नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 11 January 2011

आपण आणि ते...










परवा लोकसत्तात आलेली बातमी. 'भ्रष्टाचारात मुंबई पोलीस आघाडीवर.' त्याखालील क्रमांक, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा.

मुंबई एक सुपर फास्ट ट्रेन. ती धावते. त्यातील माणसांना जागा पकडण्यासाठी सतत धावणे जरुरीचे ठरते. दमछाक झाली तरीही. कधी कोणाला विंडो सीट मिळते तर कधी तिसरी. मग तिसरी सोडून खिडकी मिळवण्याची धावपळ. मानसिकता काय? तर सगळं कसं फास्ट. सुपर फास्ट. ह्या सगळ्या धावपळीत आम्ही कधी उंदीर झालो, पत्ता नाही लागला. बऱ्याचदा उंदीर, परंतु मांजर होण्याची धडपड. पाइपावर चढू पहाणारा उंदीर.

ही आपली धडपड, मग आपल्या सहप्रवाश्यांचं काय?
पोलीस? आपले सरकारी नोकर?

'Time is money'. ह्याचा अर्थ आपल्यासाठी - 'वेळ हा इतका मौल्यवान आहे की तो वाया घालवू नये. म्हणजेच तो फुकट जाऊ नये ह्यासाठी पैसा गेला तरीही बेहेतर.

कधी आपल्याला कायदा आडवा येतो. आपण वाहतुकीचा नियम मोडलेला असतो वा आपण जे काही काम करून घेण्यासाठी एखाद्या सरकारी कार्यालयात उभे असतो, तिथल्या नियमांप्रमाणे आपल्याकडे, पुरेसे वा गरजेचे कागदपत्र नसतात. मग आपले काम अडते. आणि मग पुन्हां- आम्हां मुंबईकरांसाठी Time is Money...मग आम्ही त्या त्या संबंधित माणसांपुढे लक्ष्मी नाचवतो. म्हणजेच आम्ही लाच देण्यास तयार आहोत...ती घ्यायची की नाही हा निर्णय तुमचा. घेतलीत तर काय, बाहेर आधीच तुमचे खाते भ्रष्टाचारी म्हणून ओळखले जात आहेच...त्यात तुमची भर. वर तिथून बाहेर पडलो की बोलायला मोकळे..."पैसे खाल्याशिवाय एक काम करत नाहीत. करप्ट साले!"
किंवा आपल्या जुजबी ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडून पैश्याची मागणी होते. मग आपला धीर सुटतो. आम्हां मुंबईकरांकडे बाकी सगळं आहे पण वेळ मात्र नाही. आणि आपला हा कमकुवत धागा समोरच्याचा आता चांगलाच परिचयाचा झालेला आहे.

आता ह्या सर्व घटनाक्रमात मुंबईकर, आपण कुठे आहोत?
गुन्हेगाराच्याच चौकटीत नव्हे काय?

काल ऑफिसमध्ये एका मित्राशी ह्या बातमीवर थोडा वाद झाला.
"ही बातमी वाचलीस काय?" मी.
"हो. बघितली." तो.
"मग? काय वाटलं तुला?"
"काय वाटणार? हे होणारच! वेळ कोणाला आहे यार इथे? ही लोकं मुद्दाम वेळ काढतात आणि मग पैसे मागतात!"
"पण जर माझ्याकडून तुम्हांला एक छदामही मिळणार नाही, अशी आपण ठाम भूमिका घेतली तर?"
"काssssही होणार नाही! तू दुबईतली तुझी कामं कशी आटपून आलीस?"
"दुबईत? दुबईत माझे काम जवळजवळ प्रत्येक खात्यात होते. पोलीस, वीज, हॉस्पिटल, घरभाडे, स्मशानभूमी, कोर्ट. तिथे मी कुठेही मला घरी परतायची घाई आहे म्हणून पैसा चारलेला नाही. शेवटी शेवटी देखील कोर्र्टाच्या कामासाठी, जे कायदेशीर आहे, तेच म्हणजे नवऱ्याच्या मित्राच्या नावे मी 'power of attorney' देऊन आले. इतकंच. त्याच्याही पुढे इथे महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये कोर्टात, महसूल खात्यात, नगरपालिकेत देखील कधीही कुठेही पैसा चारलेला नाही. वेळ नक्कीच गेला. खूप फेऱ्या निश्चितच माराव्या लागल्या. परंतु थोडं धीराने कागदपत्र वेळोवेळी सादर केल्याकारणाने माझ्याकडे कुठेही कधीही पैश्याची मागणी झाली नाही."
"इथे साधं पाण्यासाठी पण पैसे चारायला लागतात यार!"
"तेही झालं. डोंबिवली तान्हं बाळ घेऊन पाण्याशिवाय पाच दिवस काढले."
"मग काय केलंस?"
"काय करणार? काही नाही. खाली नळाला पाणी होतं. मग पाण्याच्या बादल्या चढवल्या दोन मजले. समोरच्या इमारतीतील बाई मैत्रीण झाली होती. तिच्याकडे होतं पाणी. मग कधी तिच्याकडून आणल्या बाटल्या भरून."
"इथे कोणाला वेळ पडलाय!"

समाजाचे जर दोन भाग पाडले...आपण आणि ते...आपण आणि लाच खाणारे. तर सर्वप्रथम गुन्हेगार आपण आहोत. ते नाहीत. आपली घाईच आपल्याला नडली आहे.
फक्त आपण इतके सरावलोय की हे आता आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपला गुन्हा एकच नाही. गुन्हे दोन आहेत. १. लाच देणे. २. दुसऱ्याला गुन्हा करावयास प्रवृत्त करणे.

मग आता आपली आकडेवारी कोण आणि कधी घेणार?

30 comments:

Deepak Parulekar said...

एकदम बराबर डिकरा!
आमी पण कधी कसल्याही कामासाठी कोनाला पैसा नाय चारला !

मग आता आपली आकडेवारी कोण आणि कधी घेणार?
चला काउंट करा!!!

हेरंब said...

वेगळं एकदम.. खरंच !! भ्रष्टाचार, अन्याय वगैरे कडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देतेस तू नेहमी !!!

भानस said...

टाळी वाजायला दोन हात लागतातच. मात्र टिकेची झोड नेहमी दुसर्‍यावरच... :(

श्रद्धा said...

Cent percent agree with you.

Anagha said...

खरोखर दीपक. ही जर आकडेवारी काढली तर सगळीच गणितं फिरतील. ह्या परिस्थितीला आपण किती जबाबदार आहोत हेच पुढे येईल. नाही का?

Anagha said...

हेरंब, कारण बऱ्याचदा आपणच जबाबदार असतो, आपल्या परिस्थितीला.
आणि हे मान्य केल्याशिवाय आपण सुधारणार तरी कशी ती? :)

Anagha said...

भाग्यश्री, कारण आपण ह्यात छुपे गुन्हेगार आहोत! :)

Anagha said...

आभार ग श्रद्धा! :)

सारिका said...

मी सरकारी खात्यात आहे नोकरीला..पण कधी लाच घेतली नाही...बरोबरच्या सहका-यांनाही घेऊ दिली नाही..

परीणाम काय...५ वर्षात ३ वेळा बदली..

पण हरले नाही अजुन..

Anagha said...

सारिका! मला किती अभिमान वाटतो तुझा!
मला जाणीव आहे कि तुझा लढा नक्कीच फार कठीण आहे! परंतु, मला अभिमान आहे, तू माझी मैत्रीण आहेस! कधी काही गरज लागली तर...हाक नक्की मार!

उमेश जाधव said...

सरकारी अधिकारी लाच घेतात ......यासाठी सामान्य मानुसच जवाबदार आहे...
तुम्ही आम्ही असू किव्हा नसू पण काही बंधन ही आहेतच ................पण क्रांति ही होणार आणि याच युगात.
या समाजाला एका क्रांतीची गरज आहे.

Aakash said...

ह्यात दोष कोणात आहे, हा विषय जरा बाजूला सारून; सरकारी खात्यात "self importance" नावाच्या एका factor ला आपल्याला तोंड द्यावा लागता. खूप लहान सहान गोष्टी समोरच्या कारकुनाला "काका / sir " म्हणून हाक मारल्यास पट-पट होऊ लागते. (कधी कधी इकडे खिश्याटली नोट पण बोलत नाही)

आणि तसा पण आम्ही पळवाटा शोधण्यात माहीर आहोत. इमारतीचा FSI वाढवण्यासाठी पेटीचा खोका करावा लागतो, पण आम्हाला ह्या नसत्या झन्न-झट कडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.
It all finally takes us back to our basic instincts. standing on the mark of 2011 of evolution, what we managed to achieve was - Ferrari (with a insensitive driver).

Anonymous said...

पोस्ट १०० % पटली.... माझ्या बाबांनी आमच्या घराच्या वेळेस MSEB तल्या काही लोकांशी दिलेला लढा आठवला... लढाच म्हणावा लागेल ...पण त्यांनी स्पष्ट सांगितले होते की मी चहापाणी या सदरात मोडणारा एक छदामही देणार नाहिये कश्याच साठी... खूप वेळ लागला पण जिंकले बाबा :)

अगं खूप लहान लहान बाबी असतात पण आपण बोलायचे टाळतो .. मग आपल्याला दुहेरी त्रास होतो... एक समोरच्या माणसाच्या चुकीने झालेलाच असतो आणि दुसरं की आपण विरोध का नाही केला याची बोच....

rajiv said...

आपण आणि ते.......मोहात पाडणारे व मोहात पडणारे .....जात्यातले सुपात व सुपातले
जात्यात...!!
हे तर एक अव्याहत चक्र सुरु असते ...!
आपल्या चुकांवर, त्रुटींवर वा बेकायदेशीर कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी दुसऱ्याला मोहात पाडणे
अथवा केवळ इतरांपेक्षा लवकर काम करून घेणे म्हणून `शॉट कट' शोधणे व दुसऱ्याला मोहात पाडणे व प्रवृत्त करणे हा सर्वात मोठ्ठा अपराध !

कारण यात आपण फक्त दुसऱ्याला मोहात पाडत नाही, तर जी मंडळी इमानाने आपली कामे सरळपणे करून घेऊ इच्छित असतात,
त्यांचाही हक्क डावलण्याचा अपराध आपण करीत असतो ....
हे व असे अपराध फक्त शासकीय कामात होतात असे नाही, तर कॉर्पोरेट क्षेत्रात पण कंत्राटे मिळवताना `खरेदी विभागाच्या' व पूर्ण करताना `गुणवत्ता चाचणी विभागाच्या' लोकांना खुषीची पाकिटे वा खोके वाटले व घेतले जातात.......

हे पण याच सदरांत मोडू शकते याची जाण ठेवणे आवश्यक !!

तेंव्हा क्रांती हि कोणे दुसरयाने करायची नसते तर ती स्वतःच्या विचारांत घडवून ती आचरणात आणणे असते, म्हणजे ती आपोआप समाजास चेतवून यशाची वाट चालू शकते. आज पर्यंतच्या प्रत्येक यशस्वी क्रांतीचा इतिहास बघितला तर सामान्यांचा सहभाग असलेलाच उठाव यशस्वी झालाय.

१९७७ च्या आणीबाणी नंतर झालेला दिल्लीतील `सत्तापालट' त्याचाच एक पाठ होता. दुर्दैवाने सत्तेच्या `मधा'ने व `मदा'ने `जेत्यांना ' जनतेचा पक्ष तो राखता आला नाही :(

rajiv said...

सुमारे 30 वर्षांपूर्वी माझ्या दुचाकी चालक दाखल्यावर सही करताना, अधिकाऱ्याकडून मला सांगण्यात आले होते कि ` दुचाकी काय चार चाकी दाखला घ्यायचा तुमच्यासारख्या व्यावसायिकाने ! केवळ ५० रुपये दिले असते एजंटला, तरी काम झाले असते '.
त्यावर मी त्याला सांगितले कि ` घे सही , टाक ५० रुपये' अशी टांकसाळ मी काढलेली नसल्याने व काढू इच्छित नसल्याने, मला तूर्तास दुचाकी पुरे ..!!
यावर मानही वर न उचलता मला दाखला मिळाला. असे अनुभव व्यवसायामुळे तर पदोपदी आलेत आजपर्यंत ....पण एकदाही टांकसाळ काढण्यास पूरक झालो नाही .

सौरभ said...

आह्हा!!! एकदम बरोब्बर. लाच घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी जशी सोय असते तशी लाच देणाऱ्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी आहे का? शिवाय जरी कोणी अशी तक्रार केली तरी निकाल त्या सामान्य व्यक्तीच्याच बाजूने लागण्याची शक्यता जास्त. पर बात तो पते की है की भ्रष्टाचार आपनेईच पोसा है...

Anagha said...

आकाश, खरं आहे. म्हणजेच माणुसकीवर विश्वास ठेऊन, समोरच्याला नोकर म्हणून न वागवता, 'मनापासूनचे दोन गोड शब्द' खरंच खूप कामं करून जातात.
आपल्याला एकूणच पुढे जायची इतकी घाई लागलेली आहे, कि त्या पुढल्या भविष्यातच आपण हळूहळू विष पसरवत आहोत.

Anagha said...

उमेश ही जबाबदारी प्रत्येकाची आहे..नाही का? क्रांती प्रत्येकाने आणायची आहे. प्रतिक्रियेबद्दल आभार.

Anagha said...

तन्वी, म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांचा अभिमान वाटला, परंतु, आपल्या मुलांना अभिमान वाटावा असे आपण मात्र काही नाही करू शकलो...असंच काहीसं, नाही का? काय वाढून ठेवतो आहोत आपण आपल्या पुढील पिढीसाठी देवच जाणे! :(

Anagha said...

राजीव, अॅडव्होकेट म्हणून अशी तुमच्यासारखी प्रामाणिक माणसे जेव्हा समोर येतात त्यावेळी अजूनही आशेला जागा आहे...असे वाटते.
प्रतिक्रियेबद्दल आभार.

Anagha said...

'इथे धीर धरी, धीरापोटी फळे गोमटी'...असेच नाही का? कारण सरळ मार्गाने आपण आपले एखादे काम करून घेतले..कि मग त्यात वेळ का गेला असेना, तो आनंद अधिकच..नाही का सौरभ?

THEPROPHET said...

हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे...
मला कॉमेंटायचं नाही... खूप पैलू वाटतात मला...
पण छान मांडलाय दृष्टिकोन!! :)

THEPROPHET said...

हुश्श...
झाल्या सगळ्या पोष्टा वाचून... किती लिहितेस... :D
नववर्षाच्या शुभेच्छा!!!

Anagha said...

खरंय विद्याधर...आपणच ते घडवलंय आणि कालापरत्वे अधिकाधिक गुंतागुंतीचं देखील आपणच केलंय.
फक्त काही चांगला बदल घडवून आणण्याची पहिली पायरी हीच मुळी 'ह्याला कारणीभूत आपणच आहोत' हे लक्षात घेणे ही ठरते. नाही का?

Anagha said...

हाय राम!! विद्याधर, सॉरीच रे बाबा!!! :p :D

Shriraj said...

:( कटू सत्य :(

रोहन... said...

बाबा म्हणतो तेच मी म्हणतो.. :) मी स्वतः: कुठे पैसे देत नाही पण प्रत्येकाला प्रत्येकवेळी तसे जमतेच असे नाही... आता माझ्या नवीन घराचे राशनकार्ड १ वर्ष झाले तरी अजून बनत नाही. कारण मी पैसे देणार नाही ना... तत्काळ पारपत्र बनवायला खेटा घालून कसे बसे बनवून घेतले. दर वेळी सुट्टीमध्ये हेच काम... :) पण मी पैसे देणार नाही...

पोस्ट नेहमीप्रमाणे मुद्देसूत आणि प्रभावी.. आता तेच तेच सांगायचा कंटाळा आलाय... नवीन शब्द शोधावे म्हणतो... ;)

रोहन... said...

एक सांगू का... लाच देणे - घेणे (फक्त पैसे ह्या स्वरूपात नव्हे तर कुठल्याही प्रकारचे सामान, जागा वगैरे) हा आपल्या जीवनाचा खूप पूर्वीपासून एक अविभाज्य घटक आहे. तो आपण पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. किंबहुना अनेक चांगली कामे सुद्धा लाच देऊन तडीस नेता येतात. सध्याचे बोकाळलेले भ्रष्टाचारी मात्र अति करून बसले आहेत.. ह्याला पिचले गेलेले सामान्य लोक सुद्धा जबाबदार आहेतच पण त्यांच्या हातात फार काही आहे असे मला नाही वाटत.

Anagha said...

रोहन, माझ्या माहितीप्रमाणे आपण जर राशन घेत नसू, तर आपल्याला आता राशन कार्डाची गरज पडत नाही. कारण त्या राशन कार्डावर सरळसरळ छापलेले असते कि हा निवासाचा पुरावा होऊ शकत नाही. निवास पुरावा म्हणून 'विजेचे बिल, घरभाड्याच्या रिसीटा' हे वापरले जाऊ शकते परंतु, राशन कार्ड नाही.

Anagha said...

'...किंबहुना अनेक चांगली कामे सुद्धा लाच देऊन तडीस नेता येतात.' हा मुद्दा थोडा गैर आहे. कारण ह्यात दोन भाग आहेत. १. काम चांगले आहे कि नाही. आणि २. लाच द्यावी कि नाही.
'चांगले आणि वाईट' ह्या गोष्टी प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक मतावर अवलंबून आहेत. एकदा आपण लाच देणे हेच मुळी गैर असताना ती आपण चांगल्या कामासाठी देत आहोत कि गैर कामासाठी हा मुद्दा गैरलागू. कारण मग सत्कार्य आहे म्हणून आपण लाच देण्याला इथे राजमान्यता दिल्यासारखे.
आणि, आपण ह्याला जबाबदार आहोत हे एकदा मान्य केल्यावर आपण आपल्या परीने वा आपल्या पूर्ण शक्तीने प्रयत्न करावयास हवेत. हार न मानता. जसे आपण सर्वशक्तीने स्वातंत्र्य मिळवले, त्याच भावनेने आता हा दुसरा लढा. किंबहुना त्याहून कठीण लढा आता आपल्याला द्यायला हवा. कठीण अशासाठी कारण आता तो स्वत: विरूद्धच देणार आहोत. स्वत:च्या मोहावर विजय मिळवणार आहोत. देशबांधवांशीच लढणार आहोत.