नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 8 January 2011

आधार!

वर्षाची अखेर. मिट्ट अंधार. समोर क्षितीज नसलेला काळाशार समुद्र. आशा भोसले, ओ पी नय्यर टेपरेकोर्डवर. सगळं धुंद. बेधुंद. त्यात मद्याची साथ. शेखर, राजेश, निखील आणि मुकूल. चार तिशीतले मित्र. त्यातील शेखर आणि राजेश सपत्नीक. शेखरची आरती आणि राजेशची मुक्ता. शेखर आणि आरतीचं गोजिरं ९/१० महिन्यांचं बाळ देखील साथीला. थंडी वाजू नये म्हणून टोपरंबिपरं घालून बसवलेलं. वाळूत खेळत. आईबरोबर. रात्र उलटून चालली होती. मद्य कार्यरत होते.

"चला यार! पाण्यात जाऊ." निखील म्हणाला.
"चल!" मुकूल.
सगळे निघाले पाण्यात डुंबायला. थंड समुद्र नाहीतरी बराच वेळ बोलवतंच होता.
बाळ आणि आई किनाऱ्यावर. बाळाचे बाबा पाण्यात डुंबायला निघाले. राजेशची तरुण पत्नी, मुक्ता, हौशी होती. तिने इतका सुंदर पेहेराव काही कोरडाच परत न्यायला बॅगेत भरला नव्हता.
"आरती, तू नको जाऊस त्यांच्यात." राजेश.
"का बरं? तुझी बायको गेली की पोहायला!"
"ती जाऊ दे! तू बस इथेच! मी थांबतो तुझ्याबरोबर!"
नाही तरी इतक्या पुरुषांसमोर पोहण्याचा तोकडा पेहेराव घालणे तिला शक्य नव्हतेच. बाळाला देखील झोप लागलेली होती. तिच्या कोरड्या पण उबदार मांडीवर.
"ठीक. पण तू देखील गेलास तरी हरकत नाही! मी बसेन इथेच!" आरतीचा एकटीने तिथे थांबायला काहीच आक्षेप नव्हता.
"नको."

आशा आणि ऑ. पी. नय्यर कधी थकलेत? त्यांना रात्र देखील तोकडीच. राजेश घुटके घेत आणि आरती गाणी ऐकत बसून होते. मुक्ता, मुकूल, निखील आणि शेखर पाण्यात खेळत होते. भरपूर आणलेला 'स्टॉक' मात्र संपत चालला होता. शरीर व डोकं...ताळ आणि तंत्र. सैल सुटलेले. समुद्राच्या लाटांवर शरीर खालीवर. मद्याच्या लाटांवर डोकं वरवर. डुंबणं आता फार झेपणारं नव्हतं. बाटल्यांनी तांबडी जादू प्रत्येकावर केलेली होती. जिभा जड झालेल्या होत्या. चाल वाकडी होऊ लागली होती.

"चल ना रे आता! परत जाऊ या आपण रूमवर! हा पण गाढ झोपलाय." आरतीने शेखरला विनवणी केली त्यावेळी तो हलक्याफुलक्या ढगांवर तरंगत होता. आरतीला त्यात काय नवे?
"चला रे! जाऊया रूमवर! हे असं बायकापोरांना आणलं की असंच व्हायचं!" शेखर त्याच्या विनोदबुद्धीमुळेच तर मित्रांना प्रिय होता.
"म्हणून आम्हीं लग्न करत नाही." ब्रह्मचर्य न पाळणारा 'ब्रम्हचारी' निखील आपण हुशार आहोत ह्याची खातरजमा करत उद्गारला.
"चला. उचला रे सामान."
मुक्ताने गोव्यामध्ये पूर्वी घेतलेलं रंगीबेरंगी कापड कमरेला गुंडाळलं. भिजलेले केस झटकले. ह्या ओलेत्या अवस्थेत आपण अधिकच मादक दिसत असणार ह्या खात्रीत तिने रुमच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. तिच्याबरोबर राजेश व मुकूल. आणि त्यांच्याबरोबर पुढे शेखर. आता मद्य अंमलामुळे विनोदबुद्धीच्या अधिकच भराऱ्या. मागे आरती आणि कडेवर झोपलेला चिमणा जीव.
रस्ता अंधारलेला. अंधाराला डोळे सरावलेले असले तरी देखील काळोख तो काळोखच. मद्य आणि अंधार. सैतानाचं साम्राज्य. निखिलचे पाय आरतीपाशी रेंगाळले. शेखर दूर दिसत होता. विनोदा मागे विनोद. मुक्ता तुफान हसत आणि साथीला राजेश होताच. "शेखर, तू ना साल्या!"

सप्तपदी नाहीतरी मागूनच पूर्ण केली होती. मग आता ती मागे राहून गेली तर त्यात काय बिघडलं? आरतीच्या कानापर्यंत नवऱ्याने मारलेला विनोद काही नव्हता पोचला. आणि मिट्ट काळोखात कडेवरल्या तान्हुल्याला सांभाळण्याची कसरत अधिक महत्त्वाची नक्कीच होती.
अकस्मात तिच्या खांद्यावर आलेला हात तिला धडकी भरवून गेला.
"घाबरू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. मी घेतो तुझी काळजी!" सैतान खुदूखुदू हसत होता तेव्हा काही तो शेखरच्या विनोदाला दाद देत नव्हता.
स्पर्श कळतो. तिने खांदा झटकला. काळोखात पडले तरी बेहेतर अश्या वेगात ती अंधारात दूर झाली.
"अरे! अशी काय! मला तुझी काळजी वाटली म्हणून आलो होतो! तुला मदत करायला!"
"मी ठीक आहे! तू जा!"
अंधारात शेखर, मुकूल, मुक्ता आणि राजेशच्या आकृत्या पुसटश्या दिसत होत्या.
आरतीचं खेकसणं ऐकून खांदे उडवून निखील त्यांना सामील झाला.

आरती एकटीच चालू लागली. कडेवरच्या बाळाला काय माहित. आईच्या अब्रूवर उठलेलं. अंधारात दूर दूर जाणारा बाबा...आकाशात मंदावलेल्या चांदण्या...धूसर होणारा चंद्र...विनोदी शेखरच्या विनोदाला मिळालेली दाद...अंधारात घुमणारी...कानात बोचणारी. रात्र अखेर संपत आली होती.

नूतन वर्षाचा आरंभ झाला होता.

16 comments:

सौरभ said...

हम्म्म्म... हम्म्म्म्म... फार सुरेख लिहलय. नक्की काय बोलावं समजत नाही. चिवित्र वाटतय. एक बरय, सैतान औकादमधे राहिला.

सारिका said...

हा सैतान सगळीकडे पाहयाला मिळतो..अगदी आपल्या घरापासुन ते ऑफीसपर्यत्..सगळीकडे...
नेहमीसारंखं छान मांडलं आहेस..

Anagha said...

सैतान...बरोबर...ओळखता तरी आला.
परंतु, शेखरला काय म्हणावे?

Unique Poet ! said...

खरी परिस्थिती आहे ...................

Anagha said...

सैतानाचा जन्मच मुळी शेखरच्या मदमस्त वागणुकीमुळे झाला असावा...नाही का?

Anagha said...

समीर, आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

Anagha said...

सारिका आभार....

हेरंब said...

बापरे.. मला पण सौरभसारखंच एक विचित्र फिलिंग आलंय..
रात्र, समुद्र, बाटल्या.. नेहमीच भयानक कॉम्बो असतो हा !!

Anagha said...

त्रांगडं ना? हेरंब?

Shriraj said...

अनघा, काही दिवसांपूर्वी (पुण्याला जाऊन आल्यावर) माझी बायको डोळ्यात पाणी आणून हेच सांगत होती... तो नालायक माझाच नातेवाईक होता... थोड्यावेळासाठी वाटलं मुलुंडला जाऊन त्याला झोडावं.

rajiv said...

अरे श्रीराज, या गोष्टी थोड्यावेळासाठी नाही तर `कायम'साठी वाटायला पाहिजेत .
जा जाऊन झोड त्याला घरी !!! कायद्यात न सापडता कसे करावे ते मी तुला सांगतो .!!

Shriraj said...

तसा शब्दांचा मार दिला मी त्याला...

Aakash said...

Bolayla shabdach nahi urle (mhanun adhicha blank comment dila.)

Anagha said...

:)

THEPROPHET said...

:-S
मला कळत नाही काय लिहू ते..
सुन्न वाटतं कधी कधी!

Anagha said...

:(