नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 7 January 2011

प्रसन्न दिवसाची सुरुवात...

पहाट झाली. रोजच्यासारखी. फरक एव्हढाच की मी गजर बंद करून झोपून गेले नाही तर चालायला गेले. आमच्या शिवाजी पार्काला चांगल्या ३ गरागरा चकरा मारल्या. भोवऱ्यासारख्या. भोवरा मी टाकला असल्याने तीन चकरांतच पडला! रोजचीच शहाणी वेडी, म्हातारी तरणी, कुत्रे मांजरी दिसले. मग मी घरी आले. माझी फर्स्ट क्लास कॉफी प्यायले. नखरा केला...म्हणजे जेव्हढा झेपतो तेव्हढा केला. मग आरश्याने जेंव्हा हसून, "you may go now" म्हटले तेव्हाच पर्स उचलली आणि निघाले.

कशासाठी?
अर्थात पोटासाठी!

खाली आले. वाहन सुरु केलं. मी बघितलंय...म्हणजे माझा मुळी तसा अनुभवच आहे...सक्काळी गाडी सुरु केल्याकेल्या लागलेलं पहिलं गाणं जर आपल्या आवडीचं असेल तर दिवस चांगला जाण्याचा संभव अधिक असतो. खात्री नाही. पण संभव असतो. तर अगदी, तेरे मस्त मस्त दो नैन...चालू होतं...खुशीत निघाले...

गाडी रस्त्याला लागली. दुसऱ्या रांगेत. उजव्या हातावरील जलद रांगेतील गाड्या घाईघाईत. एकूणच मुंबईच्या रस्त्यावरून गाड्या कश्या स्वच्छंदी विहरत असतात. म्हणजे बागेत बागडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरासारखं. सांगता येणे कठीण की पुढल्या क्षणाला त्याची झेप कुठल्या दिशेला असेल. तर डावीकडून अकस्मात एक कानटोपी घातलेले गृहस्थ दुचाकीवरून पुढ्यात आले. आता त्यांचा त्यांचा एक वेग. माझा माझा एक वेगळा वेग. काकांना दुसऱ्या रांगेची गती बहुधा अमान्य होती. उजव्या हाताला तर चिकटलेल्या फुलपाखरांची मालाच तरंगत होती. म्हणजे ती तोडणे काही शक्य नाही. आणि हातात भोंगा आहे म्हणून वाजवणे म्हणजे अगदी समोरच्याला 'दूर हो जा मेरी नजरोंसे" असे त्याच्या अंगावर खेकसण्यासारखेच! आणि ते सुद्धा वयस्क काकांच्या अंगावर! म्हणजे ते काही खरं नाही. आणि काका जसे काही मला ऑफिसचा रस्ता दाखवायलाच निघालेले. म्हणजे अगदी follow me! मग त्यांच्या भावनेचा आदर चांगली पाच मिनिटे केला....आणि रोजचे डावे वळण आले...घेतले आणि मार्गाला लागले...स्वतंत्र.

गाडी तळघरात लागली. ठराविक जागेवर. म्हणजे काका सोडल्यास सर्व नेहेमीसारखेच चालू झाले होते.

तळघर ते आसन, पंधरा मिनिटे प्रवास. रोजची वादळापुर्वीची शांतता. रोजचा दिवस हे एक वादळच. सगळेच झपाटलेले...मिटींगा, डेड लाइन्स म्हणजे जसा रोजचा मृत्यूचा फतवा. पैश्याची आवक किती वाढली? डोकं किती वापरलं? की क्लायंटने मागितलं आणि ते देऊन टाकलं? जसं वाण्याकडे...साखर द्या, साखर दिली. गहू हवे, गहू दिले. हे असे रोजचे वादळ. तारेवरची कसरत. आज पंधरा मिनिटांच्या त्या शांततेवर झडप घातली, आडव्या तिडव्या घिरट्या घालणाऱ्या विचारांनी. म्हणजे वादळाआधीच चक्रीवादळ! चक्रीवादळाला कसले भान? नुसते थैमान. पंधरा मिनिटांनी लढाईत उतरायचे होते. तिथले रोजचे डावपेच. रोजच्या लढाया. प्रत्येकाची जिवंत रहाण्याची धडपड. वार, प्रतिवार. जवळजवळ सगळेच वार पाठून. हत्यार वाट्टेल ते. तलवार, खंजीर...नुसती भोसकाभोसकी. जिवंत रहाण्याच्या धुंदीत प्रथम पांडव वाटणारे, कधी कौरवात रूपांतरित झाले...हे ज्याचे त्याला देखील कळले कि नाही शंकाच. कसली मैत्री आणि कसली दोस्ती. काचेच्या केबिना, जसे पारदर्शक तंबू. खलबते, कारस्थाने. सतत. बाहेर त्याचा अस्पष्ट देखील आवाज नाही. कधी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय ह्याचा पत्ता लागायचा नाही. गुळगुळीत मस्क्यातून धारदार सुरी सफाईने बाहेर निघावी. रक्ताचा टिपूस नाही.

तळघरातून वर आले. घिरट्या आता घिरट्या नव्हत्या उरलेल्या. मेंदूवर घारींनी झडपच घातलेली जशी. लचके नुस्ते! युध्द. लढाई....राजकारण.

इमारत खंबीर. उभी आडवी. निळ्या काचा लावलेली. पारदर्शक. चालताचालता मान वर केली. सहज डावीकडे बघितलं. आणि दचकले. जे काही दिसलं त्याने खाडकन जागीच झाले. युद्धाचे सगळे परिणाम चेहेऱ्यावर पसरलेले. घरातील आरशाने तर पसंती दिलेली होती. परंतु ह्या निळ्या काचेत जे प्रतिबिंब दिसलं ते मात्र काही सुखावह नव्हतं. त्या वेड्यावाकड्या विचारांनी दिल्या होत्या आठ्या. असंख्य. एकेक रेषा चेहेऱ्यावरची त्रासलेली. कपाळ जसं धारातीर्थी पडलेले बाण. वाया गेलेले. ओठ वक्र झालेले. माझ्या चेहेऱ्यावर माझा ताबा नव्हता? डोक्याच्या आतील थैमान...बाहेरील सर्व स्नायूंवर ताबा मिळवून बसलेले. त्रासलेले विचार...विद्रूप चेहेरा. अतिउष्णतेने भांडं तडकावं...बेढब व्हावं. दिवसाची ही अशी सुरुवात?

एक मिनिट ती भिंत पार करायला. तितका वेळ पुरला स्वत:चा चेहेरा बघायला. मनात विचार आला. चला, आपलं डोकं हे काही नारळ नाही नक्की. वरून कणखर आणि आतून नासके. उलट डोक्यात चक्रीवादळ तर चेहेऱ्यावरदेखील तीच खळबळ. मग फारफार तर कमळ म्हणता येईल...ऊन लागलं, कोमेजलं...पुन्हा पाण्यात रोवलं...ते हरखून गेलं. आता ह्या आत्मस्तुतीने मात्र हसू आलं...इमारतीच्या दाराशी रखवालादारांचे रोजचे चेहेरे दिसले. मग हसू अधिक पसरत गेलं...अगदी त्यांच्या चेहेऱ्यांपर्यंत.

20 comments:

सौरभ said...

मां कस्सम... डोकं आहे की कुरुक्षेत्र??? ऑफिसात कधी ना कधी कोणीतरी अनघा मॅडमच्या हातुन मार खाणाऱ्ये नक्की.

rajiv said...

खरेय! एकदम पटले बुवा !! आपली सकाळ कशी सुरु होतेय त्यावर आपल्या दिवसाचे भवितव्य ठरू शकते.
एखाद्या आवडत्या गाण्याने वा दूरध्वनीने प्रसन्नपणे सुरु झालेला दिवस पुढील वाईट घटनांवर मात करून त्यांची तीव्रता कमी करण्यास कारणीभूत होते !!
restiscrime वरील पोस्ट ने पण असेच घडते ....

Anagha said...

सौरभबुवा, मी काय कोणाला मारणार?!
कॉर्पोरेट युध्ये सगळी!

Anagha said...

:) राजीव, एखादं छानसं गाणं....छानशी कॉफी...वर्तमानपत्रातील एखादा चांगला लेख...
मग लागतो माझा दिवस नीट मार्गी!
आभार हा प्रतिक्रियेबद्दल. :)

Deepak Parulekar said...

गुड मॉर्निंग !
सही झाला आहे लेख!
कॉर्पोरेट मंडळ आभारी आहे ! :)

हेरंब said...

बाब्बो.. विचारांची वावटळ नुसती... कठीण आहे !

Anagha said...

वावटळच हेरंब...:)

Anagha said...

हेहे!! 'कॉर्पोरेट मंडळ आभारी आहे!' :D :D :D
सक्काळी सक्काळी हसवलंसच तू दीपक! आजचा दिवस छान जाणार! आणि सुट्टीचा दिवस आहे! :)
मित्रमंडळ आभारी आहे! :p

Anonymous said...

अगं बाई सुटलीयेस तुफान....(पोस्टेत हं.. प्रत्यक्ष ब्रम्हदेवाने हार मानलीये ;) )

कसलं कसलं लिहीलेयेस एकदम... माझी सकाळ प्रसन्न एकदम :)

Anagha said...

हो ना गं तन्वी! हे असं माझं वारू चौफेर धावत असतं! आभार गं प्रतिक्रियेबद्दल!
:)

रोहन... said...

सिद्धहस्त आहेस तू... :) काही क्षण जे विचार डोक्यात थैमान घालतात ते तू शब्दावाटे उतरवू शकतेस.... कधी जमणार असे मला... :(

Unique Poet ! said...

आपल्या मनात काय काय असंख्य सतत चालू असतं याचा हा उत्तम नमुना आहे , एके ठिकाणी वाचलं होतं की आपल्या मनात एका मिनिटात ६०० विचार येतात ,
हे जर प्रमाण धरले तर ही पोस्ट लिहीताना किती विचार आले असतील ? :)

Anagha said...

बाप रे!! समीर, ६००? हेहे! एका विचारावर एक पोस्ट! :p ;)

Anagha said...

रोहना, आणि तू लिहितोस ते...मस्त मस्त रोमांचकारी पोस्टा? थरारक!!!

Unique Poet ! said...

अनघाताई ! भारी आयडिया ! एका विचारावर एक पोस्ट , पण त्या ६०० विचारांपैकी प्रत्येकाला नीट पकडून ठेवायला १००० वेळा विचार करावा लागेल. ;)

Anagha said...

:D :D

Shriraj said...

राजीव चे म्हणणे अगदी पटले
>> restiscrime वरील पोस्ट ने खरच असेच घडते

Anagha said...

आभार हा श्रीराज. :)

THEPROPHET said...

अनघाताई कुणालातरी कॉर्पोरेट धुणार एकदा ;)

Anagha said...

'कॉर्पोरेट धुणार'!! :D :D
बोडकं माझं!