नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 5 January 2011

शप्पत!

"श्शी! वाजतंच नाहीये!"
फ्रॉक गुंडाळून घेतला होता आणि पाय दुमडून एक लाल केप फोडणे चालू होते. घरातील हातोडी घेऊन. पण हातोडी जमिनीवर धाड धाड फक्त आपटत होती आणि तो केप फुटल्याचा फट्ट आवाज मात्र येत नव्हता. म्हणजे हे भलतंच. उगाच खालच्या अण्णांना त्रास. आणि मग बाबांकडे तक्रार. त्यातून ती एकच केप खाली मिळाली होती. एकटीच पडलेली. बाबा काही आवाजाचे फटाके आणून देत नाहीत! त्यांना कित्ती सांगितलं. सगळे वाजवतात! आमच्या बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक आहेत! ते सगळे लवंगा लावतात! बिल्डींगीमध्येच लावतात! सक्काळी सक्काळी! केव्हढा आवाज होतो! मी तर एकदम दचकूनच उठते! पण मग त्यामुळे मी गेले ३/४ दिवस लवकर उठतेय ना? नाहीतर तेच ओरडत असतात! "उठ अगं, आठ वाजले! आळशी नुसती!" आता ते गेलेत ऑफिसला! आई पण! मला सांभाळायला एक आजी ठेवल्यात! त्या नुसत्या दिवसभर माझ्यावर लक्ष ठेऊन असतात! मला आता हे असे रस्त्यात वेचुनवेचून केपा आणायला लागतात! हे माझे बाबा! म्हणे आवाजाचे फटाके वाईट!
"XXX XX!"

रात्र झालीय. बाबा असे काय पुस्तकात डोकं घालून बसलेत? आज माझ्याशी बोलत का नाहीयेत? माझ्याकडे बघत पण नाहीयेत ते! असे काय करतायत? आई पण जास्ती बोलत नाहीये! बोलत नाहीये पण घातली बाबा तिने माझी गादी! झोप कित्ती आलीय मला!

परवा बाबा बोलत नव्हते. काल बाबा बोलत नव्हते. आज पण बाबा बोलत नाहीयेत!! आई पण नुस्ती मला अंघोळबिंघोळ घालते आणि जाते ऑफिसला! माझ्याशी कोणीच बोलत नाहीये!!
"आईई"
"हं. काय?"
"बाबा बोलत का नाहीयेत माझ्याशी?"
"त्यांनाच विचार!"
"तू सांग ना!"
डोळे भरले बुवा आता!
"तू त्या दिवशी काहीतरी घाणेरडी भाषा बोललीस ना?"
लटपट लटपट! पाय हो!
"असं कोण म्हणालं?"
"आजींनी सांगितलं बाबांना! लगेच! बाबा ऑफिसमधून आल्याआल्या!"
"हो?"
मुसुमुसू.
"आता काय करू मी?"
"जा बाबांकडे आणि माफी माग!"
बाबा ना कायम पुस्तकातच डोकं घालून असतात! म्हणजे तुम्हीं समोर उभे राहिलात ना तर ते पुस्तकच दिसेल तुम्हांला! बाबा दिसणारच नाहीत! म्हणजे त्यांचं डोकं दिसणारच नाही!
"बाबा"
-------
"बाबाआआआ"
"काय?"
"तुम्हीं बोलत का नाहीहात माझ्याशी?"
"हं"
"सांगा ना बाबा!"
"तू काय बोललीस त्या दिवशी? कोणी शिकवलं तुला हे असं बोलायला?"
-----
घळाघळा!
"ते असं आलंच कुठून तुझ्या तोंडात? ते तू दिवसभर खाली वाडीत उनाडक्या करत असतेस ना?"
"नाही बाबा!"
"आता एक काम करायचं?"
रडक्या तोंडावर एक प्रश्नचिन्ह.
"हात ठेव माझ्या हातावर...हा....आणि म्हण...मी पुन्हा असं बोलणार नाही...मी पुन्हा असे वाईट शब्द उच्चारणार नाही."
बाबांचा हात ना मऊ आहे! आणि उबदार!
"बाबा, मी पुन्हा असं बोलणार नाही...मी वाईट काही बोलणार नाही."
"शप्पथ घेतलीयस तू! आता परत अजिबात असं बोलायचं नाही! वाईट असतं ते. आपण हे असे शब्द नाही बोलत. कळलं?"
मान हलली. बाबांनी कडेवर घेतलं.
हुश्श!!!

"मूर्ख! अक्कलशुन्य गाढव! आचरट! XX ची त्याच्या!"
"हं बोल बोल! ऐकतायत आजोबा!"
"अगं हे ना, ह्या मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून ना माझं असं झालंय! तो मूर्ख बघ ना कसा गेला आपल्याला ओवरटेक करून! आपटलाच असता तो आता आपल्या गाडीवर! "
"उगाच कारण नको सांगूस! शप्पथ घेतली होतीस ना? काय झालं मग त्याचं?"
"श्या! तुला ना मी उगाच सांगत बसते काहीतरी!"
"हो का? मुद्दा तो नाहीये! तू शपथा मोडतेस! आणि मग मला कशाला सांगतेस शपथ मोडायची नसते म्हणून?"
"अगं माझे आई! नाही बोलणार परत! मग तर झालं?!"
"घे शप्पथ!"
"आईशप्पत! तू पण ना! आहेस खरी!"
:p

33 comments:

भानस said...

:D
तू पण ना...

हेरंब said...

मोडायच्या शपथा मी डाव्या हाताने घेतो.. हेहेहे ;)

Anagha said...

बघ ना ग! काहीतरी कुठेतरी ऐकलेलं! आणि आलं ना असं तोंडून बाहेर?! :p

Anagha said...

हा!! हेरंब, ये आयडीयेकी कल्पना सही है!!
बाबांना माहित होतं वाटतं हे! माझा उजवाच हात घेतला तो त्यांनी!
:p

सौरभ said...

आह्हा आह्हा आह्हा!!! हा पोस्ट केवढा फिरला. केवढं काय शिकवुन गेला. हा धडा माझ्या सदैव लक्षात राहिल. आणि कसलं निरागस लिहलय... समोर घडल्यासारखं वाटत होतं. एक केळं खाऊन ह्या कानापासून त्या कानापर्यंत स्माईल. :) :D

हेरंब said...

सौरभ, म्हणजे नानाची मंजू स्माईल देते तसं स्माईल ना रे ? :)

सौरभ said...

नानाची मंजू??? कोण नाना?? कोण मंजू??? (चांगली आहे का रे दिसायला?? ;))

Anagha said...

टपोरी नुस्ते!! :D

सौरभ said...

हेरंब, तुला टपोरी बोल्ल्या रे. अशी टपोरीगिरी सोडुन दे रे. ;P ;D

BinaryBandya™ said...

मस्त झालीये पोस्ट..
आवडली ..

Anagha said...

सौरभ, कशी तोंडघशी पडले ना!?
मोठं आपण काही शिकवायला जातो...स्वत: नेहेमीच पाळतो असं नाही आणि मग हे असं होतं! :)

Anagha said...

:) बंड्या, आभार!

Shriraj said...

रडवता रडवता हसवलेस, अनघा. सुंदर! मस्त!! अप्रतिम!!!

Anagha said...

:)

हेरंब said...

अरे स्प्येलिंग मिस्टेक झाली.. नानाची मंजू नाही मंदू. ए आणि टपोरी बिपोरी काय? तू आम्हाला टपोरी म्हणालीस तर मग ते नानाला पण लागू होईल.. २००३ च्या वर्ल्ड कपदरम्यान सोनी टीव्हीवर मंदिरा बेदी कॉमेंटरीच्या नावाखाली जो काही धुमाकूळ घालायची त्यावर नानाने एक लेख लिहिला होता. कुठल्या पेपरात ते आता आठवत नाही.. माझ्या मेलबॉक्समध्ये असेल तर शोधून फॉरवर्ड करतो. असो.. तर त्या लेखात केळं आडवं खाणं हा वाक्प्रचार मी पहिल्यांदा वाचला होता.. सौरभच्या कमेंटवरून नाना आणि मंदूची आठवण झाली :) हुश्श.. किती मोठी कमेंट.. दमेश !!

Anonymous said...

मस्तच गं माते... अगदी आईशप्पथ.. येव्हढी एकच खर्री शपथ बाकि देवालाही गंडवते मी ;)

>>>>मोडायच्या शपथा मी डाव्या हाताने घेतो.. हेहेहे ;)

हे सहीये.. मी उघड उघड शप्पथ्थ म्हणजे आणि लगेच मनात ’नाह्ही’ असे म्हणते.. म्हणजे शप्पथ नाही असे झाले असेअच मानते... :)

पण पोरं खरचं कधी कानपिचक्या देतील नेम नाही गं.. :)

Anagha said...

हेहे!! 'नानाची मंदू' वाचलं! मस्त!!! :D
आणि नाना पाटेकर आमच्या कॉलेजचा आहे. त्यामुळे त्याच्या 'टपोरी'पणाच्या खूप गोष्टी अगदी विश्वासू हेरखात्याकडून ऐकलेल्या आहेत! :p
परंतु, एक नट आणि एक चित्रकार म्हणून त्याचं कौशल्य हे वादातीत आहे!
आणि नाना पाटेकर हा माझा एक 'विक पॉइंट' आहे! :p

हेरंब said...

>>मी उघड उघड शप्पथ्थ म्हणजे आणि लगेच मनात ’नाह्ही’ असे म्हणते.. म्हणजे शप्पथ नाही असे झाले असेच मानते... :)

हा हा हा तन्वे !! जब्बरदस्त कैच्याकै :)

Anagha said...

बघ ना गं तन्वी! आणि ही माझी लेक ना ह्या अश्या कानपिचक्या मला वारंवार देत असते! म्हणजे आई कोण हा प्रश्नच पडावा! :p

Anagha said...

:D :D हेरंबा, चांगली क्लुप्ती आहे ना ही! तन्वीची! :p

सारिका said...

मस्तच...!!

Anagha said...

:) आभार गं सारिका. :)

Deepak Parulekar said...

हे हे हे! सॉरी बर्‍याच उशीरा कमेंट देतोय!
खरं तर वरच्या सगळ्या कमेंट्स वाचुन हसायला येतयं !

:)

Anagha said...

हरवला होतास ना दीपक? :)

Suhas Diwakar Zele said...

अनघा तू पण ना..परत असा करू नकोस हां !!
स्वगत - माझ्या वाक्यात येणारे कर्ता, कर्म, विशेषण बदलायला हवीत ;-)

Deepak Parulekar said...

नाही गं तुझा "लढा" वाचुन थोडासा बावरलो होतो!
काही सुचत नव्हतं कमेंट द्यायला!
खरचं आयुष्य आपल्याला काय काय शिकवतं ना!

Anagha said...

:D सुहास, अरे हे मुंबईतले ड्रायव्हिंगना मला असं तोंडघशीच पाडतं! उस्फूर्तपणानेच येतं असं काही तरी तोंडून! :p

Anagha said...

दीपक, I understand.:)

हेरंब said...

अग माझी बायडीही तुझ्या आणि नानाच्याच कॉलेजची आहे :)..

>> नाना पाटेकर हा माझा एक 'विक पॉइंट' आहे!
माझाही.. विकेस्ट म्हण हवं तर.. :D

Raindrop said...

u didn't break the shappat....u let out your anger in a creative verbal medium :) imagine if you had gotten out of the car to beat up that guy, would have been worse na :)

Anagha said...

:D :D creative verbal medium!!! Hehe!! Vandu! That's really supportive! :)

THEPROPHET said...

मी लहान होतो तेव्हा मला वाटायचं नुसती शप्पथ आणि आईशप्पथ ह्यांमध्ये आईशप्पथ जास्त पावरफुल आहे...
वेल हे खरं असलं तरी मला कारण माहित नव्हतं! :D

Anagha said...

हेहे!! :D :D