नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 20 June 2013

पुन्हा वाचन…

कान आणि डोळे कार्यरत असले की तोंड बंद रहातं. एखाद्या मधमाशांच्या पोळ्यागत, आपला मेंदू नित्य नव्या ज्ञानाने प्रसरण पावू शकतो. आणि त्यातून आपले डोळे उघडतात.

मिलिंद बोकीलांचं 'गोष्ट मेंढा गावाची' हे पुस्तक. एक आदिवासी गाव. मेंढा. देवाजी, गावातील प्रत्येक गावकऱ्याला सोबत घेऊन सर्वांच्या विचारांत व त्यातून सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणतात. परिस्थितीला एक धडा म्हणून बेधडक अंगावर न घेता पळवाटा पकडणाऱ्याने, तर आधी हे पुस्तक मिळवावे.  
शहरातील आमची पाच बोटं एकजूट का नाही दाखवत ?
कारण त्या प्रत्येक बोटाला दुसऱ्यापेक्षा अधिक उंचीची आस आहे.

एका देशातील पक्षी जेव्हा दुसऱ्या देशातील भेटत असेल तेव्हा ते एकमेकांत  कुठल्या भाषेमध्ये संवाद साधीत असावेत ?
जर त्यांना कधीही ही पंचाईत पडत नसेल तर ती मला का पडावी ?
मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येतं कारण ती माझी मातृभाषा आहे. शाळेत इंग्रजी होतं तरीही इंग्रजीतून बोलण्याचा फारसा प्रसंग येत नसे. आणि कॉलेजमध्ये अर्धेअधिक मराठी बोलणारे त्यामुळे तिथेही काही अडले नाही. नोकरीला लागल्यावर मात्र कधी आणि कसे कोण जाणे परंतु इंग्रजी, जिभेला हलके वाटू लागले आणि डोळ्यांना झेपू लागले. परंतु, बंगाली भाषेचा आणि माझा संबंध शून्य. मुंबईत बरेच बंगाली आहेत परंतु त्यांना मातृभाषा येत नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचे दुर्दैव अधिक आहे. ते देखील माझ्यासारखेच ब्रिटीश जी भाषा सोडून गेले त्या भाषेचा आधार घेऊन रवींद्रनाथ टागोर वाचतात.

Chokher Bali.
वाळूकण. 
डोळ्यामध्ये खुपणारा.
आणि शिंपल्यामध्ये मोती फुलवणारा देखील वाळूकणच.
तरुण विधवा बिनोदिनी ही त्या वाळूकणासारखी.
रूपवती, बुद्धिमान, अहंकारी. सरळसाध्या, हळव्या, आशाच्या आयुष्याची होळी पेटविण्यास निघालेली ही बिनोदिनी.
रवीन्द्रनाथांच्या ओघवत्या बंगाली भाषेमधील हे पुस्तक मला वाचता आले असते तर काय बहार आली असती !

Broken nest and other stories.
पुन्हा भाषांतर.
ह्या कथेचा चित्रपट आला तो चारुलता ह्या नावाने. पुस्तकातील नायिकेचे नाव चारुलता. माझ्या सौभाग्याने मला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी मिळाली होती. आणि नशिबाने ती मी दवडली नव्हती. चित्रपट आधी आणि त्यानंतर पुस्तक वाचणे ही तशी काही फारशी आनंदाची गोष्ट नव्हे. परंतु ज्यावेळी दिग्दर्शक सत्यजित रे असतात त्यावेळी त्या चित्रपटाविषयी असे काही बोलता येईल काय ? पुस्तकामध्ये टागोरांनी आपल्या शब्दांमध्ये श्रीमंत घरातील तरुण चारूचे उदास, एकटे दिवस टिपले आहेत तर चित्रपटात तेच सत्यजित रेंनी तितक्याच भकासतेने टिपले आहे. एकटेपणातून आपल्या दिराकडे नकळत ओढली जाणारी चारू…निर्बळ, हताश चारू. 
वितभर लांबीचं हे पुस्तक आणि कृष्ण धवल सिनेमा. त्यातील ही ९३ पानांची गोष्ट.
एकही शब्द जसा उणादुणा नाही तशीच चित्रपटामधील एकही चौकट ही अडगळ नाही.
त्याच पुस्तकातील The Ghat's tale, Notebook आणि Postmaster ह्या लघुकथा.
"आई, तुला त्यातली कुठली गोष्ट सर्वात आवडली ?"  माझ्या लेकीने पुस्तक वाचून संपवून पलंगावर ठेवता ठेवता मला विचारलं. मी विचारात पडले. "The Ghat's tale." मी म्हटलं. 
"तुला गं ?" 
"काही सांगताच येत नाही. पण मला वाटतं मला Postmaster आवडली."
हे पुस्तक नक्की मिळवा. संपल्याशिवाय खाली नाही ठेऊ शकणार तुम्ही.
मूळ तुर्क भाषेतील 'My name is Red' हे इंग्रजी पुस्तक वाचताना हे भाषांतर आहे असे अजिबात जाणवले नव्हते. दुर्दैवाने सदर बंगाली साहित्याचे तसे नाही म्हणता येत. बऱ्याच वेळा शब्द टोचतात. वाक्य खुपतात. भाषांतर सुंदर असायला हवं होतं अशी चुटपूट वाटत रहाते. 
"Why these translations are so bad?" मी माझ्या एका बंगाली मित्राला विचारलं. बंगाली लोकांचं इंग्रजी वाईट असतं असं न पटणारं उत्तर मला मिळालं. कोण जाणे माझ्या प्रश्नातील दु:ख त्याला झेपलं नसावं.
दुसऱ्या एका मूळ बंगाली 'इंग्रजी कॉपी रायटर'ला देखील मी हाच प्रश्न विचारला. तो म्हणाला…God knows. मी म्हटलं," Why don't you try ?"
"My Bengali is not good!"

मराठी भाषेतील भाषांतर कदाचित मला खटकले नसते काय ?

The Little Prince.
हे पुस्तक तुम्ही अजून नाही वाचलंत तर काय वाचलंत ? 
हा आणि हाच प्रश्न योग्य आहे. इतके हे पुस्तक सुंदर आहे. १९४३ साली, ओंत्र दि सा-एक्झुबे ह्या फ्रेंच लेखकाचे हे पुस्तक, कमीतकमी २५० भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. माझ्या हातात हा छोटा राजपुत्र विसावला तो गौरीच्या घरातून. शंभर पानांची ही गोष्ट. जन्माला आल्यावर आपण धडपडत चालू लागलो होतो…कुठलेही नियम ज्ञात नव्हते. कागदावरच्या चार रेघांमध्ये, अवकाशातील कुठल्याही आकारामध्ये आपल्याला काहीही गवसू शके. हळूहळू ती नजर धुसर होत गेली…आणि तरी देखील आपल्याला समज आली असं उगाच वाटू लागलं. ह्या छोटेखानी जगप्रसिद्ध पुस्तकामधून; लहान राजपुत्राच्या नजरेतून आपण मोठ्यांची आयुष्याची कोडी बघू लागतो…आणि एक सुंदर आणि त्याच वेळी करुणेची एक अस्पष्ट छटा असं मनोहारी चित्र आपल्यासमोर उभं रहातं. 
लेखकाने पानापानावर रेखाटलेली ती सुरेख चित्र…शब्द, विचार, विविध कल्पनांची अखंड भरारी…आपल्याला हे सर्व अशा काही एका उंचीवर नेऊन ठेवतं तो अनुभव मुळातच शब्दातीत. 
आणि माझ्या शब्दांत इतुकी ताकद कुठली ?

सध्या अमेरिकेत रहात असलेली माझी एक भाची खूप छान छान पुस्तकं वाचत असते. त्यामुळे ती सध्या काय वाचतेय ह्याची मी अगदी आवर्जून तिच्या आईकडे चौकशी करत असते. ह्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं…'जय'.

देवदत्त पटनाईक ह्या तरुण लेखकाचं हे पुस्तक मग मी माझ्या लेकीच्या वाढदिवसाला भेट दिलं. तिने प्रथम वाचलं आणि त्यानंतर मी ते हातात घेतलं. वाचन चालू असलेलं पुस्तक, त्याच्या शेवटच्या पानापर्यंत सतत माझ्या बरोबर असतं. माझं पोट आणि माझं डोकं हे अगदी लहानपणापासून एकत्र जेवायला बसतात !

'जय' ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाभारतातील विविध कथा लेखकाने आपल्यासमोर उभ्या केल्या आहेत. त्या अर्थात नव्या नाहीत, परंतु, त्यांना त्याने छोट्या छोट्या स्वरूपात, सरल भाषेत शब्दबद्ध करून, प्रत्येक गोष्टीखाली त्याने आपले विचार मांडले आहेत. महाभारत ज्यावेळी घडले, त्यावेळची समाजाची स्थिती, त्यावेळचे रीतीरिवाज, स्त्रियांचे विचारस्वातंत्र्य; हे इतक्या सुलभतेने त्याने आपल्यासमोर उभं केलं आहे की मनात विचार येतो…आपण ज्यावेळी महाभारत वाचलं त्यावेळी आपण नक्की काय वाचलं ? अर्थात महाभारत हे एक असे काव्य आहे जे तुमच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तुमच्याबरोबर वाढत जातं. दुर्गा भागवतांचं 'व्यासपर्व' हे माझं फार लाडकं पुस्तक. त्यातून त्यांनी महाभारतातील वेगवेगळी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर वेगळ्या उजेडात आणली. जसं आम्ही आमच्या कॉलेजमध्ये स्थिरचित्र काढत असू. त्यावेळी समोरची मांडणी माझ्या खुर्चीतून मला जशी दिसे तशीच ती माझ्या सहविद्यार्थ्यांना दिसत नसे. त्याचा कोन वेगळा; त्याच्यासमोरच्या रचनेवर सूर्यप्रकाशाने मांडलेला खेळ वेगळा. तसं काहीसं. विचारांना प्रवृत्त करणारी पुस्तकं मला फार आवडतात. हे पुस्तक तर मध्येच मला हसायला भाग पाडी. "हे कधी माझ्या डोक्यातच आलं नाही !" असं म्हणून मी माझ्या लेकीला तिने वाचलं असूनही परत तिला वाचून दाखवी !

पटनाईकांनी स्वहस्ते काढलेल्या चित्रांचा उल्लेख न करणे हे म्हणजे अचानक स्मृतीभ्रंशाचा झटका आल्यासारखं !
माझ्या कचेरीतील बहुतेक सर्व तरुण इंग्रजी वाचकवर्गाने ह्या पुस्तकाचं वाचन कधीच केलंय. आणि त्यांना हे पुस्तक फार भावलंय देखील. त्यातल्या प्रत्येकाला मी एक प्रश्न हमखास विचारी, "Have you read the original Mahabharata ?" बहुतेक वेळा तरी मला उत्तर नकारार्थी मिळालं. आपल्या तरुणवर्गाची महाभारताशी ओळख अमर चित्रकथा वा टीव्ही मुळे झाली. पण मग त्याने नक्की काय बिघडलं ? मी जेव्हा महाभारत वाचलं त्यावेळी कदाचित लहान वयामुळे म्हणा किंवा बुद्धीदौर्बल्यामुळे म्हणा; मला एकही प्रश्न पडला नव्हता. परंतु, मला कधीही न पडलेले प्रश्न ह्या पुस्तकाने माझ्यासमोर आणले आणि त्यातील सगळ्या करड्या रंगाच्या नाना छटा माझ्यासमोर उलगडल्या !

… महाभारत माझी पाठ अशीतशी सोडणार नाही बहुतेक. आता इरावती कर्व्यांचं 'युगांत' मिळवलंय ! मराठी.
त्यांच्या अभ्यासातून, त्यांना दिसलेला तोच तो कृष्ण…आणि त्याचं ते महाभारत !
पटनाईक एका ठिकाणी म्हणतात, गांधारीने आपल्या शंभर मुलांकडे डोळे उघडे ठेवून बघितले असते तर कदाचित महाभारत घडले नसते !
मला आशा आहे युगांत मला आगळा वेगळा आनंद देईल.   

गेल्या दोन ते तीन महिन्यांत मी ही पुस्तकं वाचली. चांगलं काही वाचनात आलं तर ते आजूबाजूला पसरवावं असं मला फार वाटतं. म्हणजे एखादं चित्र छान जमून गेलं की ते वर्गात सगळ्यांना दाखवावं अशी इच्छा शाळेत देखील फार होई !

तसं काहीसं.

13 comments:

Nandan said...

'युगांत' तुम्हांला आवडेल.

बंगाली भाषांतराच्या दर्जाबद्दल सहमत आहे. गद्याप्रमाणेच रवीन्द्रनाथांच्या कवितांत हे विशेषतः जाणवतं.

देशे देशे दिशे दिशे कोर्मोधारा धाय
ओजोस्रो शोहोस्रोबिधो चोरितार्थोताय

या ओळींतला अनुप्रास, जोश यांच्यापुढे अगदी सिद्धहस्त कवी यीट्सने केलेलं 'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' फार फिकं वाटतं.

Gouri said...

मस्त ग! सद्ध्या मी "What to expect in the first year" वाचतेय :)
भाषांतराबद्दल म्हणशील, तर दोन्ही भाषा उत्तम येणं पुरेसं नसतं ते करतांना. हे एक वेगळं कौशल्य आहे, आणि हे येणारे + आवडीने करणारे (मी इतकी मेहनत दुसर्‍याच्या कलाकृतीवर का घ्यायची?) थोडे असतात. आपल्याकडे भाषांतरासाठी मिळणारा मोबदला सुद्धा कधीकधी पाट्या टाकणार्‍यांनाच परवडण्यासारखा असतो.

rajiv said...

" शहरातील आमची पाच बोटे एकजूट का नाही दाखवत ? कारण त्या प्रत्येक बोटाला दुसऱ्यापेक्षा अधिक उंचीची आस असते "

खुपच मार्मिक लिहिलेस. मस्तय पोस्ट !!
हि सगळी बुके वाचणे एकवेळ शक्य आहे पण त्यावर इतक्या सहजतेने व त्यांबाबत उत्सुकता निर्माण करणारे लिहिणे हे नक्कीच कौतुकास्पद आहे !!

तृप्ती said...

पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. युगांत वगळता काहीच वाचलेली नाहीत.

भाषांतराबद्दल वाचून ह्या भाषांतराची आठवण आली. आवडेल तुला- http://www.maayboli.com/node/23797

This one too- http://www.maayboli.com/node/23042

Abhishek said...

छान आणि धन्यवाद... इकडे वाचनाचा उजेड आहे, पण कधी हि पुस्तक मांजरं चुकून क्रॉस झाली तर पकडून वाचेनच :) (हे ही नसे थोडके!)

shriraj moré said...

:)

Anagha Nigwekar said...

नंदन, प्रतिक्रियेबद्दल आभार.
युगांत हातात घेण्याआगोदर एकदम जीएंचं पैलपाखरे हातात आलंय. तेही ३ वेगवेगळ्या कथांचं भाषांतराच आहे पण अतिशय सुंदर ! मला फार आवडतंय !
असं का होत असावं ? कुठल्याच भाषेत बंगाली भाषेतील सौंदर्य का पकडता येत नसावं ?

Anagha Nigwekar said...

गौरे ! भारीच ! मी पण अशीच बाळांची पुस्तकं घेऊन बसायचे ! आणि कसले गोंधळ घालायची मी ! :p

आणि बहुतेक तरी तू म्हणतेस तसच कारण असावं…सुमार दर्ज्याचं ! :(

Anagha Nigwekar said...

राजीव, धन्यवाद. :) :)

Anagha Nigwekar said...

तृप्ती, का कोण जाणे मला असं वाटतं की मूळ भाषा बंगाली त्यानंतर इंग्रजी आणि मग मराठी…हा फार दूरचा प्रवास झाला ना ? ते टाळायला मी प्रयत्न करत होते बंगाली - इंग्रजी वाचण्याचा !
सध्या मी जे वाचतेय ना जीएंचं पैलपाखरे…ते देखील इंग्रजीवरून भाषांतरच आहे ! पण इतकं सुंदर आहे ना ! खूपच ! :)

Anagha Nigwekar said...

अभिषेक, पुस्तकमांजरं आडवी जाण्याचा योग म्हणजे अपशकुन समजू नका म्हणजे झालं ! :D

Anagha Nigwekar said...

श्रीराज, तू काय वाचतोयस सध्या ?

Vidya Bhutkar said...

Sahi.. sadhya Jhimma vachat aahe. Te jhale ki pudhe list tayarch distey. :) Really nice post. I never thought of translations so intensly. But now that you brought up, I feel we are missing on something really special when its lost in translation.
About Mahabharat, I read a book as a child, 'Navneet Bharat'. Dont remember how it was but even I didnt get any questions about it then. :)
Nice post again.
Vidya.