नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 5 March 2013

मग माझी सटकते...

मी चारचाकी चालवते. चार चाकांना आणि दोन चाकांना नियम समान असतात. दोन चाकी बाईक्स डाव्या बाजूने ओव्हरटेक करून माझ्या पुढे जातात, तेव्हा मी त्यांना एखाद्या अरुंद गल्लीत देखील डाव्या बाजूला जागा सोडावी अशी त्यांची अपेक्षा असते. त्या दिवशी मी एका बाइकरला जागा दिली नाही. तो डाव्या बाजूला पडला. सिग्नलमुळे दोन्ही वाहनांची गती धीमी होती. एक दुसराच बाईकर माझ्या गाडीसमोर आडवा आला आणि स्व:घोषित बाजीप्रभू देशपांडेंचे रूप धारण करून माझी खिंड रोखली. मी उतरले.
"काय झालं ? " मी.
"काय झालं म्हणून काय विचारता ? तो पडला तिथे ! दिसत नाय काय तुम्हाला ?" तो.
"दिसलं ना. तो पडला ते दिसलं. तू त्याच्यासाठी भांडायला आलायस का ? छान. "
"अर्थात !"
"थांब थोडा. तो येतोय. त्याला विचारू आपण नक्की काय झालं ते."
पडलेला उठला आणि बाईकवरून पुढे आला.
"काय मॅडम ? दिसत नाय काय तुम्हाला ?" पडलेला माणूस.
"दिसतं ना ! ती अरुंद जागा पुढे जायला पुरणार नाही हे तुला दिसलं नाही काय ? मी तुझ्यासाठी ब्रेक मारायचा...मग तू पुढे जाणार...आणि मग मी गाडी काढावी...असा तू काय मोठा तीर मारलायस ? मी माझ्या गाडीचा ब्रेक मारावा आणि तुला पुढे जगू द्यावं ही तुझी अपेक्षाच का माझ्याकडून ? तू च्यायला मारे मोठ्या अरेरावीत जाणार ! आणि मी तुझ्यासाठी ब्रेक मारू ? बॉस, तुला जगायचं असेल तर जग नाहीतर मारायचं तर मर !" वीर गप्प झाला.
पहिला माणूस थोडं अजून काही बोलला.
"त्याला त्याची चूक कळली...तो गप्प बसला...त्याच्या चुकीवरून तुला काही बोध झाला असेल तर बघ....नाहीतर चालू पड आता." माझी सटकली होती. आणि जे मनापासून आदराने नियमांचे पालन करतात त्यांची का सटकू नये ?

परवा दादर रानडे रोडवरून मी मुख्य रस्त्याला बाहेर पडत होते. गाडी चालवत. सिग्नल वाहनांचा होता. आणि पादचारी भसाभसा चालू लागले. रस्ता ओलांडण्यासाठी. मग मी...कधी माझे डावे वळण घ्यायचे ? नाही म्हणजे माझा सिग्नल लागलाय...म्हणजे मला माझे वळण घ्यायला मिळायला हवे की नको ? परंतु, पाच सहा लोकांच्या अंगावर गाडी घातल्याशिवाय मला वळण मिळणे अशक्य. मग ? आता काय करायचं तरी काय ? आणि वर सगळी समस्त जनता मी गाडी चालवतेय, म्हणून मलाच खुन्नस देणार....मलाच शिव्या घालणार !

मग माझी सटकते !

काय नियम फक्त गाडी चालवणाऱ्या माणसांसाठीच असतात काय ? आणि पादचारी कधीही कुठेही ( कुठेही अशासाठी की दोन रस्त्यांच्यामध्ये घातलेल्या उंच दुभाजकावरून चढून माकडासारखी उडी मारून माझ्या गाडीसमोर दत्त म्हणून उभी रहाणारी जनता मी अनेकवेळा जिवंत ठेवली आहे. )

नागपूर मधील एक बाई देखील मनात आलं म्हणून उजव्या बाजूला सरकल्या. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ट्रक ड्रायव्हरने ब्रेक दाबला नाही. त्या ट्रक ड्रायव्हरचं नशीब बलवत्तर म्हणून बाई जीवानिशी वाचल्या आहेत.

समोरच्याने मला जिवंत ठेवावे अशी रोज उठून मी माझ्या प्राणाची भिक त्याच्याकडे का मागावी हे मला आजतागायत कळलेलं नाही.

बॉस ! मला नियमांची पूर्ण जाणीव आहे. त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर आहे. नियमांचे पालन करणे ही एक नागरिक म्हणून मी माझी जबाबदारी समजते. मात्र नियम ही प्रत्येकाने पाळावयाची बाब आहे. गाड्यांना नियम आणि पादचारी कायम समुद्रावर फिरायला निघाल्यासारखे भर रहदारीच्या रस्त्यावर फिरणार...हे का ? आधीही सांगितल्याप्रमाणे मी माज आल्यासारखी गाडी चालवत नाही आणि कधी काळी टॅक्सी केलीच तर मी त्या ड्रायव्हरला पण माज आल्यागत चालवू देत नाही.

XX, त्या मुंग्या पण शिस्तीत चालतात यार !

16 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

अशा वेळी सटकलेली अजिबातच सावरायची नाही. दे घुमाके.

shriraj moré said...

:-D bharich!!

''Pooja Mhatre'' said...

तुम्ही गाडी वाल्यांच मर्म बरोबर पकडलत !पुण्यात गाडी चालवताना असेच भयंकर expiriance घेतलेत मी ...अनेकदा !!

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

आपली अशी सटकल्याने आपलेच नुकसान होते हे जेव्हा कळेल तोच आमचा सौभाग्यदिन... हेच परमेवश्वर आपल्याला केव्हासून सांगतोय.... तीच आपली खरी कार आहे.. तुम्ही चालवताय ती मायाच...

Ketaki Akade said...

Tu Awesome aahes Anagha tai :)

Mi evdhyat ch chaar chaki chalawayla shikley ani kharach yetat ase experiences.. Punyat tar kahi vicharaylach nako!

Abhishek said...

गुरं वळतांना गुराखी काठी चालवतो तेव्हा त्याची सटकलेलीच असणार, आता गुरांना पण त्याचीच सवय... हा एक व्ह्यु

रोहन... said...

सध्या पादचारी रस्ता ओलांडण्याचे नियम अजिबात पाळत नाहियेत. अगदी कुठेही नाही!!! अश्यावेळी अपघात होउन काही चालणार्‍याला काही झाले तरी लगेच वाहनचालकाला धरतात. मी घालतो अंगावर गाडी अश्या लोकांच्या, म्हणजे ६-७ महिनेपुर्वीपर्यंत घालत होतो. गेल्या काही दिवसात दुचाकीवाले कसली भयानक पद्धतिने गाडी चालवतात ते देखील पाहिले. बेदरकार, बेशिस्त आणि बेपर्वा... पण आपण लढायचे.. नाही सोडायचे. :)

भानस said...

वाघ म्हटले तरीही खातोच आणि वाघोबा म्हटले तरीही खाणारच आहे. कारण सवय लागलीये. आरे ला कारे करणारा भेटला की गप गुमान शेळी होतेय. सोडायचे नाही. :)

अनघा said...

पंकज ! :) :) कराटे नाही शिकवलं आम्हाला शाळेत !

अनघा said...

श्रीराज, जमेल तितकं, जमेल तिथे…बेशिस्त वागणुकीला विरोध दाखवणे !

अनघा said...

पूजा, पुणं अधिकच बेशिस्त आहे म्हणे ! :(
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

अनघा said...

नामधारी, चुकीच्या गोष्टीला विरोध न दाखवता ती सर्व माया आहे असे समजून मी जिवंत असून देखील 'मृत' आयुष्य जगू इच्छित नाही.

अनघा said...

केतकी ! अगं भांडकुदळ होत चाललेय की काय असं वाटतंय मला !! :D

अनघा said...

ह्म्म्म्म्म… अभिषेक ! खरंय !

अनघा said...

रोहणा, परवा एका रिसर्चचे निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते . त्यात गेल्या काही वर्षांत मोटारसायकल चालवताना अपघात होऊन मृत झालेल्यांचा आकडा दिला होता. प्रचंड वाढ झालेला !

अनघा said...

श्री, :) :)