नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 30 July 2011

Product development...

ते शाळेतले दिवस होते.
वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा शाळेसाठी एक 'प्रॉडक्ट'. शाळा हा एक मोठा 'ब्रँड'. शाळेचे 'प्रॉडक्ट डेव्हलपिंग' चालू होते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रम रचले जात होते. कोण कशात चमकेल, कोणाचा कुठला 'यु.एस.पी.' (unique selling point) म्हणजेच विशिष्ट गुण झळाळून दिसू लागेल काही सांगता येत नव्हते. कारण हे सर्व प्रॉडक्ट्स देखील अतिशय कोवळे, अजाणच होते. नाही का ? स्वत:च्या गुणांची त्यांना काय जाण ? प्रॉडक्ट, बाजारामध्ये उतरवायला तर अजून बराच कालावधी होता. एखादे प्रॉडक्ट कुठे कुठल्या स्पर्धेत झळाळले तर शेवटी 'शाळा' ह्या ब्रँडचेच नाव मोठे होणार. त्यातून अधिकाधिक विद्यार्थी शाळेला मिळणार. म्हणजेच मोठे चित्र बघण्यासाठी अगदी छोट्यात छोट्या गोष्टीवर लक्ष देणे महत्त्वाचे. समजा, शाळा म्हणजे 'हिंदुस्तान लिव्हर' व मुले म्हणजे कोणी लक्स, कोणी सनसिल्क तर कोणी रिन.
हे सर्व आता कळतं. आपलं स्वत:चं एक 'प्रॉडक्ट' जन्माला घातल्यावर व 'डेव्हलप' करावयास घेतल्यावर.

शनिवारी, शाळा सकाळी लवकर सुरु होई व दहा वाजेपर्यंत संपून देखील जाई. आमच्या शाळेत २ तास सांस्कृतिक कार्यक्रमाचे असत. दर शनिवारी. मग आमचे वर्गशिक्षक वा शिक्षिका जे काही ठरवत ते आम्हीं करत असू. त्यात एकदा शाळेसमोरील रस्ता देखील झाडून काढला होता आम्हीं. किती मजा आली होती ते करताना. मला वाटतं घरून झाडू घेऊन आलो होतो आम्हीं सर्व. रस्ता चकचकीत झाला...आमच्या मनात अभिमान झळाळला...काही मिनिटांतच. एका दगडात दोन पक्षी. अतिशय सोप्प्या रीतीने.

"आता पुढले काही शनिवार तुमच्यातील प्रत्येकजण इथे वर्गासमोर येऊन काही करून दाखवणार आहे. गाणे, निबंध वाचन, नृत्य...काहीही. पण नियम असा आहे की प्रत्येकाने काहीनाकाही तरी केलेच पाहिजे." मला वाटतं डेरे बाई होत्या तेव्हा. गोऱ्या, सुंदर दिसणाऱ्या.
धस्स. धस्स झालं माझ्या मनात ! आली का पंचाईत ? आजपर्यंत मी आले कधी आणि गेले कधी हे वर्गात कोणाला कळण्याची सूतराम शक्यता नव्हती. चमकणारी मुले व मुली वेगळेच. ते सर्व नियमितरीत्या दहाच्या आत क्रमांक मिळवत. त्यांची नावे वारंवार शिक्षकांच्या मुखी ऐकू येत. जसे डोळे दिपवणारे यश मिळवले नाही तसेच कधीही वाईटही काही केले नाही. त्यामुळे माझी कोणी दखल घेण्याची शक्यता शून्य.

आडनाव 'पाटील' असल्यामुळे माझा क्रमांक नेहेमीच पाचाच्या घरात असे. ५२, ५३ वा ५४. म्हणजे बरेच शनिवार मिळणार होते इतरांचे कौशल्य बघावयास. आता मी काय करू ह्या माझ्या प्रश्र्नाला २ शनिवार काही उत्तरच सापडेना. सुजाताने 'केशवा माधवा' गायले. मिलिंदने बोंगो वाजवला. टाळ्यांचा आवाज चढता असे. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलत एकेक मुलंमुली जागेवर जाऊन बसत होते. काहीजण भाषण देखील करत होते...स्वत: विषय निवडून त्यावर स्वत: लिखाण वगैरे करून. "बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हांला...वगैरे वगैरे. ह्यातून काही सुटका नव्हती. एक ओझे झाले डोक्यावर. झोप लागेना. काहीच सुचेना. अंगात कुठलीही कला सापडेना. जी सर्वांसमोर पाच मिनिटांत करून दाखवता येईल. व मलाही वाहवा मिळवता येईल. बाईंची कौतुकाची नजर माझ्यावरही पडेल. खूप विचार केला. शेवटी बसून एकटीनेच तोडगा काढला. सोप्पं आहे. विनोद. विनोद सांगूया आपण. छोटुसाच असेल व सर्वजण हसू लागतील. बाईंना पण मजा येईल. उगाच कोणी गांभीर्याने घेणार नाही. मग शोधाशोध केली. सरदारजीचा एक विनोद हाती लागला. मोजून पाच वाक्यांचा. त्यावेळी तरी बऱ्यापैकी विनोदी वाटला. रात्रंदिवस बसून विनोद पाठ केला. घोकला. कविता घोकावी तसा. हिरवे हिरवे गार गालिचे, हरिततृणांच्या मखमालीचे....त्या सुंदर मखमालीवरती...एक होता सरदारजी...तो त्याच्या मित्राला म्हणाला की...बारीकसा सावळा चेहेरा. नाकावर घसरता जाडा चष्मा. खांद्यावर लांब वेण्या. कपाळावर लाल बारीकसं कुंकू. अ, क, घ, न...आडनावांची यादी पुढे सरकत होती. तसे बरेच दिवस मिळाले. विनोद पाठ करावयास. घरात उभं राहून.

तो आठवडा फारच लवकर संपला. म्हणजे आदल्या शनिवारी चाळीसपर्यंत आकडे झाले. चाळीस नंतर दहा बारा मुलंमुली गेल्यावर माझा क्रमांक येणार. बाई, माझे नाव पुकारणार. शनिवार उजाडला. डोळे उघडल्यापासून विनोद लिहिलेलं ते छोटं चिटोरं हातात पकडून ठेवलं होतं. शाळेची बस धावत धावत पकडली. कोपऱ्यात जाऊन बसले. घोकंपट्टी चालू. कागद आत्तापर्यंत अगदी चुरगळून गेला होता. वर्गात गेले. जागेवर बसले. कागद हातात घट्ट. बसल्या जागेवर चुळबूळ. मधूनच कागद उघडावा, विनोदावर नजर टाकावी, डोळे मिटावे...एक होता सरदारजी...तास सुरु झाला. एकेकजण पुढे आले. आपापल्या कला दाखवू लागले. टाळ्या वाजू लागल्या.
"अनघा पाटील" बाई उद्गारल्या.
मी उठले. चिटोरं मुठीत पकडून वर्गासमोर गेले. आजपर्यंत कधीही मी अशी ढळढळीत सर्वांसमोर उभी राहिले नव्हते. तिथे उभं राहिलं की वर्ग फार म्हणजे फारच भयंकर दिसतो. समोरची चुन्याची पांढरी भिंत. त्यावरील सुविचार. पाठीशी भिंत असली की नेहेमी तर आधार वाटतो पण तीच अशी पसरट समोर आली की आता पुढे सरकणार आपल्याला चिरडून टाकणार असेच काहीसे वाटते. वर्गात सत्तरच्या आसपास मुले बसलेली व बाजूला खुर्चीत बाई बसलेल्या. आपण एकटेच उभे. सर्व शांत. अगदी टाचणी पडली तर आवाज ऐकू येईल इतकी शांतता. पण माझं हृदय कधी पडलं कोण जाणे. सरदारजी मित्राला काय म्हणाला...मग त्यावर मित्र काय म्हणाला...त्यावर सरदारजी काही विनोदी बोलला...आणि एक विनोद तयार झाला. पण नाही. अश्रू तयार झाले. समोर चष्मा. डोळ्यांत पाणी. चष्म्यावर वाफ. समोरचे सगळे अदृश्य. घशात हुंदका. रडू फुटले. बाईंनी जागेवर पाठवून दिले. जागेवर बसले. ठरवलं. पुन्हां कधीही मी सर्वांसमोर एकटी उभी रहाणार नाही. ते खूप भयंकर असतं. खूप भीती वाटते. काहीच बोलता येत नाही. मग सगळे आपल्याला हसतात. आपणच एक विनोद बनून जातो. सगळ्यांसाठी.

आता कधी कोणी वर्गातील भेटलं आणि त्यांना मी विचारलं...रूपा, आठवतं तुला...असं असं झालं होतं...हेमंत, तुला आठवतं का रे...तर नाही आठवणार कोणाला....कारण कोणी लक्षात ठेवावं...असं मी काहीच केलं नव्हतं...
माझ्या आत्मविश्वासाच्या चिंधड्या झाल्या होत्या.
एक 'प्रॉडक्ट' पहिल्याच पायरीवर 'फेल' गेलं होतं.

झाली ह्या घटनेला काही दशके...

क्रमश:

Wednesday 27 July 2011

एक कळी

"माझ्या डोक्यावर खूप ओझं आहे."
"अगं, ओझं कसलं ? मी आहे ना...मी माझं छत्र धरलंय गं तुझ्यावर. "
"पण मला त्याचं ओझं होतंय बाबा. "
"असं कसं म्हणतेस तू ? अजून कळी तू. माझी. फक्त माझी. बाहेरचं जग काय माहित तुला ? दिसतंय हिरवंगार...पण ते वरून गं..."
"पण ते मला बघू द्या ना...मला अनुभवू द्या ना..."
"म्हणजे ? बाहेर धोका आहे...तो मी तुला नको सांगू...मोकळं सोडून देऊ ? नाही...माझ्याच्याने शक्य नाही. मी जग पाहिलं...बरे वाईट अनुभव मी घेतले...त्याचा उपयोग तुला नाही झाला तर कोणाला?"

कळी अधिक वाकली. जड छत्राखाली दबून गेली. पण करणार काय ? ती तर कळी. नाजूक. टवटवीत जग डोळ्यांसमोर...त्याची आस. मन दु:खी. डोळ्यांतून टिपं येत...पण नजर खाली लावलेली...लीन नजर...त्यातील अश्रू कोणाला ना दिसत.

असे किती दिवस उलटले, कोण जाणे. त्या नम्र कळीची नव्हती हिंमत नजर वर करण्याची. जमिनीवर टेकलेल्या नजरेला काय माहित अंधार कधी झाला व उजाडले कधी. ना ती बहरे...ना ती उमले.

मग त्या दिवशी कसे कोण जाणे ? कोणी आले. तिला मुक्त केले. त्या हिरव्यागार पानाखाली दडून बसलेल्या कळीला हलकेच बाहेर काढले. कळी आनंदली. डोलू लागली. तोच तो अवखळ वारा. त्याच्या नजरेपासून कोण लपे ? त्याने तिला बाहेर खेचले. मुक्त वाऱ्याचा तिला स्पर्श झाला. ती सुखावून गेली. अंगावर रोमांच उभे राहिले. काही दिस उलटले. आणि पाऊस आला. त्याने तिला ओलेते केले. नखशिखांत भिजवून टाकले. ती शहारली. ते ओलेतेपण देखील तिला आवडू लागले. कधी तो वारा तर कधी तो पाऊस. कळी नाचू बागडू लागली.

हिरवे पान दुखावले. त्याच्या नजरेसमोर हे काय घडू पहात होते ? वाऱ्याने त्याच्या पोरकळीला बाहेर खेचले. मोहात पाडले. अनुभवी पान, नाचऱ्या कळीकडे नाराज होऊन बघू लागले. किती दिवस जपले होते. आत दडवून ठेवले होते. पण ते त्याच्या कळीला ना रुजले. ना पटले. आता मात्र त्याच्या हातात काही नव्हते. जगाची नजर, त्याच्या कळीवर पडली होती. पान फक्त चिंतेत पडले. दुसरे हातात काय होते ? काय आता कळी तग धरेल ? उन्हापावसात तिचे काय होईल ? बेभान कळीला कुठे कसले भान ? ती मस्त. ती धुंद.

असेच अजून काही दिस उलटले. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतके. पांढरी शुभ्र यौवनातील कळी आता शुभ्र ना राहिली. कधी तिला प्रखर उन्हाने लुटले. कधी आक्रस्ताळी पावसाने तिला ओले केले. उद्दाम वाऱ्याने तिला पुरते विस्कटले. ते हिरवे पान, फक्त साक्षीदार ठरले.

काही दिवसांतच कळीला प्रारब्ध कळून चुकले. कळी खिन्न झाली. विचार करू लागली. पण हेच तर प्राक्तन होते. कळीला फुलायचे होते. फुलून कोमेजून जायचे होते. बाहेरचे जग राक्षस आहे. पानाला माहिती होते. पण काय कळीने घाबरून रहायचे होते ? ती मनाशी म्हणे...माझे सुख मी उपभोगले...माझे दु:ख मी झेलले. माझा वाटा...ऊनपावसाचा.

हिरव्या पानाचे दु:खच वेगळे...त्याचे आयुष्य संपत नव्हते. जसा तो भीष्म...अंतापर्यंत तग धरत...कळींवरचे अत्याचार झेलत. उघड्या डोळ्यांसमोर.

Monday 25 July 2011

माणूस...असा आणि तसा.

दोनतीन वेगवेगळे प्रसंग. ठिकाणे वेगळी. वेळ वेगळी. दिवस वेगळा. समान काय तर कधी अप्रत्यक्षरीत्या तर कधी प्रत्यक्षरीत्या, मी त्या प्रसंगांचा एक भाग। प्रसंग साधेसुधे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील सामान्य प्रसंग. आणि म्हणूनच महत्त्वाचे. कारण सामान्य माणसांना घेऊन समाज तयार होतो. एकेक मुंगी रात्रंदिवस मेहनत करते. प्रचंड वारूळ उभे रहाते. अशाच एखाद्या मुंगीवर कॅमेरा लावला व त्याच जागेवर स्थिर रहात फक्त लेन्स फिरवत नजरेसमोरील दृश्य विस्तारित गेलो तर... एक मुंगी, असंख्य मुंग्या, त्यांची लगबग आणि मग ते वारूळ.

...गेल्या रविवारी मी व माझी लेक सिटीलाइट मार्केटमध्ये बाजारहाट करावयास गेलो होतो. सर्व आटपून बाहेर आलो व लक्षात आले, सर्वात महत्त्वाची गोष्ट विसरलो. कोथिंबीर. बाहेर पडताना उजव्या हाताला एक बाई मिरच्या कोथिंबीर विकत असते. एक लाकडी बाकडं व पुढ्यात दुसऱ्या बाकड्यावर ह्या बारीकसारीक परंतु सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. कित्येक वर्ष ती तिथे आहे. पूर्वी फक्त मिरच्या कोथिंबीर मिळायचं पण हळूहळू प्रगती होतहोत एकदोन पालेभाज्या ती ठेवू लागली. काळी, ठेंगणी, कमरेखालपर्यंत एक पोलका. त्याखाली परकर, हाच वेष. ह्यात बदल काहीही नाही. कधीतरी तो पोलका सफेद दिसावा. त्यानंतर त्यावर पिवळट झाक असे. आणि एक बाब मात्र तिची इतक्या वर्षांत नाही बदलली. तिचं हसू. माणसाचे मन जर नितळ तर हसू देखील तसंच. चेहेऱ्यावर पसरणारं. हलकेच एखादी थैली उघडावी आणि आतील अस्सल हिरे झळकून उठावे.
"कोथिंबीर दे ग" मी म्हटलं.
"किती दिवसांनी येतेयस ताई." हातात कोथिंबीर गोळा करताकरता ती म्हणाली. मी कानकोंडी. रस्त्यावरून भाजी घेणे माझ्या तत्वांत बसत नाही म्हणून मी नेहेमीच आत बाजारात जाऊन सर्व आठवड्याचा बाजारहाट आटोपूनच बाहेर पडते. बाहेर पडताच उजव्या हाताला ती दिसते. कधी एकटी तर कधी १३/१४ वर्षांची सावळीशी तरतरीत मुलगी सोबतीला. बाबांबरोबर मी यायचे त्यावेळी बाबा तिच्याचकडून मिरच्या कोथिंबीर घ्यायचे. आणि काका कसे आहात अशी सुरुवात करत दर रविवारी त्यांच्या गप्पा रंगत. मी नियमितरित्या तिच्याकडे खरेदी करत नाही हे तिलाही माहित आहे. पण म्हणून तिने कधी हाक मारून हटकले नाही.
"आज लेक पण आली तुझ्याबरोबर ?" तिने मला विचारले.
"हो बाई. आलीय खरी आज माझ्या नशिबाने." मी म्हटलं. "मुलगी ?" मी तिला पुढे विचारलं.
"ताईची ! ताईची मुलगी आता पंधरावीला आहे. अभ्यास करत असते. म्हणून नाही आली आज." मान खाली घालून ती भराभर कोथिंबीरीची जुडी करू लागली.
कुठेतरी मला माझ्या प्रश्र्नाच्या योग्यतेची खात्री नव्हतीच...आणि म्हणूनच मी 'तुझी मुलगी कुठेय' असा प्रश्र्न नव्हता केला. फक्त मुलगी हे एव्हढंच प्रश्नार्थक बोलले होते. खिन्न. खिन्न झाले मी. तिचं कधी लग्न झालं नसावं. कधी संसार थाटला गेला नसावा. अख्खं आयुष्य कोथिंबीरीच्या जुड्या करण्यात घालवायचं...आपली भावंड सांभाळायची...त्यांच्या संसाराची जुडी बांधायची....आपल्या आयुष्याचे देठ एकेक खुडून.
माझं चुकलंच...मी नको होतं असं विचारायला...तिथून निघाल्यावर मी लेकीच्या कानाशी पुटपुटले. तिने माझ्याकडे बघितलं आणि हसली.

एकदा का पाऊस पडला की आपल्या रस्त्यांवरील खड्डे जलमय होतात. त्यात मी काय नवीन सांगितलं. त्या दिवशी सकाळी कचेरीत येत होते. नवनवीन इमारती कॉम्प्लान न पिता उंची वाढवत आहेत. ती उंची बघून भयाने पोटात खड्डा पडावा तसे रस्ते भोकाळत आहेत. हनुमान गल्ली देखील त्यातीलच. गाडी चालवत असता त्या खड्डयांच्या खोलीचा अंदाज येणे हे म्हणजे एखाद्या स्त्रीच्या अंत:करणाची खोली कळण्याइतके कठीण. नाही का ? गल्ली असल्याने माझ्या गाडीचा वेग काही फारसा नव्हता. सकाळी नवाच्या सुमारास ह्या रस्त्यावर नोकरदारांची रहदारी असते. शनिवार रविवार सोडून. काही पायी तर काही गाड्यांमध्ये. 'ऋतू हिरवा' सीडी वाजत होती. बाहेर पावसाळी व गाडीत आशाताईंचा पाऊस. मी संथसंथ खालीवर चालले होते...स्वरांवर, खड्डयांवर. आणि अकस्मात माझा खोलीचा अंदाज चुकला. पुढील चाकांखाली आलेला खड्डा नको इतका खोल होता. त्यात भरून राहिलेले पाणी वेगात अस्ताव्यस्त फेकले गेले. मी दोन्ही बाजूला चोरटी नजर टाकली. उजव्या बाजूला दोन नोकरदार महिला व डाव्या बाजूला एक नीटनेटके कपडे घातलेला अजून एक नोकरदार. मी त्यांच्या कपड्यांचा चांगलाच शिमगा केला होता. ते सर्व मातकट पाणी सलवार खामिजावर एक मुक्त कलाकुसर करून गेलं आणि त्या पुरुषाच्या विजारीचा रंग कुठला होता हे विचारायची पाळी ! त्या सहा डोळ्यांतील तिरस्कार एकदम घायाळ करून गेला. मला कळत होतं...आता पुढचा दिवस ह्या बायका काय अशाच बरबटलेल्या कपड्यांत बसणार होत्या ? आणि तो पुरुष तरी काय करणार होता ? गाडी मी अधिकच संथ केली...उजवा हात स्टीयरींग व्हीलवरून उचलला...सपशेल माफी मागितली. ते तिघे मला माफ करू शकले की नाही तेच जाणो...आणि पुढला दिवस त्यांनी त्यांच्यात्यांच्या कचेरीत कसा काय घालवला हेही तेच जाणोत ! माझं मन आपलं दिवसभर मला टोचत राहिलं...एखादी अणकुचीदार सुई...हृदयाला बोचत रहाते.

काल सकाळी घरातून खाली उतरले. दिसत होतं...आज गाडी धुतलेली नव्हती. "क्या हुआ ? गाडी धोया नही ?" बाजूच्या गाडीवर ओलं फडका फिरवणाऱ्या कृष्णाला मी विचारलं. कृष्णा. आमचा गाडीला, रोज 'वरवर' साफ करणारा. काम फारसं मनावर घ्यायचं नाही हे त्याचं जीवन तत्व. अगदी कामचुकार. थातुरमातुर काम करून टाकायचं आणि एक तारखेला मात्र बरोब्बर पगारासाठी दारात उभं राहायचं. पैश्याची अडचण कायम. आणि आमच्या अख्ख्या वसाहतीत मी एकटीच 'अंबानी' आहे ह्याची त्याला खात्री. एकदा रत्नागिरीवरून परतताना, रस्त्यात माणगावला घेतलेले खारे शेंगदाणे व पाण्याच्या तीन रिकाम्या बाटल्या, दहा दिवसांनी मला गाडीत सीटखाली सापडल्या. म्हणजे बोला ! फक्त मॅट्स काढून धुवायच्या व वरून गाडी पुसून घ्यायची की झालं आमच्या कृष्णाचं काम ! कामचोर!
"कल गाडी बाहर निकला नही ! इधरही था ! इसलिये आज नही धोया."
"गाडी इधर था...बाहर निकला नही... इससे तेरा क्या लेनादेना ? तू तेरा काम कर ना ! "
"नही...नजर चुकवत कृष्णा पुटपुटला. "वो आज मैं लेट आया..."
"हां...तो फिर, वो बोल ना ! तू लेट आया इसलिये गाडी धोया नही ! खालीफुकट गाडी पे क्यों डाल रहा है ! फालतू में !"
चुकी मान्य करायची नाही. तत्परतेने सोंगटी पुढे सरकवून द्यायची...कुठलाही आर्थिक स्तर असो...हे तंत्र जमून गेले की तग धरता येण्याची खात्री !
गाडी चालू करता, मंद आवाजात सुरु होणारी मराठी भावगीतं...सगळ्या प्रकारच्या वैतागावर माझा हा एक रामबाण उपाय.
...भेट तुझी माझी स्मरते...अरुण दाते.

आणि शेवटचा एक. रात्रीचे साडेदहा. शिवाजी पार्कसमोरील पेट्रोल पंप. आत शिरताच डाव्या हाताला हवा भरणे. टायरमध्ये हवा भरून मी पेट्रोल भरायला गाडी पुढे घेऊन आले आणि गाडीतून उतरले. स्लीपबुक व पेन हातात...त्यावर तारीख टाकत होते. ते नियमित भरून एकदा संपलं की पेट्रोल पंपाकडे सुपूर्द करावयाचे असते. त्याच्या बळावर आमच्या कचेरीतून पैसे वसूल करून घेणे ही त्यांची जबाबदारी. म्हणजेच महागड्या पेट्रोलचे पैसे ऑफिस देते ! तितक्यात कर्कश हॉर्नचा आवाज सुरु झाला. क्षणभरही न थांबता. मी मान वर करून बघितलं. एक दुचाकी. त्यावर एक १९/२० वर्षांचा मुलगा स्वार व त्याच वयाचा एक मुलगा खाली उभा. हिरवागार टीशर्ट, अर्धी चड्डी हा त्या बसलेल्या मुलाचा पेहेराव. त्याचाच हात हॉर्नवर चिकटून बसला होता बहुधा. शिवाजी पार्क थोडंफार अजून हलत होतं. परंतु, आसपासच्या इमारतीतील दिवे तसे मंदावलेले होते. दिवसभर थकलेले जीव हळूहळू झोपावयच्या तयारीत असावेत.
"काय झालं ?" मी माझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्याला विचारलं. "त्याला काय झालं ?"
"कुछ नही मॅडम ! उसको जल्दी पेट्रोल भरना है."
किर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र... हॉर्न चालूच....
"पर इतना हॉर्न ? भरेगाही ना कोई ना कोई..."
"मॅडम अब क्या बताऊँ ? ये एरिया में इन लडकोंने तंग करके रखा है !"
"कौन है ये लडके ?"
त्याची पाठ होती पार्ककडे. त्याने फक्त मान थोडी उजवीकडे वळवली व मागे गल्लीकडे हलकाच इशारा केला. किर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्रर्र्र... हॉर्न चालूच....अजून वातावरणाची ऐशी की तैशीच. आता मी धरून चालेन की माझ्या गाडीत पेट्रोल भरणारा माणूस उत्तर प्रदेशीय होता. मागे शिवाजी पार्कसमोर एक झेंडा रहातो. त्याचा रोख त्या झेंड्याकडे असेलही. परंतु, मला त्या क्षणाला कोणा उत्तर प्रदेशीय माणसाचा त्रास होत नव्हता, ना कोणा मनसे वा शिवसैनिकाचा त्रास होत होता. मला मुळातच एका अतिशय बेजबाबदार 'माणसा'चा त्रास होत होता. मग्रुरीने अति तीव्र आवाज करून आसपासच्या माणसांचा, वातावरणाचा शून्य विचार करणाऱ्या त्या मनोवृत्तीचा मला प्रचंड त्रास होत होता. तेथील असंख्य लोकांना त्यावेळी तो होत होता....हा कोणाचा मुलगा होता....काय माहित...तो कोणता झेंडा घेऊन होता काय माहित...तो काय शिकला होता कोण जाणे...परंतु, ज्याने कोणी हा गुंड घडवला होता मला 'त्याचा' तिरस्कार आला. हा असा जंगली घडवणाऱ्या पालकांचा तिरस्कार आला...ही अशी बेदरकार वृत्ती घडवणाऱ्या पुढाऱ्यांचा मला तिटकारा आला. एकूणच...डोक्यात गेला तो माझ्या.
"बॉस, काय झालं ?" मी पुढे जाऊन त्या मुलाला विचारलं.
"पेट्रोल ! कधीचे उभे आहोत आम्ही इथे !"
"पण तो माणूस रिकामा झाला की येईलच नाही का तुमच्याकडे ? आणि देईलच भरून पेट्रोल. न भरून सांगतो कुणाला ?"
"अरे ! थांबायला वेळ नाही आम्हांला !"
"ते कळलं आम्हां सर्वांना...इतका वेळ तुम्ही जो नॉन स्टॉप हॉर्न वाजवताय त्यावरून." माझ्याशी बोलण्याच्या नादात त्याचा हॉर्न बंद झाला होता.
"म काय तर ? किती वेळ थांबणार आम्ही !"
"म्हणजे तुम्ही जर असा इतका आवाज केला नसता तर तो आलाच नसता काय तुमच्याकडे ?"
"म्हणजे ?"
"नाही...म्हणजे जगाने तुमच्याकडे बघावं ह्याकरता हे इतकंच करू शकता काय तुम्ही ?"
"बाई...काय म्हणायचं तरी काय तुम्हांला ?"
"काही नाही...मला एकूणच तुमच्याकडे बघून हे कळलं की बाकी तुमच्या अंगात इतर काडीचंही कर्तृत्व नाही...आणि त्यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ही असली त्रासदायक, घृणास्पद कृती करण्यापलीकडे, तुम्ही तरी काय करू शकता...नाही का ? दया येतेय मला तुमची...."
माझ्या गाडीचे पेट्रोल भरून झाले होते...मी सही करून स्लीप पेट्रोल भरणाऱ्या माणसाकडे सुपूर्त केली. गाडीत जाऊन बसले व गाडी सुरु केली....
केतकीच्या बनात....सुमन कल्याणपूर.
तो मुलगा अधिक लक्ष देण्याच्या लायकीचा नव्हता. माझ्यासाठी.

कित्येक वर्षे हसतमुखाने मिरच्या कोथिंबीर विकणारी, स्वत:च्या श्रमांचे महत्त्व जाणणारी माझी मैत्रीण. आयुष्यात पुन्हा पुन्हा भेटत रहावी अशी. वृत्तीने श्रीमंत. नागरिक क्रमांक एक.
कोणा कंत्राटदाराच्या पैसेखाऊ वृत्तीमुळे नकळत हातून अपराध घडल्याने, कोणाचे नाहक शिव्याशाप झेलणारी केविलवाणी मी. नागरिक क्रमांक दोन.
पैसे कमावण्यासाठी का होईना परंतु, हातात घेतलेले काम चांगलेच व्हावयास हवे...ह्या वृत्तीचा मागमूसही नसणारा कृष्णा. नागरिक क्रमांक तीन.
लहान वयातच, कोणाच्या जीवावर मगरूरी अंगात माजवून घेणारा, बिन नावाचा...माझ्या दारात मत मागावयास निदान उभा राहू नये. अनाचारी. नागरिक क्रमांक चार.

माणसे.
काही, असामान्य.
काही, केविलवाणी.
काही, बेरकी.
आणि...काही कलंक.

Monday 18 July 2011

चित्र-विचित्र

कोण जाणे किती वेळ डोळे मिटले होते. कधीकधी जाग व नीज ह्यांतील रेषा अंधुक होते. एक कुठला विचारांचा धागा हाती लागतो. तो धागा पकडत हलकेच पुढे निघावे आणि धागा काही वेगळ्याच वळणावर वळावा. जसे काही धुक्याच्या पायवाटेवर चालू पडावे व काही क्षणात ती पायवाट कुठे एखाद्या दरीच्या काठावर नेऊन कटकन तुटावी....अकस्मात. आणि मग विचारात पडावे...ह्या पायवाटेवर आपण का निघालो...कधी निघालो.

डोळे उघडले तर माझ्या डोळ्यांसमोरील चित्राला चौकट होती विमानाच्या दीड वीत खिडकीची. बाहेर बघावं तर पांढरे शुभ्र ढग. ढग...आणि ढग. सर्वत्र पसरलेले. कापूस जो आपण बघतो त्याला तर असते एक पिवळसर छटा. हे जे डोळ्यांसमोर होतं त्याहून अधिक शुभ्र काही असूच शकत नाही. सर्वत्र पसरलेला तो पांढरा रंग. त्या रंगाला बाधा येईल असे काहीही कुठेही नाही...दूर दूरपर्यंत नाही. कधी पनवेलच्या तलावात पाहिलेली पांढरी कमळे, हाताला किंचित रवाळ लागणारी पांढरी रांगोळी, गादीवर अंथरलेली पांढरी मऊ चादर, हातात कधीतरी मिळणारा शाळेतील तो पांढरा खडू, बाबांचे रोजचे पांढरेशुभ्र कपडे, आणि चित्र काढण्यासाठी कॉलेजमध्ये हातात धरलेला शुभ्र गुळगुळीत महागडा आयव्हरी कागद.

जे डोळ्यासमोर होते ते जणू एका अतिप्रचंड कॅनव्हसवरील एक चित्र. ते चित्र इतके मोठे की एका नजरेत बघून कधी पूर्णच होणारे नाही. आणि ते बघण्यासाठीच जशी काही मी इतकी वर आले होते. एखाद्या प्रदर्शन दालनात मोठ्या चित्रासमोर उभे राहायचे असेल तर चित्रापासून अंतर राखून दूर उभे रहाणे भागच असते. जवळून त्या चित्राची खोली, त्यातील विविध आकार नजरेत मावतच नाहीत. तेव्हढी व्याप्ती आपल्या नजरेच्या क्षमतेच्या बाहेरची ठरते. तसेच काहीसे वाटले. अति उंचावर बसून कोणा चित्रकर्म्याची निर्मिती बघावी. फक्त पांढरा रंग घेऊन इतके आकार कसे हा निर्माण करू शकतो. आणि साधासुधा नाही. पेलिकन व्हाईट. कॉलेजमध्ये हा पेलिकन व्हाईट ज्यावेळी हातात आला, त्यावेळी त्याच्या नावाचीच गंमत वाटली. म्हणजे एक साधा व्हाईट आणि एक भारी पेलिकन व्हाईट. कधी त्याला पॅलेटमध्ये उतरवून घ्यावयाचे असले तर हातातील कुंचला पाण्यात ढवळून घ्यावा लागत असे. अगदी पाण्याची खळखळ खळखळ. वेगळ्या रंगाचा एक अणूथेंब देखील त्याच्या शुभ्र अंगावर एक डाग सोडून जात असे. आणि मग मन हिरमुसलं होऊन जाई...एकदा पडलेला डाग कधीही निघत नाही. तो त्याच्या साऱ्या आयुष्यात मिसळून जातो...आणि मग तो पांढराशुभ्र नाही उरत...कधी निळसर छटा...तर कधी करडी छटा पसरलेला...मग ज्यावेळी तो पेलिकन व्हाईटच हवा असेल त्यावेळी दुसरी बाटली आणण्यावाचून गत्यंतर नाही...कारण हा रंग धुवून थोडाच नाहीसा होतो ? एकदा डागाळलेला व्हाईट कधीही फिरून पेलिकन व्हाईट होत नाही. मग ती बाटली पडून राही कोपऱ्यात...ना कोणी तिला फिरून उघडे...ना कोणी त्यात कुंचला बुडवे. मग ते विस्थापित आयुष्य जगून सुकून गेलेली ती बाटली कधीतरी कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडे...जसे एखादे आयुष्य...डागाळलेले.

किती वेळ गेला कोण जाणे...लाखो शुभ्र ढग नजरेखालून गेले. आणि मी अगदी शाळेतून निघून माझ्या कॉलेजपर्यंत फेरफटका मारून आले.

एक होते. नजरेखाली, काही फुटांवर ढग होते त्यामुळे आपण किती उंचावर आहोत हे कळायला काही मार्ग नव्हता. हे असे ढग, रोज बनवून खाली सोडून द्यावयाचे काम करण्यास, देवाने किती माणसे कामावर ठेवली असतील बरं ? आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरात येत असेल ? ढग बनवण्याची रेसिपी काय असेल बरं ? एखादा अतिप्रचंड टब असावा....त्यात कित्येक लिटर पाणी ओतलेले असावे...आणि त्या पाण्याचा पुरवठा अविरत असावा...व त्यात साबणाचा चुरा कोणी भुरभुरत ठेवत असावे...रवी घेऊन अनेक बायका ते पाणी घुसळत असाव्यात...व त्या टबाला एका बाजूला असलेल्या नळातून मऊ मऊ ढग निसटून हलकेच बाहेर पडत असावेत. नाही का ? नाही पटलं ? मग दुसरी काही कल्पना आहे का तुमच्याकडे ? मला तरी हा असाच 'ढग कारखाना' असावा असं वाटलं.

अकस्मात माझ्या त्या शुभ्र कॅनव्हासाला भोक पडलं. आणि इतका वेळ हळुवार तरंगणारी माझी नजर भस्सकन त्या भोकातून खाली घसरली. आणि एकदा घसरावयास लागल्यावर काहीतरी अडथळा मध्ये यावा लागतो. नाहीतर घरंगळत किती खोल जाणार ? माझ्या नजरेला ना कोणी थोपावले. खोल खोल त्या भोकातून माझी दृष्टी जी घसरली ती कित्येक मैल खाली गेली. आणि ती थाडकन आपटली एका झोपडीवर. आता शुभ्र साम्राज्य संपलं होतं. ढग टरटर फाटत चालले होते. जसं शुभ्र शालूला एक छिद्र पडावं व त्यात बोट घालून ते कोणी मोठं मोठंच करावं. झाकलेलं नागडं सत्य उघडं पाडावं...शुभ्र स्वप्नातून लाथाडून बाहेर फेकावं.

काही क्षणांपूर्वी नजरेसमोर पसरलेला कॅनव्हास आता पूर्ण फाटला होता...त्याची लक्तरे झाली होती...त्यातून वास्तव बाहेर लोंबकाळलं होतं. विद्रूप. बेंगरूळ.

माझं तरंगतं विमान जमिनीला टेकलं.
रंजलेली गांजलेली माझी बलात्कारित मुंबादेवी. तिचाच मी एक अणू.

पुढल्या पाचव्या मिनिटाला मी प्रीपेड टॅक्सीत बसले होते. घरच्या रस्त्याला लागले होते. बाहेर सर्व ओले धूसर. धुंद. खिडकीच्या बंद काचेवर थेंब जमा होत होते. ही खिडकी उघडणे हातात होते. उघडलेल्या खिडकीतून मान वर उंचावून बघितले. दूरदूर एक चिमुकले विमान आकाशात पुढे सरकत होते. काय त्याच वेळी कोणी, कोसो मैल उंचीवरून पुन्हा एकदा खाली डोकावत होते ?

मग मनोमन वाटलं...निदान त्या अनामिक प्रेक्षकासाठी तो शुभ्र कॅनव्हास पुन्हा एकदा जोडला गेला असावा. अज्ञानात तो सुखी असावा.
निरंतर.

Sunday 17 July 2011

All bookish !

"प्रेम त्याग शिकवतं."
"आई, हे पुस्तकातलं वाक्य झालं."
"नाही. का बरं ? प्रेमाची पहिली भूकच तर त्याग ही असते. त्यागच जर नाही केला तर प्रेम टिकून कसे रहाणार व त्या त्यागातूनच तर आत्मबल मिळते...नाही का ?"
"All bookish !"
"नेहेमी अहं आणि प्रेम हे तराजूत घातलेले असतात. मग अहंचं पारडं जड की प्रेमाचं...ह्यावरून तो माणूस त्याग करतो की नाही हे ठरतं...आता आपण हे बोलतोय तर त्यावरून मला काही आठवलं..."
भुवया उंचावून तिने माझ्याकडे बघितलं.
"म्हटलं तर विषयाला धरून आहे...म्हटलं तर नाही...एकदा जीतूकाका बर्फात कुठे घरापासून दूर अडकून पडला होता. दुपार उलटून गेलेली होती. दिवस मावळत चालला होता. अपूर्वा मावशीला निवड करायची होती....बर्फात गाडी काढावी की नवऱ्याला सांगावं की आहेस तिथेच रहा...व बर्फ वितळला की ये घरी."
"म ?"
"पण बर्फ वितळणार आहे की पुढे परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे हे समजायला काही मार्ग नव्हता."
"म ?"
"मावशीने मुलींना शेजारी ठेवलं...गाडी काढली...वाढत चाललेल्या अंधारात, बर्फातून गाडी चालवत ती जीतूकाकापर्यंत पोचली. येताना अर्थात गाडी त्याने चालवली. आपण हातपाय गाळून न घेता, संकटांवर मात करू शकतो हे मनोबल तिने त्यातून मिळवलेच नाही का ? ती त्यावेळी हे न करता...उबदार कपडे घालून पलंगावर शांत झोपू शकत होती...मुलींना कुशीत घेऊन. त्यानंतर तिथली परिस्थिती खरोखरच अधिक गंभीर झाली...कधी नव्हे इतका त्या वर्षी बर्फ पडला. मावशी तिथे गेली नसती तर जीतूकाका पुढचे चारपाच दिवस थंडीत अन्नपाण्यावाचून तिथेच अडकून पडला असता..."
"हम्म्म्म"
"इथे मावशीला प्रेम आहे...काळजी आहे...आणि म्हणून ती जीवाची तमा न करता गेली ना नवऱ्याला घ्यायला....?"
माझी लेक हसली...
"आई, आयुष्यात त्याग हा नेहेमी दोघांनी करायचा असतो. हो ना ?"
"अर्थात !"
किती ठसक्यात उद्गारले मी ! कधीकधी खोटी विधाने करताना उगाच फार मोठ्या आवाजात वाक्ये फेकली जातात...त्यातलेच हे एक !

Thursday 14 July 2011

बात सिंपलसी...

मी नंदुरबारचा शिरीष आहे.
मी झाशीची राणी आहे.
मी शिवाजी आहे.
मी टिळक आहे.
मी सावरकर आहे.
महत्त्वाचे म्हणजे, मी अजून जिवंत आहे.
त्याला कारण आहे.
मी तू आहे.
मी तो आहे.
मी ती आहे.
स्वर्ग मी आहे.
पाताळ मी आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे, मी अजून जिवंत आहे.
कारण सर्वनाशाला मीच जबाबदार आहे.
...तो बात सिंपलसी है.
पुछना बस इतनाही है...
मेरा नंबर कब आएगा...?
पुछना बस इतनाही है !

Tuesday 12 July 2011

वाफारा

मरणप्राय वेदना. डोकेदुखी. मेंदूत एखादी बारीकशी गाठ झाल्याने ज्या वेदना होत असतील त्या वेदनांचे भान ठेवून इतकेच म्हणेन की माझ्या डोकेदुखीच्या वेदना देखील थोड्या अती होत्या. एखादी तान मंद स्वरात कानी पडावी आणि हलकेच चढत जाऊन अगदी तारस्वरात जाऊन पोचावी अशी काहीशी ती वेदना होती. डोक्यात कुठे तरी काहीतरी गडबड चालू होती व त्याचे बाह्य स्वरूप म्हणून त्या कळा. नाहीतर त्या अंतर्गत घडामोडींचे ज्ञान मला कुठून होणार ? घसरत पलंगाखाली गेलेली एक सपाता काढण्यासाठी वाकणे देखील अशक्यप्राय. नुसती मान खाली केली तर सर्दी नसताना देखील सर्रकन नाकातून पाण्याची धार.

स्वत:साठी डॉक्टरांकडे जाणे हे एक स्वयंपाकघरात जाऊन
एकटीसाठी साग्रसंगीत जेवण करण्याइतकेच कठीण काम. कधीकाळी गेले होते त्यावेळी सायनसचे निदान केले होते व त्यानुसार औषधे लिहून दिली गेली होती. कपाळावरची कुठलीशी शीर हे असे पाणी साठवून घेत होती व मी वाकले की नळ सोडावा अशी धार सुटत होती. सर्दीबिर्दी थोडी देखील नाही.

औषधे नेहेमीच कोणी प्रेमाने दिली की त्या प्रेमाच्या धाकाने घेतली जातात. स्वत: उठून नियमित औषधे घेणे म्हणजे आपण जगण्याचा उगा हट्ट करतोय...असं काहीसं वाटू लागतं. अर्थात आपण जर नीट औषधे घेतली नाहीत तर आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना नसता त्रास होईल ह्याची एक बोच मनी असतेच. पण ती बोच नेहेमीच 'सेल्फ गिल्ट' ह्यात मोडते. अशा ह्या 'आत्म बोचणी' चा एक गगनचुंबी थरच माझ्या डोक्यात वास्तव्याला आहे. आणि ही बोच काही नियमित औषधे घेण्यास तितकीशी प्रवृत्त करत नाही.

आणि मग ती विचारांची घोडदौड...दिशाहीन.
गेल्याच महिन्यात सख्खी मैत्रीण मेंदूतील एका अशाच गाठीचं निमित्त होऊन सरळ निघूनच गेली आहे. मग काय ? कोण आवरणार त्या मोकाट घोड्याला ?
...आपण आता मेलो तर नक्की कोणाचं काय नुकसान होईल...आपल्या माणसांना आपण दु:खाची खाईत वगैरे ढकलू हे ठीक आहे...त्यावर काळ हे थोड्याबहुत प्रमाणात उत्तर असते...परंतु, आर्थिक खाईत तर आपण आपल्या माणसांना ढकलणार नाही ना...हे अधिक महत्त्वाचे. आपण आपले मृत्यूपत्र नेमके बनवले आहे की नाही...आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या आहेत की नाही वगैरे वगैरे...दुखऱ्या मेंदूला अगदी किसणीवर घेतल्यासारखे...खरवडून बारीक कीस.

"मला जरा पाणी गरम करून देतेस का ? मी वाफारा घेते." दृश्य स्वरूपात नसलेल्या सर्दीला देखील वाफारा घेऊन बरे वाटेल अशी आपली एक आशा. लेकीने गरमगरम पाणी आणून दिलं. आणि एक पंचा. मी पंच्यात डोकं खुपसलं.

मंचावर बसलेल्या भांड्यातील पाण्यात
काही क्षण तरंग निर्माण होत होते. मग ते हलकेच स्थिर झाले. त्या ऊन पाण्यातून सगळी कोंदटलेली उष्णता हळुवार बाहेर पडू लागली. चेहेऱ्याला स्पर्श करू लागली. मी डोळे हलकेच मिटले. त्या दाटलेल्या उष्ण भावनांचा तो कोमट स्पर्श...दुखऱ्या कपाळाला झाला. आणि नस न नस मोकळी होऊ लागली...कोण ती कुठली एक सुजरी नस..त्या उबदार जिवंत ओंजारगोंजारण्याने सुखावली...मोकळी मोकळी झाली...हळुवार, शांत झाली.

हे इतकंच तर हवं असतं... त्या दुखऱ्या जाणीवेला.

Saturday 9 July 2011

'वॉटरप्रुफ' यश

ब्रिटीश कॉन्सिलच्या भारतातील 'यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर' स्पर्धेत माझी मैत्रीण फायनलिस्टमध्ये आहे. वंदना नातू घाना. आणि त्या तिच्या प्रवासात माझा थोडा हातभार. म्हणजे खारीचा वाटाबिटा.

इथे ब्रिटीश कॉन्सिलची आणि आमच्या ज्या कामाचा तिथे उल्लेख आहे त्याची लिंक देत आहे. आधीही इथे ती लिंक दिली होती...परंतु, ह्या यशाबरोबर पुन्हा एकदा....
:)

यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रिनॉर
रेनोल्ड्स वॉटरप्रुफ मुंबई

Friday 8 July 2011

डबके

ती मान खाली घालून फुटपाथावर बसली होती. पावसाची जोरदार सर नेमकी त्याच वेळी का यावी हा एक चिडका प्रश्र्न मनात घेऊन. कालच निळे प्लास्टिक कसेबसे मिळवले होते. गळणाऱ्या झोपडीवर घातले होते. पाण्याची डबकी अस्ताव्यस्त पसरलेली दिसत होती. त्यात पडलेली पिवळ्या दिव्यांची प्रतिबिंबे. गोल गोल..नाजूक. वाटले, ते उचलून घ्यावे...आणि बाजारात विकावे...पिवळे चमचमते हिरे. अचानक त्या डबक्यात वरून थेंब पडू लागले. उमटणाऱ्या लहरी. सगळे हिरेच फुटले. पाण्याने एक क्षण मन शांत करावे आणि वरून अजून एक थेंब टपकवा आणि पाणी थरारून उठावं...पुन्हा तेच...एक क्षण शांत व पुन्हा थैमान. तिची नजर पायाजवळील डबक्यावर पडली. तिला तिचे प्रतिबिंब दिसले...एकच क्षण आणि वरून अकस्मात चारपाच थेंब त्याकडे झेपावले आणि पाणी थरारून उठलं. त्या थेंबांना त्या शांत पाण्यात कोसळताना धीर नव्हता...ते डबकं आत्ता कुठे श्वास घेत होतं...एका संकटातून बाहेर आल्याच्या सुखात एक निश्वास टाकत होतं...आणि पुन्हा तेच...पुन्हा नवीन संकट...आणि पुन्हा उलथापालथ...
डाव्या बाजूने भर्रकन एक गाडी गेली व तिने ते अख्खं डबकं तिच्या अंगावर उडवलं...
एक डबक्याच्या आयुष्यातील सर्व थरार थांबले...ते आयुष्यातून उठलं...
पुढल्या क्षणाला दुसरीकडे जन्म घेऊन परत एकदा जगायचा प्रयत्न करू लागलं...
डबक्याचे आयुष्य ते...माझ्यासारखे उकिरड्याचे थोडे...माश्या घोंघावत. तिने तिरस्कारात मान झटकली.
समोर चार पोरं. आपण गोरे आणि ही सगळीच्या सगळी अशी काळी ठिक्कर. अंगावर घालायला कपडा नाही. नाचतायत पावसात. नुसता दंगा माजलाय ! खिदळतायत साली ! उड्या मारतायत !

...आता ह्या तुफान पावसात ह्या गळक्या घरात काय गिऱ्हाईक येणार ?

...हा साला पाऊस तर धंद्यावर येतो !

Monday 4 July 2011

विषवल्ली...भाग ६

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३
विषवल्ली...भाग ४
विषवल्ली...भाग ५

मग तशीही काही वर्षे उलटली. लीनाला ना कधी भाड्याने घर मिळाले. ना ती कधी प्राजक्ताला घेऊन एकटी कुठे राहू शकली. लीनाच्या वडिलांनी कधी नव्हे ते अनेक देव केले. लीनाच्या आईने लीनाच्या हातात रामरक्षा ठेवली. तिला मन शांत राखणे गरजेचे होते म्हणून. लीनावर अन्याय झाला की नाही ह्याचे उत्तर शोधायचा कोणी कधी प्रयत्न केला नाही.

जर आता मनीष परगावीच रहाणार आहे तर निदान म्हणून तरी लीना-प्राजक्ताला त्यांचे घर रहावयास मिळावे अशी मागणी मग लीनाने मनीषपुढे मांडली. कधीकधी नशिबाची चक्र वेगळी पडतात. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारे दरवाजे आपोआप उघडताना दिसतात. मनीषने लीनाची विनंती मान्य केली. लीनाला तिच्या घराची किल्ली जवळपास / वर्षांनी मिळाली.
"आई, आता आपण इथेच राहायचं ?"
"हो बाळा. आपण आता आपल्या घरी राहायचं."

त्यानंतर किती प्रलय आले. किती भूकंप झाले. लीना नाही बदलली. मनीष प्रथम मनाविरुद्ध घरी परतला. पण आता लीनाने सर्व बळ एकवटले होते. घर, नोकरी आणि लेक ह्या सर्वांमधील तारेवरची कसरत तिने झेपवून नेली होती. मनीष सर्व बघत होता. प्राजक्ता तिच्या घरी खूष होती. अभ्यास, खेळ...बालपण सर्वांगाने फुलत होतं. त्या मायलेकींना पुन्हा घराबाहेर तो काय म्हणून काढणार होता ? जेव्हा प्राजक्ता बाळ होती तेव्हा आई बाबांना घट्ट मिठी मारायला सांगायची स्वत:ला मध्ये गुरफटून घ्यायची...आणि बोबड्या शब्दांत 'सॅन्डी सॅन्डी' करून टाळ्या वाजवत रहायची. आता बऱ्याच वर्षांनी जेव्हा प्राजक्ताला तिचं 'सॅन्डवि' परत मिळालं तेव्हाही ती तशीच टाळ्या वाजवत राहिली...तिचं कालियामर्दन सफल झालं होतं...जणू ती त्याच आनंदात होती.

काही वर्षे उलटली. मनीष, लीना प्राजक्ता ह्या तिघांनी मिळून जगभर भटकंती केली.

परंतु, बहुधा तो संसारच मुळी दृष्ट लागलेला होता. सुख हे धुके ठरावे असे मनिषचे दारूचे व्यसन हळूहळू वाढले. पुन्हा रोज पिऊन मनीष घरी परतू लागला. वा कधी त्याचे मित्र त्याला दारी आणून टाकू लागले. शेखर गौरी मनीषच्या आधीच परगाव सोडून शहरात परतलेले होते. मग लीनाने पुन्हा शक्ती एकत्र केली. डॉक्टर केले. इस्पितळे केली. दारू सोडवण्यासाठीचे सगळे उपाय केले. परंतु, दारू हे एक व्यसन नव्हे. तो एक रोग आहे. रोग सुटत नाही. तो बळावतो जीव घेऊनच विसावतो. ते मायावी द्रव्य मनीषच्या पोटाची चाळण करत होतं...आणि एक दिवस लीना प्राजक्ताच्या नशिबालाच छिद्रे पडली त्यातून मनीष निसटून गेला.

पुन्हा सर्व मित्र गोळा झाले. लीनाला भेटावयास आले. मनीषच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याच्या गोष्टी करू लागले. परोपरीने तिने एकच विनंती केली...मला थोडा वेळ द्या.

काही महिने गेले. आजपर्यंत सर्व संकटात स्वत:ची नोकरी सांभाळण्याचे तंत्र म्हणजे लीनाच्या हातचा मळ झाला होता.
एक दिवस लीनाने घरातील उंच स्टूल खेचले वर चढली. उंच कपाटात व्यवस्थित ठेऊन दिलेली मनीषची चित्रे तिने खाली उतरवली. गादीवर सर्व मांडली. काही चित्रे होती. काही चित्रे लीनाकडे होती. जपून ठेवलेली. तर काही परगावी असताना मनीषने शेखरच्या ताब्यात दिली होती. लीनाच्या हे लक्षात आले.
"अरुण, सर्व चित्र नाहीयेत घरात. मला वाटतं काही शेखरकडे आहेत. त्याच्याकडून आणा मागून. मग सर्व नीट एकत्र करून भरवू आपण प्रदर्शन." तिने मनीषच्या दुसऱ्या एका जवळच्या मित्राला कळवले.
"हो काय ? चालेल. मी करतो त्याला फोन. आणतो त्याच्याकडून चित्र."
लगेच दुसऱ्या दिवशी अरुणने शेखरला फोन केला.
"अरे, तुझ्याकडे चित्र आहेत ना मनीषची ?
"हो. आहेत. काही चित्र आहेत माझ्याकडे."
"मग मी कधी येऊ तुझ्याकडे ? मी घेऊन जाईन ना चित्र. प्रदर्शन भरवायचंय त्याच्या चित्रांचं."
"देईन ना...मी चित्र नक्की देईन. पण एका अटीवर."
"अट ? ह्यात अट कसली ?"
"लीनाला सांग मला फोन करायला. मी फक्त तिच्याचकडे चित्रे देईन."

"लीना, त्याने तुला फोन करायला सांगितलाय."

लीनाने लाचार व्हायचे होते. गत नवऱ्याची चित्र शेखरकडे गयावया करून मागून घ्यायची होती. तिने शेखरवर केलेल्या मायेचा शेखरने एकदा अपमान केला होता. तिने शेखरसाठी एका वहिनीची, एका बहिणीची त्याचप्रमाणे एका मैत्रिणीची भूमिका अतिशय ताकदीने निभावली होती. त्याच शेखरच्या मनातील विषारी अजगराने लीनावर विखारी फुत्कार टाकला होता.

आज पुन्हा एकदा नियतीच्या परीक्षेत शेखर सपशेल नापास झाला होता.

एका अगतिक क्षणी लीनाचा फायदा उठवण्यास धजू शकणारा शेखर आज पुन्हा एकदा त्याच पायरीवर विषारी जीभ लवलवत अधाशी मनाने उभा होता...तिचा पुन्हा अपमान करण्यासाठी.
"आई, जाऊ दे. राहू दे बाबांची चित्रं."
आता मोठं झालेलं ते बाळ सर्व समजून गेल्यासारखं बोललं.
"बाळा, तुला वाटतं मी त्याला करेन फोन ? तो बाबांचा जर खरा मित्र असता तर हे असं तो वागलाच नसता नाही का ? हे मला कधीच कळून चुकलंय....बाबांनी हे समजून समजल्यासारखे केले...आयुष्यभर..."
प्राजक्ता आता मोठी झाली होती...जगाची बदलती गणित तिला लवकर समजून येत होती.

चित्रे ती. शेखरच्या कपाटात पडून राहिली. कधीतरी स्वत:च्या घरात परत जाण्याची वाट पहात. मरण का कोणाला टळले आहे ? जसे ते तिला येईल तसेच ते एक दिवस शेखरला देखील येईल. मधुमेहाने त्याला ग्रासले. एक पाय लंगडा झाला. दीड दिवसांचा गणपती तो लंगडत लंगडत घेऊन येतो, काय त्यावेळी त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत जीव असतो ?

ही गोष्ट, कधीच मनीष आणि लीनाची नव्हती. ती शेखर लीनाची होती. ती प्रारंभी एका भाबड्या प्रेमाची होती. बहिणीने भावावर करावे तसे ते लीनाचे प्रेम होते. त्याच्या पडत्या काळात तिने ते नाते बहिणीसारखे जपले. परंतु, गोष्टीने एक वळण घेतले त्या प्रेमाचे निरागस पंख गळून पडले. आत इतकी वर्षे लपून बसलेले काटेरी पंख भस्सकन लीनाच्या अंगावर झेपावले. एका फटकाऱ्यासरशी त्या निरागस नात्याची राखरांगोळी झाली.

चूक कबूल करून ती सुधारू द्यावी जगू द्यावे हे एका स्त्रीने आपल्या जोडीदाराला केलेले आर्जव.
स्वत:ची काहीही चूक नाही ही अहं भावना गोंजारून तिला झिडकारून लावणारा एक पुरुष.
आणि निखळ मैत्रीचे नाते विसरून क्षणार्धात आपले असली रंग दाखवणारा दुसरा पुरुष.

डोळ्यांसमोर येतात ती काळी करडी धूसर चित्रे. कधी चित्रांमधून दिसणाऱ्या सैतानाची. तेच ते लपवलेले तीक्ष्ण दात, लालबुंद डोळे, वेडीवाकडी टोकदार नखे असलेली किळसवाणी बोटे.

ही माणसात लपलेल्या सैतानाची गोष्ट. घराघरात लपून बसलेल्या भेकड भस्मासुराची गोष्ट. फक्त वासनेची भाषा बोलणाऱ्या हैवानाची गोष्ट. बेसावध सावजावर झेप घालते...त्या हपापलेल्या पालीची ही गोष्ट.

कित्येक वर्षांपूर्वी, मनीषने काही बिया लीनाच्या हाती टेकवल्या होत्या...सुगंधी रोप आहे म्हणून सांगितलं होतं...लीनाने बिया कुंडीत पेरल्या...खतपाणी केलं...कोंब फुटला...आकाशात झेपावला.
आणि अकस्मात एक दिवस त्या रोपाने गाफील लीनावर झेप घातली होती...डंख मारला होता.
त्यावेळी लीनाला जाणवलं...मनीषने घरात आणलेलं रोप सुगंधी नव्हतं...ती विषवल्ली होती.
लीनाने ती वेल दूर भिरकावली...नजरेआड ढकलून दिली.
पण विषवल्ली ती...जिवंत राहिली...पुढील संधीची वाट पाहू लागली.
...ज्यावेळी त्या बिया हाती आल्या होत्या...लीना निरागस होती...मनाने नाजूक होती...पण आज ?
आज परिस्थितीचे आभार मानावे...लीना खंबीर झाली.
नियतीने तिला घाव झेलायला शिकवले...विषवल्लीचा आज काहीही परिणाम होणार नाही इतके तिला कणखर बनवले.
आणि ते लीनाला वाचवणारे चिमुकले हात...ते हात बियाणं आधीच ओळखायला शिकले. सुगंधी रोप विषवल्लीतील फरक दुरूनच समजून घ्यायला शिकले.

समाप्त

Sunday 3 July 2011

विषवल्ली...भाग ५

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग
विषवल्ली...भाग ४

मनीष पुरता कोसळला होता. आजवर लीना ही त्याने आयुष्यात गृहीत धरलेली गोष्ट होती. पूर्ण रंग भरत चित्र न्यावं आणि अकस्मात पाण्याचं भांड कलंडावं सर्व रंग विस्कटून जावेत. कचेरीत उच्च पदांवर तो सरकत होता आणि लीनाने त्याला कड्यावरून खाली ढकलून दिलं होतं. तिला माफी नव्हती. त्या दिवशी तो कामासाठी कुठे निघाला होता. नेहेमीसारखी गाडी चालवत. संध्याकाळ नुकतीच झालेली होती. त्याचे जग अंधारलेले होते पण अजून बाहेर उजेडच होता. सिग्नलला तो गाडी वळवणार तेव्हढ्यात त्याला लीना दिसली. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने अचानक गाडीचा वेग वाढवला. क्षणभराची खोटी लीनाच्या अंगावर गाडी जावी. त्याची लीनाची नजरानजर झाली. बावचळून लीना एकदम रस्त्याच्या कडेला सरकली. पडता पडता वाचली. गाडीच्या बोनेटचा तिने आधार घेतला स्वत:ला सावरले. पुन्हा वर बघितलं तर एका क्षणात पूर्ण तिरस्काराने तिला फाडून मनीष पुढे निघून गेला होता. तो तिरस्कार तिला कोसळवून गेला. एक अतिशय प्रखर वीज कोसळली होती तिच्या अंगावर. भडकत्या आगीचा जाळ तिला भेदून गेला होता. आणि कधी नव्हे इतक्या वेगाने मनीषाने गाडी त्या गल्लीत घुसवली. त्याला जिथे काम होतं ती इमारत गेऊन गेली तरी मनीषने गाडी नाही थांबवली. कोणी ढकलून दिल्यासारखा तो निघाला. त्याच्या हातून मृत्यू लिहिलेला नव्हता म्हणून आज त्याच्या गाडीपुढे अजून कोणी नाही आलं.
कधीतरी एक मांजर आडवं गेलं होतं... त्यानंतर अजून कोणीही आडवं गेलं नाही.

गौरी लीना ह्यांचे कधीही सख्य नव्हते. एकमेकांना त्या ओळखत होत्या इतकेच. त्यामुळे ना ती कधी लीनाकडे धावून आली ना लीना कधी गौरीकडे गेली. मात्र मनीष, दारू शेखरगौरी ह्यांच्यावर आता अधिकाधिक अवलंबून राहू लागला.

इथे लीनाची नोकरी चालू होती. अनेकदा भावनिकदृष्ट्या कोसळून देखील तो नोकरीचा लढा मात्र तिने चालू ठेवला होता. तसेही तिला गत्यंतर नव्हते. पैसे कमावणे भाग होते. प्राजक्ता व तिचा स्वत:चा खर्च ती तिच्या आई वडिलांवर कसा टाकू शकत होती ? त्यांनी तिला बिनतक्रार घरात घेतले हेच खूप झाले. इतक्या मोठ्या चुकीनंतर देखील त्यांनी त्यांच्या घराचे दरवाजे तिच्यासाठी उघडले ही मोठी गोष्ट नव्हती काय ? त्या दोघींच्या खर्चाचा भार मनीष काही आता सोसणार नव्हता. लीनाचे वडील ह्या सर्व घटनेने खचून गेले. त्यांनी एकदा परोपरीने मनीषची हात जोडून माफी मागितली. त्यांच्या कन्येच्या चुकीसाठी. बाप लाचार झाला. तिला माफ करा. ती तिच्या तोंडाने तिची चूक मान्य करतेय म्हणून तरी तिला माफ करा...बाप व्याकुळतेने सांगत होता. परंतु, मनीष व त्याच्या बरोबरीने आलेला शेखर तिथून तडकाफडकी निघून गेले. त्या पुण्यवान म्हाताऱ्याच्या विनवण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून. आभाळ वाकलं होतं. मनीषने आपलं अंग चोरलं. तो दरवाजाकडे वळला त्यावेळी त्या बंद दरवाज्यापाशी हात जोडून लीना विनवण्या करत होती. आक्रोश चालू होता. शेखर व मनीष निघून गेले आणि लीना मटकन खाली बसली. तिला हे सर्व खरंच घडतंय ह्यावर विश्वास नव्हता बसत. आता आपल्याला वेड लागेल...आपण नाही ह्यातून जिवंत बाहेर पडू शकणार....नाही पडायचं ह्यातून जिवंत. गल्लीतील रोजच्या केमिस्टकडून लीनाने झोपेच्या गोळ्या जमवायला सुरुवात केली. दोन तीन दिवसांतून ती एकदा तिथे जाई व एकदोन गोळ्या मागून आणे. आज काय तर डॉक्टरांचा कागद घरीच राहिला तर उद्या म्हणे आहे पर्समध्ये..आत्ता सापडत नाहीये. केमिस्ट लहानपणापासून तिला ओळखणारा. त्याला काय माहित लीना सरसोट कड्याच्या टोकाशी उभी आहे. आणि वर्तमानकाळ व भूतकाळ ह्यात असा कितीसा अवधी ? एक तर पळ. पापणी लवेस्तोवर तेव्हढाच तर वेळ जातो.

कचेरीतून मध्येच उठून लीना जवळच असलेल्या समुद्रापाशी जाऊन बसे. शून्यात नजर लावून. पर्समधून झोपेच्या गोळ्या काढे..आणि हातावर घेऊन मोजत बसे. पण तिला हे करवत नव्हतं..आपण अजून किती त्रास देणार आहोत आपल्या आई वडिलांना...आपण मरून गेलो तर मग काय करेल प्राजक्ता....मनीष थोडी सांभाळणार आहे तिला...अधिकाधिक दारू पीत राहील...आणि मग काय होईल प्राजक्ताचं. एक दिवस अशीच लीना वाळूत पाय अंगाशी घेऊन बसली होती. सूर्यास्त होत आला होता. आकाश ना लाल होतं. ना तांबूस. सगळं जसं करडं, रंगहीन. कातरवेळेची हल्ली लीनाला भीती वाटे. तिरमिरीत येऊन लीनाने सगळ्या गोळ्या समुद्रात फेकून दिल्या...एक गोळी हळूच तिच्या पावलाशी येऊन पडली...लीना वाकली. गोळी हातात घेतली. वाटलं, देव काय सांगतो आहे...काय तो तिची परीक्षा घेतो आहे...? हे असे आत्महत्या करणे म्हणजे का केलेल्या चुकीची शिक्षा ? की शिक्षेपासून पळ ? लीनाने वाकून तळहात पाण्यात धरला...हलकेच लाट गोळीवर फिरली. खारट पाणी हातात गोल फिरलं. बुडबुडे उठले. पाण्याने गोळीला फेरे धरले. लीनाने विरघळेस्तोवर तिला तळहातात धरून ठेवलं...ती हलकेच आक्रसत जाते ना जाते तोच पुढच्या लाटेने गोळीला खेचून नेलं. जशी त्या लाटेने लीनालाशिक्षा फर्मावली...जा...जगणे हीच तुझी शिक्षा...

जिवंत पुरुषी अहंकारच ह्यापुढे मनीषला जिवंत ठेवणार होता. लीनाने तिची चूक मान्य केली. तिला माफी नव्हती. मनीषने त्याची चूक मान्य केलीच नव्हती. त्यामुळे त्याला माफ करण्याचा प्रश्र्नच कुठे उद्ध्भवत होता ?

लीना त्या नात्यातून जी बाहेर पडली होती ती कधीही न परतण्यासाठी. ते तिने कधीच तोडलं होतं...तडकाफडकी बाहेर येण्यासाठी नक्की काय घडलं ? तिचं मन प्रेमासाठी आसुसलेलं...पण एक क्षण असा आला व अकस्मात त्या नात्याचं चित्र स्पष्ट झालं. तू घटस्फोट घे व तुझं घर ताब्यात घे...मग आपण लग्न करू...हे ज्यावेळी वाक्य तिच्या कानावर आलं त्यावेळी तिला जी खाडकन जाग आली ती त्या वरून मलमली दिसणाऱ्या स्वप्नात पुन्हा कधीही न शिरण्यासाठी. जसा एखादा सुंभ जाळून त्याचे टोक अगदी बंद करून टाकावे. कधीही न उस्कवटण्यासाठी. किंवा एखादे उगाच उगवलेले बांडगुळ कोणी उपटावे, त्याची मुळे जाळावीत व झाडाची ती जागाच खरवडून खरवडून नष्ट करावी. वादळात भरकटलेली तिची नाव लीना खेचून किनारी आणत होती. तिच्या हाती एक चिमुकला हात होता. आणि त्या हातात जी ताकद होती ती जगात कोणाकडेही नव्हती. तोच जीव आता तिला ह्यातून बाहेर काढणार होता. मात्र तो किनारा खरोखर कधी अस्तित्वात होता की तो एक भासच होता...

ह्याला जीवन ऐसे नाव. नाही का ?

आणि शेखर ? तो आज काय भूमिका खेळत होता ?

मनीषला परत मिळवण्याची आशा मात्र अजून लीनाने जिवंतच ठेवली होती. किती पत्रे लिहिली. किती फोन केले. सगळे दरवाजे ठोठावले. किती दिवस आईवडिलांकडे रहाणार म्हणून मग भाड्याचे घरही शोधू लागली. अंधेरी, गोरेगाव, वांद्रे. कधी कुठे गॅरेजमध्ये तर कधी रेल्वेपासून अतिशय जवळ. मुंबईकरांच्या विधींची दुर्गंधी त्या घराला कायम लाभलेली. भाड्याने घर घ्यावे आणि मग प्राजक्ताला कसे सांभाळावे ? दिवसभर तिला कुठे ठेवावे ? प्रश्र्न नाना. उत्तरे शून्य.

एक दिवस लीनाला कचेरीत फोन आला. शेखरचा. तो म्हणाला तू घरी ये. त्याने लीनाला, तिच्याच घरी भेटायचे आमंत्रण दिले. मनीषने त्याच्याकडे किल्ली दिलेली होती. लीना गेली. मनीष घरात नव्हता. तिच्याशी बोलण्यासाठी शेखरने तिला मुद्दाम बोलावले होते. सूर्यास्त होऊन दोनतीन तास उलटून गेलेले होते. घरात अंधार पडू लागला होता. घर खरे तर लीनाचे. परंतु, आता तिथे मनीषच्या मित्रांचा वावर अधिक दिसत होता. घरातील दिवेलागण आज बऱ्याच दिवसांनी तिच्या हातून झाली होती. दिवाणखान्यात लीना बसली. जमिनीवर. समोर शेखर मद्याचा ग्लास भरून. ह्यात नवीन ते काय ? मनीषच्या घरात नेहेमीच ह्याला मुभा होती. शेखर तर घरचाच होता. आता काय करता येईल व मनीष पुन्हा लीनाला घरात घेईल हा प्रश्र्न होता. लीना पुन्हा पुन्हा एकच विचारत होती. काय करू मी आता ? काही बोलतो का तो तुझ्याशी ? कसा आहे तो ? काही विचारतो का माझ्याबद्दल ? हे आणि असेच निरर्थक प्रश्न.
अकस्मात शेखरने लीनाच्या मांडीवर डोके ठेवले.
"आता तू काही मनीषची बायको राहिली नाहीस. आपल्यात आता काहीही होऊ शकते." शेखर म्हणाला.
लीनाचा चुकलेला हृदयाचा ठोका पुन्हा कधीही ठिकाणावर नाही आला. ती तिरमिरीत उठली. आणि दार उघडून चालू पडली. वडिलांच्या घरी आली आणि प्राजक्ताला मिठी मारून हमसाहमशी रडू लागली. तिच्या आईवडिलांना त्यात काय नवीन होते ? चुकलेल्या नशिबाची लीना आज फिरून एकदा रडत होती. इतकेच काय ते त्यांच्यासाठी होते.

पुढचे तीनचार दिवस रोज लीनाच्या कचेरीत शेखर तिला फोन करत होता. आणि त्याचे नाव देऊन तिने रीसेप्शनिस्टला सांगूनच ठेवले होते तिला तो फोन न देण्याबद्दल. एकदाच तिने चुकून फोन घेतला. "हे तू काय चालवलं आहेस ? भेट मला. बोलायचंय मला तुझ्याशी. तिथे येऊन खेचून घेऊन जाईन तुला ! कळलं ना ?"
तिने न बोलता फोन ठेवून दिला. तोही तिच्या अब्रूचे अजून धिंडवडे काढायला कधी तिच्या कचेरीत अवतरला नाही.

हे शेखरचे धक्कादायक वागणे लीनाने मग फक्त एका मित्राला सांगितले. त्याने मनीषच्या कानावर घातले. परंतु, मनीषला ना त्याचे सोयर ना सुतक. शेखर व गौरी आपल्या लेकाला घेऊन परगावी निघून गेले. व त्यांच्या मागोमाग मनीषदेखील तिथे निघून गेला. त्यांच्याचकडे तो आता राहू लागला. महिना १०,००० रुपये शेखरला भाडे म्हणून देऊन. तेव्हढाच म्हणे शेखरला हातभार. कधी काळी त्यांच्या चार आण्यांच्या संसारात लीनाने शेखरला आपला मोठा भाऊ मानून सांभाळले होते. कधी ते नाते पैश्यात नव्हते मोजले. त्याची आठवण कोणाला ? आणि का बरं असावी ?

भयानक वादळ...जीवघेणं थैमान...रोजची काळरात्र आणि विजांचं रोजचं तांडवनृत्य...
बाल्य नकळत एका भयानक वादळाला थोपवायला निघालं होतं. त्याचं कालियामर्दन चालू होतं.

Saturday 2 July 2011

विषवल्ली...भाग ४

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३

लीनाने रात्रंदिवस विचार केला. न सांगणे तिला जगू देईना. आणि कसे सांगावे हे कळेना. रोज पाच वाजत होते. पहाट होत होती. लीना यंत्रागत दिवस सुरु करत होती. दिवस पुढे सरके...पण तिचे विचार मात्र जसं शिवणयंत्र अचानक अडकून पडावं...किती पाय मारावेत...किती चाक हाताने ढकलावं...ना सुई पुढे सरके...ना टाका मारला जाई...सुई फक्त वरखाली होत होती आणि कापडावर एकाच जागी नुसत्याच गाठी पडत होत्या...नुसती गुंतागुंत. काय होईल नाही सांगितले तर ? आपण हा चुकीचा रस्ता तर बदलू...जिथे आहोत तिथूनच परत फिरू....पण कधीतरी एक वळण चुकीचे घेतले होते त्याचे हे जड ओझे आता कुठे टाकू ? प्राजक्ताला तयार करे...शाळेत त्या दोघी नेहेमीच चालत जात. आणि त्यावेळच्या त्यांच्या गप्पा तर किती रंगत. पण आता गेले काही दिवस फक्त लीना हुंकार भरत होती...आणि हे असे फक्त हुंकार भरणे देखील तिला त्रास देत होते...लीनाला मोकळा श्वास हवासा होता...पुन्हा एक मोकळा श्वास...तोच एक श्वास तिला तिच्या जोडीदाराकडे मागायचा होता.

ती आधी शेखरला भेटली. मुंबईतील एका गजबजलेल्या हॉटेलमध्ये. चारच्या सुमारास. चहा पीतपीत त्याला तिने सर्व सांगितले. हे सर्व कसे घडले. ती कशी त्यात वहावत गेली हे व असेच बरेचसे. मनीषला हे सर्व सांगण्यात धोका आहे हे शेखरने तिला सर्वप्रथम बजावले. परंतु, हा असा खोट्या पायरीवर पुढील संसार नाही उभा करता येणार हे तिने त्याला सांगितले.
ठीक आहे. मग सांग. शेखर तिला म्हणाला.

सकाळी चालायला जाणे हा मनिषचा रिवाज. त्यादिवशी तो जेव्हा फेरफटका मारायला गेला त्यावेळी लीना घरात बसून सगळे बळ एकवटत होती. धावपळ करून प्राजक्ताला शाळेत सोडण्याचे रोजचेच तिचे काम आजही तिने सवयीने केले होते. त्या कामात मनीषने काही हातभार लावावा असे तिला सुरुवातीला फार वाटे. जगभरातील अनेक स्त्रियांप्रमाणे तिलाही त्यातील फोलपणा जाणवला. मग एकदा मनाची समजूत घातल्यावर सगळी कामे एकटीनेच करणे तसे तिला सोपे गेले.

आज मनीषची वाट बघत ती दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचण्याचे सोंग करत होती. सांगायचे हे एकदा ठरवल्यावर त्यावर तिने तसा काहीही विचार केला नव्हता. म्हणजे प्लान ए नीट नाही झाला तर प्लान बी काय असेल हे तिच्या डोक्यात काहीही तयार नव्हते. तो काय म्हणेल काय करेल काही अंदाज बांधता येत नव्हता. घरात कोणी मोठं नव्हतं ज्यांच्यासमोर हातून घडलेली अक्षम्य चूक मान्य करून माफी मागता येईल. वा पुढे काय करावे ह्याचा सल्ला घेता येईल. तिच्या आईशी इतकी जवळीक तिची कधीच नव्हती. खरं तर एखाद्या रात्री मनीषला सांगणे हे सोप्पे गेले असते. नवरा बायको ह्यांचे खाजगीतील संवाद खरे तर बिछान्यात होणे हे अधिक उचित असते काय ? ती नाना विचार करीत होती. परंतु, मनिषशी संवाद असा कधी केलेला तिला आठवेचना. इकडचे तिकडचे बोलणे होई. परंतु, कधी कुठल्या गंभीर विषयावर बोललेले नव्हते आठवत. म्हणजे मग आपण गेली इतकी वर्षे करत काय होतो ? असा विचार येऊन तिने फटकन वर्तमानपत्र समोरील टेबलावर आपटले आणि तेव्हढ्यात दारावरची घंटा वाजली.

मनीष परत आला होता. घामेजलेला. बूट काढीत कोचावर बसला. शिरस्त्याप्रमाणे लीनाने त्याच्या हाती पाण्याचा ग्लास दिला. त्याने ताजे वर्तमानपत्र हाती धरले व नेहेमीप्रमाणे तो बाथरुमच्या दिशेने जाऊ लागला.
"मला तुझ्याशी काही बोलायचंय."
"बोल ?"
"बस ना तू. इथे. माझ्याजवळ."
धीर एकवटून. बळ गोळा करून. वगैरे वगैरे. शेवटी लीनाने मनीषला सर्व सांगितले. कुठल्या सुंदर स्वप्नात ती होती कोण जाणे. ह्या सर्व प्रसंगातून तिने काय आशा धरली होती हे देवच जाणे. पण त्यानंतर मनीष सकाळी जो कचेरीत गेला तो रात्री घरी फिरकलाच नाही. रात्री उशिरा प्राजक्ताला घेऊन लीना त्याच्या ऑफिसला पोचली. खूप काम आहे ते आटोपले की येईन असे त्याने तिला सांगितले व घरी परत पाठवून दिले. दोन दिवस उलटले. मनीष घरी आला नाही. चवथ्या दिवशी मनीषचा निरोप घेऊन ज्यावेळी शेखर लीनाकडे पोचला त्यावेळी लीना अंथरुणाला खिळली होती. तीन दिवस पोटात अन्नपाण्याचा थेंब नव्हता गेला.
त्याने तुला घरातून निघून जायला सांगितलेले आहे. प्राजक्ताला घेऊन.
पण का ? मला त्याच्याशी बोलायचंय.
ते आता कधी होईल नाही माहित. तू तुझ्या आईवडिलांकडे निघून जा. त्याशिवाय मनीष घरी नाही परतणार. गेले तीन दिवस तो आमच्याकडेच आहे.

मनीष किती हट्टी आहे हे तिला वेगळे कोणी सांगायची गरज नव्हती. हा निर्वाणीचा निरोप ऐकल्यावर लीनाच्या हाती काय उरलं होतं ? ती तिच्या माहेरी गेली. त्यावेळी प्राजक्ता पाच वर्षांची होती. आजी आजोबांकडे रहायला जायचे म्हणून ती खुष होती. रस्त्यात उड्या मारीत असलेल्या प्राजक्ताचा थकलेल्या लीनाला उगाच राग येत होता. आता पुढे नशिबी काय वाढून ठेवले होते कोण जाणे.
ह्या सर्वात प्राजक्ताचा विचार कोणी केला होता का ? कुठलेतरी बंड डोक्यात घेऊन चुकीचे पाऊल टाकताना लीनाने वा ह्या लीनाच्या चुकीत आपला सहभाग किती ह्याचा तिळमात्र विचार न करता तिला घराबाहेर काढणाऱ्या मनीषने. कोणी त्या चिमुरडीचा विचार केला का ?

हे सर्व घडून जवळजवळ महिना दोन महिने उलटले. लीना माहेरी रहात होती. लेकीबरोबर. आता ती तिथे किती दिवस राहील कोण जाणे. ह्या विचाराने लीनाच्या आईने तिला तिच्या कपाटात एक खण रिकामा करून दिला. धुसफुसत. त्यात लीनाने स्वत:चे व लेकीचे कपडे पुरवून बसवले. वाहते डोळे व वाहून ओसंडून चाललेले कपाट. सगळीच आता अनिश्चितता. मधल्या काळात कित्येकदा लीना तिच्या घरी गेली. बाहेर उभे राहून वारंवार मनीषच्या विनवण्या केल्या. दार उघड मनीष. मला आत येऊ दे. मला तुझ्याशी बोलू दे...अगदी धाय मोकलून रडून झालं. परंतु ते दार म्हणजे जशी काय चीनची भिंतच उभी. असंख्य आक्रोश गिळंकृत करून अभेद्य उभी रहाणारी. मनीषच्या मित्रांचे मग फावले. त्यांच्या ओल्या पार्ट्या त्याच्या ह्या मोकळ्या घरात विनासायास झडू लागल्या. सकाळी ज्यावेळी कामवाली केर लादी करावयास येई त्यावेळी तिच्यासाठी दारुच्या इतस्तत: विखुरलेल्या बाटल्या उचलणे हे पहिले काम असे.

ताजी जखम अशीच उसकवत मनीषने आपल्या कॉलेजमधील जवळच्या मित्रांना एक दिवस गोळा केले. त्यांच्या रोजच्या हॉटेलमध्ये तो त्यांना घेऊन गेला. प्रत्येकाने आपापल्या आवडीची दारू मागवली. बिलाची चिंता नव्हतीच. नेहेमीच त्यांची बिले मनीषच भरत होता. दारू आली. ग्लास उंचावले गेले. मद्य हिंदोळले. मद्य चढले. व लीनाचे वस्त्रहरण केले गेले. लीनाने एक लफडे केलेय. आणि ते तिने नको तितके पुढे नेलेय. आणि म्हणून मी तिला घराबाहेर काढले आहे. कायमचे. मनीषने आपल्या सर्व मित्रांसमोर हे जाहीर केले. आज मुळी त्याला मित्रांना सगळे सांगायचेच होते. जखम उघडी करावयाचीच होती. मित्र हादरले. खरे तर लीनाला तेही ओळखत होतेच. तीही त्यांच्याच तर कॉलेजची होती. पण बायकांचे काय सांगता येते. तू दारू पितोस म्हणून काय तिने असे करायचे...वगैरे वगैरे...मनीषवर झालेला अन्याय सर्वांनी पटवून घेतला. त्यालाही तो अधिक पटवून दिला गेला. व हे जे तू तिला घराबाहेर काढले आहेस ते तू बरोबरच केले आहेस असा त्याच्या वागण्याला दुजोरा दिला गेला. हे घर तू तुझ्या कष्टाने घेतले आहेस. लीनाने आता असे केल्यावर तिला तिथून बाहेर काढणे हे बरोबरच आहे इत्यादी. शेखर मद्याचे घुटके घेत शांतपणे ऐकत होता.

Friday 1 July 2011

विषवल्ली...भाग ३

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २

आणि एक विचित्र घटना घडली. गौरीकडे दोन्ही मुलांना सोपवून एका मोठ्या कार्यक्रमाला तिघे गेले होते. कार्यक्रम रात्री उशिरा संपणार होता. ह्या अशा कार्यक्रमात शेखर व मनीषचे मन फार रमत असे. नृत्य दारू, गप्पा आणि टप्पा. लीनाचा जीव काही फारसा त्यात न रमणारा. तिने प्रथमच गौरीकडे प्राजक्ताला असे सोडले होते. प्राजक्ता सहा सात वर्षांची व राहुल चार वर्षांचा. कार्यक्रम अर्धवट टाकून काही मनीष शेखर तिथून निघणार नव्हते. मग रात्री अकराच्या सुमारास लीना एकटीच तिथून निघाली व गौरीकडे गेली प्राजक्ताला घ्यायला. प्राजक्ता झोपेला आलेली. राहुल कधीच झोपून गेलेला.
"आज आमच्या पलंगाखाली प्राजक्ताने राहुलला नेले"
"अं ?"
"काही विचित्र विचित्र ती त्याच्याशी बोलू लागली. विचित्र काही वागू लागली."
ह्या वाक्याने हादरलेली लीना, कशीबशी घरी पोचली. मनीष रात्री उशिरा घरी परतला. अशा कार्यक्रमांवरून थोडीच कोणी कोरडे परत येते. ती वेळ नव्हती मनीषशी काही बोलण्याची. रात्रभर लीनाच्या डोळ्याला डोळा लागेना. सकाळी त्याला जाग आल्यावर तीने घडलेला प्रसंग मनीषच्या कानी घातला. गौरी हे असं काही मला सांगत होती.
वर्तमानपत्रात मान डोकावून मनीष शांत.
लक्ष नको देऊस तू. सोडून दे.
पण रात्री मनीष कामावरून घरी आल्यावर सकाळची गोष्ट लीनाने पुन्हा छेडली.
कसं सोडून देऊ ? मी तुला आधीही एखादा म्हटलं होतं. मला कालही नाही आवडलं. गौरी आपल्या लेकीबद्दल खोटं व घाणेरडं बोललीय. ते आपण कसं सोडून द्यायचं ? आणि तुला का सतत ते दोघे लागतात ?
लीनाने ताटात वाढलेली तळलेली चमचमीत कोलंबी लक्षपूर्वक खाणे मनिषसाठी अधिक आनंददायी होते.

तसाही संसार म्हणजे मुळातच ठिगळं लावलेली एक गोधडी. मग एकदा एक ठिगळ लागल्यावर त्यात अजून दहा लागली तरी काय फरक पडतो. बहुधा संसारात ज्यावेळी एक चुकतो त्यावेळी मुळातच त्या चुकीला दुसऱ्याचा हातभार लागलेला असतो. म्हणजे हमालाच्या डोक्यावर 'पँडोराचा बॉक्स' आपण द्यावयाचा..व मग त्या उघड्या फटीमधून विषारी सर्प बाहेर पडू लागले की हमालाच्या नावाने बोंबाबोंब करावयाची. तसं काहिसं.

एकदा एका मंगळवारी मनीष लीना दुपारी जेवायला भेटले. दोघेही कचेरीतून मधेच निघून एकत्र भेटले होते. लीनाला आठवले त्यांचे कॉलेजचे कोवळे दिवस. कॉलेजमध्ये असताना कॉलेज बुडवून ते असेच फिरत असत. खिशात ना फुटकी दमडी. मग चालणे आणि फक्त चालणे. आई लीनाला महिना दहा रुपये पॉकेटमनी देई व मनीषने मागितले की ते त्याला ती देऊन टाकी. त्याच्याकडे कुठून येणार पैसे म्हणून. मग हिचा खिसा रिकामा. ती दुपार लीनाची खूप छान गेली. तिच्या मनीषबरोबर. ते एकत्र जेवले. एकत्र फिरले. काम आटोपल्यावर ती घरी आली व तो आपल्या कचेरीत परत गेला. पण ते तेव्हढेच. रात्री जेव्हा मनीष घरी परतला तेव्हा तो नेहेमीसारखाच पिऊन आला होता. मग तिने त्याला विचारले.
"दुपारी आपण भेटलो तेव्हा तुला नाही का छान वाटलं ? मला तर आपले कॉलेजचे दिवस आठवले. पण मग आता तू कशाला पुन्हा पिऊन आलायस ?"
इत्यादी इत्यादी. अगदी प्यायलेल्या नवऱ्याला एखादी वैतागलेली बायको जे जाब विचारेल ते सर्व तिने विचारले. त्यावर मनीष तिला एकच म्हणाला.
"तू फक्त ती दुपार लक्षात ठेव ना मग ? रात्र कशाला धरून बसतेस ?"
नवऱ्याबरोबरची रात्र लीनाची नसे. रात्र वैऱ्याची असे.

कोवळ्या वयात असल्यापासून मनीषवर जीवतोड प्रेम करणारी लीना आता आयुष्याच्या दुसऱ्या पायरीवर एकटी उभी होती. त्या पायरीसमोर पूर्ण अंधार. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याबद्दल ती स्वत: पूर्णत: अनभिज्ञ. दुसरा पुरुष आयुष्यात येणे हे काही सरळ मनाच्या लीनाला फारसे आनंददायी नव्हते. परंतु, ते घडले. वा ती ते टाळू नाही शकली. जे घडायचे ते नेहेमीच घडते. जर टाळले गेले असते तर त्याचाच अर्थ ते घडणारच नव्हते असा नव्हे काय ? आणि मग त्यात एक प्रामाणिकतेचा तिला लागलेला शाप. वा वरदान ?

हे आपण जे मनीषला फसवत आहोत ते काही बरोबर नाही. त्यात त्याची किती चुकी आहे हे आपण जाणतो तसेच तोही जाणत असेल. आपण त्याच्यावर किती प्रेम केले. व त्याने आपल्या सर्वच गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष केले...हे असे नाना विचार तिच्या मनी येऊ लागले. आता जर हा सर्व प्रकार थांबवायचा असेल तर सर्वात प्रथम घडलेली घटना आधी मनीषच्या कानावर घालणे भाग आहे. त्यातच आपले दोघांचे, नव्हे तिघांचे भले आहे असे लीनाला वाटू लागले. तरच आपण आपला संसार पुन्हा कोऱ्या पाटीवर रेखू शकू, ही तिची भावना. तेच ते तिचं गणित...एक अधिक एक दोन.
दारू पिऊन घरी उशिरा परतणे हे तर मनिषचे रोजचेच झाले होते. कॉलेजमध्ये बऱ्याचदा मनीष म्हणाला तर होता...लग्न झालं की मी सोडणारच आहे...पण आता तर हे नेहेमीचंच झालं...आपण न्यायालयात गुन्हेगाराच्या चौकटीत उभे रहायला निघालो आहोत खरे....पण ज्याच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तो ह्या खटल्यात मुख्य गुन्हेगार आहे त्याचे काय ?

आता हे सर्व मनीषला सांगायचे तरी कधी व कसे हा लीना पुढील यक्षप्रश्न.