नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 16 May 2011

अनुभूती

शुक्रवार आणि रविवार.

शुक्रवार. नेहरू सेंटर मधील कागदाची शिल्पे. अप्रतिम. बघायलाच हवी अशी. आजचा दिवस शेवटचा आहे...धावा, पळा आणि गाठा. मी काही १९९५ साली जहांगीर कला दालनातील प्रदर्शन बघितले नव्हते. त्यातील शिल्पे याहून अधिक सुंदर होती...असे ऐकिवात आले. आम्ही ऑफिसमधून चौघे गेलो होतो. मधल्या सुट्टीत. आपापसात काही बोलत असता, शेजारीच उभ्या असलेल्या एक बाई हलकेच पुटपुटल्या," लहानपणापासून तो हेच करतोय. फार हौस त्याला."
मी त्यांच्याकडे वळून बघितले.
"मी त्याची बहिण."
"हो का?"
"हो. लहानपणी पण कागद आणि कातर घेऊन तो बसलेला असे."
"तेव्हापासून काम करत आहेत म्हणजे ते या कलेवर ! त्या कष्टांनीच तर इतके कौशल्य प्राप्त झाले आहे. नाही का ?"
छोटुसा बेडूक, चिमुकले फुलपाखरू, एखादी लहानशी कळी, एखादा निळा खंड्या...अगदी असे वाटावे...आपणही हॅन्स अॅण्डरसन्सच्या परीकथेतील 'थंबलीना' व्हावे...व ह्या तिच्या चिमुकल्या रानात आपणही एखाद्या गुलाबी फुलात विराजमान व्हावे.
त्यातच त्या शिल्पकाराने वसवलेले आदर्श असे गावातील कौलारू घर. चिमुकले घर, एक विहीर, त्यावर रहाटगाडगे, समोर धष्टपुष्ट गुरंढोरं, एक डौलदार कोंबडा, त्याच्या बाजूला दाणे टिपणाऱ्या दोन कोंबड्या....फक्त त्यात नाही दिसली ती तुरुतुरु पळणारी त्यांची पिल्लावळ. एक सवय नजरेला...चित्र डोक्यात बसलेले...कोंबडा कोंबडी आणि त्यांची पिलावळ. ती त्यांची धांदल फक्त नाही दिसली. पण ही आपली माझी उगाचची हुरहूर. तुम्ही आपले पळा...हा आनंद चुकवू नका.

मग रात्रीचे आठ. वरळीच्या ताओ कलादालन. अच्युतचे प्रदर्शन. अच्युत पालव. कॅलीग्राफर. तो आता निघालाय लंडन व जर्मनीला. त्याची चित्रे घेऊन. त्या चित्रांची मुंबईतील, एका दिवसाची झलक. जसा एखादा खलिता असतो तसेच हे मोठे भिंतीवर लटकवायचे खलिते. त्यावर कधी एखादा श्लोक, कधी ओम तर कधी एखादे देवनागरी अक्षर. अच्युतचा नेहेमीचा व आता जगभर मान्यता पावलेला आत्मविश्वास त्यातील प्रत्येक फटकाऱ्यात नाचरा. मला वाटतं, अच्युत त्याचे फटकारे अवकाशात भिरकावतो. आणि मग ते तसेच त्याच गतीत त्या झपाटलेल्या अवकाशात फुगड्या घालीत रहातात. सगळे त्याचे साहित्य, पाठंगुळीस लावून जागतिक दौऱ्यावर निघालेला हा माझा वर्गबंधू.

शनिवार सामान्य.

रविवार रात्री साडे आठ वाजता आयनॉक्स, नरीमन पॉइन्ट. बाल गंधर्व.
चित्रपटात बाल गंधर्वांची आई त्यांच्या पत्नीला म्हणते "हा असामान्य मुलगा होता आणि त्याला मी उगाच आपल्या सामान्य नियमांमध्ये जखडायला गेले व त्यात नाहक तुझी फरफट झाली."
खरोखर. असामान्य माणसांनी सामान्य आयुष्य जगावे अशी आपण अपेक्षा करतो व मग आपल्या सामान्य अपेक्षा पूर्ण न झाल्याच्या जखमा घेऊन बसतो. कुबेरालाही भीक लागेल अशी त्यांची स्वप्ने माझ्या सामान्य पोटात खड्डा निर्माण करत गेली. त्यांच्या पत्नीची दु:खे माझी झाली.
दिग्दर्शक त्या सिनेमाला एकसंघ रूप देऊ शकलेला नाही...काही प्रश्र्न अनुत्तरीतच राहिले. परंतु ही माझी मते...व तरीही हा भरजरी सिनेमा पैसे देऊन बघायलाच हवा...हे माझे ठाम मत. त्यातील 'बाल गंधर्व एका तलावाच्या काठाशी उभे राहून जेव्हा मुक्त स्वरात अभंग गातात ते दृश्य स्वर्गीय ! आसमंतात त्या क्षणांपुरता फाकलेला तो दैवी प्रकाश...व तो अद्भुत आवाज...!!!!! शब्द संपले.

शुक्रवार व रविवार...कारणी लागले.

कलेची अनुभूती.

तीन वेगवेळ्या माध्यमातून.

कधी निसर्ग व कागद.
कधी कागदावरील शाईचे नृत्य.
तर कधी स्वर्गीय गळ्याची मानवी फरफट.

22 comments:

Raindrop said...

perfect weekend u had :) I Agre with u on the movie...a MUSSSSSSt watch!!

रोहन चौधरी ... said...

वा.. विकांत भलताच सार्थकी लागलेला दिसतोय... अगं कसला योगायोग आहे.. कालच माझे कागदाची शिल्पे. ह्या विषयावर एका मैत्रीबरोबर बोलणे झाले. टी सुद्धा बघायला गेली होती. रवींद्र गोळे का काय त्यांचे नाव? मला पण बघायचं आता तिकडे आलो की... मला सांग हा हे असे कधी कुठे असेल तर.

बालगंधर्व मला बघायचाय पण आता मी तिथे येईपर्यंत थेटरात राहिला तर... :)

rajiv said...

जीवनाचे सामान्य नियम , असामान्य लोकांना लावल्याने त्यांची फरफटच होते..... :(

Raindrop said...

but that cannot be an escape route for people to get out of responsibilities....saglech mhanteel amhanna nakko responsibility amhi genius aahot!!!

हेरंब said...

एकदम बीजी बीजी विकांत :)

tanvi said...

मस्त मस्त वीकएंड :) .... मला आता भारतात आल्यावर ’बालगंधर्व’ पहायला जायचेय.... :)

alhadmahabal said...

"दिग्दर्शक त्या सिनेमाला एकसंघ रूप देऊ शकलेला नाही...काही प्रश्र्न अनुत्तरीतच राहिले."
अगदी बरोबर...
Movie failed to foray into his psyche!

बाकी वीकेंड मस्तच!!

Gouri said...

सुंदर वीकेंड! बालगंधर्व मलाही बघायचाय. त्यात स्त्रीपार्टी करणार्‍या कलावंतांच्या बायकांना काय वाटत असेल हा आईने डोक्यात सोडून दिलेला प्रश्न कित्येक वर्षं छळतोय.

श्रीराज said...

मी ही बघितला, बालगंधर्व. शनिवारी. आईला बऱ्याच दिवसांनी रडताना बघितलं...मजा आली :P

एका अशा माणसाच्या आयुष्यावर दोन अडीच तासांचा चित्रपट बनवणे खूप कठीण वाटते. शिवाय चित्रपट-दिग्दर्शक म्हणून नितीनचा हा बहुतेक पहिलाच प्रयत्न. त्या मानाने चित्रपट खूपच प्रभावी झालाय.

मला आवडलेला सीन म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जेव्हा मिळालेली रक्कम ते एका पिरेवर टेवतात तो... मनाचा ठाव घेतला त्या सीन ने.

अनघा said...

Vandu, the movie watch was just because of you...thanks a ton dear ! :)

अनघा said...

हो रोहणा. गोळे त्यांचं नाव. नक्की सांगेन..परत असेल त्यावेळी. :)

हे बरीक खरंय...कधी परतणार आपण आता मायदेशी ?? सहा महिन्यांनी का?? :)

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल ! :)

अनघा said...

असामान्य लोक आयुष्यभर सांभाळणे म्हणजे जीवघेणी कसरत ! नाही का राजीव ?

आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

अनघा said...

कसं आहे ना वंदू...बऱ्याचदा, हे असामान्य लोक काही जाणूनबुजून पळवाट शोधत नाहीत आयुष्यातील जबाबदारीतून...परंतु, त्यांच्या असामान्य असण्यातच ह्या गोष्टी दडलेल्या असतात...व मग त्यांचे आप्त त्यात होरपळून जातात...नाही का ?

अनघा said...

एकदम एकदम हेरंबा...
:)

अनघा said...

आलीस की नक्की बघ हं तन्वी ! आणि मग नक्की सांग तुला कसा वाटला ते ! :)

आभार गं ! :)

अनघा said...

आभार आल्हाद ! :)

अनघा said...

मग नक्की बघ गौरी ! तुला पडलेल्या प्रश्र्नाचे उत्तर नक्की मिळेल ह्या चित्रपटात ! :)

आभार गं ! :)

अनघा said...

श्रीराज, दिग्दर्शक आहे रवी जाधव. आणि अद्वितीय माणसावर लांबीचा चित्रपट काढणे मला नाही वाटत कठीण आहे...परंतु, दिग्दर्शकाने महत्त्वाच्या गोष्टी गाळलेल्या आहेत, त्यामुळे मुख्य व्यक्ती व त्यांच्या आयुष्यातील व्यक्ती ह्यांच्या बाबतीत अन्याय झाला आहे...असे माझे मत आहे. व हा चित्रपट इतिहासाला धरून केलेला जर असेल, तर दिग्दर्शकाची जबाबदारी आहे की कोणावरही अन्याय होऊ नये...त्यातल्या व्यक्तींची ते ते निर्णय घेतानाची मानसिकता प्रेक्षकाला दाखवण्यात यावी. व ही तर एक बेसिक गोष्ट आहे. नाही का ?
हा काही हॉलीवूडचा Elizabeth वा King's Speech' नव्हे ! की त्यात चित्रपटाला अधिक परिणामकारक बनवण्यासाठी काहीही बदलण्यात यावे !
:)

श्रीराज said...

क्षमा असावी ताईसाहेब! :) मी अगदीच अनभिज्ञ निघालो ह्या विषयात! तुझे मुद्दे पटले...

अनघा said...

आईशप्पत ! ओरडले काय मी श्रीराज ?! तसे काही नव्हते मनात !! :p
:)

श्रीराज said...

छे गं! तसं काही नाही... आणि जरी तू रागावली असतीस तरी मला राग नसता आला. खरं सांगतोय.

अनघा said...

माहितेय ते मला श्रीराज. :)