नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 8 October 2013

ढेप

रोजच्या आयुष्यात पानंफुलं, इंद्रधनुष्य, फुलपाखरं वगैरे लिहिणं फार कठीण. खरं तर मागे वळून पाहिलं असता स्वत:ची ओळख स्वत:ला पटत नाही. अर्थात ह्या सर्व त्यात्या वयातील गोष्टी असतात. निदान सोळाव्या वर्षात तरी मला जग सुंदर दिसू शकलं हे माझं भाग्यच म्हणायचं. परंतु, सध्या लिहायला सुरवात केल्यावर मला मार्गावर दवबिंदू दिसत नाहीत. सामान्य माणसाने सामान्य जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या वाट्यास कुठले दवबिंदू ?

तत्वांना धरून जगायचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या मित्र मंडळींचा रोष ओढवून घेणे.

मजल्यावर तीन लिफ्ट्स. आमचा मजला तिसरा. फारफार तर पन्नास सेकंद तिष्ठत उभं राहावं लागतं. अशाच एके दिवशी आम्ही दोघी वाट  बघत उभ्या होतो. मुंबईतील लोकलमधील लोकं रोज चेहेरा दिसतो म्हणून नाही का नजरभेट झाली की हसून निदान मान तरी डोलावत ? मला तिचं नाव नाही माहित…चेहेरा मात्र खात्रीदायक ओळखीचा. मनातील चढउतार चेहेऱ्यावर दिसावेत त्याप्रमाणे लिफ्टच्या डोक्यावरील दिवा आतील हालचाल दर्शवित होता. एक लिफ्ट उघडली. दोनतीन माणसे बाहेर पडली.
माझी बिननावाची मैत्रीण चापल्याने आत शिरली. तिने बटण दाबून धरलं. लिफ्ट आ वासून स्तब्ध.
"Come!" मला तिने इशारा केला.
"But that one is going up." मी म्हटलं.
"That's okay ! We will take it down !" आत्मविश्वासाने ती उद्गारली. एकदा मिळालेल्या आदेशानुसार वर निघालेल्या लिफ्टला अधोमार्गावर नेणे तसे फारसे कठीण कुठे ? फक्त एक लाल बटण दाबावे. आणि तिला खाली जाण्याचा आदेश द्यावा.
"But…people must be waiting upstairs."
"That doesn't matter!"
"No…I can't do that."
वरच्या मजल्यावरची माणसं काही माझी मित्र नव्हती. पण मित्र असण्याचा संबंध आलाच कुठे ?
तिने खांदे उडवले. कुठून मी या बाईला विचारलं असं काहीसं. तिच्यासाठी बाब फार शुल्लक होती. दार बंद करून घेतले. वर आकडा दोन पेटला. लिफ्ट मान खाली घालून निघाली. तिच्या हातात तसेही काही नसतेच.

एखाद्या लहानश्या गोष्टीत आपण आपला स्वार्थ बाजूला ठेवू शकत नाही. मग आयुष्यात कधी एखादा मोठा लाभ समोर आला तर आपण कसे घट्ट उभे रहाणार ?

नाही म्हणणे कठीण असते काय ? वाल्याच्या बायकापोरांनी वाल्याला नकार नव्हता का दिला ? दुसऱ्याच्या ताटातले आपल्या ताटात ओढून घेणे ही एक वृत्ती नव्हे काय ? कधी छोट्या तर कधी मोठ्या प्रसंगातून ती बाहेर डोकावते. आपल्या डोक्यात हे असले कृमी अंडी घालीत तर नाहीत ना ह्यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर डोके भ्रष्ट व्हायला फार काळ नाही लागायचा.  आपण जगात एकटेच आहोत व ह्या जगाचा जन्मच मुळात माझ्यासाठी झालेला आहे असा भ्रम करून घेण्याचे आपण बंद करावयास हवे.
आपली कृती, ही येणाऱ्या पुढल्या क्षणाची जबाबदारी पेलत असते.
Trying to see a bigger picture….असं काहीसं.

तत्त्व म्हणजे गुळाची ढेप...
आपण…

Saturday, 28 September 2013

हार

नव्याकोऱ्या गाडीला ठोकलं जाणं तरी ठीक आहे.

गाडी ऑफिसखाली एका जागी स्थिर उभी असताना रात्री दीड वाजता एका टँकरने ठोकली. गाजावाजा झाला. सिक्युरिटीने मला खाली बोलावलं. अवाक. हतबल. वगैरे.

त्यानंतर पुढले दोन महिने ऑफिसच्या इमारतीच्या एचआर खात्याशी व टँकरच्या चालकाशी बैठकी झाल्या. त्याच्यावर मी दया दाखवावी अशी त्या चालकाची मागणी होती. आणि ती दया त्याच्या मालकाने त्याच्यावर दाखवावी असा माझा मुद्दा होता. गाडीच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च त्याच्या मालकाने द्यावयाचे नाकारले. मग विमा. त्यातून गाडीची दुरुस्ती झाली. एक महिना उलटून गेला परंतु, विमाच्या वरच्या खर्चाची भरपाई ना त्या मालकाकडून झाली ना चालकाकडून. इमारतीच्या एचआर खात्याने मला तारखा द्यायला सुरवात केली.

अजून थोडे दिवस गेले.
त्यावर अजून थोडे दिवस उलटले.
तसंही हे वर्ष घसरगुंडीवर बसल्यासारखं घसरलंय.
साधारण दोन महिने पार घसरले.

मी एचआरच्या अमितला दूरध्वनी लावला.
"काय झालं माझ्या पैश्यांचं ?"
"मिळणार तुम्हांला मॅडम."
"मिळणार हे तुम्ही मला गेले दोन महिने सांगताय."
"बघतो मी…त्याच्या मालकाला सांगितलंय…देईल म्हणालाय तो…"
"नवीन काहीतरी सांगा राव तुम्ही मला !"
"तसं नाही मॅडम…"
"बॉस ! तसं नाही तर कसं ? तुम्हाला काय वाटलं काय हे सगळं म्हणजे ? काय टाईमपास चाललाय माझा ? तुम्हाला स्वत:ला तुमच्या शब्दाचा मान नाही ! फुकटच्या तारखा सांगताय च्यायला  तुम्ही गेले कित्येक दिवस !"
"मॅडम, थोडा संयम बाळगायला हवा तुम्ही."
"संयम च्यायला गेला तुमचा चुलीत ! आज जर नाही माझे पैसे दिलेत ना तुम्ही तर आज संध्याकाळी त्या टँकरची वाट लावली नाही ना तर नावाची अनघा नाही मी ! दगड धोंडे मारून तोडफोड करून टाकेन मी ! च्यायला ! कोणाला सांगता तुम्ही संयम ठेवायला ?! मला ?! तुमची गाडी अशी कोणी फोडली असती म्हणजे ठेवला असता काय तुम्ही तुमचा तो संयम ! डोक्यात जाऊ नका राव तुम्ही ! गपगुमान माझे पैसे त्याच्याकडून मिळवून द्या ! नाहीतर फोडून टाकेन आज रात्री त्याचा टँकर !"
"मॅडम, मला पंधरा मिनिटं द्या…मी परत फोन करतो तुम्हाला."

पंधरा मिनिटात चेक माझ्या ऑफिसच्या रिसेप्शनला ठेवला गेला.

गाडी फोडल्याच्या दु:खापेक्षाही आता माझं दु:ख आयुष्यभर डोक्याला मुंग्या आणणारं होतं.
मी दोन महिने सामोपचाराने घेत होते…मला तारखा दिल्या गेल्या. 
मी अर्ध्या मिनिटासाठी मानसिक संतुलन जाऊ दिलं… ताडताड बोलले…जे माझ्या बाबांनी, गुरुवर्यांनी कधी शिकवलं नाही अशा भाषेत बोलले…
…पुढल्या क्षणी मला माझे पैसे मिळाले.

कितीही काहीही झाले तरी लढा हा सनदशीर मार्गानेच द्यावयाचा ही माझ्या बाबांची शिकवण आहे. लढा देण्याजोगे लहानमोठे प्रसंग आयुष्यात समोर उभे ठाकणार आहेतच. परंतु हे लढे अरेरावी, दंगेधोपे, जाळपोळ ह्या मार्गाने सोडावयाचे नाहीत. आपण आपल्या तत्वांचा मार्ग सोडला तर आपण आणि गुंड ह्यात फरक तो काय ?
सद्य परिस्थितीत सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा झालेला अंत; माझ्या शब्दांमधून कर्कश बाहेर पडला. आणि मी त्या अंताचा एक पुरावा बनले. 
ही माझी हार आहे.
माझ्या विचारांची हार आहे.
माझ्या वैचारिक घसरणीला…अध:पतनाला माझी मीच जबाबदार आहे.

Thursday, 12 September 2013

जुईची फुलं...

"लगेच परवा कुठून आणणार मी हिच्यासाठी कपडे ?"
ती म्हणाली तेव्हा आम्ही दोघी एका शूटसाठी एकत्र आलो होतो. ती तिच्या मोबाईलवर आलेला एक एसेमेस वाचत चिडक्या स्वरात हे बोलत होती. मी काही न कळून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. आणि तिने तिच्या त्राग्यामागचे कारण सांगायला सुरवात केली.
"I am a working woman…ज्या बायका घरीच असतात त्यांचं ठीक आहे… त्यांना शक्य आहे हे असं एका दिवसात मुलांसाठी कपडे तयार करणं…दही हंडी आहे आणि माझ्या लेकीच्या शाळेत ती साजरी होणार आहे. आणि त्यासाठी तिला कृष्णाचे कपडे घालून यायला सांगितलंय ! आता एका दिवसात कुठून आणू मी कपडे ?!"
"तसेही कृष्णाचे कपडे फार काही कठीण नाहीत ! कमीच कपडे असायचे त्याच्या अंगावर !" मी.
"तरीही…ते मोराचं पीस कुठून आणणार मी ?"
"मी खरं सांगू ? मला वाटतं हे असं आपल्या मुलांना तयार करण्यात ना फार मजा असते !"

आपण जे बोलतो त्याला बहुतेक वेळा आपले अनुभव, आठवणी जोडलेल्या असतात. 
जुईच्या कोमल फुलाचा जणू नाजूक देठ.

लेक कधी मायकल जॅक्सन तर कधी ओनिडाचा डेव्हिल तर कधी टपोरे काळे ठिपके अंगावर मिरवणारा डाल्मेशन. अडीच फूट उंचीचा, कुरळ्या केसांचा मायकल जॅक्सन, रंगमंचावर चांगला दीड मिनिटांचा मून डान्स करून बक्षीस घेऊन आला होता. ओनिडाच्या डेव्हिलची डोक्यावरची छोटीशी शिंग, तिच्या लाडक्या बाबाने रंगवून दिलेला चेहरा…दिवस अगदी संस्मरणीय. आणि ज्युनियर केजीमध्ये वर्गातल्या नाटकातलं ते डाल्मेशनचं पिल्लू…शेपटी हलवणारं. घरून निघतानाच आम्ही भूभू बनून निघालो होतो. वर्गशिक्षिकेने बघताच क्षणी नाकाच्या टोकावर एक काळाभोर टिळा लावला आणि क्षणात माझं पिल्लू, डाल्मेशनचं पिल्लू झालं !

हे सर्व क्षण माझे. तेच माझ्या लेकीचे. काही आम्हां तिघांचे. फक्त आमचे. असे क्षण वेचावे…त्यासाठी आयुष्य वेचावे. पुढले आयुष्य झेपावे…जगता यावे…त्याकरता हीच जुईची नाजूक फुले टिपावी.
आयुष्याची नौका मग कितीही उलटीपालटी झाली…विश्वास बसणार नाही कदाचित; पण ह्याच कोमल कळ्या तारून नेतात…जगवतात.

"I don't know…I had left my job…just wanted to be with my daughter…didn't want to miss out anything…मला आपलं वाटतं…करियर…आज नाही तर उद्या, पुन्हा त्या प्रवाहात शिरू शकतो. मागे नक्कीच पडतो…पण शर्यतीत भाग घेताना मध्येच आपल्या पायांना विळखा घालून एक गोड पिल्लू आलं तर मग कसली ती शर्यत आणि कसलं काय ? ते पिल्लू इतकं भराभर मोठं होत जातं की आजचा दिवस आणि कालचा दिवस ह्यात पण काही साम्य नसावं ! करियरच्या शर्यतीत हे सगळे क्षण बाजूला सारले तर ते मात्र पुन्हा कधीच मिळत नाहीत…करियर लागते पुन्हा हाताशी…असं आपलं मला वाटतं…!"

मला नोकरी सोडणं शक्य होतं ही महत्त्वाची बाब आहेच. ते नसतं तर मात्र फार कठीण होतं. जाहिरात विश्वाला घड्याळ नसतं. चोवीस तास सात दिवस. तेव्हा रहात होतो डोंबिवलीला. दोघांनी जाहिरातविश्वात काम करायचं मग तर बाळं, संसार विसरूनच जावं. रहाट गाडग्याला बांधून घ्यावं.

त्यापेक्षा हे बरं.
थोडी मागे का होईना; पायावर उभी आहे…
हातात जुईची फुलं आहेत.…
पायात त्यांचं बळ आहे.

वहावले.

Wednesday, 28 August 2013

का कोण जाणे...

आकाश स्वच्छ होतं. निळसर काळं. चंद्र गोल होता. वाटोळ्या दिव्यासारखा. दिवा आहे पण खांब नाही. असा. त्याच्या जवळचे आकाश उजळलेले. दूरचे ? अंधारलेले. काळोखी. त्या काळोखात एकही चांदणी नाही. का ? कोण जाणे. तो सगळा अवकाश त्या एकट्या चंद्राचा होता. कधीकधी आपल्याला नाही का वाटत ? एकटं असावं. गुमान बसावं. आतला आवाज ऐकावा. वगैरे वगैरे.
काल चंद्र दिसला. बऱ्याच महिन्यानंतर भेटला. असं होतं. साधी मान उंचावून वर करून बघण्याची तसदी घेतली नव्हती. त्याने एखाद दिवशी यायचंच नाकारलं असतं की मग धाबं दणाणलं असतं.
आयुष्यात वारंवार अमावस्या कोणाला हवी असते ?
चंद्राने रात्री उगवावं.
सूर्य येईस्तोवर दिवा चालू ठेवावा.
मग सूर्याने यावं.
प्रकाश, जीवन वगैरे द्यावं.
आम्ही जगावं.
घेत जावं.
देणं हे काम नेहेमी समोरच्याने करावं.
हे आमचं आयुष्याचं गृहीत आहे.
चंद्राच्या उपकाराचं मला ओझं झालं.
सूर्याचे उपकार कसे फेडू कळेनासं झालं.
उगाच मनात आलं…
दोघांना पोत्यात घालावं…
एक टेबल टेनिसचा चेंडू…
दुसरा फुटबॉलचा.
पाठीवर घ्यावं…
कुठे निघून जावं…
एकटं…
समुद्रात दोघांना भिरकावून द्यावं…
…मग आहेच…
रोजची अमावस्या. 

Sunday, 18 August 2013

थोड़ा है थोड़े कि जरुरत है...

मंडळी,
आपल्या छोट्या मित्रमैत्रिणींना गणवेष पाठवण्याचे ठरवले आणि तुम्ही सगळ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. गणवेषांची खरेदी झाली, पोच झाली आणि तरी आपले पैसे उरले ! मग आपण काही वेगळेच करण्याचे ठरवले. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दुष्काळाची बोंब सतत ऐकू येत होती. मग जरा आसपास चौकशी केली. शबरी सेवा समितीच्या श्री. करंदीकरांना भेटलो आणि एक वेगळंच काम हाती लागलं.

पाण्याची साठवण. ज्या भागात पाऊस पडतो अशा भागात जर टाक्या बांधल्या तर त्यात पडणारा थेंब झेलता येईल, साठवता येईल ही संकल्पना.

आपण बहुतेकजण शहरात रहातो त्यामुळे आपले अज्ञान अफाट आहे ह्याची जाण होतीच. मग श्री. करंदीकरांच्या मदतीने एक पाडा गाठला. आणि तुम्हा सर्वांचे उरलेले पैसे पाण्याची साठवण करण्याच्या कामी लावले. १०,००० लिटर पाणी साठवले जाऊ शकते. ज्यावेळी कधी टाकीतील पाणी संपेल त्यावेळी पाणी मागवावे लागले तरी टँकरमधून येणारे पाणी पाड्यातील लोकं ह्या टाकीमध्ये साठवू शकतात ही अशा प्रकारे टाकी बांधण्यामागची अजून एक जमेची बाब.



महत्त्वाचे म्हणजे ही टाकी पूर्णत: लाभार्थींच्या श्रमदानाने उभी राहिली आहे. आपण ह्यात फक्त सामान पुरवले आहे. 

ह्या वर्षाचे आपण अंगावर घेतलेले काम फक्कड पार पडले आहे. तेव्हा ह्यातून स्फूर्ती घेऊन आपण पुढल्या वर्षी कोणते काम हाती घ्यावे…ह्याबद्दल सर्वांनी विचार करा…आणि अर्थात आम्हाला तुमच्या कल्पना कळवा.
ह्या अनुभवातून जे काही शिकलो, तुमचा विश्वास संपादन केला…त्यातून अशीच काही कामे अजून पार पाडू शकलो तर जगण्याला थोडा अर्थ प्राप्त करून देऊ शकू…
असे वाटते.

 
कामाची सुरवात… 







टाकी बांधताना वापरले गेलेले साचे

उरलेले पैसे सुपूर्त

Sunday, 28 July 2013

मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात…

सध्या मला सुचलेली, मी लिहिलेली जाहिरात टीव्हीवर दाखवली जात आहे. तुम्ही कदाचित बघितली देखील असेल. इथे टाकतेय म्हणजे तुम्हाला कळेल ना की हे माझं पिल्लू आहे !

आणि काय माहित तुम्ही टीव्ही बघता की नाही ?! कदाचित टीव्ही बघत असालही पण जाहिराती सुरु झाल्या की नेमके टीव्ही समोरून उठून जात असाल ! काही भरवसा नाही तुमचा !  :)
त्याही पुढे जाऊन…तुम्ही सगळे कुठे कुठे जगभर आहात ! म्हणजे आम्ही भारतात आमच्या टीव्हीवर जे बघत असतो ते काही तुम्ही बघत नाही !
 
गेल्या वर्षी तयार होऊन देखील ऑन एअर येईस्तोवर बरेच महिने गेले. शेवटी शेवटी तर ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणींनी मला चिडवायला सुरवात केली होती…" ते तू 'नही नही' गाणं कशाला टाकलंस ? म्हणून तुझी फिल्म पण त्या 'नही नही झोन'मध्ये गेलीय !"
:) :)



Thursday, 25 July 2013

ताईस,

ताई,
मी तुला ओळखते तेच मुळी मांच्या गावच्या घराशेजारी रहाणारी आणि मांची नेहेमीच काळजी घेणारी म्हणून.
मां…माझ्या गत नवऱ्याने जिला आईपेक्षा देखील वरचे स्थान दिले होते. त्याच्या कुमारवयापासूनच. गावी तू तिच्या उतारवयात, तिच्या सोबत होतीस म्हणून तुझी ओळख मला तुझ्याबद्दल ओलावा देऊन गेली होती. तूही मला शरदची बायको म्हणून ओळखतेस…वा ओळखत होतीस. कधीतरी तुझ्या हातची भाजीभाकरी खाल्ल्याचे देखील थोडेफार आठवते.

त्या दिवशी तुम्हा सगळ्या गावातल्या लोकांना अरुण गेल्याचं कळवण्यात आलं. आणि तुम्ही गावावरून पोचेस्तोवर पुढे काही होऊ शकत नाही हेही मला कोणी सांगितलं. भर पावसात माणगावावरून निघून आता तुम्ही किती वाजता डोंबिवलीला पोचाल ह्याबाबत वेगवेगळे अंदाज काढले गेले. ज्यावेळी तुमच्या गाड्या पनवेलला पोहोचल्या असं तुम्ही कळवलं त्यावेळी इस्पितळातून अरुणला घेऊन शववाहिका त्याच्या घराच्या दिशेने निघाली. गावोगावी पोचलेल्या मोबाईलच्या सुविधा.

त्याला घरी आणल्यावर त्याच्या कन्येने आणि बायकोने केलेला आक्रोश मी तुम्हाला काय सांगणार ? तो तर होणारच होता. मला त्याबद्दल बोलायचे देखील नाही. मला तू आणि गावावरून आलेल्या त्या कोणा माणसाने जे केलं त्याबद्दल मात्र बोलायचं आहे.

"हे करायलाच हवं. आता ती पुन्हा कधी नटणार नाही. हिरव्या बांगड्या घालणार नाही. तिला पुन्हा नटलेली बघायची ही बाईच्या नवऱ्याची इच्छा असते. हे करायलाच लागतं." तुम्ही येण्याअगोदर एक बाई हे सांगून गेल्या. अरुणच्या कन्येला. ती परोपरीने सगळ्यांना विनवण्या करत होती. "नका ना आईला असं काही करू. करायलाच हवं का हे सगळं ?"…
"तू तरी सांग ना सगळ्यांना." ती मला म्हणाली आणि मी बधिर झाले.
"Mau, this is beyond my capacity."

हे परक्या भाषेतलं वाक्य माझ्यासाठी परक्या अनघाच्या तोंडून निघालं.
आज हे वाक्य; माझ्या मृत्यूचा दरवाजा अजून थोडा उघडतं.
आज ते वाक्य; तीळतीळाने मला त्या दरवाजाकडे ढकलत रहातं.
आज ते वाक्य; मला शतकानुशतके मागे ढकलतं.
माझ्या छातीवर मणामणाचं ओझं ठेवत जातं.
वाटतं…
मी कधीच चितेवर चढले आहे…
माझ्या छातीवर कैक गोण्या ठेवल्या गेल्या आहेत.
रोज त्या माझ्याच अश्रूंनी भिजत जातात. अधिकाधिक भारी होतात.
माझी लाकडं आता कोरडी होणार तरी कधी ?
माझी चिता आता पेटणार तरी कशी…?

त्याच्या कृश तरुण बायकोच्या हाडांभोवती एक लुगडं गुंडाळलं गेलं.
ताई, तुम्ही येऊन जे करणार होतात त्याची ती पूर्व तयारी होती. कुठल्या चित्रपटाचे जर हे दृश्य असते तर त्याला गूढ संगीत दिले गेले असते. वेळ झाली. बाहेर पाऊस होता. काळोख माजला होता. काळोखाचे माझ्यावर फार उपकार झाले त्या रात्री. सूर्य माजला असता तर धर्म रखवालदारांचा माज भगभगीत दिसला असता. 
इमारतीसमोर अरुणला ठेवलं गेलं. काही वेळापूर्वी कोणी वर छप्पर घातलं होतं. गळक्या आभाळापासून आडोसा ?
की होऊ घातलेल्या चेटकी कारवायांना आडोसा ?
मला तेव्हा वाटले… 
आम्ही खोल काळोख्या उंदराच्या बिळात आहोत. आम्ही काळे करडे उंदीर आहोत. भयाण रात्र आहे. आम्ही माणुसकीत खोल खोल दात खुपसले आहेत. माणुसकी सगळ्याच उंदरांच्या तोडांतून ओघळते आहे. किळसवाणे. सगळेच. आमचे लालभडक डोळे सुखात लुकलुकत आहेत. बिळाबाहेर ओल आहे. बिळामध्ये ओल आहे.
आम्हा उंदरांच्या हृदयात मात्र कोरडे पाषाण ठासून भरले आहेत.
मी उभी होते. माझ्या बाजूला अरुणची बायको होती. हाताची हाडं पदर गळ्याभोवती घट्ट दाबून घेत होती. तू तिच्या पलीकडे उभी होतीस. आल्यापासून तू एक आक्रोश मांडला होतास. काळोख भेदत तो आवाज एक भयाण वातावरण निर्मिती करीत होता. वहिनी तुला सांगत होत्या…शांत रहायला. पण मला वाटतं त्या संपूर्ण काळनाटकाचे मुख्य पात्र तू होतीस. एकच गोष्ट तू पुन्हा पुन्हा करत होतीस. सुलभाच्या पदराआड झाकलेल्या मानेला तू हात घालत होतीस. का कोण जाणे मी तिला घट्ट मिठीत धरून ठेवलं होतं. तिचं दु:ख माझ्या ओळखीचं होतं. गेले सहा महिने जीव तोडून हेच ते दु:ख तिच्यापासून मी दूर बांधून ठेवलं होतं.

अचानक तुझ्याबरोबर गावावरून आलेला तो मध्यमवयीन माणूस कुठूनसा डोकावला. "खाली बस आणि आटपून घे ते !" तुझ्या कानात अधिकारवाणीने त्याने सांगितले. हो हो करत तू तिच्या गळ्याला हात लावलास. कोण जाणे का मी तिथून तिरमिरीत वर गेले. मी बधिर होते. माझी घुसमट झाली. मला आक्रोश करायचा होता. एकही आवाज न काढता मी बिछान्यावर बसून आक्रोश केला. असा आक्रोश जो धो धो वाहत्या ओढ्याला अकस्मात एखादा अजस्त्र दगड आडवा यावा आणि ओढा लुप्त व्हावा…तसा आक्रोश मी केला आणि तसाच तो छातीत ढकलून दिला. पुन्हा दाराशी आले. भिंतीला टेकून ठेवलेली छत्री उन्मळून पडल्यागत जमिनीवर पडली होती. तिला घेतले आणि तशीच खाली आले.

ताई,
तोपर्यंत तू दावा साधला होतास.
तिच्या गळ्याभोवती पदर अधिकच आवळला गेला होता.
हृदयाच्या घुसमटी पुढे शरीराच्या घुसमटीचं कुठे काय ?

लहानपणी माझ्या एका मैत्रिणीचे बाबा वारले. तिच्या आईने तिचे मंगळसूत्र कधीच उतरवले नाही. कदाचित त्या बळावर तिने आपल्या तीन मुलांना हिंमतीने वाढवले.
बाबा गेले त्यावेळी आईने तिच्या गळ्यातले मंगळसूत्र काढून माझ्या हातात ठेवले. म्हणाली कपाटात ठेवून दे. त्या मंगळसूत्राची झळ अजून मला माझ्या हातावर जाणवते.
माझ्या कपाटाच्या आत ठेवलेले माझे मंगळसूत्र माझ्या नजरेस अधूनमधून पडतं. हृदय जड होतं.
तुझं लग्न कधी झालं की नाही ? कधी हा प्रश्न मला पडला नव्हता त्यामुळे त्याचं उत्तर मला माहित नाही.
त्या दिवशी देखील तुझ्या गळ्याचा शोध मी घेतला नाही.
आता मला तुला एकदा तरी भेटायचं आहे. दुसऱ्या एखाद्या बाईच्या मनपाखरूचे तडफडणे; एखादी बाई धर्माच्या नावाखाली पचवू तरी कशी शकते हे मला जाणून घ्यायचे आहे.

त्या दिवशी मी दुसऱ्या खोलीत बसले होते. सगळ्या तरुण मुली होत्या तिथे. त्यांना प्रश्न पडले होते…नवरा गेला म्हणून बायको आता कधीच नटू शकणार नाही ? तिच्या हातातला हिरवा चुडा फोडायलाच हवा ? तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र दुसऱ्या कोणी खेचून 'वाढवायला'च हवं ? तिला मग सतीच देऊन टाका. ही माणसं सती देण्याआधीचे सर्व विधी करतात…फक्त तिला जाळत नाहीत ! कारण तो कायद्याने गुन्हा ठरवला आहे ! हा कुठला धर्म ? हा कुठला न्याय ?
दबक्या आवाजातील कुमारिकांचे ते प्रश्न होते.
खोलीत एक भीती दबा धरून बसली होती. भिंतीवरच्या पालीसारखी.
आणि मी ?
ताई, मी अधांतरी होते. 
बधिर.
आयुष्य थांबून गेल्यासारखी.
आतल्या खोलीत हक्काने मंगळसूत्र घालणाऱ्या बायका. 
काही माझ्यापेक्षा वयाने सान.
तर काही माझ्यापेक्षा थोर.
बाहेर गॅलेरीत तरुण कुमारिका.
मी ना इथली.
ना मी तिथली.
शतकानुशतके बायकांवर टाकल्या गेलेल्या ओझ्याखाली फुका मी घुसमटलेली.
माझा नवरा गेला तेव्हा देवाने माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेतली. ती अशुभ घटना दुबईत घडली. नाहीतर मला खात्री आहे की ही तुझ्यासारखीच कोणी दुसरी धर्मरक्षक बाई माझ्याही समोर चेटकिणीगत उभी राहिली असती ! माझा तमाशा केला असता !

"तू तरी कर ना काहीतरी…"
ही मला करण्यात आलेली विनंती होती ?
ही एक खात्रीलायक हक्काची मागणी ?
मी नक्की काहीतरी करेन….तिच्या आई सोबत घडून येणारी दुर्दैवी घटना मी थांबवेन…
ही आशा…?
आणि मी काय केले ?

माझ्या पायात फुका मणामणाचे ओझे.
डोक्यावर धर्माचा फुकटचा खविस.
पुरुषांनी जन्माला घातलेला.
बायकांनी जोपासलेला.
ताई, आज मी एक मागणी घालणार आहे. तुझ्याकडे नाही. कारण पुरुषांनी केलेले नियम शिरसावंद्य मानून पाळणारी तू बाई आहेस. तुला दुसऱ्या बाईच्या मनाची तशीही पर्वा नाही.
ती बाई, नवरा मेला म्हणून स्वत:च्या नावापुढे लागलेले त्याचे नाव जाळून टाकणार नाही ! हे जग एखाद्या एकट्या बाईसाठी किती धोकादायक असू शकते हे मी तुला सांगायची आवश्यकता मला वाटत नाही. परंतु, त्या काळ्या मंगळसूत्राबरोबर त्या समाजात वावरताना…नवऱ्याच्या अस्तित्वाचे कवच नसताना…ते मंगळसूत्र कदाचित तिला एक संरक्षण देऊ शकेल…हा विचार तर तुम्हा कोणाच्या मनात देखील येत नाही…!

आज माझे आवाहन पुरुषांसाठीचेच आहे.

…ज्यांना गावकी आहे…ज्यांच्या आयुष्यात त्यांची गावची माणसे फार मोठे स्थान राखून आहेत…सोयर असो वा सुतक…ज्यांचे कुठलेही कार्य ह्या धर्मरक्षकांशिवाय पुढे सरकत नाही…ज्यांची ही माणसे स्वत:ला; माणुसकीपेक्षा धर्माचे रक्षक मानतात…ज्या ज्या पुरुषांना आपल्या बायकांविषयी थोडी तरी आपुलकी आहे… त्या प्रत्येक पुरुषाने आत्ताच एक काळजी घ्यावी…आपल्या त्या धर्मरक्षक आप्तस्वकीयांना सांगून ठेवावं…
"मी मेल्यावर माझ्या बायकोला सती देता येत नाही म्हणून तिच्या मनाला असे सती देऊ नका….! तिच्या गळ्यातले मंगळसूत्र, तिच्या हातातील हिरव्या बांगड्या… ह्यांचे नक्की काय करायचे ह्याचा विचार तिला आणि फक्त तिलाच करू द्या. तो निर्णय तिने कधी घ्यायचा हा निर्णय देखील तिचाच हवा…आणि ही माझी शेवटची इच्छा असेल ! माझ्या नावावर ही नसती बिलं फाडू नका ! ती नटलेली मला शेवटचे जे काही बघायचे असेल ते मी आणि ती जिवंतपणी बघून घेऊ ! मी मेलो म्हणून माझ्या बायकोवरची सगळी सत्ता तुमच्या हातात आल्यागत तिचे हृदय जाळून टाकू नका !"

अनघा