एकूणच सज्ज्यात उभं राहून बाहेर बघायला मला आवडतंच.
वाटतं आपण कोणीही असू शकतो. हे हाडामांसाचं फक्त एक आवरण आहे. ते मी पांघरलेलं आहे. तात्पुरतं. पुढल्या क्षणी जर मला वाटलं तर हे पांघरूण झुगारून देऊन समोरच्या आसमंतात पंख पसरून उडून जावं…तर ते तसं करण्याचा अधिकार मला आहेच.
समोर आंब्याचं हिरवंगार झाड. आभाळाने धुवून वाळत ठेवलेलं. फळाचे महिने संपलेले. झाड मोकळंढाकळं. ओटीपोट रिकामं. एका डहाळीवर चिमणी. दुसऱ्या फांदीवर पोपटाचं पिल्लू. त्याला जगण्याची नवलाई. समोर जुन्या इमारतीखाली डांबर जाळत एक पिवळट बनियन घातलेला पुरुष.
काय विचार करीत असेल तो ?
आज संध्याकाळी चार पैसे हातात येतील. त्यात झ्याक एक बाहुली येल. बनी खुश होल.
की…
हिच्या बांगड्या परवा वाढवल्या नाही का ? जाताना घेऊनच जाऊ…
की…
आंटीकडे जाऊन बरेच दिवस झालेत….!
समोरच्या फांदीवर कावळा बसला. तो नसता आला तरी चाललंच असतं. असा एक सुतार बाबांनी शोधला होता. तो नसता आला तरी चाललंच असतं. त्याची नजर वाईट आहे असं बाबांना सांगितलं तर त्यांना ते पटलं नाही. तरी आई सांगत होती…त्याची नजर वाईट आहे हे मुलींनाच कळणार नाही का ? तुम्हाला कुठून कळणारे ? पण बाबांनी काही ऐकलंबिकलं नाही...आमचं नाहीच आणि आईचं पण नाही.
चिमणीचा आत्तापर्यंत उत्तर ते दक्षिण शोध झाला होता. आणि पोपट ? कोण जाणे. नाही दिसला. म्हणजे माझ्या आयुष्यात हा कावळा आला आणि पोपट निघून गेला.
कावळा शांत का बसत नाही ? कावकाव कावकाव.
त्याला त्याच्या आतला आवाज ऐकायचा नसतो का ? ज्याला असा आपल्या आत्म्याचा ध्वनी ऐकावयाचा नसतो तो असा बोंबाटत असतो.
खाली बघितलं तर मी फक्त पहिल्या मजल्यावर उभी होते.
म्हणजे तसंही हे आवरण वगैरे फेकून उडून जाऊन काही फारसा उपयोग नव्हता. न्यूटनने जर गुरुत्वाकर्षणाचा शोधच नसता लावला तर माणूस कधीतरी उडू शकला असता का ? म्हणजे उगाच आपण शोधात बंद झालो ! न्यूटनमुळे उडी मारली की आपल्याला खालीच येणं भाग पडतं ! आपण उडू शकत नाही !
वैतागे !
डॉक्टरांच्या मदतनीस बाईंनी हाक मारली म्हणून मी आत जायला वळले.
कावळा बसला केकाटत.
डांबरी माणूस डांबर जाळीत.
आणि…
वेड्या न्यूटनच्या आत्म्याला उचकी लागली !
डॉक्टरांसमोरील खुर्चीत बसता बसता मला ऐकू आली.