नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 27 February 2012

असूया

"हे बघ, तुझी मैत्रीण आहे ना सुजाता तिला आणि तुला मी इंग्रजी शिकवत जाईन. रोज संध्याकाळी." बाबा संध्याकाळी ऑफिसमधून आले आणि दिवाणखान्यात त्यांच्या खास खुर्चीत बसून मला म्हणाले.

खरं तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी, सध्या बॅडमिंटन खेळायला सुरुवात केलीय. आमचे तसे सिझन असतात. कधी लगोरीचा सिझन, कधी चोरपोलीस तर कधी गोट्या. आता हे बॅडमिंटन आम्हीं सगळ्याजणी प्रथमच शिकतोय. आईने एक रॅकेट पण आणलीय माझ्यासाठी. आणि फूलं, नाक्यावर दामूकडे मिळतात. ती आम्हीं आणतो. कधी मी, कधी सुजाता तर कधी रश्मी. आता माझी रॅकेट तशी फुलाला लागते. कधीमधी फूल, रॅकेटच्या स्टीलच्या कडेला लागतं. मग टिंग असा आवाज होतो आणि टुणकन ते खालीच पडतं. श्या ! पूर्वी तर ते माझ्या अंगावर यायचं आणि माझी रॅकेट कुठे भलतीकडेच फिरायची. म्हणजे हवेतच. आणि फूल कुठे दुसरीकडेच. तशी माझीच रॅकेट पहिल्यांदा लागायला लागलीय. महिनाभर आम्हीं सगळ्याजणी प्रयत्न करत होतो. जमिनीवर पडलं फूल की मग गेला माझा चान्स. म्हणजे हा खेळ दोघीजणीच खेळू शकतात म्हणून. मग सुजाता येणार खेळायला. आणि मी बाहेर. मग वाट बघायची आपण. कधी कोणाचं फूल जमिनीवर पडतंय म्हणून. मान एकदा इकडे एकदा तिकडे. आणि मनात तर सारखं वाटतं, की ह्यांचा डाव रंगूच नये ! इथे सूर्य मावळत जातो आणि मग हळूहळू फूल दिसेनासं होतं. मग नाही खेळता येत. आमच्याकडे काही नेटबीट नाहीये. पण तशी काही गरजच नाहीये मुळी. लागतच नाही ते आम्हांला ! आम्हीं असं वरवर उडवतो फूल आणि असं पुढे. मग जर ते सुजातापर्यंत पोचत नसेल तर सुजाता अशी धावत धावत येते पुढे. आणि रॅकेट लावते फूलाला. मग कधीकधी ते फूल माझ्यापर्यंत येतं. कधीकधी. नाहीतर तिथल्यातिथेच जमिनीवर पडतं !  म्हणजे प्राजक्ताचं फूल जमिनीवर पडावं तसं. खरं तर आम्हीं शटल नाहीच म्हणत शटलला. फूलच म्हणतो. पांढरंशुभ्र फूल. रश्मी मात्र शटल म्हणते. आमच्यात ती एकटीच इंग्रजी शाळेत जाते. म्हणून. आणि रॅकेट आणि फूल एकमेकांवर आपटलं की त्याला कनेक्ट झालं असं म्हणतात. तिनेच सांगितलं आम्हांला. पंधरा दिवसांत आमचं फूल बिचारं फिस्कारतच. एकेक पीस गळून पडतं आणि लागतं हवेत भिरभिरायला. म्हणजे आम्हीं हे असे रॅकेट धरून खाली उभे आणि हे आमचं फूल येतंय खाली हळूहळू. खाली यायचं म्हणून येतं. ते गुरुत्वाकर्षणामुळे. झालंय ते आमचं अभ्यासात. नाहीतर मध्येच कुठे एखाद्या झाडावर जाऊन बसलं असतं. थकलंभागलं. चाफा निखळला झाडावरून की कसा येतो भिरभिरत जमिनीपाशी ? तसं येतं ते खाली. त्यातून आमच्या बिल्डिंगी समुद्राजवळ. म्हणजे दोन बिल्डिंगी अशा खंबीर उभ्या आहेत मागे पण तरी वारा असा वळून वळून येतो आमच्या फुलावर आपटायला. मुद्दाम. आणि जातं मग ते वाऱ्याबरोबर कुठे भलत्याच दिशेला. फिरायला. म्हणजे ते वाऱ्याशी खेळतं आणि आम्हीं खाली उभ्या अशा बावळटासारख्या...वर आकाशाकडे बघत. हातात रॅकेट घेऊन. तलवारी धरल्यागत. फूलाची वाट बघत. आणि हे चाललंय आपलं वाऱ्याच्या खांद्यावर बसून तरंगत तरंगत. जसं काही त्या जादूच्या गालिच्यावरच बसलंय. दिसतबिसत नाही गालिचा...पण फूल दिसतं ना पुढेपुढे जाताना. असं.

मात्र हे सगळं करायला शाळेतून आल्याआल्या लवकर खाली जायला लागतं. बॅग टाकायची, पटकन कपडे बदलायचे. कंगवा फिरवायचा केसांवर की झालं. कंगवा नाही फिरवला तर भूत. म्हणजे डोक्याभोवती हे असं एक जंजाळ. पांगारा कसा दिसतो पानंफुलं नसलेला ? फांद्यांची टोकंटोकं ? आणि खाली दोनदोन खोडं. म्हणजे माझ्या दोन वेण्या. आई सकाळी ऑफिसला जायच्या आधी देते बांधून, घट्ट. संध्याकाळपर्यंत वेण्या रहातात जागच्याजागी पण डोक्यावर मात्र होतं जंजाळ तयार. तसं. न विंचरताच खाली खेळायला गेलं की आहे आईचा ओरडा. साधा कंगवा पण फिरवता येत नाही का गं म्हणून ! त्यावर मग मी एक आयडीया काढलीय. म्हणजे थोडं पाणी घ्यायचं हातावर आणि असं शिंपडायचं डोक्यावर. आणि मsग कंगवा फिरवायचा डोक्यावर. गपचूप बसतात मग सगळे केस आपापल्या जागेवर. अशा मी खूप कायकाय आयडीया काढत असते. आईला काही कळत नाही, पण खरं तर खाली लवकर जाणं हेच त्यावेळी खूप महत्त्वाचं असतं. जसं सकाळी तिचं ट्रेन पकडणं महत्त्वाचं असतं तितकंच ! उशीर झाला तर मग बिल्डींग मधली सगळी मुलं क्रिकेट सुरू करतात ! आणि मग आम्हांला जागाच नसते खेळायला. आणि हे सगळं ही मुलं मुद्दाम करतात. जागा अडवून ठेवणं वगैरे. म्हणजे एकच कोणीतरी लवकर खाली येतो आणि मग कमरेवर हात ठेवून उभा रहातो. विठोबा सारखा. आम्हीं सगळे एकाच शाळेत जातो. त्यामुळे आम्हीं नेमके एकाच वेळी घरी येतो. तापेय डोक्याला नुस्ता. जगात ही मुलंच नसती तर खरं बरं झालं असतं ! दादागिरी नस्ती ! म्हणजे त्यांना बघून मला माकडांची आठवण येते. हातात काठ्या घेऊन इथेतिथे पळणारी माकडं. असं आमच्या पुस्तकात लिहिलंय की माणूस हा आधी माकड होता. पण इथे त्याच्या उलटं दिसतं. ही सगळी मुलं आत्ता माकडं झालीयत. आधी लहान होते तेव्हा आमच्यासारखी माणसंच दिसायचे. म्हणजे आईचा हातबीत धरून असायचे. पण आता माकडं झालीयत ! आणि ही बिल्डींग काही माझी नाहीये. मी इथे रहातच नाही. इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी रहातात. आणि मी एकटीच समोरच्या बिल्डींगमध्ये. म्हणजे मी एकटीच मुंगी आणि त्या खूप मुंग्या. मग एकटीच हरवलेली मुंगी कशी जाऊन मिसळते सगळ्या तिच्या मैत्रीणींना ? तुरूतुरू ? तसं. सुजाता माझी पहिली मैत्रीण. साधना नंतरची. साधना मेली. आम्हीं दोघी लहान होतो तेव्हाच. मग सुजाता माझी मैत्रीण झाली. ती आणि मी एकाच शाळेत जातो म्हणून. मग आम्हीं एकत्र स्कूलबसने जातो. मी सातवीत आणि ती सहावीत.
"कशाला ते बाबा ?" आता बाबा सांगतील काहीतरी आणि मग सगळं आमचं खेळणं जाणार बाराच्या भावात. बाराच्या का ? तेराच्या का नाही ? कोण जाणे ! ते महत्त्वाचं नाहीये !
"इंग्रजी तर यायलाच हवं. आणि ते आत्तापासूनच यायला हवं. नंतर तुला ते कठीण जाईल."
"पण बाबा, मी करतेय ना ! येतं मला !" मला खरं तर नेहेमी सगळं माहित असतं. पण तसं आमच्या शाळेतल्या बाईंना आणि सरांना का नाही वाटत कोण जाणे. ते मार्क देत नाहीत ! त्याला मी काय करणार ? बाबांनी त्यांना हे समजावून सांगायला पाहिजे ना ? मला सांगून काय उपयोग ?
बाबा माझे, ही भली मोठ्ठी पुस्तकं वाचत असतात. हातात पेन्सिलबिन्सील घेऊन. सगळ्या पुस्तकांवर खूणा ! त्यांना जे आवडतं, किंवा त्यांना जेजे महत्त्वाचं वाटतं, त्याच्यावर ते खूणा करून ठेवतात. म्हणजे अशा आडव्या रेघा. नाहीतर बाजूला कोपऱ्यात उभ्या रेघा. मला कधीकधी वाटतं..की म्हणजे हे अख्खं पुस्तकंच महत्त्वाचं आहे नाही का ? कारण एव्हढ्या जाड्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर ह्या इतक्या रेघा !
"तू सांग तुझ्या मैत्रिणीला. संध्याकाळी मी आल्यावर बसूया रोज." संध्याकाळी ? मग आमचं खेळणं ? आत्ता कुठे आम्हांला उडवता येतंय फूल रॅकेटने ! रोज प्रॅक्टिस नाही केली तर मग येतंय ते पण विसरणार आम्हीं !

माझं मन माझ्याशी सारखं बोलत असतं. म्हणजे जर 'मनातल्या मनात बोलणं' असं काही नसतंच तर मी सारखी बडबडच करताना दिसले असते ! वेड्यासारखी ! मावशीच्यावर एक वेडी रहाते. ती एकटीच बोलत असते गॅलेरीत उभी राहून. म्हणजे तिच्या जे मनात येतं ते ती मोठमोठ्याने बोलत रहाते. हातवारे वगैरे करून. आपल्याला भीतीच वाटू शकते तिच्याकडे बघून खरं तर. मला नाही वाटत. बाबा मला मारत नाहीत म्हणून त्यांची मला भीती नाही वाटत. आई धपाटा घालते म्हणून तिची म्हटलं तर वाटते. धपाटा घालते पाठीत नाहीतर हातातला कांगावा सटकन मारते. आणि कांगाव्याला दात असतात ते हातावर उठतात. मी काळी असले म्हणून काय झालं ? तरी ते दात हातावर दिसतातच. हे असं होतं माझं. म्हणजे माझं डोकं आरशासारखं आहे. एकदा आई मला एका दुकानात घेऊन गेली होती. तिथे एक आरसा होता. आणि बरोब्बर त्याच्या समोर दुसरा आरसा. तर मग मी इतकी दिसायला लागले. म्हणजे एकदम प्रचंडच. मी आत मी आत मी आणि आत पण मीच ! असं !  माझ्या डोक्यात असतं तसंच. एकातेक एकातेक.

"बाबा !" माझा जाडा चष्मा मी वर केला आणि बाबांकडे बघितलं. बाबांनीच मला उशिरा नेलं डोळ्यांच्या डॉक्टरकडे. त्यामुळे लागला तोच हा असा जाडा चष्मा लागलाय मला ! डॉक्टर चांगले ओरडले होते तेव्हा बाबांना ! "पाटील, काय हे ! लवकर आणायचं ना तिला ! आता खूप वाढलाय नंबर !" पण खरं तर मलाच नव्हतं कळलं की मला दिसतंच नाहीये फळ्यावरच ते ! मला एकदम मागे बसवलं बाईंनी, तेव्हा कुठे कळलं ! म्हणजे काळा फळा आणि त्यावर काहीच नाही...बाई लिहितायत आपल्या. काळं काळं आकाश आणि एकही चांदणी नाही ! असं !
"सांगतोय ते ऐक." बाबांनी एकदा मनात घेतलं की सोडतच नाहीत मुळी !

सकाळी मी खाली आधी पोचते सुजाताच्या. स्कूलबससाठी. बस आमच्या गल्लीत शिरली तरी ही नव्हती आलेली. तिचे पण लांब केस आहेत. मग तयारीचा अर्धा वेळ त्या शेपट्या बांधण्यातच जातो. आली मग धावत धावत. मी बस थांबवून धरली तोपर्यंत. आम्हांला दोघींना कधीतरी जोडीने बसायला जागा मिळते. त्या दिवशी नेमकी मिळाली.
"अगं, माझे बाबा म्हणतायत की ते आपल्याला रोज संध्याकाळी इंग्रजी शिकवणार आहेत. आपल्याला दोघींना. येशील का तू ?"
"मला विचारायला हवं माझ्या बाबांना." सुजाता खूप हुशार आहे. म्हणजे नेहेमी पहिला नंबर वगैरे.
"विचार आणि सांग मग."

चारपाच दिवस आमचा बॅडमिंटनचा खेळ खूप रंगला. मी आणि सुजाता नाहीतर मी आणि रश्मी. म्हणजे मी आहेच ! मी फूल मुळी सोडतंच नाही आता. बरोब्बर माझी रॅकेट जाऊन फुलाच्या टपलीत मारते, की गेलंच पाहिजे फूल समोर !

बाबांनी इंग्रजी व्याकरणाची खूप पुस्तकं जमवलीयत. नवीजुनी. छोटी मोठी. हिरवी निळी. चित्रांची. बिन चित्रांची. वेगवेगळ्या रस्त्यांवर बाबांचे ठरलेले रद्दीवाले आहेत. बाबा त्यांना सांगून ठेवतात आणि ते बरोब्बर काढून ठेवतात पुस्तकं. खास बाबांसाठी. सकाळी ऑफिसला जाताना ते खिशात एक पिशवी घालूनच बाहेर पडतात. आणि मग काही छान पुस्तकं मिळाली की येतात घरी खुशीत. एका हातात पुस्तकांनी भरलेली पिशवी. आणि दुसऱ्या हातात पिशवीत न मावलेली पुस्तकं ! मी रोज वाट बघते त्यांची गॅलेरीत उभी राहून. अगदी दूरवरूनच दिसतात ते मला. पांढरेशुभ्र कपडे घातलेले उंचउंच बाबा. जसजसे ते घराजवळ येतात तसतसे ते बुटके होत जातात. अगदी घराखाली आले की मला वाकून बघायला लागतं. मग त्यांचं डोकं वरून दिसत आणि खाली जमिनीवर एकदम पाय. मधले बाबा दिसतच नाहीत. नाहीतर कधीच मला बाबांचं वरचं डोकं दिसत नाही. ते घरात शिरले की मी बराच वेळ त्यांच्या मागे मागे फिरत रहाते. मी पुस्तकात वाचलंय एका. भूत कुठल्याही माणसाचं रूप घेऊन येऊ शकतं ! आणि मग ते त्या माणसाच्या घरात शिरतं. म्हणून मग मी हे माझे बाबाच आहेत की कोणी भूतच आलंय ते लक्ष ठेवून बघते. हे कोणालाच माहित नाहीये ! मग बाबा हातपाय धुऊन पुस्तक घेऊन वाचत बसले की मग कुठे मला हुश्श होतं ! कारण भूतं काही पुस्तक वाचत नाहीत ! माहितेय ते मला ! म्हणजे हे पुस्तकात डोकं खुपसून बसलेले माझे बाबाच आहेत ! असं.

काल आम्हीं आमचा रंगलेला डाव सोडून घरीच आलो होतो. मी आणि सुजाता. बाबा येताना दिसले मग आम्हीं पण वर आलो. आमचा इंग्रजीचा क्लास सुरू होणार होता. म्हणून. घरात एक खुर्ची बाबांची आहे. त्याच्यावर बाबा बसले आणि समोर आम्हीं दोघी. हातात वही आणि पेन घेऊन. आम्हांला शाळेत खूप लिहायला लागतं. आणि आम्हीं शाईचं पेन वापरतो. ती शाई माझ्या मधल्या बोटाला नेहेमी लागते. आणि पेन हातात धरून धरून आता माझ्या त्या बोटाला टेंगुळच आलंय ! बाबांनी सुरवात केली a, e, i, o, u वरून. ते शिकवायला लागले. माझ्या बाबांचा आवाज एकदम छान आहे. म्हणजे एकदम मृदू. हळुवार सांगतात ते. आणि कधीच ओरडत नाहीत. आम्हीं दोघी एकदम मन लावून ऐकू लागलो. आणि मला हळूहळू मजाच यायला लागली. एकेक आम्हीं लिहून घेत होतो. बाबा एकेक वाक्य सांगत होते. an कधी वापरायचा. a कधी वापरायचा. असं खरं तर सगळं नीटच चाललं होतं. पण मग एकदम माझ्या लक्षात काहीतरी वेगळंच आलं. मग माझं मन सैरभैर झालं. म्हणजे मग बाबा काय सांगतायत ते कळेनासच झालं. हे माझे बाबा, मुळी माझ्याकडे बघतच नव्हते ! बाबा सुजाताकडेच बघत शिकवत होते ! पण बाबा माझे आहेत ना ? ते काय सुजाताचे आहेत ? मग त्यांनी माझ्याकडे बघायचं की सुजाताकडे ? ती हुषारेय म्हणून बाबा असं करतायत का ? मला मग काही ऐकूच येईनासं झालं. म्हणजे मी एकदम बहिरीच झाले. कानबीन बंद ! आणि गेलं मग माझं डोकं कुठेतरी भलतीचकडे. आरशात आरसा. आरशात आरसा. मी नेमकी खरी कुठली ते कळतच नाही ! असं !

"काय गं अनघा ? लक्ष कुठेय तुझं ? कळतंय ना मी काय बोलतोय ते ?" आत्ता बघितलं माझ्याकडे बाबांनी. मग मी पण नुसतीच मान डोलावली. होहो अशी. आणि नाकावर घसरलेला चष्मा वर केला. बाबांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं तर मग त्यांना कसं कळलं की मला मुळी काही ऐकूच येत नाहीये ते काय बोलतायत ते ? मग मी परत लक्ष दिलं बाबा काय सांगतायत त्याकडे. असं डोळे बारीक करून बघितलं त्यांच्याकडे. एकदम बारीक नजरेने. सुजाता लिहित होती तिच्या वहीत. आणि पुन्हा आपलं तेच ! माझे बाबा माझ्याकडे बघतच नाहीत ! ते सुजातालाच शिकवतात. कारण ती हुषार आहे. आणि म्हणून तीच बाबांची लाडकी आहे ! मी माझ्या बाबांना मुळी आवडतच नाही ! मला करायचाच नाही तर हा अभ्यास ! मला आधीच येतंय सगळं. मला काही गरजच नाहीये शिकवायची ! मला आता काही दिसतच नाही समोरचं. मान एकदम खाली जाते आणि असं एकदम एक थेंबच पडतो माझ्या चष्म्यावर ! कुठून येतो कोण जाणे. असं कधीपण येऊ शकतं माझ्या डोळ्यांत पाणी. माझे डोळे तसंही माझं काही ऐकतच नाहीत. कोणीच माझं काहीच ऐकत नाही. बाबांना काही दिसतच नाही. आणि त्यांना काही कळतच नाही. माझे कान पण माझं ऐकत नाहीत. आणि ते आपोआप बंद होतात. म्हणजे आवाज येऊन पडतो कानात पण त्याचं पुढे काहीच होत नाही. खरं तर झाडं माझ्याशी बोलतात. म्हणजे खिडकीबाहेर एक माड आहे त्याची झावळी आमच्या घरात येते. हात पुढे केला तर ती माझ्या हातात येते. आणि मग ती माझ्याशी बोलू लागते. ते मला सगळं नीट ऐकू येत. ती कशी आधी छोटी होती आणि मग आता कशी माझ्यासारखी मोठे झाली. आणि आधी तिला खालच्या मजल्यावरच्या अण्णांच्या घरातलं दिसत होतं आणि आता तिला आमच्या घरातला दिसतं. वगैरे वगैरे. जे कोणाला पण ऐकू येत नाही ते सगळं ऐकू येतं मला. पण आता बाबा काय शिकवतायत ते मला ऐकूच येत नाहीये. मी परत हळूच वर बघते बाबांकडे. त्यांना मुळी काही फरकच पडलेला नाहीये.
"कळलं तुला ? ठीक आहे मग. आता आपण परवा भेटू. ये अशीच तू संध्याकाळी. आपण तेव्हां पुढचा अभ्यास करू." सुजाताने मान डोलावली. आणि मग मी काय करू ? मला नाहीच बसायचं मुळी इंग्रजीच्या क्लासला ! सुजाता उठते आणि पुस्तक गोळा करते. दारापाशी जाते. तिथे थांबून मला माहित असतं की ती आता मला टाटा म्हणणारेय. पण मी लक्षच देत नाही. आणि सरळ आत निघून येते !

"किती छान शिकवतात तुझे बाबा !" सक्काळी सक्काळी स्कूलबसमध्ये सुजाता मला सांगते.
हं. मी फक्त हुंकार देते. आज आमच्या गप्पा रंगत नाही. कंटाळवाणी बस खूप फिरत रहाते. शाळा खूप दूर गेल्यासारखी वाटते. पाय जड. पाठीवरचं दप्तर जड. आणि पुन्हा एक थेंब कुठूनतरी अवतीर्ण होतो आणि गालावरून टपकन हातावर पडतो. नशीब, सुजाता पलीकडे बसलेय. आणि तिथून तिला माझी फक्त पाठच दिसतेय. मी मुळी तशी बसलेच आहे. तिच्याकडे पाठच करून ! शेवटी एकदाची बस पोचते आमच्या शाळेच्या दारात. मी सर्वात आधी उतरते. आणि धावतच सुटते. उजव्या हाताचं उंबराचं झाड पण आज चकितच होतं. आज मी त्याच्याकडे बघत नाही. उंबरबिंबर काही नाही. टाटाबीटा काही नाही ! "आज बाईंनी लवकर बोलावलंय वर्गात !" धावता धावता मी ओरडून सांगून टाकते. कधीकधी खोटं बोलू शकतो आपण. चालतं. आणि असं कधी खोटं बोलायला लागलं तर उजव्या हाताची दोन बोटं...अंगठ्याच्या बाजूची, अशी एकावर एक चढवायची...मग चालतं कायपण बोललं तरी ! पापबीप नाही लागत ! असं.

Friday, 10 February 2012

समुद्र

समुद्र किनई आमच्या घराच्या पाठीच आहे. नाही नाही. पाठी कसा ? पुढे ! म्हणजे आमच्या घराचं तोंड जिथे आहे ना त्याच्या बरोब्बर समोर आमचा समुद्र आहे. आमच्या घराला तोंड आहे. कारण गॅलेरीत उभं राहिलं की अख्खं घर आपल्यामागे उभं रहातं. म्हणजे आपल्या पाठी. म्हणून म्हटलं...आमच्या घराला तोंड आहे. आमचं घर आणि आमचा समुद्र. मी झोपते ना म्हणजे आम्हीं जमिनीवर गाद्या टाकूनच झोपतो...तर उजव्या कुशीवर वळून झोपलो की आपोआप एक आवाज येतो. एकदा माझी मामेबहिण आली होती आमच्याकडे रहायला. ती खूप मोठी आहे माझ्यापेक्षा. तिला मी हे सांगितलं. ती पण उजव्या कुशीवर वळली, माझ्याकडे पाठ करून. मग तिला पण आला तो आवाज. तिने मला सांगितलं की हा समुद्राच्या लाटांचा आवाज आहे. त्या आवाजाला गाज म्हणतात. कळलं ? लक्षात राहील का ? नवीन शब्द आहे म्हणून विचारतेय. तेव्हा माझी मामेबहीण मला असंही म्हणाली की समुद्र तिला बोलावतोय असं तिला वाटतंय. मग मला भीती वाटली. म्हणजे म्हटलं की आता ही झोपेल की समुद्रावर जाईल ? रात्री ? काळोखात ? मी तिला विचारलं की मग तू आता समुद्रावर जाणार आहेस की झोपणार आहेस ? तर ती म्हणाली की नाही...आत्ता नाही जाणार कारण आता रात्र झालीय. मग मला एकदम हुश्श वाटलं. तरी मी तिचा हात घट्ट धरून झोपले. उठले तेव्हा ती बाजूला नव्हतीच. मी घाबरून गेले अगदी आणि धावत धावत माजघरात गेले. नाहीतर मला असं पटकन नाही उठता येत. सकाळी आई मला हाका मारत सुटते...आणि तरी मला नाही उठता येत. मी खरं तर खूप प्रयत्न करते. पण माझी गादी आहे ना...ती खूप हट्टी आहे. ती मला धरूनच ठेवते. मला ती सोडतच नाही. म्हणजे मी अशी उठते तर ती मला परत खेचते. आणि मग मी पुन्हां झोपते. असं. पण आज मी पटकन उठले. कुठे गेली ही म्हणून ! पण होती ती आत. चहा पीत. ती चहा पिते. मी नाही पीत. मी अजून लहान आहे. म्हणून. तुम्हीं मला खूप प्रश्र्न विचारताय. पण मी शहाणी आहे नं...म्हणून सगळ्यांची उत्तर देतेय. लगेच. आई मला उगाच नेहेमी म्हणत असते...अगं, लक्ष कुठेय तुझं ? कधीपासून एकच गोष्ट विचारतेय मी तुला !...मी माझी बाहुली मांडीवर घेऊन बसलेली असते. तिची सगळी तयारी मलाच करायला लागते. आई मुळी तिचं काहीच करत नाही ! ती नेहेमीच घाईत असते. तिला कामावर जायचं असतं आणि त्याच्यासाठी तिला तिची ट्रेन पकडायची असते. म्हणून तिची सारखी घाई घाई असते. बाबांची आधी घाई आणि ते गेले की आईची घाई. दोघे दोघे...घाई घाई. बाबांचा डबा आईला भरायचा असतो सकाळी. असा उभा उभा आहे तो डबा. त्यात वर मी रोज बाबांना एक चिठ्ठी लिहिते. म्हणजे मला अजून लिहिता येत नाही...पण मग मी चित्र काढते आणि डब्यात ठेऊन देते. वर. खाली चपाती, भाजी, वरण भात सगळं सगळं. बाबा सगळ्या भाज्या खातात. मला नाही आवडत सगळ्या भाज्या. बाबांना मीठ खूप लागतं मग आई एक छोटीशी पुडी बांधते आणि डब्यात ठेवते. त्याच्या बाजूला मी माझी चिठ्ठी ठेवते. मग एक डबेवाला येतो आणि डबा घेऊन जातो. त्याला फक्त माहितेय बाबांचं ऑफिस कुठेय ते ! मलाच नाही माहित ! मी विचारलं त्याला एकदा. तुला माहितेय माझ्या बाबांचं ऑफिस ? तर आई मला ओरडली ! असं कोणाला पण तू म्हणायचं नसतं ! पण मला कसं कळणार...कोणाला तू म्हणायचं आणि कोणाला तुम्हीं म्हणायचं ते ? तर हे डबेवाले काका बरोब्बर नेऊन देतात बाबांना माझी चिठ्ठी ! म्हणजे ते डबा देतात. आणि माझे बाबा, डबा खाता खाता माझी चिठ्ठी पण वाचतात. ते संध्याकाळी घरी आले की मला सांगतात मग ! त्यांना नेहेमी कळतं मी काय काढलंय ते चित्रात ! आईला माझ्या कायपण कळत नाही ! फक्त मला प्रश्र्न विचारायचे कळतात तिला !

पण ही गोष्ट खरी वेगळीच आहे ! म्हणजे मी तुम्हांला काहीतरी वेगळंच सांगत होते. मी म्हटलं ना...तुम्हीं मला खूप कायकाय विचारत बसता...आणि मग माझी गोष्ट रहाते बाजूला आणि काहीतरी वेगळंच सुरु होतं ! माझ्या डोक्यात ! आता तुम्हीं जरा शांत बसा...म्हणजे हाताची घडी घाला आणि तोंडावर बोट ठेवा. आई सांगते मला असं. पण कान मात्र उघडे ठेवा हा...नाहीतर तुम्हांला काही ऐकूच यायचं नाही मी काय बोलतेय ते ! आई खूप ओरडायला लागली ना की मी असं करते म्हणून माहितेय मला. आई स्वयंपाकघरातून जोराजोरात ओरडते. भांड्यांची डोकी आपटते. ओट्यावर. आणि मग त्या भांड्यांची डोकी एकदम आतच जातात. म्हणजे मी कुठे आपटले तर माझं डोकं अस्सं फुगतं पण भांड्यांचं डोकं आतंच जातं. मी दिवाणखान्यात कानात एकदम बोटं घालून बसते...अश्शी आत एकदम....मग मला काहीच ऐकू येत नाही ती काय ओरडतेय ते ! तिला माहीतच नाहीये हे ! ती ओरडत ओरडत माझ्यापर्यंत येते ना...म्हणजे तिचा आवाज आधी येतो...आणि ती नंतर येते. मग मी बोटं काढते कानातून ! आणि हाताची घडी घालून बस्ते ! अस्सं ! तिला कळतंच नाही...की ती काय मोठ्यामोठ्याने ओरडत होती ते मला ऐकूच आलेलं नाहीये ! मज्जा !

तर आईला रविवारी सुट्टी असते. मग संध्याकाळी ती मला आमच्या समुद्रावर घेऊन जाते. दुपारपासून ती बाबांना सारखी विचारत रहाते. म्हणजे तुम्हीं पण चला आमच्याबरोबर म्हणून. पण बाबा काही ऐकत नाहीत. म्हणजे खरं तर मी हट्टी नाहीचेय ! आई आणि बाबाच हट्टी आहेत ! म्हणजे कधी आई, बाबांचं ऐकत नाही आणि कधी बाबा, आईचं ऐकत नाहीत ! पण म्हणजे माझी आई ही माझी आई आहे ! ती बाबांची आई नाहीचे ! ती बाबांची बायको आहे ! आणि बाबा हे फक्त माझे बाबा आहेत ! ते आईचे बाबा मुळी नाहीचेत ! ते आईचा नवरा आहेत ! म्हणजे काय ? ते मला माहित नाही ! ते तुम्हीं ना कोणाला तरी मोठ्यांना विचारा ! तुमच्या बाजूला आहेत का कोणी मोठे ? नाहीतर ना तुम्हीं तुमच्या आईला नाहीतर बाबांना विचारा ! ते सांगतील बरोब्बर ! तर म्हणून ते एकमेकांचं ऐकत नाहीत ! मला मात्र त्यांचं सगळं ऐकायला लागतं ! कारण ते माझे आईबाबा आहेत ! कळलं ?

हा...तर बाबा काही आमच्याबरोबर समुद्रावर येत नाहीत. कारण रविवारी त्यांचे मित्र येतात. आमच्या घरी. मग त्यांच्या गप्पा चालतात. कायपण गप्पा मारू शकतात ते ! म्हणजे मी कधी असले घरी तर मग मी बाबांच्या बाजूला जाऊन बसते. मग ते मला कधीकधी मांडीवर घेऊन बसतात. पण मग बाबा आणि त्यांचे ते मित्र, नाना काका, खूपच गप्पा मारतात. नानाकाकांना मोठी दाढी आहे. ही मोठ्ठी. काळीकाळी. मिशी पण आहे. मी एकदा त्यांच्या दाढीचं चित्र पण काढलं. म्हणजे कागदावर मी पेन्सिल अशी गोलगोल फिरवली. खूप वेळ. तर काकांची दाढी कागदावर आली. असं. बाबांच्या मांडीवर खरं तर मला झोप येते आणि मी झोपूनच जाते. म्हणजे बाबांचं पोट ना हलतं...असं. मग मला एकदम छान वरखाली होतं. हळूच वर आणि हळूच खाली. आणि माझे कान असे ठेवले ना बाबांच्या अंगावर, की मला ठक ठक असा आवाज ऐकू येतो. तो मला खूप आवडतो. त्याला काय म्हणतात ? ते मला माहित नाही. माझ्या मोठ्या बहिणीने ते मला सांगितलं नाहीये. समुद्राच्या आवाजाला गाज म्हणतात ते तिने मला सांगितलंय. मी मगाशी सांगितलं ना तुम्हांला ? तुमच्या लक्षात नाहीये वाटतं ? माझ्या सगळं बरोब्बर लक्षात रहातं! मग बाबा म्हणतात की मी त्यांची हुश्शार मुलगी आहे. अस्सं.

मग मी आणि आई समुद्रावर जातो. मी आईचा हात धरून चालते. रस्त्यात. आई चालते. आणि मी उड्या मारते. कारण मला आई सारखं चालताच येत नाही. आई माझं बोट घट्ट धरून ठेवते आणि तरी मी उड्या मारते. म्हणजे कसं आधी उजवा पाय पुढे घ्यायचा. उजवा म्हणजे ज्या हाताने तुम्हीं खाता ना त्या हाताचा पाय. तर तो पुढे घ्यायचा...तेव्हा डावा पाय असा दुमडायचा...मग डावा पाय पुढे आणि उजवा पाय दुमडायचा. कळलं का तुम्हांला ? बघा पाहू करून ! उजवा हात आईने धरून ठेवलाय ना...मग तो नाही हलवू शकत आपण ! पण मग डावा हात असा पुढे न्यायचा आणि अस्सा मागे आणायचा ! असं. समुद्र जसजसा जवळ यायला लागतो तसतसा एकदम वारा अंगावर येतो. माझ्याबरोबर उड्या मारणारा माझा फ्रॉक आता एकदम हलायला लागतो. पुढे मागे. आता माझे डोळे पण एकदम मिटतात. वारा माझ्या डोळ्यात जातो. आणि वाळू पण. हळूहळू समुद्राचा आवाज पण ऐकू यायला लागतो. जसा काही तो मला बोलावतच असतो. घुम्म्म घुम्म्म असा. पण मला कधीकधी कळत नाही. वारा मला मागेमागे ढकलतो आणि समुद्र मला पुढेपुढे बोलावतो. समुद्रावर जाताना नेहेमी मी पुढे असते आणि आई मागे. मला आईचा हात खेचायला लागतो. नाहीतर रोज सकाळी आमचं उलट असतं. आई माझा हात खेचत असते कारण तिला लवकर लवकर मला आजीकडे सोडायचं असतं आणि ऑफिसला जायचं असतं. माझ्या नाकाला पण आता एक वेगळाच वास यायला लागतो. ओला ओला. मी नाक उडवून बघते हाताने ते ओलं झालंय का म्हणून. पण नाही. नाकाच्या आत जाणारा वास ओला असतो. 

आमच्या समुद्राला दार आहे आणि एका हाताला लांबलांब एक भिंत आहे. छोटीशी. त्याच्यावर लोक बसलेली असतात. शेंगदाणे, चणे विकणारा माणूस त्याच्या गळ्यात टोपली अडकवून फिरत असतो इकडेतिकडे. कोणी त्याच्याकडून दाणे विकत घेतात. कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाहीत. माझी आई कधीकधी घेते माझ्यासाठी दाणे. मग आम्हीं आत शिरतो. आता पायाला माझ्या वाळू लागते. थंड. मला मग एकदम हसू येतं. कारण मऊमऊ वाळू माझ्या चपलांमध्ये शिरते. मला गुदगुल्या करायला लागते. मी हळू पाय पुढे टाकते. माझा पाय हलकेच खाली जातो आणि वाळू वर येते. आणि मग माझा पायच दिसत नाही. मग मी तो पाय वर घेते आणि दुसरा पाय ठेवते. मग तो मला दिसत नाही. अशी मजा. आता आई माझा हात सोडून देते. कारण इथे गाडया नसतात. नुसती वाळू आणि समोर समुद्र. मग मी कुठेपण धावू शकते. इथेतिथे. वाऱ्यावर. पण मग आम्हीं दोघी एक जागा बघतो आणि बसून टाकतो. आई दाणे खायला सुरवात करते. मी थोडा वेळ अशीच बसून रहाते. गारगार वारा माझ्या तोंडावर येतो. आता तो मला ढकलून नाही देत. मी मग माझे दोन्ही पाय वाळूत खुपसते. म्हणजे नाहीसेच होतात माझे पाय ! 
"कुठे गेले कुठे गेले ? आई माझे पाय कुठे गेले ?"
आई हसायलाच लागते ! 
"अरे ! खरंच ! कुठे बरं गेले तुझे पाय ? गेले वाटतं फिरायला पुढे ? तू बसलीस ना इथे ? मग ते गेले पुढे चालायला !"
कायपण !  मला एकदम भीतीच वाटते ! म्हणजे असे माझे पाय मला टाकून कुठे गेले तर मग मी घरी कशी जाणार ? मी एकदम जोरात माझे पाय बाहेर काढते. वाळूतून ! "हे बघ ! आई ! आहेत माझे पाय ! कुठ्ठेच नाही गेले !" अस्सं.

समोर सूर्य एकदम वाटोळा वाटोळा दिसतो. म्हणजे इतकं गोल माझं ताट पण नाहीये. तसंही माझं ताट छोटूसंच आहे. आणि बाबांचं मोठ्ठं. पण आत्ता सूर्य, बाबांच्या ताटापेक्षा पण मोठा दिसतो ! गरगरीत. आई कधी पुऱ्या करते ना तसं. पण खूपखूप पुऱ्या अशा मांडून ठेवायच्या. एक मोठ्ठा गोल तयार होईल ना तितका मोठा. आकाशात. आणि त्याच्या खाली समुद्र. आणि समुद्राच्या पाण्यात दुसरा सूर्य. कापून कापून ठेवलेला. पट्ट्यापट्ट्यांचा. मी करते अशा पट्ट्या कधीतरी. बाबांचे कागद असतात ना नको असलेले, ते मला मिळाले तर मी त्याच्या पट्ट्या पट्ट्या करते. घरभर पट्ट्या. आईची शिवणाची कातर घेते मी. तिचं लक्ष नसलं तर. नाहीतर नाही. ती देतंच नाही तर ! मग असा कागद धरायचा आणि कापायचा. तसं वाटतंय हे. कोणी केल्या बरं सूर्याच्या पट्ट्या ? जाऊ दे ! तसंही ना मला सगळं नसतच माहित ! मग मी बाबांना विचारते. त्यांना सगळं माहित असतं. पण आत्ता नाहीयेत इथे बाबा. आणि आता मी घरी जाऊन विचारायला नक्की विसरणार ! जाऊ दे. मी बसते. म्हणजे अशी पाय दुमडून. आणि मग ना मी असे माझे दोन हात घेते आणि मुठी करते. आणि ते असे वाळूत फिरवते. पुढे मागे. पुढे मागे. आई बघते माझ्याकडे. तिला काही कळतंच नाही. ती विचारते मला,"काय गं ? हे काय करतेयस ?"
"अगं, मी ना वाटण वाटतेय !" आई अस्संच तर वाटते वाटण. दगडावर. मी तिच्या बाजूला बसते. आणि बघते नेहेमी. किती वेळ वाटत असते. आधी ते पांढरं असतं आणि मग हळूहळू एकदम लाललाल होतं !
"वाटण ?!"
"हो ! मी मासे करणारेय ना ! तिथून आणणारेय मी आता मासे. समुद्रातून !"
"काय गं बाई तुझं ! दुसरं काही सुचत नाही का गं तुला ? डोंगर बिंगर करायचा ना ! आता इथे तुला वाटण कुठे सुचतंय ?" माझ्या आईला ना काही कळत नाही !
"बघ ना आकाश कसं लाल झालंय ना...ते तसंच...तसं कालवण करणारेय मी आई ! माशाचं !"
"कर बाई कर ! माशाचं कालवण कर ! मला पण दे हं !"
"तुला पण भूक लागलीय का आई ? देते हं मी तुला. आता झालं बघ माझं वाटण !"
मग मी ते वाटण गोळा करते आणि एक भांड जसं करते वाळूत. म्हणजे खरंखरं नाही ! श्या ! तुम्हांला समजत नाहीये ! असं समजायचं असतं ! की भांडं आहे...आणि मग मी तेल सोडते हा भांड्यात...आई तसंच करते...मी बघितलंय...आता हे मासे आहेत ना...ते मी टाकणार त्यात ! आणि मग माझं वाटण आहे ना हे...ते पण टाकणार ! मग झालं माझं कालवण...लाललाल ! अस्सं. मी जरा आकाशात बघते तर म्हणजे तो गोल सूर्य नसतोच ! कुठे गेला तो ? पडला वाटतं पाण्यात ! म्हणजे तो तरी किती वेळ रहाणार ना असा आकाशात ? रस्त्यात दिव्यांना कसा एक खांब असतो नं...ह्या सूर्याला तसं काहीच नसतं ना...मग त्याचे बिचाऱ्याचे पाय दुखले की मला वाटतं तो एकदम बसतोच खाली ! आणि खाली पाणी असतं ना..तर तो एकदम बुडून जातो पाण्यात ! बिचारा ! आता कोण काढणार त्याला ? पण सूर्य बुडतो तर हळूहळू सगळंच दिसेनासं होतं. म्हणजे आई दिसते. पण दूरवरचा समुद्र आता नाही दिसत. आणि त्या बाजूला बसलेली माणसं पण नाही दिसत. जशी काही ती कोणी पुसून टाकली. पाटी कशी पुसतो ? तशी. मग पाटी दिसते ना काळी काळी तसा आमचा सगळा समुद्र काळा काळा दिसायला लागतो. मग मला नाही आवडत. आई पण उठून पटकन उभी रहाते. "चल गं...काळोख पडला. घरी जाऊया !"
"चल चल...घरी जाऊया !" मी पण उठून उभी रहाते. माझं कालवण रहातं तिथेच. "आई, माझं कालवण ?"
"हो गं बाई तुझं कालवण ! असू दे आता ! चल जाऊया आपण घरी....इथे आता तो समुद्र येईल ना रात्री पुढेपुढे...त्याला भूक लागलेली असेल ना...तर तो खाऊन टाकेल तुझं कालवण...नाही का?"
"हा...चालेल ! त्याचं जेवण होईल ना मग आई ?"
"हो गं बये ! चल आता पटापट ! किती लगेच अंधार पडला बघ !"
अंधार ? कुठून पडला अंधार ? सूर्य पडला ना ? अंधार कुठे होता ? कुठून पडला ? लागलं का मग त्याला ? आई कशाचीच उत्तरं देत नाही ! तिला मुळी काही माहितीच नसतं ! आता आई मला भराभर खेचते. घराकडे. "तुला उचलून घेऊ का गं मी ? बाबा वाट बघत असतील बघ आता ! उशीर झाला आपल्याला !"
आई मग मला कडेवरच घेऊन टाकते. तिला उशीर व्हायला लागला की ती अशीच करते. मला कडेवर घेते. मग आम्हीं पटकन पोचतो. सकाळी आजीकडे पण.

आम्हीं घरापाशी पोचतो तर मला बाबा आमच्या गॅलेरीत दिसतात. आमची वाट बघत. "बाssssबा !" मी हाक मारते आणि मग आई सोडते मला खाली. मी धावत धावत जिना चढते. बाबा माझे आधीच दरवाजा उघडून ठेवतात आणि उभेच रहातात दारात ! माझ्यासाठी. मी एकदम धावते ना मग बाबांकडे. ते मला कडेवर घेतात पण एकदम बाथरुममध्येच उभं करतात !
'बाबा!"
"अगं, सगळी वाळू लागलीय अंगाला तुझ्या ! चल ! अंघोळ घालतो मी तुला ! घरभर वाळू करून ठेवशील नाहीतर !"
"बाबा...मी काय केलं माहितेय आज समुद्रावर ?"
"काय...?"
बाबा असं विचारतात पण एकदम माझ्या डोक्यावर पाणीच ओततात ! मला मग काहीच दिसत नाही ! कारण मला डोळेच उघडता येत नाहीत ! आता मी कसं बोलणार ?! बाबाssssss !
मला मग रडू येतं ! मोठ्याने ! मग असा किती वेळ जातो ! मला कित्ती वेळ काहीच दिसत नाही ! बाबा सगळा साबण माझ्या डोक्याला फासून ठेवतात ! बाबांना येत नाही खरं तर माझे केस धुता ! तरी पण करतात असं ! आईला मदत करायला म्हणून ! कायपण करतात ! सगळा साबू माझ्या डोळ्यात जातो ना मग ! मग मी खूप जोरात रडते. अशी मी रडते ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आमच्या खालचे अण्णा मला विचारतात. "काय गं ? कशाला रडत होतीस काल इतक्या जोरात ?"
"उगाच !" मी देतंच नाही त्यांना उत्तर ! वेडे आहेत ते ! पण आता बाबा मला कडेवर घेऊन बेडरूममध्ये नेतात तरी मी रडतच रहाते ! कारण माझे डोळेच रडतायत ! साबण गेलाय ना म्हणून ! ते थांबतच नाहीत रडायचे ! आणि मला उघडताच येत नाही त्यांना ! बंद ! बंद!  काहीच दिसत नाही मग ! बाबा मला पुसून काढतात आणि मग घेऊन बसतात मांडीवर. आणि आता विचारतात मला ते ! काय गं काय केलंस समुद्रावर आज तू ? असं ! मी कसं सांगणार ? मला डोळे उघडता येतायत का ? मला काय दिसतायत का बाबा ? नाही ना ? मग ? आणि मग असे डोळे इतका वेळ बंद केले की मग मला झोप येते ! म्हणजे मग मला डोळे उघडताच येत नाहीत ! मग मी काय करू ? मला फक्त ऐकू येतं..."अहो, भूक लागली असेल तिला ! आणा इथे ! भरवते मी तिला !"
आता कसं भरवणार आई मला ? मी झोपलेय ना...आणि मला तो समुद्र दिसतोय...बंद डोळ्यांना मला जे दिसतं ना ते कधी खरं नसतं काय...म्हणजे ते खरं असतं...पण ते त्यावेळी असं समोर नसतं...असं...सांगू शकते पण मी तुम्हांला...समुद्र...सूर्य...सूर्य मला पाण्यात पडताना दिसतोय...आणि तो एकदम जोरात पडतो पाण्यात आणि मग एकदम पाणी उडतं...म्हणजे माझा तांब्या आहे ना तो वेडा आहे...कधीकधी असा बादलीत पडतो...आणि मग असं एकदम पाणी उडतं...अंगावर...अशी मजा...तसा सूर्य पाण्यात पडतो...आणि मग पाणी उडतं...बाबा मला कुठे घेऊन चाललेत...आता ते मला गादीवर ठेवतील...आणि मग माझ्या डोक्यावर हात फिरवत बसतील....ते मला खूप आवडतं...मग मी एकदम अशी ससा होते....तुम्हांला माहितेय ससा...? आमच्या घराच्या खाली ससे आहेत ! मऊ मऊ...पांढरे पांढरे ! तसा ससा...आणि एकदम ना बाबांच्या पोटात शिरते...एकदम गुडूप !


Tuesday, 7 February 2012

मांजर, मामी आणि मासे...

अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील आत्मीयता वाटायला हवी. फक्त माणुसकीच्या दृष्टीतूनच नव्हे तर काय सांगावे नेमका पुढला जन्म तोच असला तर काय घ्या...म्हणून. स्वार्थाने.

सकाळचे साडेनऊ आणि रविवारचा दिवस. त्यामुळे सिटीलाईट मार्केट रसरशीत दिसत होते. एखाद्या मांसल माशासारखे. फडशा पाडायला नक्की कुठून सुरवात करावी असा मनाचा गोंधळ उडवणारे. मी लगबगीने आत शिरत होते त्यावेळी माझे लक्ष समोर होते. आणि तरी पायाशी काही हालचाल जाणवली आणि नजर खाली वळली. एक अगदी चिटुकलं मांजरीचं पिल्लू लडबडत चाललं होतं. एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे. मी रस्त्याने चालत होते म्हणून ते मला दिसलं पण एखादी गाडी आली तर त्या चालकाला हा जीव दिसणे कठीण. मी थबकले तर एका क्षणात अजून एक पिल्लू पुढे आलं...बाजूला असलेल्या टोपली आडून. दोघे दोघे. इवलेसे. अंगात जेमतेम जीव असलेले. धडपडत दोघे पलीकडे जाऊ लागले. आणि त्यांच्याबरोबर मी देखील पार अलीकडे पोचले.

मामाचं नवीन लग्न झालं होतं. आणि त्याने गोरी बायको आणली होती. मी सात वर्षांची होते. आणि त्या वयात तसेही ही मामी गोरी आहे की पांढरीफटक आहे हे नव्हते कळले. आणि बऱ्याचदा माणसाची ओळख झाली, म्हणजे त्याच्या मनाची ओळख झाली, की मग त्याच्या शारीरिक गोष्टींना आपोआप व्यंग वा गुण असे ठरवले जाते. आणि मामी कोणाकडेच बघून फारशी हसत नाही हे कळल्यावर ती दिवसेंदिवस गोरीपान नाही तर पांढरीफटक वाटू लागली. मामाच्या लग्नात मसाला दूध होते. आणि त्या दुधाचा रंग मामीच्या रंगाशी मिळताजुळता होता असे त्यावेळी आम्हीं सर्व भावंडांनी लग्नगृहातच ठरवलं होतं. ती अजिबात हसत नाही हा एक गंभीर प्रश्र्न आहे असे त्यावेळी कळले नव्हते. पण ती आम्हां कोणा भाचरांशी काही बोलत नाही हे मात्र जाणवले. मामाचं लग्न झालं, मामी घरी आली त्यावेळी मोठमोठे कुरमुऱ्याचे लाडू, आणि हे मोठे केशरी, हिरव्या रंगाचे कानवले असे काही विनोदी पदार्थ देखील माझ्या आजोळी दाखल झाले होते. म्हणजे अॅलीस इन वनडरलॅण्ड सारखं. आपण छोटेछोटे आणि चहाचा कप भला मोठा ! बाहेरची खोली सगळी त्यांनीच भरून गेली होती. त्या आधी असे अगडबंब लाडू वगैरे कधी नजरेस पडले नव्हते. "हे कायेय मावशी ?" मी मावशीला विचारले. तेव्हां तिने मला सांगितले..."रुखवत...रुखवत म्हणतात ह्याला."
"पण हे कोणी दिलं आपल्याला ?"
"अगं ! ती नवी मामी आलीय ना...तिच्या आईने आणि बहिणींनी दिलंय हे तिला !"
"तिला ?! म्हणजे हे सगळं एव्हढं मोठं मोठं ती खाणारेय ?" मला ती गोरी मामी मोठ्ठा कानवला खातानाच दिसायला लागली !
"अगं नाही ! तुम्हांला सगळ्यांना पण मिळणार आहे थोडं थोडं !"
"मग दे की आम्हांला मावशी ! भूक लागलीय ना !"
"थांब गं जरा...विचारुया आपण तिला !"
मावशीशी देखील नवी मामी हसली नव्हती वाटतं...कोण जाणे मग पुढे त्या अगडबंब लाडवांचं आणि राक्षसी कानवल्यांचं काय झालं.
एक दिवस नवी मामी चारपाच मांजरांचे लाड करताना दिसली. गोरी मामी आणि पांढरी मांजरं.
"अगं, आपली नवी मामी एकदम प्रेमळ आहे हं !" माझी मावसबहीण मला म्हणाली. ती पण अशीच. मी सात. तर ती नऊ.
"कोणी सांगितलं ? तिने लाड केले तुझे ?" मी विचारलं. घरात मी सर्वांची लाडकी होते. मग मला सोडून नव्या मामीने हिचे कसे आणि कधी लाड केले हा तसा एक गंभीर प्रश्र्न होता. आणि तो माझ्या डोक्यावर पडला होता. प्रेमळ माणसं लाड करतात. माझे मोठ्ठे मामा प्रेमळ होते. ते आमचे खूप लाड करायचे. आम्हांला गोष्टीबिष्टी सांगायचे. मला ते मांडीवर घ्यायचे.
"नाही गं !"
"मग ?" ती प्रेमळ असल्याचा मला पुरावा हवा होता. तसे आम्हीं त्यावेळी खूप चर्चा वगैरे करायचो. आणि गल्लीत शोधबिध घ्यायचो. म्हणजे गल्लीत त्या टोकाशी एका जागी गुलाबी पावडर मिळते. आणि ती तिथे ढिगाऱ्याने वाळवत ठेवलेली असते. तिने म्हणे लोकं दात घासतात. तिथल्या रखवालदाराची नजर चुकवून जर पावडर पळवून आणली तर आपण ती खाऊ शकतो. आणि ती गोड लागते हे आम्हीं असंच शोधून काढलं होतं. आमचे सगळ्यांचे आईबाबा आम्हांला आमच्या आजीवर सोडून कामावर जात असत. आणि आजी म्हातारी होती. तिला तसं काही कळायचं नाही. म्हणजे आम्हीं कुठे आहोत आणि काय करतोय वगैरे. कधीतरी कोणीतरी आमची तक्रार घेऊन यायचा तेव्हा मात्र ती आम्हांला ओरडायची. पण तसं तिच्याकडे आम्हीं लक्ष द्यायचो नाही. म्हणजे ती दुपारी मला बाजूला घेऊन झोपत असे. आणि तिच्या पाठीवर एक ही मोठ्ठी चामखीळ होती. मग ती खेचायला मला फारच मजा येत असे. आमच्या गल्लीच्या त्या तोंडाशी एक मोकळं मैदान होतं. आणि तिथे सहासहा दिवस एक सायकलवाला माणूस गोलगोल सायकल फिरवत असे. दुपारच्या उन्हांत सुद्धा. आणि त्याने ती न थांबता फिरवली की त्याला मोठ्ठं बक्षीस मिळत असे. मोठ्याने तिथे लाऊडस्पिकर लावलेला असे आणि त्यावर दिवसभर मस्तमस्त गाणी लावली जात. ती अगदी पार आमच्या घरी पण ऐकू येत. कितीतरी वेळ आम्हीं सगळी भावंडं गळ्यातगळे घालून ते बघत असू. "अगं, पण मग त्याला शू आली की तो काय करतो ?" असं मी एकदा बहिणीला विचारलं तर ती एकदम ओरडलीच माझ्या अंगावर. "मला नाही माहित !" ती माझ्यापेक्षा खरं तर इतकुशीच मोठी होती पण तरी तिला असंच वाटत असे की माझी सगळी जबाबदारी तिच्यावरच आहे. मला वैताग येत असे मग ती अशी मला ओरडली की ! "मग सांग ना ? कशावरून आपली नवी मामी प्रेमळ आहे ?" मी पुन्हां तिला विचारलं. "मी आज बघितलं...तिने ना एकदम चार पाच मांजरं गोळा केली होती. आणि ती ना त्या सर्वांचे लाड करत होती !"
"म्हणजे ती प्रेमळ आहे ?"
"अगं ! अशी काय ? तिला प्राण्यांबद्दल प्रेम आहे...म्हणजे ती प्रेमळच असणार ना ?" असं तेव्हां माझ्या ह्या मावस बहिणीला मनापासून वाटत होतं.
पण मामीने तिला खोटंच पाडलं. ती अजिबात प्रेमळ वगैरे नव्हती. म्हणजे तिच्या मनात जर काही प्रेमाची भावना असेल ती सगळी त्या मांजरांसाठी होती. भारी लाड करे ती त्यांचे. मग ह्या माझ्या आजोळी चारचार मांजरं एकाच वेळी घरभर फिरत रहायची. इथेतिथे. अगदी स्वयंपाकघरात सुद्धा. मामी आमचे लाड करत नाही आणि त्यांचे मात्र लाड करते हे मला कळलं. मांजरांना दूध मिळे. त्यांना मासे मिळत. पण कधी तिच्या हाताचे मासे खाण्याचा आमच्या नशिबी काही योग आला नाही !
मला मांजरं अजिबात आवडत नाहीत !

पण ही पिल्लं ?! आता काय करू मी ह्यांचं ? मी तिथे कितीवेळ उभी होते कोण जाणे. मनाला काही घड्याळ नसतं. म्हणजे त्याच्याशी कोणी शर्यत लावली तर कोणीच जिंकू शकत नाही. असं आहे माझं मन. कुठून कुठे ! दोन्ही पिल्लांनी पाय खेचत मार्केटच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूपर्यन्तचा प्रवास पार पाडला होता. आणि मी भूतकाळात फेरफटका मारला होता. जमीन ओली होती. माश्यांचे पाणी सर्वत्र सांडलेले होते. त्याच पाण्याने पिल्लं भिजली होती. भिजके केस ताठरलेले होते. हातपाय थरथरत होते. हो..हात आणि पाय. पुढचे दोन हात. आणि पाठचे दोन पाय. चला. झाला त्यांचा रस्ता ओलांडून. आता निदान गाडी खाली तरी नाही यायची ! मांजरं आवडत नाहीत म्हणून काय झालं ? त्यांनी अगदी जाऊन मरू नये असं मात्र मला नक्कीच वाटतं.
मी पुढे सरकले. एव्हढा मी जगभर प्रवास केला पण माश्यांच्या भरल्या भरल्या टोपल्यांसारखे सुंदर जगात काहीही दिसत नाही. अमेरिकेत किंवा दुबईत काचेआड ठेवलेल्या माश्यांत मात्र ही गंमत नाही. त्यापेक्षा समुद्राजवळच मांडलेला शारजातील मासळी बाजार किती देखणा दिसतो. टोपल्या टोपल्या येऊन उतरत असतात. गुलाबी कोलंबी अगदी हलती असते. स्वत:वरच खुष जशी. नजर जरा दूर नेली तर निळाशार समुद्र. पापलेट, सुरमई, बांगडे....कोलंबी...वा वा...किती घेऊ आणि काय घेऊ...
आणि विचार करा...एखादे चकचकीत पापलेट आहे...आणि समुद्रात ते बिचारे म्हातारे होऊन मरून गेले तर ते त्याच्यासाठी किती बरे दुर्दैवी असेल...त्याच्या आत्म्याला काय शांती मिळेल ? बिचारा कुठेतरी अश्रू ढाळत बसेल...आपण आयुष्यभर इथेतिथे नुसते फिरत राहिलो...शेपटी हलवत...आपला काडीचाही कोणाला उपयोग झाला नाही वगैरे...हे असे वाटणे फारच दु:खकारक असते. कोणालाही. आपल्या आयुष्याचा काही उपयोग नाही झाला वगैरे ! प्रत्येकाच्या आत्म्याला शांती मिळावयास हवी...काय वाटतं तुम्हांला ?

म्हणून म्हणते मी...अगदी छोट्यात छोट्या जीवाविषयी देखील अशी आत्मीयता वाटायला हवी...
:)

Friday, 3 February 2012

सफेदी की चमकार...

एखाद्या ब्रॅन्डवर काम केले की घरी देखील तोच ब्रॅन्ड व तेच प्रॉडक्ट वापरले तर ते नीतिमत्तेला धरून होईल. परंतु, तसंही बघितलं तर जाहिरात क्षेत्रात प्रामाणिकपणा हा कितीसा असतो ? नटनट्या, खेळाडू हे ज्या ज्या प्रॉडक्टची जाहिरात करीत असतात ते काय खरोखर स्वत: वापरत असतात ? काही अपवाद वगळता ह्याचे उत्तर नकारार्थीच येते.
एका क्लायंटने मला पहिल्याच भेटीत विचारले होते..." तू कुठला शॅम्पू वापरतेस ?"
आणि दुर्दैवाने मला खोटे बोलता येत नसल्याने मी हळूच पुटपुटले आणि वेगळ्याच प्रॉडक्टचे नाव घेतले.
गंमतीने का होईना पण तो मला म्हणालाच...ह्या मिटिंगला बसायचा तुला अजिबात अधिकार नाही !

हम्म्म्म. 'रीन' वर काम केले...घरी रीन वापरला...सनसिल्क विकायला सुरवात केली आणि म्हणून सनसिल्क केसांवर ओतलं असे तर कधी झाले नाही. उलट बहुतेक वेळा, त्या त्या ब्रॅन्डवर काम करताना इतका वैताग आलेला असतो की घरी पण कशाला तेच !...म्हणून नाहीच विकत घेतला जात !

"आईईईई" लेकीने हाक मारली तेव्हा मी स्वयंपाकघरात होते आणि ती बेडरूममध्ये.
"काय गं ?" तिथूनच ओ देऊन बघितली.
"इथे ये आधी !" मला कधीकधी कळत नाही...मी मोठी की ही ! फर्मान सोडते ना असं मला !
मी गेले आणि दारात उभी राहिले. आवाज तसा दरडावणीचाच होता.
लेकीच्या हातात तिचा पांढरा ओव्हरकोट होता. ती हॉस्पिटल्समध्ये जात असते आणि तो तिला तिथे नियमित घालावा लागतो. त्या ओव्हरकोटाला घरात शिरून तसे चारच महिने उलटले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"आई ! ह्याचा रंग कोणता आहे ?"
स्वत:ला चित्रकार म्हणायचं आणि ढळढळीत करड्या दिसणाऱ्या रंगाला पांढरा कसं काय म्हणवतं कोण जाणे !?
"पांढरा तर आहे !" मी हळूच म्हटले.
"आई ! हा तुला पांढरा दिसतोय ?! आई ! पूजा आणि मी एकत्रच घेतलेले कोट ! आणि तिचा अजून पांढरा दिसतोय ! आणि माझा बघ ना ! किती जुनाट आणि घाणेरडा दिसतोय ?!"
ताडकन तिने हात पुढे केला...आणि तिच्या हातातल्या कोटाने शरमेने मान खाली घातली ! आणि त्याच्याबरोबर मी देखील !
"अगं ! मी खरं तर एरीयल वापरते गं !"
ए टू झेड दाग....
"सर्फ एक्सेल आणूया का गं ?" दाग अच्छे होते है !
म्हणजे कसं निर्णय काय तो एकत्र घेऊया...चुकलाच तर एकटीच्याच नको गळ्याशी !
"ते काही मला माहित नाही ! माझा कोट घाणेरडा दिसतोय ! आणि मग मला घालवत नाही गं तो आई !"
बिच्चारी माझी लेक ! शरमेने किती खाली जात असेल तिची मान ! जळले मेले हे ब्रॅण्डस ! सगळी मेल्यांची खोटी प्रॉमिसेस ! एक तरी कोणी खरं बोलेल तर शप्पथ !
"कसं गं माझं सोनं ते ! आता काय करू मी ?! पुजाला हळूच विचारतेस का...तिची आई काय वापरते ते ?!" शरमेने मान अगदी खाली खाली.
"हळूच कशाला विचारायला पाहिजे ? मी आधीच विचारलंय तिला ! टाइड वापरते तिची आई ! आण पाहू तू तेच !"
चौंक गये ?! टाइड प्लस हो तो व्हाइट प्लस हो !
सगळ्या जाहिराती आणि त्यांच्या टॅग लाईन्स कायम माझ्या डोळ्यांसमोरून फिरत असतात !
'आज शर्ट कल पोछा ?!'...हे माझंच डोकं होतं...काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं...वर्षभर हे घोषवाक्य घासलं होतं....
आणि सध्या तरी माझ्या लेकीचा ओव्हर कोट हा 'कल शर्ट आज पोछा'च दिसत होता !
अॅडव्हटायझिंग आपल्या जागी आणि घरासाठी बाजारात जाऊन वस्तू विकत घेणे आपल्या जागी ! स्वत: त्यातच काम केल्याने त्यात विश्वासार्हता किती असते हे आमचे आम्हींच जाणो !
पण काल जाऊन तातडीने टाइड आणलं...मशीनमध्ये घातलं...आज घडी घालून नीटनेटका कपाटात ठेवताना लेकीने कपाळाला बारीकशी आठी घालून बघितलं आणि म्हणे," बरं दिसतंय..."
पण शेवटी मला माहित आहेच...उद्या, ज्यावेळी पूजा आणि माझी लेक बाजूबाजूला उभ्या रहातील त्याचवेळी काय तो माझ्या ह्या परीक्षेचा निकाल लागेल !
भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?!
:)

Wednesday, 1 February 2012

रक्तदान

आज सकाळी...
एक आठवडा अंगात ताप घेऊन कामे उरकण्याचा प्रयत्न केल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणीसाठी, पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी येऊन पोचले होते. ताप पण असा विक्षिप्त की आल्यासारखा शांतपणे दोन तीन दिवस राहावे व बाडबिस्तरा उचलून निघून जावे असेही नाही. कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी रात्री झोपता झोपता...पण रोज हजेरी लावून जाणे मात्र नक्की. म्हणजे, चला आज जरा बरं वाटतंय म्हणून दिवस सुरु करावा तर ह्याने येऊन मागून वार करावा...की आपण पुन्हां बिछान्यात आडवे.

लॅबमध्ये रक्तासाहित पोचले. ही आमची नेहेमीची लॅब आहे त्यामुळे तेथील सर्वजण आता ओळखीचे झाले आहेत.
"कशा आहात ?" तेथील हसतमुख बाईंनी विचारले.
"आजारी आहे...म्हणून आले." बाई हसल्या. मग पुढे पैसे वगैरे भरले आणि जाऊन कोचावर बसले. माझ्या नावाची पुकारणी होण्याची वाट बघत.

शहर सध्या आजारी आहे. मानसिक सोडा, शारीरिक आजारपणे वाढली आहेत. त्यामुळे तपासणीसाठी बरीच गर्दी होती. आणि उपाशीपोटी, गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात, भर तापात....अशा वेगवेगळ्या तपासण्या, जगण्यासाठी आवश्यक असल्याकारणाने तिथे वातावरण मिश्र भावनांचे होते. म्हणजे नवव्या महिन्यातील गरोदर बाई व त्यांचा नवरा तसे खुशीतच दिसत होते. माझ्या शेजारील बाई तापाने फणफणलेल्या होत्या. व मी आपली काल रात्री हजेरी लावून गेलेल्या तापाच्या मुळाशी पोचण्यासाठी तिथे येऊन बसले होते.

आयुष्यातील दहा मिनिटे सरली आणि माझे नाव मला ऐकू आले. मी आत गेले. अंगातील जॅकेटची बाही मागे सारून हात पुढे करून बसले. उजव्या हाताला एक वृद्ध गृहस्थ बसले होते. लॅबमधील बाई त्यांचे रक्त शोषून घेत होत्या. माझा हात तेथील दुसऱ्या बाईंनी ताब्यात घेतला. तेव्हढ्यात पहिल्या बाईंनी त्यांचे तोंड उघडले व सध्या शहरात काय चालले आहे ते त्या वर्णू लागल्या. "कालच माझी मुलं सांगत होती. आई, वेगवेगळे पुढारी आज आपल्या घरी आले होते आणि कसल्या छान छान भेटवस्तू दिल्यात....कित्ती मस्त मस्त कायकाय मिळालंय आपल्याला." हे कानावर पडले आणि माझ्या हाताला बसलेला बारीक चिमटा आज मला जाणवला नाही. सुई आत शिरली होती. रक्त शोषून घेत होती. मी त्या बाईंकडे बघितले.
"म्हणजे ?" त्या बाई खरे तर त्यांच्या सहकारी सख्यांना त्यांचे अनुभव सांगत होत्या. पण मला राहवले नाहीच.
"काही नाही हो...निवडणुका आल्यात ना...त्यामुळे हे पुढारी लागलेत फिरायला...गल्लीगल्लीत....गिफ्ट्स देत...."
"कुठे चाललंय हे...मुंबईत ?" मी अजून खोलात.
"नाही. पुण्यात."
"पुण्यात कशाला....मुंबईत पण हेच चाललंय....दादरमध्ये चालू आहेत हे प्रकार." माझ्या बाजूला हात दुमडून बसलेले ते अनुभवी वृद्ध गृहस्थ बोलले. त्यांचे रक्त जमा झालेले होते.
"दादरमध्ये कुठे ?" मी.
"भवानी शंकर रोडवर चाललंय...!" आजोबा.
"पण बाई, तुम्हीं तुमच्या मुलांना सांगा ना...घेऊ नका म्हणावं त्या भेटवस्तू...आहे काय आणि नाही काय ?"
"अहो मी नसते ना तिथे...मी असते इथे मुंबईत....मुलांना काय सांगणार...कोणीतरी येऊन गिफ्ट्स देतंय म्हटल्यावर खूष झाली ती...पण म्हणाली हा मात्र मला...आई, तू ह्यातल्या कोणालाही मत देऊ नकोस...!" पोटच्या पोरांवरील मोठ्या अभिमानाने बाई म्हणाल्या.
"पण हे सर्व मत मिळवण्यासाठी केलं जातंय एव्हढं त्यांना कळतंय म्हणजे काही फार लहान नाहीयेत तुमची मुलं..." मी लावलीच माझी रट.
"अहो...आपण हे असलं करून काय होतंय...ते कालचच तुम्हीं बघा....बाळ ठाकरे..." अनुभवी आजोबा मोठी मोठी नावं घेऊन बोलते झाले.
माझं रक्त घेऊन झालं होतं. बाईंनी माझ्या सुईच्या अग्राइतक्या छिद्रावर एक पांढरी टेप लावली आणि मी उठले.
"हे भेटवस्तू आपल्या मतदार संघात वाटणे हा एक गुन्हा आहे. तसाच त्या भेटवस्तू घेणे हा देखील गुन्हा ठरवला जायला हवा." मी शांतपणे म्हणाले.
बाई चमकल्या. त्यांची तरुण सहकारी मैत्रीण माझ्याकडे बघून हसली.
"अगदी बरोबर." माझ्या म्हणण्याला तिने पुष्टी जोडली.

तिथून बाहेर पडताना मला वाटले...
भारताला एका ऑपरेशन थेटरात बेडवर झोपवावे. एक पंप त्याच्या शरीराला लावला जावा. कन्याकुमारीच्या जागी लावला तरी चालेल. काश्मीर हे त्याचे डोके व कन्याकुमारी हे त्याचे पाय असे समजले तर त्याचा बेड त्याच्या डोक्यापाशी उंचावावा. आणि त्या पंपातून आजारी भारताच्या शरीरातील सर्व नासके अशुद्ध रक्त काढून टाकले जावे. अख्खाच्या अख्खा त्याला रिकामा करावा. आणि मग पुन्हां एकदा त्याच्या त्या शरीरात शुद्ध रक्त भरले जावे. गरजे इतकेच. आणि मगच त्याला पुन्हां बाहेरच्या मोकळ्या हवेत सोडावे.

मात्र हे असे शुद्ध रक्त मिळणार कोठे...हे मात्र मला नाही कळले.
तुमच्या आमच्या शरीरात आहे काय असे शुद्ध रक्त ?
देशाच्या रक्तवाहिन्यांतून धावू शकेल असे खेळते निरोगी रक्त ?
का त्यासाठी देखील शिवाजी जन्माला यायला हवाय ?