जसजसे मुंबईचे आकाश उंच इमारतींनी भरू लागले आहे तसतशी माणसांमधील नाती ही पाताळाच्या दिशेने वाहत चालल्यासारखी वाटू लागली आहेत. कदाचित त्यातील घट्टपणा कमी होऊन ती पातळ झाली असावीत व निसर्गाच्या नियमानुसार त्याचा ओघ उतरणीला लागला असावा.
मुंबईचा पुनर्विकास सुरु झाला. एकेक चाळ, एकेक इमारत...सगळे त्यात सहभागी झाले. बिल्डर जे काही अवाढव्य भाव त्या जागांसाठी देऊ करत आहेत त्या धक्याने कोणी कोणाचे न उरले. एक समज होता...नाती इतकी घट्ट की आम्हांला कायद्याची काय गरज. पण आता चित्र अगदी उलट. जसे एखादे पान पलटावे आणि पुढील पानावर काही भलतेच निघावे....दुसऱ्याच कुठल्या अनोळखी पुस्तकाचे पान बांधणीत यावे. आता नाती जपण्यासाठी कायद्याची मदत घ्या...त्याचा एक कागद तयार ठेवा. अथवा, कोण कोणाचा भाऊ व कोण कोणाची बहिण. मी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्याच पोटी ही माझी इतर भावंडे का बरे आली...आली ती आली परंतु, जन्माला येताच आईने त्यांच्या नरड्याला नख का बरे लावले नाही...असे काही विचार मला कधी थोरल्या भावाच्या चेहेऱ्यावर दिसतात तर कधी आता झाले की जगून ह्यांचे...अजून का बरे हे म्हातारडे भाऊ जिवंत आहेत असा आसुरी प्रश्र्न कधी धाकट्याच्या मस्तकात घोळताना मला दिसला.
...आणि मी...मी का बरे ह्या माणसांच्या संपर्कात येते ? काय ह्याला नशीब म्हणायचे ?
माझी 'वाशा' ह्या वर्षाच्या सुरुवातीला वारली. वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी. माझ्या घरी ती घरकामाला होती. पण ती होती म्हणून हे घर सुंदर, टापटीप व दृष्ट लागण्याजोगे दिसत असे. तिला तीन भाऊ. हिचा नंबर तिसरा. हे कुटुंब आमच्या घराखालील वाडीत रहात असे. दहा बाय दहाच्या खोलीत. धाकटा भाऊ जन्माला आल्यानंतर थोड्याच दिवसात ह्या मुलांची आई निर्वतली. मग ह्या मुलांनीच आपल्या चिमुकल्या भावाला सांभाळले. गावी थोडीफार जमीन. पुढे, ह्या जमिनीची देखभाल करावयास मोठा भाऊ गावी निघून गेला. त्यापाठचा भाऊ बोरिवलीला राहू लागला. वाशाचा प्रेमविवाह गल्लीतीलच एका दारुड्याशी झाला. लग्नानंतर आई होण्याचे तिचे स्वप्न अवेळी झालेल्या गर्भपाताने सहा वेळा मोडले. मग सातव्या वेळी तिला तिसऱ्या महिन्यापासून इस्पितळात भरती केले व आमोदचा जन्म झाला. कालांतराने तिचा नवरा दारू पिऊन वारला. काही वर्षांत अति रक्तदाबामुळे वाशाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. हिंदुजातील आठवड्यातून तीनदा चालू केलेले डायलिसीस तिला नाही वाचवू शकले. मग तीही वारली. आता ?
मागे राहिला आठ वर्षांचा आमोद. वाशाचे तीन भाऊ. एक गावी. एक बोरिवलीला. आणि धाकटा दादरला. आणि अर्थात अजून एक महत्त्वाची गोष्ट शिल्लक राहिली.
दादरची दहा बाय दहाची खोली.
त्या दहा बाय दहाच्या खोलीने नाती पातळ केली.
सगळी वाडी पुनर्विकासाला आली. बिल्डर + म्हाडा. 'जागेत रहाणारा' ह्या नात्याने बिल्डरने धाकट्याला दुसरी जागा बघून दिली. नवीन इमारत तयार होईस्तोवर बिल्डर ह्या जागेचे भाडे भरेल. ते भाडे आजच्या घटकेला वीस हजार रुपये. त्यापुढे थोड्याफार फरकाने ते वाढते राहील.
काही दिवसांपूर्वी, गावी रहाणारा वाशाचा मोठा भाऊ माझ्या दारी उभा राहिला. दोन प्रश्र्न घेऊन. पहिला प्रश्र्न...सर्व भाडे धाकटा भाऊ एकटाच घेत आहे. त्याहूनही मोठा असा दुसरा प्रश्र्न, भाड्याच्या झोपडीऐवजी ज्यावेळी नवीन इमारतीत मालकी हक्काची जागा मिळेल ती कोणाच्या नावे असेल ?
ही पूर्ण वाडी व माझे आईबाबा ज्या इमारतीत भाड्याने रहात असत ती इमारत, ह्या दोन्ही गोष्टी सलग असल्याकारणाने एकाच बिल्डरने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे वाशाच्या घराचे कागदपत्र डोळ्याखालून घालणे फारसे कठीण नव्हते. तेव्हा लक्षात आले ते असे...त्या खोलीवर पूर्वी मालक म्हणून कोणा एकाचे नाव होते व सध्या भोगवटीनुसार (रहाणार म्हणून) नाव फक्त वाश्याच्या धाकट्या भावाचे होते. कारण एक म्हणजे तो तिथे रहात होता (भोगवट) व दुसरे म्हणजे त्याने आपल्या भावंडांची नावे, वारसाहक्काने आलेल्या संपत्तीवर टाकण्याची तसदी हेतुपुरस्सर घेतली नव्हती.
आता ? आता मी दुर्लक्ष करावे की अजाण व आईबाप नसलेल्या आठ वर्षांच्या आमोदची आत्ताच काळजी घ्यावी ?
मी आमोदला वाऱ्यावर सोडणार नाही ह्या विश्वासावर वाशाने मृत्यूचे भय कधी बाळगले नव्हते.
मी धाकट्या भावाला फोन लावला. त्याला संशयाचा फायदा (benefit of doubt) देणे गरजेचे. मी गृहीत धरून चालू शकत नव्हते की हे सर्व त्याने मुद्दाम केले आहे. ते त्याच्याशी बोलून ठरवणे महत्त्वाचे.
"दामू, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. कधी येऊ शकशील?"
"येतो, आजच दुपारी येतो."
"ठीक."
दामू दुपारी दारात उभा राहिला त्यावेळी तो एकटा नव्हता. बरोबर त्याची पत्नी व एकुलती एक पदवीधर लेक होती.
संभाषण सुरु झाले. ते थोडक्यात असे...
"दामू, आजच्या घटकेला तुला बिल्डरने भाड्याने जागा घेऊन दिलेली आहे. त्याचे महिना वीस हजार रुपये तो देत आहे."
"हो."
"तुझ्या ह्या जागेचे कागद मी बघितले तर त्यावर तुझ्या मोठ्या दोन भावांची व वाशाचे नाव नाही."
"माझ्याकडे त्यांच्या सहीचा कागद आहे."
"हो ? काय बरे आहे तो कागद ?"
"आमच्या झोपडीच्या पुनर्विकासाला त्यांची परवानगी आहे अशी ती एनओसी आहे."
"हो का ? छान छान. परंतु, मी ते नाही विचारत आहे. त्या जागेसंदर्भातील मालकीचे जे कागद बिल्डरकडे आहेत त्यावर ह्या तुझ्या भावंडांची नावे नाहीत."
"आहेत ना !"
"दामू, त्याच प्रकारचा आमच्या जागेसंदर्भातील जो कागद त्याच बिल्डरकडे आहे, त्यावर प्रथम आमच्या आईचे व त्याखालोखाल आम्हां तिघी बहिणींची नावे आहेत. त्यामुळे आता जी नवी इमारत उभी राहील त्यातील आमच्या मालकीची जी जागा असेल त्यावर आम्हा चौघींची नावे असतील."
आता दामूची पत्नी....
"आम्ही ह्यांच्या वडिलांचे किती केले...आजारपणात आम्हीच त्यांच्याबरोबर होतो..." वगैरे वगैरे...
"मी वडिलांना बघितले..मी तर एकटा होतो त्यांच्यासोबत...तेव्हा हे भाऊ कुठे होते ? कोणी आलं होतं का त्यांना बघायला...? वडिलांना बघायला लागायचे म्हणून मी तिथेच राहिलो." दामू.
"कधी गेले तुझे वडील ?" मी विचारले. "त्यावेळी तू किती वर्षांचा होतास ?"
"वीस."
"आज किती वर्षांचा आहेस ?"
"त्रेचाळीस."
"म्हणजे तेवीस वर्षे झाली तुझ्या डोक्यावरील वडिलांची जबाबदारी संपुष्टात येऊन. "
"नाही. नाही. मी त्यावेळी तीस वर्षांचा होतो."
"ठीक. म्हणजे तुझ्या एकट्यावर पडलेली वडिलांची जबाबदारी संपून तेरा वर्षे झाली. मग जर तू केवळ त्यांच्यासाठी म्हणून ह्या दादरच्या घरात रहात होतास व नाहीतर तशी तुझी इच्छा मुळीच नव्हती तर तू त्यानंतर दुसरी जागा स्वखर्चाने घेऊन येथून निघून का बरे नाही गेलास ?"
"अरे ! मी कशाला जाऊ ?" दामू.
"म्हणजेच दामू, ह्या जागेचा तुला फायदा होत होता आणि म्हणून तू इथेच राहिलास असे नव्हे काय ?"
"काय शब्द वापरता तुम्हीं ? फायदा काय त्यात ? मी एकटा काळजी घ्यायचो ह्या घराची...त्यांना काय माहित ? पत्रे टाकले मी एकदा....घर गळत होतं म्हणून...त्याचे पैसे काय त्यांनी दिले...? मीच भरले ना ?"
"त्या घरात तू रहात होतास...घर गळत होतं...मग त्यावर स्वखर्चाने तू पत्रे टाकलेस ह्यात चुकीचे काय ? काय नाहीतर तू गळक्या घरात राहू शकत होतास ?"
बायकोची मान गर्रकन फिरली. लेक रागारागात खिडकीबाहेर बघू लागली.
"दामू, हे घर तुला वारसा हक्काने मिळालेलं आहे व त्यामुळे त्यावर तुझ्या भावंडांचा समान हक्क आहे. मला तुला फक्त इतकेच सांगायचे आहे. वाशाचे मृत्युपत्र आहे. त्यामुळे त्या घरावर आमोदचे नाव देखील पडायला हवे."
"म्हणजे तुम्हांला काय वाटतं...मी मामा आहे त्याचा...मी काय त्याला वाऱ्यावर सोडणार आहे ? मी घेणारच आहे त्याची काळजी." दामू.
"मला आनंदच वाटतो दामू तुझे हे बोलणे ऐकून. व तुझ्या ह्या भावनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त ह्याच तुझ्या भावनेला अधिक बळ देण्यासाठी असा एक कागद तुझ्या सहीचा हवा ज्यात त्या सगळ्यांचे हक्क तू मान्य केलेले असतील."
"आम्ही अजिबात त्यांची नावं टाकणार नाही !" बायको.
"मला वाटतं मी दामूशी बोलते आहे. त्यामुळे तू शांत बसलीस तरी देखील चालू शकेल." मी.
"असं कसं ? अहो, तुम्हांला काहीही माहित नाही ! वाशा रडायची हो आमच्याकडे येऊन ! सासू छळते...घरात त्रास देतात म्हणून...आता तीच लोकं तुम्हांला येऊन काहीबाही सांगतात...व तुम्हीं विश्वास ठेवता ? आम्ही अजिबात त्यांची नाव टाकणार नाही !"
"दामू...?" मी.
"अहो आम्ही त्यांची नाव टाकली की ज्यावेळी जागा तयार होईल त्यावेळी ते ती विकायला निघतील ! मग आम्हीं कुठे जाऊ ?"
"कुठे जाऊ म्हणजे ? अरे, त्यात तुझाही चवथा हिस्सा असेल नाही का ? त्यात तू तुझी मालकी हक्काची दुसरी जागा घे."
"आम्हीं अजिबात असं करणार नाही...बाबांची तिथे घराण्याची देवी आहे ! व बाबांना तिची पूजा करण्यासाठी तिथेच रहायची गरज आहे !" दामूची लेक.
"तीन मोठी माणसे बोलत असताना तुला त्यात बोलायची गरज आहे असे मला नाही वाटत." मी.
"मी का नको बोलू ? आम्हीं त्यांची नावे टाकणार नाही !" पदवीधर लेक.
...पंधरावीस मिनिटे अशीच चर्चा...
"जागा ताब्यात मिळाली की, त्यांनी जागा विकावी...व आलेल्या पैश्यात मला दादरमध्ये जागा घेऊन द्यावी. उरलेले पैसे त्यांनी आपापसात वाटून घ्यावेत. मी दादर सोडून कुठेही जाणार नाही." दामू म्हणाला.
"दामू, तुला हे तर मान्य आहे ना...की ही जागा वारसा हक्काने आल्याकारणाने त्यावर तुम्हां चौघांचा समान हक्क आहे ?"
"हो ! ते मी नाही म्हणतच नाही आहे !"
"मग तसे असताना विकून आलेल्या जागेच्या रकमेचा 'मोठा हिस्सा' तुला देण्यात यावा असे तुला का बरे वाटते आहे ?"
"आम्हीं दादर सोडणार नाही !" कुटुंबात एकमत.
"असो. त्यांचा हक्क तर तुला मान्य आहे ना दामू...मग ठीक आहे. तसा कायदेशीर कागद आपण तयार करू. आणि मग पुढलं पुढे बघू....ठीक ?"
आवाज थोडेफार चढले होते.
मध्यम उंचीचा दामू, केसांच्या झिपऱ्या कपाळावर पुढे घेणारा. अस्सल मुंबईकर. त्या भावांमधील दारू पिणारा असा हा एकमेव. आईने दामूला जन्म दिला व वारली. त्यामुळे दामूला ह्या भावंडांनी लहानाचे मोठे केलेले. वाशाचा सर्वात लाडका भाऊ. बायको तंग कुर्ता व सलवार घातलेली. जाडसर. कन्या चेहेऱ्यावर उद्दाम भाव. वाडीत राहून शिकली खरी परंतु, त्या शिक्षणाने काय मन मोठे झाले ? नाही. ते संकुचित झाले...मी शिकले ह्याचा अहं त्या मनात शिरला. शिक्षणाने विनय, नम्रता, लाघव...हे नाही दिले. ज्या घरात दामूची लेक सून म्हणून जाईल त्या घराची मी उगाच काळजी करते.
ताडकन दामू उठला...बायको तिरीमिरीत उठली...नाकीडोळी नीटस लेक चेहेऱ्यावर मग्रुरी नाचवत ठसक्यात दाराकडे निघाली.
मी ? मी विचारात पडते...खरं तर सरळ साधी गोष्ट...वाढत्या मुंबईतील हे एक छोटेखानी कुटुंब. १० बाय १० खोलीतच वाढलेले. त्यावेळी ही चार मुले व त्यांचा बाप..असे एकत्र रहात होते. तसेच तिथेच लहानाचे मोठे झाले. आज घटकेला बिल्डर त्यांना इमारत तयार झाली की ३०० स्के. फूट जागा देणार आहे. त्यांच्या मालकी हक्काची जागा त्यांना मिळेल. पण आता त्यात गुण्या गोविंदाने रहायला कोण ? कोणीही नाही.
केवळ एक कीड, सुग्रास जेवण फुकट घालवते.
"बाळा, जे आपले हक्काचे आहे ना तेव्हढेच आपले...दुसऱ्याच्या वस्तूचा कधीही मोह ठेवू नये. भावंडं असलं तरीही." मी लेकीला सांगते.
"आता मी काय केलं ?" ती विचारते.
"तू काही नाही ग केलंस...पण मी आपली सांगतेय तुला..."
भावंड आहे म्हणून जे त्याचे आहे ते मी ओरबाडून घेऊ ? माझ्या नशिबाला जबरदस्तीने जोडू ?
मुंबईतील घरांचा चढता भाव...व त्याच वेगात खाली घसरत चाललेली नाती.
एक विचित्र आलेख माझ्या नजरेसमोर चमकला.
कायद्याचा एक कागद...व त्यावर लिहिलेले वाशाच्या आमोदचे भविष्य.
पुन्हा एकदा मला वकिलाची गरज पडणार आहे.
कुठे तरी माझ्या मनात हे डोकावतंच...
घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं.