नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 31 January 2011

कर्ता करविता...

एक घटना कानी पडली. ह्यातील व्यक्तिमत्वे काही माझ्या ओळखीची नाहीत. आणि इथे व्यक्तिचित्रण मला अनावश्यक वाटले...म्हणून नाही केले.

बाप लेक एका सामाजिक मान्यता मिळालेल्या शाळेत मुलाखत देण्यासाठी बसले होते. शाळा इंग्लिश माध्यम. मुलाखत लेकाची. बापाची, बाहेरून तपासणी. लेक, वय वर्षे अदमासे साडे तीन. बाप, पस्तीशीच्या आसपास. चाचण्या विविध प्रकारच्या होत्या. गुण नाही तर श्रेणी होती. ए पासून सी पर्यंत. रंग ओळखा, चित्र ओळखा...वगैरे वगैरे. पोरगा चुणचुणीत होता. पाचही चाचण्यांमध्ये ए श्रेणी पटकावली. ह्या ओळखपरेडमध्ये तेथील शिक्षिकांनी मुलासमोर काही सुंदर रंगीबेरंगी खेळणी ठेवली होती. पोराला त्यातले एक फारच भावले. त्याने बापाच्या कानावर आवड घातली. आता पुढील संवाद अगदी तंतोतंत माहिती नसला तरी देखील आपण एक अंदाज बांधू...
"बाबा, ती गाडी छान आहे ना?" बापाच्या कानात हळूच.
"हं."
"ती आपण घेऊन जाउया का?"
"शूsss हळू बोल! असं नाही करू शकत आपण! ठेव ती तिथे!"
"पण बाबा! मला ती आवडलीय! मी घेऊन जाणार!" पोराचा आवाज आता चढलेला.
"बंड्या! ठेव पाहू ते गपचूप तिथे!" बापाचा आवाज बंद दंतपंक्तीतून परंतु जरबेचा.
"बाबा, F x x K YOU!"

समोर मगाशी मुलाची हुशारी बघून प्रेमाने भारलेल्या तरुण शिक्षिका अजूनही बसलेल्याच होत्या.
मुलाची श्रेणी ए वरून त्वरित सी वर आली.

मुलाचा मेंदू हा समजा एक टीपकागद धरला, तर त्या टिपकागदाने घरातल्या घरात रंगांबरोबर बेरंग देखील टिपलेला आहे. बापाने दिलेले हे शिक्षण अधिक प्रभावशाली ठरले आहे.

लेकाला त्या नावाजलेल्या शाळेत प्रवेश मिळाला कि नाही, काही कल्पना नाही.

आसमंतात निराशावाद पसरलेला आहे. सर्वत्र चंगळशाही माजली आहे. भले व बुरे यामधील पूर्वी असलेल्या दरीची आता जेमतेम एक अरुंद भेग उरलेली आहे. घराबाहेर असलेल्या स्पर्धात्मक जगामुळे रोज येणारे निराशेचे झटके वडिलाधाऱ्यांकडून, घरात बाहेर पडतात. कधी मुखातून तर कधी मारहाणीतून.

माझा एक मराठी मित्र...
बाप झाल्यावर त्याचं स्वप्न, शिवाजी घडवण्याचं आहे.
माझा दुसरा मराठी मित्र....
चार वर्षाच्या पोराला ताप जावा म्हणून एक पेग दारू पाजतो, कारण त्याला बायकापोरांना घेऊन दुसऱ्या दिवशी गोव्यासाठी प्रस्थान करावयाचे असते...गोव्यात जेव्हा समुद्रकिनारी अकस्मात नग्न स्त्रिया फिरताना दिसतात..त्यावेळी हा बाप लेकाला टाळी देतो.

कधीही आपली मानसिकता आपण जे काम करत आहोत त्यातून बाहेर येते. समजा आपण दु:खी असलो तर आपण चितारत असलेल्या चित्रात काळा रंग अधिक प्रमाणात उतरेल. वा आपण काही काव्य करीत असलो तर काव्याचे स्वरूप त्यातील शब्द निवडीमुळे, निराशेकडे झुकू शकेल. मग आपण जे एक माणूस नावाचे शिल्प घडवायला घेतले आहे, त्या शिल्पात हीच आपली मानसिकता नाही का उतरणार?

म्हणतात, स्वातंत्र्य मिळाल्यापासून चार पिढ्या फुकट गेलेल्या आहेत. नव्या पिढीने जन्म घेतलेला आहे.
त्यातून शिवाजी निघणार की कलमाडी...
काळ ठरवेल...
दोन्हींला, हातभार मात्र आपलाच आहे.

Saturday, 29 January 2011

ललित

आज मला हलकंफुलकं लिहायचंय.
एकदम ललितबिलीत.
इथून तिथून उपमा. म्हणजे निळेशार पाणी, हिरवीगार वनराई, पिवळेधमक गुलाब, जांभळे जांभळे डोंगर, तरंगती फुलपाखरं! अगदी अगदी.

जळले ते सोनावणे, जळला ते ट्युनिशिया आणि मढ झालं त्या इजिप्तचं. अगदी पिरॅमिड!

माझं डोकं हा एक कोळसा आहे. त्यावर मी रोज पाणी ओतते. त्याचा सोनावणे नको व्हायला!
या या...चला भेटूया...
वाद घालूया...चला चला चर्चा करूया!
येताना एक मडकं घेऊन या!
फोडा ते!
ओता पाणी!
कोळश्यावर माझ्या!
डोकं माझं एक कोळसा आहे!
होतं ललित मनात....त्याचं झालंय मात्र जळीत!

Friday, 28 January 2011

चला, जादूच्या नगरीत...

छानसं पुस्तक. जादुई नगरीलं. सलमान रश्दींनी लिहिलेलं. आता सलमान रश्दी हा माणूस कसा आहे...तो काय बोलतो आणि किती लग्न करतो ह्या बाबी अलाहिदा.
त्यांचे लिखाण...त्यांची साहित्यकृती...? अप्रतिम! शब्दच नाहीत काही! अगदी 'कसं सुचतं बुवा ह्यांना?!' असा प्रश्न सारखा सारखा डोक्यातून बाहेर उडी मारावा!

त्या पुस्तकावर मी काही लिहिणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास वाटतंय मला. म्हणून... पुस्तकाच्या वेष्टणाच्या आतील बाजूवर लिहिलेलं छोटंसं परिक्षण....

Luka and the Fire of Life

On a beautiful starry night in the city of Kahani in the land of Alifbay a terrible thing happened: twelve-year-old Luka's storyteller father, Rashid, fell suddenly and inexplicably into a sleep so deep that nothing and no one could rouse him. To save him from slipping away entirely, Luka must embark on a journey through the Magic World, encountering a slew of phantasmagorical obstacles along the way, to steal the Fire of Life, a seemingly impossible and exceedingly dangerous task.

With Haroun and the Sea of Stories Salman Raushdie proved that he is one of the best contemporary writers of fables, and it proved to be one of his most popular books with readers of all ages. While Haroun was written as a gift for his first son, Luka and the Fire of Life, the story of Horoun's younger brother, is a gift for his second son on his twelfth birthday. Lyrical, rich with word-play, and with the narrative tension of the classic quest stories, this is Salman Rushdie at his very best.

आवडेल का मित्रमैत्रिणींनो, मखमली गालिच्यावर बसून, पुन्हां त्या जादुई नगरीतून मस्त सैर करायला?
जादू, साहस, धाडस आणि पितृप्रेम!
:)


मिले सूर मेरा तुम्हारा...

रोज सकाळी दहा वाजता. म्हणजे दिवाळी, गणपती, नाताळ आणि इतर बारीकसारीक सुट्ट्या सोडल्या तर रोज सकाळी दहा वाजता ते वाजायचं. प्रथम प्रार्थना. अंतरमम विकसित करी हे करुणाकरा...आणि सर्वात शेवटी जन गण मन. लाऊडस्पीकरवर गायनाचे जोगळेकर मास्तर आणि त्यांची आवाज बरा असलेली टोळी. मास्तर पेटी वाजवत गायचे. त्यांच्या सुरात सूर मिळवून त्यांच्याबरोबरची मुलंमुली. साथीला वर्गात आम्हीं सर्व.

लांब गडद निळा स्कर्ट, पांढराशुभ्र ब्लाऊज, कपाळावर लाल टिकली. मुली. नाकावर शक्तिशाली चष्मा, लाल रिबिनीत गुंडाळून आवरलेल्या दोन घट्ट वेण्या. ही माझी त्या गणवेषात भर.

बरोबर बारा वर्षे. बरोबर बारा वर्षे आम्हीं जन गण मन न चुकता...अर्थात ह्यात चुकण्याचा प्रश्र्नच कुठे आला...पण तरीही...नेमाने राष्ट्रगीत म्हणत होतो. अजिबात न हलता. श्वास घ्यायला जितकं हलवावं लागतं तितकंच पोट हलवायचं. बाकी चुळबुळ काही नाही. 'जयहिंद' म्हणून कडक हाताचा छातीशी सलाम ठोकायचा आणि मग बस्तान मांडायचं. रोज पाच इंग्रजी शब्द पाठ केले तर अगणित इंग्रजी शब्द पाठ होतील आणि माझी भाषा सुधारेल असं बाबा म्हणायचे. मग त्या गणितानुसार जर इतकी वर्ष हे गीत म्हटलं असेल तर ते किती तोंडपाठ झालं असेल? हो कि नाही? झालं असेल कि नाही? आहेच मुळी तोंडपाठ! शंका का आलीय?

आली ना, शंकाच आली! परवा काय होतं? काय होतं आपलं परवा? बरोबर! प्रजासत्ताक दिन! मग? मग काय? आमच्या पीव्हीआरला गेलो होतो आम्हीं. मैत्रिणी मैत्रिणी. चित्रपट बघायला. ते काय ट्रेलरबिरलं झालं. आणि मग पडद्यावर सूचना झळकली. आम्हीं हातातलं सामानबिमान झटकून तत्परतेने उभ्या राहिलो. राष्ट्रगीत सुरु झालं. ताठ मान सरळ नजर. स्तब्ध. कुठेही हे गीत लागलं की आपोआप मनातील रेकोर्ड चालू होते. तशी परवाही चालू झाली. जन गण मन अधिनायक जय हे...आता इथे काही जोगळेकर मास्तर त्यांच्या बालचमू बरोबर हजर नव्हते. एक सुरेल आवाजाची झाक असलेल्या बाई, गात होत्या. संथसंथ संगीतासमवेत. आमच्या मास्तरांची नुसती पेटी असायची, इथे मात्र अगदी साग्रसंगीत. परंतु, गडबड! इतक्या सगळ्या संगीतात बाई एकदा वेगळा शब्द उच्चारल्या. म्हणजे आम्ही जे शाळेत म्हणत होतो त्यापेक्षा थोडा वेगळा...अर्थ तोच पण शब्द वेगळा. मी मनात म्हणतेय एक शब्द आणि बाई बोलतायत वेगळं! मास्तरांनी आम्हांला काही वेगळं सांगितलेलं होतं! आणि ह्या बाई काही वेगळं!

आता काय माझ्याच देशाचं राष्ट्रगीत मी गुगल काकांना विचारू?!

(विचारलं मी गुगल काकांना! स्वस्थ बसवेना. त्यांनी सांगितलं, भारतात जितक्या भाषा आहेत तितक्या भाषांमध्ये आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. त्यामुळे वरवर बघता जरी ते एकच वाटले तरीही एखाददुसऱ्या ठिकाणी उच्चार वेगळे आहेत.)

बाई कोणी वेगळ्या भाषेच्या होत्या बहुतेक! त्यामुळे त्यांचं माझं 'मिले सूर मेरा तुम्हांरा'...नाही झालं!
बस्स इतकंच!


मराठी बोल-
जनगणमनअधिनायक जय हे भारतभाग्यविधाता ।
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग ।
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग ।
तव शुभनामे जागे, तव शुभ आशिष मागे ।
गाहे तव जयगाथा ॥
जनगणमंगलदायक जय हे भारतभाग्यविधाता ।
जय हे, जय हे, जय हे ।
जय जय जय जय हे !

Tuesday, 25 January 2011

LOC

आसमंतात सतत दोन प्रकारच्या उर्जा वहात असतात.
वाईट व चांगली.
प्रत्येक क्षणी.
हे माझ्यावर आहे, मी त्यातील कुठल्या उर्जेला तेल पाणी घालणार आहे.
जिची मी निगराणी करेन, तीच मला फळे देईल.
दुष्ट वा सुष्ट.
निगराणी...कळत वा नकळत.
जपेन तीच उर्जा, कधी मला ग्रासून टाकेल वा कधी मला तेजाळून टाकेल.
ह्याचा अर्थ, त्या उर्जांचे अस्तित्व प्रथम मला मान्य करावयास हवे.
तरच माझ्या मेंदूवर वाईट उर्जेचा हल्ला मी परतवून लावू शकेन.
मी, गढूळ लाटेला अटकाव केला तर माझा किनारा सुंदर मऊगार राहील
काय?
मी, गडद मळभ माझ्या आकाशात नाकारले तर माझे आकाश उजळलेलेच राहील काय?
माझ्यावर स्वामित्व माझेच हवे.
मीच ठरवावे, माझ्या घरात कोणी यावे.
माझी ताकद मला, सर्वस्वी पणास लावावयास हवी...
नाही तर त्या लाटेचे बळ, त्या मळभाचे साम्राज्य,
चंचूप्रवेश करेल आणि...
मग कोण मी आणि कसला किनारा....
मी...
एखादा रिकामा शिंपला.

LOC

Monday, 24 January 2011

वेड्याची दुनिया...

नशिबाच्या चक्रात फिरणे. गोल गोल. मग तोच तोचपणा.. आकाश तेच. चांदण्या त्याच. सगळ्या रात्री तश्याच. कदाचित जवळून बघितलं तर रातकिडे देखील तेच असतील. तोच युगांयुगांचा सूर खेचत. हेच मला आवडत नाही. एकसूरीपणा मनास पटत नाही.
उघड्या दरवाजातून निघायचं. सरळ समोर चालत राहायचं. रात्रभर. हे असं चालण्याची मात्र मजा काही औरच. एक रस्ता धरायचा आणि चालत जायचं. हे असं मी कधीपासून करतो आहे....नाही आठवत. कित्येक वर्ष. पण इथे कोणालाच कोणाकडे बघायची सवड नाही. थोडं स्वत:ला बाजूला ठेवून समोर बघा, त्याच्या आयुष्यात काय होतंय ह्याचा विचार करा...पण हे तर दूरचच. खूप विचार केला मी ह्यावर. रात्र रात्र घालवल्या...कूस अदलबदल. कापूस भिजून गेला...पिंजून गेला....पण उत्तर नाही मिळालं. कधी मनात आलं, आत्महत्या केली तर हे जग माझी नोंद घेईल काय? आत्महत्या... नव्हे...प्राणत्याग. म्हणजे नाहीसेच होऊन जायचे ह्या जगातून. मग ही दुनिया माझी आठवण काढून टिपे गाळेल काय? तसं माझ्यात काय आहे की जगाने माझी नोंद घ्यावी. चेहेऱ्यावर डाग...पांढराफटक रंग. त्यामुळे तर डाग अधिक उठून. लोकांना आस सौंदर्याची असते. हाव असते....ओढ असते पराकोटीची. मग माझ्याकडे कोण बघणार? मी लपुनछपून बाहेर पडतो. कधी स्वत:ला झाकून घेतो. हे असे मी कित्येक तप केले. पण एक दिवस अतिरेक झाला. वेदनेने तीव्र रूप गाठले. उपाय शोधावाच लागला. काय...काय करू मी? काय उपाय शोधला मी?
...रूपे...मी रूपे धारण केली. रोज एक. बाहेर रात्रीच पडायचो...पण वेगळी रूपे धारण करून. कधी कोणासमोर रेंगाळायचो. कधी डोकावायचो...डोळयांत निरखत रहायचो. कधी कोणी दखल घेऊ लागले...त्यांच्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह तरळू लागले. काल ज्याला बघितले तो काय हाच होता? लोक एकमेकां विचारू लागले. वादविवाद करू लागले. मला धीर आला. मला हुरूप आला. कित्येक वर्षांनी कोणी माझी दाखल घेतली होती. अशी पंधरा रूपे शोधली. आरशासमोर तास दोन तास बसून रहायचो. अभ्यास करावा लागला. चवदा रूपे सहज मिळाली. प्रारंभी आरशात बघून स्वत:चे चित्र काढून ठेवले. आणि नीट आरशालाच डकवून टाकले. तारीख लिहून. पंधरावे मात्र खूप कठीण गेले. कळत नव्हते काय करावे. मनाशी खुणगाठ तर पंधराची होती. ह्या खेळाची एक धुंदीच चढली होती. रंग चढवायचो, बुरखे पांघरायचो...किती आणि काय काय. पण आता पंधराव्या दिवसाचे काय? असाच बसून राहिलो होतो आरशासमोर. काही सुचेना. काही सुधरेना. बाहेर पडायची वेळ समीप येत चालली होती. माझी अजून काहीच तयारी झालेली नव्हती. बुरखा असाच पांघरला होता...आणि तेव्हढ्यात बाहेर नजर गेली. खूप उशीर झाला होता. त्याच क्षणाची गरज होती. मला बाहेर पडायला हवेच होते. मी पूर्ण बुरखा पांघरला. तसाच बाहेर पडलो. अंधारात मिसळून गेलो. ह्याची मजा देखील काही औरच. आजूबाजूला आसमंतात नजर टाकली. रोजचे चेहेरे दिसत होते परंतु मी कोणालाच दिसत नव्हतो.
आणि मग एक दिवस...
...तो दिवस चौदाव्या चेहेऱ्याचा होता. मी बाहेर पडलो होतो. नित्याचा फेरफटका मारत होतो. पाय मोकळे होत होते. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहेरे. त्यात माझाही एक वेगळा चेहेरा. स्वत:वर आता मी खुष होतो. एका झाडामागे असाच थोडा थांबलो. रेंगाळलो. वारा वाहत होता. भिरभिरत एक कागद झाडापाशी येऊन थबकला. माझी नजर पडली. काही अभ्यासाचा कागद होता. मी वाचू लागलो. सरसर. कागद पुन्हा वाऱ्याचा हात पकडायच्या आत संपवणे भाग होते. ती काही माहिती होती...कुठल्या रोगाची. मानसिक रोगाची. एक स्त्री आणि तिची १६ व्यक्तिमत्व! Schizophrenia! कोणी मुलगी होती....वेगेवेगळी नावे धारण करून...वेगवेगळे वेष परिधान करून...विविध रूपे धारण करून...म्हणजे माझ्यासारखी....म्हणजे? पण हा रोग मला लागला? कधी? हे मी काय केलं? मी, स्क्रिझोफ्रेनिक? हो...मी देखील १५ रूपे धारण केली...लोकांमध्ये नाना कला घेऊन फिरलो....हो....मी स्क्रिझोफ्रेनिक बनलो....माझ्या नकळत मी ह्या रोगाचा शिकार झालो. पाणी वाहू लागलं....धो धो....कित्येक वर्षांनी मी हा असा मनमोकळा रडलो. माणूस सैरावैरा धावू लागला ....पावसाळा कधीच संपलेला होता.
मी पूर्ण रात्र वाट फुटेल तसा फिरत होतो. नव्हते कळत, काय करावे...कसा आणि कधी परतलो...कोण जाणे.

दुसरा दिवस...विचार करण्यात गेला. कोंडून घेतलं. केस पिंजारले...भकास झालो....कधीतरी बाहेर पडलो. आज आरशात बघायचे मात्र विसरलो. माहित होतं...रडून..आसवं गाळून काय होणार होतं दुसरं? पडलो बाहेर. एकटं बसून वेड लागायची पाळी आली होती. एकांतवास भुतं नाचवत होता.
तो महिना पौष होता. मी समुद्रापाशी जाऊन विसावलो. मन थकलेलं. शरीर? मी पाण्यात डोकावलो. आणि... मला काय दिसले? माझे प्रतिबिंब समुद्राच्या पार तीराशी पोचले होते....पार किनाऱ्यापाशी....ते बघितलं...मी तर सुंदर दिसत होतो! हसलो....कसनुसं हसू आलं चेहेऱ्यावर. का बरं पुन्हां डोळे भरले? मी सुंदर दिसत होतो....मी आज सुंदर दिसणारच होतो....आज शाकंभरी पौर्णिमा होती. पण कोणी बघत होते काय? कोणाला जाण होती काय? मी हा असा सडाफटींग...१५ व्यक्तिमत्वाचा स्क्रिझोफ्रेनिक... येतो आणि जातो....आता मी काय ह्या माणसासाठी सोळावे रूप धारण करू? काय करू मी आता की हा माणूस माझी जाण ठेवेल...कधी हा माझ्याकडे डोळे भरून पाहिल? कधी तो मला डोळा समावून घेईल? माझे डोळे आता पुन्हा भरले....टीप टीप अश्रू पडू लागले. प्रेमात, भान हरपून एकमेकांच्या कुशीत, किनाऱ्याशी विसावलेले दोन जीव...माझ्याकडे बघू लागले. त्याने ताल धरला...."तोच चंद्रमा नभात...तीच चैत्र यामिनी...एकांती मज समीप..."
मी पंधरा वेडा...आणि मला साथ द्यायला हे दुसरे वेडे....
चालायचंच...वेड्याला साथ वेड्यांची.
इस्पितळ...वेड्यांचे इस्पितळ...
आणि शहाण्यांची, ही आंधळी जगरहाटी...

'सिबिल' हा सिनेमा बघितला आणि हे डोक्यात आलं.

Wednesday, 19 January 2011

अहं! अहं? अहं!!

असं आहे कि हा प्रवास आहे. जीवनाचा. लिफ्टसारखा. वरवर नेणारा. ही लिफ्ट कळ नसलेली. कोणाचाच ताबा नसलेली लिफ्ट. कुठे थांबणार...कोण उतरणार...कोणाला ना थांग ना पत्ता. पण ठरलेला मजला आला की जो तो उतरून मात्र नक्की जाणार. न सांगता न निरोप घेता. चालायचंच. प्रवासाचे नियमच वेगळे असतात. जशी अनोळखी लोकं आगमन करतात. तसेच जवळचे, ओळखीचे त्यांच्या त्यांच्या मजल्यावर उतरून जातात. परत फिरून न येण्यासाठी. कधी नव्या गाठीभेटी. तर कधी नुसत्याच नजरभेटी. एखादं स्मित हास्य. ना हा प्रवास टाळता येत. ना प्रवाश्यांची आवकजावक बदलता येत.

अश्याच ह्या माझ्या प्रवासातले हे माझे तीन अनुभव. पुरुष नामक जातीच्या 'अहं' संदर्भातील.
कधी हा अहं जसा ताठ माड तर कधी जशी नाजूक हिरवीकंच केळ.

दुपारचा साधारण एक वाजत आला होता. नागपूरच्या विमानतळावर उतरून पुढे चार तासांच्या अंतरावरील एका मध्यम आर्थिक परिस्थितील गावात पोचलो होतो. मी, छायाचित्रकार आणि त्याचे ३ सहकारी. दिवस पहिला होता. पुढचे तीन दिवस शूट चालणार होतं. आणि त्या शूटसाठीची जागा आणि मॉडेल्स गावातील फेरफटक्यावर ठरणार होती. मॉडेल्स असणार होते खरेखुरे शेतकरी आणि त्यांची बायकापोरं. क्लायंटचे, गावातील कर्मचारी, श्री. महाले ह्यांनी आधी बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती. शेतकरी बांधवांतून मला निवड करावयाची होती. जसजसे शेतकरी समोर येत होते, मी माझ्या साध्या कॅमेरावर त्यांचे पासपोर्ट धर्तीचे फोटो काढत होते. त्यामुळे इतकेच साध्य होत होते की मला तिथल्या तिथे शेतकऱ्यांना नकार द्यावयास लागत नव्हता. जरी महिना नोव्हेंबर असला तरी देखील सूर्य माथ्यावर तळपती शरवृष्टी करतच होता.
"मॅडम"
"हं, महाले?"
"हे साहेब आलेत. त्यांचा उद्या फोटो काढूचया आपण."
मी महाल्यांच्या मागे नजर टाकली. दुचाकीवर एक ४०-४५ दरम्यानचे गृहस्थ बसलेले होते. डोळ्यांवर चष्मा, त्यातून दिसून येणारे पिवळट डोळे, घट्ट पिना मारलेले ओठ, जश्या काही असंख्य टाचण्या उलट्या करून ठेवाव्यात तसे अस्ताव्यस्त दाढीचे खुंट. न हसणारा व उगाच डोळ्यांना डोळे भिडवणारा चौकोनी चेहेरा. महाल्यांच्या हावभावावरून ही गावातील कोणी बऱ्यापैकी मोठी असामी दिसत होती. आणि मी त्यांना नकार देऊन दुखवू नये ही आज्ञा महाल्यांच्या विनंतीत छुपलेली जाणवत होती.
"ठीक. करुया. साहेब, कृपा करून उद्या येताना दाढी करून याल का?" माझी विनंती.
दुचाकी गुरगुरली. साहेब निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजताची वेळ साहेबांना दिली होती. सव्वा तीनच्या सुमारास आधी कानावर डरकाळी आली आणि मग साहेब समोर येऊन उभे राहिले. कालच्या आणि आजच्या परिस्थितीत काही फरक नव्हता. टाचण्या तश्याच विखुरलेल्या होत्या. त्यामुळे अस्वच्छ दिसणारा चेहेरा आणि तेच उद्दाम भाव कायम. आता? आमचे ऑफिसमधील 'इमेज वर्क' करणारे दीपक नजरेसमोर तरळले. "काय ग ए बाई! ह्याला दाढी करून यायला सांगता आलं नाही तुला? मी इथे बसून आता काय दाढी करू ह्याची?! फोटोशॉपमुळे तुम्ही क्रिएटीव्ह लोकं ना फार बेजबाबदार झालायत!!" कानावर दीपकचा आवाज आदळला. इतर चित्रीकरण चालू ठेवलं. साहेबांकडे दुर्लक्ष केलं...बाईने दुर्लक्ष केलं! अहंकाराला ठेच गेली. महाल्यांच्या 'अहं' फुग्यालाही नकळत छिद्र पडलं. साहेबांच्या भावना दुखावल्या. मी पुन्हा मुंबईत ऑफिसला पोहोचायच्या आधीच आमच्या ऑफिसमध्ये क्लायंटकडून तक्रार नोंदवली गेली. गावात एजन्सीने शेतकऱ्यांना नीट वागणूक दिली नाही. तिथलेच दुसरे कुटुंब...श्री. बुखाडे. त्यांच्या कुटुंबाने, आवर्जून भरलेली माझी ओटी श्रीयुत महाले विसरून गेले बहुधा. एजन्सीकडून क्लायंटकडे उत्तर गेलं." When Anagha is concern, we don't think any misbehavior can occur."

महाले आणि साहेब.
अहं? तीव्र.

दुसरा अनुभव. प्रत्येक भारतीय मनातील ही जुनीच ओळख. साक्षात गुलजार. समोर उभे. दुपारची वेळ. वांद्रा येथील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात ठरलेल्या वेळी आम्हीं पोचलो होतो. मी व माझी जीवश्च कंठश्च मैत्रिण आणि फिल्म दिग्दर्शक वंदना. त्यांच्या लाडक्या लेकीच्या खोलीत आम्ही उभे. १२ बाय १२ ची खोली. भरपूर प्रकाशाची. मंचामागे खिडक्या. समोर उजव्या हाताला कोपऱ्यात पायऱ्या. निमुळता, सात आठ पायऱ्यांचा जिना. छायाचित्रण मुव्ही कॅमेऱ्यावर होतं. शॉट वंदनाला आखायचा होता. बाईंच्या सुपीक डोक्यात काही शिजू लागलं. "गुलजारजी, क्या आप इन सीढ़ीयों पे बैठ जाओगे? यहाँ मै मेरा कॅमेरा रखुँगी. और फिर हम बातचीत करेंगे. है ना?"
मी एकदम कानकोंडी. मान खाली वगैरे.
"हां हां.. क्यों नही? वैसे भी
हमने कभी यहाँ बैठके तस्वीरें नहीं खींची! अच्छी कल्पना है आपकी."
साईसारखा मऊ आवाज कानी पडला. हळूच वर बघितलं. चेहेऱ्यावर
स्मितहास्य आणि शरीरावर पांढरा शुभ्र कुर्ता परिधान केलेले गुलजारजी पायऱ्यांवर विसावले देखील होते. आणि मग पुढील अर्धा तास ते लाखमोलाचे शब्द, कान तृप्त होऊन ऐकत राहावं असे.

गुलजार.
अहं? मृदू.
समोर येणारा प्रत्येक मनुष्य हा एकाच पातळीवर आणि तो सुद्धा त्यांच्याच पायरीवर. दुणं
दूजं? शून्य!

आता तिसरा सहप्रवासी. तासाभराचा एकत्र प्रवास.
गणपतीचे दिवस. नाना पाटेकरचे वास्तव्य त्याच्या माहीमच्या घरी. एका शूटसाठी तिथे पोचलो. फुलांचा घमघमाट सर्वत्र. गणपती देखील त्यात बुडालेला. प्रसन्न वातावरण. नाना, लालबागच्या गणपतीला दर्शन देण्यासाठी गेले होते. आम्हीं तासभर थांबलो. टॅक्सीतून उतरून नाना तरातरा गणपतीपाशी उभे. फुलांची बाकी राहिलेली सजावट चालू. आमचे मास्तर त्यांचे मित्र. मग मित्रद्वयीच्या गप्पा चालू. मध्येच मास्तरांना बाजूला शांत उभी असलेली मी दिसले.
"नाना, हिच्या बाबांचं खूप मोठं
पुस्तकांचं कलेक्शन आहे, बरं का? किती आहेत गं आसपास?"
नाना नजर फक्त फुलं आणि गणपती.
"हल्लीच मोजदाद केली. सुमारे साडे चार हजार आहेत." भाबडं उत्तर.
"हो? मोजलीस?
हे मला सांगितलंस, आणि कोणाला बोलू नकोस! पुस्तकं वाचायची सोडून मोजलीस म्हणून!"
एक बिन आवाजाची कानफटात!
"नाही म्हणजे, बाबांचे विषय मला नाही कळत!"
पुढे दुर्लक्ष. फक्त गणपती आणि पिवळा धमक ताजा ताजा झेंडू बिं
डू. तास उलटला.
"हं आता बोला. काय करायचंय?"
गजाननाची सजावट संपली होती. आता पुढचा काही वेळ आमचा होता. किती? कोण जाणे. त्या सुवासिक खोलीतून बाहेर आलो.
बाहेरची खोली अंधारलेली. नाना कोपऱ्यातील पलंगावर बसले. खिड़की मागे. नानांच्या चेहेऱ्यावर प्रकाश? शून्य. सावळा चेहेरा अधिकच अंधारलेला. बाजूला उभ्या असलेल्या फोटोग्राफर मित्राची, रोहितची, चुळबूळ सुरू.
"अगं, त्यांना सांग ना जरा बाहेर पडवीत बसायला. इथे खूप काळोख आहे गं. नाही येणार फोटो बरोबर."
हे म्हणजे कठीणच. वाघाच्या जबड्यात हात वगैरे.
"गपचूप काढ रे आता!
आपण फोटोशॉप मध्ये उजळू त्यांना नंतर!" सगळं कसं कुजूबुजू.
"अरे! तू विचारून तर बघ ना!"
"नाना..."
भुवया उंचावल्या गेल्या.
"नाना, तुम्ही बाहेर पडवीत बसता का? तिथे ना जास्त उजेड आहे!" इथे काळोख आहे म्हणण्यापेक्षा तिथे कसा जास्त उजेड आहे हे म्हणणे बरे नव्हे काय?
टोपीवाले नाना अजूनच पलंगावर मागे सरकले. पाय वर घेऊन बस्तानच ठोकलं. अगदी आत बसलेल्या गणपतीसारखेच.
"मी इथेच हा असाच बसणार! काढायचं तर काढा!"

नाना पाटेकर.
अहं?
अगदी अगदी! ताडमाड!

अशी ही तीन अहं झाडे.
माझ्या जीवनाच्या प्रवासात भेटलेली.
एक
अहं, जसं काटेरी रानटी, नकोसं झाड.
एक
अहं, जशी मृदू आपलेपण लगडलेली केळ.
एक
अहं, अरेरावीचा जसा णगट वटवृक्ष. जटा खोल रुतवून. अढळ.

Sunday, 16 January 2011

पुंजी....?

म्हणजे कसं...
दशकं...कित्येक दशकं...पेटीत पुंजी साठवत होते.
एकेक क्षण जमा केला. एकेक दिवस...एकेक रात्र जमा केली.
आज बघितलं...कित्येक दशकांची कुलूपबंद पेटी उघडून आत डोकावलं...तर अंधार...त्या पेटीला काही तळच नाही. मग...माझा खारा घाम, गेला कुठे? माझा टपोरा अश्रू, गेला कुठे? आयुष्यातील इतक्या वर्षांची साठवण, गेली कुठे? ह्यालाच का रसातळाला जाणे म्हणतात?
म्हणजे एकेक क्षण त्यात जमा करताना...आधीच ती 'तुझ्या डोक्याची पेटी' उघडून बघायला हवी होती. तुझ्या डोक्यात काही जमा होतंय की नुसतीच गळती लागलीय...हे तरी नक्कीच तपासायला हवं होतं. साधीच गोष्ट होती खरं तर...पण वसा बावळटपणाचा घेतला होता...
मग आता दुसरं काय होणार?
...रिकामं डुक्कर खातं...हाताशी लागणार!

Friday, 14 January 2011

रिकामं आकाश


















मला वाटतं...
मला वाटतं...मी एक ढग होतो. काळा सावळा ढग. तरंगता. संथ. माझ्या घरावर वहाणारा. शांत छाया अंथरणारा. सहा मुले. तीन मुलं. तीन मुली. सहा मुलांची एक आई. रहाणार लालबाग. गिरणगाव. चाळीची एक खोली. रोज सकाळी सातला खोली सोडायची. भायखळ्याच्या गिरणीत पोचायचं. चटचट. चालत. काळा रस्ता. वळणाच्या टोकाशी एक रोप कोपऱ्यातलं. कुठून तरी आलेलं. तिथं रुजलेलं. कोणाला ना पत्ता. कोणाला ना थांग. नेमकी नजर गेली की हलकेच डुलायचं. कधी दादरा उतरून रस्त्याला लागायचो. वर पहिल्या मजल्यावरील आमच्या बंद दाराकडे बघायचो. तर कोण नसायचं. ना छोटी शकू. सगळं स्तब्ध. घरातून दार ढकलून निघालो की पहिली हालचाल ह्या रोपाची. हलकी हलकी. फक्त माझ्यासाठी.

दिवेलागणीस घरी परत. जे काही पैसे मिळायचे ते हिच्या ताब्यात. मी बचत केली. थोडे खिशात घातले. थोडे थोडे करून जमवले. तीनचार महिन्यातून एक क्वार्टर. बस. बाहेर सज्ज्यात बसलेला मी. माझा संवाद मनात. तिचा भांड्यांशी. भांड्यांची तिला साथ. आदळआपट. हिची सगळी भांडी तारस्वरात ओरडणारी. त्याला वेगळा ताल तिच्या दात ओठांचा. कडाकडा. कधी आत डोकावले तर शकू गुमान कोपऱ्यात बसून.
ताट बाहेर आणून आदळायची. चपाती उडायची, हलकेच येऊन तिरपी पडायची. डाळ डुचमळायची. जशी गढूळ डबकं. हे सगळं दारू प्यायलो म्हणून. पण मी तेव्हढंच करायचो. लक्ष्मीला कधी खेळायला नाही लावली. मग जाऊन गुमान सज्ज्यात बसायचो. वर नजरेला आकाश. टक लावून बघायचं. नजर न हलवता. पापणी न फडकवता. खोल खोल. शिरतो आपण. आत आत. मग हळूहळू मी तरंगतो. आकाश उघडतं. मी सज्ज्यात नसतोच. निमुळता सज्जा. फिरतो. चढता होतो.
दार. बंद दार. आणून टाकलेलं माझं अंथरूण. बदलतं आकाश. गडद होणारं. थंड. तेव्हापासून मला वाटायचं, मी एक ढग आहे.
हे असं दिवसेंदिवस केलं की मग त्याची सवय होते. कोणाशी न बोलण्याची सवय. मी बोलतो. फक्त तोंड न उघडता. तशी मी सवय लावून घेतली. सोपी सवय. बोलणं जरुरीचं नसतं. संवाद जरुरीचा असतो. मग आसपास बघितलं तर सगळ्यांना बरंच वाटलं. दहा बाय दहाची खोली एक रंगमंच. उठती, चालती, आपापसात बोलती माणसं. माझी भूमिका एकच. महिन्याच्या एक तारखेला. ते पण जर बंद दाराच्या फटी खालून पाकीट सरकवलं असतं तर सगळ्यांना बरंच वाटलं असतं. माझ्या कानांसाठी दर महिन्याला फक्त तीन शब्द. "द्या. पगार द्या." महिन्याला तीन म्हणजे वर्षाला किती? ३६.

दिवसेंदिवस. वर्षानुवर्ष. हे सगळं वाहणाऱ्या या ढगाचा सातजणांना ना कधी पत्ता लागला. मी होतो. माझी छाया होती. माझ्या माणसांवर पडलेली. न झाकोळणारी सावली.

ते रोप वाढलं. हिरवं डवरलं. पिंपळ तो. भरल्या तारुण्याने सळसळला. मी पिवळं पान झालो. एक दिवस रिटायर झालो. पेन्शन घेऊ लागलो. कायम मुक्काम पोस्ट सज्जा.

सज्जात बसल्या जागी त्या दिवशी एक बघितलं. ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं त्या दिवशी विश्वास नाही बसला. नाही कळलं हे कधी चालू झालं?
मुलं मोठी झाली होती. सकाळी बाहेर पडू लागली होती. कामासाठी, शाळेत, कॉलेजात. आणि माझी सगळी मुलं बाहेर पडताना त्यांच्या मातेच्या पाया पडू लागली होती. रोज. प्रत्येकजण. मी बाहेर सज्ज्यात बसून होतो. कोणाला कधी दिसलो नाही. कोणी आलं नाही. पायाशी कोणी वाकलं नाही. माझा संवाद मनाशी. त्यातील वाक्यांत मग भर पडली. आयुष्यमान भव. ऐकायला कोणी नव्हतं. पण मी बोललो मात्र.

मला वाटतं...
मला नेहेमीच वाटतं...मी एक ढग होतो. काळा सावळा ढग. तरंगता. संथ. वर तरंगत राहिलो. छाया देत राहिलो. एकटक जेव्हा आकाशात बघतो त्यावेळी माझ्यासाठी आकाश उघडतं. मी आत शिरतो. खोल. मी खोल खोल शिरतो.
आज मी वळून मात्र बघत नाही.
ढग सरकल्याचं कधी कोणाला कळलंय?
नाही.
पेन्शनचा ढग सावली देऊ लागल्यावर काय कोणाला कळणार होतं.
एक म्हातारा पिंजलेला ढग....कधीतरी विखुरला.
आणि कधीतरी...
कधीतरी...विरून गेला.

Thursday, 13 January 2011

पराजयापुढे विजय असतो...

काल 'नो वन किलड जेसिका' पाहिला. बातम्या सनसनाटी करता करता मिडीया 'इच्छा असेल तर' समाजाचे भले देखील करू शकते ह्या बद्दल एक विश्वास वाटला. स्वत: जाहिरातक्षेत्रात असल्याकारणाने हे सर्व प्रकार काही विघातक कामे न करता, उलट किती घातक कामे करू शकतात हे रोजच्या अनुभवातून कळतेच. 'पिपली लाइव्ह' मध्ये तेच दाखवले होते. परंतु सध्याच्या काळात एकूणच कोण कशी वाईट कामे करतोय, किंवा कोण वाईट कामे करून देखील कसा उजळ माथ्याने फिरतोय...हे सर्व वारंवार ऐकून, बघून आणि वाचून निराशा दाटून येण्यापलीकडे काहीही होत नाही. त्या उलट जर कोणी लढा दिला असेल आणि प्रचंड ताण सहन करून देखील तो विजयी झाला असेल तर ते वाचणे वा बघणे हे जिगीषा जागृत करणारे ठरू शकते. किंबहुना त्याचीच सद्य परिस्थितीत गरज आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.
'नो वन किलड जेसिका' बघून तसेच वाटले. आपला जगण्यासाठीचा लढा लढण्यास मग अधिक बळ मिळून जाते. 'पिपली लाइव्ह' बघून ही भावना नव्हती जिवंत झाली. त्याच उलट कापूस शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच बेतलेला मराठी सिनेमा 'झिंग चिक झिंग' अधिक गरजेचा वाटला होता. जबाबदारीचा वाटला होता.












आता वाचन!
आंद्रे
अगासी हातात पडलाय. पण त्याचे वादग्रस्त आयुष्य वाचताना घरातच एक वाद उभा राहिलाय! ते पुस्तक कोणी आधी वाचायचं ह्यावरून! आम्हां दोघीत! लेक आणि मी! म्हणजे ते कधी ठेवलेलं दिसलं की पटकन त्यावर ताबा मिळवणे, ते लपवून ठेवणे, ते पुस्तक अंगाला चिकटल्यासारखे घरात वावरणे...वगैरे वगैरे! त्यात दोनदोन बुकमार्क्स म्हणूनच पडलेत. परंतु, ही नवी पिढी जुन्या पिढीची डाळ काही शिजू देत नाही! म्हणजे माझा चिमुकला बुकमार्क मला कधी परत पुस्तकात दिसतच नाही! उलट घरात इथे तिथे पडलेलाच सापडतो! इतकंच नव्हे तर माझे पण नाव त्या पुस्तकावर टाकण्याची माझी विनंती बिलकुल फेटाळून लावण्यात आलेली आहे! :(


















तर मंडळी, 'आंद्रे अगासी- OPEN' मिळवा आणि नक्की वाचा! मला वाटतं मराठीत भाषांतर होण्याची वाट बघू नये. कारण मूळ भाषेतील सौंदर्य भाषांतर करताना टिकून राहिलंच की नाही, कोण जाणे. साहित्यिक मूल्य असलेलं पुस्तक! माझं जेव्हढं काही वाचून झालेलं आहे ते अप्रतिम आहे....त्यात नुसता खेळ नाही...तर खेळ खेळता खेळता सांगितलेलं साधं सरळ सोपं तत्वज्ञान आहे. आपण देखील त्याच्याबरोबर लहान होतो, हरतो, जिंकतो. आपल्या आयुष्याचे तत्वज्ञान आपण 'त्याच्या' अनुभवातून शिकतो. सरळ भाषेत...आणि म्हणूनच मनाला भिडणाऱ्या. कधी कधी अवाक करणारे विचार, अचंबित करणारे दाखले!
Like his beautiful different strokes!
Must 'Watch'!

ह्या पुस्तकाचे लोकसत्तात आलेले परिक्षण-
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=117492:2010-11-26-14-58-59&catid=34:2009-07-09-02-04-26&Itemid=11

Tuesday, 11 January 2011

आपण आणि ते...










परवा लोकसत्तात आलेली बातमी. 'भ्रष्टाचारात मुंबई पोलीस आघाडीवर.' त्याखालील क्रमांक, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा.

मुंबई एक सुपर फास्ट ट्रेन. ती धावते. त्यातील माणसांना जागा पकडण्यासाठी सतत धावणे जरुरीचे ठरते. दमछाक झाली तरीही. कधी कोणाला विंडो सीट मिळते तर कधी तिसरी. मग तिसरी सोडून खिडकी मिळवण्याची धावपळ. मानसिकता काय? तर सगळं कसं फास्ट. सुपर फास्ट. ह्या सगळ्या धावपळीत आम्ही कधी उंदीर झालो, पत्ता नाही लागला. बऱ्याचदा उंदीर, परंतु मांजर होण्याची धडपड. पाइपावर चढू पहाणारा उंदीर.

ही आपली धडपड, मग आपल्या सहप्रवाश्यांचं काय?
पोलीस? आपले सरकारी नोकर?

'Time is money'. ह्याचा अर्थ आपल्यासाठी - 'वेळ हा इतका मौल्यवान आहे की तो वाया घालवू नये. म्हणजेच तो फुकट जाऊ नये ह्यासाठी पैसा गेला तरीही बेहेतर.

कधी आपल्याला कायदा आडवा येतो. आपण वाहतुकीचा नियम मोडलेला असतो वा आपण जे काही काम करून घेण्यासाठी एखाद्या सरकारी कार्यालयात उभे असतो, तिथल्या नियमांप्रमाणे आपल्याकडे, पुरेसे वा गरजेचे कागदपत्र नसतात. मग आपले काम अडते. आणि मग पुन्हां- आम्हां मुंबईकरांसाठी Time is Money...मग आम्ही त्या त्या संबंधित माणसांपुढे लक्ष्मी नाचवतो. म्हणजेच आम्ही लाच देण्यास तयार आहोत...ती घ्यायची की नाही हा निर्णय तुमचा. घेतलीत तर काय, बाहेर आधीच तुमचे खाते भ्रष्टाचारी म्हणून ओळखले जात आहेच...त्यात तुमची भर. वर तिथून बाहेर पडलो की बोलायला मोकळे..."पैसे खाल्याशिवाय एक काम करत नाहीत. करप्ट साले!"
किंवा आपल्या जुजबी ज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडून पैश्याची मागणी होते. मग आपला धीर सुटतो. आम्हां मुंबईकरांकडे बाकी सगळं आहे पण वेळ मात्र नाही. आणि आपला हा कमकुवत धागा समोरच्याचा आता चांगलाच परिचयाचा झालेला आहे.

आता ह्या सर्व घटनाक्रमात मुंबईकर, आपण कुठे आहोत?
गुन्हेगाराच्याच चौकटीत नव्हे काय?

काल ऑफिसमध्ये एका मित्राशी ह्या बातमीवर थोडा वाद झाला.
"ही बातमी वाचलीस काय?" मी.
"हो. बघितली." तो.
"मग? काय वाटलं तुला?"
"काय वाटणार? हे होणारच! वेळ कोणाला आहे यार इथे? ही लोकं मुद्दाम वेळ काढतात आणि मग पैसे मागतात!"
"पण जर माझ्याकडून तुम्हांला एक छदामही मिळणार नाही, अशी आपण ठाम भूमिका घेतली तर?"
"काssssही होणार नाही! तू दुबईतली तुझी कामं कशी आटपून आलीस?"
"दुबईत? दुबईत माझे काम जवळजवळ प्रत्येक खात्यात होते. पोलीस, वीज, हॉस्पिटल, घरभाडे, स्मशानभूमी, कोर्ट. तिथे मी कुठेही मला घरी परतायची घाई आहे म्हणून पैसा चारलेला नाही. शेवटी शेवटी देखील कोर्र्टाच्या कामासाठी, जे कायदेशीर आहे, तेच म्हणजे नवऱ्याच्या मित्राच्या नावे मी 'power of attorney' देऊन आले. इतकंच. त्याच्याही पुढे इथे महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये कोर्टात, महसूल खात्यात, नगरपालिकेत देखील कधीही कुठेही पैसा चारलेला नाही. वेळ नक्कीच गेला. खूप फेऱ्या निश्चितच माराव्या लागल्या. परंतु थोडं धीराने कागदपत्र वेळोवेळी सादर केल्याकारणाने माझ्याकडे कुठेही कधीही पैश्याची मागणी झाली नाही."
"इथे साधं पाण्यासाठी पण पैसे चारायला लागतात यार!"
"तेही झालं. डोंबिवली तान्हं बाळ घेऊन पाण्याशिवाय पाच दिवस काढले."
"मग काय केलंस?"
"काय करणार? काही नाही. खाली नळाला पाणी होतं. मग पाण्याच्या बादल्या चढवल्या दोन मजले. समोरच्या इमारतीतील बाई मैत्रीण झाली होती. तिच्याकडे होतं पाणी. मग कधी तिच्याकडून आणल्या बाटल्या भरून."
"इथे कोणाला वेळ पडलाय!"

समाजाचे जर दोन भाग पाडले...आपण आणि ते...आपण आणि लाच खाणारे. तर सर्वप्रथम गुन्हेगार आपण आहोत. ते नाहीत. आपली घाईच आपल्याला नडली आहे.
फक्त आपण इतके सरावलोय की हे आता आपल्या लक्षातच येत नाही. आणि आपला गुन्हा एकच नाही. गुन्हे दोन आहेत. १. लाच देणे. २. दुसऱ्याला गुन्हा करावयास प्रवृत्त करणे.

मग आता आपली आकडेवारी कोण आणि कधी घेणार?

Sunday, 9 January 2011

मामांची गोष्ट

आमची मे महिन्याची सुट्टी चालू आहे. भिंतीवरचं आजोबांचं जुनं घड्याळ नुकतेच दहा ठोके देऊन थांबलंय. लाकडी उभट. आणि त्यात एक चपट गोळा. एaaaक...दोoooन...मला आता दहापर्यंत आकडे मोजता येतात. हे घर आजीआजोबांचं. ते आता नाहीत. म्हणजे आजोबांना मी बघितलंच नाहीये. पण आजी होती. पण आता नाहीये. तिच्या पाठीवर एक पुळी आहे. म्हणजे होती. काळी आणि मोठी. त्याला चामखीळ म्हणतात. दुपारी ती झोपली की मी तिच्या बाजूला झोपायचे आणि मग मला ती चामखीळ खेचायला खूप मजा यायची. आता माझी आजी आकाशात एक चांदणी झालीय.

मग आता इथे आजी नाहीये. माझे एक मामा कामासाठी दिल्लीला असतात. मला तीन मामा आहेत. सर्वात छोटा मामा इथेच असतो. पण तो माझे लाड करत नाही. एकदम मोठे मामा कधी इथे येतंच नाहीत. मग त्यांना मी बघितलेलंच नाहीये. पण मे महिन्याची सुट्टी आमच्यासारखीच दिल्लीत पण पडते. सुट्टी पडते म्हणजे मी सारखी पडते तसं नाही. सुट्टी पडते म्हणजे मला शाळेत जायला लागत नाही. मग मामामामी आणि सगळे इथे येतात. मामांना तीन मुलं आहेत. म्हणजे ते माझे भाऊ आणि बहिण आहेत. ते माझे खूप लाड करतात. त्यांची मी लाडकी आहे. ते मला चिडवतात पण खूप लाड करतात.

तर आता आम्ही सगळे ह्या हॉलमध्ये आहोत. हॉल खूप मोठा आहे. तिथे आम्ही सगळे एकत्र झोपतो. म्हणजे बाजूबाजूला अश्या खूप गाद्या टाकतात आणि त्याच्यावर चादरी घालून आम्ही सगळे झोपतो. मी, माझ्या मावस बहिणी, मावस भाऊ, माझ्या मामे बहिणी, मामे भाऊ आणि मामामामी. मामाच्या मुलांना मामे म्हणतात आणि मावशीच्या मुलांना मावस म्हणतात.

"मामा, गोष्ट सांगा ना!" आम्हांला आमचे हे मामा नेहेमी गोष्ट सांगतात.
"अरे! काल सांगितली ना! ती विसरलात का तुम्हीं सगळे!"
"नाही! मला आठवतेय!" हा पराग! हा माझा मोठा मावस भाऊ आहे. तो जास्तीच शहाणपणा करत असतो! नेहेमीच! तो पण असतो सुट्टीत इथे. कारण हे माझे मामा, त्याचे पण मामा आहेत! कसे? ते मला नाही माहित! माझ्या आईने तसं मला सांगितलंय!
"पण मामा, काल ती गोष्ट अर्धीच झाली ना?" हे मी म्हटलंय.
"हो? अशी कशी अर्धीच झाली? तुम्हीं झोपून गेलात काय राव? मी तर पुरी सांगितली!"
हे म्हणजे असं झालं? मी झोपूनच गेले? मामा गोष्ट सांगत होते तेव्हां? हे असं होऊ शकतं. कारण मला झोपायला खूप आवडतं. म्हणजे कधीकधी मी झोपून उठले की मला कळतंच नाही कि संध्याकाळ आहे की सकाळ आहे!
"नाही हा बाबा! तुम्हीं काल अर्धीच सांगितली!" हा माझा मामे भाऊ शशांक. तो ह्या माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि तो मोठा आहे.
"बाबा, काल तुम्हीं सोनेरी राजपुत्र आणि सफरचंद ही गोष्ट सांगत होतात! आणि मग तुम्हांला झोप आली म्हणून तुम्हीं ती अर्धीच सांगितलीत!" ही माझी मामे बहिण. तिला आम्ही अक्का म्हणतो. ती खूप मोठी आहे. आणि ती आमचे सगळ्याचे खूप खूप लाड करते! पण मला माहितेय की मीच तिची सर्वात जास्त लाडकी आहे!
काल मामांनी अर्धी सांगितली वाटतं गोष्ट. मला माहितीच नाही हे! म्हणजे मी झोपून गेले का?
"बरं. मग आज कुठली सांगू?" मामा थोडे झोप आल्यासारखे वाटतायत का?
"मामा, तीच पुढे सांगा ना!" ही प्रज्ञा. मी पहिलीत आहे आणि ती दुसरीत आहे.
"नको. ती नंतर कधीतरी पुरी करुया! आज ना आपण एक गंमत करुया!"
मामा आमचे खूप गंमतीशीर आहेत! आज काय गंमत करायचीय?
"काय करुया मामा?" मी विचारतेय.
"आज ना जो पहिला झोपेल ना त्याला गोष्ट!"
"म्हणजे?" हा अजय. अजून तो छोट्या शाळेतच आहे!
"म्हणजे काय म्हणजे? अरे, जो पहिला झोपेल ना त्याला गोष्ट!"
"चालेल! मी ना मामा सगळ्यात आधी झोपून दाखवते हा तुम्हांला!"
"हा! अना! एकदम!"
मी ना मग एकदम माझं पांघरूण घेतलं. मी नेहेमी अक्काच्या बाजूलाच झोपते. दुसऱ्या कोणाला नाही देत मी तिच्याजवळ झोपायला. तर मी आता पटकन झोपून दाखवते मामांना. मग सगळेच एकामागोमाग एक आडवे झालेत. रांगेत. मामा पण. वरती पंखा आहे. गरगर फिरणारा. डाव्या बाजूला एक खिडकी आहे आणि त्यातून थोडा उजेड येतो. नाहीतर मग आमच्या ह्या हॉलमध्ये खूप काळोख होऊन जातो. आता मामा आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर पराग नेहेमी मला भुताच्या गोष्टी सांगतो. मला खूप भीती वाटते.

"मामाsss, तुम्हीं रात्री गोष्टच नाही सांगितली!" मी डोळे उघडले तर मामा पेपर वाचत होते. चहा पीतपीत. माझ्या बाजूला एक पण गादी नव्हती. म्हणजे सगळे उठले होते. असं होतं नेहेमी! मग सगळे मला आळशी म्हणतात!
"मामाsss'
"अरे! अना, तू उठलीस?"
"हो! पण मामा तुम्हीं मला गोष्टच नाही सांगितली रात्री!"
"मी काय सांगितलं होतं रात्री?"
"जो पहिला झोपेल त्याला गोष्ट!"
"मग?"
"मग मीच पहिली झोपले मामा!"
"अरे! तू झोपूनच गेलीस! मग कशी सांगणार मी तुला गोष्ट?"
म्हणजे काय? मला कळलंच नाहीये! सगळे ना, असं मला काही कळलं नाही की हसत बसतात!
"हो? मग कोणाला सांगितली तुम्हीं गोष्ट?"
"अरे, तुम्हीं सगळे झोपूनच गेलात! मग मी कोणालाच नाही सांगितली गोष्ट!"
असं कसं? मग मी झोपायचं होतं की नव्हतं? मामा मला म्हणालेले ना की जो पहिला झोपेल त्याला गोष्ट? शी बाबा!
"मामा, आज रात्री सांगाल मग गोष्ट? मी नाही झोपणार आज! तुमच्या ना मांडीवरच बसून राहीन! चालेल?"
"हो तर! तू माझ्या मांडीवरच बस! मग बघ मी ती राजपुत्राची गोष्ट सांगतो की नाही!"
"चालेल!"

Saturday, 8 January 2011

आधार!

वर्षाची अखेर. मिट्ट अंधार. समोर क्षितीज नसलेला काळाशार समुद्र. आशा भोसले, ओ पी नय्यर टेपरेकोर्डवर. सगळं धुंद. बेधुंद. त्यात मद्याची साथ. शेखर, राजेश, निखील आणि मुकूल. चार तिशीतले मित्र. त्यातील शेखर आणि राजेश सपत्नीक. शेखरची आरती आणि राजेशची मुक्ता. शेखर आणि आरतीचं गोजिरं ९/१० महिन्यांचं बाळ देखील साथीला. थंडी वाजू नये म्हणून टोपरंबिपरं घालून बसवलेलं. वाळूत खेळत. आईबरोबर. रात्र उलटून चालली होती. मद्य कार्यरत होते.

"चला यार! पाण्यात जाऊ." निखील म्हणाला.
"चल!" मुकूल.
सगळे निघाले पाण्यात डुंबायला. थंड समुद्र नाहीतरी बराच वेळ बोलवतंच होता.
बाळ आणि आई किनाऱ्यावर. बाळाचे बाबा पाण्यात डुंबायला निघाले. राजेशची तरुण पत्नी, मुक्ता, हौशी होती. तिने इतका सुंदर पेहेराव काही कोरडाच परत न्यायला बॅगेत भरला नव्हता.
"आरती, तू नको जाऊस त्यांच्यात." राजेश.
"का बरं? तुझी बायको गेली की पोहायला!"
"ती जाऊ दे! तू बस इथेच! मी थांबतो तुझ्याबरोबर!"
नाही तरी इतक्या पुरुषांसमोर पोहण्याचा तोकडा पेहेराव घालणे तिला शक्य नव्हतेच. बाळाला देखील झोप लागलेली होती. तिच्या कोरड्या पण उबदार मांडीवर.
"ठीक. पण तू देखील गेलास तरी हरकत नाही! मी बसेन इथेच!" आरतीचा एकटीने तिथे थांबायला काहीच आक्षेप नव्हता.
"नको."

आशा आणि ऑ. पी. नय्यर कधी थकलेत? त्यांना रात्र देखील तोकडीच. राजेश घुटके घेत आणि आरती गाणी ऐकत बसून होते. मुक्ता, मुकूल, निखील आणि शेखर पाण्यात खेळत होते. भरपूर आणलेला 'स्टॉक' मात्र संपत चालला होता. शरीर व डोकं...ताळ आणि तंत्र. सैल सुटलेले. समुद्राच्या लाटांवर शरीर खालीवर. मद्याच्या लाटांवर डोकं वरवर. डुंबणं आता फार झेपणारं नव्हतं. बाटल्यांनी तांबडी जादू प्रत्येकावर केलेली होती. जिभा जड झालेल्या होत्या. चाल वाकडी होऊ लागली होती.

"चल ना रे आता! परत जाऊ या आपण रूमवर! हा पण गाढ झोपलाय." आरतीने शेखरला विनवणी केली त्यावेळी तो हलक्याफुलक्या ढगांवर तरंगत होता. आरतीला त्यात काय नवे?
"चला रे! जाऊया रूमवर! हे असं बायकापोरांना आणलं की असंच व्हायचं!" शेखर त्याच्या विनोदबुद्धीमुळेच तर मित्रांना प्रिय होता.
"म्हणून आम्हीं लग्न करत नाही." ब्रह्मचर्य न पाळणारा 'ब्रम्हचारी' निखील आपण हुशार आहोत ह्याची खातरजमा करत उद्गारला.
"चला. उचला रे सामान."
मुक्ताने गोव्यामध्ये पूर्वी घेतलेलं रंगीबेरंगी कापड कमरेला गुंडाळलं. भिजलेले केस झटकले. ह्या ओलेत्या अवस्थेत आपण अधिकच मादक दिसत असणार ह्या खात्रीत तिने रुमच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. तिच्याबरोबर राजेश व मुकूल. आणि त्यांच्याबरोबर पुढे शेखर. आता मद्य अंमलामुळे विनोदबुद्धीच्या अधिकच भराऱ्या. मागे आरती आणि कडेवर झोपलेला चिमणा जीव.
रस्ता अंधारलेला. अंधाराला डोळे सरावलेले असले तरी देखील काळोख तो काळोखच. मद्य आणि अंधार. सैतानाचं साम्राज्य. निखिलचे पाय आरतीपाशी रेंगाळले. शेखर दूर दिसत होता. विनोदा मागे विनोद. मुक्ता तुफान हसत आणि साथीला राजेश होताच. "शेखर, तू ना साल्या!"

सप्तपदी नाहीतरी मागूनच पूर्ण केली होती. मग आता ती मागे राहून गेली तर त्यात काय बिघडलं? आरतीच्या कानापर्यंत नवऱ्याने मारलेला विनोद काही नव्हता पोचला. आणि मिट्ट काळोखात कडेवरल्या तान्हुल्याला सांभाळण्याची कसरत अधिक महत्त्वाची नक्कीच होती.
अकस्मात तिच्या खांद्यावर आलेला हात तिला धडकी भरवून गेला.
"घाबरू नकोस. मी आहे तुझ्याबरोबर. मी घेतो तुझी काळजी!" सैतान खुदूखुदू हसत होता तेव्हा काही तो शेखरच्या विनोदाला दाद देत नव्हता.
स्पर्श कळतो. तिने खांदा झटकला. काळोखात पडले तरी बेहेतर अश्या वेगात ती अंधारात दूर झाली.
"अरे! अशी काय! मला तुझी काळजी वाटली म्हणून आलो होतो! तुला मदत करायला!"
"मी ठीक आहे! तू जा!"
अंधारात शेखर, मुकूल, मुक्ता आणि राजेशच्या आकृत्या पुसटश्या दिसत होत्या.
आरतीचं खेकसणं ऐकून खांदे उडवून निखील त्यांना सामील झाला.

आरती एकटीच चालू लागली. कडेवरच्या बाळाला काय माहित. आईच्या अब्रूवर उठलेलं. अंधारात दूर दूर जाणारा बाबा...आकाशात मंदावलेल्या चांदण्या...धूसर होणारा चंद्र...विनोदी शेखरच्या विनोदाला मिळालेली दाद...अंधारात घुमणारी...कानात बोचणारी. रात्र अखेर संपत आली होती.

नूतन वर्षाचा आरंभ झाला होता.

Friday, 7 January 2011

प्रसन्न दिवसाची सुरुवात...

पहाट झाली. रोजच्यासारखी. फरक एव्हढाच की मी गजर बंद करून झोपून गेले नाही तर चालायला गेले. आमच्या शिवाजी पार्काला चांगल्या ३ गरागरा चकरा मारल्या. भोवऱ्यासारख्या. भोवरा मी टाकला असल्याने तीन चकरांतच पडला! रोजचीच शहाणी वेडी, म्हातारी तरणी, कुत्रे मांजरी दिसले. मग मी घरी आले. माझी फर्स्ट क्लास कॉफी प्यायले. नखरा केला...म्हणजे जेव्हढा झेपतो तेव्हढा केला. मग आरश्याने जेंव्हा हसून, "you may go now" म्हटले तेव्हाच पर्स उचलली आणि निघाले.

कशासाठी?
अर्थात पोटासाठी!

खाली आले. वाहन सुरु केलं. मी बघितलंय...म्हणजे माझा मुळी तसा अनुभवच आहे...सक्काळी गाडी सुरु केल्याकेल्या लागलेलं पहिलं गाणं जर आपल्या आवडीचं असेल तर दिवस चांगला जाण्याचा संभव अधिक असतो. खात्री नाही. पण संभव असतो. तर अगदी, तेरे मस्त मस्त दो नैन...चालू होतं...खुशीत निघाले...

गाडी रस्त्याला लागली. दुसऱ्या रांगेत. उजव्या हातावरील जलद रांगेतील गाड्या घाईघाईत. एकूणच मुंबईच्या रस्त्यावरून गाड्या कश्या स्वच्छंदी विहरत असतात. म्हणजे बागेत बागडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरासारखं. सांगता येणे कठीण की पुढल्या क्षणाला त्याची झेप कुठल्या दिशेला असेल. तर डावीकडून अकस्मात एक कानटोपी घातलेले गृहस्थ दुचाकीवरून पुढ्यात आले. आता त्यांचा त्यांचा एक वेग. माझा माझा एक वेगळा वेग. काकांना दुसऱ्या रांगेची गती बहुधा अमान्य होती. उजव्या हाताला तर चिकटलेल्या फुलपाखरांची मालाच तरंगत होती. म्हणजे ती तोडणे काही शक्य नाही. आणि हातात भोंगा आहे म्हणून वाजवणे म्हणजे अगदी समोरच्याला 'दूर हो जा मेरी नजरोंसे" असे त्याच्या अंगावर खेकसण्यासारखेच! आणि ते सुद्धा वयस्क काकांच्या अंगावर! म्हणजे ते काही खरं नाही. आणि काका जसे काही मला ऑफिसचा रस्ता दाखवायलाच निघालेले. म्हणजे अगदी follow me! मग त्यांच्या भावनेचा आदर चांगली पाच मिनिटे केला....आणि रोजचे डावे वळण आले...घेतले आणि मार्गाला लागले...स्वतंत्र.

गाडी तळघरात लागली. ठराविक जागेवर. म्हणजे काका सोडल्यास सर्व नेहेमीसारखेच चालू झाले होते.

तळघर ते आसन, पंधरा मिनिटे प्रवास. रोजची वादळापुर्वीची शांतता. रोजचा दिवस हे एक वादळच. सगळेच झपाटलेले...मिटींगा, डेड लाइन्स म्हणजे जसा रोजचा मृत्यूचा फतवा. पैश्याची आवक किती वाढली? डोकं किती वापरलं? की क्लायंटने मागितलं आणि ते देऊन टाकलं? जसं वाण्याकडे...साखर द्या, साखर दिली. गहू हवे, गहू दिले. हे असे रोजचे वादळ. तारेवरची कसरत. आज पंधरा मिनिटांच्या त्या शांततेवर झडप घातली, आडव्या तिडव्या घिरट्या घालणाऱ्या विचारांनी. म्हणजे वादळाआधीच चक्रीवादळ! चक्रीवादळाला कसले भान? नुसते थैमान. पंधरा मिनिटांनी लढाईत उतरायचे होते. तिथले रोजचे डावपेच. रोजच्या लढाया. प्रत्येकाची जिवंत रहाण्याची धडपड. वार, प्रतिवार. जवळजवळ सगळेच वार पाठून. हत्यार वाट्टेल ते. तलवार, खंजीर...नुसती भोसकाभोसकी. जिवंत रहाण्याच्या धुंदीत प्रथम पांडव वाटणारे, कधी कौरवात रूपांतरित झाले...हे ज्याचे त्याला देखील कळले कि नाही शंकाच. कसली मैत्री आणि कसली दोस्ती. काचेच्या केबिना, जसे पारदर्शक तंबू. खलबते, कारस्थाने. सतत. बाहेर त्याचा अस्पष्ट देखील आवाज नाही. कधी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय ह्याचा पत्ता लागायचा नाही. गुळगुळीत मस्क्यातून धारदार सुरी सफाईने बाहेर निघावी. रक्ताचा टिपूस नाही.

तळघरातून वर आले. घिरट्या आता घिरट्या नव्हत्या उरलेल्या. मेंदूवर घारींनी झडपच घातलेली जशी. लचके नुस्ते! युध्द. लढाई....राजकारण.

इमारत खंबीर. उभी आडवी. निळ्या काचा लावलेली. पारदर्शक. चालताचालता मान वर केली. सहज डावीकडे बघितलं. आणि दचकले. जे काही दिसलं त्याने खाडकन जागीच झाले. युद्धाचे सगळे परिणाम चेहेऱ्यावर पसरलेले. घरातील आरशाने तर पसंती दिलेली होती. परंतु ह्या निळ्या काचेत जे प्रतिबिंब दिसलं ते मात्र काही सुखावह नव्हतं. त्या वेड्यावाकड्या विचारांनी दिल्या होत्या आठ्या. असंख्य. एकेक रेषा चेहेऱ्यावरची त्रासलेली. कपाळ जसं धारातीर्थी पडलेले बाण. वाया गेलेले. ओठ वक्र झालेले. माझ्या चेहेऱ्यावर माझा ताबा नव्हता? डोक्याच्या आतील थैमान...बाहेरील सर्व स्नायूंवर ताबा मिळवून बसलेले. त्रासलेले विचार...विद्रूप चेहेरा. अतिउष्णतेने भांडं तडकावं...बेढब व्हावं. दिवसाची ही अशी सुरुवात?

एक मिनिट ती भिंत पार करायला. तितका वेळ पुरला स्वत:चा चेहेरा बघायला. मनात विचार आला. चला, आपलं डोकं हे काही नारळ नाही नक्की. वरून कणखर आणि आतून नासके. उलट डोक्यात चक्रीवादळ तर चेहेऱ्यावरदेखील तीच खळबळ. मग फारफार तर कमळ म्हणता येईल...ऊन लागलं, कोमेजलं...पुन्हा पाण्यात रोवलं...ते हरखून गेलं. आता ह्या आत्मस्तुतीने मात्र हसू आलं...इमारतीच्या दाराशी रखवालादारांचे रोजचे चेहेरे दिसले. मग हसू अधिक पसरत गेलं...अगदी त्यांच्या चेहेऱ्यांपर्यंत.

Wednesday, 5 January 2011

शप्पत!

"श्शी! वाजतंच नाहीये!"
फ्रॉक गुंडाळून घेतला होता आणि पाय दुमडून एक लाल केप फोडणे चालू होते. घरातील हातोडी घेऊन. पण हातोडी जमिनीवर धाड धाड फक्त आपटत होती आणि तो केप फुटल्याचा फट्ट आवाज मात्र येत नव्हता. म्हणजे हे भलतंच. उगाच खालच्या अण्णांना त्रास. आणि मग बाबांकडे तक्रार. त्यातून ती एकच केप खाली मिळाली होती. एकटीच पडलेली. बाबा काही आवाजाचे फटाके आणून देत नाहीत! त्यांना कित्ती सांगितलं. सगळे वाजवतात! आमच्या बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक आहेत! ते सगळे लवंगा लावतात! बिल्डींगीमध्येच लावतात! सक्काळी सक्काळी! केव्हढा आवाज होतो! मी तर एकदम दचकूनच उठते! पण मग त्यामुळे मी गेले ३/४ दिवस लवकर उठतेय ना? नाहीतर तेच ओरडत असतात! "उठ अगं, आठ वाजले! आळशी नुसती!" आता ते गेलेत ऑफिसला! आई पण! मला सांभाळायला एक आजी ठेवल्यात! त्या नुसत्या दिवसभर माझ्यावर लक्ष ठेऊन असतात! मला आता हे असे रस्त्यात वेचुनवेचून केपा आणायला लागतात! हे माझे बाबा! म्हणे आवाजाचे फटाके वाईट!
"XXX XX!"

रात्र झालीय. बाबा असे काय पुस्तकात डोकं घालून बसलेत? आज माझ्याशी बोलत का नाहीयेत? माझ्याकडे बघत पण नाहीयेत ते! असे काय करतायत? आई पण जास्ती बोलत नाहीये! बोलत नाहीये पण घातली बाबा तिने माझी गादी! झोप कित्ती आलीय मला!

परवा बाबा बोलत नव्हते. काल बाबा बोलत नव्हते. आज पण बाबा बोलत नाहीयेत!! आई पण नुस्ती मला अंघोळबिंघोळ घालते आणि जाते ऑफिसला! माझ्याशी कोणीच बोलत नाहीये!!
"आईई"
"हं. काय?"
"बाबा बोलत का नाहीयेत माझ्याशी?"
"त्यांनाच विचार!"
"तू सांग ना!"
डोळे भरले बुवा आता!
"तू त्या दिवशी काहीतरी घाणेरडी भाषा बोललीस ना?"
लटपट लटपट! पाय हो!
"असं कोण म्हणालं?"
"आजींनी सांगितलं बाबांना! लगेच! बाबा ऑफिसमधून आल्याआल्या!"
"हो?"
मुसुमुसू.
"आता काय करू मी?"
"जा बाबांकडे आणि माफी माग!"
बाबा ना कायम पुस्तकातच डोकं घालून असतात! म्हणजे तुम्हीं समोर उभे राहिलात ना तर ते पुस्तकच दिसेल तुम्हांला! बाबा दिसणारच नाहीत! म्हणजे त्यांचं डोकं दिसणारच नाही!
"बाबा"
-------
"बाबाआआआ"
"काय?"
"तुम्हीं बोलत का नाहीहात माझ्याशी?"
"हं"
"सांगा ना बाबा!"
"तू काय बोललीस त्या दिवशी? कोणी शिकवलं तुला हे असं बोलायला?"
-----
घळाघळा!
"ते असं आलंच कुठून तुझ्या तोंडात? ते तू दिवसभर खाली वाडीत उनाडक्या करत असतेस ना?"
"नाही बाबा!"
"आता एक काम करायचं?"
रडक्या तोंडावर एक प्रश्नचिन्ह.
"हात ठेव माझ्या हातावर...हा....आणि म्हण...मी पुन्हा असं बोलणार नाही...मी पुन्हा असे वाईट शब्द उच्चारणार नाही."
बाबांचा हात ना मऊ आहे! आणि उबदार!
"बाबा, मी पुन्हा असं बोलणार नाही...मी वाईट काही बोलणार नाही."
"शप्पथ घेतलीयस तू! आता परत अजिबात असं बोलायचं नाही! वाईट असतं ते. आपण हे असे शब्द नाही बोलत. कळलं?"
मान हलली. बाबांनी कडेवर घेतलं.
हुश्श!!!

"मूर्ख! अक्कलशुन्य गाढव! आचरट! XX ची त्याच्या!"
"हं बोल बोल! ऐकतायत आजोबा!"
"अगं हे ना, ह्या मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून ना माझं असं झालंय! तो मूर्ख बघ ना कसा गेला आपल्याला ओवरटेक करून! आपटलाच असता तो आता आपल्या गाडीवर! "
"उगाच कारण नको सांगूस! शप्पथ घेतली होतीस ना? काय झालं मग त्याचं?"
"श्या! तुला ना मी उगाच सांगत बसते काहीतरी!"
"हो का? मुद्दा तो नाहीये! तू शपथा मोडतेस! आणि मग मला कशाला सांगतेस शपथ मोडायची नसते म्हणून?"
"अगं माझे आई! नाही बोलणार परत! मग तर झालं?!"
"घे शप्पथ!"
"आईशप्पत! तू पण ना! आहेस खरी!"
:p

Tuesday, 4 January 2011

"....."

वर्ष होऊन गेलं. आत्म्यास शांती लाभो...

Monday, 3 January 2011

ओळखा पाहू!

एक तर स्वत: अप्रतिम दिसायचं आणि मग आपण ढगात गेल्यावर वर बसून असा काही डाव खेळायचा की आपल्यासारखं पुन्हा कोणी जन्मच घेणार नाही!
कम्माल आहे! किती स्वार्थी असावं माणसाने?!
मला तरी हे फोटू बघून असंच वाटलं....तुमचं काय मत आहे?









काय हो? ओळखलंत ना?
:p

Sunday, 2 January 2011

लढा

मी काय तीर मारला?

१२ जानेवारी २०१०. दुबई.
संध्याकाळी सहाच्या सुमारास नवऱ्याच्या अस्थी हाती आणून दिल्या गेल्या. त्याच्या मित्राने.
पंधरा
तारखेचं परतीचं तिकीट होतं. अस्थी घेऊन मायदेशी परतायचं होतं. तो मंगळवार होता. बुधवारी संध्याकाळी दुसऱ्या मित्राने माहिती दिली, अस्थी भारतात घेऊन जाण्यासाठी दुबईतील दूतावासाकडून एक पत्र लागेल. त्याशिवाय दुबई विमानतळ, अस्थी घेऊन प्रवास करण्यास परवानगी देणार नाही. हे कळेस्तोवर बुधवारची संध्याकाळ होऊन गेली होती.

गुरुवार, १४ जानेवारी.
मृत्यूचा अरबी भाषेतील दाखला, असेच इतर अरबी भाषेतील काही कागद, पासपोर्ट, विसा, त्यांच्या काही नकला...हे सर्व असलेली एक जाडी फाईल. अस्थींचा एक फुट व्यासाचा पत्र्याचा गोल जड डबा. दुबईतील स्मशानभूमीने दिलेला. हे सर्व घेऊन दुबई दूतावास गाठला. सकाळी दहा वाजता. सोबत नवऱ्याचे तीन मित्र. सख्खे भाऊ नाहीत...परंतु इतर चुलत, मामे, मावस ह्या नावाखाली येणाऱ्या सर्व बंधूनात्याला मागे नेऊन टाकणारी ही माणसे.

"You thought you can carry your husband's ashes just like that? "
टेबलाच्या मागे बसलेल्या व्यक्तीचं वय अदमासे पंचावन. पाटी नाव वाचत होती...'Mr. Sinha.'
"I came to know about this permission letter yesterday."
"So? Is it our fault? You cannot make us work on a holiday!" बाजूचे टेबल. पाटी वाचत होती...Mr. Anil. वय अदमासे तीस-बत्तीस.
"Holiday? Today is Wednesday Sir."
"Madam, it's Makar Sankranti! We have a holiday!"
"I didn't know this."
"Carrying a dead body can be an emergency! Carrying ashes is not an emergency! Show your husband's passport!"
फाईल समोर टेबलावर ठेवली. त्यातून नवऱ्याचा पासपोर्ट काढला. श्रीयुत अनिल ह्यांच्या ताब्यात दिला.
"See! You got your dead husband's passport cancelled on 10th! Where were you for last 4 days?"
अस्थींचा डबा अजून तरी खाली जमिनीवर ठेवणे नव्हते जमले.
"I didn't know that I need a permission letter. I came to know that yesterday."
श्रीयुत अनिल,"This cannot be your excuse! Show us your tickets! Show us the proof that you are flying tomorrow!"
तिकीटं समोर ठेवण्यात आली. "Show us the death certificate we had issued."
फाईलीतील असंख्य कागदांमधून एक कागद अनिल ह्यांच्या समोर धरला. अनिल ह्यांचा आवाज आता नुसताच उर्मट नव्हता. चढा देखील झाला होता.
"Madam, this is not the one! You must be having a certificate with the consulate stamp!"
पाच मिनिटांचा फायलीतील शोध आणि दोन्ही अधिकाऱ्यांच्या उद्धट नजरा. त्यांनी दिलेला मृत्यूचा दाखला शेवटी समोर आला.
"We need to seal this box. Today is a holiday. We don't keep the seal in the office. You need to go to the officer's house and get it."

पत्ता घेऊन मित्र महेश निघाला. तीन चार तासांनी अस्थी सीलबंद झाल्या. पिवळट कापड त्यावर लालबुंद सील. परतीच्या प्रवासाला आता मुभा होती.


घरी परतलो.

काही जीवघेणे अनुभव आपल्याला येतात. मग वाटतं, हे आपल्यापर्यंतच संपावं. आणि कोणालाही हे सुन्न करणारे, माणुसकीवरील विश्वास उडवून लावणारे अनुभव येऊ नयेत. कुठेतरी वडिलांनी मनावर कोरलेले असते...माणुसकीवर विश्वास ठेवावा कारण तो विश्वास हीच मानवजातीची गरज आहे. अन्यायाविरुद्ध काहीही करणे म्हणजेच दुसऱ्या अर्थाने अन्याय करणे अन्यायाला पाठिंबा देणे आहे.

शशी थरूर जाल विहार करणारे आहेत अशी माहिती होतीच. जालावरून त्यांचा आणि त्यांच्या कार्यालयाचा -मेल पत्ता मिळवला. वरील अनुभव त्यांना मेल केला. त्यावेळी ते बहुधा स्वत:च्या लग्न गडबडीत होते. आणि बहुधा त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यालय देखील लग्न सराईत होते. काही दिवस उलटले. जालाच्या पत्रपेटीत प्रत्युत्तर शून्य.

हे असे नाही संपवू शकत. तशी शिकवणच नाही.

श्रीयुत शर्मा, Consul General of India, दुबई ह्यांना तेच पत्र पाठवलं. दोनतीन दिवसांनी त्यांचे धोरणी उत्तर आले.

Dear Ms. Nigwekar,
I was very disturbed and saddened to see your e-mail. There is simply no room for insensitivity on matters relating to death.
My colleagues in the Consulate are always under great stress and public pressure. I am, however, ensuring that we show complete sensitivity in such cases.
If you were still in Dubai or likely to be, please let me know so that I can personally express my regret at your experience. I hope you have the inner strength to deal with your loss.
I wish you the very best,
(Sanjay Verma)
Consul General of India, Dubai
March 18, 2010

त्याला उत्तर पाठवले....your mail gave me a sense that if you are very busy, stressed and under work pressure; you can be inhuman.

दोन दिवसांनंतर दुबईच्या दूतावासातून श्रीयुत संजय वर्मांचा फोन आला. माफी मागण्यासाठी.

त्यांनी माफी मागावी ह्यासाठी हा अट्टाहास नव्हता. दूतावासाच्या मूळ उद्देशाबाहेर जाऊन अशा प्रकारची असंस्कृत वागणूक पुन्हां कधीही कोणाला मिळू नये...हा उद्देश मनात धरून वरपर्यंत दार ठोठावले होते. त्याची जाणीव त्यांना करून देणे आणि ह्या घटनेची दाखल घेणे त्यांना भाग पाडणे...हे इथपर्यंत तर केले होते.

मग मी काय तीर मारला?
नाही. तीर नाही मारला...
परंतु निदान आपल्यापाठी भाता आहे त्यात तीर आहेत...ते बोथट होऊ देता त्याचा वापर करावा ही बाबांची शिकवण फुकट नाही घालवली.

"अन्यायाविरुद्ध काहीही करणे म्हणजे समाजावर अन्याय करणे आणि होणाऱ्या अन्यायाला पाठिंबा देऊन 'रावण पोसणे'."


३६५ पानांचं पुस्तक

गेलं ३६५ पानांचं पुस्तक फार झपाट्यात संपलं.
वाचनास सुरुवात केली आणि खाली ठेवण्यास अवधी न मिळावा.
त्या वेगाची धाप लागली...श्वास कोंडला.

ते पुस्तक होतं संमिश्र. भावनांचा कल्लोळ.
दु:ख, वेदनेची परिसीमा आणि त्यात काही आनंदाच्या क्षणांची थोडीशी सरमिसळ.
भर उन्हांत, खचलेल्या भुईवर एखाददुसरा थेंब पडावा आणि आतून खोलवर दडलेले बीज अंकुरावं. प्राणवायू सापडावा...आणि त्याने तग धरावा.

आता वाटतं...हे नवीन पुस्तक मात्र थोडं संथ वेगाने पुढे सरकावं...

अर्थात ह्या सगळ्या वाटण्याच्या गोष्टी...
वाटताना काहीही वाटू शकतं.
नासलेल्या दुधाची बासुंदी व्हावी असे देखील वाटू शकतं..

शेवटी, हातात जे पुस्तक सरकवण्यात आलं आहे...
कोण जाणे त्यात काय दडलं आहे?