नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 11 January 2016

फास

दडलेल्या गोष्टी अंधारच स्पष्ट दर्शवतो हेच खरे.

सूर्य कधीच दुबळा झाला होता.
पक्षी वगैरे आपापल्या घरी पोचले होते.
मनुष्य जात मात्र त्या हमरस्त्यावर आपापल्या वाहनावर स्वार होऊन परतीच्या रस्त्याला लागली होती.

त्याच जातीचा एक जीव; टांगणीला लागला होता.
आणि त्या जिवाच्या वतीने ती रुग्णवाहिका मदतीचा धावा करीत होती.
चार चाकी गाड्या हलकेच दूर पसरल्या. 
जसं वारूळ फिसकटावं व मुंग्या मूळ वाट सोडून दूर व्हाव्या.
वा वाऱ्याच्या झुळुकीने जेव्हा पान एक हलकी उडी घेतं तेव्हा त्यावर तरंगणारा एखादा ओघळ जसा फाटे फुटत विखरून जातो.
तसं काहीसं.

रुग्णवाहिका पुढे पुढे सरकत होती.
आत बसलेला यम, त्या जिवाच्या डोक्यापाशीच आपले पाय विसावून त्याच्या समोरच्या सिटवर आरामात विसावला होता. रुग्ण शुद्धीवर नव्हता. पण त्याच्याशी यमाला काय घेणं आणि काय देणं ? आपणच सगळं करावयाचं आहे व त्याशिवाय समोरचा साधा श्वास देखील घेऊ शकत नाही ही जाणीव नक्कीच एक बेदरकारपणा बहाल करीत असावी.

मार्ग काढीत काढीत वाहिनी डाव्या हाताला सरकली. कठड्याला दीड फुट जागा सोडून. चालकाच्या बाजूला बसलेल्या सहायकाने आपला डावा हात बाहेर काढला. मागून येणाऱ्या वाहनांना इशारा देण्यासाठी तो हात वरखाली होत होता. इशारा व विनंती.

दुचाकींची एक रांग डाव्या हाताने पुढे धावत होती. दीड फुटाची जागा पुढे सरकायला पुरेशी होती. शेवट नसलेली रांग. मारुतीचं शेपूट. वाहिनीच्या खिडकीतून बाहेर आलेला हात पुढे जाण्यासाठी विनंती करीत राहिला. आणि दुचाकी न थांबता पुढे जात राहिल्या. जसा काही तो हात अदृश्य होता. कोणालाच न दिसणारा.

आत यमाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होतं.
एकेक दुचाकी पुढे जात होती.
वाहिनी स्तब्ध उभी राहिली.
अविचल.
धावा चालू होता.
हात बाहेर लटकत होता.
"एकेक दुचाकी जसजशी पुढे जाईल तसतसा तुझ्या गळ्याभोवतालचा हा फास मी सुतासुताने आवळत जाणार आहे." तो त्याला म्हणाला.
एक.
दोन.
तीन.
चार.
पाच.
सहा.
बहिऱ्या दुचाक्या.
आंधळ्या दुचाक्या.
मुडद्या दुचाक्या.

शेवटचा झटका फासाचा.
माणुसकीच्या क्षीण मानेला बसला.

यम रुग्णवाहिनीतून बाहेर पडला.
दूरपर्यंत ऐकू येणारा धावा खटकन थांबला.
लटकता हात आत गेला.
वाहिनी थंडावली.
आता घाई नव्हती.
चालकाने सराईत गियर टाकला.
आत माणुसकीचं प्रेत वाहिकेच्या गतीबरोबर डूचमळलं.
तेव्हढीच प्रेताला हालचाल.


Monday, 4 January 2016

सामान्य माणसाच्या नजरेतून अनुत्तरीत प्रश्न

मित्रमंडळींशी whatsapp वर चर्चा ही फार त्रोटक व अपूर्ण होत होती. म्हणून…
सर्वप्रथम माझ्याबद्दल -
मी एक अतिसामान्य नागरिक आहे. माझे ऐतिहासिक वाचन अफाट वगैरे नाही. लहान होते त्यावेळी मला छावा, स्वामी वगैरे कादंबऱ्या अतिशय आवडत असत. ना. स. इनामदार ह्यांच्या कादंबऱ्या माझ्या संग्रही देखील मी त्यावेळेपासून ठेवलेल्या आहेत.
संजय लीला भन्साळीच्या अति सामान्य ताकदीनुसार बनवण्यात आलेल्या चित्रपटावर आधारित खालील लिखाण नाही. मात्र त्यातून सुरू झालेले वादंग वाचनात आल्याने मी बाजीराव पेशव्यांवरील माहितीपूर्ण पुस्तके (कादंबऱ्या नव्हेत) नक्कीच मागवली आहेत व वाचनास सुरवात देखील केलेली आहे.

आज अनेक वर्षांनंतर ह्या आधुनिक जगतात वावरत असताना मला एक प्रश्न पडला.

त्या प्रश्नाच्या पाठीमागे जी माहिती आहे ती ही अशी:

१. युद्धात मदत म्हणून छत्रसाल राजाने बाजीराव पेशव्यांना विनंती केली. (सत्य)
२. पेशवे आले आणि छत्रसाल राजावरचे संकट पळवून लावले. (सत्य)
३. हे करीत असता,
   अ) छत्रसाल राजाची अतिशय सुंदर, हुशार, विविध कलांमध्ये प्राविण्य असलेली सुकन्या मस्तानी पेशव्यांच्या प्रेमात पडली.
किंवा
    ब) शूर, रुबाबदार पेशवे मस्तानीच्या प्रेमात पडले.
किंवा
    क) बाजीराव व मस्तानी एकमेकांच्या प्रेमात पडले.
किंवा
   ड) पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे राज्याच्या भल्यासाठी विविध राज्यांत व हिंदू मुस्लिम विवाह लावून देणे घडत असे त्याप्रमाणे छत्रसाल राजाला देखील विविध धर्माच्या विविध बायका होत्या. त्यामुळे खुद्द छत्रसाल महाराजांना वाटले की 'माझ्या राज्याचे संरक्षणासाठी ह्या शूर योद्ध्याशी नाते जुळवणे मला अति गरजेचे आहे. व त्यामुळे माझी सुकन्या मस्तानी हिचा विवाह पेशव्यांशी मी लावून देणार आहे.' व त्यांच्या इच्छेप्रमाणे बाजीराव मस्तानीचा विवाह लावून देण्यात आला.

४. युद्ध आटपल्यावर पेशवे पुण्यास परतले. (सत्य)
  अ) त्यांनी येताना आपल्यासमवेत आपल्या नवपत्नीस आणले (छत्रसाल महाराजांनी त्यांचा विवाह लावून दिला होता हे इथे गृहीत आहे)
  ब) पेशवे पुण्यास परतले व त्यांच्यामागून त्यांच्या प्रेमात पडलेली मस्तानी देखील आली.
५. पुण्यात पेशव्यांच्या घरात त्यांच्या मातोश्रींनी, भावाने आणि बाहेर पुण्यातील ब्राम्हणांनी ह्या नात्यास प्रचंड विरोध केला. (सत्य)
६. बाजीराव मस्तानीला पुत्र झाला. सर्वांचा विरोध अधिकच बळावला.
७. अनेक प्रयत्न बाजीराव व मस्तानीने केले (गृहीत) परंतु त्यांच्या नात्याला समाजमान्यता मिळाली नाही.
८. वयाच्या चाळीशीत ह्या तरुण शूर योध्याचे निधन झाले.
 अ) हृदयाचा झटका
किंवा
  ब) उष्माघात
किंवा
  क) दारूचे व्यसन तू सोडलेस तर तुझ्या व मस्तानीच्या नात्याला मी परवानगी देईन असे त्यांच्या मातोश्रीने सांगितले व त्यामुळे दारूपान त्यांनी थांबवले. व त्यामुळे withdrawal Symptoms ला अनुसरून त्यांचा हा अकाली मृत्यू ओढवला.


संबंधित व्यक्तींनी ह्या नात्याविषयी केलेले विचार काय बरे असू शकतात ?

मस्तानी - 
मी एका पुण्याच्या ब्राम्हणाच्या तोही राज्याची धुरा वाहणाऱ्या अतिशय मोठ्या माणसाच्या प्रेमात पडले आहे. व त्या प्रेमामुळे मला त्याच्या सहवासात रहाणे ही मला त्याच्याविषयी वाटणाऱ्या गाढ प्रेमाची नितांत गरज आहे.

छत्रसाल - 
मी माझ्या राज्यात राजा आहे. आज माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मदतीला हा आला परंतु तसाच भविष्यकाळात देखील येईल ह्याचा काय भरवसा. तेव्हा पुढील संरक्षणासाठी ह्या शूर पेशव्याशी नाते जोडणे फार गरजेचे आहे. माझ्या मुलीचे मी ह्याच्याशी लग्न लावून देतो जेणेकरून पुढची चिंता कमी होईल. मुलीबरोबर इतर वैभव, गावे वगैरे तर आभारदर्शक म्हणून मी देईनच.

पेशवे -  
मी पेशवा आहे व माझ्या घरगुती, व सामाजिक जबाबदाऱ्या मी चोख पार पाडत आहे. तेव्हा मी एका यवनी स्त्रीशी विवाह केला तर त्याला समाजाचा व माझ्या घरच्यांचा विरोध का बरे करावा ? तेव्हा हे मी करणार आणि ते तुम्ही आनंदात स्वीकारा.

आता ह्या तीन व्यक्तींना हे प्रश्न पडले नाहीत काय ?


मस्तानी -
१) मी यवनी आहे. माझे व माझ्या प्रियकराचे लग्न हे पुण्यासारख्या शहरात मान्य होईल काय ?
२) हट्ट धरून वा माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले म्हणून मी पुण्यात गेलेच तर ज्याच्यावर माझे गाढ प्रेम आहे त्याचे त्यात भले आहे काय ?
३) त्याला होणाऱ्या मनस्तापामुळे त्याच्या राज्याचे नुकसान नाही होणार काय ?
४) मग मी आणि मला वाटणारे नितांत प्रेम ह्यात त्यागाच्या भावनेला प्राधान्य देऊन आहे तेथेच रहाणे हे सर्वांच्या व राज्याच्या देखील भल्याचे नाही काय ?

छत्रसाल -
१) माझी लेक अतिशय सुंदर, अतिशय हुशार, अतिशय शूर आहे. ब्राम्हण पेशव्याशी तिचे लग्न लावून देऊन त्याच्या पुण्यात पाठवले तर नक्की तिचे भले होणार आहे काय ?
२) पेशव्यांना त्यांच्याच माणसांकडून प्रचंड मनस्ताप होईल असे काहीतरी करून त्याने माझ्यावर केलेल्या उपकारांची फेड वाईट रीतीने मी का करावी ? मला इतकी साधी दूरदृष्टी नसावी ?

पेशवे -
मी ह्या नात्यातून नक्की काय साधतोय ? कोणाचे भले होणार आहे ? मस्तानीला होणाऱ्या पोराबाळांचे ? माझ्या राज्याचे ? माझी बायको काशी हिचे ? मी पेशवा आहे व माझ्यावर असंख्य जबाबदाऱ्या आहेत. मग मी हा हट्ट का धरावा ? आपण जे करीत आहोत त्याचे पुण्यात स्वागत होईल, आपल्या मातोश्री आपल्या ह्या कृत्याने खुश होतील व आपले बंधुराज आपले स्वागतच करतील असे पेशव्यांना वाटले होते काय ? आणि असे वाटले असेलही तर मग हा शूर योद्धा आपल्याच माणसांना ओळखू शकला नाही काय ?

आता माझा प्रश्न -

१. माणूस कितीही थोर असला तरीही घरीदारी होणारा प्रचंड विरोध त्याला मनस्ताप देणाराच ठरतो ह्यावर दुमत नसावे. व प्रचंड मनस्ताप आपले आयुष्य आखूड करतो हे देखील आपण जाणतोच.
२. प्रेमात कोणी कधी पडावे ह्यावर नियम नसतात. ते कधीही उगवू शकते.
३. वाटलेल्या प्रेमाला मी काय रूप द्यावयाचे आहे हा मात्र माझा निर्णय असू शकतो.

शाहू महाराज पेशव्यांचे महत्त्व जाणून होते. त्यामुळे त्यांनी बाजीराव मस्तानी नात्याला मान्यता दिलेली होती असे वाचनात आले. बाजीरावांकडून अजून बरेच काही घडू शकत होते.

वर उल्लेखलेल्या तीन व्यक्तींच्या एका हट्टापायी व दूरदृष्टी न ठेवता घेतलेल्या निर्णयापोटी राज्याचे कार्य अधुरे राहिले नाही काय ?


Friday, 23 October 2015

थोडा है थोडे कि जरुरत है…३

मंडळी,
आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम.

पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं.
म्हणजे शिक्षण.

दुसरं एका पाड्याच्या पाणी साठवणकरिता टाकीचे बांधकाम.
म्हणजे पाणीव्यवस्थापन.

आणि काल जे एक पाऊल टाकलं ते...मानसिक व शारीरिक अत्याचारातून गेलेल्या व नशीब बलवत्तर म्हणून 'मुक्ता बालिकाश्रम' येथे पोचलेल्या मुलींपाशी.
म्हणजे स्त्रीला सक्षम बनवण्यासाठी हातभार.

मंडळी,
आपण नक्की कुठे पैसे पाठवत आहोत व त्याचा विनियोग नक्की काय व कसा होणार आहे ह्याची माहिती, संबधित व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून त्यानंतर मदतीचा निर्णय  घेण्याचा आपला प्रयत्न कायम राहिला.

कमीतकमी शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर…
भयानक परिस्थितीतून बाहेर पडून इथे पोचलेल्या मुलीला फक्त खाऊपिऊ घालून 'मुक्ता बालिकाश्रम' थांबत नाही. अशा अनेक संस्था असतात ज्या सरकारकडून मिळणाऱ्या पैशासाठी वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मुलाना सांभाळतात व त्यानंतर बाहेर सोडून देतात. इथे तसे होत नाही.
मनावर झालेल्या आघातांची तीव्रता आपण देऊ केलेल्या प्रेमातून कमी करून, त्या आघातांवर मात करून, जगात ठामपणे मुलींना उभे करणे हे मुक्ता बालिकाश्रामाचे कार्य. आपण जसे आपल्या मुलांचा कल ओळखून त्याला/ तिला पुढील आयुष्यात आपल्या पायावर उभे रहाण्यास मदत करतो, अगदी त्याच विचाराने ही संस्था चालवली जाते. इथे स्त्रीला सक्षम बनवले जाते.

कोणाला चित्रकलेची आवड, कोणाला अभ्यासाची आवड, कोणाला बुद्धिबळाचे अंग, कोणाचा आवाज डबिंगमध्ये जोरकस. सहा मुलींची लग्न करून दिली गेली आहेत. एक बालिका MBA करून आज नोकरीला लागली आहे. संस्थेच्या कार्यात तिचा हातभार हा नियमित असतोच. दुसरी ब्युटीशियनचा कोर्स करून आज स्वत:चा LAPTOP हातात घेऊन स्वतंत्र व्यवसाय व्यवस्थित सांभाळते आहे. प्रत्येकीमागे मुक्ता बालिकाश्रम उभा राहिला आहे. मुली स्वत:ची आर्थिक काळजी घेऊ शकल्या आहेत. आणि बाहेर पडल्या म्हणून मागे असलेल्या आपल्या बहिणींना त्या विसरलेल्या नाहीत. आजही एकमेकींशी सतत संवाद साधत असतात.

२००५ पासून संस्था कार्यरत आहे.
आज आपण त्यांच्या ह्या कामात खारीचा वाटा उचलला आहे.
एकूण ८४००१/- आपण गोळा केले. काल त्यांच्याकडे आपण सर्व चेक्स सुपूर्त केले.
प्रत्येकाच्या नावाच्या रीसिटा आम्ही आणल्या आहेत.
८०G समवेत.

आणि हो !
एक सुंदर शुभेच्छापत्र व डोलणारे कानातले देखील मिळाले !














ह्या संस्थेबरोबर पुढील तीन वर्ष आपण काम करावयाचे आहे. आपण एक लक्षात ठेवायचे आहे. ते म्हणजे त्यांची गरज ही फक्त पैश्यांची नाही.
दिवाळीच्या सुट्टीत मुलींना इंग्रजी बोलणे शिकायचे आहे.
एका मुलीला UPSC ची परीक्षा द्यावयाची आहे.

गौरी बार्गी, नीता नायक, हेरंब ओक, सागर नेरकर, धुंडीराज सकपाळ , सचिन पाटील, भाग्यश्री सरदेसाई, अॅडव्होकेट राजीव फलटणकर, डॉ. कुंदाताई जोगळेकर, दीपक परुळेकर, हेमंत आडारकर, हिनल जाधव, सुचेता पोतनीस, सौरभ बोंगाळे आपण सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य हातात घेतलं आहे.
विश्वासाने पुढे जाऊ हे नक्की.

आज आपण पैसे दिले…कोणी वेळ देऊ शकत असेल तर बाहेरच्या जगात खंबीरपणे उभे रहाण्यासाठी आपल्या मुली शिकायला आनंदाने तयार आहेत !
:)














Tuesday, 16 June 2015

माझी मी...

हल्ली रडूबिडू येत नाही असं एक क्षण वाटतं…

आणि स्वत:बद्दल तशी खात्री होताहोता एखादा चित्रपट समोर येतो आणि अख्खं थेटर जिथे खदखदुन हसत असतं तेव्हा हमसाहमशी रडताना माझी मीच मला सापडते…

आणि मग काही कळेनासं होतं.

दुसऱ्यांना ओळखायचं राहिलं बाजूला, आपण स्वत:ला ओळखत नाही हेच खरं.
समोरच्याला ओळखणं थोडंफार जमू शकतं कारण आपल्या समोर ती व्यक्ती असते.
त्याचा/तिचा चेहरा, त्याचे/ तिचे शब्द आपल्या समोर कानात रुंजी घालत असतात. 
आपण त्याचं विश्लेषण करण्याचा निदान प्रयत्न करू शकतो.

पण आपला चेहरा हा नेहेमीच आपल्यापासून लपून बसलेला असतो.
आपले डोळे आपल्याशी तर कधी बोलत नाहीत.

आपणच आपला मेंदू कापून, चिरफाड वगैरे करून आपल्या समोर मांडला तर काही हाती लागण्याची शक्यता कमी आहे. तठस्थ रहाता आलं पाहिजे.

हे सगळं अर्थहीन विचारमंथन का बरं ?
सगळीकडे बांडगुळासारख्या फुटलेल्या झोपड्या बघून मी उद्गारले, "गरिबांबद्दलचा माझा कळवळा वगैरे आटला आहे  !"

आणि मग ?

मग काल तमिळ सिनेमा बघितला.
काका मुत्ताय ( उच्चार चुकला असण्याची शक्यता मोठी )
सिनेमागृह हसत होतं.
टाळ्या वाजवत होतं.

मी हमसाहमशी रडत होते.
हुंदके मला आवरत नव्हते.
ते काय ते काजळ वगैरे लावलं होतं ते बहुधा काळ्या ढगातून पाणी कोसळल्यावर ढग जसे विस्कटून जातात…तसंच झालं असणार.

त्या पिल्लुच्या थोबाडीत लगावली गेली...
...आणि माझी खुर्ची हादरली.
त्याचा तो एक अश्रू मला कोसळवून गेला.
वाटलं…. वाटलं ते पिल्लू माझ्या कुशीत हवं…

आता माझ्या घशाखाली कधीही पिझ्झा जाऊ शकत नाही.

मी मला ओळखत नाही...


Friday, 12 June 2015

भोग...

त्या थेंबाची गेल्या वर्षी जन्माला आलेली भावंडं नशीबवान होती म्हणायची.
ती मुक्त, मोठ्या ओढीने झेपावत. लाल मातीत मिसळून जात.
माती शहारे. थेंब आणि माती एकजीव, एकरूप होऊन जात.
त्यांचे ते मूक मिलन मला आनंद देऊन जाई.

परंतु…
आज ती माती राहिली नाही.
ओरबाडून टाकली गेली. होत्याची नव्हती झाली. 
सिमेंटची करडी, टणक जमीन आली.

वेडे थेंब मात्र त्याच ओढीने झेपावले.
जमिनीवर आदळले.
कपाळमोक्ष झाला.

कर्म कोणाचे…
भोग कोणाला…

आंधळे थेंब !


Friday, 24 April 2015

एक दिवस

खरं तर रोजच्यासारखा एक दिवस.
म्हणजे अगदी वाऱ्याची एक झुळूक आली.
आणि एक पिंपळ पान हललं.
मग दुसरी झुळूक आली.
आणि दुसरं पान हललं.
हा असा एक दिवस.
कालचा.

शहराच्या टोकावरचा समुद्रासमोर रस्त्याचा, अंधारा कोपरा.
एका लांबसडक गाडीच्या पाठीवर पहुडलेला एक कुत्रा.
आणि त्याच्या अंगावर अतीव ममत्वाने हळुवार हात फिरवणारा त्या गाडीचा तरुण मालक.
कुत्र्याचे अर्धोन्मिलित डोळे.
आणि तरुणाचा हलके स्मित फुटलेला चेहरा.
जलरंगाचाचा एक नाजूक ठिपका ओल्या कागदावर सोडून द्यावा.
आणि क्षणार्धात तो कागद पांढरा न रहाता त्या रंगाचा होऊन जावा.

स्पर्श.
 
परतीचा रस्ता.
समुद्राला डाव्या हाताला पकडून.

लांबसडक रस्ता रात्रीच्या अकरा वाजता एका रांगेत भरून गेलेला.
समुद्राकडे तोंड करून असंख्य माणसे. 
मी गाडीतून उतरले.
बघ्यांच्या गर्दीत शिरले.
खाली पसरलेल्या दगडांच्या विसाव्याला एक मृत शरीर आलं होतं.
कुठला माणूस ?
कुठला किनारा ?
आणि कुठले दगड !
त्या दगडांनी त्या माणसाचे मरणोत्तर वहावत जाणे थांबवले होते.
अर्धी चड्डी. 
उघडे शरीर.
फुगलेले. 
पोलिसांनी टाकलेल्या प्रकाशात स्पष्ट दिसणारे.
ओला मानवी देह.
पातळ हातमोज्यांमधले पोलिसांचे सुरक्षित हात.
मृत देहाचा स्पर्श मर्यादेत ठेवणारे.

स्पर्श.

"जरा बोटं मोड ना !" तू.
पायाची बोटं खेचली की हाडं वाजतात.
त्यातून तुला काय बरं वाटायचं कोण जाणे.
कधीकधी हातात नेलकटर घेऊन तुझी पायाची नखं एकाग्र चित्ताने कापणारी मी.
तो तुझ्या पायांचा स्पर्श.


आणि मग शरीर झाकलेल्या चादरीवरून, माझ्या हाताने चाचपडलेली तुझ्या पायाची बोटं.
परदेशातील पोलिसांसमोर.
'हा माझाच नवरा'…
संपूर्ण झाकलेले शरीर देखील माझ्या नवऱ्याचेच आहे असे सांगणाऱ्या कागदावर खात्रीपूर्वक सही करणारी मी.

आणि तीरपांगडा दिवस अंगावर झेलून, रात्रीच्या मिट्ट काळोखात पांढरेशुभ्र कुरमुरे एकेक करत तोंडात टाकणारी मी.



Monday, 16 March 2015

गुलाबी

चंदेरी गाडी घरून निघाली.
रस्त्यातलं ओळखीचं झाड कालपरवापर्यंत रिकामं झालं होतं.
पिंपळाचं.
आज त्यावर गुलाबी स्वप्न उगवली होती.
नाजूक.
सूर्य ती स्वप्न जपेल.
जोपासेल.
कधी ना कधी ती स्वप्न जून होतील.
सूर्य कठोर होईल.
स्वप्न उखडून टाकेल.
पुन्हा नवी स्वप्न उगवायला…
त्या झाडात तेव्हढी ताकद तरी शिल्लक राहील का ?

गाडी पुढे निघाली.
गल्लीत ती नटून उभी होती.
त्याच पिंपळी गुलाबी रंगाचं आवरण…
ओठांवर चढवून.
तो रंग ओरबाडून टाकणारा…
मात्र तिचं पोट भरणारा…
कोणी गिऱ्हाईक तिला आज मिळेल काय ?