नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 11 January 2016

फास

दडलेल्या गोष्टी अंधारच स्पष्ट दर्शवतो हेच खरे.

सूर्य कधीच दुबळा झाला होता.
पक्षी वगैरे आपापल्या घरी पोचले होते.
मनुष्य जात मात्र त्या हमरस्त्यावर आपापल्या वाहनावर स्वार होऊन परतीच्या रस्त्याला लागली होती.

त्याच जातीचा एक जीव; टांगणीला लागला होता.
आणि त्या जिवाच्या वतीने ती रुग्णवाहिका मदतीचा धावा करीत होती.
चार चाकी गाड्या हलकेच दूर पसरल्या. 
जसं वारूळ फिसकटावं व मुंग्या मूळ वाट सोडून दूर व्हाव्या.
वा वाऱ्याच्या झुळुकीने जेव्हा पान एक हलकी उडी घेतं तेव्हा त्यावर तरंगणारा एखादा ओघळ जसा फाटे फुटत विखरून जातो.
तसं काहीसं.

रुग्णवाहिका पुढे पुढे सरकत होती.
आत बसलेला यम, त्या जिवाच्या डोक्यापाशीच आपले पाय विसावून त्याच्या समोरच्या सिटवर आरामात विसावला होता. रुग्ण शुद्धीवर नव्हता. पण त्याच्याशी यमाला काय घेणं आणि काय देणं ? आपणच सगळं करावयाचं आहे व त्याशिवाय समोरचा साधा श्वास देखील घेऊ शकत नाही ही जाणीव नक्कीच एक बेदरकारपणा बहाल करीत असावी.

मार्ग काढीत काढीत वाहिनी डाव्या हाताला सरकली. कठड्याला दीड फुट जागा सोडून. चालकाच्या बाजूला बसलेल्या सहायकाने आपला डावा हात बाहेर काढला. मागून येणाऱ्या वाहनांना इशारा देण्यासाठी तो हात वरखाली होत होता. इशारा व विनंती.

दुचाकींची एक रांग डाव्या हाताने पुढे धावत होती. दीड फुटाची जागा पुढे सरकायला पुरेशी होती. शेवट नसलेली रांग. मारुतीचं शेपूट. वाहिनीच्या खिडकीतून बाहेर आलेला हात पुढे जाण्यासाठी विनंती करीत राहिला. आणि दुचाकी न थांबता पुढे जात राहिल्या. जसा काही तो हात अदृश्य होता. कोणालाच न दिसणारा.

आत यमाच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य होतं.
एकेक दुचाकी पुढे जात होती.
वाहिनी स्तब्ध उभी राहिली.
अविचल.
धावा चालू होता.
हात बाहेर लटकत होता.
"एकेक दुचाकी जसजशी पुढे जाईल तसतसा तुझ्या गळ्याभोवतालचा हा फास मी सुतासुताने आवळत जाणार आहे." तो त्याला म्हणाला.
एक.
दोन.
तीन.
चार.
पाच.
सहा.
बहिऱ्या दुचाक्या.
आंधळ्या दुचाक्या.
मुडद्या दुचाक्या.

शेवटचा झटका फासाचा.
माणुसकीच्या क्षीण मानेला बसला.

यम रुग्णवाहिनीतून बाहेर पडला.
दूरपर्यंत ऐकू येणारा धावा खटकन थांबला.
लटकता हात आत गेला.
वाहिनी थंडावली.
आता घाई नव्हती.
चालकाने सराईत गियर टाकला.
आत माणुसकीचं प्रेत वाहिकेच्या गतीबरोबर डूचमळलं.
तेव्हढीच प्रेताला हालचाल.


3 comments:

इंद्रधनु said...

:(

BinaryBandya™ said...

माणुसकीचं प्रेत :(
छान लिहिलंय.
रुग्णवाहिकेच्या मागे गाड्या पळवणारे लोक पण माणुसकीचा खूनच करत असतात (बहुतेक तुमची एक जुनी पोस्ट अशाच लोकांवर आहे)

Rajat Joshi said...

स्पर्श करुन जाणारं लेखन!