नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 22 March 2013

हट्ट

जिवंत असलेला माणूस आपली बाजू मांडू शकतो, मेलेला माणूस कुठून आणि कशी मांडणार ? स्वप्नातबिप्नात येऊन सांगून गेला तरी ते शेवटी एक स्वप्नच रहातं. त्यावर सर्वचजण विश्वास ठेवतील असे काही नाही.

हा विचार डोक्यात घेतला की बऱ्याच, किंबहुना बहुतांशी गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आत दाबून ठेवल्या जातात. परंतु, आज तो धोका पत्करून मी लिहिणार आहे कारण त्यातून कोणाच्या विचाराला, सुबुद्धीला चालना मिळाली तर कुठेतरी, कोणाचे तरी भलेच होईल.

अलंकारिक भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही ते आज कठीणच आहे.
रोखठोक. घटना जशा घडल्या तश्या.
त्यावर विशेष टिपणी न करता.

स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट ह्यावर शहाणा देखील काही करू शकत नाही म्हणतात. हट्ट म्हटले की त्या गोष्टीला आपोआपच एक नकारार्थी वलय प्राप्त होतं. आणि मग तो हट्ट नक्की कशासाठी केला गेला आहे त्याचा विसरच पडतो. म्हणजे एखाद्या बाबीचा हट्ट धरून त्यासाठी उपोषण केले तर मात्र ते चांगलेच. परंतु, घरात एखाद्या गोष्टीसाठी हट्ट  करणे, त्यासाठी अबोला, उपोषण हे मार्ग पत्करले तरीही ते ऐकलेच जातील असे नाही.

स्त्री हीच शेवटी स्त्रीची शत्रू असते.
"अनघाच्या हट्टी स्वभावामुळे शरदने दारू सोडली नाही" हे विधान शरद मरून गेल्यावर काही दिवसानंतर मी ऐकले. एका स्त्रीकडूनच.

आता "तू दारू सोड" हा हट्ट मी नक्की कधी, किती वेळा आणि काय प्रकारे केला हे आपण बघू. ती स्त्री काही हे वाचायला जाणार नाही आणि शरद आज हयात नसल्याने तो त्याची भूमिका मांडू शकत नाही. त्यामुळे रहाता राहिले मी...जी हे लिहित आहे. त्यामुळे जे काही बोलायचं आहे, किंवा तुम्हाला ह्यातील कोणताही मुद्दा पटला नाही तर तो तुम्हाला माझ्यासमोरच मांडणे भाग आहे. कोणी काही करू शकत नाही त्यावर.

हट्ट प्रसंग १.
माझे वय वर्षे सोळा. शरद अठरा. स्थळ: जे जे स्कूल ऑफ अप्लाईड आर्टचा परिसर.
"तू नको ना पिऊस दारू. नाही ती बरी. आणि मला नाही आवडत."
"सोडणार मी."

हट्ट प्रसंग २.
माझे वय तेवीस. त्याचे पंचवीस.
गणपतीचे दिवस. शरदाच्या जीवश्चकंठश्च्य मित्राकडे गणपती. स्थळ: त्यांचे घर. रात्रीचे आठ. आरती सुरू. शरद थोडा उशिरा हजर. दारू पिऊन तर्र. आरतीसाठी उभा.
रात्री उशिरा आम्ही आमच्या घरी परत.
"हे का केलंस तू ? दारू पिऊन आरती करत होतास !" मी. रडत. हुंदके वगैरे.
"रडू नको. सोडणार मी दारू." शरद.

हट्ट प्रसंग ३.
माझे वय सत्तावीस अठ्ठावीस. गणित मांडले तर शरद तीस. लग्न झालेले आहे. स्थळ: बाबांचे घर. जाहिरातक्षेत्रातील झगमगीत बक्षीस समारंभ. शरद दारू पिणार हे नक्की.
"प्लीज प्लीज आज तू नको पिऊस. आज आपण बाबांच्या घरी आहोत. बाबांच्या घरी दारू पिऊन तू नको येऊस. असं कोणी उभं पण रहात नाही बाबांसमोर दारू पिऊन."
रात्रीचे २. बेल वाजली. दार उघडले. दारुचा वास. दारात शरद उभा.

हट्ट प्रसंग ४.
माझे वय पस्तीसच्या आसपास. आमची लेक सात आठ.
स्थळ: शरदच्या मानलेल्या बहिणीचे घर. तिचा नवरा आणि शरद ह्यांच्या गप्पा रंगात. समोर दारूचे ग्लास. शरदचा रिकामा ग्लास बहिणीचा नवरा भरत असताना माझी लेक त्यांना म्हणाली," काका नका ना बाबाला दारू देऊ !"
काका," काही नाही होत बाळा."
दोन तासांनी आम्ही तिथून निघालो तेव्हा शरद दारू पिऊन तर्र. त्याला आम्ही मायलेकींनी मिळून गाडीत घातले. आणि घरी पोचलो.
हा झाला बालहट्ट.
हट्ट सोन्याचे ना कपडालत्त्याचे. दारू सोड हा हट्ट मी प्रेमात पडल्यापासून केला. आणि त्यावेळी...हो, सोडणार आहे...हो, लग्न झाल्यावर सोडणार आहे....हो, मूल झाल्यावर सोडणार आहे...हो, ती मोठी झाल्यावर सोडणार आहे....हेच ऐकायला मिळालेलं आहे.

बरोबर. त्याने मला सुरवातीपासून वचन दिलं. जेव्हा जमेल तेव्हा मी हे एकच मागितलं. आणि तो माझा हट्ट त्याच्यासाठी न पुरवता येण्यासारखा होता. बाकी मी काहीही मागितले असते तरी ते त्याने माझ्यासमोर उभे केले असते. अमेरिका ट्रिप ? हे घे तिकीट ?
सोनं ? ह्या घे जाडजूड बांगड्या.
शालू ? हा पहा भरजरी शालू !
पण मी एकच हट्ट धरून बसले.
"तू मला सांगितलं होतंस...दारू सोडशील म्हणून. मला नाही सहन होत हा वास."
"त्याला काही नाही करू शकत. तो तुला सहन करायलाच हवा."

कृतीतून त्याने पूर्ण करून दाखवलेला त्याचा हट्ट.
हट्टी शरद.
हट्टी मी.
"अनघाच्या हट्टी स्वभावामुळे शरदने दारू सोडली नाही."
तीच ती शरदाची बहिण, जिचा नवरा माझ्या चिमुकल्या लेकीचे देखील न मानता शरदच्या ग्लासात दारू ओतत होता.

दोन हट्टी माणसं एकत्र आली होती असं म्हणता येईल.
शरद, दिलेले वाचन पाळणारा राम नव्हता.
मी सीता होणे, असणे हा आपल्या समाजाचा कायम हट्ट असतो.
हट्टी यमराजाला झुकवणे सोप्पे असेल परंतु, हट्टी नवऱ्याला एखादी चांगली मागणी पुरी करण्यास भाग पाडणे मला जमले नाही. त्यामुळे मी सावित्री देखील नव्हते.
वाल्याच्या पापामध्ये सहभागी मित्रमंडळी होती.
जेव्हा पार्ट्या होत, शरद सगळ्यांची जाडजूड बिलं भरून, पिऊन घरी परते, त्यावेळी त्या घरी आम्ही दोघी होतो.
कधी त्याची वाट बघून झोपून गेलेली त्याची लेक. वा रात्रीबेरात्री गरमागरम जेवण वाढणारी मी.
परिस्थितीमुळे नवरा जिवंत असताना गळ्यातलं मंगळसूत्र विकायला काढणारी मी.
कलियुगातील अनघा.


15 comments:

इंद्रधनू said...

कोण चूक कोण बरोबर… कोण हट्टी कोण नाही … यापेक्षाही मला पडलेला वेगळाच प्रश्न म्हणजे तुम्ही इतकं प्रामाणिक कसं लिहू शकता? स्वत:बद्दलही आणि तुमच्या आयुष्यातल्या इतर व्यक्तींबद्दलही… खूप धाडसाचं आहे हे स्वत:चं आयुष्य उलगडून इतरांसमोर ठेवणं… त्यासाठी सलाम तुम्हाला

अनघा said...

इंद्रधनू, सरळ साधी गोष्ट आहे...माझ्या आयुष्यात असं काहीही घडलं नाही जे दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात घडत नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा...हे कधी होईल...तर पुढच्याने ती ठेच नक्की कशामुळे लागली आहे हे सांगितलं तर. त्यात मोठं झाकून ठेवण्यासारखं काही नाही. आणि स्वत:च्या दु:खाची शेखी मारण्यासारखे देखील काही नाही. हे सगळे मी माझ्या आयुष्यात घेतलेले धडे आहेत. ते फक्त झालेले प्रसंग म्हणून तुमच्यासमोर मांडते आहे. त्यात कुठलीही विशेष टिपणी न जोडण्याचा माझा प्रयत्न असतो. तो देखील नेहेमीच सफल होतो असं अजिबात नाही. त्यापुढे जाऊन हे देखील आहेच...उद्या कोणी विचारलं की म्हणजे हे लग्न ही चूक झाली का ? तर असं काहीही नाही. तो पुनर्जन्म वगैरे काही खरोखर असेलच तर त्याही जन्मात जाऊन मी त्याच्याशीच लग्न करेन. ( मात्र तो तयार होईल की नाही कोण जाणे ! :) ) जी काही मी घडले, स्वत:च्या पायांवर उभी राहू शकले ह्यात त्याचा फार मोठा वाटा आहे.परंतु सामान्य आयुष्यातील ह्या घटना, जश्या घडायच्या होत्या तश्या त्या घडल्या. हे इतकंच. मी काही चांगले हट्ट धरले होते मात्र पुरवण्याइतके महत्त्वाचे ते त्याला वाटले नाहीत. बाकी काही नाही.
मी आज लिहिलेलं वाचून तुला काही त्रास झाला असेल, तर मात्र क्षमस्व. तो उद्देश अजिबात नव्हता.

आणि हो....प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

anujnainmarathi said...

असा स्त्रीहट्ट करण्याची पाळी बाईवर आणणारा तो पुरुषहट्ट, असा कुठला शब्द नाही आपल्याकडे. कदाचित त्यात द्विरुक्ती होत असावी.

सीता-सावित्री वगैरे दूरच राहू देत.
बाई गं तुलाच शिरसाष्टांग नमस्कार...

aambat-god said...

अगदी पारदर्शी आणि प्रामाणिक लिखाण. लोक खूप लूजली कमेंट करतात...कुणाला ते अगदी लक्षात राहीलसं जिव्हारी लागून जातं!
आधीचे तुझे लेख वाचून जरा ’शिष्ट’ अशी प्रतिमा मनात तयार झाली होती...ती पूर्णच बदलली....अगदी जवळची मैत्रीण वाटू लागलीस तू या लेखाने!
शुभेच्छा!
अश्विनी.

अनघा said...

speechless................ असा वेडा हट्ट धरणारी तू आणि तुझा तो हट्ट धुडकावून टाकणारा तो … अशी हि जगातली एकमेव जोडी नाहीये … फक्त त्याच्यावर आकंठ प्रेम करत राहत असतानाही या गोष्टी मांडण्याचे तू मनात आणतेस म्हणून ते विशेष वाटते. अशीही एक अनघा आहे जी गेली कित्येक वर्षे त्याला विचारते " एक सांग … मरताना जर मी तुला "दारू सोड" हे मागणे मागितले तर तरी तू ती सोडशील का?" किंवा " जर जगात "ती किंवा मी" असे दोनच शेवटचे पर्याय तुझ्या समोर राहिले तर तू "तिला" जवळ ठेवशील आणि मला सोडून देशील हो ना?" काही उपयोग होत नाही …. तरीही आशा सुटत नाही.

इंद्रधनू said...

अवांतर: अनघाताई, त्रास आजिबातच नाही हो… जे वाटलं ते सांगितलं फक्त तुम्हाला :)

Gouri said...

अनघा,

काय प्रतिक्रिया देऊ ते समजत नाहीये.

हे सगळंच सीता आणि सावित्रीसाठी आऊट ऑफ सिलॅबस आहे बरं! हे प्रश्न त्यांच्या पेपरमध्ये नव्हते. :)

हे इतक्या नेमकेपणाने पब्लिक ब्लॉगवर मांडणं फार अवघड वाटतं मला. तू हे सहज लिहून जातेस!

अनघा said...

अनुजा हे भारी आवडलं मला ! पुरुषहट्ट ! खरं तर त्यांचेच हट्ट पुरवता पुरवता आयुष्य कधी आणि कसं संपून गेलं हे कळत देखील नाही !

अनघा said...

अश्विनी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! शिष्ट वाटले मी तुला ? मी जरा परत मागे जाऊन बघितलं की काय वाचून तुला मी शिष्ट वाटले असेन ?! :D
आणि तुला देखील शुभेच्छा गं. :)

अनघा said...

अनघा, अशी अनेक जोडपी असतात. हे मी फार जबाबदारीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लिहिले त्यालाही सबळ कारण आहे. वाचणाऱ्या स्त्रिया असतात तसेच पुरुष देखील असतात. मला समाजाच्या ह्या दोन्ही घटकांसमोर हे सत्य मांडायचे होते. कारण नवऱ्याने बायकोला सांगितलेले व बायकोने नवऱ्याला सांगितलेले किती प्रमाणात ऐकले जाते ह्याचा मला अनुभव आहे. इथे सगळ्यांसाठी मी एक 'तिसरी व्यक्ती' असते, जिच्या आयुष्यात हे सर्व घडून गेले आहे. आणि तरी माझ्या बाबांच्या आशिर्वादाने मी खंबीर उभी आहे. वाचकाला विचारांस प्रवृत्त करण्याची माझी एकमेव इच्छा होती. मला आशा आहे की तसे घडले असेल.
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

अनघा said...

इंद्रधनू, तसे नेहेमीच करत जा....वाचून जे मनात येईल ते नक्की सांगत जा. :)

अनघा said...

गौरे, मी पुस्तक लिहिलं तर कोणी वाचेल ह्याची खात्री नाही ना ! म्हणून इथे लिहिते ! ;) :)

आयुष्य खूप गुंतागुंतीचं गेलं...लिहायला घेतलं की तो गुंता कधीकधी हलकेच सुटत जातो...तोच एक प्रयत्न...बाकी काही नाही. :)

सौरभ said...

शहाण्यास शब्दाचा मार. हे वाचुन आपल्या माणसांच्या अट्टहासाचा योग्य विचार तरी होईल. :)

Trupti said...

निशब्द..
इथे पण relate hotey post.fakt hatt vegala
manale tula

BinaryBandya™ said...

स्वत:चं आयुष्य इतरांसमोर उलगडून ठेवणं फार अवघड असतं.
Great :)