नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 23 February 2011

इस शहर में...

गेला शनिवार कुतूब शहाच्या शहरी गेला. आंध्र प्रदेशाची राजधानी. हैदराबाद. पहाटे आकाशात तरंगायला सुरुवात केली साडे सातच्या सुमारास पाय तिथे टेकवले. मी माझा कॉपिरायटर मित्र. एक भेट ठरवलेली होती....पोटापाण्यासाठी. आधीही एकदा गेले होते त्यामुळे अतिशय सुंदर, एखाद्या परदेशीय विमानतळाच्या बरोबरीचा हैदराबाद विमानतळ बघितलेला होता. अभिमान, वाटावा असा. बाहेर झकासशी बस, शहरात शिरण्यासाठी. रिक्षांना, टॅक्स्यांना आसपास प्रवेश मनाई. लांबसडक गुळगुळीत रस्ते, फुलझाडांनी सुशोभित. हल्ली आपण फक्त परदेशीय फुलझाडे लावतो, मूळ भारतीय वृक्ष लावणे आपण बंदच केलेले आहे. हे वृक्ष तोडायचे आणि त्यांचा वारसा चालू राहील असे देखील काही करायचे नाही. म्हणजे दुबईचा विमानतळ देखील हल्ली ठिबकसिंचनाच्या मदतीने असाच कायम फुललेला दिसतो. अगदी हीच फुले आणि हीच पाने. इथे पक्कं भारतीय असं साधं एक पान देखील शोधून सापडलं नाही. एकूणच परदेशी आल्याचा एक भास, दूर शहरात शिरेपर्यंत कायम.

जवळजवळ एका तासाच्या प्रवासानंतर पोचलो हैदराबादच्या जुळ्या भावंडाकडे...सिकंदराबादमध्ये.
भेट संपेपर्यंत दुपार झाली होती. मग पोटपूजा. परतीचा प्रवास उशिराचा होता. आता वेळ काढणे आले. मग केली एक रिक्षा आणि चालकाला सांगितले पुढचे तास दोन तास फक्त शहर दाखवायचे.

कुतूब शहाने उभारलेले शहर...म्हणे एके काळी भारतातील सर्वात श्रीमंत शहर. आम्ही आधी शिरलो जुन्या शहरात. चारमिनार. शोधली इथे तिथे विखुरलेली ती लपून बसलेली प्राचीन श्रीमंती. कधी कुठे एखादा सज्जा, तर कधी एखादा खांब, एखादी खिडकी वा खिडकीची हिरवीजर्द फुटकी काच. शहराचे वेगळेपण पूर्ण धूळकटलेले. आणि बाकी आकाशातून लटकलेल्या विजेच्या वायरी, अस्ताव्यस्त. बारकाईने पाहिले तर त्याच काळ्या वायरींच्या मागे कदाचित लपलेले दिसेल एखादं नाजूक नक्षीकाम. हे असेच काहीसे मला जुन्या नाशकात फिरताना वाटले होते. कळकटलेल्या इमारती, इथे तिथे चिकटवलेली भित्तीपत्रके...नेत्यांची...नटनट्यांची. आंध्र सिनेमांची ही भित्तीपत्रके, चंट भडक. त्यांची त्यांची एक शैली राखून. डिझायनिं अगदी हॉलीवूड धर्तीवर. स्त्रियांसाठीचा बाजार...चमचमता...आणि फिरत्या काळ्या गोष्यातील स्त्रिया. त्यातून कोणाचा हात दिसलाच तर दिसाव्या त्या चमकत्या बांगड्या, आणि पायाकडे नजर टाकली तर गोऱ्या पायातील पादत्राण एखादा तारा चमकवून जावं.

ठीक...एक भारतीय पाचशे वर्ष जुनं शहर...काळाचा पडदा विरविरीत नाही तर अगदी जाड गोणपाटासारखा...

पुढे श्रीमान अझरुद्दीनची बंजारा टेकडी. बंजारा तलाव. सुंदर शांत. काठाशी लटकलेले पुढारी मात्र नजरेला शांतता नाही लाभू देत...आत तळ्यात शांत उभा बुद्ध. थोडा धूसर...बाकी शहर इतर भारतीय शहरांहून काय वेगळे? तेच ते देशी परदेशी मोठमोठे ब्रँण्ड सर्वत्र उभे. इमारती अश्या बांधलेल्या की आपल्यात कधी सौंदर्यदृष्टी होती ह्याबद्दल शंकाच यावी. अतिशय वाईट...सौंदर्याचे बारा वाजलेले. प्रश्र्न पडतो...कोण ह्यांना आर्किटेक्ट बनवतो...कुठून आणि का ह्यांना पदव्या मिळतात...हे का आपली नसलेली डोकी चालवतात... का ही अशी आता पुढे वर्षानुवर्ष बघावी लागणारी ओबढधोबढ बांधकामे करतात! सापासारखा पसरलेला फ्ल्यायओव्हर. वर त्याखाली जाडजूड खांबावर डकवलेली पत्रके. कुठे खरवडलेली...कुठे अगदी शाबूत. एकजात सगळे खांब हे असेच किळसवाणे...बरबटलेले.

ठीक...एक भारतीय प्रगत शहर...प्रगत भारतीयांनी उभारलेलं...वेडंविद्र.

....रात्रीच्या काळोखातील माझी निद्रानाश झालेली मुंबई...पुढारलेली....दुसऱ्यांच्या पापापोटी स्वत:चे व्यक्तिमत्व हरवून बसलेली.

कोण जाणे का...भारताच्या नवशृंगार करून बेढब दिसणाऱ्या ह्या शहरांपुढे कुठे कोपऱ्यात माडांखाली लपलेले, चार माणसांचे एखादे गावच शोधावेसे वाटते...कधी वाटतं, सायकल काढावी, एखादं वळण घ्यावं, पाय मारत मारत सिमेंटच्या ह्या करड्या रानातून कुठे निघून जावं...जिथे किनारा सापडेल...जिथे आसरा मिळेल...
माणसाला नाही तरी जास्तीतजास्त सहा फूट जागा लागते...मग आत्मा जी काय अवकाशात जागा व्यापेल ती आणि तेव्हढीच मालकीची...
28 comments:

Gouri said...

ह्म्म. या सगळ्या कुरूपतेचा स्पर्श न झालेलं गाव सद्ध्या भारतात तुला कुठे सापडणार बयो? छोट्या, एकेकाळी टुमदार असणार्‍या गावात सुध्दा वेडीवाकडी तोडलेली झाडं, सगळीकडे लावलेले बटबटीत फ्लेक्स आणि जाहिराती, आणि केबलची, विजेच्या तारांवर लावलेल्या ‘आकड्यांची’ कोळीष्टकं दिसणारच की ग.

हेरंब said...

पोस्ट पटली. पण तरीही सांगतो हैद्राबाद दोन तासात फिरायचं शहर नाही. जाऊन मस्त वर्षं दोन वर्षं राहून ये आणि मग बघ कशी प्रेमात पडशील हैद्राबादच्या.. माझं हैद्राबादवर निस्सीम प्रेम आहे.... मुंबई आणि न्यूयॉर्कइतकंच !!!!!

सौरभ said...

life मै change मांग्ता मड्डमजी :D

THE PROPHET said...

शहरांची शोकांतिका हीच...
आपलं म्हणणारं अन समजणारं कुणीच नाही! :(
माझी मुंबईही तशीच! :(

भानस said...

खूप खूप वर्षांपूर्वी या दोन्ही शहरांना भेट दिली होती. आजही ती स्मरणात आहे. लवकरच पुन्हा भेट देण्याचा विचार करत होते पण आता राहूच दे! उगाच जुन्या स्मृतींना सोसायचे नाही.

राखेला तर तितकीही लागत नाहीच. आणि बरोबर काहीही नेताही येत नाही... पण, नेमका याचाच विसर आपल्याला पडतो...

अनघा said...

हो ना गौरी?! :( पण मग हे असं सगळं हळू हळू अधिकाधिक कुरूपच होत जाणार नं? :(

अनघा said...

हेरंब बुवा, आपण रहात होता वाटतं काही वर्ष निजामाच्या शहरात? मग हे असं होतं...आंधळं प्रेम! :p

आणि नक्कीच, मनात घर करतील अश्या आठवणी असतीलच...काही शहराच्या तर काही त्यावेळी आपल्या बरोबर असलेल्या माणसांच्या... :)
प्रतिक्रियेबद्दल आभार रे... :)

panda said...

अतिशय सुरेख वर्णन !!! जुन्या शहराची मज्जा काही औरच आहे. कित्येक weekends खुळ्यासारखे फिरलोय....शहराचा आस्वाद घेत, मग ते "चार मिनार" जवळची "ईराणी चाय" असो किंवा "मोजामजाही मार्केट" चे प्रसिद्ध "Ice-cream". दोन तास रिक्षामध्ये फिरून ही गंमत नाही कळायची.
हैद्राबाद च्या सर्व आठवणी उजळून निघाल्या. धन्यवाद !!!

अनघा said...

सौरभ, change is good...परंतु, तो सुंदर असेल तर बरं नाही का होणार? कारण हा चेंज आता पुढे शेकडो वर्ष रहाणार आहे....मग आज आपण जसे जुनी बांधकाम बघून हरखून जातो, तसं पुढील पिढ्यांसाठी काय सोडणार आहोत आपण?

अनघा said...

विद्याधर, हळूहळू काय होणार आहे काही समजत नाही... :(

अनघा said...

खरं आहे भाग्यश्री....

हे मोकाट सुटलेले आपले पुढारी आणि बिल्डर बघून कळत नाही की ह्यांच्यावर ना कोणाचाच ताबा..मग हे असं सगळं विद्रूप करून जाणार....आणि हे ह्या शहरांसाठी कायमच रहाणार ना?! वाट लावतायत सगळ्याची!:(

आभार गं...

अनघा said...

पंकज, इराणी चहा मात्र प्यायला हा आम्ही. :)
आणि खरं आहे काही तासांमध्ये नाही कल्पना यायची. पण माझ्या ह्या मुंबईचा पण आत्मा हळूहळू धूसर होताना दिसतोय ना दिवसागणिक...! :(
आभार रे प्रतिक्रियेबद्दल.

श्रीराज said...

अनघा, असं असलं तरी प्रवास करणं थांबवू नकोस...

गौरीच्या प्रतिक्रियेवरून आठवलं, गेल्या महिन्यात राजापूरला गेलेलो.. काय सुंदर गावं आहेत गं तिकडची... उंचच उंच पोफळींची झाडं, शांत वाहणारे ओढे... खूप मज्जा आली बघ!!!

सुहास झेले said...

शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली आपली शहर सुटणार नाहीत... मी पण विचार करतोय काही वर्षांनी गावालाच स्थायिक व्हाव हे सगळ सोडून...

अनघा said...

ते तर नाहीच थांबणार श्रीराज.
पण बघ, शेवटी गावंच सुंदर वाटतात नं...पण आता गावी पण हे फ्लेक्सबिक्स पोचल्याने तीही आता काही फारशी सुरक्षित राहिलेली नाहीत. व तिथेही सिमेंटचे आक्रमण सुरु झालेलेच आहे...त्यांच्यासाठी तर ती प्रगतीच आहे. नाही का?

अनघा said...

हो ना सुहास?! माझेही विचार त्याच दिशेने चालू आहेत!! :)

आभार रे प्रतिक्रियेबद्दल.

Raindrop said...

har shahar ka yahi haal...
barason ki puti deewarein,
pad rahin hain feeki
saal dar saal....

Pankaj - भटकंती Unlimited said...

सह्याद्रीच्या अनवट वाटा तुडवा. रात्री अपरात्री अमावस्येला मोहरीचे पठार करा. सकाळी तोरण्यावरुन राजगड्याच्या माथ्यावर सूर्योदय पहा, त्याच संध्याकाळी राजगडावर जाऊन तोरण्याच्या माथ्यावर सूर्यास्त पहा. मालवणाक जावा. तयच्या दर्याचा खारा वारा पेवा. चांदीची म्हावरं खावा. सांच्याला निवांत समुद्राची गाज ऐका. नाक्याच्या मंदिराची घंटा ऐका. रात्री उशिरापर्यंत दशावतार पहा. कुठलाच रिक्षावाला लागणार नाही. कुठल्याच तारा दिसणार नाहीत.

अनघा said...

ह्म्म्म. खरं आहे तुझं पंकज...
आभार हं सुंदर प्रतिक्रियेबद्दल! :)

अनघा said...

बढिया वंदू!
:)

Yogesh said...

>>कोण ह्यांना आर्किटेक्ट बनवतो...

या लोकांशी माझा २४X७ संबंध असतो....१० मधील ९ जण हे होपलेस असतात....काही नसल तरी अ‍ॅटिट्युड हा ठासुन भरलेला असतो...जाउ दे त्यावर लिहायच झाल तर एक भली मोठी पोस्ट होइल.

विकासाच्या नावाखाली वाटोळ केल आहे.सगळच बदलत चालल आहे :(

अनघा said...

ओह! हो का योगेश? म्हणजे हा तुझा रोजचा मनस्ताप असेल! :(
कसला धरबंधच नाही राहिलेला ह्यांना!

sanket said...

छान विषय ! मलासुद्धा हाच प्रश्न पडतो कधीकधी. इक्डे पुण्याततर विकासाच्या नावावर जी निसर्गाची कत्तल चाललीए ती बघून डोके फ़िरते.असा सुंदर निसर्ग दिलाय पुण्याला आणि डोंगर पोखरून टॉवर उभारत आहेत.
टाऊन प्लानिंगची कल्पनाच नाही यांनी आणि सौंदर्यदृष्टी तर नाहीच नाही.
जुने ते टिकवतापण येत नाही यांना ,ही त्यातल्यात्यात अजून एक खेदाची बाब.

अनघा said...

काय होणार आहे मग हळूहळू? एकेक शहर...एकेक गाव....
एखादी सुंदर, सात्विक स्त्री....एकामागून एक अत्याचारांपायी हताश व हतबल झालेली...आणि आपण फक्त बघे...
:(

संकेत, आभार प्रतिक्रियेबद्दल.

आनंद पत्रे said...

छान लिहिलंय..
तरीही हैदराबाद आवडतं शहर आहे...

अनघा said...

खरं आहे आनंद... आपल्या शहराबद्दल आपल्याला प्रेम हे असतंच...आणि त्या प्रेमातूनच मग हे जे सध्या विद्रूपीकरण होत आहे त्याचं दु:ख होतं...जसं मला माझ्या मुंबईबद्दल होतं.

आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

रोहन चौधरी ... said...

अनघा... हैद्राबादचे जुने नाव भाग्यनगर.. ते काही कुतुबशाहने वसवले नाही... त्या आधीपासून आहे ते. हा त्याला नवा साज चढवला असेल त्या शाहीत...
मला हैद्राबाद म्हटले की आठवते ती शिवरायांची दक्षिण मोहीम आणि त्यांचे हैद्राबाद मध्ये झालेले स्वागत... मला जायचंय कधीतरी... त्याच वाटेने भाग्यनगरला गोअळकोंडा बघायला..

अनघा said...

हो का रोहन ? नव्हतं हे माहिती... ह्या माहितीबद्दल आभार. :)