नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 28 February 2011

नाती व चव्हाटा.

आज चव्हाट्यावरच मांडायचं ठरवलंय...
उगीच नाही...गरज दिसली म्हणून.

प्रसंग एक.
"मामा, आज ह्या घराची पुर्नबांधणी होणार आहे...मग तू तुझ्या भावंडांबद्दल काय ठरवलं आहेस?"
"तू कोण मला विचारणारी? निघ! निघ इथून!"
"आई सध्या अमेरिकेत आहे. तिच्या सांगण्यावरून हे मी तुला विचारतेय. आणि तुझा गैरसमज होतोय मामा. मी तुझ्या घरात उभी नाही. मी माझ्या आजीआजोबांच्या घरात उभी आहे. ज्या घरावर माझ्या आईचाही तितकाच हक्क आहे, जितका तुझा आहे."
"चालती होतेस की धक्के मारून बाहेर काढू तुला!"

हे घर दादरमधील. जवळजवळ १२०० स्क़े.फीट. एक बंगला. त्यातील तळमजला माझ्या आजोबांनी भाड्याने घेतलेला. ज्यावेळी हा माझा धाकटा मामा जन्माला होता की नाही हीच शंका. ३ मुलगे, पाच मुली असा पूर्वी चालून जाणारा, आजीआजोबांचा मोठा परिवार. त्या त्या वेळी घरातील मोठ्या व्यक्तींनी अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा वा आपल्या माणसांवरील अवाजवी विश्वासामुळे म्हणा, कायद्याची मदत घेतलेली नाही. मुलींची लग्न झाली. मुलगे आपापल्या व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थाईक झाले. मग घरात राहिला कोण...तर धाकटा मामा. मध्यंतरीच्या काळात मोठ्या मामाने परत येण्याची इच्छा दर्शवली, पत्राद्वारे. परंतु त्या पत्रांना कचऱ्याचा डबा दिसला. त्यांना कधीही प्रत्युत्तर मिळाले नाही. प्रत्येक भावंडं आपापल्या संसाराचं रहाटगाडगं चालवत राहिलं...आपापल्या कुवतीनुसार. कित्येक रक्षाबंधने आली, कित्येक भाऊबिजी गेल्या. मामाने सहकुटूंब बहिणींकडे जेवणे झोडली. (हो. आता वेळच अशी आली आहे की त्या आनंददायी क्षणांचा हिशोब काढावा) मग आता काय झाले? काय बिघडले?

आमचे वकील म्हणतात...हा दादरमध्ये जागा असण्याचा तोटा आहे. जागा आणि नाती....जागांच्या भावांचा आलेख चढता आणि नातीगोती? आलेख उतरता...अगदी रसातळाला.

मामाने आता मुंबई कोर्टाला काय सांगितले?...बहिणींची लग्ने होऊन त्या दुसऱ्या घरी गेल्या...आता त्यांचा ह्या जागेशी काय संबंध?
...पुढे काय? पुढे फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.

प्रसंग २.
"आमची अहमदाबादमध्ये मोठी जागा आहे. आम्ही दोघे भाऊ. आणि आम्हांला एक बहिण आहे."
"मग?"
"म्हणजे तुला म्हणायचंय की आमच्या लग्न झालेल्या बहिणीचा देखील त्या जागेवर आमच्या इतकाच हक्क आहे?!"
"अर्थात! भारतीय कायद्यातील सुधारणेनुसार आता वारसाहक्काने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मुलाइतकाच मुलीचाही अधिकार आहे!"
"ह्म्म्म"
"नाहीतर त्याच न्यायाने तुला आज एक मुलगी आहे आणि दोन मुलगे आहेत. मग उद्या तुझ्या मुलांनी तुझ्या लाडक्या लेकीचा हक्क नाकारला तर चालेल काय तुला?"
वरील संवाद मी व माझा एक जुना मित्र यांमधील.

प्रसंग ३.
"ताईचं लग्न झालं यार! ती गेली अमेरिकेला! आता तिचा काय हक्क ह्या घरावर?"
"का म्हणून? हे घर तिच्या आईवडिलांचं आहे...मग तिचा वारसा हक्क का नाही लागू होणार इथे?"
...पुढे काय? फक्त वाद आणि भांडण.
परिणाम? मनं दुखावणे...रक्ताची नाती दुरावणे.

प्रसंग ४.
एका इस्टेटीचे भागीदार किती?
५७!
चार बहिणी. पाच भाऊ. एका जोडप्याच्या मूळ वृक्षाच्या ह्या ५७ फांद्या.
भागीदारीची वेळ आली. त्यातील काही भाऊ व बहिणी हयात नाहीत. तरी देखील, जी वाटणी झाली तिचे पूर्णपणे ५७ भाग झाले. आपापसात ते वाटून घेतले गेले...नाती पुढे चालू राहिली. आनंद दिवसागणिक द्विगुणीत झाला...कसलेही गालबोट न लागता.

नाती महत्वाची.
आहेत ना? आपली मुले...गुण्यागोविंदाने, एकमेकांना धरून पुढे जावीत...असं मनापासून वाटतं ना?
आपला भाऊ, आपली बहिण...जसे आपण एकत्र लहानाचे मोठे झालो...तसेच आता आयुष्यात येणाऱ्या बऱ्या व वाईट प्रसंगांना एकत्रित सामोरे जावे, अशीच भावना आहे ना?
कोर्टाची पायरी चढावी लागू नये असेच वाटते ना?
मग, मी माझे इच्छापत्र तयार केले ह्याचा अर्थ माझा माझ्या मुलांवर अविश्वास आहे, असा का होतो?
ह्या उलट, माझे माझ्या मुलांवर जीवापाड प्रेम आहे...आपापसात बेबनाव न होता, त्यांनी आयुष्यात एकमेकांना धरून राहावे असेच मला वाटते आणि म्हणून मी माझे इच्छापत्र तयार करून ठेवेन, असा नाही का होत?
म्हणजेच माझ्या प्रेमाला, कायद्याची जोड देऊन ते प्रेम मी अधिक दृढ नाही का करत?

इथे मी माझ्या आदरणीय आजोबांना अपराधी ठरवत आहे काय? त्यावेळी ह्या गोष्टी इतक्या सहज आणि सोप्प्या नव्हत्या हे मला लक्षात घेतलेच पाहिजे. त्यांचे मरण आले अकस्मात. परंतु कोणीच कधीही कायद्याचे भान न ठेवल्याने आता एक कुटुंब वृक्षच मुळापासून उखडला गेला. मनं दुखावली...वर्षानुवर्षे जे आनंदाचे क्षण एकत्रित अनुभवले होते, ते सर्व खोटे ठरले...दांभिकता बाहेर आली. वरून रसरशीत दिसणारं सोनेरी सफरचंद...आत पूर्ण किडकं निघालं.

आजही माझे समकालीन देखील तसाच चुकीचा विचार करताना दिसतात. म्हणून ही सुचनेची घंटा.

माझा धडा मी अतिशय दु:खदरित्या, अपमानकारकरित्या घेतला. आजही दर महिन्याला 'तारीख पे तारीख' गेली की जखम अधिकाधिक खोलच होते. जसं कोणी ड्रील मशीन चालवावे.

...म्हणून आणली आज नाती...
चव्हाट्यावर.

Saturday, 26 February 2011

कि की की?

मी गोंधळले होते. मी उजवी की डावरी? म्हणजे गेलं जवजवळ एक वर्ष मला दोन्ही बाजूने कामाला जुंलं गेलं. तक्रार आहे ही माझी. कोणाकडे? ते नाही माहित. पण आहे...आणि तक्रार करून ठेवलेली बरी, म्हणून सांगतेय. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला. म्हणजे मला जिने असं ठेवलं, तिला तर वाटत होतं की मी मुळी उजवी आणि डावरी...दोन्ही आहे. म्हणजे तेच ते...अँबीडेक्सट्रस. म्हणून मग केलं मला...कधी डावरं तर कधी उजवं! आणि मला बोलता येत नाही. त्यामुळे जसं मला ठेवलं गेलं तशीच मी बसले. कधी डावरी कधी उजवी! वैताग यायचा! एक वर्ष हे मी सहन केलं! कोणीही ह्याबद्दल काहीही केलं नाही. बघणारे बघत राहिले. मनोमन हसत राहिले. पण केलं मात्र काही नाही! मग काय? मी काय करणार बिचारी? मुकी!

पण दिवस बदलले! कसे कोण जाणे पण माझे दिवस बदलले! ही जी बाई आहे ना...हा असा माझ्या आयुष्यात गोंधळ घालणारी...तिला शेवटी एकदाचे कळून चुकले! कसे देव जाणे! आणि आपल्याला ते काय करायचंय? नाही का? शेवटी आपण झालं काय ते बघायला हवं! ते का झालं आणि कसं झालं त्यात पडू नये! ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड!

तर एके दिवशी ही बाई मला समोर घेऊन बसली! आणि मी म्हणजे काही एक दोन नाही...अहो, मी म्हणजे जवळजवळ आठशे तरी आहे...म्हणजे हिच्या जवळ मी निदान तेव्हढी तरी आहेच! तर जवळजवळ तीन दिवस ही स्वत:ची चूक सुधारत बसली होती! हे तरी तुम्ही मान्य केलंच पाहिजे! एकदा चूक कळल्यावर ती अगदी पार पहिल्या दिवसावरच पोचली! चूक सुधारायला! म्हणजे अगदी आरंभापासून इतिपर्यंत तिने मला सुधारलं. सगळीकडे उजवं केलं. म्हणजे काय केलं? अहो मी सर्वात उजवीच आहे! कळलं का तुम्हांला? अजून नाहीच का कळलं? कम्मालेय!

अहो, मी म्हणजे 'की'!
म्हणजे तुम्हीं जेव्हा मराठी लिहिता, त्यावेळी बरेचदा तुम्हीं मला वापरता...म्हणजे समजा तुमचं वाक्य आहे...मी असं म्हणालो 'की'...मी असं ऐकलं 'की'.....
ती मी 'की'!! आता तरी कळलं?

तर, गेलं वर्षभर ह्या अनघाबाई मला कधी ऱ्हस्व (हे जोडाक्षर नीट टाईप होतच नाहीये! पंधरा मिनिटं घालवली मी त्यावर!) तर कधी दीर्घ करून ठेवत होत्या! म्हणजे कधी 'की, तर कधी 'कि'! आणि बिचारी मुकी मी! मी काय करणार? बसले चरफडत! म्हणजे तिच्या एका पोस्ट मधील हे वाक्यच घ्या...'पण जर देवाला वाटतंय कि मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...' ह्यातील 'कि' दिसला? असा होता! आता नका अगदी मुद्दाम जाऊन बघू! बाईंनी केलंय आता मला दुरुस्त!

आता विचारा, कशा काय सुधारल्या ह्या बाई! अहो, अमेरिकेहून सांगावा धाडला गेला! अगदी पत्रच आलं म्हणे! मॅडमच्या मैत्रिणीने वाचवलं शेवटी! अपर्णा! ओळखता ना तिला? तिचं पत्र आलं! सक्काळी सक्काळी! मोठ्या एक पोस्ट तयार करून घेऊन आल्या होत्या....गरमागरम! हापिसात! आधी पत्रपेटी उघडली तर तिथे हे प्रेमपत्र! मग काय? बालमोहनच्या ना बाई?! पायाखालची जमीन सरकली! हापिसात तर बाईंचा शब्दकोश नव्हता हाताशी! गोंधळल्या! मग लावला त्यांनी त्यांच्या आदरणीय गुप्ते सरांना फोन!
"सर!"
"अरे व्वा! आज सकाळी सकाळीच कशी म्हाताऱ्याची आठवण झाली?!"
"काय हो सर!!?"
"अगं, गंमत केली! बोल बोल! काय झालं?"
"सर...आपण बोलतो ना...की मी असं म्हणतेय की...त्यातील 'की' आपण लिहिताना दीर्घ लिहितो की ऱ्हस्व?"
"दीर्घ! आमच्या वेळी तर त्यावर एक अनुस्वार पण असे आणि पुढे एक स्वल्पविराम. पण हल्ली अनुस्वार कमी केल्याकारणाने आता फक्त दीर्घ की लिहिला जातो! पण आता तुला का हा प्रश्न पडला?"
"अहो नाही सर...मी तुम्हांला म्हटलेलं ना की मी हल्ली मराठी ब्लॉग लिहिते...त्यात ना, मी गेलं वर्षभर की हा शब्द, कधी दीर्घ आणि कधी ऱ्हस्व लिहून ठेवलाय! आणि आज ना सक्काळी सक्काळीच मला माझ्या एका नव्या मैत्रिणीचं पत्र आलंय...ह्याबाबत!"
"हो का? अरे व्वा! मला आधी ह्याचाच आनंद झालाय की तुला शुद्धलेखनाची एव्हढी पर्वा अजूनही वाटतेय!"
"म्हणजे काय सर!? अहो, बालमोहन! विसरलात का?"
"अरे नाही! ते नाही विसरलो! पण हल्ली सगळीकडे 'आर्शिवाद' वाचून मी आता ह्या अशुद्ध लेखनाचा त्रास करून घेणंच सोडलंय!...मग काय आता....घालीन लोटांगण! चूक मान्य करून टाका!"
"हो! ते तर करेनच मी सर! पण आता सगळं सुधारल्याशिवाय नाही लिहिणार पुढे!"
"अगं, मला ना ते तुमचं इंटरनेट नाही कळत आणि ते तुमचं मोबाईल प्रकरण पण नाही कळत! म्हणून मग वाचलं नाही जात तुझं लिखाण!"
'माहितेय ते मला सर....मी ना त्यातल्या त्यात जे बरं लिहिलं गेलंय, त्याचे ना तुम्हांला प्रिंट आउटच पाठवते!"
"हा! ते बरं होईल बघ!"

तर असा काहीसा संवाद, गुरु शिष्येत घडला...

मग बाईंना शाळेतील दिवस आठवले...अशुद्धलेखनावर, शिक्षा काय? तर तो शब्द काढा लिहून वहीच्या पानभर! मग काय? बाई दिवसभर वेळ मिळेल तसा, ब्लॉगवर मागेमागे जाऊन माझे हातपाय धड करत गेल्या! डावीकडचा पाय उजवीकडे!...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...कॉपी पेस्ट...एक दिवस...दोन दिवस...आणि तिसरा दिवस! बाई तीन दिवस हे एव्हढंच करत होत्या! जवळजवळ २८८ पोस्टा त्यांना सुधाराव्या लागल्या! केलं त्यांनी! न करून सांगतायत कोणाला....

तर मंडळी, आशा आहे की आता बाई पुन्हा कधीही अशी चूक करणार नाहीत आणि 'मी' जी उजवी आहे...ती उजवीच तुमच्या समोर येईन! आता नवीन चुका केल्या तर काही सांगता येत नाही हा! पण असं काही मिळालं तर वेळीच सांगा! असे थांबू नका १००० होईस्तोवर! कारण 'की' हा शब्द तुम्ही इतक्या वेळा वापरता...की बाई जवळजवळ २८८ X २ (कमीतकमी!!) कॉपी पेस्ट करत होत्या!! :)

आता जरा व्याकरण बघुया का 'की' ह्या शब्दाचं?
की:
१) उभयान्वयी अव्यय - अथवा, किंवा. (अ+व्यय - कधीही न बदलणारा)
संशयबोधक अव्यय - 'की माझे दुर्दैव प्रभूच्या मार्गात आडवे पडले?'
२) प्रश्नावर जोर देण्याकरिता प्रश्नाच्या शेवटी पुष्कळदा योजतात. जसे: मी देतो की, येतोस की, जातोस की.
३) स्वरूपबोधक अव्यय. जे, असे. 'ते बोलले की आम्हांस यावयास बनणार नाही.'
हा शब्द एक अव्यय असल्याकारणाने कधीही बदलत नाही। त्याआधी स्त्रीलिंग वा पुल्लिंगी काहीही आले तरी देखील 'की' हा दीर्घच रहातो.
(संदर्भ, गुप्ते सर!)
किं:
कोण? कोणाचा? काय? हा शब्द बहुव्रीहि समासात नेहेमी येतो. जसे- किंकर्तृक= कोणी केलेले? कोण कारण झालेले? किंप्रयोजक= कोणत्या कामाचा किंवा कोणत्या उपयोगाचा?
(संदर्भ- महाराष्ट्र शब्दकोश. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे.)

:)

Wednesday, 23 February 2011

इस शहर में...

गेला शनिवार कुतूब शहाच्या शहरी गेला. आंध्र प्रदेशाची राजधानी. हैदराबाद. पहाटे आकाशात तरंगायला सुरुवात केली साडे सातच्या सुमारास पाय तिथे टेकवले. मी माझा कॉपिरायटर मित्र. एक भेट ठरवलेली होती....पोटापाण्यासाठी. आधीही एकदा गेले होते त्यामुळे अतिशय सुंदर, एखाद्या परदेशीय विमानतळाच्या बरोबरीचा हैदराबाद विमानतळ बघितलेला होता. अभिमान, वाटावा असा. बाहेर झकासशी बस, शहरात शिरण्यासाठी. रिक्षांना, टॅक्स्यांना आसपास प्रवेश मनाई. लांबसडक गुळगुळीत रस्ते, फुलझाडांनी सुशोभित. हल्ली आपण फक्त परदेशीय फुलझाडे लावतो, मूळ भारतीय वृक्ष लावणे आपण बंदच केलेले आहे. हे वृक्ष तोडायचे आणि त्यांचा वारसा चालू राहील असे देखील काही करायचे नाही. म्हणजे दुबईचा विमानतळ देखील हल्ली ठिबकसिंचनाच्या मदतीने असाच कायम फुललेला दिसतो. अगदी हीच फुले आणि हीच पाने. इथे पक्कं भारतीय असं साधं एक पान देखील शोधून सापडलं नाही. एकूणच परदेशी आल्याचा एक भास, दूर शहरात शिरेपर्यंत कायम.

जवळजवळ एका तासाच्या प्रवासानंतर पोचलो हैदराबादच्या जुळ्या भावंडाकडे...सिकंदराबादमध्ये.
भेट संपेपर्यंत दुपार झाली होती. मग पोटपूजा. परतीचा प्रवास उशिराचा होता. आता वेळ काढणे आले. मग केली एक रिक्षा आणि चालकाला सांगितले पुढचे तास दोन तास फक्त शहर दाखवायचे.

कुतूब शहाने उभारलेले शहर...म्हणे एके काळी भारतातील सर्वात श्रीमंत शहर. आम्ही आधी शिरलो जुन्या शहरात. चारमिनार. शोधली इथे तिथे विखुरलेली ती लपून बसलेली प्राचीन श्रीमंती. कधी कुठे एखादा सज्जा, तर कधी एखादा खांब, एखादी खिडकी वा खिडकीची हिरवीजर्द फुटकी काच. शहराचे वेगळेपण पूर्ण धूळकटलेले. आणि बाकी आकाशातून लटकलेल्या विजेच्या वायरी, अस्ताव्यस्त. बारकाईने पाहिले तर त्याच काळ्या वायरींच्या मागे कदाचित लपलेले दिसेल एखादं नाजूक नक्षीकाम. हे असेच काहीसे मला जुन्या नाशकात फिरताना वाटले होते. कळकटलेल्या इमारती, इथे तिथे चिकटवलेली भित्तीपत्रके...नेत्यांची...नटनट्यांची. आंध्र सिनेमांची ही भित्तीपत्रके, चंट भडक. त्यांची त्यांची एक शैली राखून. डिझायनिं अगदी हॉलीवूड धर्तीवर. स्त्रियांसाठीचा बाजार...चमचमता...आणि फिरत्या काळ्या गोष्यातील स्त्रिया. त्यातून कोणाचा हात दिसलाच तर दिसाव्या त्या चमकत्या बांगड्या, आणि पायाकडे नजर टाकली तर गोऱ्या पायातील पादत्राण एखादा तारा चमकवून जावं.

ठीक...एक भारतीय पाचशे वर्ष जुनं शहर...काळाचा पडदा विरविरीत नाही तर अगदी जाड गोणपाटासारखा...

पुढे श्रीमान अझरुद्दीनची बंजारा टेकडी. बंजारा तलाव. सुंदर शांत. काठाशी लटकलेले पुढारी मात्र नजरेला शांतता नाही लाभू देत...आत तळ्यात शांत उभा बुद्ध. थोडा धूसर...बाकी शहर इतर भारतीय शहरांहून काय वेगळे? तेच ते देशी परदेशी मोठमोठे ब्रँण्ड सर्वत्र उभे. इमारती अश्या बांधलेल्या की आपल्यात कधी सौंदर्यदृष्टी होती ह्याबद्दल शंकाच यावी. अतिशय वाईट...सौंदर्याचे बारा वाजलेले. प्रश्र्न पडतो...कोण ह्यांना आर्किटेक्ट बनवतो...कुठून आणि का ह्यांना पदव्या मिळतात...हे का आपली नसलेली डोकी चालवतात... का ही अशी आता पुढे वर्षानुवर्ष बघावी लागणारी ओबढधोबढ बांधकामे करतात! सापासारखा पसरलेला फ्ल्यायओव्हर. वर त्याखाली जाडजूड खांबावर डकवलेली पत्रके. कुठे खरवडलेली...कुठे अगदी शाबूत. एकजात सगळे खांब हे असेच किळसवाणे...बरबटलेले.

ठीक...एक भारतीय प्रगत शहर...प्रगत भारतीयांनी उभारलेलं...वेडंविद्र.

....रात्रीच्या काळोखातील माझी निद्रानाश झालेली मुंबई...पुढारलेली....दुसऱ्यांच्या पापापोटी स्वत:चे व्यक्तिमत्व हरवून बसलेली.

कोण जाणे का...भारताच्या नवशृंगार करून बेढब दिसणाऱ्या ह्या शहरांपुढे कुठे कोपऱ्यात माडांखाली लपलेले, चार माणसांचे एखादे गावच शोधावेसे वाटते...कधी वाटतं, सायकल काढावी, एखादं वळण घ्यावं, पाय मारत मारत सिमेंटच्या ह्या करड्या रानातून कुठे निघून जावं...जिथे किनारा सापडेल...जिथे आसरा मिळेल...
माणसाला नाही तरी जास्तीतजास्त सहा फूट जागा लागते...मग आत्मा जी काय अवकाशात जागा व्यापेल ती आणि तेव्हढीच मालकीची...




Friday, 18 February 2011

नको तिथे...

"ही तू ठेवलेली देवांची जागा बरोबर नाही."
"म्हणजे? मी पूर्वपश्चिम बघूनच ठेवलेत देव!"
"तरी पण....इथेच तू जेवण करतेस आणि तिथेच देव आहेत!"
"अरे? पण अन्न हे पुर्णब्रम्ह्च नव्हे काय? आणि म्हणतात बेडरूममध्ये ठेवू नयेत....हॉलमध्ये ठेवू नयेत...मग आता कुठे ठेवणार मी त्याला?"
"ते काही मला माहित नाही! ते तू बघ!"
"ठीक आहे...ही जागा बरोबर नाही. बरोबर?"
"हो."
"आणि माझ्या ह्या घरात दुसरी काही जागा नाही..."
"तुझ्या घरात देवाला जागा नाही!?"
"तसं नाही म्हणतेय मी...पण जर देवाला वाटतंय की मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...आणि म्हणून तो माझ्यावर नाराज आहे...आणि वेळोवेळी त्याला ही त्याची नाराजी दाखवावीशी वाटत असेल...तर द्यावं त्याने मला मोठं घर घेऊन...मुंबईत...मग मी बसवेन त्याला...चुलीपासून दूर....हवं तिथे!"
"तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये!"
"अरेच्चा! त्याच्या मनाजोगती जागा त्याला हवी असेल तर त्यालाच नको का प्रयत्न करायला? कम्मालेय! पटत का नाहीये तुला?!"

Wednesday, 16 February 2011

वासंती

कधी कधी दु:खी वाटत असतं...
जसं काही मनाला एखादा जड पाषाण गुंडाळावा आणि समुद्रात सोडावं...
मग ते बिचारं मऊ लुसलुशीत मन हळूहळू खोलखोल रसातळाला पोचावं...
जेव्हा असं काही वाटतं त्यावेळी ते दु:ख बाहेर काढावे म्हणून कलाकार आपल्याला अवगत असलेल्या कलेचा आधार घेतो. कोणी चित्र काढतो, कोणी कविता करतो...कोणी एकटाच बसून अश्रू ढाळतो...
माणसं हे इतकंच करतात...

पण कधीकधी देव दु:खी असतो...
आणि त्याने तरी गप्प बसावं नाही का....
की दु:खी आहोत म्हणून दु:खी गोष्टी लिहित बसायचे...
आणि कोणाच्या ना कोणाच्या डोक्यावर आपली गोष्ट थापायची,
आणि....द्यावे पाठवून खाली त्या जीवाला...
ह्याने लिहिलेल्या गोष्टी जगायला....
नाहक.
अन्यायकारक...
नाही का?

आज माझी बालमैत्रीण गेली....
वासंती....

Tuesday, 15 February 2011

देणे, गत जन्माचे

काल एक फुलपाखरू घरात बागडत होतं. काळं कुळकुळीत. जशी काही एखादी सावली....इकडे तिकडे उडणारी. आणि त्याबरोबर बागडणारे खरे रंगीबेरंगी फुलपाखरू नाहीच. फक्त धावणारी सावली. माझ्या इतकी हाताजवळून गेली की त्या नाजूक सावलीचा स्पर्श देखील हलकाच कळावा. सावलीचा स्पर्श. मी हलकेच माझी बोटं हलवली. सावली उडाली. आणि मला आठवण झाली...

...त्यादिवशी देखील अशीच एक सावली खोलीतील क्षीण प्रकाशात मला दिसली होती. मध्यरात्रच होती. ती सावली माझ्या मानेवर हुळहुळून सरकली होती. आणि म्हणूनच मला जाग आली होती. भीती. भीती दाटली मनात. मी उठले. त्या सावलीवर मी सपाताचा वार केला. एक दोन तीन. अज्ञानातील चढती भीती. सावली थरथरली. माझा वार प्रबळ झाला. धडपडत ती निष्प्राण झाली. मी लहानग्या लेकीला कुशीत घेतलं आणि तिच्यावरील नकळत आलेलं संकट दूर केल्याच्या आनंदात डोळे मिटले.

खोलीत प्रकाश शिरला तेव्हा सवयीनुसार जाग आली. सपाता पायात सरकवण्यासाठी पाय पुढे नेले. आणि जागतेपणाचा पहिला इशारा...अंगावर शहारा आणून गेला.

एक निष्पाप फुलपाखरू मरून पडलं होतं. चेचलं गेलं होतं. फाटके पंख, चिमुकला जीव. चिरडून गेला होता.
मला अंधाराने आंधळं केलं...जाणीवा नष्ट केल्या आणि माझ्या हातून ते फुलपाखरू मेलं. रात्रीच्या अंधारात मी केलेले ते वार आठवले. जीवाच्या आकांताने केलेले घाव. धस्स झालं. जर गेल्या जन्मावर विश्वास ठेवावा तर फुलपाखराचं आणि माझं असं काय नातं होतं? का त्याने मानेला नाजूक स्पर्श करून मला उठवावं आणि मग हे असं माझ्या हातून क्रूर मरण ओढवून घ्यावं? हे देणे, गत जन्माचे?

तो हाताच्या दोन पेराइतकासा जीव आणि पलंगावर माझ्यावर विसंबून, निवांत झोपलेला तितकाच निरागस एक जीव.
रात्री, खोलीतील मिट्ट काळोख दूर करणं खरं तर काही कठीण नव्हतं.
एकाच बटणाचे तर अंतर आणि त्यावर अवलंबून एक आयुष्य...

ते शरीर उचललं....
ती नाजूक कुडी...तळहाताएव्हढी...
कुंडीतील रातराणीला अर्पण केली...
निसर्गाला मान निसर्गाचा...

संपले असेल काय ते माझे आणि फुलपाखराचे देणे?
निदान ह्या आयुष्यात...

Sunday, 13 February 2011

कहाणीतील गूढ

रविवारचा सूर्य मावळत आला होता. असा निवांतपणा परत मिळवायला सहा दिवसांवर मात करायची होती. हे असं जेव्हा होतं तेव्हाच त्या जलद सरकणाऱ्या सूर्याचं मोल कळतं.
"काल ती पुन्हा निराश होती."
"मग?" प्रशस्त दिवाणखाना. उंचच उंच मोकळ्या खिडक्या. त्या खिडक्या पुढ्यात घेऊन बसलं की मन मोकळं व्हायला कितीसा अवधी?
"मग काय? काही नाही. तिला मी जे गेली सहा वर्ष सांगतेय तेच पुन्हा सांगितलं...उसाचं गुऱ्हा पुन्हा चालवलं."
"रडत होती?"
"नाही. ते झालेलं म्हणे रात्री करून."
"हम्म्म्म. मग आता?"
"मला नाही कळत हिला कसं समजवायचं ते! गेली सहा वर्ष पुन्हापुन्हा त्यांचं ब्रेकअप होतंय आणि पुन्हापुन्हा पॅचअप! तो तसाच आहे! तो नाही बदलत! आणि ही त्याला नाही सोडत!"
खिडकीवरील कावळा उगाच दोघां जिवाभावाच्या मैत्रिणींना न्याहाळत होता.
"मला वाटतं तुला आता तुझी strategy बदलायला हवीय!"
"माझी? म्हणजे?"
"साधी गोष्ट आहे. त्याचे आईबाबा लहानपणीच गेलेले आहेत. तो एकटाच वाढलेला आहे. निर्णय एकट्याने घेणे त्याच्या अंगवळणी पडले आहे. आणि कोण कधी कोणासाठी बदलतं का?"
"खरं आहे. मग?"
"ह्यातून कोण चूक आणि कोण बरोबर हे आपण काढूनच टाकूया. ज्या गोष्टीला कधीही कुठलेही ठाम उत्तर नसते त्या गोष्टीला आपण इतके महत्व का द्यावे?"
"अं?"
"All this right and wrong..let 's keep that aside."
"Okkk. And then?"
"आता ह्या घटकेला नक्की होतंय काय? तर कधी हिच्या वागण्याचा त्याला आणि कधी त्याच्या वागण्याचा हिला...पण त्रास मात्र नक्की होतोय. आनंदाचे क्षणही असतीलच आयुष्यात घडत परंतु overall effect त्रासाचा आहे. नाही का?"
"हो."
"आता आपण फक्त तिचा विचार करु...कारण ती तुझी जिवलग मैत्रीण आहे. ठीकेय? तिला त्याच्या वागण्याचा त्रास तर होतोय. परंतु, त्याच्यावरच्या प्रेमाने तो त्रास ती आज सहन करते आणि हे नातं पुढे नेते. मग असंच पुढे जाऊन एकदोन वर्षांत त्यांचं लग्न होईल आणि आयुष्य पुढे सरकेल."
"हो...बहुधा..."
"आता मन हे आपण एक कोकरू धरू... निरागस, निष्पाप. ते प्रत्येक घावाबरोबर बावचळेल, दुखावेल. परंतु, निरागस ते, तसेच कठीण पर्वत चढू लागेल...वर वर. स्वप्नातील हिरवळीच्या दिशेने. ज्या गोष्टींचा लग्न होईपर्यंत त्रास झालेला आहे, ज्यातून तिचं हे कोकरू मन गेलेलं आहे...ठेचाळलेलं आहे...तेच लग्नानंतरच्या खडतर प्रवासात अधिकाधिक जखमी होईल...आणि त्याचा स्वभाव लक्षात घेता, तो जरी राक्षस नसला तरी देखील तो ह्या कोकराला तळहातावर जपणारा मेंढपाळ देखील नाही. नाही का?"
"ह्म्म्म. मग?"
"मग काही नाही . कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होईल...आणि ह्या कोकराकडून एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरी मग त्याला माफी नसेल...असेल तो फक्त कपाळमोक्ष. हा मेंढपाळ नाही जपणार ह्या कोकराला. ह्याच्या शेकडो चुका ती आंधळ्या प्रेमाने माफ करून जाईल, सपशेल डोळेझाक करेल...आणि तिची एक चूक मात्र त्यांना आयुष्यातून उठवेल."
.........
"तुझे का डोळे भरले?"
"कारण मला माझी मैत्रीण आयुष्यात सुखीच व्हायला हवीय !"
"बघ हेच तिला सांगून. सांग तिला स्वत:च्या सहनशक्तीच्या मर्यादा जाणून घ्यायला. धनुष्य किती ताणलं जाऊ शकतं ह्याचा अंदाज, बाण टेकवण्याच्या आधीच घ्यावयास सांग."
.......
"आणि त्याही पलीकडे जाऊन एक ध्यानात ठेव तू."
"काय?"
"जे तिच्या नशिबात लिहून ठेवलेलं आहे...ते घडणारच आहे..."
"कसला कर्कश आहे हा कावळा!"
ती हसली...."हो का? कधी ऐकलास तू गोड आवाजात गाणारा कावळा?"
दोघींच्या गप्पा तर संपल्या हसतहसतच...परंतु, हसण्यावर सोडून देता येणाऱ्या त्या तिसरीच्या नशिबात, काय लिहून ठेवलंय हे तर काळच जाणे.
आणि कहाणीतील गूढ कायम राखण्याची हातोटी, कोणी या काळाकडूनच शिकावी!