नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 18 February 2014

चाँद तन्हा है...

चाँद तन्हा है, आसमां तन्हा,
दिल मिला है कहाँ कहाँ तन्हा.

बुझ गयी आस, छुप गया तारा,
थरथराता रहा धुँआ तन्हा,
चाँद तन्हा है...

जिंदगी क्या इसी को कहते हैं ?
जिस्म तन्हा है और जां तन्हा,
चाँद तन्हा है...

हमसफ़र कोई गर मिले भी कहीं,
दोनों चलते रहे तन्हा तन्हा,
चाँद तन्हा है...

जलती बुझती सी रोशनी के परे,
सिमटा-सिमटा सा इक मकां तन्हा,
राह देखा करेगा सदियों तक,
छोड़ जायेंगे ये जहाँ तन्हा,
चाँद तन्हा है...

...मीनाकुमारीने लिहिलेली दर्दभरी गझल तिच्याच दर्दभऱ्या आवाजात...


Tuesday 11 February 2014

मी खार...

जितकं जमेल तितकं…
आणि ज्या प्रकारे जमेल तसं…

मला मदत करायला आवडेल पण माझ्याकडे श्वास घ्यायला देखील फुरसत नाही…
हे असं मी किती काळ म्हणणार ? काय ही माझी एक पळवाट आहे ?
श्वास घ्यायला जर वेळच नाही तर तो श्वास आपल्या हृदयातून बाहेर पडणे कधी थांबवेल ह्याचा तसा पत्ता देखील लागत नाही. आज आहे, उद्या नाही.
बेभरवश्याचे जिणे इत्यादी.

मुंबईतीलमहानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम माझी काही मित्रमंडळी करत आहेत. Citizens Association For Children. त्यांच्या ह्या गेल्या आठ दहा वर्षांच्या मेहनतीच्या एकेक सुरस कथा ऐकल्यावर ह्यांचा धीर कसा काय नाही सुटला ह्याचे मला आश्चर्य वाटते. एकजुटीने आणि सहनशीलता पणाला लावून मंडळी हे काम करीत आहेत.

माझा आपला खारीचा वाटा.

उदाहरणार्थ त्यांचा लोगो तयार करून देणे, त्यांना वाटप करण्यासाठी लागणारी हॅन्डबिल्स डिझाईन करून देणे वगैरे वगैरे. विनामोबदला. मुंबईच्या नागरिकांकडून मदतीचा हात जर मिळाला नाही तर कोणाच्या आणि कोणत्या जोरावर हे काम मार्गी लागणार ?

खाली आम्ही तयार केलेले एक हॅन्डबिल ठेवले आहे. बघून घ्या. आणि मुंबईत असलात, काही करू इच्छित असलात तर सहभाग घेऊ शकता. तिथे मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. त्यावत आपण संपर्क साधू शकता.

आणि तसेही आपल्या नकळत आपला श्वास घेतला जातोच…
हे काम मात्र आपण जागरूक नागरिक म्हणून करावयाचे आहे…
:)


Friday 7 February 2014

बाहुल्या...

चालत्या गाडीच्या खिडक्या, ह्या नेहेमीच चांगले दृश्य फ्रेम करीत नाहीत.
समाजाच्या विविध स्तरातून काही क्षणांमध्ये गाडी प्रवास करीत असते.
त्या क्षणांमध्ये आपण कधी फाटक्या भाकरीला मोताद असतो...
तर कधी फक्त वेळ निघून जावा म्हणून १०० रुपयांच्या कॉफीचा आपण आस्वाद घेत असतो.
तिचे वय पाच ते सहा असावे. खांद्यावरून खाली लोंबकळणाऱ्या झिपऱ्या. पिवळट परकर पोलका. त्यावर तपकिरी रंगाचे वर्तुळाकार ठसे. कसलेच ठराविक आकार नसलेले. माझ्याकडे तिची पाठ होती तेच बरे. डोळे नेहेमीच भेदून टाकतात. भर रस्त्यावरून कोणाकडेतरी वा कुठेतरी वळून बघत ती पळत होती. उजव्या काखेत अडकवून तिने तिची कापडी सोबतीण दाबून धरली होती. ती नागवी. मळकट गुलाबी. हातपाय हवेत. आपले आयुष्य त्या मुलीच्या हातात सोपवून टाकलेली.

माझे डोके म्हणजेच एक लोहचुंबक आहे बहुधा. एखादे दृश्य येऊन माझ्या मेंदूच्या एखाद्या कोपऱ्यात थाडकन चिकटते. एकावर एक थप्पी बनून राहिलेली ही दृश्य मला वाटतं कधीतरी आतल्या आत झोंबाझोंबी करितात. आणि मग एखादं खोलवर लपून गेलेलं दृश्य उसळ्या मारीत बाहेर येतं. वाळूवर पडलेल्या माश्यांच्या ढिगातून एखादा मासा तडफडत का होईना पण उड्या मारीत पाण्यात पुन्हा शिरतो…आपले उर्वरित आयुष्य आपल्या पदरात पाडून घेतो.

तिच्या एव्हढीच असताना माझी देखील एक बाहुली होती. पॅरीसवरून आली होती. माझ्या हातात. इतक्या दूरवरून प्रवास करून आली म्हणून मी तिला नखशिखांत भिजवली होती. आणि ती अशीच झाली होती. ओल्या कावळ्यासारखी. तो उन्हात बसून पुन्हा कोरडा तरी होतो. माझी बाहुली पुन्हा कधीच नाही पूर्ववत झाली.

…वाटले, गाडीचे फिरते चाक सोडून द्यावे. खाली उतरावे. ती माझी विस्कटलेली बाहुली पुन्हा हातात घ्यावी आणि त्या झिपऱ्या मुलीचा डावा हात माझ्या उजव्या हातात पकडावा...आणि असंच बागडत जावं.
दोघी दोघी.
कुठे ?
कोण जाणे.

घशात हुंदका.
डोळे…ओले.

गाडी गेटमधून आत नेली.
नटलेल्या दुनियेत प्रवेश केला.
मी अंगठा पुढे केला. हजेरी लावली.
माझ्या आयुष्यातील अजून एक दिवस कंपनीला दान केला.
खात्यातल्या वजाबाकीला महिन्याच्या एकाच दिवशी बांध लागतो.
फक्त एकाच दिवशी पाणी जमा होते.
बाकी सारे दिवस…धरण बेबंध उघडे…
धोधो रिकामे होत.
माझी बाहुली…
तिची बाहुली…
वा आम्ही आमच्या नशिबाच्या बाहुल्या ?
विस्कटलेल्या…
सजण्याची ओढ मनी ?