नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 14 October 2013

अरेरे !

आपल्या मातेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावयाचे.
आणि तिच्यावर अत्याचार झाले की म्हणावयाचे 'हिच्या पोटी मी जन्म घेतला ह्याची मला शरम येते.'
काय म्हणावयाचे ह्या वागण्याला ? 
ह्या  विचारधारेला ?
बेजबाबदार ?
आचरटपणा ?
की बालिशपणा ?
हे विधान मी माझ्या घरात बसून केले तर ते निदान जगाच्या नजरेआड तरी राहिले असते. परंतु, तसे न करता जालावर टाकावे ? ह्या कृतीकडे बालिश म्हणून दुर्लक्ष काय म्हणून करावे ? जालावरच जाऊन मी ह्या कृतीचा तीव्र निषेध काय म्हणून करू नये ?

दिल्लीतील पाशवी बलात्कार व त्यानंतर मुंबईतील बलात्कार. ह्या दोन बातम्या अमेरिकेत बसून तू वाचल्यास. तू सुन्न झालीस आणि मानसिक धक्यातून तू जालावर लिहिलेस…
'ह्या देशाची मी नागरिक असल्याची शरम वाटते.'

तो देश फक्त तुझा नाही. माझा देखील आहे. कोणत्याही फोटोफ्रेममध्ये वा मूर्तीत बसलेल्या देवापेक्षा वा फक्त देवच कशाला, माझ्या प्रत्यक्ष आईवडीलांपेक्षा देखील जिला मी माझे आयुष्य वाहिले आहे अशा माझ्या भारतमातेविषयी हे असे कोणी विधान करावे ? मी ते काय म्हणून सहन करावे ?

आता तुझी ही भावना आणि माझे जाज्वल्य देशप्रेम हे दोन्ही बाजूला ठेवू.
खडे सत्य बोलू. माझ्या वाचनात आलेले तुझ्या समोर ठेवते.
आधारसामुग्री (data) दाखवते, जे देश दुसऱ्या देशातील स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक मिळते ह्याविषयी बोलतात त्या देशांमध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार हे इतर देशांपेक्षा अधिक असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेमधील लैंगिक गुन्हेगारीचे प्रमाण हे २७.३, युनायटेड किंगडममध्ये २८.८, फ्रांन्समध्ये १६.२. इतर प्रगत राष्ट्रामध्ये स्विडनचे प्रमाण ६३ आहे. ह्या तुलनेमध्ये सर्वात कमी प्रमाण हे लेबेनॉनमध्ये दिसून येते. ०.५. ह्या तुलनात्मक अभ्यासामध्ये भारतातील बलात्काराचे प्रमाण हे १.८ आहे.

तुझ्या विधानान्तर्गत एक तुलना लपलेली आहे. ह्या देशाची नागरिक होण्याची शरम वाटते असे म्हणताना अमेरिकेत तुझे असलेले वास्तव्य बघता; त्या देशाचे नागरिकत्व बहुधा तुला अभिमानाचे वाटत असावे. कुठल्या ना कुठल्या देशाचे नागरिकत्व असणे हे गरजेचे. आज भारताला बलात्कारी देश म्हणून बोंबाबोंब करताना पृथ्वीवरील इतर देशांकडे देखील नजर टाकावीच लागेल. एखाद्या भारतीयाने विश्वविक्रम केला की माझा देश म्हणून छाती पुढे काढून मिरवायाचे व अशी घृणास्पद घटना घडली की मला शरम येते की मी भारताची नागरिक आहे…असे विधान करावयाचे…ह्याला दुटप्पीपणा म्हणू नये काय ? काही चांगले घडले तर मान ताठ करून चालणे व ज्यावेळी आपला परदेशी मित्र आपल्या मातृभूमीला बलात्कारी म्हणत आहे तेव्हा आपणही त्यात सामील व्हावे व जालावर घोषित करून टाकावे…मला लाज वाटते मी भारताची नागरिक आहे…हा कुठला न्याय ?

मला हे लिहायलाच हवं होतं. ती गरज होती. माझा देश उघड्यावर पडलेला नाही. त्याचे नागरिकत्व घेणे वा असणे ही कोणावरही जबरदस्ती नक्कीच नाही. उलट अशी जबरदस्ती होऊ नये. कुठलही नातं बळजबरीने नाही तग धरू शकत. आपण कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घेऊ ह्यावर आपला ताबा नक्कीच नसतो. मात्र आपण ज्या भूमीवर जन्म घेतला त्या देशाला अभिमान वाटावा असे आपण नक्कीच काही करू शकतो. ते आपल्या हातात नक्कीच असते. मात्र दुसऱ्या देशात राहावयाचे, तेथील सुखसोयींचा उपभोग घ्यावयाचा आणि मग जगभरातील लोकांना नाहक माझ्या मातृभूमीची मला कशी लाज वाटते असे सांगणे हा मात्र गुन्हा आहे. अक्षम्य गुन्हा.

ह्या दोन्ही बातम्या जशा मला सुन्न करतात तशीच जगाच्या पाठीवर असंख्य स्त्रियांवर होणारे पाशवी अत्याचार जेव्हा माझ्या वाचनात येतात तेव्हा मी एक माणूस म्हणून सुन्न होते. माणूस म्हणून जन्माला आल्याची घृणा मनात दाटते. आज भारतीय स्त्रिया धीर एकवटायला शिकल्या आहेत, बलात्कार झाला ह्याचा अर्थ आपले आयुष्यच संपून गेले, आता समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही वगैरे गैरसमजातून हळूहळू बाहेर पडत आहेत. पोलिस स्टेशनावर पोचत आहेत. घडलेल्या गुन्ह्यांची नोंद होऊ लागली आहे. मग अगदी छेडछाडीची देखील. हे बळ आम्ही भारतीय स्त्रियांनी नक्कीच मिळवले आहे. आमचे ओझे पेलण्यास आम्ही समर्थ आहोत. आमच्यावर बलात्कार झाले म्हणून परदेशात बसून ज्या माणसांची मान 'अरेरे, मी भारतात जन्म घेतला' असे विचार मनात येऊन खाली जाते, अशा दुतोंडी, स्वार्थी परदेशस्थ स्वदेशीयांची भारताला गरज काय ?

शरमच जर वाटायला हवी आहे तर ती घडलेल्या घटनेची वाटायला हवी !
मी ह्याबाबत काही करू शकत नाही वा करू शकणार नाही ह्याबाबत स्वत:ची शरम वाटायला हवी !
आज ह्या प्रयासात आपला म्हणावा असा कुठलाच देश आपल्याकडे उरला नाही ह्याची शरम वाटावयास हवी !
अरेरे !

5 comments:

Deepak Parulekar said...

स्व:ताच्या अस्मितेला जिवाच्या पलिकडे जपतोच ना आपण; मग आपण ज्या देशात जन्मलो, लहानाचे मोठे झालो त्या देशाच्या अस्मितेला जपणं हे देखिल आपलं कर्तव्यच आहे.
जो प्रसंग घडला तो खरंच लाजिरवाणा होता. पण म्हणुन आपण स्वस्थ बसून फक्त सोशल नेटवर्कवर त्याच्या निषेध केला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं सगळ्यांना वाटत आजकाल.
फेसबुक, ट्विटरवर तर लोक अशा प्रसंगांची वाटच बघत असतात कारण मग कार्टुन्स, आणि वन लायनर जोक्स पोस्ट करायची आणि लाईक्स मिळवायची ही हल्ली सगळ्यांचीच मानसिकता झाली आहे.
अगदी मार्मिक लिहिलं आहेस..

rajiv said...

अगदी बरोब्बर अनघा ! दुसऱ्याच्या एखाद्या कृत्यामुळे जर स्वत:ला शरम वाटत असेल तर ती स्वत:च्या निष्क्रियतेची, हतबलतेची वा या विरूद्ध चीड निर्माण न होऊ देता षंढपणे बघत बसणाऱ्या थंड नजरांची, वाटायला हवीय. देशाची कशाला ? देशाने तर या सर्व बाबींची खातिरदारी करणारे कायदे व व्यवस्था दक्षतापुर्वक तयार केली आहे. पण ते न पाळणारे आपण आहोत. तेंव्हा शरम स्वत:ची वाटायला हवीय… मला माझ्या देशाने व्यक्तीस्वातंत्र्य व सर्व सोयी सवलती दिल्या असून देखील, मी माझ्या देशाला त्या बदल्यात माझ्यावरील नागरिकत्वाच्या जाबादाऱ्याची पूर्तता न करता दुषणे देणे, हे निलाजरेपणाचे आहे…असो

श्रिया (मोनिका रेगे) said...

अनघा छान लिहिले आहेस. तुझे अगदी पटले. एखाद्या घटनेची चीड येणे,आणि आपण काहीच मदत करू शकत नाही हे वाटणे साहजिक आहे,पण अश्या कृत्यासाठी पूर्ण देशाला जबाबदार धरणे पटत नाही.

shriraj moré said...

:) yatha-yogya samachar ghetlays.... kharach tyachi garaj hoti... asha lokanche halli praman vadhayla laglay

Raindrop said...

I sometimes feel the same sadness when people criticize cities too. People say 'Delhi is no place to live' in front of me knowing fully well that I live there. I think it arises from the sense that one is separate from the other. Just because the NRIs don't live here they can very easily say 'I am ashamed of being an Indian' coz they are not living here and they have a sense of detachment. They don;t feel any 'apulki' towards it. Just like when people from other cities criticize Delhi coz they think it to be a city they will never live in. They don't realise that their own friends & family live there and it is as much theirs as the country is theirs.