नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 29 March 2013

मालनगाथा

रोजच्या वाचनात एक तरी पुस्तक हे असायलाच हवं. अलिखित नियम. हातातल्या पुस्तकाचं शेवटचं पान उलटलं की लगेच पुस्तकांचं छोटेखानी लाकडी कपाट उघडावं आणि असंख्य न वाचलेल्या पुस्तकांना वरखाली करावं. पुस्तकं पण लबाड असतात. आळशी असतात. त्यांच्या मनात जेव्हा बाहेर उन्हात चार दिवस, अंग पसरून बसावंसं वाटतं तेव्हाच ती आपल्या हाताला लागतात. नाहीतर अंधारात गपगुमान डोळे मिटून, एक जागा पकडून, निवांत बसून असतात ! काल एका पुस्तकाने अगदी आळस झटकून नाही पण डोळे किलकिले करून माझ्याकडे बघितलं. मी त्याला कपाटाबाहेर काढलं. मुखपृष्ठावर सुंदरसं चित्र. आनंददायी रंगांतलं. मालनगाथा. इंदिरा संत. मी मुखपृष्ठ उलटलं आणि आत...
फोटो आहेत खाली जोडलेले...ते बघा म्हणजे जसा मला आश्चर्याचा धक्का बसला तसाच तुम्हाला पण बसेल !
मी मराठी शब्दकोश उघडला. मालन म्हणजे अतिशय सुंदर स्त्री. आणि गाथा ह्या शब्दाचा अर्थ, कविता, प्राकृत, छंद-रहित रचना, साधे गद्य. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये विद्वानांची नावे आहेत...रमेश तेंडुलकर, सौ. वासंती मुझुमदार, दुर्गा भागवत...प्रस्तावना वाचता वाचता मला खूप वर्षांपूर्वी बाबांच्या घरी रंगणाऱ्या चर्चा आठवल्या. आणि अगदी फारच मोठा खजिना हाताशी लागल्यासारखं वाटू लागलं. नक्कीच हे पुस्तक दुर्गाआजींनी बाबांना आणून दिलं असावं. आणि मग ते आमच्याकडे राहून गेलं असावं. आणि आज माझ्या हातात पडण्यासाठी ह्या पुस्तकाने डोकं वर काढलं असावं.

पुस्तकाबद्दल मी काही बालिश बोलण्यापेक्षा इंदिरा संतांचेच काही परिच्छेद मी इथे टंकित करणे उचित.

'नवे वर्ष सुरू झाले आणि मनात आले, आणखी आठ वर्षांनी हे विसावे शतक मावळणार. त्याबरोबर आणखी कोणत्या गोष्टी मावळातील ? हा मनाचा खेळ सुरू झाला आणि त्यात ही मावळतीच्या धारेला लागलेली बकुळेची फुले हातांशी आली. आजवर कोट्यावधी सुर्योदयांनी ती उमललेली पाहिली.
यातीलच एक पहाट. एका डोंगरदरीत विसावलेले एक खेडेगाव. सर्व घरे साखरझोपेत असलेली. पण घरातील ओसरीशी वा पडवीशी एक ठाणवई मिणीमिणी उजळत असलेली. त्या प्रकाशात जात्याशी बसलेली एक मालन. एक मांडी घालून, एक पाय लांब सोडलेला. तिचा काकणांनी भरलेला हात जात्याचा खुंटा धरून जाते फिरवीत असलेला, दुसरा हात मधूनमधून बाजूच्या सुपातील जोंधळे मुठीने घेऊन जात्याला भरवीत असलेला.
जात्याचा तो मंद सुरातील घर्रघर्र असा वळणे घेणारा आवाज. दळतानाच्या हालचालींची मालनीची वळणदार लय आणि यात एकरूप झालेली ती मालन. जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठांतून शब्दकळ्या उमलू लागतात. ओव्यामागून ओव्या गात असता दळण कधी संपते, तिला कळत नाही. त्या ओव्याही ओळीला ओळ जोडून, घोळून घोळून, उंच स्वरात गायच्या. ओवीच्या शेवटच्या ओळीच्या अखेरीस एक लांब हेल देऊन त्याच्या टोकानेच दुसरी ओवी उचलायची.
या ओवीत काय नसायचे ? अवघ्या स्त्रीजीवनाला त्यांनी स्पर्श केलेला असायचा. सुपली - कुरुकुळीच्या खेळापासून, घाण्याच्या बैलासारख्या ओढलेल्या कष्टांपर्यंत. शृंगाररसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत. पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकांतापर्यंत, जे जे म्हणून स्त्रीला भावले, ते सर्व या ओवीत आहे. ते एक अमृतानुभवाचे अथांग असे मानससरोवर आहे. अशा या मानससरोवराचा एकविसाव्या शतकात मागमूसही रहाणार नाही. कारण आता जातेसंस्कृती संपली आहे.'

'ओव्यांच्या नादात दळण संपल्याची जाणीव होत नाही. सुपात दोन ओंजळी दाणे राहिले, की 'दळण सरलं ' हे लक्षात येते. सरले आणि संपले या दोन शब्दांत सूक्ष्म फरक आहे. असेही मालन म्हणते. 'सरलं' हा अर्धविराम असतो, तर संपलं हा पूर्णविराम असतो. दळण ही एक संसारातील नित्य चालू राहणारी क्रिया आहे. म्हणून 'दळण संपलं' असं म्हणायचं नाही.'

'जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्या. अवघ्या संसाराचे एक उपनिषद. जाते-संस्कृतीने मालनीच्या पदरात बांधलेले हे स्त्रीधन म्हणजे स्त्रियांच्या काव्याचा मुळारंभ आरंभ !'

'बोलीभाषा हीच त्यांच्या अनुभवाची भाषा असते. तिचा अनुभव आणि तिची शब्दकला यांचे ते एक मधुर रसायन असते. त्यांच्या ओवीतील शब्दकला बदलली - एका शब्दाने बदलली, तरी त्या ओवीचा तोल जातो. 'पंढsगरीशी जाऊ' हे 'पंढरीशी जाऊ' असे बदलले, की संपलेच. 'भरतार' चे 'भ्रतार' केले, की त्या ओळीत त्राण राहत नाही. एवढी त्या ओळीची वा बोलीभाषेची नाजूक अशी संवेदनशीलता आहे. नागरी भाषेप्रमाणे तिची साहित्यिक भाषा होण्याची मुळी महत्त्वाकांक्षाच नसते. ती व्याकरणाने नियत नसते. ओवीच्या भावानुभवाच्या झोक्याप्रमाणे, लयीप्रमाणे हेलावणारे असे तिचे रूप असते. नियम-विरहित असे ते बोलीभाषेचे जिवंत वळण असते.'

खरं लिहायला गेलं तर प्रत्येक ओळ लिहिण्यासारखी...आणि तुम्हाला वाचून दाखवण्यासारखी. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गावांमधून त्या ओव्या मिळवायच्या, त्या संकलीत करावयाच्या आणि त्यातील काही ओव्या वेचून त्यावर इंदिरा संतांनी आपल्या भावून भाषेत रसग्रहण करावे...ह्यासारखा अजून दुसरा खजिना काय असावा ? किती सहजत्या ह्या स्त्रिया आपलं सुखदु:ख मांडून जातात...ते ओवीत रचतात...आणि त्यावर हलकी वळणे घेत गोड स्वरात गातात. माझ्या अंगावर काटा येतो...घशात आवंढा येतो...आणि मी देखील त्यातल्याच कोणा मालिनीच्या समोर मांडी घालून बसते...झुंजूमुंजू झालेले असते, तिच्या जात्याचा खांब मीही पकडते....आता मालिनी तिच्या ओवीत आर्तता आणते....जणू मी माझ्या मनीची वेदना गेल्या रात्रीच तिला सांगून बसले.

'पुढील गाथेत एक मालन आपल्या घरासंसाराबद्दल, पतीबद्दल ओव्या गात आहे. घर कसे थोरांचे. येणाऱ्या जाणाऱ्याचे. पै-पाहुण्यांचे. घराच्या लहान-थोर कुटुंबाचे ! या घराची प्रमुख तीच आहे. 'धनीयाचे जाते' हे शब्द हे सूचित करतात. हे दळण तिचे आनंदाचे काम आहे. दळायचे, त्याचे जेवण करायचे, लहानथोरांना वाढायचे. त्यातच भाऊ पाहुणा आला, तर रवापिठी दळायची, या सगळ्या उस्तवारीत तिला आनंद वाटतो. पहाटेच उठलेला तिचा लहानाही तिच्या मांडीवर झोपला आहे. याचाही तिला आनंद वाटतो. घरात नवराही उठला आहे. तिने तापवलेल्या पाण्याने अंघोळ करून, गंध-टिळा करून तिच्या मागे तिचे कौतुक पाहत तो उभा आहे.
ती तर गीताच्या छंदात इतकी गुंतली आहे, की तिला वाटते विठ्ठलच अभीर-गंधात मिसळतो आहे. तिचे दळणाचे पीठ इतके बारीक गंधासारखे आहे, की तेच गंध म्हणून विठ्ठलाने घेतले आहे ! आणि आता मी जात्याच्या फेराबरोबर ओव्या गाते आहे. तर तो गिरिधारी उभा आहे. 'गीताच्या छंदामंदी' तिला झालेले हे भास !
ही गाथा म्हणजे चित्रकाराला दिलेले आव्हानच आहे आणि रसिकालाही अशा या आपल्याच छंदात गुंग असणाऱ्या मालनीचे दळण थांबलेच; पण ओव्या मात्र लाखावर उरल्या - या कधीच संपत नाहीत. 
अशी ही गाथा :

दळन दळीतेs                 बाई चुड्याच्या हातायानं
भागीवान माझ्याs          त्या गs कंठाच्या जात्यायानं
दळन दळीतेs                 मोती सुपातs जवाsरss
माझी गs जेवणारीs       थोराघाराची लहानथोरss
दळनs दळीतेs               रावापीठी ग गव्हाचीss
जेवणाला जोडीs            बाई येनार भावाचीss
दळन दळीतेs                 बाई दळीता आनंदss
माझ्या गs मांडीवरs       बाई झोपला गोइंदss
दळन दळीतेs                 गीताच्या छंदामंदीs
इठूदेव ल्यालंs                बाई अबीर गंधामंदी
वाव्या मी गायील्याs      जात्याच्या फेरावरss
सरलं दळनs                  वव्या उरल्या लाखावरss
वव्या मी गsगातेs          जात्याच्या चवफेरीss
जातं  गs वडीतानाss     उभं हायीती गीरीधारीss


एखादं सुरेल गाणं...वा मंद बासरीचे सूर कानी पडतात....आणि त्यानंतर कुठलाही आवाज नकोसा वाटतो.

3 comments:

shriraj moré said...

Lekh nehmipramane chhan jamun alay ani pustakansathi vaparlele 'personification' tar mastach vattay!

Sakhi said...

व्वा

घरात इतकी पुस्तके असावीत कि त्यांना लपून छपून स्वत:च्या मनागत हाती लागण्याचे सुख असावे त्यापरते अजून काय....

अन काय पोस्ट झालीय आहा////

इंदिराबाई नि जणू ती लेकुरवाळी जात्याची धनीण जातिवंत उभी केलीय समोर...
नव्या नव्या वर्षांच्या सरत्या धबडग्यात त्यांची बकुळीच्या फुलांची भीती मात्र अजून तशीच आहे ... अजून सुकल्या फुलात वास आहे हे आपले भाग्य म्हणायचे... आणि कदाचित त्याच गंधात ती अजून काही शतके नहात राहतील हे आशा करायची...

भक्ति

Trupti said...

kiti chaan..:)
tuzya blog var aale na ki man aandaun jat :)
mast ch