नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 15 March 2013

फाईल

म्हटलं तर गोष्ट साधीच आहे, परंतु बऱ्याचदा साध्याच गोष्टी आपल्याला बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करीत असतात. आपण त्या समजून घेऊ शकू की नाही ही बाब अलाहिदा.

एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळी ती रक्ताची नाती आपल्याबरोबर घेऊन जन्माला येते. आणि पुढील आयुष्यात स्वकर्तृत्वावर, नवनवीन नाती जोडत जाते. ही नवीन नाती तो आपल्या आवडीनिवडीनुसार, स्वभावानुसार, स्वार्थाकरीता विणत असतो. मूळ व्यक्ती जरी एक असली तरीही तिच्या स्वभावाला असंख्य कांगोरे असतात. त्यामुळे एखादा माणूस हा असाच वागेल असे काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ, ती व्यक्ती हा जर पुरुष धरला तर आपल्या आईवडिलांसमवेत एक ढंग, बहिणभावासमवेत एक ढंग व मित्रमैत्रिणीसमवेत एक ढंग असे होऊ शकते. कारण त्यांचे संदर्भच वेगळे असतात.

हे झाले वरवरचे.
खोल विहिरीचा तळ काही वेगळाच असतो.

विषय क्लिष्ट आहे.

त्याचे असे झाले...

कधीही माझ्या नवऱ्याचा विषय त्याच्या एखाद्या मित्रासमोर निघाला, की एकूणच त्यांना प्रेमाचे भरते येते, डोळ्यात अश्रू जमा होतात, वगैरे वगैरे. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्यांच्या मनात अगदी कोलाहल माजवतात.
माझ्या मनात तर तो कायम असतो. सतत. परंतु, हे असे अश्रू, आणि 'किती तो चांगला होता...'इत्यादी इत्यादी माझ्या मनात अजिबात येत नाही. 
एकदा मी आणि माझी लेक असेच काही बोलत बसलो होतो. मी तिला म्हटले, "चल, पटकन एखादी बाबाची आठवण सांग पाहू. पटकन हं. म्हणजे अगदी मनावर तरंगत असलेली आठवण आपण पकडायची. उगाच गळ टाकून बसायचे नाही !"
असे म्हटले असता, माझ्या नवऱ्याच्या नशिबाने तिच्या मनाने तिच्या डोक्याला एक छानशी गोड आठवण पुरवली.
मग आता माझी पाळी.
वर तरंगणारे कमळ नासके होते.

पतीपत्नीमधील असे असंख्य प्रसंग असू शकतात, जे फक्त त्यांचे आहेत. त्यातील जखमा फक्त त्यांच्यासाठीच्या आहेत. त्यातील दु:खे ही त्यांचीच आहेत. ती दु:खे, त्या जखमा कितीही कोणापुढे अगदी ती विहीर उपडी करून दाखवली, तरीही त्यातील खोली ही कधीही पोचता न येण्यासारखीच रहाते. त्यामुळे त्यातील एक माणूस निधन पावला तर जिवंत माणसाने आता फक्त गुणगान गायला हवे असे का बरे असावे ?
हे म्हणजे आपले राजकीय नेते मरता क्षणी लगेच सगळेजण अकस्मात गुणगान गावू लागतात, तसे झाले. 

ठळक जाड अक्षरांत लिहिलेला अधोरेखित नियम 'गेलेल्या माणसाबद्दल आपण चांगलेच बोलावयास हवे' असा आहे.

नाती बदलतात. आणि गणितं बदलतात. उद्या माझ्या आईला माझ्या वडिलांबद्दल काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी असण्याचा तिचा हक्क मी नाकारू शकत नाही. "हे असं कसं बोलतेस तू ? माझे वडील तर फारच ग्रेट होते !" हे असं जर मी तिला बोलले तर ते भावनाशुन्य होईल. बाबांचे आणि तिचे नाते हे पतीपत्नीचे होते. आणि माझे आणि त्यांचे नाते हे लेक व वडील ह्यांचे होते. म्हणजे सगळेच नियम बदलले. इतकेच कशाला, मी माझ्या वडिलांची थोरली लेक आहे. त्यामुळे माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना, व माझ्यानंतर सहा वर्षांनी जन्माला आलेल्या माझ्या बहिणीच्या भावना ह्यात कितीतरी तफावत आहे. कारण पुन्हा सर्व गणिते बदलतात.

फारा वर्षांपूर्वी बाबा एकदा आईविषयी काही अप्रिय आठवणी मला सांगू पहात होते. त्यांना फक्त एक कान हवा होता. कुठलेही हृदय नको होते. परंतु, मी त्या परीक्षेत पास नाही होऊ शकले. ती माझी आई आहे, तेव्हा तुम्ही मला हे काही सांगू नका, असे मी सांगून टाकले. आणि आजपर्यंत कधीही कोणाशीही आतले मनातले न बोलणारे बाबा गप्प झाले. म्हणजे मी माझ्या कानात नात्याचे बोळे घातले.

आजवर मी स्वत:ला ह्या माझ्या गुन्ह्यासाठी माफ नाही करू शकले.

काल मी नवऱ्याच्या जिवलग मित्राशी बोलत होते. कधीकधी नको ते विषय वर येतात. आणि काही बोलायला भाग पाडतात. त्याने मग मला नियम ऐकवला. "गेलेल्या माणसाबद्दल आपण चांगलेच बोलायला हवे."
मी ज्यावेळी माझ्या आईवडिलांचे उदाहरण दिले...आईला माझ्या वडिलांबद्दल तक्रारी असू शकतात, व त्या मुलींसमोर बोलण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे. आता त्याला माझा विचार पटू लागला. परंतु, तरीही मला परवानगी नव्हतीच. गत नवऱ्याची एक तक्रार आणि माझ्यासमोर नियमाचा राक्षस उभा ठाकतो.

'गेलेल्या माणसाबद्दल चांगलेच लक्षात ठेवायला हवे. त्याच्याविषयी चांगलेच बोलावयास हवे.'

परवा टीव्हीवर कुठल्याश्या प्रदेशावर डॉक्युमेंटरी चालू होती. तेथील जंगलातील झाडे ठराविक ऋतूमध्ये रंगीबेरंगी फुलपाखरांनी डवरलेली असतात. एकाच रंगाची, एकाच आकाराची असंख्य फुलपाखरे. झाड आत लपून बसलेले. त्यावरील फुलापाखरांमुळे आपल्याला झाडाचा आकार दिसतो, आणि त्याच्या आतील अस्तित्वाची जाणीव होते. हे असे आयुष्य असावे. नाजूक, हलक्या तरल आठवांनी डवरलेले. वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने नाजूक पंख फडफडावे, भवतालच्या प्रदेशाला एक सुख देऊन जावे.

झाड किडीने पोखरलेले असू नये. आत. खोल.
झाडाच्या ह्या अवस्थेचा जगाला मागमूस लागू नये.
आणि एक दिवस अकस्मात झाड उन्मळून पडावे.

पोलिसस्टेशन मधील कारभारासारखे चालावयास हवे.
माणूस मेला ?
फाईल बंद !

मनाला न पटणारा नियम जर कोणी माथी थोपला तर मन सत्याग्रह करते.
खोल खोल आत गाढलेली भुतं उसळी घेतात.

9 comments:

Tejas Shah said...

veglya drushtine natya-sambhanda kade pahnar lekh. Lekh vachylavar 5 min sunn basalo hoto.

Abhishek said...

विषय क्लिष्ट आहे... अगदी!
फुलपाखर किडीने पोखरलेल्या झाडावर (अशी काही) बसतील, अशी शक्यता अप्वादाची असावी! :)
पोलिसांचा नियम उत्तम, मात्र मनुष्य म्हणून आपण त्यावर पण टीका करतोच न!
सुनीताबाईंचे पु.ल. वाचले तेव्हा मला अगदी अशक्य झाल होत... पण समाजात ही एक कॉमन गोष्ट आहे, आपल्याशी ती घडली आहे याची आपल्याला जाणीव असते... दुसऱ्याच्या विहिरीचा तळ माहित नसल्यामुळे त्या बद्दल ती जाणीव नसणे सहजशक्य आहे... आताशाने पु.ल. वाचताना थोड बॅकग्राउंड म्युझिक सुरु असत, आणि त्याची सवय होते आहे, पु.ल. अजूनही आनंद देतात हे महत्वाच, आणि हेच सुनीताबाईंच यश अस मी मानतो

aativas said...

फाईल एका अर्थी बंद करणे इष्ट असते कारण आता परिस्थितीत काहीही बदल होणार नसतो.

हो, पण फाईल कधीतरी उघडून ती वाचायला काहीच हरकत नसते :-)

Jayu Shirish said...

like

Gouri said...

कुणाजवळ तरी हे बोलता यायला हवंच ग ... नाही तर निचरा कसा होणार?
पण ऐकणर्‍याची सुद्धा तेवढी पात्रता हवी. म्हणजे असं, की एक कटू अनुभव मनात वर आला आणि तो आपण सांगून टाकला, तरी तो एक अनुभव म्हणजेच ती व्यक्ती नसते. एका प्रसंगात आपल्याला दिसलेली ती एक बाजू आहे. खेरीज हे ज्या व्यक्तीविषयी सांगितलं जातंय, ती आता हयात नाही, आपली बाजू मांडू शकत नाही याचंही भान ठेवायला हवंय. यावरून ऐकणार्‍याने आपल्याला किंवा गेलेल्याला लगेच जज नको करायला, नाही का?

Aditya Patil said...

विचार करायला भाग पडणारा सुंदर लेख.

Gouri ह्यांची प्रतिक्रिया अगदी समर्पक. गेलेली व्यक्ती आपली बाजू मांडू शकत नाही त्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलू नये अशी रीत. ह्यात सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची प्रगल्भता महत्वाची. ह्यातील मुख्य गरज केवळ सांगणाऱ्याचे मन मोकळे व्हावे ही. मन मोकळे करून झाल्यावर पुन्हा गेलेल्या माणसाबद्दल किल्मिष दोघांनीही बाळगू नये किंवा ही घटना उगाच नको तिथे बोलू नये.

Raindrop said...

Our life in a file. Each leaf attached safely in order so that someday when one feels like reading it again....you can quickly go to the pages you'd like to read and omit the ones written in dark ink. File zaroori aste....loose papers aste tar ek saada paan vachava asa vatla tar sagle panan madhun shodun kahava lagta tyala.

shriraj moré said...

Tuzi ya babtitli mate agdi mazya babansarkhi aahet... te nahi maanat ya niyamaalaa ani tyancha prabhav mhanun ki kay misuddha tyach mataachaa aahe

सौरभ said...

May be just to spread the goodness :)