नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 20 January 2013

माझा वाचनप्रवास

वेगवेगळे चित्रपट, नाटकं बघणे, एखादी संध्याकाळ संगीत ऐकत व्यतीत करणे वा पुस्तक वाचणे ह्या गोष्टी फक्त छंद म्हणून आपण करीत असतो असे आता वाटत नाही.
ह्या वयाला पोचल्यावर.

लहानपणी आम्हां मुलींना वाचनाचा नाद लागला ह्यामागे आमचे अभ्यासू वृत्तीचे बाबा होते. मात्र कोणतेही पुस्तक वा मासिक हे त्यांनी वाचून, तपासून झाल्यावरच आमच्या हातात पडे. म्हणजे अगदी गुरुनाथ नाईकांच्या रहस्यकथा देखील बाबा आधी वाचून घेत व त्यानंतर ते पुस्तक मला हातात घ्यावयास मिळे. त्यावेळी "बाबा तुम्ही लबाडी करताय! त्यात मी न वाचण्यासारखं खरं तर काहीच नाहीये ! पण तुम्हाला ते आधी वाचायचंय म्हणून तुम्ही मला देत नाही आहात !" हे आणि असे बरेच मुद्दे घेऊन मी बाबांशी भांडत असे. बाबा पलंगावर बसून पुस्तक वाचीत. आणि मी त्यांच्या पाठीशी उभी राहून त्यात डोकावत राही. मुद्दाम. त्यामुळे तरी बाबा वैतागतील आणि मला पुस्तक देऊन टाकतील म्हणून. पण बाबा त्या रहस्यकथेत इतके रमून गेलेले असत की मी त्रास द्यायला मागे उभी आहे ह्याची त्यांना जरा सुद्धा जाणीव होत नसे. कधीतरी...अगदी कधीतरी...बाबांचं वाचून होण्याआगोदर, बाबुराव अर्नाळकर मला हातात सापडीत असत. बाबा अंघोळीला गेले, वा कचेरीत गेले की मी त्यावर झडप घालीत असे. त्यामुळे मेनका मासिक वा चंद्रकांत काकोडकर, भाऊ पाध्ये आमच्या घरी कुठेही मिळणे अशक्य. गुरुनाथ नाईकांबरोबर वेताळ, मॅन्ड्रेकनी तर माझं बालपण भारूनच टाकलं होतं. माझी मावसभावंड कुठून तरी कॉमिक्स मिळवित आणि मी ती हपापून वाचीत असे. अगदी रस्त्यावरून चालताना देखील. आणि त्यावेळी रस्ते इतके शेफारलेले नव्हते. त्यामुळे त्याच्या डाव्या कडेकडेने हातात पुस्तक धरून चालणे तसे काही फारसे धोक्याचे नसे.

आई सुद्धा तिच्या कचेरीच्या वाचनालयातून आमच्यासाठी गोष्टींची पुस्तकं आणीत असे. तिने आणलेल्या पुस्तकांमध्ये आठवण येते ती हॅन्स अॅण्डरसनच्या परीकथा...आंगठ्या एव्हढी थम्बलिना...बर्फाळ प्रदेशातील दोन छोट्या मुलांची कथा. आपल्या हरवलेल्या मित्राला शोधण्यासाठी जिवावर उदार होऊन निघालेली ती छोटीशी मुलगी. हृदय बर्फाचे होऊन गेलेला तिचा तो मित्र...अगदी डोळ्यांत पाणी वगैरे. भा. रा. भागवतांनी तर माझ्या पुस्तकविश्वात कमालच केली होती...फास्टर फेणे ! जादूचे गलबत...असेच काहीसे नाव होते...मुखपृष्ठावरील चित्र देखील स्पष्ट आठवते. काळेभोर आकाश...निळा निळा समुद्र...त्यावर तरंगणारे गूढ जहाज. चंद्रावर स्वारी. ना. धो. ताम्हणकर...गोट्या...चिंगी. साने गुरुजी...श्यामची आई. त्यांच्या अजून कितीतरी कथा आठवतात...त्यातील चित्रं आठवतात. एक गोबऱ्या गोबऱ्या गालांची फुलं विकणारी अनाथ मुलगी...तिला अचानक भेटणारी तिची आई. सज्जन माणसाच्या शोधात आकाशातून आलेली फुलांची माला....अहाहा. टारझन आणि त्याच्या शौर्यकथा ! गलिव्हर देखील तेव्हाच कधीतरी आयुष्यात आला. आणि त्याच्याबरोबर बुटक्यांच्या राज्यात मी फिरले. विं. दा. करंदीकर ! रात्री बिछाने घातल्यावर त्यावर बसून मी हेंगाड वेंगाड...आली आली भुताबाई...चार माणसे रोज खाई...ही त्यांची लांबसडक कविता फार नाटकं करून माझ्या दोन धाकट्या बहिणींना ऐकवीत असे. आणि त्या देखील न कंटाळता तीच तीच भुताबाईची कविता रोज मला म्हणायला लावीत असत. रोजचे नाटक.

जेवणाच्या टेबलावर बसून पुस्तक वाचणे हे सुद्धा मी बाबांकडूनच खरं तर शिकले होते. मी फक्त त्याचं अति केलं म्हणून मग मला ओरडा बसू लागला...आईकडून ! खुर्चीत पाय वर घ्यावयाचे...डाव्या हातात पुस्तक धरायचं आणि उजव्या हाताने जेवायचं. ताटातलं जेवण संपलेलं पत्ता नाही...आई काय विचारतेय...ऐकू येत नाही...अशी अवस्था.

आपल्या मुलीला चित्र काढून काही पैसे मिळणार नाहीत ह्याची खात्री असल्यामुळे असेल वा तिला तिचे स्वत:चे उत्त्पन्न मिळावे ह्या विचारामुळे असेल, बाबांनी मला टंकलेखनाच्या वर्गांना घातले होते. दादर स्थानकासमोर ते वर्ग भरीत असत. मी नियमित तिथे जाई. त्याची पहिली परीक्षा देखील मी दिली होती. मला वाटतं माझ्या टंकलेखनाला ४० पर्यंत गती आली होती. जाताजाता मग मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे सभासत्व घेतले. आणि मग वाचनासाठी बाबांवर अवलंबून रहाणे कमी झाले. मी कोणती पुस्तकं घेऊन घरी येते ह्यावर त्यांचे बारीक लक्ष असे ते वेगळंच. त्यावेळी ना. स. इनामदार ह्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या मोठ्या एकाग्रतेने मी वाचल्या होत्या. झुंज, राऊ, शहेनशाह ही नावं आता आठवतात. नंतरच्या कालावधीत एका मित्राची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी त्याच्याकडील बरीच मराठी पुस्तके मी विकत घेतली होती. त्यात औरंगजेबावरील कादंबरी 'शहेनशाह' होती. मग कधीतरी बाबांनी रामायण महाभारताचे मोठे संच विकत आणले. त्यातून मी त्या महाकथांच्या खोलात शिरले. एकेक पान नवी कथा...एकेक पान नवे व्यक्तिमत्व.

आमचे कधी कपड्यांचे लाड झाले नाहीत. पण खाणे आणि पुस्तके ? मुबलक ! बाबांनी कपड्यांची हौस केली नाही. त्यांनी कधीही रंगीत कपडे अंगावर घातले नाहीत. कायम पांढराशुभ्र शर्ट आणि पांढरी विजार. चामड्याच्या भरभक्कम चपला. मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरील रद्दीवाल्यांशी त्यांची पक्की दोस्ती. तेही पाटलांना आवडतील अशी पुस्तके बरोबर ओळखून बाजूला काढून ठेवीत. बाबांनी आपल्याला बढती देण्यात येऊ नये अशी विनंती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याजवळ सुरवातीलाच करून ठेवली होती. कारण एकच. "मला बढती दिलीत तर मला इथे जास्तीचे तास बसून काम करायला लागेल. आणि ते मला जमणारे नाही. मला घरी जाऊन माझे वाचन व लिखाण करावयाचे असते. ते माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे."

मे महिन्याच्या सुट्टीत घराजवळील किर्ती महाविद्यालयामध्ये त्यावेळी लहान मुलांसाठी वाचनालय चालवले जात असे. भारी सुंदर उपक्रम होता तो. त्यावेळी तेथील वाचनालय ऐसपैस सभागृहात होते. आत शिरल्याशिरल्या समोर मोठ्या खिडक्या...त्यातून आत येणारा स्वच्छ सुर्यप्रकाश. वेगवेगळ्या कपाटांमध्ये दडलेला खजिना. आपण त्यातून अलगद फिरायचे...पुस्तके हातात घ्यावयाची...चाळावयची...कधी एखाद्या खिडकीजवळ बसून त्या पुस्तकात डुबकी मारायची...तर कधी त्या पुस्तकाला हातात घट्ट धरून घरी परतावयाचे. सकाळी जर त्याला आपण ताब्यात घेतले असेल तर दुपारपर्यंत त्याचा शेवट गाठावयाचा...आणि मग पुन्हा...कीर्ती महाविद्यालय....तेथील खिडक्या....आता फक्त ऊन उतरलेले....सूर्यकिरणे थोडी मवाळ....कपाटे अथक जागच्याजागी आपली वाट बघत उभी...एका दिवसात दोन पुस्तकांचा फडशा !

प्रेमात पडल्यावर, लग्न झाल्यावर आणि लेक मोठी झाल्यावर...माझ्या स्वत:च्या आजवरच्या आयुष्याचे ३ टप्पे मला दिसून येतात. कुठलीही गोष्ट करायला घेतल्यावर भान हरपून करण्याचा स्वभाव असल्याने प्रेमात पडल्यावर वाचन कमी झाले. मिल्स अॅण्ड बुन्स फार वाचली गेली नाहीत ह्याला कारण पुन्हा बाबाच. एखाददुसरी जी काही वाचली, त्यातील 'टॉल, डार्क अॅण्ड हॅण्डसम' कुठे रोजच्या आयुष्यात आढळला नाही. त्यानंतर हातात पडलं ते शांता शेळके ह्यांचं चौघीजणी ! ह्या पुस्तकासाठी मात्र माझं भांडण बाबांशी नव्हे तर माझ्या धाकट्या बहिणीशी फार झाले. तिच्या आधी उठून ते पुस्तक ताब्यात घेणे, न्हाणीघर, संडासमध्ये जाताना देखील पुस्तक हातातून खाली न ठेवणे, घराबाहेर पडताना पुस्तक घेऊनच बाहेर पडणे हे सर्व प्रकार मी ह्या पुस्तकासाठी केले. जर हे करण्यात मी कुठे कमी पडले, तर माझी बहिण हमखास पुस्तक पळवून नेई. आणि मग तिच्याकडून परत मिळवण्यासाठी फार मोठा लढा द्यावा लागे. तेव्हाचा मित्र (नंतर नवरा...हे आधीच सांगून टाकलेलं बरं ! ) डोंबिवलीवरून येत असे व मी दादरवरून. एकमेकांना भेटण्यासाठी आम्ही आमच्या कॉलेजजवळचे व व्हीटी स्थानकासमोरचे एक बसस्थानक निवडले होते. तिथे मी 'चौघीजणी' घेऊन वाचत उभी राही आणि आपण कोणाची वाट पहात आहोत हेच विसरून जाई. तेव्हाही आपल्या गाड्या उशिरानेच धावत असल्याकारणाने मी नेहेमीच आधी पोचत असे. व तो चांगला तास दोन तास उशिरा येई. पण पुस्तकात रमल्याकारणाने तास उलटून गेला आहे ह्याचे मला भानच नसे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील 'त्याचे' महत्त्व कमी होऊन 'चौघीजणी' चे महत्त्व फार वाढले आहे असा त्याचा समज झाला व त्याने माझ्या बसथांब्यावरील वाचनाला जोरदार विरोध दर्शवला. तसेही आपल्याला डोके आहे, विचारशक्ती व मत असू शकते ह्याची त्या वयात मला फारशी जाणीव नव्हती.

यानंतर लग्न. नोकरी दादरला आणि घर डोंबिवलीला. मग मी रेल्वे स्थानकापासून घरी पोचण्याच्या रस्त्यावर दुसरे वाचनालय शोधून काढले. आगगाडीत बसून पुस्तक वाचण्याची सवय जडवून घेतली. आता ह्यावर नवऱ्याची बंदी येण्याची तसे काही कारण नव्हते. त्या कालावधीत मी असे मोठे काय वाचले...तर फारसे काही आठवत नाही. स्वयंपाक करणे ही नवी जबाबदारी अंगावर पडल्याने बहुधा अर्धे लक्ष तेथेच असावे.

मग माझ्या लेकीचा जन्म झाला. आणि मी संसारात बुडून गेले. मातृत्वाच्या सुखावधीत वाचलेली पुस्तके म्हणजे बेन्जामिन स्पॉक ह्यांचे 'बेबी अॅण्ड चाईल्ड केअर' आणि डॉ. वागळे ह्यांचे 'बालसंगोपन.' बस इतकंच. त्यातील माहिती वाचून मी माझ्या लेकीवर बरेच प्रयोग करीत असे. आणि त्यातले एक दोन तर फार चुकीचे. म्हणजे तीन महिन्याच्या बाळाला उकडलेल्या अंड्याचे पिवळे तुम्ही देऊ शकता हे मी 'बालसंगोपन'मध्ये वाचले. व चिमुकल्या चमच्यात बोटाच्या अर्ध्या पेराइतके उकडलेले पिवळे घेऊन लेकीला चाटायला मी दिले. आता ह्यात माहिती अशी होती, की डॉक्टरांनी हे पिवळे एखाद्या फळाच्या रसात मिसळून द्या असे लिहिले होते. व मी नेमके तेच वाचले नव्हते. त्यामुळे चमच्यामध्ये फक्त पिवळा बलक मी घेतला व लेकीला चाटवला. एका क्षणात तिने भडाभडा सगळे आधीचे जे खाल्ले होते तेही उलटून टाकले. असाच एक चुकीचा प्रयोग म्हणजे गाजराचा रस बाळांसाठी फार पौष्टिक आहे असेही त्याच पुस्तकात लिहिले होते. व म्हणून मी एक दिवस मारे गाजरे किसली. त्यांचा रस बाटलीत भरला व तिला पाजला. आता हे अजिबात लक्षात आले नाही की तिला मी फक्त एखाददुसरा चमचा रस द्यावयाचा होता. मी बाटली तिच्या तोंडाला लावली आणि तिने ती रिकामी केली. जेमतेम आठ महिन्याची माझी लेक त्यापुढील पंधरा दिवस फार आजारी पडली. जी काही गुटगुटीत दिसू लागली होती, ती अगदी निम्मी झाली.
हे असे माझे पुस्तक वाचून केलेले प्रयोग. त्याची बळी माझी लेक. ती वर्षाची होईस्तोवर लिखाण केलं ते देखील तिच्या आयुष्यातील पहिलं वर्ष, ती मोठी झाल्यावर तिला वर्णून सांगता यावं म्हणून. 'Baby's record book' मध्ये.

बाबांना जेव्हा छातीत दुखतंय म्हणून मी हिंदुजामध्ये रात्री घेऊन गेले, त्यावेळी इसीजी वगैरे ठीक आला म्हणून तेथील डॉक्टरांनी आम्हाला परत घरी पाठवून दिलं. मग पहाटे बाबांना परत अस्वस्थ वाटू लागलं आणि अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. दोन माणसं स्ट्रेचर उचलू लागली. आणि बाबा त्यांच्या काळजीत पडले. "तुम्हाला जड पडतंय का हो ?" आईने बाबांच्या हातावर साखर ठेवली. आम्ही हिंदुजामध्ये पोचलो. बाबा तेथील बिछान्यावर लवंडले. दुपारपर्यंत सगळे डॉक्टर जमा झाले. मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. "पाटील त्यांना पहिला झटका आला होता त्याच अवस्थेला आता पोचले आहेत. काही सांगता येत नाही." आणि तसेच झाले. बाबांना नाकातोंडात वेगवेगळ्या नळ्या लावल्या गेल्या. बोलणं अशक्य झालं. मी समोर उभी होते...मला बाबा काहीतरी खुणा करीत राहिले. कसे कोण जाणे, मी मागे वळले...आणि तिथल्या नर्सकडे धावले..."मला तुमची वही आणि पेन्सिल द्या ! प्लीज पटकन द्या !" मी त्यांनी दिलेला कागद आणि पेन घेऊन धावत बाबांकडे आले. "बाबा, ह्याच्यावर लिहा....काय हवंय तुम्हाला ? काय होतंय तुम्हाला ?" 
बाबांनी कागद धरला...आणि लिहिलं...
"मला पुस्तकं वाचायचीत"

आज आता मी वाळिंब्यांचे 'हिटलर' वाचते. 'आणीबाणी आणि आम्ही' हे मित्राकडून मागवून घेते. नेल्सन मंडेला ह्यांचे 'Conversations with Myself' हे मित्रमैत्रीणींकडून हक्काने वाढदिवसाची भेट म्हणून मागून घेते. आता का कोण जाणे कथाकादंबऱ्यामध्ये मन नाही रमत.
आज पुन्हा बाबा हवे होते....
मी काय वाचते आहे ह्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणारे...
मी वाचावी अशीच पुस्तकं घरी घेऊन येणारे.
नेल्सन मंडेला वाचता वाचता काही अधोरेखित करून ठेवावसं वाटतं...पण त्यावेळी प्रश्न पडतोच...मी हे नक्की कशासाठी आणि कोणासाठी खूण करून ठेवते आहे ?
काय माझे बाबा त्यातून काही मला समजावून सांगणार आहेत ? त्यावर माझ्याशी चर्चा करणार आहेत ? मी खूण केलेली वाक्यं त्यांना देखील आवडतील काय ? मी त्यावर विचार करतेय हे बघून त्यांना माझा अभिमान वाटेल काय ?
बाबांनी सगळी पुस्तकं स्वत: आधी वाचायला घेतली...'सेन्सॉर' केली तरी आता माझी त्याला हरकत नाही.
आजही मी गपचूप त्यांच्या मागे उभी राहून त्या पुस्तकात डोकावेनच की ! आणि तसंही बाबा वाचनात इतके दंग होऊन जातात की त्यांना कळत सुद्धा नाही...किती वेळ उलटून गेला, मी त्यांच्या पुस्तकात डोकावते आहे...आणि त्यांचाच वेग पकडून वाचायचा प्रयत्न करते आहे...
नाहीतर माझं अर्धवट वाचून होईल...आणि बाबा पान उलटतील ना....?!

25 comments:

रोहन... said...

सुंदर झालीये पोस्ट. अख्खा जिवनपटच उलगडला आहे ह्यात. :)

'Shivaji Underground' ह्यावर पोस्ट हवीये मला. मी वाट बघतोय.

onkardanke said...

माणासाचे आयुष्य पुस्तकाच्या भोवती कसे गुंफलेले असू शकते हे या पोस्टवरुन समजते.प्रत्येक वाचनवेड्याला आपली वाटेल अशी झाली आहे पोस्ट.

हेरंब said...

सुंदर !! खूपच हळवी पोस्ट :)

Amar Pawar said...

मस्त पोस्ट :)

सचिन उथळे-पाटील said...

खुपच हळवी झालीये पोस्ट ...

>> आता का कोण जाणे कथाकादंबऱ्यामध्ये मन नाही रमत.
- ह्म्म्म ... बरीचशी समज आल्यावर आणि थोडफार का होईना आयुष्याचा धडा गिरवल्यावर खोट्या खोट्या गोष्टीत मन रमतच नाही का..

इंद्रधनू said...

खूप आवडली पोस्ट.... आणि वाचताना मी कधी कोणतं पुस्तक वाचलं होतं हे ही आठवत गेलं....

Abhishek said...

ह्या लेखाची समीक्षा करणारा शोधावा लागेल, इतक काही लिहील गेल आहे ह्यात!
चुकून(!) मी कमेंटच आधी वाचल्या... आणि लेख वाचता वाचता त्या योग्य प्रकारे अर्थाने भिनल्या...
संस्कार लावून घेण ह्यात आपला पण थोडा (खारीचा!) वाटा असतोच...

Prof. Narendra Vichare said...

अनघा, "आपले दुखणे बाजूला सारून स्ट्रेचर उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी करणारे" फक्त तुझे बाबाच असू शकतात आणि अखेरचा निरोप घेताना सुद्धा पुस्तक वाचायची " अखेरची इच्छा धरणारे देखील, मला माहित असलेले फक्त " विश्वासराव पाटील" च असू शकतात......

shriraj moré said...

Mi tuza bhau mhanun janmalo asto tar mla he sagla anubhavayla milale aste... Post sundar zaley...kadhi vachun zali te kalla dekhil nahi

भानस said...

मस्त झालीये पोस्ट. वाचनाचा प्रवास उलगडलास. :)

पुस्तकं आपल्याला प्रेमात पडायला लावतातच. वयानुरुप व काळानुरुप फक्त त्यांचा रोख बदलतो. मात्र आधीचीही पक्की स्मरणात राहून जातात.

लेकीवरचे प्रयोग भारीच गं!:D

Apurva Patil said...

Once in a week, Fantom and Mandrek comics used to come along with the newspaper! Even the comics, Baba used to read before us, he used to wait for those as eagerly as us!!

Mahendra Kulkarni said...

वाह, खूप सुंदर झाली आहे पोस्ट, आधी पण वाचली होती, पण कॉमेंट पब्लिश होत नव्हती :)

Mahendra Kulkarni said...

शांता शेळके यांचे एक पानी वाचून पहा.. मस्त आहे पुस्तक

अनघा said...

रोहन, प्रयत्न तरी तोच होता. :) :)

अनघा said...

ओंकार, आभार. :) :)

अनघा said...

हेरंबा, संसाररुपी मोठ्या गॅप नंतर पुन्हा वाचायला सुरवात केलीय ! :)

अनघा said...

अमर, आभार. आणि उशिरा उत्तर देतेय त्याबद्दल मनापासून माफी. :)

अनघा said...

सचिन, अगदी खरं बोललास ! सध्या आत्मचरित्र वाचायला अधिक आवडू लागलंय त्याचं हेच कारण असावं...असावं नाही...आहेच. :)

अनघा said...

इंद्रधनू, लिहायला सुरवात केली आणि एकेक समोर येत गेलं. आभार प्रतिक्रियेबद्दल. :)

अनघा said...

अभिषेक, हो ना !
प्रतिक्रियेबद्दल आभार. :)

अनघा said...

सर, तुमची प्रतिक्रिया आली की मला भारीच आनंद होतो ! म्हणजे तुम्ही मला आणि माझ्या बाबांना पण अगदी आतून ओळखता ना ! म्हणून ! :) :)

अनघा said...

श्रीराज, तुझं वाचन दांडगं आहे हे माहितेय बरं का मला ! :)

अनघा said...

श्री, :)
आभार गं.

अनघा said...

अपूर्वा, :D :D
आठवतंय ना तुला पण सगळं !? बाबांच्या लबाड्या ! :D

अनघा said...

महेंद्र, बऱ्याच दिवसांनी दिसताय ! आभार प्रतिक्रियेबद्दल. :)
आणि दुर्गाबाईंचं दुपानी वाचलंय ! एकपानी शांताबाईंचं आहे म्हणजे अप्रतिमच असणार ! नक्की वाचेन ! :)