नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 3 January 2013

गुलाबी कांचन...दानव...मुक्ती...जिवंत मरण...आणि बरेच

दुरून बघितले तर प्रश्न पडावा...नारळाच्या झाडाला काय गुलाबी फुले येतात ? जवळ जावे तर हे असे...अंगणातील वाढत्या नारळाच्या कुशीत शेजारीच बहरलेल्या नाजूक कांचनचे गुलाबी फूल अलवार विसावलेले. जसे, शेजारच्या मुलीवर कोणा मुलाचे प्रेम बसावे, व तिनेही मोठ्या विश्वासाने त्याच्या भरदार छातीवर मान टेकावी. 
नाजूक मन...हळव्या भावना.

गेल्या मे महिन्यात शेजारणीने माझ्या डवरलेल्या आंब्याच्या झाडावर एकही आंबा शिल्लक ठेवला नाही. त्यावर भांडण झाले...बाईने जमिनीवर पडलेला दगड उचलून आमच्या घरी काम करणाऱ्याच्या अंगावर उगारला...मी त्या कृतीचे फोटो काढले...सोसायटीकडे लेखी तक्रार वगैरे नोंदवली गेली...मिटिंगमध्ये ह्यावर चर्चेचे एक सोंग आणले गेले. वगैरे.
त्या बाईंचे परवा कळले ते वक्तव्य असे...
"आमच्या लेकाने एखाददुसरा आंबा काढून घेतला असेल...ह्या बाईने त्याचा केव्हढा मोठा इश्यू केला...!"
ह्यावर विचार केला असता...ह्या घटनेमुळे माझे नुकसान असे कितीसे झाले ? शेकडा दोन शेकडा आंबे चोरीला गेले. त्यामुळे मला, माझ्या लेकीला, माझ्या मित्रमैत्रिणींना त्या आंब्यांचा स्वाद घेता नाही आला...तसे बघायला गेले तर माझे नुकसान ते काय ते हे इतकेच.

मी लहान होते त्यावेळची गोष्ट. भातुकलीच्या खेळाची नुकतीच ओळख झाली होती. माझ्याहून पाच सहा वर्षांनी मोठ्या मामेबहिणीच्या इटुकल्या पिटुकल्या खेळातून. छोटी वाडगी, चिमुकली चूल..सर्व काही तांब्यापितळेचं. काही दिवसांनी तिला तिची खेळणी सापडेनाशी झाली. आजीकडे एक गडी कामाला होता, महादू. बहिणीने घरभर शोधले, तिला काही तिची भातुकली सापडेना. महादू तिला म्हणाला," ताई, इथे ह्या घरी शोधून तुम्हाला नाही काही मिळणार. धाकट्या पाटलीणीकडे शोधा...सगळी भांडी सापडतील !"
त्यातील काही भांडी कधीतरी मी माझ्या घरी घेऊन गेले होते. हे जे आपण करतो आहोत त्याला चोरी म्हणतात हे काही वयाच्या पाचव्या वर्षी कळले नाही. आणि माझ्या मामेबहिणीने तिच्या वा माझ्या आईबाबांकडे तक्रार देखील केली नाही. त्यामुळे ती तिची खेळणी माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडेच राहिली. मी म्हणजे एक लाडोबा प्रकरण होते, त्याचे हे उदाहरण. मात्र, आज देखील ह्या प्रसंगाची आठवण माझ्या मनात कुठेतरी कोरून बसली आहे. आणि चोरी असे म्हटले की ती आठवण वर डोकावते. लाल ओल्या मातीत दडून बसलेल्या लाल गांडूळासारखीच. मान काढून वर डोकावते, आणि पुन्हा दडून स्वस्थ बसून रहाते.

शाळेत, जुई आणि मी एका बाकावर बसत असू. सहसा आमच्यात भांडणं होत नसत. त्यामुळे अख्खा बाक हा आमचा दोघींचा असे. मात्र, कधी काळी भांडण झालेच तर अगदी पट्टी लावून, मोजूनमापून, बाकाची रुंदी काढली जाई. मधोमध खडूने रेघ ओढली जाई. हद्द. अर्धा बाक तिचा, अर्धा माझा. मग कधी माझ्या एखाद्या पेन्सिलीने घरंगळत जाऊन तिच्या हद्दीत लोळण घेतली तर शांत होऊ घातलेलं भांडण पुन्हा उफाळून वर येई...आणि पुढे चालू राही. विझत चाललेल्या आगीत एखादा चमचा तेल वगैरे.

भरलेले आंब्याचे झाड रिकामे केले गेले होते हे सत्य.
१२/१३ वर्षांचा शेजारणीचा लेक. तिच्या मते, तिच्या लेकाने एखाद-दुसरा आंबा माझ्या अंगणातून काढला होता. आपल्या मुलाचा बचाव करताना, तिने दुसऱ्या माणसावर चोरीचा आळ घातला...त्याच्यावर दगड उगारला...आकांडतांडव केले. ह्या सर्व घटनेला तिच्या बाजूलाच उभा असलेला तिचा लेक साक्षीदार होता.

मुलांना पुढ्यात वा बाजूला बसवून आईवडील, चालवित असलेले वाहन सिग्नल न पाळता जेव्हा भरधाव पळवीत असतात, तेव्हा ते 'आपण नियम पाळणे हे जरुरीचे, गरजेचे नाही.' हे आपल्या मुलांच्या मनात बिंबवीत असतात. उद्या पुढे ज्यावेळी त्या मुलाच्या/मुलीचा हातात वाहन येईल त्यावेळी त्याच्या/तिच्या चुकीने झालेल्या एखाद्या अपघातात जर त्याचे /तिचे निधन वा आयुष्यभराचे अपंगत्व आले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या पालकाच्या शिरावर आहे.

उद्या मोठे झाल्यावर मुलगा अफरातफर, बलात्कार अशा प्रकारच्या गुन्ह्यांत गुंतू लागला तर 'एखादी वस्तू माझी नसताना देखील ती बळजबरीने हिसकावून घेऊन त्यावर ताबा मिळवणे' ही वृत्ती बळावण्यामागे, लहानपणापासून नीट संस्कार न होणे हे प्रबळ कारण आहे.

अनेक लेख सध्या वाचनात येत आहेत. बरेच इंग्रजी भाषेतील. संशोधनात दिसून आले आहे ते असे, ८०% बलात्कार हे त्या स्त्रीच्या परिचयातील माणसांनी केलेले असतात. ज्यावेळी विधवा विवाहविषयक कायदा नव्हता त्यावेळी घरातील विधवेवरील अत्याचारांना सीमा नव्हती. घरातीलच, काका, मामा, सासरे, दीर, हेच गुन्हेगार असत. त्यावर बाहेर तोंड उघडणे अशक्यप्राय. स्त्रियांनी केशवपन करावे, त्यांनी अंगावर लाल वस्त्र परिधान करावे हे समाजाने त्यांच्यावर लादलेले नियम. तसे करून देखील त्यांच्यावरील अत्याचार काही कमी झाले नव्हते. ह्याचा अर्थ स्त्रियांनी अंगभर कपडे घालावेत. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमणे होणार नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल.

हद्द. ते तुझं. हे माझं.
हद्द. एक मर्यादा.

काल सकाळी मी घरातील महत्त्वाची परंतु मागे पडलेली कामे करण्यासाठी सुट्टी घेतली होती. सर्व गरजेचे कागदपत्र हातात घेऊन पायी निघाले होते. समोर कॉलेज आहे त्यामुळे देशाची भावी पिढी सतत समोर असते. पाच सहा तरुण मुलांचा घोळका कोपऱ्यावर उभा होता. त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. हसणे खिदळणे चालू होते. त्यांच्या बाजूने पुढे सरकता सरकता एक संवाद कानी पडला. तेव्हा मी मान फिरवून हे कोण बोलले म्हणून बघितले. नाकावर जाड भिंगाचा चष्मा, रंग काळा, उंची तशी कमी. "जा जा...घे तिला !" त्याचे उद्गार हे होते. समोर उभ्या असलेल्या मित्राला तो हा सल्ला देत होता. सगळे त्याचे मित्र त्यावर खिदळले. 'घे तिला' ह्याचा अर्थ 'तिची फिरकी घे' इतका माफक असावा अशी मी माझ्या मनाची भाबडी समजूत काढली. व त्या कधीही न बघितलेल्या मुलीचे भले चिंतून पुढे निघाले.

मर्यादांचे उल्लंघन.

एखादा चित्रपट, एखादे नाटक आपण ज्यावेळी बघायला जातो, त्यावेळी बऱ्याचदा एखादा अश्लील विनोद समोर पडद्यावर वा मंचावर केला जातो. अंधारलेले प्रेक्षकगृह खदखदुन हसते...पुरुष आणि स्त्रिया. कदाचित त्याच विनोदावर तीनचार मित्रांमध्ये तीच माणसे हसणार नाहीत. बिचकतील. परंतु, झुंडीमध्ये असताना आतील भावना बेधडक बाहेर येतात. गर्दीला चेहरा नसतो. आपल्याला मात्र आपले मन गर्दीत देखील हसू देत नाही. हे आपल्यावर झालेले संस्कार असतात. आपल्या आईवडिलांनी व आपल्या शाळेने केलेले.

'बलात्कार करणाऱ्या माणसाला फाशीची शिक्षा दिली जावी' ही एक मागणी आजच्या समाजाची.
ज्या दुर्दैवी स्त्रीवर बलात्कार होतो...त्या घटनेनंतर प्रत्येक क्षणाला ती मरणाला सामोरी जाते. मग ज्याने बलात्कार केला त्याला एका क्षणात का बरे मुक्तता मिळावी ?
फाशी वा कुठलेही मरण, ही वेदनेपासून वा दु:खापासून मुक्ती नव्हे काय ?
जेव्हा आपण धावत्या जगाची गती पकडायला निघतो तेव्हा आपले आपल्या गत माणसांचे दु:ख देखील बोथट होते.
मग फाशी दिलेल्या माणसाची सतत आठवण काय माझ्या मनात जागी रहाणार आहे ?
त्या ऐवजी शिक्षा ही 'रोजचे मरण' अशी का दिली जाऊ नये ?
कदाचित शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेसारखी. शिक्षा ताबडतोब फर्मावली जाणारी.
हातपाय तोडा आणि समाजात जगण्यास सोडून द्या.
त्या माणसाला ही जन्माची शिक्षा आणि वेदना.
समाजाला जळते जागते डोळ्यांसमोर उदाहरण.

'आई, तू मला शिकवलेस म्हणून कधी मला ट्रॅफिक पोलिसाने पकडले ना तर मी काही त्याला पैसे चारायला जात नाही. मी माझे लायसन्स जप्त होऊ देते. आणि नंतर दंड भरून ते ताब्यात घेते. पण माझी एकही मैत्रीण वा एकही मित्र असं करीत नाही ! ते सगळे त्या पोलिसाला पैसे देतात आणि जातात पुढे लायसन्स घेऊन !" माझी लेक मला सांगते. जन्माला येऊन मी समाजाचे काही भले नाही करू शकले परंतु, मी समाजाची हानी होईल असे तरी निदान नाही केले इतके माफक समाधान घेऊन मी मरू शकते. जन्माला येणे हे काही आपल्या हातात नाही. परंतु, आपण जन्माला घातलेल्या मुलाला माणूस बनवायचे की पशू हे तरी निदान आपल्या हातात आहे. हातात माती आली की कुंभार त्याचे सुंदरसे व उपयोगी असे मडके बनवतो...आपण हातात माती आली...त्याची मातीच केली असे नको व्ह्यायला. कुंभाराचे हे उदाहरण शतकानुशतके वापरून बोथट झाले असेलही परंतु, आता इथे ते चपखल बसते.

'आमच्या एकूण तीन पिढ्या चूक ठरलेल्या आहेत...व त्यामुळे हे भ्रष्ट्राचारी पुढाऱ्याचे पेव फुटले आहे' असे एकदा एका चर्चेत कोणी म्हटल्याचे आठवते. आता जे गुन्हे समोर येत आहेत त्यातील गुन्हेगारांची वये ही१७...१८...२२..२५ अशी सुद्धा आहेत.
ह्याचा अर्थ हे एक दुष्टचक्र सुरु झाले आहे. आमची पिढी चुकली...आमच्या मुलाबाळांवर आम्ही नीट संस्कार नाही करू शकलो...त्यामुळे आमची मुले जी पुढे जाऊन समाजाची नागरिक म्हणून रिंगणात उतरली ते पशू म्हणून...
आता त्यांनी जन्म घातलेले अजून काय असणार...पशूच नव्हे काय ?

खूप पूर्वी एक कथा वाचली होती...भयकथा.
त्यातील स्त्री असह्य प्रसववेदना देऊन एका बाळाला जन्म देते...ते बाळ मानवी नसते...अतिशय विद्रूप, भयानक...राक्षसी बाळ असते. मुखातून बाहेर येणारे धारदार पिवळे सुळे घेऊन जन्माला आलेले. तरीही ती स्त्री आपल्या बाळाला ममतेने हृदयाशी धरते. त्यावेळी त्याच सुळ्यांनी ते राक्षसी बाळ तिच्या दुधाने भरलेल्या स्तनांमध्ये, आपले सुळे रोवते...अशी काहीशी ती कथा.
त्यावेळी धक्का देऊन गेली होती.
आजतागायत त्या कथेचा विसर नाही पडला.

नाजूक असे आता काहीही नाही...
फक्त सहा इंची हिंस्त्र काटेरी राक्षसगण..

भय इथले संपत नाही.

14 comments:

मोहना said...

छान आहे लेख, थोडं विषयांतर झालं असं वाटलं काही ठिकाणी. तुम्ही ज्या कथेचा उल्लेख केला आहे ती रत्नाकर मतकरींची ’कळकीचं बाळ’. आम्हाला लहानपणी आमचे ’चांदोबा’, दिवाळीच्या वेळी खास आमच्यासाठी आणलेली पुस्तक नंतर शेजारच्या घरात तिथल्या मुलीचं नाव घातलेली मिळायची. मलाही चोरी म्हटलं की ते आठवतं नेहमी!

shriraj moré said...

Aslya paristhitit tol dhalu na deta lihina far kathin ahe... tarihi tu khup changlya shabdat post lihili ahes

हेरंब said...

सारंच फार भयंकर आहे !! पुढच्या पिढीला काय काय बघावं आणि पचवावं लागणार आहे देवच जाणे !!

Yogesh said...

अनघा ताई...खर आहे... "उद्या" फ़ार भयंकर आहे.... "उद्याची पिढी" हाच कदाचित समाजापुढील आव्हान असेल. अंधानुकरणाच्या नादात मुल्य शिक्षण,संस्कार, सामाजिक बांधिलकी या सर्वांची सध्या वानवा आहे.

Pankaj - भटकंती Unlimited said...

पुढची पिढी ही भवितव्याचा आधारस्तंभ आहे, पण त्या स्तंभावर आपण संस्कार करुन नैतिकदृष्ट्या अधिक सबळ करायचे की, त्यालाच आपल्या वागणुकीच्या उदाहरणांतून कोरण्या लावून पोकळ करायचे याचा निर्णय मात्र आपल्या हाती आहे.

अवांतर: मायान संस्कृतीला जगाचा विनाश म्हणजे नैतिक विनाश असेच म्हणायचे होते का? त्यातून एक जहाज असे उरावे की ज्यांची खरीच किमान बेसिक नैतिकता शिल्लक आहे.

aativas said...

प्रत्येक पिढीला 'आता पुढच्या पिढीचं कसं होणार' अशी एक चिंता असते. काढेल ती पिढी मार्ग - हुशार, विचारी आणि प्रगल्भ आहे ती आपल्यापेक्षा!

तुम्ही एक करा काही दिवस. वाईट अनुभवांबद्दल लिहूच नका - फक्त चांगल्या अनुभवांबद्दल लिहा. तुमचं तुम्हालाच बरं वाटेल.

आणि हो, शेजारच्या त्या मुलाला बोलावून डझनभर कै-या द्या आधीच. बघा त्याने काही फरक पडतोय का ते. प्रयत्न करून बघायला काय हरकत?

अनघा said...

मोहना, बरेच विचार डोक्यात चालू होते...त्यामुळे विषयांतर झालंही असेल...धागा एकच धरला होता हे मात्र खरं.
मला ते 'कलकीचं बाळ' की 'कळकीचं बाळ' तेच नव्हतं आठवत. आणि गुगल करून काही फायदा नाही झाला कारण ते स्पेलिंग इंग्रजीतलच मिळत होतं !
धन्यवाद.

अनघा said...

श्रीराज, प्रयत्न तसा केलाय.

अनघा said...

हेरंब, इतिहास भविष्य ठरवत असतो.
जितकी मी कसलीही काळजी न करता रस्त्यांतून फिरू शकत होते....तसे मी लेकीला फिरू देऊ शकत नाही...गल्ल्या जरी त्याच असल्या तरी.

अनघा said...

योगेश, पालक आणि शाळा ह्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे असं वाटतं. नाही का ?

अनघा said...

पंकज...एक जहाज...आवडलं हे...ते जहाज सध्याच्या त्सुनामीत देखील तग धरायला हवं मात्र.

अनघा said...

सविता, पुढील पिढीचे जगणे, आपण जे करून ठेवतो त्यावर बरेच ठरते. जसे, आपल्या आधीच्या पिढीने केलेल्या आत्मबलिदानाच्या जोरावर स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत.
असे अर्थात मला वाटते.

तुझा सल्ला नक्की लक्षात ठेवेन.

शेजारच्या मुलाला शेकडा दोन शेकडा कैऱ्या द्याव्या लागतील. आणि वर म्हटल्याप्रमाणे, प्रश्न फक्त आंबे चोरीला जाणे हा नव्हता. एक मूल वाढवणे म्हणजे फक्त 'मी आणि माझे मूल...मला जसे हवे तसे वाढवेन' असे असू नये. कारण शेवटी ते मूल हा बाहेरील समाजाचा एक घटक असतो/होणार असतो. आणि तो समाजाला हानिकारक असा आपण बनवू/घडवू नये. असे म्हणायचे होते. कदाचित मी ते नीट उतरवू शकले नसेन.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

तृप्ती said...

:(


आजुबाजुला अशा घटना घडताना त्याबद्दल न लिहिणे/बोलणे टाळण्यापेक्षा मनातल्या विचारांना वाट करुन दिलेली बरी.

इंद्रधनू said...

आमचं आंब्याचं झाड वाढून थोडं अंगणाबाहेर आल्याने कैऱ्या चोरणाऱ्यांचा उपद्रव दर वर्षी सहन करावा लागतो... पण झाडावरच्या सगळ्याच कैऱ्या गायब झाल्या तर हा विचारही करू शकत नाही मी.....
चोरी तर मला वाटतं लहान असताना प्रत्येकानेच केली असेल.... मी भांडीकुंडी खेळताना एकदा पेरूची फोड चोरल्याचं मला आठवतंय.....
बाकी आजूबाजूची परिस्थिती फारच भयंकर होत चालली आहे आणि संवेदनशील मन ते फार पटकन पकडतं....