नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 25 December 2012

एक प्रयत्न...

तसाही विचार करायला फारसा वेळबीळ मिळत नाही. आणि त्यातून कामाचा प्रकार असा आहे की २४ x ७ डोकं लढवत बसणे भाग असते. जाहिरात क्षेत्रामध्ये कुठल्याही कामाचा 'रिझल्ट' हा ताबडतोब दिसून यावा लागतो. म्हणजे जाहिरातीत जे काही बोलले जाईल त्याच्याशी वाचक (प्रिंट मिडीया), श्रोता (रेडियो ) वा प्रेक्षक (टीव्ही वा चित्रपट) हा त्वरित कनेक्ट व्हावयास हवा. समोरच्या माणसाच्या भावनांना हात वगैरे. त्यामुळे प्रत्यक्ष एखाद्याशी बोलण्याचा प्रश्न उद्भवला तर आपण जे काही बोलतो आहोत, ते समोरच्याला समजेल असे असावे. त्याच्याकडून आपल्याला जी अभिप्रेत आहे ती कृती मिळवण्यासाठी काय प्रकारची भाषा व काय बोलले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा मेंदू तयार झाला आहे....वा तयार होत आहे.

हल्ली माझ्यावर सार्वजनिक वाहनांचा लाभ घेण्याचे प्रसंग कमी येतात. त्यामुळे जिथे 'नियम पाळणे' ह्या आपल्या कर्तव्याची सर्वप्रथम परीक्षा होते ते बहुतांशी तरी माझ्याच हातात असते. आणि मी नियम तोडायला जात नाही.

मात्र गेल्या काही दिवसांत ३ वेळा मला टॅक्सी करावी लागली. मग तीनही वेळा दार उघडून आत शांतपणे बसल्याबसल्या मी चालकाला चार गोष्टी सांगितल्या. सर्वात प्रथम मला नक्की कुठे जायचे आहे ते. दुसरी, तिसरी आणि चौथी गोष्ट...पहिल्यावेळी मी आधी मराठीत बोलून पाहिलं. मग लक्षात आलं की शेवटी मी जे काही बोलणार आहे ते फार महत्त्वाचं आहे...आणि ते समोरच्याला कळणे जरुरीचे आहे. समोरच्याला संवादाची भाषा हिंदी हवी होती...मग मी हिंदीत बोलले. माझ्या मुंबईच्या धेडगुजरी हिंदीत. पण ठामपणे.
"अब हम चार चीजें करेंगे...एक...हम खालीफोकट हॉर्न नही बजायेंगे...दो...हम एक भी सिग्नल नही तोडेंगे...तीन...हम झीब्रापे सवार नहीं होंगे...और लास्ट में...हम खिडकी के बाहर थुकेंगे नहीं."
"ठीक हैं...ऐसा ही होगा...!"
"धन्यवाद...!"

प्रत्येक वेळी होकारार्थी उत्तर मिळालं.
आणि त्या तीनही चालकांनी मला दिलेला शब्द पाळला...मी त्यांच्या गाडीत बसले होते तोपर्यंत.

निदान इतकं तरी पुरेसं आहे...नाही का ?
मी काही 'रिक्षा प्रदेशात' रहात नाही...पण हा एक प्रयोग त्यांच्यावरही करून बघायला हरकत नाही.

मला वाटतं...मी ज्या काही भाषेत बोलले...आणि जे काही बोलले...त्यातून समोरच्याला ठराविक कालावधी पुरती का होईना मला हवी ती कृती करावयास मी भाग पाडले.

हा प्रयत्न करून बघता येईल का तुम्हाला ?

Sunday 23 December 2012

ओळखपरेड

लहानपणी पातळ पुस्तकं मिळत असत. मोठ्या अक्षरांची. A४ हून लहान आकाराची. सोनेरी सफरचंद...उडता घोडा वगैरे. त्यातील राजकन्या रूपवती असे...अचानक एके दिवशी अतिशय भयावह राक्षस तिला पळवून नेत असे. दूर दूर उंच उंच पर्वतावर तिला ठेवीत असे. ही बातमी वाऱ्यासारखी दुनियाभर पसरे. दिवसांमागून दिवस उलटत. आणि कुठूनतरी एक रुबाबदार राजपुत्र उडत्या घोड्यावर बसून येई. राक्षसाशी तुंबळ युद्ध करी. त्याचा समूळ नायनाट केल्यावर राजपुत्र त्याच उडत्या घोड्यावर राजकन्येला घेऊन स्वार होई. तिला तिच्या देशात, तिच्या महाली घेऊन येई...तिच्याशी विवाह करून...पुढे कित्येक वर्षं सुखाने राज्य करी.

त्यानंतर आयुष्यात आला रावण. त्याने सीतेला खांद्यावर बसवून पळवून नेले. अशोक वृक्षाखाली तिला विद्रूप राक्षसीणींच्या बंदोबस्तात ठेवले. आणि तिची रोज मनधरणी केली. तिने त्याच्याशी लग्न करावे म्हणून. 

पुढील आयुष्यात अनेक राक्षसांशी ओळख झाली. नरकासुर, महिषासुर, कंस वगैरे वगैरे. नरकासुराने असंख्य स्त्रियांवर अत्याचार केले. त्या त्या देवाने जन्म घेऊन त्या त्या राक्षसाचा वध केला. वेळोवेळी मानवजातीला जगणे सुसह्य करून दिले.

शाळेत जाण्यासाठी बस होती. इमारतीच्या खाली सकाळी बस येत असे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आणून सोडत असे. बसने मुलगी गेली तर ती सुरक्षित राहील अशी आई बाबांची खात्री होती. सात आठ वर्षांची असताना आमच्या शाळेच्या बसचा क्लिनर 'घाणेरडा' होता. लहान लहान मुलींना आपल्या मांडीवर घेऊन त्यांच्या शरीराशी तो चाळे करीत असे. हे चुकीचे आहे आणि ह्याविरुद्ध आपण तोंड उघडावयास हवे...आपल्या आईबाबांना सांगावयास हवे हे कळले नाही...कोणालाच.

रस्त्यात अचानक एखाद्या रिकाम्या गल्लीत एखादा माणूस स्वत:च्या शरीराशी विचित्र चाळे करीत असताना आढळे. त्यावेळी दुसऱ्या पदपथावर जाउन खाली मान घालून चालू पडावे.

कॉलेजसाठी बेस्टच्या बसने येजा करावी लागे. मुद्दाम आपल्या शरीराला हात लावला जात आहे हे कळले की आपण गर्दीतून कसेबसे सरकावे व कुठल्यातरी एखाद्या कोपऱ्यात उभे रहावे.

आपल्याच तंद्रीत इमारतीत शिरावे आणि अचानक पाठून कोणी शरीराला विळखा घालावा. आपण आकांताने किंचाळावे....माणसे जमा करावीत...चेहरा नसलेला माणूस पळून जावा...कोणाच्याही तावडीत न सापडता.

अशा प्रकारचा अनुभव एखाद्या माझ्या सखीला तिच्या आयुष्यात आलाच नसेल हे अशक्य.

राक्षस पुस्तकात वाचले. तेव्हा प्रश्न पडले नाहीत. पण आता पडतात...राक्षस राजकन्येला जेव्हा कैद करून ठेवत असे, काय तेव्हा तो तिच्यावर बलात्कार करीत असे ? ज्यावेळी राजपुत्र राक्षसाचा वध करून राजकन्येची सुटका करीत असे त्यावेळी तिची अवस्था नक्की कशी असे ? त्या अवस्थेत तिला पाहून देखील काय राजपुत्र तिचा पत्नी म्हणून स्वीकार करीत असे ?

रावणाने सीतेची फक्त मनधरणी केली व तिच्यावर बलात्कार केला नाही अशी आपली समजूत आहे की रावण हा एक सद्गुणी राक्षस होता ?

थोरामोठ्यांसमोर स्वाक्षऱ्या केल्या म्हणून नवऱ्याला स्वत:च्या सुखासाठी बायकोवर बलात्कार करण्याचा काय राजरोस कायदेशीर अधिकार मिळतो ?

स्वत: दारू पिऊन मदमस्त झाल्यावर आपला मित्र आपल्या बायकोवर हात टाकतो आहे ह्याचे भान देखील न ठेवणाऱ्या नवऱ्याचे 'राजपुत्राचे देखले कवच' गळून पडलेले बायकोला कळते...मग हे त्याच्या लक्षात कधीच येत नाही काय ?

सादत हसन मंटो. त्याची 'खोल दो' कथा. अवाक करून गेली. पोटात खड्डा पडला...त्यातील तरुण मुलगी आता आपल्या जिवंतपणी आपल्या नजरेपासून कधीही दूर जाणार नाही...हे कळले.

राक्षस सद्गुणी होते.
कारण त्यांच्या माता राक्षसीणी होत्या...बाप राक्षस होते.
त्यामुळे ते बघताक्षणी ओळखू येत होते. कुरूप, अवाढव्य, दहा डोकी...इत्यादी.
आता माणसाने राक्षसाला जन्म घालावयास सुरवात केली आहे.
त्यामुळे आता त्याचे डोळे त्याच्या आईसारखे...नाक बापासारखे...बोटे आजीसारखी...आणि केस आजोबांसारखे.
इंद्रिय मात्र राक्षसाचे.

सखे, आपणच तर ह्यांना जन्म देणार...
मग आता आपण ह्यांना कसे ओळखायचे ?
आणि आपले देव तर आपण मंदिरांत नेऊन बसवले.
त्यामुळे त्या देवळातील मुर्तींतून बाहेर प्रकटबिकट होऊन आपल्या लज्जारक्षणासाठी साड्यांच्या स्पेशल इफेक्टची शक्यता देखील शून्य.
बघ बाई.
राक्षसाची जन्मदात्री देखील तूच.
आणि त्याच्या शरीराखाली चोळामोळा होऊन फाटून निघणारी देखील तूच.

Saturday 15 December 2012

कुणाविना...

बारा तारखेला बाबा जाऊन दहा वर्षं झाली. हे सिद्ध झालं की आपलं माणूस गेलं म्हणून आपण काही मरतबिरत नाही. आता नववर्षाच्या आरंभदिनी नवरा जाऊन दोन वर्षं होतील. म्हणजे सिद्धांताला पुरावे मिळाले. ह्या सगळ्या आपल्या बालसमजुती असतात. माझ्या ह्या समजुती अगदी माझी लेक दोन वर्षांची झाली तरी टिकून होत्या. म्हणजे आमच्या शेजारचे काका अकस्मात गेले त्यावेळी मला अगदी ठामपणे वाटले होते...आता वर्षभरात काकी पण जातील म्हणून. पण तसं काही झालं नाही. त्यानंतरही बरीच वर्षं काकी जिवंत होत्या. बालवयात प्रेमपत्र वगैरे लिहिताना मी बऱ्याचदा लिहिलं होतं...तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही वगैरे वगैरे. तसलं काही झालं नाही. ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. आपल्याला कोणी असं बोललंबिललं तर अगदी म्हणणं खोडून टाकायची गरज नाही...पण उगाच त्यावर विश्वास ठेवायला जाऊ नये. कारण आपले जगणे हे आपले असते. आपण शेवटी स्वत:साठी जगत असतो...स्वत:च्या कर्तव्यांसाठी जगतो...आपल्या टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्यासाठी जगतो.

हल्ली असं बऱ्याचदा होतं...विचारांची वावटळ आणि समोरील पडद्यावर टंकित करता येण्याची गती...ह्यांचा मेळ जुळत नाही. विचार सुसाट लाटेसारखे किनाऱ्यावर आपटून माघारी निघून देखील जातात...आणि मी तिथेच उभी असते....पायाखालचा ओला स्पर्श सुकवत. बधिर. एक लाट...दुसरी लाट...शुभ्र फेस वाळूच्या आरपार झिरपतो...आणि माझे विचार फेसाइतकेच अल्प आयुष्य घेऊन झिरपून जातात...
अस्तित्वाचे नामोनिशाण न ठेवता. 

माझी लेक मला बोलता बोलता म्हणून जाते..."आई, तुझं आयुष्य फार इव्हेन्टफुल झालंय...."

इव्हेन्टफुल आयुष्य...
आणि इव्हेन्ट मॅनेजमेंटचा ना ओ का ठो मला माहिती...!


Tuesday 11 December 2012

तीन...दोन...एक

स्वत:ला ओळखेओळखेस्तोवर अर्ध आयुष्य जातं...आणि जोडीदाराला पूर्ण ओळखतो असं मानून त्याच्यावर आपण आयुष्य सोपवतो !
कसला मूर्खपणा आहे हा !
सोळाव्या वर्षी...तळपत्या उन्हात देखील आकाशात इंद्रधनुष्य असतं...कुजक्या नाल्यात डवरलेले गुलाब दिसतात...!
अक्कलखाती आयुष्य जातं !

पानाला पिवळजर्द होऊन धारातीर्थी पडल्यावर कळत असेल काय....वर हे इतकं अथांग आभाळ पसरलं होतं...त्याच्या देखील नकळत...अचानक एखादी वीज त्याचे हृदय फाडून जाते...आणि तरी सुद्धा ते आभाळ जणू सर्व आलबेलच आहे असा आव आणून, पृथ्वीवर सावली धरून उभं रहातं !
कमाल आहे नाही का?
जाणवतं का कधी हे तुम्हांला ?

मला सध्या हे असंच सुचतंय !
काळजी नका करू...
मी आभाळाकडून बरंच काही शिकतेय !
:)



Sunday 9 December 2012

सैरभैर

आभाळाला सीमा नसते...नियम एक. नदी संथ वहाते...नियम दोन. समुद्र पृथ्वीचा सोबती...नियम क्रमांक तीन.
नियमबाह्य घडते तेव्हा आभाळ फाटते. नदी हंबरडा फोडते. पृथ्वीची साथ सोडून समुद्र आकाशाकडे झेपावतो.
आई प्रेमळ असावी...आयुष्याने धरलेली पहिली अपेक्षा...नियम नव्हे.
मात्र हा एक अपेक्षाभंग...माथ्यावरचे आभाळ फाडतो...डोळ्यांच्या नदीला पूर आणतो...आणि समुद्राची लाट उर फाटून नेते...
...एकूण काय....एक अपेक्षाभंग...आयुष्य सैरभैर वगैरे.

Thursday 6 December 2012

घुबडकथा

हळव्या चिमणीचं नक्की काय झालं ?
तिचं घुबड कधी झालं ?
वादळ आलं ? उल्कापात झाला ?
कोवळ्या चिमणीचं नक्की घुबड का झालं ?
व्हायचं ते झालं...
घडायचं तेच घडलं.
गळला एकेक दिस....
ढळलं एकेक पीस.
मऊ लोण्याचं शेण झालं...
गुलाबी रंगाचं मातेरं झालं.
बघताबघता ह्या चिमणीचं घुबड झालं.