नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 21 September 2012

निषेध

दरवर्षी ह्या सुमारास गणपती येतात. मुंबई नाचते, गाते, जुगार खेळते, दारू पिते. आणि त्यानंतर गणपतीचे दिवस भरले की त्याला समुद्रात सोडले जाते.
पहिल्या दिवशी मूर्तीत प्राणस्थापना केली जाते. ज्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होत असेल त्यात आधी गणपती येऊन बसेलच कशाला ? आता ह्यात पर्यावरण हानी कशा प्रकारे होते ह्यावर मी काहीही नवे सांगू इच्छित नाही. कारण लोकं अज्ञानी नाहीत. सर्वांना PoP च्या मूर्तीमुळे व त्यावरील कृत्रिम रंगांमुळे होणारी हानी ह्याची पूर्ण जाण आहे. आणि तरीही त्यांना असे वाटते की ह्या हानिकारक मूर्तीमध्ये येऊन देव बसतो. आणि मग ते त्याच्यासमोर बसून जुगार खेळण्यास व दारू पिण्यास मोकळे होतात.
मी माझ्या घरी गणपती आणते का ? अजिबात नाही. श्रद्धा तेथे देव ह्यावर माझा विश्वास आहे. माणुसकीवर माझी श्रद्धा आहे. त्यामुळे माणुसकीमध्ये देव आहे असे माझे मत आहे. उगाच त्याच्याच मूर्ती घेऊन त्यानेच तयार केलेल्या विश्वाची विल्हेवाट लावायला मी जात नाही.
मग आता ?
आता काही नाही.
ह्या गणपतीच्या प्रदुषणाच्या हानीविरुद्ध मी काय करू शकते ? असा प्रश्न मी स्वत:लाच परवा विचारला. मी सामान्य माणूस आहे. मात्र बदल घडवायचा तर तो सामान्य माणूसच घडवू शकतो ह्यावर माझा विश्वास आहे.
आणि शब्दापेक्षा कृती महत्त्वाची हे तर खरेच.
मग एकच निर्णय केला. ज्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला दुसऱ्या कोणावरही अवलंबून रहाण्याची गरज नाही.

ज्यांच्याकडे 'पर्यावरणाला हानी' पोचवणारे गणपती वा त्याची सजावट असेल त्यांच्याकडे ह्यापुढे मी गणपतीच्या दर्शनासाठी जाणार नाही.

"तुझ्या मित्रमैत्रिणींच्या भावना दुखावतील." माझी एक मैत्रीण मला म्हणाली.
"हो दुखावतील ना. पण निसर्ग आणि मित्रमैत्रिणींच्या भावना ह्यात मला निसर्गाला अधिक महत्त्व द्यावयास हवे. कारण आता अति झाले आहे. कोणालाच मनावर घ्यावयाचे नसेल तर माझ्याकडे आता दुसरा कुठला उपाय आहे ?"

"तुझ्याकडे कसला गणपती आणलाय ?" मी माझ्या एका मित्राला विचारले.
"PoP."
"मी नाही येऊ शकत मग तुझ्याकडे. पुढल्यावर्षी जर तू निसर्गाशी जवळीक साधणारा गणपती आणलास तर मात्र नक्की येईन." सांगून टाकलं.

"तुमच्याकडे कसला गणपती आणलाय ?" दुसऱ्या एका मित्राशी झालेला संवाद.
"PoP."
"का ? तुला तर माहितेय किती हानी होते ते."
"अगं मी ठरवलेलं...पण वेळच नाही मिळाला !"
"वेळ नाही मिळाला म्हणजे ? मग नव्हता आणायचा ह्या वर्षी गणपती. तुला वेळ नाही ह्याची शिक्षा निसर्गाला का ? तू घे ना त्याची शिक्षा. आणू नकोस एक वर्ष गणपती !"

मला असं वाटतं की ज्या कोणाला पर्यावरणाची चाड असेल त्याने/तिने हा असा स्वयंघोषित निषेध व्यक्त करण्यास हरकत नाही.

आजपर्यंत मोजून दोन घरी गेले. मामेबहीण आणि एक मैत्रीण.
फायबर ग्लास.
गौरीने स्वत: खपून केलेला छोटासा शाडूचा गणेश.
हे तीनही सुंदर, मनमोहक स्वत:वर खुष झालेले आनंदी बाप्पा.

संतोष जाहला...


13 comments:

Gouri said...

खरंच, हे प्रत्येकाला करता येण्यासारखं आहे.
कधी येतेस मग आमच्या बाप्पाला भेटायला? :)
(आपल्याला बनवायला जमलं तर बसवायचा, नाही तर त्याला मनातच नमस्कार करायचा असा आमचा ‘गणेशोत्सव’ असतो. ;) )

हेरंब said...

थोडक्यात यावर्षी तुला फार्फार कमी मोदक खायला मिळणार.. अरेरे ;)

durit said...

निषेधाला पाठींबा

सुहास said...

शिवसेनेने जशी जाहिरात केली होती त्या धर्तीवर म्हणतो...

करून दाखवलं :p

माझा तुला पूर्ण पाठींबा आहे, हे वेगळे सांगणे न लगे :) :)

नागेश देशपांडे said...

पाठिंबा

मनात श्रद्धा हवी, मुर्ती मधे नव्हे.

प्रेम, मैत्री हे सगळ निसर्गाचीच भेट आहे. आपण प्रेम, मैत्री जपतो, मग निसर्ग का नाही??

मी पण या अभियानात

सौरभ said...

:)

Pankaj - भटकंती Unlimited said...

एकदम भारी निषेध. आपला पुरेपूर पाठिंबा.

गौरीबाईंचे मोदक शिल्लक असले तर बघतो जाता आलं तर :-)

Gouri said...

बहोत देर कर दी तुमने पंकज, बाप्पाचं विसर्जनही झालं आणि मोदकही संपले! :)

aativas said...

सक्रिय पाठिंबा आहे निषेधाला.

Snehal said...

Mast idea aahe tai.... Tuzya nishedha la purn pathimba

pratibha said...

Ek gaon, ek ganapati yasarakha ek area, ek ganapati ha upakram rabavata yeil.

Dhaval Ramtirthkar said...

गौरी... मला ही गणपती घरीच करायची खूप इच्छा आहे. तुम्हाला माहिती आहे तर कृपया मूर्ति काशी साकारायची हे सविस्तर सांगू शकाल का?

Gouri said...

धवल, मी शाडूची माती वापरली. ती कणकेसारखी भिजवून घेतली, आणि पायापासून वर असा साधारण आकार बनवत गेले. ढोबळ आकार प्रमाणात वाटल्यावर मग तो सुबक करायचा प्रयत्न केला. पण ही लिपोसक्शनसारखी पद्धत चुकीची आहे. यात बाहेर मिळणार्‍या मूर्तीसारखा फिनिश येत नाही, मूर्ती ओबडधोबड राहते.
मूर्ती कशी बनवतात हे तज्ञांनी इथे सांगितलंय:
http://www.maayboli.com/node/38032