नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 17 August 2012

लक्ष्मी...दर्शन

"हजर ? सुट्टीवर होतात ना ?"
"हो. तिरुपतीला गेलो होतो."
"अरे व्वा ! कोणकोण ?"
"आम्हीं तिघे...बायको, मी आणि लेक."
"मस्त !"

"तिरुपतीला गेला होतास ?"
"हो...तेच सांगत होतो हिला...म्हणून टाकली होती सुट्टी."
"छान !"
"खूप गर्दी हो पण ! तीनशे रुपये भरले मी ! दर्शनासाठी...!"
"मग झालं का...दर्शन...?"
"थोडं थोडं !"
"तंत्र आहे ते !...मी तीनदा गेलोय !"
"हो काय ?"
"म्हणजे ते तीनशे बिनशे ठीक आहे...ते द्यायचे हवं तर बाहेर...पण आत आलं की समोर...तिरुपती...!"
"हो..."
"मग ते डाव्या बाजूने ढकलायला सुरवात करतात...लगेच...दाराबाहेर !"
"हो ! तसंच झालं ना !"
"मग जायचं असं आपण...उजव्या हाताला सरकत सरकत...हळूहळू..."
"आणि ?"
"आणि काय ? तिथे कोपऱ्यात असतो एक उभा...त्याच्या हातात असे हळूच पन्नास रुपये सरकवायचे..."
"हो काय ?"
"मग काय तर ! मग हवं तितका वेळ रहा उभे ! घ्या दर्शन !"

"म्हणजे देवदर्शनासाठी लाच...?"
"अगं, त्याशिवाय मिळत नाही दर्शन ! विचार ना ह्याला...मिळालं का ? इतका तिरुपतीला गेला ! पण मनासारखं दर्शन मिळालं का ?"
"हम्म्म्म...मग झाला का तुला कधी देव प्रसन्न ? मला शंकाच आहे...लाच देऊन तू दर्शन घेतलंस...तो कसला प्रसन्न होतोय तुला ? काय उपयोग तीनतीनदा इतक्या दूरवर जाऊन ?! ही जर तिथे प्रथाच असेल तर मला शंकाच आहे की तो तिरुपती तिथे असेल ! तो गेला असेल कधीच सोडून !"
"दर्शन झालं ना ! मग झालं काम !"
"ते मूर्तीचं...ते तुला कम्प्यूटरवर पण मिळालं असतं..."
हास्य.
"ह्याला पण देशद्रोहच म्हणतात...लाच देणे हा पण देशद्रोहच आहे ! आणि त्यासाठी कोणीही पाकिस्तानी येण्याची गरज नाही...तुम्हीं स्वत:च आपल्या देशबंधूला फितवता...छोट्या छोट्या गोष्टींसाठी...! आणि देशद्रोह करण्याच्या मोहात पाडता ! आणि मग भ्रष्ट्राचार वाढलाय म्हणून बोंबाबोंब करता ! आणि त्या भ्रष्ट्राचाराच्या भस्मासुरापासून मला वाचव म्हणून त्या देवालाच साकडं घालता ! ह्याला चोराच्या उलट्या बोंबा...असं म्हणतात !"

पांगापांग.

आपण घसरगुंडीवरून पूर्ण घसरलो आहोत.
आता पुन्हां वर चढायचं म्हटलं तर परत मागे वळावयास हवे !
पायऱ्या तर समोर हजर आहेत...
पण मनात इच्छा ?
आणि तेव्हढा वेळ ?

त्या वेंकटेश्वरालाच माहित !

15 comments:

Anonymous said...

त्रास होतो नं या प्रकाराचा... पोस्टचं नाव कसलं योग्य दिलं आहेस .... ’लक्ष्मी ...दर्शन ’ !!

बाकि मराठवाड्यात , जुनाट विचारांच्या घरात लग्न करून गेलेल्यांना विचार ’तिरूपती महात्म्य ’... :) :( ;)

Anagha said...

तन्वे, आपण कसं मोठ्या हुशारीने आपलं काम करून घेतलं ह्याची ही लोकं शेखी देखील मिरवतात ! म्हणजे मी लाच दिली...माझं हे हे काम असं असं पटापट झालं...म्हणजे मी कसा हुशार आहे...आणि तू ते केलं नाहीस म्हणजे तू कसा मूर्ख आणि बावळट आहेस...अशी जेव्हा हे प्रौढी मिरवतात ना...त्यावेळी घटना वर्णन करताना कितीही का विनोदी ढंगाने त्याने सांगितलेली असेल..पण हा एक मोठा विनोद आहे असे म्हणून कानाडोळा नाही करता येत ! साधं देवदर्शन देखील ह्यांना भ्रष्ट्राचार न करता घेत येत नाही ! आणि काय गप्पा करतात हे....देशात फार भ्रष्ट्राचार वाढलाय म्हणून ?!

Deepak Parulekar said...


ज्याच्या मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव...

कय बोलणार सगळी "मंदीरे" या अशा प्रकारामुळे श्रीमंत झालीत आणि देव बिच्चारे तर कधीच त्या मंदीरातुन निघुन गेलेत...

aativas said...

जिथं बदल घडवता येण्याची शक्यता आहे तिथं प्रयत्न करायचा ... बाकी जास्त विचार करायचा नाही - असं एक सूत्र मी पाळते. नाहीतर आपण फार दु:खी होऊन जाऊ .. आणि निराशही!

Anagha said...

दीपक, मला कधीकधी आश्चर्य वाटतं...आपल्यासाठी देव सर्वत्र वास करतो...नाही काय? मग गरज काय पडते हे असे चुकीचे उद्योग करून दर्शन घेण्याची ? आपण जिथे आहोत तिथेच जरा धड माणुसकीला धरून वागलो, तर त्यात तो देवच भरून पावेल नाही काय ??

Anagha said...

माहित नाही सविता, आपण गप्प बसलो तर त्यातून, 'आपण त्या कृतीला पाठींबा दिला, आपल्याला त्या हुशारीचे कौतुक देखील वाटले' असा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे निषेध नोंदवणे ही आपली जबाबदारी असे मला वाटते...त्यापुढे जाऊन ज्याचे त्याने जबाबदारीने वागावे हे तर खरेच...

हेरंब said...

नुसत्या मंदिराचं आणि दगडाचं दर्शन घेऊन आले ते. देव भेटलाच नाही त्यांना !!

Anagha said...

खरंच आहे हेरंबा.

Shriraj said...

देवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहणे ही मला बावळटपणाचे लक्षण वाटते.

आनंद पत्रे said...

पोस्टचं नाव आणि संदर्भ आवडला...

Anagha said...

श्रीराज, आणि त्याहून अधिक म्हणजे, करायला दुसरे काहीही चांगले काम नाही काय असा प्रश्र्न मनात येतो ! कारण हे उगाच मूल्यवान वेळ वाया घालवण्यापेक्षा दुसरं काहीतरी चांगलं काम केलं तर आपला वेळ सत्कारणी लागला असे होत नाही का ?

Anagha said...

सेनापती, :)

Anagha said...

आनंद, आभार. :)

सौरभ said...

LOL मॅडमजी... जिकडे नवसाच्या नावाखाली माणुस देवालाच फितवतो तिकडे तुम्ही बाकी कसल्या अपेक्षा ठेवताय. :P

Anagha said...

सौरभा, अपेक्षाभंग झाला तरी हरकत नाही....पण अपेक्षाच न ठेवणे म्हणजे नातेच तुटून जाणे. सगळ्याच नातेसंबंधात असे नसते काय ?
मात्र समाजातील प्रत्येक सभासदाने जर एकमेकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही असे ठरवले तर एका अर्थी ते बरेच होईल. कारण मग जबाबदारी ही प्रत्येकावर येईल. म्हणजे, "तू हे (एखादे काम) करशील की नाही ह्याची खात्री नाही...म्हणून मीच करून टाकले...." असे काहीसे.