नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 14 August 2012

दाता

माझ्या दारी हिरवं वैभव आहे. आंबा. आणि आंब्याला कुशीत घेऊन माझं घर विसावलं आहे. माय जशी बाळाला कुशीत घेते, एक हात उशाशी घेते, तृप्त मनाने झोपी जाते तसंच. माझं छोटंसं नाजूक तांबूस घर त्याच्या आंब्याला कुशीत घेतं आणि शांत माझी वाट बघत बसून रहातं. कसली तक्रार नाही, कसले दु:ख नाही. आयुष्याची बोट वल्हवण्याच्या घाईगर्दीत, मला महिनामहिना माझ्या ह्या आंबेघराकडे फिरकायला वेळ मिळत नाही. मग काय माझं घर रुसतं ? अजिबात नाही. मी दुरून देखील दिसले की आंब्याची सळसळ वाढते, घराला ते हलकेच गुदगुल्या करू लागतं. जागं करतं. मग माझ्या घराला बरोबर माझी चाहूल लागते. हलकेच ते सुद्धा हसतं, आणि मी कडीकुलुप उघडून आत शिरले की खुदुखुदू हसू लागतं.

मग जेव्हा गेल्या आंब्याच्या मोसमात माझ्या लाडक्या झाडाला शेजारणीने लुटलं, त्यावेळी त्याला नक्की काय वाटलं ? आंबा नुसता लगडला होता. ओझ्याने फांद्या वाकल्या होत्या. मी मुंबईहून मुद्दाम रिकामे खोके घेऊनच तिथे पोचले होते. वाटलेलं भरभरून आंबे घेऊन परतू. सगळ्या मित्रमंडळींच्या घरी तळहाताहून मोठा मधुर आंबा पोचेल. सगळे कसे खूष होतील. हे म्हणजे आपण काही मनात मांडे खावेत, आणि व्हावं काही भलतंच. घराच्या पायऱ्या उतरता उतरता आंब्याकडे माझं लक्ष गेलं. आंबा रिकामा होता. जणू, एखाद्या सौंदर्यवतीने, अंगभर ल्यायलेले दागिने साजण न आल्याच्या रुसव्याने उतरून ठेवावे. संन्यासिनीगत रिकामं कोपऱ्यात बसून राहावं. पंधरवड्यापूर्वीच मी इथे चक्कर टाकली होती. त्यावेळी काही आंबे खाली उतरायला अधीर झालेले दिसत होते. नुकतंच पाय फुटलेलं बाळ जसं आईच्या कडेवरून जमिनीकडे झेप घेत रहातं. आंबा अंगाने भरला होता. भांगात भरलेल्या कुंकवाचा हलका रंग खाली उतरू पहात होता. आज मात्र झाडावर एकही आंबा शिल्लक नव्हता. मी दत्ताला हाक मारली. दत्ता माळी. तिशीच्या आसपास वय. दत्ता बाग सांभाळतो आणि त्याची देवकी घर सांभाळते. देवकी सतरा वर्षांची होती तेव्हा त्यांचं लग्न झालं. एकोणीसाव्या वर्षी पदरात एक बाळ आलं. "अगं, सतराव्या वर्षी कसं लग्न लावून दिलं बाई तुझं ? कायद्याने गुन्हा आहे !" मी माझी शहरी अक्कल एकदा पाजळली होती. "ताई, आमच्याकडे असंच होतं." काळीभोर देवकी तिचे टप्पोरे काळे डोळे उघडझाप करीत शांतपणे मला म्हणाली होती.
"दत्ता, आंबा कुठेय ? तू उतरवून ठेवलायस का ?" येऊन समोर पायरीवर उभ्या राहिलेल्या दत्ताला मी विचारलं. गेल्यावेळी देखील दत्ताच वर चढला होता व आकडा लावलेल्या काठीने त्याने आंबे उतरवले होते.
"नाही ताई, मी नाही उतरवला."
"मग ?"
"समोरच्या मॅडमनी उतरवला."
"म्हणजे ?"
"आज दुपारी त्या आल्या, आणि काठी लावून सगळा आंबा त्यांनी काढून घेतला."
दत्ता मला काय सांगतो आहे हे मला अजूनही कळतच नाही.
"दत्ता, कोण मॅडम ? कोणी काढून घेतला आपला आंबा ?"
"त्यांना सांगितलं मी ताई, पण त्यांनी ऐकलं नाही माझं."
"पण कोण ह्या मॅडम ?"
"त्या...त्या समोरच्या घरात रहातात त्या..."
समोरची जुनी मालकीण माझ्या ओळखीची होती. ती ह्या संपूर्ण कलाकार लोकांच्या वसाहती सुरवातीपासून होती. त्यामुळे हे स्वप्न सत्यात आणताना ज्या काही अडीअडचणीना तोंड द्यावं लागलं त्यात आम्हां सर्वांबरोबर ती देखील होती. पण तिने हे घर विकून टाकलं होतं..आणि आता कोणी नवी मालकीण आली होती. आणि माझ्या स्वभावधर्माला धरून, ती नवी मालकीण काळी का गोरी...हे मी आजवर शोधलंच नव्हतं !
"म्हणजे काय ? असं का केलं तिने ?"
गेली दहा बारा वर्ष आम्हीं सगळे सभासद फार गुण्यागोविंदाने इथे नांदत होतो. आम्हीं अदमासे पन्नासेक सभासद आहोत. त्यामुळे डोंगरावर पन्नासेक घर आहेत. टुमदार, लाल विटांची आणि लाल छपरांची.
मुंबई इथून फार दूर नाही. गाडी घेऊन गेलं तर दोन तासांवर मुंबई. दर शनिवार रविवार आमच्यातलं कुणीतरी गजबजलेल्या मुंबईहून येतं. त्याचं गोजिरं घर जागं होतं. दोन दिवस, घराचं लाडकौतुक होतं आणि मग कष्टकरी माणूस आपला मुंबईला निघून जातो. त्याचं घर पुन्हां विसावतं.
"काय माहित नाही. मी त्यांना सांगत होतो...तुम्हीं आंबे काढायला येणार आहात म्हणून...त्यांनी ऐकलं नाही माझं ! मी इथेच होतो उभा...त्यांनी माझ्या डोळ्यादेखत आंबे काढले."

शेजार कधीतरी वेगळाच मिळतो. कोणाच्या झाडावरचा फणस, कोणाचा आंबा...म्हणे हे नवीन नाही.
...'मलाच का बरं अशी माणसं भेटतात' हा एक असा प्रश्र्न आहे जो बहुतेकवेळा प्रत्येक माणसाच्या मनात येतो. म्हणजे मी हा इतका चांगला आणि ही अशी माणसे माझ्याच नशिबी का येतात..असा विचार जर प्रत्येक माणूस करत असेल...तर खरं तर जग चांगल्या माणसांनीच बहरलेलं असायला हवं. पण तसं काही चित्र नाही. त्यामुळे कोणी काही चुकीच्या गोष्टी करणार आणि मग अगदी सत्य आणि असत्य ह्यांचे तुंबळ युद्ध माजणार...आणि सत्याला धीर धरता आलाच तर शेवटी त्याचा विजय होणार.

तसंच झालं. कडाक्याचं भांडण झालं. आपल्याला हे असं अगदी नळावर पाण्यासाठी भांडल्यासारखं देखील भांडता येत ह्याचा मला शोध लागला. स्वत:ची नव्याने ओळख वगैरे.

मग इतकं तारस्वरात ओरडून आंबे परत मिळाले का ?

सूर्य मावळत आला होता. इतका चढा आवाज तसाही आमच्या वसाहतीत आजवर कधीही झाला नसावा. शेजारीण तरातरा निघून गेली. परसात रिकामा आंबा शांत उभा होता. पाने सळसळ होत होती. आता अंधार पडणार होता. हिरवा आंबा काळोखात एखाद्या सावलीसारखा उभा रहाणार होता. मी पायऱ्या उतरत अंगणात आले. अंगणात बसण्यासाठी लाल रंगाचे सिमेंटचे बाक आहेत. त्यावर जाऊन बसले. शांत. इतकी निरव शांतता...आणि त्या तिथेच काही मिनिटांपूर्वी आपणच केलेला आरडाओरडा. त्या शांततेत रातकिडे गप्पा मारू लागले. डोळा लागण्याआधी पक्षी सहचाऱ्याशी सुखदु:ख वाटून घेऊ लागले. बाकी तर आसमंतात शांतताच. समोर पुसट पिवळी छटा असलेला चंद्र साक्षात उभा. गाव तर डोंगराखाली खूप दूरवर आहे. त्यामुळे तशीही फारशी जाग नसतेच. निसर्गाची जी काय जाग असेल ती तितकीच. रक्त तापवून घेऊन केलेले भांडण, शेजारणीचे आततायी वागणे, हातात दगड घेऊन दत्तावर तिने चढवलेला हल्ला. सगळंच भयानक. आणि त्याच्याच पुढल्या क्षणाला ही इतकी निरव शांतता. चंद्र जेव्हा आकाशात संथ उगवत होता, तेव्हां आम्ही भांडत होतो. सगळंच फोल. कोण जाणे ती जेव्हा आंबे काढत होती, त्यावेळी माझ्या आंब्याला कळले तरी का...की ही चोरी आहे...आणि ती चोरी आहे कारण आंबा माझ्या दारी उगवला आहे...आणि त्या अंगणावर माझा मालकी हक्क आहे ! लाललाल मातीच्या ह्या डोंगराची ही ३ गुंठा जागा माझी...त्यावरचा हा आंबा माझा...हे माझे...ते माझे...सर्व हिणकस...क्षुद्र...!

विषण्ण.

माझ्या दारी पेरू देखील आहे. गेल्यावेळी गेले होते तेव्हा किती पेरू लगडले होते. काल बघितलं तर बहुतांशी पेरू, पक्ष्यांनी टोचले होते, अर्धे अर्धे खाल्ले होते. आता काय पक्षांशी जाऊन भांडू ? पेरू तिळमात्र देखील दु:खी वाटला नाही. चांगला खुशीत होता. अंगाखांद्यावर टोचा मारलेले कच्चे पेरू मिरवत होता. किती पाखरांचं त्याने पोट भरलं, वाटलं झाड आपलं सुखावलेलंच आहे. दु:खी नक्की नाही. बाजूला करंबळाचं झाड. ते देखील असंच ओझ्याने वाकलेलं. "आई, मला खूप आवडता हा ते स्टार फ्रूट ! घेऊन ये तू जर आली असली तर फळं !" लेक गेल्या वेळी म्हणाली होती. दत्ता पटकन शिडी घेऊन बाहेर आला. चांगली आठ दहा फळं काढून त्यानं माझ्या हातावर ठेवली. झाड आपलं पुन्हां खुष !

काही कळत नाही...'कोणाच्या ना कोणाच्या तोंडी माझं फळ लागावं...कोणाचे ना कोणाचे दोन क्षण आनंदाचे जावेत...'इतकीच माझ्या झाडांची अपेक्षा असावी बहुतेक !

काल ताटात तिखटमीठ घेऊन आम्ही मायलेकी बसलो. चांगली चार करंबळं ताटलीत घेतली होती. आंबट आंबट ! डोळे मिचकावीत, हसतहसत आम्ही फळं फस्त केली !

मी दूर मुंबईत असले तरीही तेव्हा माझं परसात उभं असलेलं झाड खुशीत डोललं...दूर उभा असलेला आंबा सर्व समजगल्यागत मोठ्या माणसासारखा मान डोलवू लागला.

ह्या वर्षी भरपूर आंबे आले होते...म्हणजे पुढल्या वर्षी तर माझा आंबा विश्रांती घेईल...त्याच्या पुढल्या वर्षी मोहोर बहरेल...तो पुन्हां फुलेल....हिरव्या कैऱ्या फुटतील...त्याच्या अंगाखांद्यावर झोका घेऊ लागतील...पक्षी बागडतील...आंबा इथेतिथे चाखून बघतील...बाळ कैऱ्या उगाच जमिनीकडे झेपावतील...आंबा खुशीत येईल...हसू लागेल...प्रेमाने भरभरून आंबा देईल.

सखी शेजारीण त्यावेळी तरी माझ्या हाती आंबा लागू देईल काय ?

11 comments:

हेरंब said...

मुडदा बशिवला मेलीचा. #$%^$^$%&

Mahendra Kulkarni said...

मस्त .. दिलसे लिहिलं आहे.
घरच्या झाडांची फुलं सकाळी कोणी काढून नेली की कसा जळफळाट होतो याचा अनुभव लहानपणी घेतलाय.

सिद्धार्थ said...

कोकणात पण आंबा बागायतदारांना माकडे हैराण करतात आणि त्यावर बागायतदारांकडे रामबाण उपाय पण आहेत. डार्विनचा सिद्धांत खरा मानला तर त्याच उपायांनी तुमच्या शेजारणीचा बंदोबस्त केला जाऊ शकतो :D

Anonymous said...

अगं आमची शेजारीण तर आंब्यांचा, सोनचाफ्याचा बहर ओसरला की झाडं तोडते तिच्या भागातले... आणि प्रचंड बडबड करते ते निराळेच.... कोवळ्या फांद्या कटाकट मोडवतात कश्या हा मुद्दा गौणच.... :( ... वर चढ्या स्वरात सुनावते बाजारात गेले तर २०रुपये किलोवर भाव मिळत नाही असल्या कैऱ्यांना :(

असो, तुम्हारा मुद्दा समजमे आता है इसलिये....
हेरंब +१ :)

अनघा said...

अनघा- निसर्ग दाता आहे हे खरेच, पण आपण सदासर्वकाळ त्याचे अनुकरण नाही करू शकत. आणि दान ही सत्पात्री असायला हवे ना? नुस्त भांडून काय होणार, अगदी शांत पाने जराही आवाज ना चढवता तिला उतरवलेले आंबे परत मागायचे होतेस ना, नाही म्हणालीच असती ती मग सरळ सरळ उचलून आणायचे तिच्या घरून आपले आंबे. काय मोगलाई लागलीये कोणीही यावे आणि काहीही आपल्या दारचे उचलून न्यावे?

Anagha said...

हेरंबा, कसला जोर आहे ह्यात ! अख्खी पोस्ट त्यात चपखल बसलीय ! :) :)

Anagha said...

महेंद्र, आता तर दुसऱ्याच्या दारातील अगदी छोटं फूल देखील तोडायचं नाही असं परवा जनरल बॉडी मिटिंगमध्ये पुन्हा एकवार सांगितलं गेलंय. :)

Anagha said...

सिद्धार्थ, ह्या बाईना सभासत्व बहाल करून फार मोठी चूक झालेली आहे...हे परवा मिटिंगमध्ये मुक्ताफळे उधळून त्यांनीच पुन्हां एकवार सिद्ध केलेलं आहे. :(
:)

Anagha said...

आई गं !!! अशी काय ही महामाया ?! :(

तन्वे, हेरंबाच्या एका वाक्यात माझी अख्खी पोस्ट बसलीय !!! :D :D

सौरभ said...

LOL heramb... i just imagine u as >> हातातल्या बांगड्या मागे घट्ट करत कोयता घेऊन चाल करणाऱ्या कोळीणीसारखा... LOL

Anagha said...

:D