नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 31 July 2012

'टूर'की...भाग १२

'टूर'की...भाग १   'टूर'की...भाग २   'टूर'की...भाग ३   'टूर'की...भाग ४   'टूर'की...भाग ५   'टूर'की...भाग ६   'टूर'की...भाग ७   'टूर'की...भाग ८    'टूर'की...भाग ९   'टूर'की...भाग १०   'टूर'की...भाग ११

लाकडी दरवाज्यातून लालबुंद मखमली छोटा फ्रॉक घातलेली एक सुंदर गोरीपान तरुणी हसतमुखाने आमचे स्वागत करायला पुढे आली तेव्हा आम्हांला सोडून आमची बस वळून तिच्या परतीच्या रस्त्याला लागली होती. तरुणीच्या मागोमाग एक तरुण तुर्क. तिने त्याला आमच्या बॅगा उचलण्याचा इशारा केला. आणि "वेलकम..." म्हणत वळून हॉटेलच्या दिशेने चालू लागली. दोघेही आमची वाट पहात जागत राहिले होते. तेस, ऑस्ट्रेलियन सुंदर तरुणी. पर्यटन विषयक अभ्यास करत करत तुर्कस्तानात पोचली होती आणि ह्या देशाच्या प्रेमात पडली. आता इथेच कपाडोक्क्यात रहाते. कधी उशीर झाला तर मागे तिची खोली आहे नाहीतर तिने थोडं दूर एक छोटं घर घेतलं आहे. फारसा काही मोठा पगार मिळत नाही. पण ह्या शहराला सोडून परत मायदेशी देखील जाववत नाही. आम्हीं आल्याची नोंद संगणकावर करता करता तिच्याशी झालेल्या गप्पांतून हे कळलं. हे हॉटेल म्हणे कधी काळी एक गुहा होती. ह्या सर्व परिसरात अशी बरीच हॉटेल्स गुहेत वसवलेली आहेत. आता मात्र नवे हॉटेल बांधायला बंदी आहे. रिसेप्शनच्या बरोबर वर आमची खोली होती. सकाळी आम्हीं कायकाय करू शकतो ? मी विचारले. तिने लगेच दोनतीन माहिती पत्रके आमच्यासमोर धरली. वेझीर केव्ह तसे शहराच्या केंद्रस्थानी होते. काही गोष्टी पायी बघता येण्यासारख्या होत्या, तर काही एखादी मार्गदर्शक भ्रमणयात्रा करणे योग्य होते. 'हॉट एअर बलून'चा खर्च नक्की किती होता. माझा पुढला प्रश्र्न. तिने उत्तर दिले. 'हॉट एअर बलून' साठी पहाटे चार वाजता हॉटेल सोडायचे होते. ठीक आहे मग...आम्हीं परवा 'हॉट एअर बलून राईड' करू. आणि उद्या एक मार्गदर्शक भ्रमणयात्रा. त्यात कायकाय आम्हांला बघायला आवडेल हे तिला सांगून टाकले. ठीक आहे. तेस म्हणाली. उद्या ती आमचं परवाचं 'हॉट एअर बलून'चं बुकिंग करेल. सकाळी आठ वाजता खाली सज्ज्यावर नाश्ता लागतो. तिथे बसून तुम्हीं नाश्ता घेऊ शकता आणि त्यानंतर भ्रमणयात्रा करावयास प्रस्थान करू शकता. ठरला आमचा कार्यक्रम! उद्या इहलारा व्हॅली आणि परवा पहाटे...अनेक फोटो आजवर बघितले होते...कित्येक लेख वाचले होते.... 'हॉट एअर बलून राईड'!

हसतमुख तेसने आमचा सर्व थकवा पळवून लावला होता. आम्हीं वर आमच्या रूमवर गेलो.  पांढऱ्या भिंती, लाकडी, दगडी मला अगदी मनापासून आवडेल अशी सजावट. आम्हीं कपडे बदलून गाडीवर पहुडलो, त्यावेळी आता सकाळी उजेडात हे शहर कसं दिसेल ह्याचा मी विचार करत होते. सुरवात छान झाली होती. इथले दोन दिवस शेवटचे होते. आमच्या सहलीतले. त्यानंतर मायदेशी परत फिरायचे होते. डोळ्यांवर झोप येऊ लागली...खडबडीत गुहा...अंधार...थंड हवा...दूर कुठेतरी कुत्र्याची जाग...सर्व स्वप्नवत...२०१२ की कास्य युग....येण्यापूर्वी चाळलेली माहिती कुठेतरी हलकेच मनात फिरत राहिली. सकाळी आठ वाजता अमेरिकन नाश्ता...हाफ फ्राय...कॉर्नफ्लेक्स...ब्रेड बटर जॅम...आणि त्यावर दोन छोटे पांढरे खास लहानसे तुर्की कप, त्यात वर पसरलेल्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब अंगावर पाडून घेणारा गडद तपकिरी तुर्की चहा. नऊच्या सुमारास दरवाजातून एक तरुण डोकावला...हातात एक छोटी चिठ्ठी. आम्हीं त्याच्याबरोबर बाहेर पडलो. थोडं दूर एक छोटी बस उभी होती. त्यात आधीच काही पर्यटक बसलेले होते. ब्रिटन, चीन, अमेरिका...भारत. आम्हांला घेऊन बस निघाली. आमची मार्गदर्शक एक तरुणी होती. बावीस वर्षांची. गोरी, तुर्की. इंजे. तिनेही पर्यटन विषयक अभ्यास केलेला होता. तुर्कस्तान आता जागतिक पर्यटक खेचत होता...जे जो वांछील ते तो लाभो...ह्या तत्त्वाला जणू अनुसरून.
कपाडोक्या. शब्दाचा अर्थ, 'सुंदर घोड्यांचा देश'. तुर्कस्तानाच्या तसे केंद्रस्थानी. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा इथे ज्वालामुखी उसळत होते, त्यावेळी कोणाला कल्पना असेल, की हा देश एखाद्या परीकथेतील देश दिसू लागेल. हॅन्स अॅण्डरसनच्या परीकथा. कुठे लांबच लांब पसरलेले लाल पहाड, तर कुठे पिवळ्या दगडांचे उंच बुटके सुळके. एखादा नितळ पाण्याचा झरा. त्यात धुंदीत तरंगणारी बदके. भौगोलिक आश्चर्ये आणि त्या रचनेला धरून घडत गेलेला इतिहास, ह्यामुळे कपाडोक्क्या प्रदेश मनात भरून जातो. पहिली भेट ज्वालामुखी विवर. डाळिंबी तलाव. इथे डाळिंबाची खूप झाडे आहेत म्हणून हे नाव. मला फोटो काढायला एकही सापडेना हे मात्र खरेच!


दुसरी भेट 'भूमिगत शहरा'ची. डेरीन्कुयू. हे असं ऐकलं तर त्यात इतकं काही विशेष वाटत नाही. पण जे काही आम्हीं बघितलं ते अविस्मरणीय होतं! भारताचा स्वत:चा इतिहास, त्यातील लेणी, गुहा काही कमी नाहीत. त्यात काप्पाडोक्याला ज्वालामुखींची जोड. सगळी भौगोलिक रचनाच वेगळी. इ.सन. पूर्व पाचव्या शतकात म्हणे हे शहर वसायला सुरुवात झाली. कास्य युगामध्ये हत्ताय किंवा हात्ती ह्या नावाने काप्पाडोक्या ओळखले जाई. प्रदेशावर वेगवेगळे राजे, सम्राट येऊन गेले. राज्य करून गेले. युद्ध, लढाया, अत्याचार, गुलामी. शेतकरी वर्ग कायम गुलामगिरीत. व त्यामुळे जेव्हा परकीय हल्ले झाले त्यावेळी त्यांची मानसिकता त्या गुलामगिरीसाठी तयार झालेली होती. वर्षानुवर्षे गुलामगिरी केल्याकारणाने, त्यांना त्यात काही नवे नव्हते. काप्पाडोक्यातील ज्वालामुखींनी तयार केलेल्या मऊ दगडामध्ये जमिनीखाली एक संपूर्ण शहर वसलेले आहे. खोल आत. तुर्कस्तानामधील खोदून उजेडात आणलेल्या अशा शहरांमधील सर्वात लांब असे भूमिगत शहर. म्हणे वर जमिनीवर घरे असत. परंतु, शत्रूचा आकस्मिक हल्ला झाला की अख्खाच्या अख्खा गाव भूमिगत होई. हल्लेखोर गावातून नाहीसे होईस्तोवर सर्वजण तेथेच रहात. महिना...दोन महिने...महिनोंमहिने. काय नाही तेथे? शयनकक्ष, गोठे, तबेले, मद्याचे, अन्नाचे गुदाम, दगडी चुली, स्वयंपाकघर. तिथे छताकडे नजर टाकावी तर चुलीच्या धगीने काजळी जमा झालेले छत. चर्चेस, कन्फेशन बॉक्सेस, कब्रस्तान...जेमतेम दीड फूट रुंदीचे रस्ते, कधी खोल उतरते, कधी चढते. बाहेर चंद्र का सूर्य कार्यरत, आत पत्ता लागणे कठीण. मध्येच उंचावर लांबसडक चिमणी सारखे काही आकाशाच्या दिशेने वर झेपावताना दिसले. त्यातून म्हणे वर आवाज द्यायचा, बाहेरची हालचाल आत कान देऊन ऐकायची. भन्नाट. किती नाट्ये इथे घडली असतील. ज्यावेळी आपले जमिनीवरचे वसलेले गाव सोडून रहिवासी आत आसरा घेत असतील त्यावेळी त्यात किती वृद्ध माणसे असतील, किती बालके, किती तान्ही बाळे... किती दिवस भरत आलेल्या गरोदर स्त्रिया...झोंबती थंडी, थैमान घालणारा वारा, झंझावती वादळ, सूड उगवण्यासाठीच दाखल झालेला पाऊस, भाजून काढणारा उन्हाळा...हालांना ना पारावार. बाहेर शत्रूला कधीतरी ह्या वसाहतीचा पत्ता लागत असेल...शत्रू आत घुसत असेल...खून, रक्ताचे साडे, स्त्रियांवरील अत्याचार. अवाक. एकविसाव्या ह्या गतिमान, जगातली मी एक तिथे उभी रहाते... तेव्हा मी का कोण जाणे...हजारो वर्षांपूर्वीच्या वेदना असह्य झालेल्या घटका भरलेल्या त्या गरोदर बाईचा हात पकडून बसलेली असते. घुसमट होते. अतीव घुसमट. मी लेकीला हाक मारते...लेक खूप पुढे निघून गेलेली असते. त्या काळोखी बोगद्यांतून तरी देखील तिला माझी हाक येते... सहपर्यटकांच्या गर्दीतून वाट काढत माझ्या बाजूला ती येऊन ठेपते... "आई, काय झालं ?" "मला बाहेर जायचंय... I need to go out !" "पाणी पी पाहू तू..." ती मला सांगते. मी पाण्याचा एक घोट घेते. दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करते. मंद प्रकाशात लेकीच्या चेहेऱ्यावर भीती दिसते. मी हळूच हसते...स्वगत सुरु होतं....पडणार मी बाहेर....अजून पाच मिनिटं...मी बाहेर पडणार....आणि मी श्वास घेणार....इथे श्वास नाही घेता येत मला...घुसमट...प्रचंड घुसमट. काही सेकंदांत मला थोडं बरं वाटतं...आई...? लेक विचारते. मी हसते....मला आता बरं वाटलेलं असतं...काही क्षणांची घुसमट. ज्या जागी मी उभी होते कोण जाणे...माझ्या दोन पावलांनी जिथे जमीन स्पर्शिली होती...त्याच जमिनीवर खडतर आयुष्य जगणाऱ्या त्या माझ्यासारख्याच स्त्रियांचे काय हाल झाले असतील ? विचित्र. इजिप्तमध्ये असाच एक पिरॅमिड खोल खोल खाली उतरलो होतो आम्हीं. संपूर्ण उताराचे छत कमी उंचीचे. कारण का तर म्हणे आत झोपलेल्या शरीराचा आदर ठेवला जावा म्हणून नतमस्तक खाली उतरावे...अशीच पिरॅमिडची रचना. असंख्य प्रेते..माणसांची, मांजरींची, वानरांची. पण का कोण जाणे...आज ह्या गुहेत उभे राहून जे काही जाणवत होते ते तसे काहीच तिथे नव्हते जाणवले. त्या पिरॅमिडांचा देखील असा अतिप्राचीन इतिहास, तिथे गुलामांवरचे अत्याचार. वळणाऱ्या पायऱ्या चढत आम्हीं दोघी वर आलो. भसकन उजेड अंगावर आला. श्वास मोकळा झाला. डोळे दिपले. भुयारातून बाहेर येताना कित्येक शतकांचा प्रवास केला होता. पर्यटकांसाठी फक्त निम्मा भाग उघडण्यात आलेला आहे. जिथपर्यंत शोध लागला आहेत तिथपर्यंत, संशोधकांना म्हणे न्हाणीघर मात्र अजून सापडलेलं नाही!


तिथून पुढे इहलारा दरी. रोमन सैनिकांपासून सुरक्षित जागा शोधण्यासाठी स्त्रिया, मुले, सामानसुमानासहीत भयभीत होवून पळणारे ख्रिश्चन, पहिल्यांदा आसऱ्याला आले ते ह्या दरीत. वाहता स्वच्छ पाण्याचा झरा, झाडी, चारी बाजूंनी उंचउंच डोगर, त्यात दडलेल्या गुहा. लपून बसण्यासाठी सुयोग्य जागा. मग तिथेंच वस्त्या उभ्या राहिल्या. असंख्य मठ, कित्येक चर्चेस. कबुतरांना निरोप्या म्हणून वापरले जायचे हे कुठेतरी इतिहासात आपण वाचतो. आणि बॉलीवूडने एखादी गोष्ट दाखवली की ती लक्षात पण फार पक्की रहाते. त्याबरोबर एखादं गाणं तर अगदी डोक्यात घट्ट बसून जातं. म्हणजे कबुतर म्हटलं की कबुतर जा जा जा...गुणगुणणं सुरू! इथे डोंगराडोंगरांतून दिसणाऱ्या गुहांबरोबर आजूबाजूला पसरलेल्या छोट्या खाचा काय असाव्यात हा प्रश्र्न पडला आणि त्याचं इंजे, आमची मार्गदर्शक, हिने दिलेलं उत्तर अगदी डोळयासमोर चित्र आणून देणारं ठरलं. ती माणसाने कबुतरांसाठी बनवलेली घरे होती. तिथे कबुतरांसाठी खाणे पिणे ठेवले जाई. व त्यांना चिठ्ठ्या पोहोचवण्याचे काम शिकवले जाई. माकडाला शिकवणे, कुत्र्याला शिकवणे ह्या कदाचित सोप्प्या गोष्टी असाव्यात. आजवर मी कुठल्याही जनावराला अगदी हे तिथे नेऊन ठेव इतके देखील शिकवलेले नाही. माणसाला शिकवण्यापेक्षा एखाद्या प्राण्याला शिकवले असते तर हाताला कदाचित यश आले असते. मनुष्याचे पूर्वज कबुतरांना शिकवत. म्हणजे त्याच्या पायाला चिठ्ठी बांधून ही आता त्या त्या प्रदेशात ह्याला त्याला नेऊन दे! हे कसे शिकवायचे? असो. त्यांच्या अंड्याचा बलक हा नैसर्गिक रंगात मिसळला जाई. त्यामुळे रंग भिंतींवर पक्का बसे. तसेच त्यांच्या मलापासून रंग बनवले जात. ह्या सर्व गोष्टींमुळे कबुतराची शिकार करणे हे पापच मानले जाई. त्यांना देवाच्या जागी समजले जाई. डोंगरांचा एक संपूर्ण परिसर 'पिजन व्हॅली' म्हणून ओळखला जातो. सगळी दरी, ह्या दोन प्रकारच्या घरांनी भरून गेलेली. माणसे व कबुतरे दोघांचे हे एकमेकांना इतके धरून रहाणे गंमतीशीर. आणि कबुतरं ती करडीच. ज्यांचा मला ती फार घाण करून ठेवतात म्हणून वैताग येतो ! काळ वेगळा, गरजा वेगळ्या, देव वेगळे आणि माणूस वेगळा. रस्त्यातून जाता जाता इंजेने आम्हांला ही माहिती दिली.

नदीला धरून इहालारा दरीत जवळजवळ आम्हीं अर्धा तास चाललो होतो. रस्ता संपला तिथे आमची खाण्याची व्यवस्था केलेली होती. सगळ्यांनाच भुका लागलेल्या होत्या. टेबलावर अन्नपदार्थ येणे आणि टेबल रिकामे होणे ह्यात फक्त दहा मिनिटांचे अंतर होते.


परतताना आकाशात अस्ताव्यस्त पसरलेला एक मठ. इथेही, गोदामे, लांबसडक जेवणाचे दगडी टेबल, काळवंडलेल्या छताचे स्वयंपाकघर, भित्तीचित्रे. हे सर्व प्राचीन आहे की काही शतकेच जुने ? वर उंचीवरून खाली बघितले की वाटते...दूर क्षितिजावरून उंटांचा तांडा दाखल होईल. खाली त्यांचा तबेला आहेच... तिथे त्यांना बांधले जाईल, आणि मग वर चढून येतील लांब पायघोळ झगे घातलेले गोरे, मठवासी... कल्पनाशक्तीवर हॉलीवूडचा पगडा! 

बसने आम्हांला वेझीर केव्हच्या दारात सोडले. वातावरण थंड होते. म्हटलं तर थकवा होता म्हटलं तर अजून भटकायची हौस होती. रिसेप्शनमध्ये तेस होतीच. "आता चालू शकाल?" तिने विचारले. किती लांब? लेकीने तिला प्रतिप्रश्र्न केला. थोडंच. खाली उतरा. अलीच्या कॅफे सफक मध्ये जा...तुम्हांला नक्की आवडेल. 

अलीचे कॅफे सफक. लोनली प्लानेटने, ट्रीप अॅडव्हायझरने त्याला चांगले रेटिंग दिलेले आहे. ती प्रशस्तीपत्रके भिंतीवर फार दिमाखात बसलेली होती. पूर्वापार म्हणे ह्या रस्त्यावर अलीच्या पूर्वजांची दुकाने होती. आता मात्र ली आणि त्याची आई, ह्या दोघांनी कॅफे चालवायला घेतला आहे. रस्त्याला लागूनच आहे. पर्यटक येतात, तुर्की चहा पितात. नाहीतर अलीच्या आईच्या हातचा अडाणा कबाब. अली येतो, तुमच्याशी झकास गप्पा मारतो. चॉकलेट क्रेप खाऊन बघा असा प्रेमाने सल्ला देखील देतो. माझी लेक पुस्तक घेऊन आलेली असते...त्याबरोबर तुर्की चहा. आता तिच्यासाठी मी अदृश्य झालेली असते. 

कपाडोक्यातील पहिला दिवस संपत आलेला असतो. इथेही सूर्य रमतगमत मावळतो. सर्व आमच्या फायद्याचे. पोटपूजा करून नऊच्या सुमारास आम्हीं आमच्या हॉटेलवर परततो. दूर कुठे पुन्हां तो कुत्रा एकटाच गात असतो. शहर काळोखात बुडत असते. काल काळोखात राक्षस वाटलेले उंच डोंगर, त्यातील गुहा उगाच ओळखीच्या वाटू लागतात. काळोखात त्याच्या पूर्वजांच्या घरात शिरणारे एखादे कबुतर देखील आपलेसे वाटू लागते. 

मायदेश सोडून एक महिन्याच्या वर मला परदेशात रहाता येत नाही हे खरेच. पण तरी देखील ऑस्ट्रेलियातील आपले घर सोडून इथेच वस्तीला आलेली तेस आता मी समजू शकते.
(क्रमश:)

15 comments:

rajiv said...

कित्येक शतकांचा प्रवास तू एका दिवसात केलास...अन आम्हाला काही मिनिटात घडवलास खरा ..
पण तुझ्या विचारांची वावटळ मात्र खूप अंतर्मुख करतेय ..
अनघा, खूपच ताकदीचे लिहिलयस ..!!

Rohini said...

Khoop Khoop Chhan...

Sakhi said...

थोडीशी घुसमट ..थोडा मोकळा श्वास
पुढच्या प्रवासाची उत्कंठा अन मागच्या वाटेत घुटमळणारा पाय
तुझ्यासोबत आमचा पण प्रवास... असाच ..

छान

हेरंब said...

>> त्यात वर पसरलेल्या निळ्या आकाशाचं प्रतिबिंब अंगावर पाडून घेणारा गडद तपकिरी तुर्की चहा.

खल्लास. एवढं फक्कड वर्णन की माझ्यासारख्या पक्क्या कॉफीबाजालाही या चहाच्या प्रेमात पडावंसं वाटलं !!

माझ्या मते आजचा भाग या पूर्ण "टूर की" मालिकेतला सर्वोच्च बिंदु आहे. अतिशय आवडला. अफाट वर्णन आहे. हे नुसतं प्रवासवर्णन नाहीये.. यातला मानवी भावभावनांचा कल्लोळ, इतिहास धुंडाळण्याची धडपड, अनामिक जीवांसाठी लागलेली हुरहूर सगळं सगळं फार प्रामाणिक आहे !

राजीव काका + १

Suhas Diwakar Zele said...

_/\_ _/\_ _/\_

वाचतोय फिरतोय अनुभवतोय .... :) :)

Anand Kale said...

धम्माल.. मस्त वर्णन..
खुप फिरलो आज... :D

THEPROPHET said...

अत्युच्च पोस्ट.. आवडली.. :)

Anagha said...

राजीव, तो देशच तसा आहे. एखाद्या पर्यटकाला देण्यासारखं त्याच्याकडे भरपूर आहे !

Anagha said...

रोहिणी, आभार ! :) :)

Anagha said...

भक्ती.... :) :)

Anagha said...

हेरंबा, तो देश चित्रमय आहे. त्यामुळे मग लिहिताना आपोआप ते सगळं नजरेसमोर तरळू लागतं. आणि आपल्याला फक्त ते शब्दांत उतरवायचं असतं ! :) :)

Anagha said...

सुहास, चला लवकर लवकर काहीतरी एखादी छोटेखानी सहल ठरवा ! पाऊस जुना झालं पण मी अजून कुठे गेलेच नाहीये ! :( शोभतं का हे तुम्हां लोकांना ?! :p :) :)

Anagha said...

आका, :) :)

Anagha said...

विद्याधर, आता मी जर सगळ्या पोस्टा एकत्र वाचायला घेतल्या तर प्रत्येक पोस्टची स्वत:ची एक वेगवेगळी अशी शैली तर नाही ना झाली...असा एक विचार मनात येतो ! म्हणजे सलग वाचायला घेतलं तर हे तुर्कस्तानावरील लिखाण नक्की एका शैलीत बसलंय की नाही...हे मला नक्की सांगता येत नाही.
:) :) :)

सौरभ said...

i'm amazed.... W.O.W.