नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 29 July 2012

'टूर'की...भाग ११

'टूर'की...भाग १   'टूर'की...भाग २   'टूर'की...भाग ३   'टूर'की...भाग ४   'टूर'की...भाग ५   'टूर'की...भाग ६   'टूर'की...भाग ७   'टूर'की...भाग ८    'टूर'की...भाग ९   'टूर'की...भाग १०

चिरालीतील शेवटची सकाळ.
अरुंद पण मोकळ्या रस्त्यावरील सायकलवरील फेरफटका...मायदेशातील समुद्राची आठवण करून देणारा तो खारट श्वास. श्वासाबरोबर शरीरात शिरणारी स्तब्धता. डोळे हलकेच मिटले, माथ्याच्या मध्यावर लक्ष केंद्रित केलं तर ती शांतता श्वासातून अंतरंगात शिरते...हलकेच वलयं माथ्याच्या मध्यभागी फिरू लागतात. पद्मासन न घालता देखील मनामध्ये ॐ उमटतो. शांत. ध्यानस्थ.

चिराली गावातील ज्या हॉटेलमध्ये आम्ही बुकिंग केलं होतं ते तसं काही फार मोठं नव्हतं. एका कुटुंबाने त्यांच्या मालकीच्या परिसरात बागा, कोंबडीपालन, व हॉटेल असा व्यवसाय मांडला होता. मात्र तेथील तरुण हसतमुख मालकीण ऐसगुल, तिचा नवरा, तिचा भाऊ सुलेमान आणि तिचा लेक, गोंडस मुस्तफा...मनमिळाऊ माणसे होती. आमचे दिवस हलकेफुलके सरले होते. दोन दिवस. दोन रात्री. आज सर्व हिशोब करायचे होते. आणि तिथून निघायचे होते. मुंबईहून निघताना काही पैसे मी ट्रॅव्हल कार्डावर टाकून घेतले होते व काही रोकड बरोबर घेतली होती. सर्व ठिकाणच्या हॉटेलचे पैसे हे या कार्डावरून भरावयाचे होते. व बाकी गरजेसाठी, रोख रक्कम होतीच. स्वयंपाकघराला लागूनच एक प्रशस्त खोली होती. जिथे संगणक वगैरे ठेवून ऑफिस थाटलेले होते. त्यामुळे तुर्की ऐसगुल कधी स्वयंपाकघरात उभी राहून आपल्या पाहुण्यांचा स्वयंपाक सांभाळताना दिसे, कधी मुस्तफाची मनोधरणी करत त्याच्या मुखी दोन घास भरवताना आढळे तर कधी संगणकावर बसून येणारी नवीन बुकिंग्स करताना दिसे. कपाळावर कधीही एकही आठी न उमटवता. मोडक्या तोडक्या का होईना...ऐसगुल, इंग्रजीतून ब्रिटीश बाईशी सहज संवाद साधताना दिसे. एकूणच बघितले तर जगभरातील स्त्रियांच्या मनोबलापुढे देव देखील हात जोडत असावा. व स्वत:च्या ह्या सबळ निर्मितीबद्दल स्वत:लाच रोज शाबासकी देत असावा !

ऐसगुलने तिच्या संगणकावर हिशोब मांडला. मी मुंबईत बसून थोडी आगावू रक्कम भरली होती त्याचं तिने गणित मांडलं. तिची बेरीज आणि माझी वजाबाकी तंतोतंत जुळली. मी ऐसगुल पुढे माझं ट्रॅव्हल कार्ड धरलं. तिच्या मशीनमध्ये तिने कार्ड सारलं. आणि संकट ओढवलं. माझं कार्ड तिचं मशीन घेईना. सतत 'insufficient funds' असा प्रिंट आउट येऊ लागला. एकदा झालं, दोनदा झालं. तिचा नवरा मदतीला आला. तरी तेच. सुलेमान आणि ऐसगुलने तुर्की भाषेत काही चर्चा केली. "यु गो विथ सुलेमान. माय कझिन सिस्टर हॅझ अनदर होटेल हियर. गो अॅन्ड ट्राय देअर." ऐसगुल मला म्हणाली. चिंतामग्न मी. आम्ही दोघी मायलेकींनी बाजूलाच असलेल्या ओझेलच्या माय लॅण्डकडे प्रथम धाव घेतली. लेकीने सकाळी सकाळी एक तुपट बकलावा फस्त केला. मी तेच कार्ड वापरून बघितलं...कार्ड व्यवस्थित चाललं. सुलेमान, मी, लेक आता त्यांच्या कझिन सिस्टरकडे. कार्डाचा पुन्हां असहकार. 'insufficient funds'! हे अशक्य होतं. कार्डावरचे पैसे संपले ? आमचा प्रवास अजून संपलेला नव्हता. अजून कपाडोक्या बाकी होतं. कार्ड जर आत्ताच रिकामं झालं असेल तर मग कपाडोक्या मधील हॉटेलचं बिल आम्हीं कुठून भरणार होतो ? चिंता ! अखेर वॉलेट काढलं. क्रेडीट कार्ड ऐसगुलच्या स्वाधीन केलं. माझे पैसे तिच्या खाती जमा झाले. प्रवासात कुठेही मी क्रेडीट कार्ड वापरणार नाही..हा माझा निश्चय भंग पावला. माझ्याकडे जे पैसे अस्तित्वात आहेत त्यावर मी ही संपूर्ण सहल करेन असे मी निघतानाच ठरवले होते. भलेमोठे आकडे...क्रेडीट कार्डाची बिलं मला भयभीत करतात. अडीअडचणीला म्हणून क्रेडीट कार्ड माझ्या वॉलेटमध्ये नेहेमीच जागा अडवून असतं. पण फक्त अडीअडचणीला. आज अकस्मात उद्भवलेल्या अडचणीवर शेवटी क्रेडीट कार्डाने मात केली आणि आम्हीं चिरालीतून बाहेर पडलो. तुर्कस्तानातील, समुद्रकिनारी वसलेले छोटे गाव. त्या गावातील ऐसगुलचे ते छोटसं हॉटेलं. माय लॅण्ड तसे नावाजलेले होते. मोठे होते. तिथे ट्रॅव्हल कार्ड चालले. ऐसगुलकडे नाही चालले. कपाडोक्याला चालेल अशी मनाची समजून घालत, आम्हीं परतीच्या प्रवासाला लागलो. आता मात्र अंताल्या बसस्थानकापर्यंत एक टॅक्सी व पुढे दुसरी टॅक्सी. बस टाळली. 


पेगासस एअरलाईन. तुर्कस्तानातील अंतर्गत विमाने इस्तान्बुलला स्पर्श केल्याशिवाय पुढे जात नाहीत. कपाडोक्याला जाण्यासाठी, कायसेरी किंवा नेवशेर ह्या विमानतळावर आपण पोचायला हवे. आणि अंताल्या विमानतळावरून कायसेरीला जाणे काही फार दूर अंतराचे नाही. पण ते सगळे नकाशावर. कायसेरीला जाण्यासाठी विमान तुम्हांला अन्ताल्यावरून उचलेल, इस्तान्बुलला नेऊन ठेवेल. मग तिथून तुम्हीं थोडे चाला. पायीपायी...दुसऱ्या गेटवर या. तिथून कदाचित तेच विमान तुम्हांला कायसेरीला घेऊन जाईल ! पण थेट अंताल्या ते कायसेरी नाही ! ह्या मागची कारणे मला माहित नाहीत. आणि ती शोधायचा मी जालावर तसा प्रयत्न देखील केलेला नाही !  
कायसेरी विमानतळावरून तसे हॉटेलचे अंतर बरेच होते. आम्ही जालावरून बुकिंग करतानाच विमानतळावरून आम्हांला उचलणे आणि परत नेऊन सोडणे ह्याचे विनंतीपत्र दिलेले होते. उगाच नाही ते साहस करण्याची तशी हौस नव्हतीच. आमच्या सोबत अजून पाच सहा प्रवासी चालकाने उचलले. आणि आम्हीं रस्त्याला लागलो. बाहेर काळोख पडला होता. डोंगर म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक ठराविक आकार येतो. म्हणजे शाळेत असताना कधी डोंगर, नदी, घर असं काही काढायला सागितलं की आपसूक, हातात बसून गेलेले आकार कागदावर उतरत. आणि आतापर्यंत जे काही डोंगर बघितले होते, त्यांचे आकार देखील डोक्यात बसलेल्या आकाराच्या फार काही विरोधातील नव्हते. परंतु, इथे खिडकीबाहेर काही विचित्र काळेकुळकुळीत आकार क्षितिजावर उभे होते. काळसर निळं आकाश, व त्यापुढे काळंनिळं काहीतरी...ते नक्की काय आहे, हे सूर्याच्या कृपेशिवाय कळणे अशक्य. उंच राक्षसांची टोळी उभी असावी जणू. लहानमोठे राक्षस. खाली रस्त्यावर पळणाऱ्या गाड्यांकडे आकाशातून नजर ठेऊन. आमची मिनी बस शहरात आत आत निघाली होती. विमानतळ दूर राहिला होता. मुक्कामस्थळे येऊ लागली व सहप्रवासी एकेक करून उतरू लागले. एकच बस धीम्या गतीत पुढेमागे सरकू शकेल इतके रस्ते निमुळते. वर्तुळाकार आरसे कोपऱ्यात भिंतीवर सर्वत्र अडकवले होते. व त्यावर समोरून येणाऱ्या गाड्या आणि आमची बस सुसंवाद साधत सहजगत्या चालत होत्या. एकेक करून सहप्रवासी उतरू लागले. आणि आमच्या हॉटेलच्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका येऊ लागली. शेवटी आम्हीं दोघीच राहिलो. कधी येणार अगं आपलं हॉटेलं ? कुठे कोपऱ्यात निवडलंय आपण ! मी लेकीला म्हटले.
"वेझीर केव्ह...!" चालक उद्गारला. आम्हीं टुणकन उठलो. बॅगा समोरच ठेवलेल्या होत्या. त्या ताब्यात घेतल्या आणि खाली उतरलो. काळोखात पांढरट दिसणारी भिंत, लाकडी दरवाजा...आत दूर दिसणारे काही बांधकाम. कधीकधी मला वाटतं...मी कशी काय बाबा अशी एकदम परक्या शहरात रात्रीबेरात्री जाऊन उभी ठाकते कोण जाणे...भीती कशी नाही वाटत मला ! मी लेकीकडे बघितलं..."छान दिसतंय हं आई हॉटेल..." "हं...चल बाई आता पटापट. रात्र उलटून गेलीय गं !" तिच्या चेहेऱ्यावर मात्र चिंतेचा मागमूस देखील दिसत नाही. आणि मला हसू येतं...वाटतं...हिला माझ्यामुळे डेअरिंग येत...आणि मला हिच्यामुळे ! निघाल्यात आपल्या मायलेकी ! मजल दर मजल !

(क्रमश:)
नकाशा जालावरून साभार  

13 comments:

हेरंब said...

>> आम्ही दोघी मायलेकींनी बाजूलाच असलेल्या ओझेलच्या माय लॅण्डकडे प्रथम धाव घेतली. लेकीने सकाळी सकाळी एक तुपट बकलावा फस्त केला.

टेन्शन आलं असेल तर तुपकट बकलावा हे उत्तम औषध आहे असं मी ऐकून आहे ;)

हेरंब said...

भारी चाललीये तुझी टूरटूर.
संपल्यावर आम्हाला वाटेल हुरहूर !

-शीघ्रकवी आवरेश्वर ;)

Sakhi said...

मस्त...

तुझ्या प्लानिंगने आमची सहल चालू आहे असे वाटावे इतके छान वर्णन आहे..

हेरंब म्हणाला तसे, सहल संपली की आम्हाला देखील हुरहूर लागेल :D

Gouri said...

मला वाटलं, चिरालीमध्येच हरवलीस का काय. आला अखेरीस पुढचा भाग! मस्त चाललीय टूर. :)
प्रवासात असं मोक्याच्या वेळी ट्रॅव्हल कार्ड न चालणं म्हणजे एकदम टेन्शन येतं ग ... त्या क्षणी काय काय डोक्यात येतं ना?

Pankaj - भटकंती Unlimited said...

विमानाच्या शेपटाचा फोटो, काय मस्त लाईट आहे त्यात. आवडला.
शिवाय बकलावा तर आधीपासूनच आवडलाय.

Shriraj said...

Smile-ful :)

Anagha said...

हेरंबा, तू माहिती अगदी अचूक आहे...त्यामुळे रोजच्या बकलावा ग्रहणाने आम्हीं दोघी दहा दिवस अगदी टेन्शन विरहित होतो ! :)

Anagha said...

भक्ती, अगं मला कळत नाही की लोक कशी काय मोठी मोठी पुस्तकं लिहितात ! :p :) :)

Anagha said...

गौरे, कार्ड न चालणे, म्हणजे अगदी पायाखालची जमीन सरकणे बाबा ! आणि त्यातून ते पुन्हापुन्हां 'insufficient funds' असं येणं...म्हणजे सगळ्यांसमोर एकदम मान खालीच की गं ! :) :)

Anagha said...

पंकज, लहानपणी जसं आपण हातात पुस्तक आलं की आधी त्यातली चित्र बघून घ्यायचो, तसं तू पोस्ट समोर आली की आधी फोटू बघून घेतोस ना ?! :D

Anagha said...

श्रीराज बुवा, हल्ली तुम्ही अधूनमधून गायब होता ! :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

खरंय खरंय. आधी फोटो, मग खायचा माल. त्यानंतर वाचन.
बादवे कधी घेतेयेस एसएलआर? ;-)

सौरभ said...

:)Turkey layich sundar desh distoy :)