नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 8 July 2012

टूर'की'...भाग ६

टूर'की'...भाग १ 
टूर'की'...भाग २
टूर'की'...भाग ३
टूर'की'...भाग ४ 
टूर'की'...भाग ५ 

उत्तर, पूर्व, आणि दक्षिण तीन दिशांनी पाण्याने वेढलेले, तुर्कस्तानातील सर्वात मोठे शहर इस्तान्बुल. गोल्डन हॉर्न, बॉस्फरस आणि मर्मरा समुद्र. एकेकाळी असलेली छोटी छोटी गावे, जंगले, सपाट प्रदेश एकत्रित करत करत सध्याचे शहर उभे केले गेले आहे. एका दिशेला गजबजलेले युरोपियन इस्तान्बुल. गोल्डन हॉर्नच्या पलीकडे शांत, श्रीमंत, छोटे छोटे किनारे, नौका, आकाशात विहारात असलेले समुद्रपक्षी आणि प्राचीन किल्ले घेऊन नटलेले एशियन इस्तान्बुल. आणि ह्यावर कळस म्हणजे बायझेन्टाइन ख्रिश्र्चन आणि ओट्टोमान इस्लाम ह्या परस्परविरोधी धर्मांचा इथे दिसणारा संगम. तीन दिवस शहरात फिरताना, युरोपियनांसाठी आशिया खंडात शिरण्याचे इस्तान्बुल हे प्रवेशद्वार होते ह्याची जाणीव मात्र पदोपदी झाली.

सकाळी आठ वाजता कॉम्प्लीमेंट्री ब्रेकफास्ट सुरु होईल हे आदल्या रात्री आम्हीं विचारून घेतले होते. डोळे उघडल्या उघडल्या भूक लागली आहे ही जाणीव पहिली होती.
"हॉटेलच्या गच्चीवर ब्रेकफास्टची टेबले टाकली आहेत." आम्हीं खोलीबाहेर आल्यावर आम्हांला मॅनेजरने सांगितले. कालच ताब्यात घेतलेले सर्व वाङमय हातात घेऊन आम्हीं जिने चढायला सुरवात केली. गच्चीत पाऊल टाकले तेव्हा साईटवर बघितलेले फोटो आणि डोळ्यांना दिसणारे दृश्य ह्यात तसे अंतर होते. फोटोमध्ये समोर अथांग निळाशार समुद्र दिसत होता. वास्तवात नजरेला, समुद्राचा थांग लागत होता. उजव्या हाताला ब्रेकफास्टचे टेबल मांडले होते. आम्हांला बसण्यासाठी एकच टेबल रिकामे होते. आणि ते काही गच्चीच्या कट्यापाशी नव्हते. सर्व हजर पाहुण्यांना एक स्मित हास्य व सुप्रभात करीत आम्हीं तिथे स्थिरावलो. मात्र आमच्या प्लेट्स रिकाम्या होईस्तोवर उजव्या कोपऱ्यातील कट्याजवळील टेबल रिकामे झाले. अर्ध्या भरलेल्या प्लेटा उचलल्या. टेबल बळकावले. आता समुद्र  नजरेस पडत होता.

आजूबाजूच्या इमारती, पूर्वी बुटक्या असाव्यात व काळाबरोबर त्यांची उंची वाढत गेली असावी असे वाटत होते. आकाशात स्वैर वावर समुद्रपक्षांचा. आसमंतात त्यांचाच आवाज. सतत कोणाला साद घातल्यागत. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हीं दिवसभर उनाडक्या करत असू, व इमारतीच्या पायथ्याशी उभ्या राहून, आकाशाच्या दिशेने माना खेचत जी कोणी सखी आली नसेल तिच्या नावे आरोळ्या ठोकत असू...त्याची आठवण झाली. एकदा माझे किंचाळणे ऐकून एका मैत्रिणीचे बाबा शेवटी गॅलेरीत येऊन उभे राहिले व कपाळाला सतराशे साठ आठ्या घालून मला म्हणाले, "किंचाळू नकोस ! स्वाती घरात नाहीये. आणि असली तरी मी तिला खाली पाठवणार नाही ! तिला अभ्यास आहे !" ह्यातील 'तिला अभ्यास आहे' हे वाक्य सूचक जागी जोर देऊन म्हटले असल्याकारणाने 'तुला अभ्यास नसला तरी तिला आहे' हे न बोलता मला सांगण्यात आले होते. मी मान खाली घालून बरं म्हटलं, चष्मा वर सारला आणि दुसऱ्या मैत्रिणीच्या नावे खिंकाळायला सुरवात केली ! आत ह्या गोष्टीशी त्या बिचाऱ्या समुद्रपक्षांचा संबध काय ?? काsssहीही नाही ! उगाच आपलं ! आठवलं म्हणून सांगितलं !
लेकीने बुकिंग करावयाच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आमच्या सुलतानेहमद परिसरातील हॉटेलच्या आसपासच सर्व प्रेक्षणीय स्थळे होती. मग 'चाय'चे घुटके घेत आणि माहितीपत्रकांत डोकावत तिने आजच्या दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला...

अया सोफिया, ब्लू मॉस्क, टर्किश नाईट शो, ग्रॅन्ड बझार, तोपकापी राजवाडा...रस्ते, गल्ल्या, बोळ, तुर्क स्त्रिया, तुर्क पुरुष, तुर्क पोरं आणि तुर्क बाळं....




इतिहासात अया सोफिया (तुर्की उच्चार) ह्या इमारतीने आयुष्यात दोनदा जाळपोळ झेलली. जसजशी राजवट बदलली तसतसे तिचे रूप बदलले. कथिड्रल ते मशीद ते म्युझियम हा असा अतिशय मिश्र इतिहास ह्या इमारतीचा आहे. सम्राट जस्टीनियन ह्याने जगात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे बांधकाम केले. ५३७ साली ह्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले व त्यानंतर १४५३ पर्यंत, हे जगातील सर्वात मोठे चर्च मानले जाई. इमारतीची उंची बघता, हे असे बांधकाम कसलेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना ३६० साली, कसे काय केले असेल हा विचार अक्षरश: तोंडात बोटे घालावयास भाग पाडतो. त्यानंतर 'महमद, दि काँकरर' (ह्याला आता मराठी इतिहासात काय नाव दिले असेल ह्याची मला काही कल्पना नाही!) ह्याने त्याची सत्ता आल्यावर त्या चर्चचे रुपांतर मशिदीत केले. आणि हे करताना भिंतींवर असलेली अतिशय सुंदर मोझॅक्स पांढरा रंग मारून मिटवून टाकली ! एखाद्या लहान मुलाचे चित्र रद्दीत जरी चुकून मिळाले तरीही ते फाडून टाकण्यास आपले मन धजावणार नाही. आणि इथे अप्रतिम अशा अगणित कलाकृती मिटवून टाकल्या गेल्या होत्या. अल्प स्वरूपात त्यातील काही चित्रे पुन्हा वर आणली गेली आहेत. हे काम किती कठीण असेल ! आतील चित्राला अजिबात धक्का न देता ते पुन्हां उजळवयाचे ! १९३५ साली अतातुर्क ह्यांनी ह्या मशिदीचे रुपांतर म्युझियम मध्ये केले. युनेस्कोने दिलेल्या अंशतः आर्थिक पाठिंब्यावर ह्या चित्रांचा पुनरुद्धार चालू आहे. जितका कालावधी मी तिथे होते तितका वेळ माझ्या डोळ्यांसमोर, अनेक माणसे पाशवी नृत्य करीत भिंतीवर, छतावर असलेल्या अलौकिक मोझॅक चित्रांची विटंबना करताना येत होती!

हिप्पोड्रोम वाटेत दिसतोच. बायझंटाइन सम्राटांची दुपार म्हणे इथे रथांच्या शर्यती बघण्यात व्यतीत होत असे ! १२०० वर्षे सम्राटांच्या दैनंदिन आयुष्याचा हा अतिशय महत्त्वाचा परिसर होता. व पुढील ४०० वर्षे त्यानंतर सत्तेवर आलेल्या ओट्टोमानांच्या आयुष्याचा. कित्येक दंगली, खूनखराबे ह्या परिसराने अनुभवले ! म्हणे विविध बायझंटाइन सम्राट व अनेक ओट्टोमान सम्राट, हिप्पोड्रोम अधिकाधिक सुंदर करण्यामागे असत. मात्र त्यांनी उभारलेल्या पुतळ्यांपैकी दुर्दैवाने आता काही मोजकेच इथे उभे आहेत.

तोपकापी राजवाडा ! प्र-चं-ड ! अफाट पसरेला. इथे वसलेल्या सम्राटांच्या कहाण्या काय सांगाव्या ? त्यांचे दागदागिने, अंगरखे, सोन्यात घडवलेले पाण्याचे घडे, सोनेरी तलवारी, हिरेजडीत मुकुट, लखलखती आसने ! सोनं...नाणी...हिरे...माणके....म्हणजे अगदी कचऱ्यासारखे होते ह्यांच्याकडे. वैभवाचा इतका अतिरेक होता की शेवटी मी हळूच लेकीच्या कानात म्हटले,"बघ गं बाई, कदाचित सोन्याचं टमरेल देखील सापडेल इथे !" "आsssई !" ती ओरडली माझ्यावर ते सोडून द्या तुम्हीं, पण तिथे नाहीतरी कोणालाही मराठीतला म कळत नव्हता. त्यामुळे हे माझे उद्गार मी मोठ्याने त्या दालनात फेकले असते तरीही कोणाला कळले नसते ! त्यांना असेच वाटले असते की ते सगळं बघून मी फारच अचंबित झाले आहे...व कदाचित बेशुद्ध वगैरे पडत असेन ! हे असेच काहीसे मला इजिप्त मधील म्युझियम बघताना वाटले होते. तुतानखामेनच्या वस्तू ! सगळं मेलं त्याचं सोन्याचं ! आणि मी एक इथे भारतीय नारी ! लेकीच्या लग्नासाठी तीळतीळ सोनं जमवतेय ! छ्या !
ओट्टोमान सम्राट अंगावर परिधान करीत त्या अंगरख्याच्या बाह्या म्हणजे आमचे जसे चुडीदार ! जर माझा हात अडीच फुटी असेल तर माझ्या अंगरख्याची बाही ही साडे आठ फुट लांब ! त्याच्या चुण्या करत-करत...करत-करत त्या अंगरख्यात आपण शिरायचे. म्हणजे मी पहाटे दोन वाजता उठले तरच हा सगळा उपद्वयाप करून, 'कदाचित' लंचटाईमपर्यंत ऑफिसात पोचेन ! कैच्याकै ! असे प्रचंड मापाचे कपडे घालणारे ओट्टोमान हे शरीराने इतके अगडबंब असूच शकत नाहीत. मग जेव्हां कधी ते त्यांचे शाही स्नान करावयास हमामखान्यात जात असत त्यावेळी त्यांचे दास 'जल्ला मेला ! मेल्याची बाडी इतकूशीच तर हाय ! उग्गाच हे भलं मोठ्ठं कायतरी फुगवून ठवलंय स्वत:ला !" असं नक्की एकमेकांत बोलत असणार ! आता मात्र माझ्या लेकीने माझ्यावर डोळे वटारले. 'अबब...बापरे...सॉलिड...'असे सातत्याने उद्गार काढीत आम्हीं कधीतरी तिथून बाहेर पडलो. तोपकापी राजवाडा....एका दिवसात बघण्याचे कामच नाही ! पण तसेही दुसऱ्याचे वैभव ते ! किती वेळ आपण त्याचे कौतुक करावयाचे ! हा मात्र एक गोष्ट होती ! आपल्या कोहिनूर हिऱ्यासारख्याच ह्यांच्या देखील बऱ्याच गोष्टी ब्रिटिशर्स घेऊन गेलेले आढळले ! आढळले म्हणजे ...त्यात्या जागा त्यांनी कपाटात रिकाम्या ठेवल्या आहेत...व खाली एक चिठ्ठी ! 'ब्रिटीश म्युझियम'...तेव्हा, तिथे जा...तिथे बघायला मिळेल !

थकल्याभागल्या आम्हीं एका इतिहास असलेल्या गोडधोडाच्या दुकानात जाऊन बसलो आणि टर्किश डिलाईट, बकलावा मागवला ! अ-हा-हा ! अप्रतिम. मुंबईत देखील पूर्वी हा पदार्थ चाखला होता. पण तुर्कस्तानात बसून तुर्की 'बकलावा' खाण्यातील गोडी काही औरच ! काल तुर्की चाय, अडाणा कबाब आणि आज बकलावा...जे जे पदार्थ ठरवून आलो होतो ते एकेक करून चाखणे चालू होते !


रात्री, बोटीवर. टर्किश नाईट शो ! बॉस्फोरस ह्या इस्तान्बूलच्या निमुळत्या समुद्रावर. रात्र काळी. रात्र नाचरी. रात्र धुंद. टर्किश विवाहातील नाचगाण्याचा एक टप्पा तेथील कलाकारांनी करून दाखवला. आपल्याबरोबर सर्वच प्रेक्षकांना आपल्या नाचात सहभागी करून घेतले. अख्खी बोट काही काळ हातात हात घालून गोलगोल फिरत होती. एकदा उजवा पाय, एकदा डावा पाय...हवेत उडवायचा ! त्या आधी बेली नर्तिकेने देखील असेच एका दोघांना पकडले. लागले बाईंबरोबर नाचू ! बाई त्यांना ठेका शिकवीत होत्या. एकदोघांनी बॉलीवूडसारखे बाईंना जवळबिवळ बोलावले. अगदी नोटा भोवती गोलगोल फिरवल्या. बाईंनी त्या ताब्यात घेतल्या. म्हातारे आजोबा देखील खुदूखुदू हसताना शेजारीच बसलेल्या आजींना सापडत होते. एकच विचित्र अनुभव. लेकीने तिथल्या वेटरकडे 'water' मागितले....त्यावेळी तो तिच्यासाठी व्होडकाचा ग्लास भरून आला !  त्याला बेनिफिट ऑफ डाउट द्यावा व आपण 'water' म्हटलेले त्याला कळले नसावे असे आम्हीं आपले मानून घेतले. वा त्या बेहोष बोटीवर पाणी मागणारे बहुतेक आम्हींच असावेत !

समुद्रातून बाहेर पडून जमिनीवर आलो तेव्हां दुसरा दिवस सुरु झाला होता. हॉटेलवर पोचलो. दमल्याभागलेल्या आम्हीं, काही क्षणांत निद्राधीन झालो.

क्रमश:

19 comments:

हेरंब said...

भ ह न्ना ह ट ह चाललंय !!

रोहन... said...

इतिहास लिहिते आहेस ते बर करते आहेस. :) मस्त सुरू आहे टूर.. :)

rajiv said...

दुसऱ्या मैत्रिणीच्या नावे खिंकाळायला सुरवात केली ! आत ह्या गोष्टीशी त्या बिचाऱ्या समुद्रपक्षांचा संबध काय ?? काsssहीही नाही"
--- असे कसे... दोन्ही ठिकाणी एकच "बिचारा" समुद्र पक्षी तर हजर होता :)

इतिहासापासून ...धुंद रात्रीपर्यंत ... सगळंच एकदम जिवंत होऊन समोर आलंय ...
"बेफाट" ...प्रत्यक्षदर्शी लिखाण !!


" रस्ते, गल्ल्या, बोळ, तुर्क स्त्रिया, तुर्क पुरुष, तुर्क पोरं आणि तुर्क बाळं...."

पण तेथील स्वच्छास्वच्छ्ता , पादचारी/गाडीचालक याचे एकमेकांवरील/समाजावरील प्रेम आपल्या इथल्या लोकांप्रमाणे बेगडी का नितळ ?

Pankaj - भटकंती Unlimited said...

ब्लू मॉस्कचे फोटो प्लीज.

THEPROPHET said...

वॉडss = वॉटर
व्हॉडकंss = व्होडका

जवळपासचे उच्चार आहेत.. लाटांच्या गाजात गोंधळला असेल वेटर.. :)

एकंदरित मस्त मस्त अनुभव..
(अतातुर्कचा तुर्कस्तान - फक्र है :) )

aativas said...

मस्त चालू आहे तुमची सफर ... वाचते आहे आणि आनंद घेते आहे.

Shriraj said...

राजीवशी १००% सहमत

अपर्णा said...

अगं त्यादिवशी एका ग्रीक रेस्टॉरंन्टमध्ये बकलावा खाताना तुझ्या "टूर"कीची आठवण आलेली...तुला "उच"की नाही न लागली...;) :D
मस्त चाललंय..डिटेलवार....:)

Anagha said...

हेरंब, ठरवताना वाटलं नव्हतं... :) :)

Anagha said...

रोहणा, शाळेत इतिहासाचा अभ्यास करताना नुस्त पाठांतर करून घेतात म्हणून शेवटी काहीच लक्षात रहात नाही ! पण हे असं प्रत्यक्ष बघताना कळतं ना की किती कायकाय घडून गेलेलं आहे !

Anagha said...

पंकज, अरे खूप फोटो आहेत ! किती आणि कायकाय टाकू...असं झालं माझं ! :)

Anagha said...

राजीव, आपण एकूणच फार अस्वच्छ आहोत...हे एक दु:खद सत्य परदेशात अधिकच खुपतं.

Anagha said...

ह्म्म्म...लाटांच्या गाजात ! संगीताच्या कल्लोळात असेही म्हणता येईल विद्याधर ! :) :)

Anagha said...

सविता, तुर्कस्तान देश असा आहे की त्यातल्या एखाद्या कोपऱ्यात गेलो तरीही लिहिण्यासारखे बरेच आहे. :)

Anagha said...

श्रीराज, :)

Anagha said...

अपर्णा, सही आहे ना बकलावा ? ! उचकी, ठसका....सगळं लागलं हो ! :) :)

सौरभ said...

:D :D :D

Anand Kale said...

अर्ध्या भरलेल्या प्लेटा उचलल्या. टेबल बळकावले. आता समुद्र नजरेस पडत होता... :))

एकदम खुसखुशित पोस्ट.. :)

अपर्णा said...

you mean you never saw this ;)

http://majhiyamana.blogspot.com/2011/10/blog-post_29.html