नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 12 June 2012

भांडाभांडी

गेल्या एका महिन्यात दोन बायकांशी भांडणे झाली. भांडणेच म्हणावीत. उगा 'वादविवाद' असे संबोधून त्याला थोर स्वरूप का द्यावे ?

प्रसंग पहिला.
स्थळ माझी गल्ली. वेळ रात्रीचे साडे आठ.
दिवस तसा बरा संपला होता. आता एक उजव्या हाताचे वळण आणि आमची इमारत दृष्टीक्षेपात. आठ वाजून गेलेत...जेवायला काय करावं...भाजी आणायची राहून गेलीय...फ्रिझमध्ये कायकाय आहे कोण जाणे....आज फ्रिझच रिकामा करावा का...फार पदार्थ पडून राहिलेत...इत्यादी इत्यादी.

आमची गल्ली म्हटली तर रुंद आणि म्हटली तर अरुंद. आपले देशवासी ज्या पध्दतीत गाड्या चालवत असतात तिथे हमरस्ता काय आणि गल्ली काय. अगदी सहा पदरी रस्ता देखील आम्हांला अरुंदच वाटत असतो. डाव्या हाताला समोर एक ऐसपैस काळी गाडी उभी होती. उजव्या हाताला आमच्या अशोकचे वडापावचे साम्राज्य. त्या स्टॉल पुढ्यात चारचाकी, दुचाकी, दोन पायी....असे वेगवेगळे प्रकार आरामात उभे असतात. वेडेवाकडे. गरमागरम बटाटा वड्यांचा स्वाद घेत. बोटे चाटत. दिवसाच्या कोणत्याही वेळेला त्या बाजूचे चित्र हे असेच असते. त्यामुळे माझ्या गाडीची गती अगदी संथ होती. इतक्यात त्या काळ्या गाडीमागून एक पस्तिशीच्या आसपासची महिला गाडीच्या पुढ्यात आली. माझी नजर तिच्यावर पडावी आणि तिने हातातून कागदाचा भल्या मोठ्या घागरीच्या आकाराचा बोळा टपदिशी रस्त्यात टाकावा...ह्यात माझेच दुर्दैव फार. त्या कागदावरून तिने आपला मालकीहक्क सोडावा आणि त्याच क्षणी तिची आणि माझी नजरानजर व्हावी...हे असे जेव्हा घडते त्यावेळी मला बऱ्याचदा वाटते...ह्या समोरच्या व्यक्तीचे आणि माझे काहीतरी गेल्या जन्मीचे नाते असावे. कारण नाहीतर हे माझ्याच समोर का घडावे ?
मी गाडीत बसल्याबसल्या बाईंना खुणेने विनंती केली...तो कागदाचा बोळा त्यांनी पुन्हा ताब्यात घ्यावा व कचराकुंडीत टाकावा. बाईंना नाही पटले..त्यांनी खुणेने ते मला सांगितले. मी देखील खमकीच. गुमान घरी जावं तर नाही. गाडीतून खाली उतरले. म्हटले, कृपया हा कागद उचला व कचराकुंडीत टाका.
बाई म्हणाल्या की मी त्यांच्याशी फार अरेरावीने बोलत आहे...व ते त्यांना मुळीच आवडले नाही. त्यांच्या मते 'कृपया' ह्याच अर्थाचा इंग्रजी भाषेतील शब्द माझ्या वाक्यांना अजिबात नम्रता देत नव्हता.
तरी मी माझे म्हणणे पुढे रेटलेच. म्हटले, मी तर तुम्हांला तुमच्या भाषेत प्लीज म्हटले आहे.
नाही...तेव्हढे पुरेसे नाही. तुमचे हावभाव फारच अरेरावीचे होते.
मी पुन्हापुन्हां बाईंना सांगून बघितले. त्यांनी नाही ऐकले. मी खाली वाकले. बोळा उचलला व बाईंच्या गाडीवर ठेवून दिला. म्हटले ही गल्ली माझी आहे...हा रस्ता माझा आहे...तो तुम्हीं घाण करू नये...तुमचा कचरा तुम्हीं घरी न्यावा...व घरातील कचरा कुंडीत टाकावा.
आता बाई अधिकच संतापल्या. मी तुम्हांला माझा बोळा उचलावयास सांगितला नव्हता. तो मी उचलणारच होते. पण तुम्ही ज्या पद्धतीने मला हे करावयास सांगितलेत ते मला आवडले नाही.
अहो बाई तुम्हीं ज्या प्रकारे माझ्या रस्त्यावर कचरा केलात ते मला आवडले नाही.
तुला नाही आवडले तर तू अख्खी गल्ली साफ कर ना...घे झाडू...आणि बस कचरा काढत. बाई उद्गारल्या.
ह्म्म्म... माझ्या डोळ्यांसमोर चित्र आले...एका हातात झाडू...आणि दुसऱ्या हातात टोपली...आमची गल्ली साफ. मला काही फरक पडला नाही. मला कचरा काढावयास आवडते. विशेष करून कचरा काढून झाल्यावर घर जे काही सुखावते ते जाणून घ्यावयास मला फार आवडते. त्यामुळे स्वच्छ झालेली माझी गल्ली किती खुष होईल हे माझ्या डोळ्यासमोर एका क्षणात चमकून गेले. तसेही हे काम आम्हांला आमच्या शाळेने शिकविले होतेच.

इतक्यात बाईंचे पतीदेव छोट्या बाळाला कडेवर घेऊन पुढे आले. त्यांनी नम्रतेने आपल्या पत्नीचा हात धरला....व तिला घरी चलण्याची त्यांनी विनंती केली.
मी देखील गाडीकडे वळले. गेली पाच मिनिटे मी माझी गल्ली अरुंद करून ठेवली होती. गाडीत बसले व गाडी सुरु केली.

माणसाला इंग्रजी आले, लांबसडक गाड्या फिरवता आल्या...ह्याचा अर्थ तो माणूस सुशिक्षित आहे असा होतो काय ?
अजिबात नाही.
म्हणजेच शिक्षण माणसाला सुसंस्कृत बनवत नाही.
मग नक्की सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा ह्या दोन गोष्टी माणूस नक्की कोठून शिकतो ?
ही एक गोष्ट.
त्यापुढे जाऊन विचार येतो...
ह्या अशा मूर्ख माणसांकडे दुर्लक्ष करणे उचित, की भर रस्त्यात ही माणसे कशी मूर्ख व ढोंगी आहेत हे उघडकीस आणणे हे उचित ? त्यांचा सुशिक्षितेचा बुरखा फाडणे उचित ?

कोण जाणे ?
गत जन्मीचे देणे फेडण्यास ही अशी माणसे मला आजकाल पदोपदी भेटू लागली आहेत हेच खरे.

दुसरे भांडण पुढील एक दोन दिवसांत...

22 comments:

Shriraj said...

"मग नक्की सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा ह्या दोन गोष्टी माणूस नक्की कोठून शिकतो?"
अनघा, तुला पडलेला हा प्रश्न मला ही खूपवेळा पडतो. ही सार्वजनिक ठिकाणांतील स्वच्छता जी बाकी देशात पाहायला मिळते ती आपल्याकडे का पाहायला मिळू नये?

Anonymous said...

अनघा ताई,
एकदम पटेश. पुढचं भांडण येऊ दे लगेच.

हेरंब said...

दुसऱ्या भांडणाची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देतो ;)

Anonymous said...

अनघा ताई,
एकदम पटेश. पुढचं भांडण येऊ दे लगेच.

Unknown said...

शिक्षित आणि सु-शिक्षित मधला फरक हाच बहुतेक. आपल्याला 'मी काय करू शकतो' पेक्षा 'कोणी काय केलं पाहिजे' हे बोलण्याचा सर्वांस सोस अधिक :)

अश्या प्रसंगांनी आपला मनस्ताप होतोच. उपरोधिक प्रतिक्रिया तो मनस्ताप कमी करतात हेच त्यात एक चांगले.

मी अगदीच कोणाला बोलायला जात नाही, वय कमी पडते, पण एक वाईट नजर तर नक्कीच बहाल करतो !

अपर्णा said...

अनघा मी जिथे एकदम नरमाईने घेते तो हा विषय आहे...:)

माझा मायदेशातला पहिल्या वर्गाने प्रवास करायचा अमुल्य वेळ तिथल्या इंग्रजी बोलणार्‍या सो कॉल्ड सुशिक्षित बायकांनी गाडीबाहेर कचरा टाकू नये म्हणून त्यांचा कचरा स्वतःकडे घेऊन मग इच्छित स्थानकावर समोरच असणार्‍य़ा चहापाण्याच्या टपरीवरच्या कचराकुंडीत टाकण्यात मी सार्थकी लावला आहे.....
काय बोलायचं??? सुसंस्कृत हा फ़क्त एक शब्द आहे असंच तेव्हा मलातरी वाटायचं....
फ़क्त एक आहे शांतपणे त्यांचा कचरा घेतल्यानंतरचा त्यांचा चेहरा पाहताना मात्र मला मनातून प्रचंड आनंद व्हायचा..आणि उगाच अशा लोकांशी बोलण्यात शक्ती घालवायचं काम मात्र मी शक्यतो केलं नाहीये....ते काय म्हणतात नं मुरख से गाठ पडना तो चुप रहना का काय...तसं...:)

Raindrop said...

why am I not surprised?? tu tashich, te tashech. nothing has changed. tu right chya patari war...tya wrong chya patari war....milnaar tar kashya hya don patrya?

Anonymous said...

तुझ्या भांडणाचा मुद्दा पटला तरी हल्ली मला बायकांची भांडण म्हटली की धडकीच भरते ;) :)

आणि भांडणाला सरळ भांडण म्हणणं खूप मनापासून आवडलं :)

भोवरा said...

शांती शांती शांती !!!

Anonymous said...

अनघा,
नमस्कार ...खरे तर वयाने तुझी लेक आणि मी यांच्यात काही फरक नसेल...पण मी मात्र तुला अनघाच म्हणणार(तुझी हरकत असली तरी)....
तुझ्या ब्लॉग वर पहिलीच प्रतिक्रिया...गेल्या आठवड्यात अशीच online भटकत असताना तुझ्या पाटीवर आले...आणि सगळे लेख झपाट्याने वाचून काढले...अगदी २००९ च्या पहिल्या पोस्टपर्यंत जाऊन आले...तेव्हाच बोलायचे होते पण काही बोलू हेच काळात नव्हते...तुझ्या कविता, तुझे लेख सारे काही अगदी निशब्द करणारे...
अगदी भिडणारे...स्पष्ट आणि अत्यंत प्रामाणिक...खरे तर मला काहीही विशेषणे लावायची नाहीयेत...खूप छान वाटले असे नाही लिहिणार मी...कारण ते सारे वाचून खूप वाईट वाटले...
फक्त एवढेच म्हणेल कि God bless you ....

Shriraj said...

आमची ताई अशीच आहे... स्वतः काळजी करणारी.... दुसऱ्यांना काळजीत पाडणारी... आता त्याला कोण काय करणार :P

सौरभ said...

ओ य्यार.. मला वाटलं फायटिंग-वायटिंग झाली की काय... श्या... चलो कोई गल नै. पुढच्या भांडणात असेल.. :P :D

Anagha said...

श्रीराज, आपण अतिशय अस्वच्छ लोकं आहोत ! आणि निर्लज्ज !

Anagha said...

श्रद्धा, पुढलं भांडण राहूनच गेलं लिहायचं ! :p फिरायला गेले ना त्यामुळे ! आता ती भटकंती लिहून झाली की लिहिते पुन्हां भांडण ! आशा आहे की तोपर्यंत काहीतरी नवीन भांडण उभं रहाणार नाही ! :p :) :)

Anagha said...

हेरंबा, बघ मी ते भांडण लिहिलं नाही आणि त्यामुळे तुझी ह्या भांडणावरची प्रतिक्रिया पण राहून गेली ! हम्म्म्म... :)

Anagha said...

हर्षल, अरे उलट लहान कोणीतरी सांगतंय म्हणून अजून लाज वाटेल कदाचित ! :) म्हणजे माझी लेक अगदीच लहान होती ना तेव्हा मी हे तंत्र वापरायचे ! तिला शिकवून ठेवलं होतं मी !....ती कोणी कागदबिगद टाकला...की घरी टाका ना...असं म्हणून त्यांच्या हातातच द्यायची तो कागद उचलून ! :) :)

Anagha said...

वंदू, शक्यता शून्य आहे...लोकं काही सुधारायची नाहीत ! आणि भांडणं सोडायची नाही ! :)

Anagha said...

तन्वे, :) :)

Anagha said...

भोवरा, :) :)

Anagha said...

अनिता, तुझ्या मनापासून लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. :)

Anagha said...

श्रीराज, :) :)

Anagha said...

सौरभ, पुढलं भांडण तसंही मी डोक्यात चांगलं जागं ठेवलंय ! लिहीनच लवकर ! :) :)