नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 12 April 2012

आत्मचरित्र

मध्यंतरी जयवंत दळवी यांचे 'आत्मचरित्राऐवजी' हे पुस्तक वाचले. त्यामधील पहिल्याच लेखात ते म्हणतात..."असे म्हटले जाते की, प्रत्येक मनुष्य आपल्या नावावर किमान एक पुस्तक लिहू शकतो ! आणि ते म्हणजे त्याचे स्वत:चे आत्मचरित्र ! असे सर्रास म्हटले जाते. त्यामुळे असा समज होतो की आत्मचरित्र लिहिणे फार सोपे आहे आणि त्याच कल्पनेने बरेचसे लोक आत्मचरित्र लिहितातही ! स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची त्यांची कल्पना असते. पण सरळ पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी म्हणजे खरेखुरे आत्मचरित्र नव्हे ! पृष्ठभागाखालचा भाग आत्मचरित्रात आणणे कठीण असते ! स्वत:चे बाह्यांग नव्हे, तर अंतरंग खरवडत जाणे ही कठीण गोष्ट आहे !"

परवा उमा कुलकर्णी यांचं 'केतकरवहिनी' वाचून झालं. मुंबईत मालाडला रहाणाऱ्या एका मुलीचे हे आत्मचरित्र. विवाह कोकणातील दुर्गम ठिकाणी झाल्यानंतरचे तिचे आयुष्य, संसारातील व समाजातील कायद्याच्या लढाया. हे सर्व वाचताना कळते ते एकच....मी अन्याय सहन करणार नाही व त्याविरुद्ध लढा देईन.' हे एकच तत्त्व उराशी बाळगून पानापानावर केतकरवहिनी घडत जातात. आणि आपल्याला देखील पुन्हा एकदा जाणीव करून देतात...'मी अन्याय सहन करणार नाही व त्याविरुद्ध लढा देईन.' हे तत्त्व आयुष्य जगण्यासाठीचे कारण बनू शकतं.

मात्र हा त्यांचा लढा वाचत असताना मला खोल खोल गर्तेत ढकलून देतात त्या बजूवहिनी. तीन परिच्छेदांत त्यांची कथा आपल्याला केतकरवहिनी सांगून जातात. परंतु, बजूवहिनींना मी आता माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही हे मला पक्के माहित आहे. रोज, दर क्षणाला कुठे ना कुठे तरी एका स्त्रीच्या आयुष्यात थैमान घातले जात असते...देशोदेशी. ह्या सत्यकथा अवाक करतात. मी पुस्तकातील ते पान जेव्हा वाचलं त्यावेळी अक्षरश: कोणीतरी ढकलून मला भिंतीपाशी न्यावं....श्वास घुसमटेस्तोवर दाबून धरावं...एकही खिडकी नसलेल्या काळोखी खोलीत बंद करावं...असंच वाटलं. आता मरेस्तोवर मी कधीही त्या खोलीतून बाहेर येऊ शकणार नाही...बजूवहिनींबरोबर मीही त्याच खोली त्यांचा हात हातात घट्ट धरून बसून राहीन...असंच काहीसं.

केतकरवहिनी सांगतात...'या बजूवहिनींशी माझे पहिल्यापासूनच जवळचे स्नेहसंबंध जुळले होते. त्या आमच्या लांबच्या नात्यातल्या सोवळ्या बाई होत्या. विनापाश बालविधवा म्हटल्यावर अडीनडीला त्यांना बोलावून घेण्यात येई. आईंशी (केतकरवहिनींच्या सासूबाई) त्यांच्या खूप गप्पा चालत.
त्यांना गाणी ऐकायला फार आवडे. माझ्याकडून त्या गाणी म्हणवून घेत. तशीच त्यांना गोष्टींची भारी आवड. मासिकामध्ये छापून आलेल्या कथा ऐकायला त्यांना फार आवडायचा. मीही दुपारी रिकाम्या वेळी वाचून दाखवत असे. त्या स्वभावाने इतक्या हळव्या होत्या की कथेतील एखादा भावनापूर्ण प्रसंग ऐकता-ऐकता त्यांचे डोळे पाण्यानं भरून जात. त्यांचा तो संवेदनाशील स्वभाव अनेकदा माझ्याही डोळ्यांत पाणी उभं करत असे.
त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगामुळे त्यांचा स्वभाव एव्हढा हळवा बनला होता.
त्या अगदी न कळत्या वयात असताना त्यांचा नवरा गेला होता. त्यांना त्याचा चेहराही आठवत नव्हता. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांना सोवळं करण्यात आलं. अशा सोवळ्या बालविधवांना त्या काळी घरच्याच माणसांकडून वाईट प्रकारे वापरलं जायचं.
बजूवहिनींच्या बाबतीतही हेच घडलं होतं. दिवस राहिले. पोट पाडण्यासाठी ठाऊक असलेले सगळे गावठी उपाय केले गेले. पण कशालाही दाद न देता तो चिवट गर्भ वाढत राहिला. असेच नऊ महिने भरले आणि कळा सुरू झाल्या.
गावातली सुईण आली. तिनं तिच्या पद्धतीने अट घातली,"हे कुणाचं पाप ? नाव सांगितलंस तरच सुटका करेन !"
कोंडीत सापडलेल्या बजूवहिनींना निरुपायाने सासऱ्यांचं नाव सांगावं लागलं.
सुईणीने सुटका केली. मुलगा झाला. रडलादेखील !
त्यानंतर अशा परिस्थितीत नेहेमी जे केलं जायचं, तेच केलं. बाळाला बाजल्याच्या खुराखाली ठेवून बाळंतीणीला बाजल्यावर बसायला सांगितलं!


बजूवहिनी. त्यांचं हे ३ परिच्छेदांतील चरित्र. केतकर वहिनीनी त्यांचा उल्लेख केला म्हणून माझ्यापर्यंत बजूवहिनी पोचल्या.

दळवी म्हणतात, "सरळ पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी म्हणजे खरेखुरे आत्मचरित्र नव्हे ! पृष्ठभागाखालचा भाग आत्मचरित्रात आणणे कठीण असते !"...आता लिहिता वाचता झालेल्या स्त्रिया, आत्मचरित्र लिहू लागल्या तर तो पृष्ठभागाखालचा भाग समाजाला झेपेल ?

स्त्रिया स्वत:चे अंतरंग खरवडत असता, पुरुषप्रधान समाजाचे बाह्यांग उघडे पडेल ते समाजाला झेपेल ?

16 comments:

Gouri said...

आता हे पुस्तक कधी एकदा वाचते असं झालंय!
काय भयंकर कहाणी आहे बजूवहिनींची :( कशाकशाला तोंड दिलंय या बायांनी ... खरंच, त्या सगळ्या लिहित्या झाल्या, तर समाजाला झेपेल?

श्रिया (मोनिका) said...

स्त्रीस्वभाव मला वाटते प्रचंड सोशिक आणि देवाला ते ठाऊक आहे न....
अनेकींच्या अनेक कहाण्या आणि काहींच्या आयुष्यातले प्रसंग तर अंगावर काटा उभा करतात.
ह्या पुस्तकातील अनुभव नक्कीच असे असावेत...आत्मचरित्र म्हणजे नुसतेच आनंदाचे तुषार नाहीत तर खोल जखमांना परत एकदा दृश्य करून त्या जखमा कश्या झाल्या ह्याचे वर्णन. कोणतीच गोष्ट टाळून तीतून मार्ग निघत नसतो, स्वानुभव कितीही कटू असले तरी मनावर ठळक कोरले जातात आणि जर अश्या स्त्रियांनी ते अनुभव बोलके केले तर नक्कीच अनेकांना हादरा बसेल.....

rajiv said...

संपत्ती व स्त्री, या दोहोंवरील स्वामित्व हेच पुरुषी अहंकार फुलवणाऱ्या गोष्टी असून, अनादी काळापासून अस्तिवात आहेत.
त्यामुळे त्या अहंकारावरील वरील कोणतेही आक्रमण...हे या पुरुष प्रधान दांभिक समाजाला झेपणारेच नाहीये.. !!
आणि याला सुरुंग लावायचा असेल तर ...असे प्रत्येक स्त्री आत्मचरित्र हे हा बुरखा फाडून टाकायला कारणीभूत होऊ शकेल ....

तृप्ती said...

Oh my God ! nusata vaachUnach poTaat DhavaLala.

kharach ashaa sagaLyaa baayaa lihityaa jhaalyaa paahijet.

हेरंब said...

अशी काही निर्घृण पद्धत पूर्वी अस्तित्वात होती याची मला ऐकूनही माहिती नसल्याने दहा वेळा वाचल्यावरही रजिस्टर होत नव्हतं आत. !!

Mazyatali Mi said...

भयंकर आहे सगळं. बाई आणि सोशिकपणा यांचं नातं अनादीअनंत आहे हेच खरं.

सुप्रिया.... said...

अंगावर काटा आला वाचतना..... :(

"बाईचं आयुष्य म्हणजे सहन करणे,तडजोडी करणे हेच आहे(अगदी आजच्या जगातही )"असा विचार करणाऱ्या पुरुष प्रधान समाजाला, "ती" ने केलेला प्रतिकार म्हणजे त्यांच्या अहंकारावर झालेला हल्लाच वाटेल ना....कस झेपेल त्यांना.....

रोहन चौधरी ... said...

विदारक आहे हे... :(

राजीव काकांचा प्रतिसाद पटला पण सुप्रिया यांचा प्रतिसाद (अगदी आजच्या जगातही हे पूर्णपणे पटले नाही..

सुहास said...

+१ रोहणा...


एकदम काटा आला वाचताना.... :( :(

अनघा said...

गौरी, आता पुन्हां भेटलीस की नक्की देईन मी हे पुस्तक तुला.
मला वाटतं...ह्या कहाण्या वर्तमानकाळात देखील कुठेना कुठे तरी घडतच असाव्यात. फक्त आपल्यापर्यंत कोणी त्यावर कुठे लिहिलं की पोचतं.

मोनिका, असंख्य स्त्रियांनी सहन केलेल्या वेदनेवर, दिलेल्या लढ्यावर, आपले सध्याचे आयुष्य बेतलेले आहे...नाही का ?

राजीव, खरंय...

तृप्ती आणि 'माझ्यातली मी', बायका कुठून ही सहनशक्ती मिळवतात कोण जाणे...

हेरंब, मला वाटतं असं बरंच काही असावं ज्याची आपल्याला कल्पनाच नाही.

सुप्रिया, 'अत्याचार करण्यास धजू पहाणाऱ्या पुरुषाला', स्त्रीचा प्रतिकार हा त्याच्या 'अहंकारावर झालेला हल्ला' वाटू शकेल.
आणि हे असे अत्याचार घरोघरी रोजच होत असतात.

रोहन, ह्यात पटणे व न पटणे असे काही असू शकते काय ? कदाचित आपण सुसंस्कृत आहोत म्हणून हे असं आपल्याला वाटतं...परंतु, 'अगदी आजच्या जगातही' अशा भयंकर घटना घडत असतात...मात्र आपल्यापर्यंत त्यातले फारच थोडे येऊन पोचते. नाही का ?

सुहास...वाचून बसलेल्या धक्क्यातून बाहेर येणे कठीण.

श्रीराज said...

पुरुष प्रधान समाजात स्त्रियांवर जे घृणास्पद अत्याचार झाले आणि होत आहेत, त्याचा इतिहास नेहमी धिक्कारच करील आणि तो व्हायलाच हवा.

मला कधीतरी वाटतं की हा जो पुरुष प्रधान समाज आहे तो पुरुष प्रधान झाला कसा, कारण हे जे हिंस्त्र अत्याचार झाले त्याला ही समाज-व्यवस्थाच कारणीभूत आहे. माझ्या या प्रश्नाचे "Patriarchy"बद्दल वाचल्यावर थोडे समाधान झाले. मग मनात आले की हा समाज जर स्त्री प्रधान असता तर पुरुषांनीसुद्धा असाच त्या समाजाच्या नावे शंख केला असता ना! कारण मुळात अत्याचार करणारा आणि अत्याचार सहन करणारा यांचे लैंगिक पातळीवर विभाजन करताच येत नाही. असे लोक दोन्ही गटात असतात. (नवऱ्याने संध्याकाळची भांडी घासली नाही म्हणून त्याची मारहाण करणारी बाई भांडूपच्या हनुमान नगरात कुणाला ही विचार ते तुला तिचा पत्ता देतील) त्यामुळे आपण अत्याचार करणारा अत्याचार का करतो किंवा अत्याचार सहन करणारा तो का सहन करतो याचा अभ्यास करून, कमजोरबाजू कशी बळकट करता येईल आणि माज आलेल्या बलिष्ट वर्गाला सभ्यपणा कसा शिकवता येईल हे पाहिले पाहिजे. त्याकामी जर अशा आत्मचरित्रांचा उपयोग होणार असेल, तर त्याचे स्वागतच आहे.

juikalelkar said...

बापरे ......अनघा !!!!!!! अंगावर काटा आला बघ वाचताना .......मलाही "केतकर वहिनी" वाचायचे आहे आजच .........

Vinayak Isave said...

तुम्ही खूप हृदयद्रावक घटना शब्दात मांडली आहे...

sahajach said...

बजूवहिनींची कथा जितकी त्रास देत होती सतत आठवण देऊन तितकेच तू लिहीलेले एक वाक्य सतत विचारात टाकतेय...

>>>आता लिहिता वाचता झालेल्या स्त्रिया, आत्मचरित्र लिहू लागल्या तर तो पृष्ठभागाखालचा भाग समाजाला झेपेल ?

नाहीच झेपणार माझ्यामते...

मोहना said...

केतकरवहिनीनी फार अस्वस्थ केलं होतं पुस्तक वाचलं तेव्हा. माझ्या आजोबांची खोती होती त्यामुळे तसा परिचयाचा विषय. पण केतकरवहिनीनी परिस्थितीला दिलेलं तोंड, त्यांना भेटलेली माणसं सगळं मनात घर करुन राहिलं कायमचं.

tivtiv said...

नि:शब्द.... :-( आणि हे वाक्य निव्वळ अप्रतिम..
'स्त्रिया स्वत:चे अंतरंग खरवडत असता, पुरुषप्रधान समाजाचे बाह्यांग उघडे पडेल ते समाजाला झेपेल ?'


'केतकरवहिनी' पुस्तक वाचावेसे वाटत आहे.