नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 3 February 2012

सफेदी की चमकार...

एखाद्या ब्रॅन्डवर काम केले की घरी देखील तोच ब्रॅन्ड व तेच प्रॉडक्ट वापरले तर ते नीतिमत्तेला धरून होईल. परंतु, तसंही बघितलं तर जाहिरात क्षेत्रात प्रामाणिकपणा हा कितीसा असतो ? नटनट्या, खेळाडू हे ज्या ज्या प्रॉडक्टची जाहिरात करीत असतात ते काय खरोखर स्वत: वापरत असतात ? काही अपवाद वगळता ह्याचे उत्तर नकारार्थीच येते.
एका क्लायंटने मला पहिल्याच भेटीत विचारले होते..." तू कुठला शॅम्पू वापरतेस ?"
आणि दुर्दैवाने मला खोटे बोलता येत नसल्याने मी हळूच पुटपुटले आणि वेगळ्याच प्रॉडक्टचे नाव घेतले.
गंमतीने का होईना पण तो मला म्हणालाच...ह्या मिटिंगला बसायचा तुला अजिबात अधिकार नाही !

हम्म्म्म. 'रीन' वर काम केले...घरी रीन वापरला...सनसिल्क विकायला सुरवात केली आणि म्हणून सनसिल्क केसांवर ओतलं असे तर कधी झाले नाही. उलट बहुतेक वेळा, त्या त्या ब्रॅन्डवर काम करताना इतका वैताग आलेला असतो की घरी पण कशाला तेच !...म्हणून नाहीच विकत घेतला जात !

"आईईईई" लेकीने हाक मारली तेव्हा मी स्वयंपाकघरात होते आणि ती बेडरूममध्ये.
"काय गं ?" तिथूनच ओ देऊन बघितली.
"इथे ये आधी !" मला कधीकधी कळत नाही...मी मोठी की ही ! फर्मान सोडते ना असं मला !
मी गेले आणि दारात उभी राहिले. आवाज तसा दरडावणीचाच होता.
लेकीच्या हातात तिचा पांढरा ओव्हरकोट होता. ती हॉस्पिटल्समध्ये जात असते आणि तो तिला तिथे नियमित घालावा लागतो. त्या ओव्हरकोटाला घरात शिरून तसे चारच महिने उलटले होते. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"आई ! ह्याचा रंग कोणता आहे ?"
स्वत:ला चित्रकार म्हणायचं आणि ढळढळीत करड्या दिसणाऱ्या रंगाला पांढरा कसं काय म्हणवतं कोण जाणे !?
"पांढरा तर आहे !" मी हळूच म्हटले.
"आई ! हा तुला पांढरा दिसतोय ?! आई ! पूजा आणि मी एकत्रच घेतलेले कोट ! आणि तिचा अजून पांढरा दिसतोय ! आणि माझा बघ ना ! किती जुनाट आणि घाणेरडा दिसतोय ?!"
ताडकन तिने हात पुढे केला...आणि तिच्या हातातल्या कोटाने शरमेने मान खाली घातली ! आणि त्याच्याबरोबर मी देखील !
"अगं ! मी खरं तर एरीयल वापरते गं !"
ए टू झेड दाग....
"सर्फ एक्सेल आणूया का गं ?" दाग अच्छे होते है !
म्हणजे कसं निर्णय काय तो एकत्र घेऊया...चुकलाच तर एकटीच्याच नको गळ्याशी !
"ते काही मला माहित नाही ! माझा कोट घाणेरडा दिसतोय ! आणि मग मला घालवत नाही गं तो आई !"
बिच्चारी माझी लेक ! शरमेने किती खाली जात असेल तिची मान ! जळले मेले हे ब्रॅण्डस ! सगळी मेल्यांची खोटी प्रॉमिसेस ! एक तरी कोणी खरं बोलेल तर शप्पथ !
"कसं गं माझं सोनं ते ! आता काय करू मी ?! पुजाला हळूच विचारतेस का...तिची आई काय वापरते ते ?!" शरमेने मान अगदी खाली खाली.
"हळूच कशाला विचारायला पाहिजे ? मी आधीच विचारलंय तिला ! टाइड वापरते तिची आई ! आण पाहू तू तेच !"
चौंक गये ?! टाइड प्लस हो तो व्हाइट प्लस हो !
सगळ्या जाहिराती आणि त्यांच्या टॅग लाईन्स कायम माझ्या डोळ्यांसमोरून फिरत असतात !
'आज शर्ट कल पोछा ?!'...हे माझंच डोकं होतं...काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं...वर्षभर हे घोषवाक्य घासलं होतं....
आणि सध्या तरी माझ्या लेकीचा ओव्हर कोट हा 'कल शर्ट आज पोछा'च दिसत होता !
अॅडव्हटायझिंग आपल्या जागी आणि घरासाठी बाजारात जाऊन वस्तू विकत घेणे आपल्या जागी ! स्वत: त्यातच काम केल्याने त्यात विश्वासार्हता किती असते हे आमचे आम्हींच जाणो !
पण काल जाऊन तातडीने टाइड आणलं...मशीनमध्ये घातलं...आज घडी घालून नीटनेटका कपाटात ठेवताना लेकीने कपाळाला बारीकशी आठी घालून बघितलं आणि म्हणे," बरं दिसतंय..."
पण शेवटी मला माहित आहेच...उद्या, ज्यावेळी पूजा आणि माझी लेक बाजूबाजूला उभ्या रहातील त्याचवेळी काय तो माझ्या ह्या परीक्षेचा निकाल लागेल !
भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?!
:)

14 comments:

THEPROPHET said...

काय गं.. टाईडचं अकाऊंट मिळालंय काय? ;) :P

Anagha said...

नाही ना ! आणि रीन आहे आमच्याकडे ! :p :D

रोहन... said...

अशक्य भारी... :)

aativas said...

जरा कापडाच्या जाहिरातीवर लक्ष ठेवा :-)
आता 'पूजाच रहस्य' अशी लाईन वापरता येईल तुला पुढे कधीतरी .. हा पूर्ण प्रसंगच उद्या एखाद्या जाहिरातीत दिसायला हरकत नाही :-)

Shriraj said...

हसून हसून वाट लागली ना माझी :D

हेरंब said...

ग्राहकांना प्रोडक्ट कंपन्या जास्त फसवतात की जाहिरात कंपन्या याबद्दल माझ्या मनात नेहमीच गोंधळ उडालेला असतो. ;)

Anagha said...

रोहणा, :) :)

Anagha said...

:D सविता, बघते...पुन्हा कधी माझ्या हातात ब्रॅण्ड 'रीन' आला तर त्याच्या बाजूने वापरेन !! :p :D

Anagha said...

श्रीराज, :) :)

Anagha said...

हीहीही ! असं नाही हा बोलायचं हेरंब ! :D

सौरभ said...

lolzzz X)) आया नया उजाला चार बूंदो वाला. कोलगेट आणि फेअर & लौलीलापण एक संधी देऊन बघा.

Anagha said...

सौरभ, 'चार बूंदोंवाला' कपडे पांढरे नाही निळेनिळे बनवतात ! निळ्या कोल्ह्यासारखे ! :(
:)

भानस said...

कसं नं ते आपल्याला बरोब्बर जाळ्यात घेतात... असं कर, सगळेच आण पाव पाव किलो आणि एकत्र करुन टाक... उगाच कोणा एकाला क्रेडिट नको आणि बोलही नकोत... कसं? :D:D

Anagha said...

सही आयडीया आहे हा ही श्री ! पण मला आता वाटतंय की ते मेलं टाइडच करतंय काम ! :) :)