नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 1 February 2012

रक्तदान

आज सकाळी...
एक आठवडा अंगात ताप घेऊन कामे उरकण्याचा प्रयत्न केल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणीसाठी, पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी येऊन पोचले होते. ताप पण असा विक्षिप्त की आल्यासारखा शांतपणे दोन तीन दिवस राहावे व बाडबिस्तरा उचलून निघून जावे असेही नाही. कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी रात्री झोपता झोपता...पण रोज हजेरी लावून जाणे मात्र नक्की. म्हणजे, चला आज जरा बरं वाटतंय म्हणून दिवस सुरु करावा तर ह्याने येऊन मागून वार करावा...की आपण पुन्हां बिछान्यात आडवे.

लॅबमध्ये रक्तासाहित पोचले. ही आमची नेहेमीची लॅब आहे त्यामुळे तेथील सर्वजण आता ओळखीचे झाले आहेत.
"कशा आहात ?" तेथील हसतमुख बाईंनी विचारले.
"आजारी आहे...म्हणून आले." बाई हसल्या. मग पुढे पैसे वगैरे भरले आणि जाऊन कोचावर बसले. माझ्या नावाची पुकारणी होण्याची वाट बघत.

शहर सध्या आजारी आहे. मानसिक सोडा, शारीरिक आजारपणे वाढली आहेत. त्यामुळे तपासणीसाठी बरीच गर्दी होती. आणि उपाशीपोटी, गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात, भर तापात....अशा वेगवेगळ्या तपासण्या, जगण्यासाठी आवश्यक असल्याकारणाने तिथे वातावरण मिश्र भावनांचे होते. म्हणजे नवव्या महिन्यातील गरोदर बाई व त्यांचा नवरा तसे खुशीतच दिसत होते. माझ्या शेजारील बाई तापाने फणफणलेल्या होत्या. व मी आपली काल रात्री हजेरी लावून गेलेल्या तापाच्या मुळाशी पोचण्यासाठी तिथे येऊन बसले होते.

आयुष्यातील दहा मिनिटे सरली आणि माझे नाव मला ऐकू आले. मी आत गेले. अंगातील जॅकेटची बाही मागे सारून हात पुढे करून बसले. उजव्या हाताला एक वृद्ध गृहस्थ बसले होते. लॅबमधील बाई त्यांचे रक्त शोषून घेत होत्या. माझा हात तेथील दुसऱ्या बाईंनी ताब्यात घेतला. तेव्हढ्यात पहिल्या बाईंनी त्यांचे तोंड उघडले व सध्या शहरात काय चालले आहे ते त्या वर्णू लागल्या. "कालच माझी मुलं सांगत होती. आई, वेगवेगळे पुढारी आज आपल्या घरी आले होते आणि कसल्या छान छान भेटवस्तू दिल्यात....कित्ती मस्त मस्त कायकाय मिळालंय आपल्याला." हे कानावर पडले आणि माझ्या हाताला बसलेला बारीक चिमटा आज मला जाणवला नाही. सुई आत शिरली होती. रक्त शोषून घेत होती. मी त्या बाईंकडे बघितले.
"म्हणजे ?" त्या बाई खरे तर त्यांच्या सहकारी सख्यांना त्यांचे अनुभव सांगत होत्या. पण मला राहवले नाहीच.
"काही नाही हो...निवडणुका आल्यात ना...त्यामुळे हे पुढारी लागलेत फिरायला...गल्लीगल्लीत....गिफ्ट्स देत...."
"कुठे चाललंय हे...मुंबईत ?" मी अजून खोलात.
"नाही. पुण्यात."
"पुण्यात कशाला....मुंबईत पण हेच चाललंय....दादरमध्ये चालू आहेत हे प्रकार." माझ्या बाजूला हात दुमडून बसलेले ते अनुभवी वृद्ध गृहस्थ बोलले. त्यांचे रक्त जमा झालेले होते.
"दादरमध्ये कुठे ?" मी.
"भवानी शंकर रोडवर चाललंय...!" आजोबा.
"पण बाई, तुम्हीं तुमच्या मुलांना सांगा ना...घेऊ नका म्हणावं त्या भेटवस्तू...आहे काय आणि नाही काय ?"
"अहो मी नसते ना तिथे...मी असते इथे मुंबईत....मुलांना काय सांगणार...कोणीतरी येऊन गिफ्ट्स देतंय म्हटल्यावर खूष झाली ती...पण म्हणाली हा मात्र मला...आई, तू ह्यातल्या कोणालाही मत देऊ नकोस...!" पोटच्या पोरांवरील मोठ्या अभिमानाने बाई म्हणाल्या.
"पण हे सर्व मत मिळवण्यासाठी केलं जातंय एव्हढं त्यांना कळतंय म्हणजे काही फार लहान नाहीयेत तुमची मुलं..." मी लावलीच माझी रट.
"अहो...आपण हे असलं करून काय होतंय...ते कालचच तुम्हीं बघा....बाळ ठाकरे..." अनुभवी आजोबा मोठी मोठी नावं घेऊन बोलते झाले.
माझं रक्त घेऊन झालं होतं. बाईंनी माझ्या सुईच्या अग्राइतक्या छिद्रावर एक पांढरी टेप लावली आणि मी उठले.
"हे भेटवस्तू आपल्या मतदार संघात वाटणे हा एक गुन्हा आहे. तसाच त्या भेटवस्तू घेणे हा देखील गुन्हा ठरवला जायला हवा." मी शांतपणे म्हणाले.
बाई चमकल्या. त्यांची तरुण सहकारी मैत्रीण माझ्याकडे बघून हसली.
"अगदी बरोबर." माझ्या म्हणण्याला तिने पुष्टी जोडली.

तिथून बाहेर पडताना मला वाटले...
भारताला एका ऑपरेशन थेटरात बेडवर झोपवावे. एक पंप त्याच्या शरीराला लावला जावा. कन्याकुमारीच्या जागी लावला तरी चालेल. काश्मीर हे त्याचे डोके व कन्याकुमारी हे त्याचे पाय असे समजले तर त्याचा बेड त्याच्या डोक्यापाशी उंचावावा. आणि त्या पंपातून आजारी भारताच्या शरीरातील सर्व नासके अशुद्ध रक्त काढून टाकले जावे. अख्खाच्या अख्खा त्याला रिकामा करावा. आणि मग पुन्हां एकदा त्याच्या त्या शरीरात शुद्ध रक्त भरले जावे. गरजे इतकेच. आणि मगच त्याला पुन्हां बाहेरच्या मोकळ्या हवेत सोडावे.

मात्र हे असे शुद्ध रक्त मिळणार कोठे...हे मात्र मला नाही कळले.
तुमच्या आमच्या शरीरात आहे काय असे शुद्ध रक्त ?
देशाच्या रक्तवाहिन्यांतून धावू शकेल असे खेळते निरोगी रक्त ?
का त्यासाठी देखील शिवाजी जन्माला यायला हवाय ?

25 comments:

Shriraj said...

रक्त बदलण्यापेक्षा मुल्याशिक्षणाची रक्तशोधक गोळी प्रत्येकाने रोज सकाळ-संध्याकाळ घेतली तरी पुरेसं आहे... असं मला वाटतं हं :)

अनिकेत वैद्य said...

ज्याप्रमाणे निवडणुकीत उमेदवाराने भेट, लाच देणे हा गुन्हा आहे तसाच मतदाराने उमेदवाराकडून भेट, लाच, मद्य घेणे हा गुन्हा आहे. निवडणूक आयोग डोळ्यावर कातडे पांघरून बसला असल्याने, "जो पर्यंत कोणी तक्रार करत नाही तो पर्यंत आम्ही कारवाई करू शकत नाही." असे उत्तर निवडणूक आयोगाने दिले आहे.

पूर्वी झोपडपट्टीत किंवा गरीब लोकांना पैशाची लालूच दाखवून मत विकत घेतले जायचे. आता तर अनेक सुशिक्षित लोक सरळसरळ पैसे मागतात व रोखठोक मत विकतात.

aativas said...

आता हा एक पैसे कमवायचा धंदा झाला आहे .. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन जनतेविरुद्धही उभारण्याची वेळ आहे ही

BinaryBandya™ said...

पुण्यात सुद्धा हे चालूच आहे ..

फुकट देवदर्शन , हळदी-कुंकू असले काही काही चालू आहे ..

मतदाराने उमेदवाराकडून भेट, लाच, मद्य घेणे ..
गुन्हाच ...

Raindrop said...

rakta badalayachi kahi garaz nahi aahe...aaher tech rakt shuddh karun ghyayala ek perfect dialysis machine aahe majya dokyat....tu! Am telling you....enter politics ani dakhavun de kasa changlyanne chalavayacha asta desh te (I think am asking you this for the 100th time now :)

By the way...just read this today. Will call tomorrow...it is late now. Hope u are feeling better.

हेरंब said...

लोकशाही/निवडणुकांची रक्त शोषण्याशी केलेली तुलना अगदी चपखल..

म्हटलं तर टीपी म्हटलं तर सिरीयस पण माझं जरा वेगळं मत आहे याबद्दल. सगळ्यांकडून भरपूर भेटवस्तू घ्यायच्या आणि मत मात्र ज्या पक्षाने काहीही भेटी दिलेल्या नाहीत त्या पक्षाला द्यायचं. ;)

rajiv said...

heramb, याच वृत्तीमुळे व न्यायाने, उमेदवार पण नंतर जनतेकडे व मतदाराकडे पाठ फिरवतात हे लक्षात घे.!!

भानस said...

गेल्या वीस वर्षात आपण झपाट्याने बदललोत... पण यात मतांची खरेदी आणि विक्री काहीच बदलली नाही. देणारा देतो कारण त्याला चारी हातांनी ओरबाडायचे आहे. घेणारा घेतो कारण फक्त इतकेच मिळणार आहे तेव्हां का सोडा. पण कोणीही अव्याहत होणार्‍या वाताहतीचा विचार करायला तयारच नाही.

दोषी सगळेच.... :(:(

तू लवकर बरी हो गं !

Shriraj said...

तू कशी आहेस पण आता ??

Anagha said...

श्रीराज, आणि लाजा पण वाटत नाही रे ह्यांना आता ! :(

Anagha said...

अनिकेत, आणि मग हेच उठून बोंबाबोंब करतात...पैसे दिल्याशिवाय एकही काम होत नाही म्हणून ! निर्लज्ज झालेत एकेक लेकाचे !

Anagha said...

काही कळतंच नाही सविता ह्यावर उपाय काय ? काल आमच्या दारात आलेले...आणि इतकी लोक येतात ना...आणि एकदम घरात घुसायला सुरवात ! आईच्या पाया वगैरे !

Anagha said...

बंड्या, म्हणतात ना...you get what you deserve...शेवटी तेच खरं...

Anagha said...

वंदू, साधं राजकारण नाही पेलत मला...तर हे इतकं मोठं कसला झेपतंय !
नुसतं प्रामाणिक असून उपयोग नाही गं...थंड डोक्याने काम करता यायला हवे....ते कुठे जमतं मला ?! :(

Anagha said...

काल आमच्या दारात जेव्हा ही लोकं उभी राहिली त्यावेळी खरं तर मला विचारायचं होतं...त्या उमेदवाराचं शिक्षण...नोकरीधंदा वगैरे तो काय करतो ह्याबद्दल. पण इतकी लोकं दारात उभी राहिली आणि तो उमेदवार एकदम आईचे पाय वगैरे धरायला लागला...इतका वैताग आला ना मला की हाकलूनच लावलं मी त्यांना ! :(

Anagha said...

खरंय राजीव तुमचं...

Anagha said...

श्री, मला पूर्वी कधी आठवत नाही गं हे असं काही घडलेलं...आपण खूप बदललोय आणि म्हणून आपल्या लायकीप्रमाणे आपल्या नशिबात हे येतंय...

Anagha said...

श्रीराज, मला येत असलेला ताप हे सध्या कोडं झालंय डॉक्टरांना ! :D बघू, आजचा दिवस कसा मावळतो... :)

सुप्रिया.... said...

सत्तेसाठी काहीही करू शकतात हल्लीचे पुढारी...एकच ध्येय खुर्ची....स्वप्न-पैसा...
अतिशय स्वार्थी अशा वृत्तीमुळेच हे अस होतय(प्रत्येक माणसाच्या)...
म्हणजे "जाऊदे मरुदे मला काय...माझ चालल आहे ना नीट"
ही वृत्ती बदलली तरच काहीतरी होऊ शकेल.....तू म्हणतेस तस blood purification करायच असेल तर "मी,माझ"ह्या impurities काढायला हव्यात.

btw Get Well Soon :)

रोहन... said...

शिवाजी जन्माला यायची गरज नाही आहे... तो आपल्या प्रत्येकाच्या रक्तात आहेच की कमी अधिक.. :)
आणि हो भ्रष्टाचार हा देखील समाजासाठी महत्वाचा असतो पण तो कोणी, कधी आणि कसा करावा ह्याचे काही नियम असतात.. :)

शिवाजी महाराजांनी देखील अनेकवेळा अनेकांना लाच दिली होती हे मी तुला सांगितले तर तुझा विश्वास बसेल? लाच देणे चूक नाही जर त्यातला कार्यकारणभाव समाजाच्या हिताचा असेल तर.. :) बघ पटतंय का!!!

rajiv said...

रोहन, शिवाजी राजांनी जर समाजकारणासाठी लाच दिली असेल राज्य करताना. तर ती परकीयांना ...
स्वकीयांना नव्हे .!! स्वकीयांना लाच दिलायचे एक तरी उदाहरण दाखवून द्यावेस ...!!

रोहन... said...

एकदम बरोबर... स्वकीयांना त्यांनी लाच नाही तर आवश्यक तिथे लाथ दिली.. ;) बाजी घोरपडे सारखी... :D

Anagha said...

रोहणा, फलटणकरांनीच दिलं तुला उत्तर ते बरं झालं ! :)

मी आपली म्हणत होते, की ह्या अशाने हे आपले पुढारी तेव्हढंच घेऊन बसतील ! म्हणजे माकडाच्या हातात कोलीत वगैरे !

Suhas Diwakar Zele said...

आधी तेब्येतीची काळजी घे.... मस्त लिहिलंयस !!


अवांतर :

मागे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका मित्राने डेक्कन हेराल्डमध्ये प्रसिद्ध झालेला एक लेख पाठवला होता. त्याचीच पुन्हा आठवण झाली.

"लायकीप्रमाणेच सरकार मिळतं असा गोषवारा त्यात आहे. तो इथे द्यावासा वाटला."

संपूर्ण लेख इथे वाचता येईल.. !!

Anagha said...

ह्म्म्म वाचला लेख सुहास...
आणि पहिल्यांदाच माझं मतदान चुकलं ह्यावेळी ! हॉस्पिटलात वास्तव्याला गेल्यामुळे ?! :(