नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 23 January 2012

तोंडाला येईल ते...

विद्याला राग आला होता. राग माणसांचा येतो. नशिबाचा नाही. तिचे नशीब नेहेमीच तिच्या बाजूने उभे राहिले होते. माणसे नाही उभी राहिली तरीही. विद्वान वडील, सरळसाध्या हुशार बहिणी, बुद्धिमान लेक आणि या ना त्या कारणाने तिला स्वत:च्या पायावर उभी रहाण्यास मदतच करणारा नवरा. तिचे नशीब नशीब बलवंत आहे ह्याचे हे पुरावे होते. त्यामुळे आज ती चिडली होती ती कोणा माणसावर.

चार दिवसांपूर्वी तिच्या जवळच्या एका कुटुंबात मृत्यू हजेरी लावून गेला होता. मृत्यू, तसाही शहरात गळ टाकून बसलेला असतो. नेमके त्याच्या गळाला कोण लागेल हे जसे त्या माश्याला माहित नसते तसेच ते त्याला देखील माहित नसावे. त्या घरातील म्हातारी बाईचे कृश शरीर त्या दिवशी त्याला सापडले होते. कृश शरीर व स्वत:चे अस्तित्त्व विसरलेला आत्मा. त्या वयोवृद्ध बाईंना हल्ली आपल्या आसपास काय घडत आहे हे कळण्यापलीकडे गेले होते. भूक लागत असे व बाकी शरीरधर्म चालू होते. अशक्त शरीराला स्वत: हालचाल करून कूस बदलता येणे शक्य नव्हते. त्यामुळे शरीरात किडे पडू लागले होते. घरातील माणसे मग काय करत होती ह्यावर तसे बोलण्यासारखे काही नव्हतेच. त्यांना इतर उद्योग होते इतकेच म्हणता येईल. 

आज विद्या व तिची लेक त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. ज्यावेळी घरातील एक माणूस वारलेला असतो त्यावेळी पाठी राहिलेल्या माणसांच्या आयुष्यात कोणाची आई, कोणाची मावशी आणि कोणाची सासू गेलेली असते. विद्याची ती मानलेली सासू होती. वयाच्या सतराव्या वर्षी, कॉलेजच्या दिवसांत, तिची त्यांची ओळख करून देण्यात आली होती. तिचा त्यावेळचा मित्र, स्वत:च्या आईपेक्षा देखील अधिक त्यांना मानत होता. व आपण कोणाबरोबर फिरतोय हे दाखवण्यासाठी तो विद्याला घेऊन त्यांच्या घरी पोचला होता. म्हणजेच तसे म्हटले तर विद्याचा तो दाखवण्याचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्या पन्नाशीच्या आसपास पोचल्या होत्या. गव्हाळ रंग, अंगावर नऊवारी पातळ, आणि घरातील सर्व हालचाल त्यांच्या बोटाच्या इशाऱ्यावर चालवण्याइतकी हिंमतवान बाई. विद्याला त्यांनी जवळ बसवले, न्याहाळले व आपल्या आवडीची पावती आपल्या मानलेल्या लेकाला देऊन टाकली. बाई तशा प्रेमळ.

तब्बल चार दिवस उलटून गेल्यावर त्या घरी दोघी पोचल्या होत्या. गाडी चालवत. नोकरीच्या दगदगीत आणखी काही वेगळं करणं तिला तर शक्य नव्हतंच. आणि अंतिम दर्शन घेतल्याने नक्की काय साधतं हे तिला अद्याप तरी कळलं नव्हतं. उलट अंतिम दर्शनात जे बघावं लागतं ते नाहक कायम हृदयात जाऊन बसतं हे तिने तिच्या नवऱ्याचं अंतिम दर्शन ज्यावेळी घेतलं त्याचवेळी कळलं होतं. दोन वर्षांपूर्वी. ते न टाळता येण्यासारखं. असो. विद्याच्या सगळ्याच वागण्याला काहीनाकाही कारण होतंच. तसेही तिचे काही विधवा म्हणून रहाण्याचे वय नव्हतेच. परंतु, तिने आता देवाशी भांडण करणे सोडून दिले होते. त्याला आपल्यापेक्षा नक्कीच अधिक कळते व तो नेहेमी आपले भलेच चिंतीत असतो हे मानून टाकले की जगणे तसे सुकर होऊ शकते. हे इतकेच तत्वज्ञान म्हणजे तिच्यापुरती तिची गीता, रामरक्षा, मनाचे श्लोक वगैरे वगैरे होते. घर चालवायचे म्हणजे पैसे कमवायला हवेत हे शेवटी सत्य होते. दर महिन्याच्या शेवटी मोबाईल वाजला की ती आशेने त्याच्याकडे बघे....पगाराचा एसेमेस.

दोघी तिथे पोचल्या तेव्हा संध्याकाळ उलटून गेली होती. रविवारचा दिवस होता. जेवणखाण, घरचे सगळे आवरून दोघी निघाल्या होत्या. बाईंचे घर दूर. दोन तासांच्या अंतरावर. नवरा गेल्यानंतर विद्या जबाबदाऱ्या सांभाळत होती. व तसेही मुद्दाम कोणी त्या घरातून ह्या दोघींची चौकशी करण्यासाठी येण्याची अपेक्षा विद्याने देखील ठेवलेली नव्हती. गेल्या दोन वर्षांत, ती त्यांना फोन करून त्यांची चौकशी करत नाही म्हणून तशी नाराजगी त्यांचीच होती. वयाने ते सर्व मोठे म्हणजे त्यांचा मान मोठा.

आत बेडरूममध्ये ती येऊन बसली. तिची लेक व त्या घरातील छोटी मुले ह्यांच्या गप्पा गोष्टी सुरु झाल्या. आधी घरातील बायकांशी बोलणे झाले. त्या उठून गेल्यावर बाईंच्या तीन लेकांपैकी एक लेक विद्याच्या बाजूला खुर्चीवर येऊन बसला.
"चांगलं मेंटेन केलयंस स्वत:ला !"
"म्हणजे ?" हे ती मोठ्याने ज्यावेळी बोलली त्यावेळी मनात ती काही वेगळेच बोलत होती.
"नाही म्हणजे जशी आधी होती तशीच आहेस." अच्छा...म्हणजे माझा नवरा गेला तरी मी होते तशीच राहिलेय का....? ना केस पांढरे झाले...ना डोळे खोल गेले ना भोवती काळी वर्तुळे आली...आणि ना चेहेरा खपाटीला गेला...
"तुझी लेक मात्र फार बारीक झालीय गं..." हे पुढचं वाक्य....हो का ? म्हणजे हिचा नवरा गेला तरी ही होती तशीच गुटगुटीत आणि हिची ती बिचारी पोर बघा....बाप गेला आणि ही पार उतरून गेली...अरेरे...
"पण तिचं वजन अगदी व्यवस्थित आहे. आणि ती अगदी लहान होती तेव्हा असलेले गोबरे गाल आता अजून कसे रहातील शिल्लक ?" हे विद्या मोठ्याने म्हणाली. खरंच बारीक झालीय की काय ही ? पण मी हिला सारखं चांगलचुंगलं खायला घालत असते ना...घरचा वजनाचा काटा तर असं काही म्हणाला नाही. एक चिंता विद्याच्या मनात फटकारा मारून गेलीच.
"तरी..." तुमची आई गेली म्हणून मी तुम्हांला भेटायला आलेय....त्यात मी स्वत:ला कसं मेंटेन केलंय ह्याचा संबंधच काय ? हे असलं सगळं मनात बोलावं आणि डोक्याला त्रास करून घ्यावा. हा विद्याचा स्वभाव. त्यामुळे पुढे ती काहीही बोलली नाही.
"चल...निघूया आपण." बाहेर बसलेल्या लेकीला ती म्हणाली.

दोघी तिथून निघाल्या तेव्हा चांगलाच काळोख झाला होता. नवरा गेला त्यामुळे आता खंगून जाणे ही आपली जबाबदारीच का बनते हे तिला तरीही कळले नाही. म्हणजे ह्यांच्या ताब्यात असते तर बहुतेक मला सतीच बनवून आगीत ढकलले असते. तेच तर कारण नव्हते का...तरुण तरुण, लहान लहान मुलींना पतीदेव स्वर्गवासी झाले की आगीत ढकलून देण्यामागे...उगाच तरण्याताठ्या बायका पुरुषप्रधान समाजाने सांभाळाव्याच का मुळात ? नसती जबाबदारी व डोळ्यांना फुका त्रास...!

तिरमिरीत विद्याने गाडी चालू केली.
अंधारलेल्या रस्त्यात अंधारलेल्या समाजाला बाजूला सारून.
रविवार नंतर सोमवार येतो हे विद्याला माहित होतं. सोमवारी ऑफिस असते. विद्याचा नवरा जिवंत आहे की नाही ह्याच्याशी ऑफिसमधल्या लोकांचा काडीचाही संबंध नव्हता. आपण हिला जो पगार देतो त्या प्रतीचे काम हिच्याकडून नक्की करून मिळते आहे की नाही ह्या बाबीला तिथे अधिक महत्त्व होते.
आणि आता आयुष्यात सगळे टक्केटोणपे खालेल्या विद्याला तेच सर्वात बरे वाटे.
खणखणीत व्यवहार.
जगण्याला आधार.

12 comments:

Gouri said...

काय म्हणू? लोकांना कुठे कधी काय बोलावं याचा पोच नसतो हेच खरं.

हेरंब said...

कैच्याकै असतात लोक !!

अनघा said...

गौरे, मला माहितेय ह्या सर्व गोष्टींचा त्रास किती करून घ्यायचा हे शेवटी ज्याने त्याने ठरवायला हवे. आणि समोरच्याने काय बोलावे हे ऐकणारा नाही ठरवू शकत.

आणि मला हेही कळतं की ह्या लोकांसाठीच 'कुंकू, आभास, एकाच जन्मी ह्या जणू...' ह्या आणि अशा कितीतरी सिरियल्स, टीव्हीवर बनवल्या जातात !

अनघा said...

हेरंब

श्रीराज said...

Agree with you, Gouri

Raindrop said...

there is no point in personalising everything that is said or happens around...it will do nothing but hurt karan kharach lokanna kadhi kadhi nahi kalat kuthe kaay bolayacha aahe or maybe it was a mistake....u remember the famous 'isi bahane' mistake na :)

रोहन चौधरी ... said...

बऱ्याचदा लोक बोलून जातात.. बर्याचदां जे बोलायचे असते त्याची वाक्यरचना चुकते.. आणि भलतेच अर्थ निघतात.
आपण त्रास करून घ्यायचा नाही. जेवढ्यास तेवढे महत्व द्यायचे.. :) अर्थात तुला अनुभवावरून ते ठावूक आहेच.. :)

अनघा said...

श्रीराज, वंदू, रोहन...
समोरचा जर ओळखीचा असेल तर त्याच्या वागण्याबोलण्याला एक इतिहास जोडलेला असतो. आणि तो इतिहास त्याच्या त्या वेळच्या बोलण्यातून चांगला वा वाईट अर्थ काढायचा हे ठरवतो....
नाही का ?
असो...
इथे हे लिहिलं कारण...हा समाज आहे...आणि ह्या समाजाचे आपण एक घटक आहोत. बाईकडे बघण्याची एक दृष्टी त्यात वर्षानुवर्षे चिकटलेली आहे. मी मेले असते आणि माझा नवरा त्यांना भेटायला गेला असता तर त्याने स्वत:ला चांगलं मेंटेन केलंय की तो किती रोडावलाय ह्याच्यावर विचारविनिमय झाला नसता.
:)

trupti said...

:)
nice one...tuzya comments hi
Anagha Di!

sumedha said...

बाई मेली आणि लोकं नवऱ्याला भेटायला गेले तो भले ४ किलो ने जाड झाला तरी लोकं म्हणणार ...काय बिचारा रोडावला हो...आता लवकरच दुसरे लग्न करून टाका.

सध्या संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाची लाट चालू आहे कोकणात...केवळ नवरा आहे(थोडक्यात बाईला शरीरसुख मिळते आहे)म्हणून नटून थटून वाणं वाटण्याचा कार्यक्रम...नवरा नाही तर नो एन्ट्री!!

भानस said...

आणि तरीही अशा लोकांशी आपण संबंध तोडत नाहीच. ते काहीही बोलू शकतात तर आपणही त्यांना तिथेच रोखायला हवे. अन्यथा त्रास नाहक आपल्यालाच आहे.

हे लाच देणे आणि घेणे यासारखंच आहे गं. ते वाग्बाण मारतात आणि आपण मारुन घेतो... :(

आजही समाजमन जराही बदललेले नाही हेच खरं..

अनघा said...

तृप्ती, :) :)