नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 20 January 2012

बालक

एक लहानगं मुल. बाळसेदार.
नुकतंच चालू लागलेलं. दुडूदुडू.
चिमुकला, घरात फिरत असे.
बाहेर पडण्याला मर्यादा होत्या. बंदोबस्त केला गेला होता.
वाटेत अडसर होता. बांध होता.
तो, कितीदा निघे. माघारी फिरे.
मनाई होती. जगाला तो दिसू नये ही भावना होती.
लपवून दडवून ठेवलेला जणू हिरा तो.
गेले किती दिवस...किती महिने...
असे कित्येक, जन्मत होते.
परंतु, ती जणू कंस.
आत कोंडून घाली.
श्वास दाबून टाकी.
मात्र आज काय झाले ?
द्वार कसे उघडे पडले ?
बांध कुठे नाहीसा झाला ?

आज ती गाफील होती.
आणि तो मोकाट होता.

ती एकटी.
तिचा अश्रू एकटा.
गालावरून घरंगळला...
अर्ध्या वाटेत सुकून गेला.

8 comments:

rajiv said...

अनघा , अश्रू म्हणजे एक लहान मुल, द्वाड, अवखळ इ. इ. !! ही कल्पना खूपच आवडली व ओठावर स्मित उमटले एकदम !!
काय छान उतरवले आहेस. शाब्बास !!

अनघा said...

मला सकाळी हे सुचलंच ! :)
धन्यवाद राजीव !

Raindrop said...

if rajiv hadn't explained, I would have never understood. but now that I do understand it....kitti surekh chitran aahe tujhya bhavanancha.

श्रीराज said...

अनघा, हे तू कदाचित वेगळ्या अर्थाने लिहिले आहेस, पण माझ्यासमोर मात्र वेगळेच चित्र उभे राहिले. ते चित्र माझ्या डोक्यात काल आईने मला सांगितलेल्या एका घटनेमुळे तयार झाले. काल आमच्या भागात म्हणे एका अडीच वर्षाच्या मुलीला अपघात झाला. एका भरधाव मोटार-सायकलने धडक दिली तिला. कळस म्हणजे हे कृत्य केल्यानंतर तो तिथून पळून गेला.

चूक कुणाची माहीत नाही, ताई; पण तो रस्ता माहितेय मला. त्या इतक्या अरुंद रस्त्यावरून त्याने गाडी हळू चालवायला हवी होती.

या माणसांना इतकी कसली घाई असते, की त्यांना कुणाच्या जीवाची पर्वा ही करावीशी वाटत नाही.

भानस said...

एकदाचा सगळे बांध तोडून अश्रू घरंगळून गेला... आता एका छान हसू उमटेल !

कल्पनाविलास झक्क. आवडला !!

(शुक्रवारपासून नेट बंद पडलेले ते आज संध्याकाळी सुरू झाले एकदाचे... आले लगेच तुझ्याकडे. :) )

Gouri said...

राजीव + १
पण, त्यात ही माझी भर ...
का ग सारखी त्याला अडवून ठेवतेस? बाहेर निर्धोक असेल कधी, अश्या वेळी येऊ देत की त्याला बाहेर - किती घुसमट होईल त्याची आतल्या आत! :)

हेरंब said...

बापरे सहीच.. वेगळं एकदम..

राजीवकाका + १

सौरभ said...

शप्पथ... हे म्हणजे खासच.