नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 17 January 2012

आढे

डोळे उघडले, नजर वर टाकली तर आढेच दिसते. म्हणजे आढ्याकडे मुद्दाम नजर लावून बसले होते असे काही नाही. गादीवर पडल्यापडल्या वर आणि दुसरे काय दिसणार ? निद्रेच्या पूर्ण आधीन होणे म्हणजे जसे काही एखाद्या हिरव्यागार दरीत तरंगत रहाणे. हलके नाजूक शुभ्र पीस आणि मंद मंद गार हवा. तरंगत जावे आणि मग जसजसा अंधार विरळ होऊन प्रकाश पसरत जावा तसतसे ते पीस हलकेच पुन्हां येऊन बिछान्यावर विसावे. बिछान्याच्या स्पर्शाने जाग यावी, डोळे उघडावे आणि सत्यात पुन्हा एकदा शिरावे. साच्यातला तो दिवस. त्यात नाविन्य ते काय ? मात्र आज मन उगाच थरथरले. जसे एखादे हरीण. समोर भयावह नसताना देखील कुठे झुडुपामागे त्याने अंग चोरून घ्यावे. कधीकधी एखाद्या विचाराचे मुख कुठून आले ते नजरेस पडत नाही. परंतु, त्या विचाराच्या सर्पमय लांबसडक शेपटीच्या टोकापाशी मात्र अगदी प्रकाशाच्या वेगाने, मन पोचून जाते. बावरते. मन हरीण. आणि विचार हे जसे विषारी सर्प. वळवळ. खळबळ. त्याच्या हालचालींवर बंधन शून्य.

गेले काही दिवस, हसत आले आणि हसत गेले. नवनव्या ओळखी. नवनवे मित्र. नवनवी नाती. मग त्यात कसली भीती ? मन का हरीण ?

भीती ? भीती ह्या इतक्या सुखाची. मन हरिणाला, रान इतके हिरवे असण्याची सवय नाही. हिरवीगार झाडे, कोवळी मऊ पाने, रंगीबेरंगी बोलकी फुले. हे सर्व भयावह. फसवं. दु:ख होतं ते खरं होतं. हिरवळ काल्पनिक आहे. सुखाच्या पाशात मी माझ्या दु:खाला विसरून जाईन. त्याचा माझ्याकडून अपमान होईल. आणि ते कदापी होऊ नये. दु:ख रागावले, दु:ख संतापले आणि त्याने पुन्हा फणा उगारला तर आता मी कुठे जाईन ? हे असे होता कामा नये. मला विसर पडता कामा नये. आज जी मी आहे तीच मुळी माझ्या दु:खाच्या जोरावर आहे. त्यात सुखाचा काय संबंध ? आयुष्यात कधीही सुख बघितले नाही असे तर नव्हेच. परंतु, त्यावेळी सुखदु:खाला एक तराजू होता. हसत असावं आणि त्याचवेळी दु:खं आपली हजेरी लावून जावं. म्हणजे सगळं कसं समतोल.

आज जागच मुळी ह्या जाणिवेने आली. कोणाचा अपमान करण्याचा हेतू कधीही नसतो. 'दु:ख हरलं. त्याचा नामशेष उरला नाही'.. ही अशी बेजबाबदार विधाने मी काय करणार ? त्याच्या शक्तीची कमाल मी ह्या उघड्या डोळ्यांनी बघितली. माझे हरीण मन कसे कोण जाणे परंतु, त्यात्या वेळी मजबूत खांब बनून उभे राहिले. मात्र, आज पुन्हां दु:खाने शेपटी फिरवू नये...फटकारू नये...असे काहीही होऊ नये. काय आज कुठे कोपऱ्यात दु:ख सुस्तावून बसून आहे ? एखाद्या संधीची वाट पहात आहे ?

मी डोळे पुन्हा मिटले. दु:खाला मनोमन नमन केले. डोळे उघडून, त्या आढ्याकडे नजरही न टाकता बिछान्यावरून खाली उतरले.

...आढे जसे निराशेचे खोल विवर.
घड्याळ जसे आयुष्याचे सत्य.
साडेसहाच्या पुढे काटा सरकला हेच सत्य होते.
आणि त्या सत्याआड, मस्टरवरील अजून एक लेटमार्क लपलेला होता.

14 comments:

भानस said...

अनघे, तू पण नं... ! :(

बयो, विचारांवर मनावर आपला बस नाही हे खरंच तरीही म्हणेन त्या लेटमार्ककडे पाहा आणि आवरायला घे. :D:D

Raindrop said...

this post reminded me of the fight between laxmi and alaxmi. both were important. they were fighting over who is more loved by God.

God couldn't help but answer in a diplomatic way, "Laxmi, I like you when I see your face. Alaxmi, I like you when I see your back'. I guess this might be the only way to tackle sukh-dukh chakra.

Shriraj said...

मला पण जागं केलंस की गो!

aativas said...

सुख काय किंवा दु:ख काय यायचे तेंव्हा येतेच ते .. त्याची इतकी मनापासून वाट कशाला पाहायची? उगीच वेळेआधी यायचे ते :-(

Anagha said...

:) ते तसा नेहेमीचंच आहे गं श्री...न आटोपून सांगते कोणाला !

Anagha said...

सुंदर गोष्ट आहे ना ही वंदू !

सकाळी चुटपूट लागलीच होती...आणि आत्ता बातमी कानावर पडली...शरदच्या अनेक आयांमधील अजून एक आई गेली...माँ दुपारी गेल्या.

Anagha said...

ह्म्म्म...खरं असं नव्हतं करायचं...पण तसं झालं खरं श्रीराज.

Anagha said...

सविता, वाट नाही खरी बघत...पण असं वाटतंच होतं...की सगळंच कसं असं ठीकठाक चाललंय...भीती वाटायला लागते....बस्स..इतकंच.

अपर्णा said...

अनघा अग काय झालं?? अशा पोस्ट मी माझ्या सकाळी वाचल्या की मला खूप काळजी वाटते...

हेरंब said...

बाप रे.. काय झालं? सगळं ठीक ना?

Anagha said...

अपर्णा, ठीक आहे सगळं.
फक्त 'आनंद' हा एक भाव आहे तसंच दु:ख, भय ह्याही भावनाच आहेत...आणि त्याही मनात येतात...बाकी काही नाही.
प्रतिक्रियेबद्दल आभार. काळजी नको करूस माझी. तसंही बघायला गेलं तर मी म्हणजे एक दगड आहे. काहीही होत नाही मला. :)

Anagha said...

हेरंबा, आल इज वेल... :)

BinaryBandya™ said...

सुंदर !!!


"निद्रेच्या पूर्ण आधीन होणे म्हणजे जसे काही एखाद्या हिरव्यागार दरीत तरंगत रहाणे. हलके नाजूक शुभ्र पीस आणि मंद मंद गार हवा. तरंगत जावे आणि मग जसजसा अंधार विरळ होऊन प्रकाश पसरत जावा तसतसे ते पीस हलकेच पुन्हां येऊन बिछान्यावर विसावे."

वाह वाह !!

Anagha said...

बंड्या !!! धन्यवाद ! :) :)