नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 30 June 2011

विषवल्ली...भाग २

विषवल्ली...भाग १

बाहेरील उघड्या जगात मनीषला त्यातल्यात्यात बरी नोकरी लागल्यावर सर्वप्रथम लीनाशी लग्न करणे भाग होते. दोघांना हातातहात घालून शहरात फिरून आठ वर्षे उलटली होती. तिचे आईवडील काही अजून धीर धरणार नव्हते. तो कमावत असलेल्या चार हजारात घर चालवणे हे प्रेमाने भारलेल्या लीनाच्या विश्वात काही कठीण नव्हते. ना घर ना दार अशा स्थितीत दोघांनी लग्न केले. मग बोरिवलीमध्ये भाड्याने मिळेल त्या घरात मजल दर मजल करीत त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य सुरु केले. माहेरी तशी खात्यापित्या घरातील लीना व इथे कामाला बाई देखील नसलेले घर अगदी जबाबदारीने सांभाळणारी लीना. चित्र तसे दृष्ट लागण्यासारखेच होते. पहाटे उठून मनिषसाठी चविष्ट नाश्त्याची लीनाची धडपड, त्याचे कपडे धुणे, कपड्यांना रोज इस्त्री करून ठेवणे, घरचं केर लादी करून धावतपळत ती लोकल पकडणे, कचेरीत वेळेवर पोचणे आणि परतीच्या रस्त्यावर मैत्रिणींना विचारून काहीतरी रोज नवनवे पदार्थ मनिषसाठी करणे. एकूण मनीषचा संसार छान चालू झाला होता. लीनाचा संसार छान होता की नाही हा प्रश्र्न तिच्या बुद्धीक्षमतेच्या बाहेरचाच होता. कारण लीना प्रेमात होती. व प्रेम आंधळे असते. प्रेम बुद्धिमान असते असे कोणी म्हटलेले ऐकिवात तरी नाही.

मनीषच्या ह्या घरात एक दिवस शेखरने शिरकाव केला. अधूनमधून आठवड्यातून एकदा असे करीत करीत कधी ते रोजचेच झाले हे ना त्या मनीषला कळले ना लीनाला. ती फक्त चार चपात्या अधिक करू लागली. व एक वाटी भात अधिक घालू लागली. त्यांचा संसार नवनवलाईचा. कोवळ्या वयात सुरु केलेला. पण म्हणून शेखर हा असा आपल्याकडेच का रहातो आहे वा मग आपल्याला आता एकांत मिळत नाही अशी एकही प्रेमळ म्हणा वा बायकी कुरबूर लीनाने कधी नवऱ्याच्या कानाशी केली नाही. उलट मनीषबरोबर लीनादेखील, शेखरच्या त्या तथाकथित प्रेमभंगात त्याच्या पाठीमागे ठाम उभी राहिली. शेखर रात्र रात्र अश्रु ढाळे व लीना त्याचे सांत्वन करी. त्याच्या आवडीनिवडी जपून त्याला खापि घाली. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्याला हातावर मीठ लागते हेही तिने लक्षात ठेवले होते. ते म्हणे त्याच्या तोंडाला येणाऱ्या कुबट वासावरील औषध होते. दिवस संपत आला की आज काय खावेसे वाटत आहे हे शेखर तिला तिच्या कचेरीत फोन करून सांगुन ठेवी. मग मुंबई रेल्वेच्या धक्काबुक्कीतून शिल्लक राहून ती अगदी प्रेमाने त्याच्या आवडीचे जेवण तयार ठेवी. असे एक दोन वर्षे चालले. लीनाने अगदी आपला मोठा भाऊ जसा जपावा तसाच त्याला जपला. अगदी त्या पहिलीच्या घरी जाऊन, तिला भेटून, तिला राजी करण्याचा देखील तिने एक प्रयत्न केला. म्हणजे शेखरने व मनीषने अगदी तिला पढवून पहिलीकडे पाठवून दिले होते. लीना शेखरच्या बहिणीला घेऊन गेली. दोघी तिच्याशी प्रेमाने बोलल्या. लीनाने दिराची व बहिणीने भावाची अवस्था अगदी डोळ्यात अश्रू आणून सांगितली.
"अगं, नाही गं जगू शकत तुझ्याशिवाय शेखर." शेखरचा रडका चेहेरा डोळ्यांसमोर आणून लीना कळवळून तिला म्हणाली.
शेखरच्या सख्ख्या बहिणीपेक्षा तिनेच तर स्वत:च्या डोळ्यांनी बघितलं होतं त्याचं दु:ख.
परंतु, आपल्या जन्मदात्यांना दुखावून ह्याच्याशी लग्न करण्याची तिची तयारी नव्हती. तिचा ठाम नकार घेऊन दोघी घरी परतल्या. लीना आपली पुन्हा आपल्या ह्या दिराला जपू लागली. त्याला संगीताची जाण. लीनाला आवड. मग दोघे रात्र रात्र बसून गाणी निवडत, त्याच्या कसेटी करून घेत. मनीष लीनाच्या नवीन संसारातील पहिली खरेदी म्हणून आणलेल्या टेपरेकॉर्डवर दोघे मग गाणी ऐकत बसत. कधी आशा मेहेंदी हसन ह्यांच्या गझला तर कधी मादक मुबारक बेगम.

शेखरचा हा ग्रीष्म काही काळ चालू राहिला. मात्र ह्या अतीव दु:खाच्या कालावधीत दुसरीशी असलेले शरीरसंबंध चालूच राहिल्याने तुटून पडलेले ते ह्रदय पुन्हा बिनतोड जोण्यास मदत झाली. मन व शरीर हे दोन वेगवेगळे जिन्नस आहेत. त्यांचा एकमेकांशी काडीचा संबंध नाही हा त्या दोघांचाही पक्का विचार. त्याची जगण्याची पद्धति व विचार हे आपल्या विचारांशी मितेजुते आहेत ह्याची जाणीव ठेन, आपल्या जिवलग सखीशी असलेल्या त्याच्या शरीरिक संबंधांची माहिती असून देखिल तिने त्याला धरून ठेवले.

आपल्या कथेतील ह्या चौथ्या व्यक्तिमत्वाचे नाव आहे गौरी. गौरी पाच फुट. सावळी. काळे तपकिरी दाट केस. खांद्यावर मोकळे सोडले तर अगदी समुद्राच्या बेभान लाटांप्रमाणे. स्वभाव काहीसा स्वार्थी. पुरुषांना भाळवण्याची एक मादकता शरीरात. गौरी व शेखरचे लग्न झाले. एकमेकांना साजेसे दोन फासे एकत्र पडले. सहा. सहा.

शेखर गौरी व मनीष लीना आपापले संसार चालवू लागले. मनीष लीना बोरिवलीत. शेखर गौरी गोरेगावात. संसारात कधी तिखट मीठ गोड आंबट तर कधी अगदी कडू. संसारच तो. चौघे एकत्र आले की शेखर मनीषच्या गप्पा रंगत. दारु सोबत. गौरी लीना ह्यांचे कधी फारसे सूत जमले नाही. परंतु, दोघींचे नवरे जीवाभावाचे मित्र त्यामुळे ह्या बायकांचे जमतेय वा नाही ह्याला तसे फारसे महत्व नव्हते. आणि त्यातूनही दारूमुळे होणारा प्रचंड मानसिक त्रास लीनाने कॉलेजमध्येच मनीषच्या कानावर वारंवार घातला होता. परंतु, तो तिचा त्रास हा दुर्लक्ष करण्याइतपत मनीषला वाटत होता. बायका उगाच राईचा पर्वत करतात असे काहीसे त्याचे म्हणणे.

मधल्या काळात मनीष लीनाच्या संसारात एक फूल जन्माला आले. फुलाचे नाव प्राजक्ता. लीनाने ही नवीन जबाबदारी मन लावून पोटाशी घेतली. नोकरी सोडून ती घरीच प्राजक्ताचा सांभाळ करू लागली. प्राजक्ताचे बोबडे बोल आणि धडपड. मान धरणे ह्यापासून ती अगदी पार स्वत:च्या पायावर उभं रहाण्यापर्यंत. अध्येमध्ये आजारपणे. मुंबईपासून दूर घर व मनीषची सर्वस्व वाहून टाकावे लागणारी नोकरी. दिवसाचे २४ तास कमी. मग कधी त्याचे घरी येणे न येणे. उशिरा येणे. घर, प्राजक्ता व मनीष हे एव्हढेच लीनाचे जग. त्यातील घर व प्राजक्ता ह्यांची तिला प्रत्येक क्षणी सोबत. व मनीषची मोजून चार क्षण. घर चालवणे व ह्या स्पर्धात्मक जगात टिकाव लावून धरणे हे कठीणच.

असो. ही कथा ना मनीष लीनाची. ना शेखर गौरीची. ती तर लीना शेखरची.

गोरेगावात शेखर गौरीकडे पुत्ररत्न जन्मास आले. राहुल.

लीनाचं फूल तीन वर्षांचं झालं. मनीष लीना धकाधकीचं दूरचं घर सोडून मुंबईत आले. कर्ज काढून. लीनाने पुन्हा नोकरी सुरु केली. अर्ध्या दिवसाची. म्हणजे सूर्याचे सरळसरळ दोन तुकड्यात विभाजन. प्राजक्ताला सांभाळणे व नोकरी जपणे. मनीषने रात्रंदिवस मेहेनत सुरु केली. कर्जाची रक्कम हळूहळू खाली उतरू लागली.

इथे मनीष लीनाकडून स्फूर्ती घेऊन गौरी शेखर ह्यांनी देखील गोरेगावहून बूड हलवले. मुंबईत स्थाईक झाले. आता ह्या चौघांतील तीनजण नोकरी करणारे. मनीष, लीना व शेखर.

Tuesday 28 June 2011

विषवल्ली...भाग १

ही एक मुंबईतील कथा आहे. तीन सर्वसामान्य व्यक्तींमध्ये घडत जाणारी. त्या कथेमध्ये त्या व्यक्तींच्या अनुषंगाने जी व्यक्तिमत्वे आपल्या समोर येतात त्यांची तेव्हढीच तोंडओळख आपल्याला देण्यात येते. कारण खोलात शिरून शेवटी हाती काय लागणार ? फुका मेंदूची जागा अधिक खाल्ली जाणार ! म्हणून.

सर्वप्रथम, कथेतील मुख्य व्यक्तंींची आपण ओळख करून घेऊ. ह्या कथेत नायक कोण, नायिका कोण खलनायक कोण हे सर्वात शेवटी तुम्ही ठरवू शकता. ही काही परीक्षा नव्हे. परंतु, लिखाणाच्या ओघात नेमके ते ठरवण्याचेच राहून गेले आहे.


...तर मंडळी, जगण्यासाठी तो अतिशय लायक माणूस होता. पाच फुट आणि एखाददुसरा इंच इथे तिथे. रंग गोरा. पोपटी, पिवळा, निळा असे ताजे रंग आवडते. त्यामुळे जांभळ्या रंगाच्या विजारीवर पोपटी रंगाचा शर्ट त्याच्या अंगावर बऱ्याचदा दिसून येत असे. कॉलेजमधे सहाध्ययांसमवेत वावरताना आपण मागे पडू नये ह्याची काळजी तो नक्कीच घेत असे. शरीरयष्टी जेमतेम. कुरळ्या केसांची दाढी. डोक्यावर तश्याच केसांचा बोजवारा.. त्यात अध्येमध्ये सफेद वेलबुट्टी. बारीक काडीवजा चौकटीचा गोल चष्मा त्याला एक अभ्यासकाचे रूप देत असे. किंबहुना आपण अभ्यासक, नवकवी वा नवागत लेखक, चित्रकार ह्यात मोडले जावे ह्या हेतूने तो तशा ढंगाचे केस, दाढी चष्मा राखत असावा. हातात अरुण कोल्हटकरांचे एखादे कवितेचे पुस्तक, शांताराम पवारांबरोबर कधी काळी झालेल्या भेटीगाठीचे पुन्हापुन्हा रसभरीत वर्णन हे मग समाजात ते वलय आपसूक मिळवून देत असे. गावावरून आल्याने सुरुवातीच्या काळा थोड़ा दबावाखाली वावरणारा तो ळूळू आपले मूळ रंग वर आणू शकला. अंगी नाना कळा तशाच विविध रंगछटा. ज्या कलेच्या नावाखाली त्या कला विद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता, ती कला फारशी काही त्याला अवगत नव्हती. शेखर. बेळगावचा शेखर.

माणसे गुंतागुंतीची असतात. आयुष्ये अधिक गुंतागुंतीची करण्याची त्यांची हौस असावी असे बहुतेक वेळा वाटू लागते. कॉलेजच्या स्वच्छंदी काळात दोन मैत्रिणींबरोबर एकाच वेळी शारीरिक संबंध ठेवणे हे शेखरला फारसे कठीण गेले नाही. त्या दोघी एकमेकींच्या जिवलग. त्याच्या मते त्यातील एकीवर त्याने मनापासून प्रेम केले. तर दुसरी स्वत: त्याच्या गळ्यात पडत होती. असे तो मित्रांना मोठ्या अभिमानाने सांगत असे. तसेही बघितले तर ज्याच्यावर प्रेम करतो त्याचीच साथ आयुष्यभर मिळावी असे फार क्वचित घडते. त्यामुळे पहिलीच्या घरून तीव्र विरोध झाला म्हणून त्या मुलीने ह्याला वाऱ्यावर सोडले. मग हा रडला. तुटून पडला. प्रेमभंग झालेला एखादा तरुण जे जे करील ते सर्व त्याने केले.

कॉलेजमध्ये शेखरला जिवलग मानणारा एक मुलगा होता. मनीष. कायम मित्रांच्या घोळक्यात. विनोदांचा खजिना. अगदी वाक्यावाक्याला विनोद. आणि त्यामुळे मित्रांमध्ये हवाहवासा. लीना ह्या मनीषची मैत्रीण. मनीषहून दोन वर्षांनी लहान. कॉलेजच्या तिच्या पहिल्या वर्षापासून मनीषच्या प्रेमात आकंठ डूबलेली. खांद्यापर्यंतचे कुरळे केस. गव्हाळी रंग. सरळ नाक, पातळ जिवणी. चेहेरा कायम गोंधळलेला. बराचसा भोळा असा लीनाचा स्वभाव. तिची सगळी गणितं सरळ. एक अधिक एक दोन हे इतकं पाठ की सध्याच्या जगात त्या गणिताचे उत्तर अगदी दोन हजार देखील येऊ शकते हे तिच्या डोक्यात कधी शिरणारच नाही. मनीषवर ती जीव तोडून प्रेम करत असे. आणि दोन माणसांच्या एकमेकांवरील प्रेमात, त्यातील एक माणूस नेहेमीच दुसऱ्यावर अधिक प्रेम करीत असतो. त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे कधीही समान पातळीचे नसते. प्रेम म्हणजे काही तराजूतील मालवस्तू नव्हे. एका थाळीत एक किलो तर दुसऱ्या थाळीत देखील तितकेच वजन टाकले. ह्या कबुतरांच्या जोडगोळीत लीनाचे मनीषवर फार प्रेम मनीषचा जीव अधिकतम मित्रांमध्ये रमणारा. जसा बऱ्याच पुरुषांचा रमतो. उलट एखाद्या पुरुषाचा जीव पत्नीमध्ये फार रमणे हे त्याच्यासाठी मित्रांमध्ये कमीपणाचे मानले जाते असा एक अभ्यास सांगतो.

शेखर + पहिली, दुसरी.
मनीष + लीना.
ह्यांच्या ह्या प्रेमकथांमध्ये कॉलेजमधील तरुणाईची धुंद वर्षे वाजतगाजत उलटून गेली.

Saturday 25 June 2011

डोस्कं म्हंजे तापेय !

परवा, मी लिहून बसले. ब्लॉगवर टाकून बसले. सगळंच खाडखाड केलं. म्हणजे आलं डोक्यात ते उतरवून टाकलं. कधीकधी अति होतं. डोळे उघडल्यापासून डोळे पुन्हा मिटेस्तोवर जेव्हा सगळीच ठिकाणे रणांगण होऊन जातात तेव्हां हे असं काहीतरी होतं ! एकही फुलबाग नाही. सगळीकडे युद्धं !

पण मला कळलंय...हे असं काहीतरी लिहून बसलं ना की मलाही छान नाही वाटत ! म्हणजे मला घाबल्यासारखंच होतं ! प्रतिक्रिया आली तरी भीती आणि नाही आली म्हणूनही भीतीच ! त्यामुळे हे असं काही लिहिणे हे अजिबात चांगलं नाही ! मनाला आणि शरीरालाही धोकादायकच !

म्हणूनच कालपासून ताप आलाय वाटतं मला !
:)

Thursday 23 June 2011

पोर्टफोलियो

थोड्याच का होईना पण माझ्या रातराणीला कळ्या लगडल्या आहेत. थोड्याच का होईना पण काही कळ्या मदमस्त फुलल्या आहेत. मंद मंद असा गंध हलकेच पसरला आहे. आयुष्यात तशा काही उगाच सुंदर आठवणी काही त्या फुलाला जुडलेल्या नाहीत. पण म्हणून काही तिचा गंध कमी झालेला नाही. ती तिची अशी मध्येच फुलते. आणि मला हसू येते. कारण हा निसर्ग आम्ही बघितला..त्यातील रंग त्या चित्रकाराने कागदावर उतरवले...पण ते रंग, आयुष्यात उतरवणे झाले नाही. म्हणजे ते काळं गडद आभाळ बघितलं...पॅलेटमध्ये काळा रंग घेतला, त्यात थोडा कोबाल्ट ब्ल्यू मिसळला...थोडा अधिक रुंदीचा कुंचला घेतला आणि सरळ सरळ ते आकाशात तरंगणारे काळे ढग त्याने हातातील कागदावर खेचून आणले. उगाच त्या काळ्या ढगांची उपमा कधी कोणाच्या डोळ्यांना दिली नाही...उगाच त्या खोलात कधी बुडाला नाही. निळे आकाश ? हे घ्या. जांभळे डोंगर ? मॅजेन्ट घ्या त्यात पर्शियन ब्ल्यू मिसळा...कागदावर भराभरा खेचा. पाणी ? प्रतिबिंब ? झाडे ? झुडपे ? हिरवे गवत ? चंद्र ? सूर्य ? सगळे सगळे कागदावर उतरले. अमर्त्य झाले. आता कधी हातात ते कागद धरले, तर आहे...नजरसुख आहे....कौतुक आहे....प्रेम आहे...
पण मग...आज का मन रिकामं ? एखादा चंद्र, मनात का नाही ? एखादा तलाव, ओला का नाही ? ते हिरवे गच्च गच्च बहरलेले झाड देखील...निष्पर्ण का ?
मनातले सगळे कागद....कार्ट्रेज, हॅण्डमेड..एकजात सगळे भगभगीत...पांढरे...पांढरे कपाळ जसे.

Tuesday 21 June 2011

हम्म्म्म...

काय झालंय कळत नाही...
हृदय का जड झालंय उमजत नाही.
शरीर जड झालं...तर कळत तरी.
वजनाचा काटा दाखवून देतो तरी...
ट्रेडमिल, सायकल गाठता येते...
वाढते वजन आटोक्यात आणता तरी येते...

पण आता करू तरी काय...
हृदय जड झाले...
त्याला डाएटवर ठेवू काय ?

Monday 20 June 2011

मैत्री

मैत्रीकडे गंभीरतेने बघावे की नाही ? वा ती फक्त भिरभिरत्या कापसासारखी असावी ? जोवर हातात असेल तोवर आपली.

बालपणीच्या निष्पाप विश्वात किती बियाणे पेरले होते. त्या त्या मौसमातील ती ती फुले. कधीतरी गळून गेली...तर एखादे खुडून टाकले गेले. ते रोप मग तसेच राहिले...त्या फुलांची ती नाजूक जागा तशीच राहिली...काही काळ ओली. कालौघात ती सुकून गेली...त्यावर पुन्हा तीच फुले कशी फुलणार? त्यांचा तो मौसम तर कधीच निघून गेला.

कॉलेजच्या नाजूक काळातील ती मैत्री. हसतीखेळती. भाबडी. पुढे ती तिचं आयुष्य जगत गेली. मी माझं. धरलेले रस्तेच वेगळे...मग कुठून कधी भेटी होणार ? नाहीच झाल्या. पण कधीतरी कानी पडलं ते तिने व तिच्या नवऱ्याने जोडीने जोपासलेल्या फुलबागेविषयी. फुलून निघालेला एक रंगीबेरंगी व्यवसाय. म्हटलं एकदा बघून यावी. तिची फुलबाग. तिचा एक जुना मित्र तोच माझा नवा मित्र. आम्ही दोघांनी ठरवलं हिची बाग बघून येण्याचं. तसं, आम्ही दोघींनी भेटून जवळजवळ वीस वर्ष उलटून गेलेली. पहाटे मुंबईहून निघालो व तिच्या बागेशी दहापर्यंत पोचलो. ती भेटणार अशी मनात एक आशा. पण दारात फक्त तिचा त्या फुलबागेतला व जीवनाचा साथी हजर. "तिला अगदी यायचं होतं. पण असं काही काम निघालं...न टाळता येण्यासारखं." त्यांनी दाखवली त्यांची बहरलेली बाग. इतकी नानाविध रंगांनी सजलेली की बघत राहावं. सगळे रंग वस्तीला आलेले. हिरव्या रंगाच्या नानाविध छटा. व त्यावर, नजर पडावी तिथे लगडलेली फुलं जणू फुलपाखरंच. समुहासमुहाने एकमेकांना चिकटून राहिलेली. वाऱ्यावर डुलणारी. वाऱ्याला देखील गंमत येत असावी...हलकेच हात त्याने फिरवावा तर त्यातून नाजूक झुळूक निघावी व रंग डोलून जावे. दोन तास कधी निघून गेले कळलं देखील नाही. फुलांना शास्त्रीय नावे का असतात कोण जाणे...चाफा, चमेली, जाई, जुई, पारिजात...कसे मानवी वाटतात...अगदी कधी सडा तर कधी त्यांचा पाऊस अंगावर झेलावा असं वाटून रहाणारी ही नावे. तिथे बघितली बरीचशी विदेशी फुले...विदेशी नावांची. दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळीच मैत्रिणीला फोन करावा व सांगावे कालचा दिवस कसा नजरसुख देऊन गेला. तिच्या बगीच्यात.
सुंदर गं. खूपच अप्रतिम. खूप छान.
काय छान ? काय आवडलं ? माझी बाग की माझा नवरा ?
हे बोलून त्यावर तिचे ते हसणे.
एका क्षणात त्या कोवळ्या मैत्रीची निष्पापताच निखळून गेली. त्या विनोदात काहीतरी असभ्य वाटले. अंगावर पाल पडावी व कितीही झटकले तरी त्या पालीने जाऊ देखील नये. उगाच वळवळत राहावे व त्या तिच्या बुटक्या पायांच्या टोकेरी नखांनी अगदी व्रण उठवावे.
तिथेच संपली ती एक मैत्री.

नवरा गेला. हाहा म्हणता जगभर बातमी पसरली. माणसे भेटीसाठी येऊ लागली. एका माणसाने गणती कमी झालेल्या आमच्या घराला भेट देण्यास आलेल्या लोकांनी आमचे चिमुकले घर क्षणाक्षणाला भरू लागलं. त्याच त्या कॉलेजमधील निष्पाप दिवसांतील सख्या देखील धावत आल्या. प्रेमात पडण्याच्या माझ्या वेड्या दिवसांच्या त्या साक्षीदार. वेडे, भोळेभाबडे, नको तितके हळवे दिवस. सोळाव्या वर्षाला शोभेसे कोवळे मन. त्यांच्या समोरच उलटलेले ते दिवस, ते महिने व ती पाच वर्षे.
तुझं काही नाही गं. तुझ्या लेकीचंच जास्ती वाटतंय. तिचं तिच्या बाबावर फार प्रेम. ती खूप मिस करेल त्याला.
माझ्या मैत्रिणीने आम्हां मायलेकींच्या प्रेमाला तराजूत घातले. वजन केले. लेकीचं तर बापावर प्रेम असणारच. पण माझे नवऱ्यावरील प्रेम व लेकीचे बापावरील प्रेम ह्यात स्पर्धा आहे हे नव्हतं माहित. माझा कोरा चेहेरा. काहीही न बोलता माझा निषेध तिच्यापर्यंत पोचला का ? कोण जाणे.
दुसरी मैत्री. फाटलेली. ठिगळ लावून मग पुढे खेचलेली.

कधी मोजदाद न केलेले प्रचंड हसतखेळत घालवलेले ते दिवस. त्याच कॉलेजच्या दिवसांतील ही तिसरी मैत्री. तेव्हा दर दिवस सोबतीत घालवलेला. एकमेकींच्या छोट्या छोट्या सुखदु:खाच्या गोष्टी वाटून घेतलेल्या. त्या दिवसांत, मानलेल्या भावाला राखी बांधण्याचा एक रिवाज. त्याला अनुसरून, तिने माझ्या त्यावेळच्या मित्राला भाऊ मानलेले. माझे त्याच्याशी लग्न झाले. संसाराच्या कधी हलक्या लाटा आल्या तर कधी झपाटलेला प्रलय आला. त्यात सावरण्याच्या प्रयत्नांत माझ्या ह्या तिसऱ्या मैत्रिणीला फोन करीत रहाणे वा पत्र व्यवहार करणे नाही जमले. तिची नाव, माझी नाव...वेगवेगळ्या धारेला वाहू लागल्या. निसर्गाच्या नियमानुसार. मला हे नाही कधी कळले, आमची मैत्री ही नको तितकी फोनवर अवलंबून होती. फोनच्या वायरीला लटकलेली ती अशक्त मैत्री, मी फोन करत नाही ह्या कारणास्तव कुठल्यातरी वर्षाला कधीतरी निसटून गळून गेली. एखाद्या फांदीला लटकलेल्या असंख्य थेंबांतील एखादा निखळावा व मातीत आपटून निशब्द फुटून देखील जावा. तिने नवीन घर घेतले. सजवले. एक दिवस आमच्या घराच्या खालून माझ्या नवऱ्याला गाडीत घालून ती स्वत:च्या नव्या घरी घेऊन गेली. सजवलेले घर मानलेल्या भावाला दाखवण्याची तिची इच्छा. ती मला कळली. परंतु, हे असे घराच्या खाली येऊन माझ्या नवऱ्याला गाडीत घालून परस्पर घेऊन जाणे...मला दुखावूनच गेले.
मग, मी तिथे ठिगळ नाही लावले.

अगदी शिशुवर्गापासुन प्रगतीपत्रकावर 'हळवी' हे विशेषण मी घेत आले. हळूहळू एक गैरसमज झाला. वाटू लागले की हा एक गुण आहे. अवगुण नव्हे. ना कधी अनुभवी आईबाबांनी सांगितले. बाई गं, 'हळवे' असणे बरे नव्हे. ह्यावर काम कर..हा अवगुण झटकून टाक. जगणे सोपे जाईल.

आज मन दगड. परंतु, तो दगड अतिशय मांसल अश्या काळजाच्या तुकड्यावर ठेवलेला. दाबून चिरडून ठेवलेले काळीज कधी हलकेच लबलबते...दगड डुचमळतो. छिद्रांनी पोखरलेल्या काळजाचे दिवस भरल्याची जाणीव होते. मग हात थरथरतात...कोरडे ठणठणीत झालेले डोळे झोंबू लागतात.
त्या निष्पाप मैत्रींची आठवण. ते हसणारे दिवस. ती निरागस पत्रे. त्या जखमा. व त्या वेदना.

मैत्रीकडे गंभीरतेने बघावे. हृदयाशी धरावे. तिचा आदर करावा. तिचा मान ठेवावा. हलक्याफुलक्या दिवसांची ती. नाजूक मैत्री. तिला ओंजळीत जपावे. परंतु ती ओंजळ....असावी दोन हातांची. एक हात तुझा...एक हात माझा. मग कधी तू हात काढून घेतलास...एक झोका आला...कापूस उडून गेला तर तो कधी भरकटला, कुठे विसावला की सोसाट्याच्या वादळात पिंजून गेला...काय मी त्यामागे धावू ? का उगा त्या विस्कटलेल्या कापसाचे कोळीष्टक हृदयाशी जोडू ?

माझी ओंजळ तुटली...एव्हढेच मी जाणे.

Thursday 16 June 2011

उपाय

सकाळी मैत्रिणीबरोबर एक वाद झाला...दूरध्वनीवर. मैत्रीण डॉक्टर. किंवा चर्चा म्हणावे. वाद म्हटला की उगाच भांडाभांडी झाल्यासारखे वाटते. नळावर !
विषय परदेशात कामानिमित्त स्थायिक होण्यावरून...माझ्या लेकीने परदेशी स्थायिक व्हावे असे तिला वाटते. मैत्रीण आहे. मला जाणीव आहे, ती माझी हितचिंतक आहे.

...इथे भ्रष्टाचार बोकाळला आहे...काही खरं नाही...सुधारण्याची शक्यता नाही. त्यापेक्षा तुझ्या लेकीने निवडलेल्या विषयावर तिला परदेशीच अधिक वाव आहे....पैसे भरपूर कमावता येतील...कामाचे समाधान मिळेल...

पैसा ही बाब दुय्यम. इथला भ्रष्टाचार प्रथम. तिलाही कन्या आहे. बुद्धिमान.

...अगं, पण ही पळवाट नव्हे काय ? आपण सुशिक्षित लोकं असे टाकून निघून गेलो तर कसे होणार ? मग परिस्थिती सुधारणार तरी कोण ? आणि कोणासाठी ?
...नाही सुधारणार आता परिस्थिती...अधिकाधिक खराबच होणार...
...हो...म्हणजे अश्या एकेक पिढ्या टाकून निघून गेल्या तर नाहीच सुधारणार कधी !

मग इथल्यातिथल्या गप्पा...हवापाण्याच्या...आणि संभाषणाची सांगता.

कन्या माझी असली तरी देखील, मी माझ्या देशाच्या एका दुसऱ्या नागरिकाच्या वतीने मत मांडत होते...भविष्यात पुढे नक्की काय होणार आहे हे जाणणारी मी कोण ?

परंतु मला अजूनही, इथे भ्रष्टाचार बोकाळला आहे...आणि त्यावर देश सोडून जाऊन दुसऱ्या देशात स्थायिक होणे...हा एकमेव उपाय कसा काय असू शकतो हे नाही कळलेले.
'उपाय' हा नेहेमी 'बदल' घडवून आणण्यासाठी असतो. नव्हे काय ? म्हणजे घरात कुठे कीड लागली तर मी ती औषधोपचार करून नष्ट करेन...की घराकडेच पाठ फिरवेन...?

...माझ्या क्षीण बुद्धीला न झेपलेले हे गणित...

Tuesday 14 June 2011

वाचन

१५ दिवस वाचन केलं. काही सुंदर काही सुमार. कदाचित अगदी सुमार नाही म्हणता येणार. कारण नावे मोठी आहेत. परंतु, न आवडलेली असे मात्र म्हणता येईल.

झोंबी
आनंद यादव.
ज्याला मराठी वाचता येते त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावयास हवे. 'शाळा' हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक आपल्याला शालेय जीवनाचे एक रूप दाखवते. तर आनंद यादवांचे 'झोंबी' हे शाळेत जाण्याचा आपण केलेला कंटाळा आठवून एक शरमेची भावना मनास स्पर्श करते. पाठ्यपुस्तकात ह्याचा काही भाग समाविष्ट आहे की नाही ह्याची जाणीव नाही. केला जावा असे मात्र वाटले. पु. ल. देशपांडे प्रस्तावनेत म्हणतात...आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरु झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे ते या 'झोंबी' सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच !
डिसेंबर १९८७ साली ह्याची पहिली आवृत्ती छापली आहे. गांधी हत्येचा उल्लेख पुस्तकात आहे...मग थोडे गणित केले तर पुस्तकाचा कालावधी अंदाजे १९४० च्या आसपासचा असावा. मग भारतातील शिक्षणाविषयीची जागरूकता...आज काय वेगळी आहे ?
अस्वस्थ. अवाक !

गंधर्वयुग
गंगाधर गाडगीळ.
बाल गंधर्व चित्रपट बघितला व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचावयास घेतले. सुरुवातीलाच गाडगीळांनी सांगितले आहे की हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी काहीही नवीन अभ्यास केलेला नाही. तर इतरांनी केलेल्या अभ्यासावर आधारित ही कादंबरी आहे. अभ्यास नाही केला तरी ठीक होते. परंतु, घटना सांगताना त्यातील व्यक्तींविषयी सरधोपट विधाने करून टाकली नसती तर उगाच मनाला त्रास नसता झाला. जगभरातील माणसांमध्ये फक्त काळा व पांढरा हे दोनच रंग नसतात तर त्यातील असंख्य करड्या छटांमधेच तर माणसे घडतात. असे मला वाटते. वरवर बघून कोणाबद्दल मते बनवून टाकणे व समाजापुढे ठेवणे हे अन्यायकारक व उथळ वाटते.

रण / दुर्ग
मिलिंद बोकील.
स्त्री म्हणून पुढारलेल्या समाजात जगताना होणारे मानसिक हिंदोळे. वर्तमानपत्रातून ह्या पुस्तकाविषयी काय परीक्षण आले काही कल्पना नाही. माझ्या मनाला मात्र एक स्त्री असूनही फारसे जवळचे नाही वाटले. उगाच फाफटपसारा देखील भरपूर वाटला. पुस्तक अजून कमी पृष्ठांचे झाले असते !

ओपन
आंद्रे अगासी.
काही महिन्यांपूर्वी सुरु केले. परंतु, लेकीने पळवले. व मग माझे राहून गेले. अप्रतिम. टेनिस मधील मला काही कळते असे अजिबात नाही. उलट शून्य कळते. परंतु हे पुस्तक टेनिसबद्दल नाहीच. अतिशय सुंदर. सोप्पे सरळ इंग्लिश. मनातून कागदावर उतरलेले. शेवटच्या पानावरील एक्नॉलेजमेंटमध्ये अगासीने ह्या लिखाणाचे श्रेय दिले आहे त्याचे मित्र आणि पुलीझ्झर बक्षिसाचे माननीय विजेते, जे. आर. मोहरिंगर ह्यांना. मुखपृष्ठावर त्यांचे नाव टाकावे ही आगासीची इच्छा. परंतु, मोहरिंगर ह्यांना वाटले...Only one name belonged on the cover. Though proud of the work we did together, he said he couldn't see signing his name to another man's life. काय पुस्तक आहे ! अगासी आवडो न आवडो. पुस्तक वाचावयासच हवे !

पुस्तक...पुस्तक....पुस्तक.
वाचावं....व मनोमन समजून जावं...
अक्षर...त्यातून शब्द...मग वाक्य...परिच्छेद...एक पान...दुसरे पान...आणि मग शेवटचे पान...
...हवा...जशी सायकलीमध्ये भरतो...टप्प्याटप्प्याने.
...पुढील रस्ता काटण्यासाठी...
...हा प्राणवायू...माझ्यासाठी.

Monday 13 June 2011

मुकी भाषा

दुपारचे साडेतीन वाजले होते. उन्हाळा रणरणता होता. महीची शाळा सुटायची वेळ झाली होती. मही आठ वर्षांची. शिडशिडीत सावळी. एका जागी स्थिर उभे राहिलो तर सगळीकडे फारच शांतता पसरेल असा तिचा काहीसा समज. आणि आजूबाजूला उडणारी फुलपाखरे का कधी स्थिर असतात ? इथे तिथे चुळबुळणारा ससा का कधी शांत असतो ? मग महीने का बरं बसावं शांत ? मही तर एक हरीण !

मोजून पंधरा मिनिटे लागतात स्कूल बसला, तिच्या घराजवळील ठरलेल्या जागी पोचायला. बाजूलाच उभे एक मध्यम उंचीचे झाड. त्याच्या कृपासावलीत, मांडीवर पुस्तक घेऊन वाचत बसली होती मावशी. हरणाची वाट बघत. चांगली आधीच येऊन बसते मावशी. उगाच हरीण आधी नको पोचायला ! झाड छोटं म्हणून त्याची सावली छोटी. खाली आडोशाला मावशी जरी बसलेली असली तरीही थोडे पाऊल सावलीच्या बाहेरच डोकावत होते. आणि जेव्हढे पाऊल सावलीबाहेर...तेव्हढेच ते नेमके लालबुंद होऊन जाते. कंड सुटू लागते. मावशीने पुस्तकातून डोके वर काढले व दूर नजर टाकली. काळ्याकुळकुळीत तप्त रस्त्यावर पिवळ्याधमक स्कूलबस दिसू लागल्या होत्या. महीची बस ४२३ क्रमांकाची. तीही दिसू लागली म्हणून मग मावशी उभी राहिली. थोडी पुढे सरकली. बस थांबली व टुणकन उडी मारून हरीण बाहेर पडले. नेहेमीसारखेच मावशीने हात पसरले. रोजच्या मिठ्या व रोजचे पापे. काही गोष्टी रोज केल्या म्हणून त्यातील गोडी थोडीच संपते ? पण कुठले काय ! आज बाहेरील उष्म्याने हैराण झालेले हरीण उडी मारून त्या झाडाच्या आडोश्यालाच उभे राहिले. पाठीला शाळेची फुगीर धोपटी, हातात खाऊचा डबा.
काय झालं ? मावशीने विचारलं.
कित्ती गरम होतंय मावशी ! इथे येऊन बघ ! किती थंड आहे !
तिथेच तर बसले होते मी इतका वेळ पुस्तक वाचत ! मावशीने म्हटलं.
पण मग आता मला सावलीतून बाहेरच नाही ना येववत !
अगं, असं कर त्या सावलीलाच घेऊन चल तुझ्याबरोबर. नाही का ?
हा ! चालेल !
महीने पाठीवरील धोपटी व कपाळावर झेपावलेल्या बटा मागे ढकलल्या आणि सावली खेचायला सुरुवात केली. पण सावली कुठली ऐकायला ! ती ना तसूभर हलली.
मावशी ! नाही ग येत ती !
मही ! अगं, त्या झाडाला तू विचारलंस तरी का त्याची सावली घेण्याआधी ? न विचारताच खेचू लागलीस ! मग बरं देईल ते झाड ?
ओss ! हा गं ! पातळश्या जिवणीचा चंबू झाला.
झाडा झाडा...मी आजचा दिवस तुझी सावली घेऊ का ? किती ऊन आहे, तूच बघ ना ! झाडाशी हरणाचा संवाद. आपण इतक्या गोड आवाजात विचारलंय म्हणजे झाड आपल्याला त्याची सावली देईलच म्हणून महीने पुन्हा सावली खेचायला सुरुवात केली ! पण छे !
मावशी ! बघ ना ! नाही येत सावली ! महीला आता आपण झाडाशी करत असलेल्या संवादात गंमत वाटू लागली होती.
अगं, तू आधी न विचारताच खेचायला सुरुवात केलीस ना म्हणून थोडं नाराज झालं वाटतं झाड आपल्यावर !
ह्म्म्म. मग आता ? महीने मान वर केली व आपले मिष्किल डोळे झाडाकडे लावले.
काही नाही ! माफी मागून टाक !
मही सावलीबाहेर पडली. घराकडे चालू लागली.
मावशी अजून तिथेच उभी.
सॉरी झाडा ! महीने मान वेळावून मागे झाडाकडे बघितले. मनमोकळी माफी मागून टाकली.
मग कुठे मावशी पुढे सरकली आणि खाऊचा डबा महीकडून आपल्या हातात घेऊन दोघी दोघी बागडत त्यांच्या घराच्या दिशेने चालू लागल्या.
आज शाळेत कायकाय घडले हे ऐकण्यात मग ते कडक ऊन देखील नरम झाले.

नाहीतरी, न विचारता कोणाकडून काही घेऊ नये हे तर निरागस महीला ज्ञात होतेच. फक्त आज त्या 'कोणा'ही मध्ये निसर्गाची देखील भर पडली.
तोही बोलकाच आहे...नाही का ? फक्त सगळ्यांनाच त्याची बोली कळतेच असे नाही...

...आणि काही भाषा शिकवून थोड्याच येतात ?

Monday 6 June 2011

कशात काय ?

ऊन तर ऊन. ऊनपाऊस नाही. ऊनसावली नाही. ऊनही असं...जसा प्रेमाचा वर्षाव. उगा, कुठल्या पुराण्या वैराचे बाण फेकत राहिल्यासारखं नव्हे. हिरवंगार गवत त्यावर पडलेलं प्रेमळ ऊन. वर पसरलेलं निळंशार छत. असं वाटावं जणू अख्खं जग एकाच निळ्या तंबूत वस्तीला आलंय ! पायाला गवताचा ओला ओला मऊ स्पर्श. आणि त्यात काय रं निळं निळं ? निळ्या तंबूचा जसा एक तुकडा. चिमुकला. मी वाकून पाहिलं तर ते कोणा पक्ष्याचं अंड. बोटाच्या एका पेराहून थोडसं मोठं. चिमटीत उचलवयास जावं तर ते इतकं नाजूक की त्याचा तुकडाच पडावा. मग हलकेच तळहातावर घेतलं आणि जरा आसपास विचारपूस केली. कोणता जीव ह्यातून बाहेर आला असावा ? ह्या बाहेरील अगडबंब विश्वात कोणी प्रवेश केला असावा ? हे रॉबिनचे अंड ! एका शेजारणीचे ठाम मत. छे छे ! हा तर ब्लू जे ! कोणाचा अर्धवट अभ्यास !

आणि ह्यावर...कोणाचे हे अंडे हेच माहित नसल्याचं माझं अज्ञानातील सुख.

कुठल्या अंड्यातून आपण बाहेर पडणार हे कुठे आपल्या हाती ? परंतु, आता बाहेर पडलोच आहोत ह्या अस्ताव्यस्त जगात, तर निदान कोण बनणार हे तरी आहे काय आपल्या हाती ?