नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 27 October 2011

पिढ्या ठिपक्यांच्या...

सुरुवातीच्या काळात आई एकटीच रांगोळी काढत असे. सुरुवात आईबाबांच्या संसाराची. त्या काळात पाच हजार रुपयांची पागडी भरून घेतलेलं त्यांचं घर. तेव्हा आमच्या दारात आई मोठ्या हौसेने रांगोळी काढे. तिच्या माहेरी म्हणे त्या चौघी बहिणी आणि शेजारणी पाजारणी अशा सगळ्यामिळून भली मोठी रांगोळी घालत असत. अगदी तीस, चाळीस आणि पन्नास ठिपक्यांच्या रांगोळ्या !
लहानपणी, मी आमच्या दारात वेड्यावाकड्या रेघा मारल्या. आईच्या देखरेखीखाली. हळूहळू ठिपक्यांचे गणित मांडता येऊ लागले. म्हणजे हा ठिपका असा सरळ गेला आणि त्या पलीकडच्या ठिपक्याला भिडला. मग तो पार त्या कोपऱ्यातून निघाला...असा तिरपा तिरपा आला आणि त्या पलीकडल्याला जाऊन टेकला. अगदी हलकेच. आणि झाली की हो एक टप्पोरी चांदणी तयार. आई आणि मी. आम्ही दोघी. ठिपके गेला बाजार दहा नाहीतर बारा. चौकोन, काटकोन, त्रिकोण.
मग आली धाकटी बहिण. आता आई कटाप. आमच्या भरवश्यावर ती स्वयंपाकघरात, दिवाळीच्या फराळावर लक्ष केंद्रित करू लागली. दारी रांगोळी तर हवीच. ह्याचा अर्थ गणित तेच. दोघींचे दोन हात. ठिपके सोळा नाहीतर अठरा. अजून काही दिवाळ्या उलटल्या. सर्वात धाकटी बहिणी आली. एक चारपाच वर्षांत मग आम्हीं तिघीतिघी रांगोळ्यांच्या पुस्तकांत शोधाशोध करू लागलो. जळत्या उदबत्यांचे टोक तपकिरी कागदाला एकेक इंचावर लावून ठिपक्यांचा घरगुती कागद तयार करू लागलो. ही झाली चढती भाजणी. म्हणजे ३ हात. मग अगदी आत्मविश्वासाने ठिपके देखील वाढले. अगदी गेले पंचवीस वा अठ्ठावीसपर्यंत. चौकोन, काटकोन, त्रिकोण. मधेच एखाददुसरे वर्तुळ देखील डोकावू लागले. कधीतरी निसर्गदृश्ये सुद्धा काढली. चुकतमाकत.

मग झालं लग्न. आणि दार बदललं. एकदम उतरती भाजणी. हात राहिला एक. रांगोळी आखूडली. दहा बारा ठिपक्यांवर येऊन पोचली. वर्षभरात आली माझी लेक. गुढघ्यापर्यंत पोचली नाही तर झाली तिची हक्काची लुडबूड सुरु. पुन्हा २ हात. मग ठिपक्यांची माझी उतरती भाजणी लागली चढू. ठिपके पुन्हा लागले पडू पंधरा...नाहीतर अठरा.

काल मात्र लेकीने आग्रह धरला मोठ्या रांगोळीचा. मोठं सारवूया ह्या वेळेला...आणि मोठी रांगोळी घालूया. दोघीदोघी. किती पुस्तकांची पाने चाळली. हल्ली आम्ही एखादी रांगोळी काढून झाली की पुस्तकातील त्या रांगोळीवर तारीख टाकून देतो. म्हणजे उगाच चुकून तीच कधी काढली जाऊ नये. किती वेळ विचार केला. विनिमय केला. ही नको. ती तर अज्जिब्बात नको. ही मला नाही आवडली आणि ती तुला नाही आवडली. ह्यात वळणे फार तर त्यात गोंधळ खूप. शेवटी एकमताने, फार नाही पण तेवीस ठिपक्यांवर येऊन ठेपलो. वळणे आणि वेलांट्या. फुले आणि पाकळ्या. लेक आपली सगळी वळणे माझ्या गळ्यात टाकते. म्हणजे सरळ रस्त्याने ती जाणार आणि अधली मधली वळणे माझ्यासाठी सोडून देणार. ती मी टाकायची. ती मी भरायची. तब्बल चार तास बाहेर पाटावर बसून होतो दोघी. हसत. खिदळत. रांगोळी काढताना एक मात्र बरं असतं. शेजारी पाजारी सगळ्यांना भेटून होतं. येताजाता. आम्हीं बसल्या बसल्या आणि ते उभ्या उभ्या...गप्पाटप्पा मारून होतात. आमच्या कॉस्मॉपॉलिटन वसाहतीत आमचं 'मदर-डॉटर' करून भरभरून कौतुक होतं. का कोण जाणे पण उगाच मुठभर मांस माझ्या अंगावर चढतं.

...मात्र ही पहिल्या दिवशी काढलेली रांगोळीच बरं का चारी दिवस ! दर दिवशी वेगळी रांगोळी काढणे मात्र नाही जमत आता. जेव्हा तीन हात होते...त्यावेळी मात्र करायचो हा उद्योग आम्हीं. नित्य नवी रांगोळी !

दर वर्षी दिवाळीच्या दिवसात आमच्या बिल्डींगमधल्या एका अतिशय व्रात्य मुलाची अगदी हमखास आठवण येते. तळमजल्यावर रहायचा. मी रांगोळी काढावी आणि दरवाजा लोटून जरा आत काय यावं...सात आठ वर्षांच्या ह्या लहान मुलाने धाडधाड जिने चढत वर यावे आणि पाय रांगोळीवर घासून रांगोळी फरफटवून टाकावी. काही वर्षांपूर्वी त्याचे आईबाबा त्याला घेऊन अमेरिकेला निघून गेले. आणि माझी रांगोळी जीवे वाचली !
काही म्हणा...
फटाक्यांच्या कर्णकटू आवाजांपेक्षा, भरलेल्या घरातील प्रेमळ हसण्याखिदळण्याचे आवाज कानाला अधिक मधूर वाटतात...हो ना ?
त्यातून,  हे आवाज ध्वनीप्रदूषण विरहित !
:)

माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हां सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! :)

24 comments:

तृप्ती said...

surekh kaaDhalee aahes raangoLee :)

rajiv said...

वा :, अनघा वा: !! ठिपक्यांचे शब्दचित्र ...कमालीचे सुंदर झालेय ! अगदी त्या गेरूने रंगवलेल्या जमिनीवरील रंगीत रांगोळीप्रमाणे !!
३ पिढ्यांचा प्रवास तो पण ठीपक्यांतून...छानच चितारलाय !!

अपर्णा said...

मस्त ग...दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...

सौरभ said...

वाह वाह वाह!!! सुरेख... सुबक... बढिया!!! अगदी गेरू सारवून... एकदम मस्त!!!

Gouri said...

मस्त ग अनघा. मागच्या दिवाळीची तुझी रांगोळीवरची पोस्टही सुंदर होती. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला दोघींनाही.

या दिवाळीला रोज लहान का होईना पण रांगोळी काढायची असं ठरवलंय. ठिपक्यांची, कर्नाटकात बघितलेली पारंपारिक विना ठिपक्यांची, किंवा माझे प्रयोग. चांगली येत नाही माझी, पण थोडी सुधारणा आहे असं वाटतंय. :)

Raindrop said...

शब्दचित्र, रंगचित्र, व्यंगचित्र, चित्र-विचित्र ....तू कलाकार आहेस :) सुंदरच!!!

अनघा said...

धन्यवाद गं तृप्ती ! लेकीने अगदी जोरच लावला ह्यावेळेला...मोठ्या रांगोळीसाठी ! :)

अनघा said...

राजीव, आभार ! 'रांगोळी मंडळ' आपले आभारी आहे ! :)

अनघा said...

अपर्णा, धन्यवाद ! :)

अनघा said...

:) मज्जा ना सौरभ ?! रांगोळी काढण्यात मस्त गेला आमचा दोघींचा वेळ ! आणि पूर्ण झाल्यावर लेक जरा बिल्डींगमध्ये चक्कर मारून आली...आणि मग म्हणे आई, आपलीच रांगोळी छान झालीय सगळ्यांत ! :p :D :)

अनघा said...

फोटू काढ गं गौरी ! आणि दाखव नक्की ! :)

अनघा said...

:) वंदू ! कलाकार ! :D

Gouri said...

अनघा, अग अजून दाखवण्यालायक नाही येत रांगोळी. शिकाऊ काम चाललंय :)

श्रिया said...

किती छान लिहिले आहे अनघाताई,मस्तच वाटले वाचून.रांगोळीची धमाल....तुझ्या लहानपणी आईसोबत काढलेली पहिली रांगोळी,मग बहिणीं सोबत आणि आता तुझी लेक....खरच ह्या रांगोळीची आणि ह्या दिवाळीची हि खासियत आहे नाती अजून जपली जातात ह्या रांगोळीच्या रेघा अश्याच पिढ्यानपिढ्या उठत राहोत अंगणात....तुला शुभ दीपावली!

हेरंब said...

मस्तच !!! रांगोळी आणि त्यात गुंफलेली तीन पिढ्यांची कहाणी !! सही.. दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

अनघा said...

आभार गं श्रिया ! बऱ्याच दिवसांनी आलीस ना ? खास दिवाळीत आलीस...मस्त ! :)

बहिणीबहिणी, मायलेकी, मैत्रिणीमैत्रिणी...असं अंगणात एकत्र बसून हसत खिदळत रांगोळी काढण्यातील मौज काही आगळीच ! ती अशीच पिढ्यांपिढ्या कायम राहो असं वाटतं खरं... :)

अनघा said...

हेरंब, माझ्या भरपूर आठवणी त्या ठिपक्यांत फिरत असतात...दर दिवाळीत त्या फिरून फिरून वर येतात आणि ताज्यातवान्या होतात !
:)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, ठिपक्यांची रांगोळी सुंदर जमली आहेच. शिवाय शब्दांची रांगोळी देखील अप्रतिम.. :-)

अनघा said...

ओ सर !! अजून आहे दारात रांगोळी ! प्रत्यक्ष या पाहू बघायला ! :) तुमच्यासारखे शिवाजी महाराज वगैरे नाही येत आम्हांला टाकता ! :)

sahajach said...

अनघा अगं काय सुंदर आलीये गं रांगोळी.... मी नं यावेळेस इशानूला ’ठिपक्यांचा उदबत्तीने केलेला कागद’ वगैरे सगळं समजावून सांगितलं... उगाच एका कागदावर जरासा डेमो दिला मग :) मुलांना इतकी मजा आली सगळं बघताना.... रंग नव्हते त्यामूळे साध्या साध्या रांगोळ्या काढल्या फक्त.... तुझी ही रांगोळी नक्की दाखवते आज पिल्लूंना....
फक्त रांगोळीच नव्हे तर पोस्टही मनापासून आवडली... :)

BinaryBandya™ said...

रांगोळी मस्तच ...
आजकाल ठिपक्यांबरोबर साच्यांचा पण जमाना आहे ..
आमच्या घरी पणती, लक्ष्मीची पावले ह्यांचा साचा आहे ...

अनघा said...

तन्वी, धन्यवाद !
सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी....आयुष्यात किती आनंद देऊन जातात ना ? आणि आपली नाती घट्ट विणत जातात ! :)

अनघा said...

बंड्या ! आहेस कुठे तू ?!
पण दिवाळीला आलास ते अगदी छान झालं ! :)
ह्म्म्म. आहे खरा साच्यांचा जमाना ! पण खरी गंमत नाही ना येत त्यात !
आभार रे. :)

BinaryBandya™ said...

दिवाळीची सुट्टी घेतली होती ..
म्हणून गायब होतो ..