नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 1 October 2011

बिना कुछ खोये....

परवा काळी पिवळी करून कचेरीत जावे लागले. आमच्या एखाद्या लेगोच्या चौरसागत उभ्या असलेल्या इमारतीखाली पोचले व चालकाला भाडे विचारले.
"किती झाले ?"
"४५."
"बघू. भाडे कार्ड बघू."
कार्डावर नजरेने पटकन शोधले....मीटर व कार्ड ह्यांची सांगड घातल्यास भाडे ४४.५० पैसे इतके होते. मग पन्नास पैसे ? ते चालकाने गृहीत धरून स्वत:च्या खिशात घातले होते. म्हणजे कष्टाचे ४४.५० व फुकटचे पन्नास पैसे. जर मी त्या चालाकाच्या डोक्यात जर थोड्या वेळासाठी डोकावले तर....पन्नास पैश्याचा तोटा ग्राहकाने उचलावा...मी का ? आणि म्हणून मी कधीही ४४ रुपये सांगणार नाही...नेहेमीच ४५ सांगेन. नाहीतरी ग्राहकाच्या खिशात ५० पैश्यांची चिल्लर कुठून असणार ? नसेलच हे मी गृहीत धरेन व 'राउंड फिगर' करून सांगून टाकेन....वाढीव स्वरूपात ! पचास पैसे कि हि तो बात है !
'राउंड फिगर' ही नेहेमीच वरच्या रकमेची...कधीही पन्नास पैश्यांनी देखील कमी नाही.

आज.
गेले कित्येक वर्षे मी ज्यावेळी माझ्या एका ठराविक बँकेत जाते त्यावेळी त्याच गल्लीत मी गाडी लावते. नेहेमीच एक बुटकासा माणूस त्याची बिलांची छोटीशी पुस्तिका घेऊन पुढे येतो. मी पाच रुपये देते. पावती घेते. संवाद करण्याचा काहीही प्रश्र्न येत नाही. परंतु, आज मी गाडी लावली तसा तो रिकाम्या हातांनी पुढे आला. मी खिडकीची काच खाली केली.
"द्या. रिसीट द्या."
"मॅडम, आप जो मन में आये वो दे दो."
"मेरे मन में क्या आनेवाला है ? तू रिसीट दे और पैसा ले."
"अब पैसा बढ गयेला है मॅडम ! पाँच का दस हो गया है."
"ठीक. तो दस का रिसीट फाड."
"नही वैसे नही...आप चाहे तो पांच दे सकते हो."
"बॉस ! तू दस का रिसीट फाड और ये दस का नोट ले ! फालतू में टाईम पास मत कर ! "

घरच्या एसीला सर्विसिंगची गरज आहे. नाहीतर चालू केला की बंद खोलीत एक हलकेच धुळीचा फवारा केल्यागत वाटू लागते ! आज शनिवार...असली कामे संपवण्याचा दिवस. म्हणून दुपारी एक ते दोनमध्ये हे काम करावे असे सर्विस स्टेशनला सांगितले. कंपनीचे अधिकृत सर्विस स्टेशन. कुठेही गोलमाल असण्याचा संभाव नाही. ज्या माणसाशी ह्या संदर्भात गेले आठ दिवस अधून मधून बोलत होते त्याचा ११ वाजता फोन आला.
"मॅडम, आप कंपनीसे करवाते हैं तो आपको १४०० रुपया चार्ज  पडेगा."
"हा. मुझे मालूम है. आपकी वो ऑफिसवाली लडकीने ये मुझे बोला है. और आपका कंपनीकाही सर्विस स्टेशन है ना ? "
"हा....कंपनी का ही है.... पर अगर मै आके करता हूँ तो आपका कम में काम हो सकता है." अतिशय मुलायम व समजावणीचा सूर.
"फोन रख तू ! और मेरे घर आने की बिल्कुल जरुरत नही."

माझी तत्वे एका टोपलीत.
टोपली माझ्या पुढ्यात.
व मी भर बाजारात...
"तत्वे घ्या तत्वे.
कधी पन्नास पैसे...
कधी पाच रुपये...
कधी पाचशे रुपये."

मी माझी तत्वे, कधी टोपलीत भरली व बाजारात विकायला काढली ? चिरीमिरीला विकली ?

एक जाहिरात आठवली...आवडली होती...माझ्या मनाला पटली होती....
कधी नव्हे ती एक अशी जाहिरात, जी काही तत्वांबद्दल बोलत होती...
...व तीही एका तरुणाच्या नजरेतून...
तरुणांसाठी...


पहिल्या घटनेत, माझ्या लिखाणात मी गरजेइतके नीट विचार मांडू शकले आहे असे आता नाही वाटत...म्हणून...
'चालकाने ग्राहकाने ५० पैसे जास्ती द्यावेत हे गृहीत धरणे चूक की बरोबर हा मुद्दा आहे.
मला माझे भाडे नक्की किती झाले आहे ते आधी त्याने सांगितले असते...त्यानंतर जर माझ्याकडे सुट्टे नसतील तर पन्नास पैसे मी त्याला अधिक देईन. परंतु, ते 'मीच' द्यावेत असे त्याने गृहीत धरणे हे किती बरोबर ? कारण इथे प्रश्र्न पन्नास पैश्याचा नाही...तर हक्काचे व श्रमाचे नसताना देखील पैसे अधिक मागण्याचा आहे.
व ते आता आपल्याही इतके रक्तात भिनले आहे की त्यात काही गैर आहे असे आपल्याला वाटत देखील नाही...'
ही एखाद्याची चुकीची प्रवृत्ती जोपासण्यासारखे आहे. आणि आपण 'कुठे पन्नास पैश्यासाठी भांडत बसा 'ह्या कारणाने त्या वृत्तीस खतपाणीच घातले आहे.
तसेच आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर, त्याचे जेव्हा आपल्यासमोर बिल ठेवण्यात येते त्यावेळेस जर त्यात सर्विस चार्जेसच्या नावाखाली एखादी रक्कम जोडली गेली असेल तर ती ग्राहकाची पूर्णपणे लुबाडणूक आहे. कारण हॉटेलच्या सेवेची किंमत पदार्थांच्या दरात अंतर्भूत असते..ती ते अधिक किंमत म्हणून आपल्याकडून वेगळी घेऊ शकत नाहीत. ती सर्वस्वी लबाडी आहे.

18 comments:

तृप्ती said...

:)

Shriraj said...

अनघा, खूप त्रास होतो अशा समाजात जगताना :-(

Anagha said...

श्रीराज, समाज म्हणजे आपणच ना ? आपणच विकलंय आपल्याला...चिरीमिरीला...मग घेणारे का नाही घेणार ? ही आपणच आपली किंमत केलेली आहे.

Anagha said...

तृप्ती, अशी हसलीस की कळतं मला...हा...तृप्ती येऊन गेली ! :) :)

Raindrop said...

traas hoto khara aahe...

Anagha said...

वंदू...

हेरंब said...

म्हंटलं तर अगदी छोटा मुद्दा पण खरं तर खूप मोठा !!

ती कमर्शियल आवडली. मस्तच !

Gouri said...

मस्त आहे ती जाहिरात :)
मला कधीकधी वाटतं आपल्याला कन्फ्रंटेशनचा फार कंटाळा आहे. प्रत्येकाशी कुठे भांडत बसणार असं वाटतं. रिक्षावाल्यांशी हुज्जत घालायचा कंटाळा आल्यामुळे कित्येकदा मी त्यांना जास्तीच्या भाड्याविषयी काही म्हणत नाही. :(

सौरभ said...

पण मला अजून नोकियाचं आणि त्याच्या तत्वांचं रिलेशन समजलं नाही!!!

अपर्णा said...

गौरी म्हणते तस होतं कधी कधी....
रच्याक, तू जर ती तत्वं खरच काढलीस न तर खूप जास्त टोपल्या लागल्तील बर...:)

Prof. Sumedha said...

मला सॉलिड आवडते असे भांडायला....स्पेशली रिक्षावाल्याशी ...२ वेळा मला त्यांनी भांडता भांडता सांगितले...ठीक आहे मग नका देऊ पैसे....मी मस्त पैसे न देता निघून गेले....त्यानी शिव्या घातल्या...पण अशा वेळी मी मस्त निगरगट्ट होते !!!!
आपल्याला भांडणे म्हणजे वाईट हे लहानपणापासून शिकवले जाते ...मोठेपणी भांडावे लागेल हे आपल्या स्वप्नातच नसते ....मग कुठे भांडा ...असला पुचाट विचार आपण करतो !!! मला माझ्या आईने असे झकास कसे भांडावे हे तिच्या कृतीतून शिकवले आहे ...त्याचा फायदा होतोच नेहमी !!!

Anagha said...

हेरंबा, मला बरं वाटलं की तुला माझ्या लिखाणातला...पहिल्या प्रसंगातील मुद्दा कळला आणि पटला. :)

Anagha said...

अगदी बरोबर गौरी. आणि आपल्या ह्याच गोष्टी, 'वेळ नसणे व रोज उठून वाद घालायचा कंटाळा येणे' रिक्षावाल्यांच्या व टॅक्सीवाल्यांच्या पथ्यावर पडल्या आहेत. अर्थात त्यांच्याच कशाला, एकूणच सगळ्यांच्याच हे पथ्यावर पडलेले आहे.

Anagha said...

सौरभ, तुला नोकिया फिल्ममधील तरुणाने स्वत:च्या फायद्यासाठी चुकीच्या मार्गाचे अवलंबन केले नाही त्यात काही विशेष दिसले नाही.
ह्याचा अर्थ मी असा काढेन- सरळ मार्गाने यश मिळवणे तुझ्यासाठी इतकी साधी गोष्ट आहे की त्याला इतके महत्त्व देण्याची काय गरज आहे असे तुला वाटते.
मला आशा आहे की हा माझा तुझ्याबद्दलचा निष्कर्ष बरोबर आहे.
:)

Anagha said...

खरं आहे गं अपर्णा... हल्ली रोज उठून 'बरे वाईट' असा झगडा करावा लागतो.

Anagha said...

:) सुमेधा, खरंच गं...लहानपणी भांडणे हे वाईट असेच तर आपण शिकलो. सध्या मात्र भांडणे वा 'जो मुद्दा बरोबर आहे तो न सोडणे' गरजेचे झालेले आहे. निदान समोरचा चुकीचे वागत आहे...व ते आपल्याला समजले आहे...हे तरी सांगणे जरूरीचेच. हो ना ?
तुझ्या अनुभवावरून मी विचारातच पडलेय...माझी लेक नक्की काय करेल ? :)
आभार गं, प्रतिक्रियेबद्दल.

Unknown said...

अगदी बरोबर लिहालायेस, मी तर बस वाहका कडून ५० पैसे ची नाणी घेऊन ठेवली आहेत :)
भाड्यात ५० पैसे झाले कि देते.
एकदा रिक्षा वाला मला बोलला " अरे अपने ५० पैसा हि दिया " मी बोलले, आपको भी पता है कितना हुआ वो!

Anagha said...

हेहे ! ऋचा ! :) :)
आभार गं प्रतिक्रियेबद्दल. :)