नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 30 October 2011

गुंता ?

असं का असतं...
दिवसभर...पूर्ण दिवस तो माझ्यासोबत असतो. एक क्षण देखील मला एकटीला सोडत नाही. त्याच्या संगे मी माझा दिवस व्यतीत करते. असो सुखाचा वा असो दु:खाचा.
पण तरीही...तरी देखील, दिवस संपता संपता तो दूर दूर जाऊ लागतो. मी त्याला कितीही का धरून ठेवेना...तो नाही ऐकत माझं...हळूहळू धूसर होऊ लागतो...आणि एका क्षणी दिसेनासा होतो. अदृश्य होऊन जातो. पुढील काही क्षण...काही पळ मी एकटी बसून रहाते. गुढघ्यात मान खुपसून. घाबरून. कसनुसं होतं. अगदी एकटं एकटं वाटू लागतं. तो अंधार अंगावर येऊ लागतो...विक्राळ आंधळा अंधार. आणि...आणि मग काय होतं ? अस्पष्ट असा तो सुस्पष्ट होत जातो...तो माझा दुसरा सखा हसत हसत दृश्य होऊ लागतो. माझी सोबत करावयास त्या अंधारात तो पुढे येतो. मग आम्हीं दोघे...पुढील क्षण न क्षण एकत्र असतो. मी त्याचा हात घट्ट धरून आणि तो माझ्या माथ्यावरून हलकेच हात फिरवत.
पण काय हे तरी शाश्वत असतं ? छे ! थोडं का भान हरपावं माझं...विसरून जावं मी मला...तो दूर होऊ लागतो...मी कितीही त्याला पकडून ठेवावं, तो मला सोडून जातो. असहाय्य मला, दूर लोटून तो निघून जातो.
मग ? मग काय होतं...?
...काय सांगावं...?
...माझा तो पहिला सखा पुन्हां पुढे येतो...
खोल खोल गर्तेत कोसळणाऱ्या मला त्याच्या बलशाली मिठीत सावरून नेतो.

पण हे असं का होतं...?

सखा तर एकच असावा ना ?
आयुष्यात एकाचीच तर साथ असावी ना ?
काय हा मोह आहे ?
वा हा निसर्गाचा एक नियम आहे ?
आणि रोज तो मला पटवू पहात आहे ?
एकाच व्यक्तीत नसतात ते सगळे गुण...जे हवेहवेसे वाटतात.
मन बापडे शोध घेत रहाते. उगा वेडेपिसे होते.
जे गुण मला सूर्यात मिळतात...ते तर त्या चंद्रात कधीच नसतात.
चंद्र मला जे सहजगत्या उदार हस्ते देऊ पहातो...ते त्या सूर्याच्या कधी ध्यानीमनी देखील नसते.
कोमल, शीतल चंद्र हा चंद्र असतो...आणि तो तप्त, उग्र सूर्य हा सूर्य.
मला का दोघांची ओढ वाटावी...
का मी ह्याचे गुण त्याच्यात आणि त्याचे गुण ह्याच्यात शोधावे ?

...माझं सरळ साधं आयुष्य मी फुका गुंतागुंतीचं करून टाकावं...?

हे असं का बरं असावं ?

Thursday 27 October 2011

पिढ्या ठिपक्यांच्या...

सुरुवातीच्या काळात आई एकटीच रांगोळी काढत असे. सुरुवात आईबाबांच्या संसाराची. त्या काळात पाच हजार रुपयांची पागडी भरून घेतलेलं त्यांचं घर. तेव्हा आमच्या दारात आई मोठ्या हौसेने रांगोळी काढे. तिच्या माहेरी म्हणे त्या चौघी बहिणी आणि शेजारणी पाजारणी अशा सगळ्यामिळून भली मोठी रांगोळी घालत असत. अगदी तीस, चाळीस आणि पन्नास ठिपक्यांच्या रांगोळ्या !
लहानपणी, मी आमच्या दारात वेड्यावाकड्या रेघा मारल्या. आईच्या देखरेखीखाली. हळूहळू ठिपक्यांचे गणित मांडता येऊ लागले. म्हणजे हा ठिपका असा सरळ गेला आणि त्या पलीकडच्या ठिपक्याला भिडला. मग तो पार त्या कोपऱ्यातून निघाला...असा तिरपा तिरपा आला आणि त्या पलीकडल्याला जाऊन टेकला. अगदी हलकेच. आणि झाली की हो एक टप्पोरी चांदणी तयार. आई आणि मी. आम्ही दोघी. ठिपके गेला बाजार दहा नाहीतर बारा. चौकोन, काटकोन, त्रिकोण.
मग आली धाकटी बहिण. आता आई कटाप. आमच्या भरवश्यावर ती स्वयंपाकघरात, दिवाळीच्या फराळावर लक्ष केंद्रित करू लागली. दारी रांगोळी तर हवीच. ह्याचा अर्थ गणित तेच. दोघींचे दोन हात. ठिपके सोळा नाहीतर अठरा. अजून काही दिवाळ्या उलटल्या. सर्वात धाकटी बहिणी आली. एक चारपाच वर्षांत मग आम्हीं तिघीतिघी रांगोळ्यांच्या पुस्तकांत शोधाशोध करू लागलो. जळत्या उदबत्यांचे टोक तपकिरी कागदाला एकेक इंचावर लावून ठिपक्यांचा घरगुती कागद तयार करू लागलो. ही झाली चढती भाजणी. म्हणजे ३ हात. मग अगदी आत्मविश्वासाने ठिपके देखील वाढले. अगदी गेले पंचवीस वा अठ्ठावीसपर्यंत. चौकोन, काटकोन, त्रिकोण. मधेच एखाददुसरे वर्तुळ देखील डोकावू लागले. कधीतरी निसर्गदृश्ये सुद्धा काढली. चुकतमाकत.

मग झालं लग्न. आणि दार बदललं. एकदम उतरती भाजणी. हात राहिला एक. रांगोळी आखूडली. दहा बारा ठिपक्यांवर येऊन पोचली. वर्षभरात आली माझी लेक. गुढघ्यापर्यंत पोचली नाही तर झाली तिची हक्काची लुडबूड सुरु. पुन्हा २ हात. मग ठिपक्यांची माझी उतरती भाजणी लागली चढू. ठिपके पुन्हा लागले पडू पंधरा...नाहीतर अठरा.

काल मात्र लेकीने आग्रह धरला मोठ्या रांगोळीचा. मोठं सारवूया ह्या वेळेला...आणि मोठी रांगोळी घालूया. दोघीदोघी. किती पुस्तकांची पाने चाळली. हल्ली आम्ही एखादी रांगोळी काढून झाली की पुस्तकातील त्या रांगोळीवर तारीख टाकून देतो. म्हणजे उगाच चुकून तीच कधी काढली जाऊ नये. किती वेळ विचार केला. विनिमय केला. ही नको. ती तर अज्जिब्बात नको. ही मला नाही आवडली आणि ती तुला नाही आवडली. ह्यात वळणे फार तर त्यात गोंधळ खूप. शेवटी एकमताने, फार नाही पण तेवीस ठिपक्यांवर येऊन ठेपलो. वळणे आणि वेलांट्या. फुले आणि पाकळ्या. लेक आपली सगळी वळणे माझ्या गळ्यात टाकते. म्हणजे सरळ रस्त्याने ती जाणार आणि अधली मधली वळणे माझ्यासाठी सोडून देणार. ती मी टाकायची. ती मी भरायची. तब्बल चार तास बाहेर पाटावर बसून होतो दोघी. हसत. खिदळत. रांगोळी काढताना एक मात्र बरं असतं. शेजारी पाजारी सगळ्यांना भेटून होतं. येताजाता. आम्हीं बसल्या बसल्या आणि ते उभ्या उभ्या...गप्पाटप्पा मारून होतात. आमच्या कॉस्मॉपॉलिटन वसाहतीत आमचं 'मदर-डॉटर' करून भरभरून कौतुक होतं. का कोण जाणे पण उगाच मुठभर मांस माझ्या अंगावर चढतं.

...मात्र ही पहिल्या दिवशी काढलेली रांगोळीच बरं का चारी दिवस ! दर दिवशी वेगळी रांगोळी काढणे मात्र नाही जमत आता. जेव्हा तीन हात होते...त्यावेळी मात्र करायचो हा उद्योग आम्हीं. नित्य नवी रांगोळी !

दर वर्षी दिवाळीच्या दिवसात आमच्या बिल्डींगमधल्या एका अतिशय व्रात्य मुलाची अगदी हमखास आठवण येते. तळमजल्यावर रहायचा. मी रांगोळी काढावी आणि दरवाजा लोटून जरा आत काय यावं...सात आठ वर्षांच्या ह्या लहान मुलाने धाडधाड जिने चढत वर यावे आणि पाय रांगोळीवर घासून रांगोळी फरफटवून टाकावी. काही वर्षांपूर्वी त्याचे आईबाबा त्याला घेऊन अमेरिकेला निघून गेले. आणि माझी रांगोळी जीवे वाचली !
















काही म्हणा...
फटाक्यांच्या कर्णकटू आवाजांपेक्षा, भरलेल्या घरातील प्रेमळ हसण्याखिदळण्याचे आवाज कानाला अधिक मधूर वाटतात...हो ना ?
त्यातून,  हे आवाज ध्वनीप्रदूषण विरहित !
:)

माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हां सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! :)

Monday 24 October 2011

कोर्ट केस क्र. ११००/अ/११

त्या दिवशी मी वेळेत घरी आले होते. संधिकाली घरी येणं हे फार क्वचित होत असल्याकारणाने त्याचे काही वेगळेच अप्रूप वाटून जाते. अत्याधुनिक कचेरीतील त्या निळ्या खिडकीपल्याड दिवस आहे की रात्र सुरु झाली आहे ह्याची कोणतीही निशाणी आत आपल्याला स्पर्श देखील करीत  नाही. बाहेर सूर्य डुबून जावा, सर्व दिशांना हलका सोनेरी प्रकाश पसरावा, हळुवार सगळा परिसर  काळोखात बुडू लागावा...आणि अशा कातरवेळी आपण घरी असावं. मग आपण दिवे लावू नयेत, घर उजळवू नये...त्या अंगावर पसरत जाणाऱ्या अंधारात आपणही धूसर व्हावं...त्यात हळूहळू नाहीसं व्हावं. आपणच आपल्याला दिसेनासे होतो. मनातले फक्त विचार जाणवतात...पण हातपाय हळूहळू नाहीसे...म्हणजे आपण असून नसल्यासारखे. हे असं स्वप्न देखील किती महाग. कधीही पैशाची चिंता भासू नये ह्या भीतीमागे ते स्वप्न दडून बसलेलं. पण त्या दिवशी मला कधी नव्हे ते देवाने लवकर घरी पाठवलं होतं. त्याला बरं सगळं माहित असतं ! काहीही न करता मी बसून राहिले होते. खिडकीत. सतत काहीतरी करतच राहिले पाहिजे हा विचार आता मी माझ्यापासून जाणूनबुजून दूर ठेवू लागले आहे. काहीही न करता पाय पसरून बसावयास मिळणे हे फार महाग झाले आहे...त्यामुळे हे घडले असावे. तितक्यात दरवाजात किल्ली फिरल्याचा आवाज झाला. दार उघडून आई आत आली. आली आणि मटकन समोरच्या सोफ्यावर बसली. लगेच उठली आणि आत गेली. परत बाहेर. वयोमानापरत्वे ती आता थोडी वाकली आहे. संधिवाताचा त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रोज संध्याकाळी थोडा वेळ चालण्याचा व्यायाम करून ती घरी परतते. मला आधी वाटले, नेहेमीसारखी आई फिरून आलेली आहे. तरतर चालत दाराकडे गेली. दार उघडून बाहेर निघाली. हे थोडं काहीतरी विचित्रच चालू होतं.
"आई, कुठे चाललीस ?" मी उठून विचारलं. सगळ्यांनाच अंधारात बसायला आवडत नाही. आणि लक्ष्मी येण्याच्या वेळी अंधारात बसायला तशीही मला भीतीच वाटते. उगाच तेव्हढंच कारण मनाशी धरून लक्ष्मी, माझ्या घरात शिरायची नाही. मी दिवे लावले.
"आई, अगं आत्ताच आलीस ना फिरून ? मग परत कुठे निघालीस ?" आई काही बोलेना. कावरीबावरी.
"काय झालंय आई ?" काहीतरी विचित्र घडलं होतं. मी दारात तिच्या पुढ्यात उभी राहिले. ती मागे फिरली. पुन्हा सोफ्यावर बसली.
"अगं, ती माणसं मला म्हणाली की ते पोलीस आहेत."
आता परिस्थितीचं गांभीर्य अंगावर येऊ लागलं.
"काय झालंय ? कोण म्हणालं तुला ते पोलीस आहेत म्हणून ?"
"अगं, ते म्हणाले की इथे चोर फिरत असतात आणि म्हाताऱ्या माणसांना लुबाडतात..."
"मग ?"
"ते मला म्हणाले की अंगावरचे दागिने काढून द्या...ते नीट माझ्या पिशवीत टाकतील...नाहीतर हे चोर लुबाडतील. मी त्यांना म्हटलं की माझं घर इथेच आहे...मी आता दोन मिनिटांत घरी पोचेन...""
मी काहीच बोलू शकले नाही.
"पण तरी ते म्हणाले की तुम्हांला कळणार पण नाही ते कधी हात मारतील....द्या तुम्ही आमच्याकडे...मी तुमच्या पर्समध्येच टाकेन...अगं, मग मी काढली गळ्यातली सोन्याची माळ...त्यांनी ती घेतली आणि मला म्हणाले की बघा आम्ही तुमच्या पिशवीत टाकतोय...पण नाहीये ग माझ्या पिशवीत."
"आई..."
"म्हणून मी परत जाऊन बघत होते...कुठे पडली का म्हणून..."
"ठीक...मी कपडे बदलते...आपण पोलीस स्टेशनला जाऊ."
"पोलीस स्टेशनला जायला लागेल ?"
"मग काय करणार आपण आई ?"
"त्यांचा फोटो असलेलं कार्ड पण दाखवलं गं त्यांनी मला..."
मी कपडे बदलून आले...आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. जेष्ठ नागरिक म्हणून पोलीस बरे वागले. बसायला वगैरे जागा दिली.
"काय झालं ?"
मी सांगायला सुरुवात केली.
"अहो...ह्या आपल्या परिसरात अशा खूप केसेस ऐकू यायला लागल्यात..." अनुभवी पोलीस म्हणाले.
दोन तीन पोलीस जमले. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले.
"काय झालं ?"
मी पुन्हा सगळं सांगितलं. आई बाजूला बसली होती. गळा ओकाबोका.
अधिकाऱ्यांनी कनिष्ठांना हुकूम दिला. आईशी बोलून घटनाक्रम लिहून घेण्याचा.
आईसमोर एक पोलीस उभी जाड वही घेऊन बसला. आईला प्रश्र्न विचारण्यास सुरुवात केली. आईने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसाने लिहून घेतला.
आईला त्या तीन माणसांनी सांगितले की आमच्या परिसरात चोर मोकाट सुटले आहेत. ते कधीही तिच्या सोन्याच्या माळेवर हात मारू शकतात. तेव्हा तिने ती काढून त्यांच्या हाती द्यावी, ते लगेच ती माळ तिच्याच पर्स मध्ये टाकतील. म्हणून तिने तसे केले. त्यांनी तिची पर्स हातात घेतली, उघडली परंतु, ते गेल्यानंतर तिने बघितले तर पर्समध्ये तिची बोरमाळ नव्हती.
"किती किंमतीची होती तुमची माळ ?"
आई कावरीबावरी झाली.
"आई, ते विचारतायत किती किंमतीची होती माळ."
"हो. कळलं ते मला. ऐकलंय मी."
पोलीस वहीतली मान उचलून आईकडे बघत बसले होते.
"आता जवळपास छत्तीस चाळीस हजारांपर्यंत असेल ती माळ....मी घेतली तेव्हाच ती........."
आई पुढे काय बोलली मला ऐकू नाही आलं. पोलीस माझ्याकडे बघत राहिला. मी आईकडे.
"आई, एव्हढी महाग होती ती माळ ?"
"असणार ना गं..."
पोलिसाचे लिखाण संपल्यावर वरच्या मजल्यावर आम्हांला नेण्यात आले. आईसमोर प्रचंड वजनाच्या जाडजूड चार ते पाच वह्या ठेवण्यात आल्या.
"आजी, ह्यात बघा...फोटो आहेत...कोणाची ओळख पटते का बघा." पोलिसाने आईला सांगितले.
गोंधळलेली आई. मी वहीची पानं पलटत होते...आई एखाददुसऱ्या फोटोकडे बघून अधेमध्ये मान डोलावत होती. त्यावर बाजूला बसलेले पोलीस चर्चा करत होते...हा सध्या ह्या परिसरात आहे...हा मालाडला दिसला होता...वगैरे वगैरे. एक तास तिथे घालवल्यावर आम्ही तिथून निघालो.
"कदाचित तुम्हांला उद्या आमच्या क्रॉफर्ड मार्केटच्या ठाण्यात यावे लागेल. ओळखपरेडसाठी. आम्ही तुमच्यासाठी जीप पाठवू."
तसे काही झाले नाही. आणि मग बरेच महिने उलटले.

परवा आमच्या पोलीस स्टेशनने एक कागद घरी आणून दिला. मजकूर हा असा...
आपण या पोलीस ठाण्यास तीन अनोळखी इसमांविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या संदर्भात आपणांस असे कळवण्यात येते आहे की, पुराव्या अभावी सदर प्रकरणावरील कारवाई तात्पुरती बंद करण्यात आली आहे. व 'गुन्हा खरा परंतु शोध न लागलेला' असे त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. पुढील कोणत्याही तारखेस तपासाचे काम पुन्हा सुरु केल्यास आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल.
सदरहू गुन्ह्याची मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ५ वे न्यायालय, मुंबई यांचे न्यायालयात कोर्ट केस क्र. ११००/अ/११, दि. १६/०५/११ अन्वये 'अ' समरी मंजूर झालेली आहे.

मंगळसूत्र काढून ठेवल्यापासून गेली नऊ वर्ष गळ्यात ती बोर माळ घालत होती. वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून नोकरी करणारी माझी आई. आधी भावांना घर चालवण्यासाठी मदत म्हणून. आणि नंतर स्वत:च्या संसाराचा वाढता डोलारा सांभाळण्यासाठी. आम्हां तिघी बहिणींची तयारी करून धावतपळत ट्रेन पकडून ते मस्टर सांभाळण्याची ती तिची सकाळची जीवतोड धांदल आणि संध्याकाळी पुन्हा ताजं जेवण, ताज्या चपात्या आमच्या ताटात वाढण्याची तिची ती कसरत. काहींचं आयुष्य धकाधकीचं लिहिलेलं असतं. माझ्या मध्यमवर्गीय आईच्या घामाच्या चकाकत्या मण्यांची ती बोरमाळ. म्हणतात शत्रूचे देखील वाईट चिंतू नये. परंतु, स्वर्गात ज्यावेळी देव हृदयाचे वाटप करत होता त्यावेळी मी पतंग उडवत होते. त्यामुळे माझ्याकडे इतके विशाल हृदय नाही. आणि शरीरात किडे पडणे म्हणजे काय हे माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले आहे. तसाच काहीसा शाप मी त्या चोरांना देते.
इतकी वर्ष आई ती बोरमाळ गळ्यात घालून वावरत होती. पण मला त्याची किंमत माहिती नव्हती. आईला माहित होती. परंतु, सद्य परिस्थितीत घराच्या बाहेर पाऊल टाकले की वाढलेला धोका अजून तिच्या लक्षात नव्हता आला. आणि त्या अज्ञानामुळे ती त्या चोरांच्या तावडीत सापडली. त्यांनी नक्की हिच्यावर बरेच दिवस पाळत ठेवली असावी. तिच्या गळ्यातील माळेची किंमत मला नव्हती परंतु, त्यांनी मात्र ती बरोब्बर हेरली होती. एक तर पोलिसांच्या वरचढ चोर आहेत...वा पोलिसांना त्यांचे मोल दिले गेले असावे. त्यामुळे 'तू चोरी कर मी शोध घेतल्यासारखे दाखवतो'....असे काही असू शकते. मनात अशी शंका हमखास येते.

मुंबई सुरक्षित राहिलेली नाही.
खरंय.
वर्तमानपत्रात जेष्ठ नागरिकांच्या खुनाच्या रोज इतक्या बातम्या वाचत असतो. तरीही अक्कल आली नाही ?
नाही आली.
म्हाताऱ्या बाईने इतका महागडा दागिना रोज अंगावर बाळगावाच का ?
चूक झाली.
पुन्हापुन्हां जाऊन त्या पोलीस ठाण्यात चौकशी केली का ?
नाही.
मग आता आम्हांला का सांगितली जातेय ही गोष्ट ?
उगाच.
वाचकाला काही संदेश द्यावयाचा आहे काय ?
नाही.
का ?
कारण ही काही इसापनीतीची गोष्ट नाही !
मग काय आहे ?
ही बदलत्या मुंबईची कहाणी आहे. 
इथे माणुसकीची पणती विझलेली आहे. 
'फास्ट मनी'चा झगमगता अनार गगनाला भिडला आहे.

नशीब म्हणायचं, आईचा जीव नाही गेला.

Wednesday 19 October 2011

काकदृष्टी...

तो एक कावळा होता. आणि त्या दिवशी तो माझ्या आयुष्यात आला होता. खिडकीवर बसला होता. दिवाणखान्याची लांबसडक खिडकी. जशी कावळ्याची लांबसडक शेपटी ? ती काळी तर माझी खिडकी तपकिरी. लाकडी. मी माझ्या लाडक्या भारतीय बैठकीवर पाय पसरून बसले होते. हातात कॉफीचा मग घेऊन. सकाळचे आठ वाजत आले होते. दिवस आठवड्याचा होता. मान मोडून काम करण्याचा.

कावळ्याने माझ्याकडे बघितले तिरक्या मानेने. आमची नजरानजर झाली. अचानक त्याने आपली चोच पंखांत खुपसली. एकदा दोनदा तीनदा. मान वर खाली. खांदा टोचून टोचून काढला. डावा पंख टोचून झाला. मग मान उजवीकडे. तसेच जोरकसतेने उजव्या खांद्याला टोचून झाले. उजवा पंख विस्कटून झाला. मध्येच माझ्याकडे नजर टाकली. मी बघते आहे की नाही ह्याची त्याने खात्री करून घेतली. आता डाव्या पायाचा कुंचला केला गेला. नखांचा. अणकुचीदार कुंचला. कान, मान. पंख विस्फारून झाले. नखांचा तो कुंचला त्याने आपल्या पंखांवरून फिरवला. मोठ्या तोऱ्यात. खास रुबाबात. खसखस खसखस. उजवा पंख आणि मग डावा पंख. खसखस खसखस. अधूनमधून माझ्या अस्तित्वाची जाणीव. म्हणजे असं नाही म्हणू शकत की मी त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्याला चांगली जाणीव होती...मी त्याला न्याहाळत होते. त्याने माझ्याकडे बघितले की मी हलकेच हसत देखील होते. त्याचा कुंचला चांगलाच उपयुक्त दिसत होता. पूर्ण शरीरभर उजव्या पायाचा व डाव्या पायाचा कुंचला फिरवून त्याने आपले अंग साफसूफ करून घेतले. मग कुंचला चोचीवर फिरवला. चोच साफ झाली. त्याने मान वेळावली. माझ्याकडे बघितले.

त्याच्या त्या नजरेतून अकस्मात माझ्या नजरेसमोर काही वेगळेच आले. चक्र चित्रपटातील स्मिता पाटील. तिची ती उघड्यावरील अंघोळ. हे असेच काहीसे दृश्य होते. 'तो' समोर बसून 'तिला' न्याहाळत होता. तिला काही गत्यंतर नव्हते. जर अंघोळ करणे गरजेचे तर ती लालचावलेली नजर सहन करणे भाग. सर्वच अगदी न टाळता येण्याजोगे. 

माझ्याकडे नजर टाकत मनसोक्त आनंद लुटत केलेली...कावळ्याची ती कोरडी अंघोळ. समजा ती कावळी असेल...मग तरीही तिने हे असे केले असते ? माझ्या मनात उगाच आले...तसेही माझ्या मनात कधीही काहीही येऊ शकते.

कळले नाही...हे जे घडले ते कावळ्याला आनंद देऊन गेले...की मला ?

"आई, काय तू त्या कावळ्याकडे बघत बसलेयस ?"
"अगं, तो बघ ना किती तन्मयतेने त्याचं अंग स्वच्छ करतोय ! उगाच आपण म्हणतो...कावळ्याची अंघोळ ! चांगली तब्बल दहा मिनिटं चाललेय त्याची साफसफाई !"
"तू उगाच कौतुकाने बघत बसू नकोस ! इथे खाली माझ्या अंगावर त्याची पिसं पडतायत !" लेक ओरडली. ती त्या खिडकीखाली तिचा चहा पीत बसली होती.
"अगं ! अशी काय ? मी खरं तर ते रेकोर्ड करणार होते ! पण जर मी कॅमेरा आणायला उठले तर तो उडून जाईल ना...म्हणून एकदम शांत बसलेय !"
पण तिचा चिडका आवाज ऐकून माझा कावळा उडून गेला !

जशी स्मिता पाटील ओलेती उठून चालू पडली व तिच्या मागोमाग तोही उठला तशी मीही मग माझा रिकामा कॉफी मग घेऊन उठले.
माझी अंघोळ पहाटेच आटोपलेली होती.
आणि ह्या अंघोळ दर्शनात उशीर झाला होता.
चाकरमानी मी. घाईघाईत ऑफिसच्या तयारीला लागले.

Thursday 13 October 2011

माणूस आई

आदर्श ह्या शिक्क्याचा हव्यास मी कधीही धरला नाही. त्यामुळे आदर्श आई होण्याच्या चढाओढीत कधी शिरले नाही. 'माणूस आई' होण्याचा प्रयत्न केला. चुकत माकत.

परवा एका घरी गेले होते. त्यातील वडीलधारी बाई दिवाणखान्यात बसलेल्या होत्या. ओळख तर खूप जुनी. अगदी पंधरा वीस वर्षांची. काळोख पडत चालला होता. घरी परत निघायचे होते. त्यांच्या सुनेशी, म्हणजेच माझ्या बालपणीच्या मैत्रिणीशी गप्पाटप्पा आवरणे भाग होते.
"आई, मी निघते." खाली वाकून पाया पडत मी म्हटले.
"निघालीस ?...पण आता मला काय माहित तुझ्या मनात काय आहे...? कसली स्वप्न आहेत... ? मग मी काय आशीर्वाद देऊ तुला ?" त्या उद्गारल्या.
वयोमानाप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती तशी थोडी अधू झाल्यासारखे आधीच्या संभाषणात जाणवले होते.
मी उभी राहिले. त्यांच्याकडे बघितलं तर त्या कुठे बाहेर बघत होत्या.
मागील भिंतीला टेकत म्हटले..."आई, मला एक लेक आहे...आठवते का तुम्हांला ती ?"
"हो हो...म्हणजे काय...? आठवते ना मला ती."
"मग झालं तर...आयुष्यात ती सुखी होईल...तिचं सगळं छानच होईल...असा आशीर्वाद द्या मला...त्यातच सगळं येईल...नाही का...?"
"हो हो...ते बरोबर बोललीस बाई...तसाच देते हो आशीर्वाद..." आई म्हणाल्या.

आज जुनं 'मोलकरीण' सिनेमातील गाणं आठवलं...१९६३ सालचा कृष्ण धवल चित्रपट. त्यातील आई ही तर देव आई...
त्या देव आईच्या पायाच्या नखाशी देखील माझी तुलना होऊ शकत नाही.
...आई बनता बनता हजार चुका केल्या...कधी कळत. कधी नकळत.
माझं एकविसाव्या शतकातील आईचं मन...
...पण आईचंच ते मन...
आशीर्वाद...मागणे...साकडं...मी आणि काय दुसरं मागणार त्या देवापुढे...?
:)

Tuesday 11 October 2011

स्टिफ जॉब्स...

"स्टीव्ह जॉब्सने म्हटलंय की आयुष्यात नेहेमी ज्यात आपल्याला आनंद मिळतो असंच काम करावं..."
"स्टीव्ह जॉब्सने ! अगं ! हे मी नेहेमी नाही का सांगत असते तुला ?!"
"काय सांगत असतेस ?!"
"की माझं किती नशीब आहे की मला जे काम आवडतं त्यातच मी पैसे कमवू शकते. तसंच तू देखील त्याच दिशेने चाललीयस! तुला आवडणाऱ्या विषयात तू पैसे कमावणार आहेस ! मी नेहेमी हेच तर म्हणते !" 
मी एकदम तावातावाने...जसं कोणी माझ्या विचारांचं पेटंटच चोरू पहात होतं.
"आणि, जेव्हा आपल्याला आवडीचं काम करण्याची संधी मिळते तेव्हा मग आपण त्यावर अधिक मेहेनत घेतो आणि मग यश येतं...मागोमाग !"
"हम्म्म्म...!" मॅकबुकमध्ये नाक खुपसत लेक. "स्टीव्ह जॉब्स म्हणालाय हे !"

मला माहित नव्हतं...माझी बापडीची स्पर्धा स्टीव्ह जॉब्सशी होती !
:)

Saturday 8 October 2011

१० बाय १० = ०

जसजसे मुंबईचे आकाश उंच इमारतींनी भरू लागले आहे तसतशी माणसांमधील नाती ही पाताळाच्या दिशेने वाहत चालल्यासारखी वाटू लागली आहेत. कदाचित त्यातील घट्टपणा कमी होऊन ती पातळ झाली असावीत व निसर्गाच्या नियमानुसार त्याचा ओघ उतरणीला लागला असावा.

मुंबईचा पुनर्विकास सुरु झाला. एकेक चाळ, एकेक इमारत...सगळे त्यात सहभागी झाले. बिल्डर जे काही अवाढव्य भाव त्या जागांसाठी देऊ करत आहेत त्या धक्याने कोणी कोणाचे न उरले. एक समज होता...नाती इतकी घट्ट की आम्हांला कायद्याची काय गरज. पण आता चित्र अगदी उलट. जसे एखादे पान पलटावे आणि पुढील पानावर काही भलतेच निघावे....दुसऱ्याच कुठल्या अनोळखी पुस्तकाचे पान बांधणीत यावे. आता नाती जपण्यासाठी कायद्याची मदत घ्या...त्याचा एक कागद तयार  ठेवा.
अथवा, कोण कोणाचा भाऊ व कोण कोणाची बहिण. मी ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्याच पोटी ही माझी इतर भावंडे का बरे आली...आली ती आली परंतु, जन्माला येताच आईने त्यांच्या नरड्याला नख का बरे लावले नाही...असे काही विचार मला कधी थोरल्या भावाच्या चेहेऱ्यावर दिसतात तर कधी आता झाले की जगून ह्यांचे...अजून का बरे हे म्हातारडे भाऊ जिवंत आहेत असा आसुरी प्रश्र्न कधी धाकट्याच्या मस्तकात घोळताना मला दिसला.

...आणि मी...मी का बरे ह्या माणसांच्या संपर्कात येते ? काय ह्याला नशीब म्हणायचे ?

माझी 'वाशा' ह्या वर्षाच्या सुरुवातीला वारली. वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी. माझ्या घरी ती घरकामाला होती. पण ती होती म्हणून हे घर सुंदर, टापटीप व दृष्ट लागण्याजोगे दिसत असे. तिला तीन भाऊ. हिचा नंबर तिसरा. हे कुटुंब आमच्या घराखालील वाडीत रहात असे. दहा बाय दहाच्या खोलीत. धाकटा भाऊ जन्माला आल्यानंतर थोड्याच दिवसात ह्या मुलांची आई निर्वतली. मग ह्या मुलांनीच आपल्या चिमुकल्या भावाला सांभाळले. गावी थोडीफार जमीन. पुढे, ह्या जमिनीची देखभाल करावयास मोठा भाऊ गावी निघून गेला. त्यापाठचा भाऊ बोरिवलीला राहू लागला. वाशाचा प्रेमविवाह गल्लीतीलच एका दारुड्याशी झाला. लग्नानंतर आई होण्याचे तिचे स्वप्न अवेळी झालेल्या गर्भपाताने सहा वेळा मोडले. मग सातव्या वेळी तिला तिसऱ्या महिन्यापासून इस्पितळात भरती केले व आमोदचा जन्म झाला. कालांतराने तिचा नवरा दारू पिऊन वारला. काही वर्षांत अति रक्तदाबामुळे वाशाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. हिंदुजातील आठवड्यातून तीनदा चालू केलेले डायलिसीस तिला नाही वाचवू शकले. मग तीही वारली. आता ?

मागे राहिला आठ वर्षांचा आमोद. वाशाचे तीन भाऊ. एक गावी. एक बोरिवलीला. आणि धाकटा दादरला. आणि अर्थात अजून एक महत्त्वाची गोष्ट शिल्लक राहिली. 
दादरची दहा बाय दहाची खोली.

त्या दहा बाय दहाच्या खोलीने नाती पातळ केली.

सगळी वाडी
पुनर्विकासाला आली. बिल्डर + म्हाडा. 'जागेत रहाणारा' ह्या नात्याने बिल्डरने धाकट्याला दुसरी जागा बघून दिली. नवीन इमारत तयार होईस्तोवर बिल्डर ह्या जागेचे भाडे भरेल. ते भाडे आजच्या घटकेला वीस हजार रुपये. त्यापुढे थोड्याफार फरकाने ते वाढते राहील.

काही दिवसांपूर्वी, गावी रहाणारा
वाशाचा मोठा भाऊ माझ्या दारी उभा राहिला. दोन प्रश्र्न घेऊन. पहिला प्रश्र्न...सर्व भाडे धाकटा भाऊ एकटाच घेत आहे. त्याहूनही मोठा असा दुसरा प्रश्र्न, भाड्याच्या झोपडीऐवजी ज्यावेळी नवीन इमारतीत मालकी हक्काची जागा मिळेल ती कोणाच्या नावे असेल ?

ही पूर्ण वाडी व माझे आईबाबा ज्या इमारतीत भाड्याने रहात असत ती इमारत, ह्या दोन्ही गोष्टी सलग असल्याकारणाने एकाच बिल्डरने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे वाशाच्या घराचे कागदपत्र डोळ्याखालून घालणे फारसे कठीण नव्हते.
तेव्हा लक्षात आले ते असे...त्या खोलीवर पूर्वी मालक म्हणून कोणा एकाचे नाव होते व सध्या भोगवटीनुसार (रहाणार म्हणून) नाव फक्त वाश्याच्या धाकट्या भावाचे होते. कारण एक म्हणजे तो तिथे रहात होता (भोगवट) व दुसरे म्हणजे त्याने आपल्या भावंडांची नावे, वारसाहक्काने आलेल्या संपत्तीवर टाकण्याची तसदी हेतुपुरस्सर घेतली नव्हती.

आता ? आता मी दुर्लक्ष करावे की अजाण व आईबाप नसलेल्या आठ वर्षांच्या आमोदची आत्ताच काळजी घ्यावी ?
मी आमोदला वाऱ्यावर सोडणार नाही ह्या विश्वासावर वाशाने मृत्यूचे भय कधी बाळगले नव्हते.
 

मी धाकट्या भावाला फोन लावला. त्याला संशयाचा फायदा (benefit of doubt) देणे गरजेचे. मी गृहीत धरून चालू शकत नव्हते की हे सर्व त्याने मुद्दाम केले आहे. ते त्याच्याशी बोलून ठरवणे महत्त्वाचे.
"दामू, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. कधी येऊ शकशील?"
"येतो, आजच दुपारी येतो."
"ठीक."
दामू दुपारी दारात उभा राहिला त्यावेळी तो एकटा नव्हता. बरोबर त्याची पत्नी व एकुलती एक
पदवीधर लेक होती.

संभाषण सुरु झाले. ते थोडक्यात असे...
"दामू, आजच्या घटकेला तुला बिल्डरने भाड्याने जागा घेऊन दिलेली आहे. त्याचे महिना वीस हजार रुपये तो देत आहे."
"हो."
"तुझ्या ह्या जागेचे कागद मी बघितले तर त्यावर तुझ्या मोठ्या दोन भावांची व वाशाचे नाव नाही."
"माझ्याकडे त्यांच्या सहीचा कागद आहे."
"हो ? काय बरे आहे तो कागद ?"
"आमच्या झोपडीच्या
पुनर्विकासाला त्यांची परवानगी आहे अशी ती एनओसी आहे."
"हो का ? छान
छान. परंतु, मी ते नाही विचारत आहे. त्या जागेसंदर्भातील मालकीचे जे कागद बिल्डरकडे आहेत त्यावर ह्या तुझ्या भावंडांची नावे नाहीत."
"आहेत ना !"
"दामू, त्याच प्रकारचा
आमच्या जागेसंदर्भातील जो कागद त्याच बिल्डरकडे आहे, त्यावर प्रथम आमच्या आईचे व त्याखालोखाल आम्हां तिघी बहिणींची नावे आहेत. त्यामुळे आता जी नवी इमारत उभी राहील त्यातील आमच्या मालकीची जी जागा असेल त्यावर आम्हा चौघींची नावे असतील."
आता दामूची पत्नी....
"आम्ही ह्यांच्या वडिलांचे किती केले...आजारपणात आम्हीच त्यांच्याबरोबर होतो..." वगैरे वगैरे...
"मी वडिलांना बघितले..मी तर एकटा होतो त्यांच्यासोबत...तेव्हा हे भाऊ कुठे होते ? कोणी आलं होतं का त्यांना बघायला...? वडिलांना बघायला लागायचे म्हणून मी तिथेच राहिलो." दामू.
"कधी गेले तुझे वडील ?" मी विचारले. "त्यावेळी तू किती वर्षांचा होतास ?"
"वीस."
"आज किती वर्षांचा आहेस ?"
"त्रेचाळीस."
"म्हणजे तेवीस वर्षे झाली तुझ्या डोक्यावरील वडिलांची जबाबदारी संपुष्टात येऊन. "
"नाही.
नाही. मी त्यावेळी तीस वर्षांचा होतो."
"ठीक. म्हणजे तुझ्या एकट्यावर पडलेली वडिलांची जबाबदारी संपून तेरा वर्षे झाली. मग जर तू केवळ त्यांच्यासाठी म्हणून ह्या दादरच्या घरात रहात होतास व नाहीतर तशी तुझी इच्छा मुळीच नव्हती तर तू त्यानंतर दुसरी जागा स्वखर्चाने घेऊन येथून निघून का बरे नाही गेलास ?"
"अरे ! मी कशाला जाऊ ?" दामू.
"म्हणजेच दामू, ह्या जागेचा तुला फायदा होत होता आणि म्हणून तू इथेच राहिलास असे नव्हे काय ?"
"काय शब्द वापरता तुम्हीं ? फायदा काय त्यात ? मी एकटा काळजी घ्यायचो ह्या घराची...त्यांना काय माहित ? पत्रे टाकले मी एकदा....घर गळत होतं म्हणून...त्याचे पैसे काय त्यांनी दिले...? मीच भरले ना ?"
"त्या घरात तू रहात होतास...घर गळत होतं...मग त्यावर स्वखर्चाने तू पत्रे टाकलेस ह्यात चुकीचे काय ? काय नाहीतर तू गळक्या घरात राहू शकत होतास ?"
बायकोची मान गर्रकन फिरली. लेक रागारागात खिडकीबाहेर बघू लागली.
"दामू, हे घर तुला वारसा हक्काने मिळालेलं आहे व त्यामुळे त्यावर तुझ्या भावंडांचा समान हक्क आहे. मला तुला फक्त इतकेच सांगायचे आहे. वाशाचे मृत्युपत्र आहे. त्यामुळे त्या घरावर आमोदचे नाव देखील पडायला हवे."
"म्हणजे तुम्हांला काय वाटतं...मी मामा आहे त्याचा...मी काय त्याला वाऱ्यावर सोडणार आहे ? मी घेणारच आहे त्याची काळजी." दामू.
"मला आनंदच वाटतो दामू तुझे हे बोलणे ऐकून. व तुझ्या ह्या भावनेवर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त ह्याच तुझ्या भावनेला अधिक बळ देण्यासाठी असा एक कागद तुझ्या सहीचा हवा ज्यात त्या सगळ्यांचे हक्क तू मान्य केलेले असतील."
"आम्ही अजिबात त्यांची नावं टाकणार नाही !" बायको.
"मला वाटतं मी दामूशी बोलते आहे. त्यामुळे तू शांत बसलीस तरी देखील चालू शकेल." मी.
"असं कसं ? अहो, तुम्हांला काहीही माहित नाही ! वाशा रडायची हो आमच्याकडे येऊन ! सासू छळते...घरात त्रास देतात म्हणून...आता तीच लोकं तुम्हांला येऊन काहीबाही सांगतात...व तुम्हीं विश्वास ठेवता ? आम्ही अजिबात त्यांची नाव टाकणार नाही !"
"दामू...?" मी.
"अहो आम्ही त्यांची नाव टाकली की ज्यावेळी जागा तयार होईल त्यावेळी ते ती विकायला निघतील ! मग आम्हीं कुठे जाऊ ?"
"कुठे जाऊ म्हणजे ? अरे, त्यात तुझाही चवथा हिस्सा असेल नाही का ? त्यात तू तुझी मालकी हक्काची दुसरी जागा घे."
"आम्हीं अजिबात असं करणार नाही...बाबांची तिथे घराण्याची देवी आहे ! व बाबांना तिची पूजा करण्यासाठी तिथेच रहायची गरज आहे !" दामूची लेक.
"तीन मोठी माणसे बोलत असताना तुला त्यात बोलायची गरज आहे असे मला नाही वाटत." मी.
"मी का नको बोलू ? आम्हीं त्यांची नावे टाकणार नाही !" पदवीधर लेक.
...पंधरावीस मिनिटे अशीच चर्चा...
"जागा ताब्यात मिळाली की, त्यांनी जागा विकावी...व आलेल्या पैश्यात मला दादरमध्ये जागा घेऊन द्यावी. उरलेले पैसे त्यांनी आपापसात वाटून घ्यावेत. मी दादर सोडून कुठेही जाणार नाही." दामू म्हणाला.
"दामू, तुला हे तर मान्य आहे ना...की ही जागा वारसा हक्काने आल्याकारणाने त्यावर तुम्हां चौघांचा समान हक्क आहे ?"
"हो ! ते मी नाही म्हणतच नाही आहे !"
"मग तसे असताना विकून आलेल्या जागेच्या रकमेचा 'मोठा हिस्सा' तुला देण्यात यावा असे तुला का बरे वाटते आहे ?"
"आम्हीं दादर सोडणार नाही !" कुटुंबात एकमत.
"असो. त्यांचा हक्क तर तुला मान्य आहे ना दामू...मग ठीक आहे. तसा कायदेशीर कागद आपण तयार करू. आणि मग पुढलं पुढे बघू....ठीक ?"
आवाज थोडेफार चढले होते.
मध्यम उंचीचा
दामू, केसांच्या झिपऱ्या कपाळावर पुढे घेणारा. अस्सल मुंबईकर. त्या भावांमधील दारू पिणारा असा हा एकमेव. आईने दामूला जन्म दिला व वारली. त्यामुळे दामूला ह्या भावंडांनी लहानाचे मोठे केलेले. वाशाचा सर्वात लाडका भाऊ. बायको तंग कुर्ता व सलवार घातलेली. जाडसर. कन्या चेहेऱ्यावर उद्दाम भाव. वाडीत राहून शिकली खरी परंतु, त्या शिक्षणाने काय मन मोठे झाले ? नाही. ते संकुचित झाले...मी शिकले ह्याचा अहं त्या मनात शिरला. शिक्षणाने विनय, नम्रता, लाघव...हे नाही दिले. ज्या घरात दामूची लेक सून म्हणून जाईल त्या घराची मी उगाच काळजी करते.

ताडकन दामू उठला...बायको तिरीमिरीत उठली...नाकीडोळी नीटस लेक चेहेऱ्यावर मग्रुरी नाचवत ठसक्यात दाराकडे निघाली.

मी ? मी विचारात पडते...खरं तर सरळ साधी गोष्ट...
वाढत्या मुंबईतील हे एक छोटेखानी कुटुंब. १० बाय १० खोलीतच वाढलेले. त्यावेळी ही चार मुले व त्यांचा बाप..असे एकत्र रहात होते. तसेच तिथेच लहानाचे मोठे झाले. आज घटकेला बिल्डर त्यांना इमारत तयार झाली की ३०० स्के. फूट जागा देणार आहे. त्यांच्या मालकी हक्काची जागा त्यांना मिळेल. पण आता त्यात गुण्या गोविंदाने रहायला कोण ? कोणीही नाही.

केवळ एक कीड, सुग्रास जेवण फुकट घालवते.

"बाळा, जे आपले हक्काचे आहे ना तेव्हढेच आपले...दुसऱ्याच्या वस्तूचा कधीही मोह ठेवू नये. भावंडं असलं तरीही." मी लेकीला सांगते.
"आता मी काय केलं ?" ती विचारते.
"तू काही नाही ग केलंस...पण मी आपली सांगतेय तुला..."

भावंड आहे म्हणून जे त्याचे आहे ते मी ओरबाडून घेऊ ? माझ्या नशिबाला जबरदस्तीने जोडू ?

मुंबईतील घरांचा चढता भाव...व त्याच वेगात खाली घसरत चाललेली नाती. 
एक विचित्र आलेख माझ्या नजरेसमोर चमकला.

कायद्याचा
एक कागद...व त्यावर लिहिलेले वाशाच्या आमोदचे भविष्य.

पुन्हा एकदा मला वकिलाची गरज पडणार आहे.

कुठे तरी माझ्या मनात हे डोकावतंच...
घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं.

Thursday 6 October 2011

"You made my day !"

त्यांचं व्यसन सुटून वीस वर्षे उलटून गेली. पण त्यांच्या तंत्राचा आज मला उपयोग झाला.

आमच्या कचेरीत एका कोपऱ्यात ट्रेड मिल आहे. जर सव्वा नऊच्या आसपास पोचलं तर अजून मासळीबाजार सुरु झालेला नसतो. मग बऱ्यापैकी एकांत मिळतो. मी रात्रीच सुयोग्य शूज बॅगेत टाकले होते. सकाळी धावतपळत एकदाचे त्या चलपट्टीवर चालणे सुरु केले. जवळपास दीड वर्षानंतर. वीस मिनिटे थोडा घाम गाळून झाला...थोडी चरबी वितळवून झाली. त्या खोलीतून बाहेर आले तर आमचे जोशी स्थानापन्न झालेले दिसले.
"अहो, अजून आता किती बारीक व्हायचंय ?" गुटख्याने फुगलेल्या तोंडाने जड प्रश्र्न त्यांनी मला विचारला.
"जोशीबुवा ! सक्काळी सक्काळी काय ते तोंडात भरून ठेवलंयत ! जा आधी ! फेकून या पाहू !"
तोंडाचा चंबू सांभाळत जोशी उठले. तोंड रिकामं करून आले.
"बुवा, लेकीसाठी सोडणार होतात ना ? काय झालं त्याचं?"
"हम्म्म्म"
"हम्म्म्म काय बोडक्याचं ? तुम्हांला मी सांगितलं ना त्या दिवशी ? आपल्या जे जेच्या सरांचं काय झालं ते ? गुटखा खाऊन खाऊन शेवटी कर्करोग झाला...गेले तेव्हा तोंडाला एक मोठ्ठं भोक पडलं होतं !"
"हो...माहितेय मला....."
"माहित असून उपयोग काय त्याचा ? असं तोंडाला भोक घेऊन मरायचंय का ?"
हसले जोशी...हलकेच.
"तुम्हांला मी एक सांगू का ?"
प्रश्र्नचिन्ह.
"माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. बरं का ? त्यांना प्रचंड व्यसन होतं...सिगरेटीचं. दिवसाला चाळीस सिगारेटी ओढायचे ते...चाळीस !"
भुवया आणि चष्मा थोडा वर.
"त्यांनी काय केलं माहितेय का ?  सिगारेट सोडायची हे मनाशी ठरवल्यानंतर जेव्हा त्यांना पहिली तल्लफ आली ना सिगरेटीची...तेव्हा ते मनाशी फक्त इतकेच म्हणाले...थोड्या वेळाने...मग थोडा वेळ गेला...पुन्हा तल्लफ आली...विचार केला...थोड्या वेळाने...असं करता करता तो दिवस उलटला...सिगारेट न ओढता...मग दुसरा दिवस उजाडला. त्यावेळी त्यांनी विचार केला...अरे...काल तर मी सिगारेट ओढली नाही आणि तरी माझा दिवस नीट पार पडला की...मग चला...आजही बघू...आणि असं करत करत तो उलटून टाकलेला क्षण परत कधीही आला नाही...गेल्या वीस वर्षांत !"
"काय सांगता काय ? बस एव्हढंच ?"
"होssssय !" 
जोरदार होकार दिला मी. आणि जागेवर गेले. दिवस सुरु झाला.
संध्याकाळ झाली. साडे सहा झाले. आमचे ह्या क्षेत्राचे कामकाजाचे घड्याळ जगावेगळेच असते...नेहेमीच.  सगळ्यांचीच कामे भरास आलेली होती. मासळी बाजार घुमत होता.
जोशी हलकेच आले.  माझ्या टेबलापाशी उभे राहिले.
"साडे सहा होत आले." गोबऱ्या गोबऱ्या चेहेऱ्यावर थोडेसे हसू.
"हो ना !"
"मला तीन वाजता खूप तल्लफ आली होती हो...पण मी तेच म्हटलं...थोड्या वेळाने...आणि बघा ना...साडे सहा झाले...पण मी गुटखा अजून तोंडात घेतलेला नाही !"
"अरे व्वा ! काय सांगताय काय ?! मस्त !!! झक्कास की हो जोशीबुवा !"
"होssss" 
खुशीत हसतहसत जोशी आपल्या जागेवर जाऊ लागले.
म्हणजे...
कधी नव्हे ते...
'कल करे सो आज और आज करे सो अभी' ह्या प्रचलित वाक्कप्रचाराच्या अगदी उलट झालं म्हणायचं !
इच्छेवर फक्त एका क्षणाचा विजय मिळवायचा...उगाच सुरवातीलाच गड जिंकायला निघावयाचे नाही...एक क्षण प्रथम...मग आपोआप एक तास...एक दिवस...एक महिना...एक वर्ष...आणि मग वीस वर्ष.

कोणी मला त्यांचा अनुभव सांगितला होता...मी फक्त तो कानोकानी केला.

मगाशी जोशीबुवांना दूरध्वनी केला.
"काय हो ? कसे आहात ?"
"हा हा...बरा आहे...."
"नक्की ?"
"हो हो...आणि उद्या तर दसराच आहे नाही का ? मग आज नाही खाल्ला गुटखा तर दसऱ्याला नाहीच खाणार..." हसत हसत जोशी उद्गारले.
"अगदी अगदी...आज तुम्ही खाल्ला नाहीत आणि दिवस तर उलटला...मग आता उद्याचा पण मस्तपैकी जाईल बघा ! भेटूच परवा !"
बहुधा तरी जोशी म्हणाले असतील...बाई डोक्यावरच बसल्या !
:) 

असो...

मी माझ्या आयुष्यात एकाचं जरी व्यसन सोडवू शकले...'मृत्यूचे कारण - व्यसन' हे जरी टाळू शकले...तरी मी समजेन आयुष्यात काही करू शकले.

"Hey ! Nice dress ya ! Looks new..." 
अपर्णा आज सुंदर कुर्ता घालून आली होती. मोहक दिसत होती.
"Ya...my mom bought it for me..."
"From where ...?" बायकी चौकश्या मी सुरु केल्या.
"I will give you the address." ती तिच्या मोबाईलवर पत्ता व नंबर शोधू लागली. मान त्या मोबाईलमध्ये...अपर्णा मला म्हणाली, "Do you know something...your smile is contagious..."
"Ah ?"
"Ya..whenever I see your smiling face na...I feel like smiling ...even if am not in good mood..."
"Oh ! You made my day ! Now every morning am going to show you my smiling face !"
"Ya...please do that...!"

नशीब....तिला मराठी येत नाही !
अहो...नाही तर वाचली नसती का तिने माझी रडगाणी...
एक दिवसाआड मी इथे गात असते ती ?!
:)

Monday 3 October 2011

धडाड !

"कसं होणार यार आपण मेलो तर ?"
"कोणाचं कसं होणार ?"
"अरे, म्हणजे मी मेलो तर माझ्या मुलीचं कसं होणार ?"
"काsssही होत नाही...सगळं व्यवस्थित होतं...तुम्ही तिची काही आर्थिक गडबड नाही करून ठेवलीत तर सरकेल तिची गाडी पुढे...!"
शांतता....काही क्षण.
"असं म्हणतेस ?"
"मग काय तर...? तेव्हढी काळजी घ्या...बाकी चालून जाईल !"

जोशी, थोडा वेळ उभे राहिले माझ्या टेबलापाशी...खिडकीबाहेर बघत. मग हसले बापडे..."खरं आहे"...असं पुटपुटत वळून लागले चालू. त्यांच्या जागेच्या दिशेने. माझ्याकडे पाठ फिरवून.

रोज सकाळी जोशी लवकरच येतात. बुटके. गोरे. गुटगुटीतच म्हणायचे. नाकावर चष्मा. वय असावे ४७/४८. डोक्यावरचं रान आता हळूहळू विरळ होत चाललं आहे. जमीन उघडी पडू लागली आहे. ठाण्याहून दुचाकी घेऊन येताना तापली उन्हं आता त्रास देऊ लागतील. अर्थात डोक्यावर शिरस्त्राण नाही घातलं तर.
कचेरीतील इतर जागा भरण्याच्या खूप आधी हे येतात. जरा तोंडावर पाणी मारून खुर्चीत स्थानापन्न होतात. आणि मग पुढचा अर्धा तास खास त्यांचा. कोण जाणे कोणाशी...पण रोज नियमित शेयर मार्केटविषयी त्यांची चर्चा सुरु होते. कधी रंगते. कधी विस्कटते. भाव...चढला...भाव...घसरला...घसरगुंडीवर आमचे जोशी अर्धा तास खेळत रहातात. बौद्धिक व्यायाम म्हणायचा का ?
मग थोड्याच वेळात हळूहळू रिकाम्या खुर्च्या भरू लागतात. जोशी रंगलेला खेळ आटोपता घेतात. व समोरील मॅकवर नजर आपटवतात.

हलतडुलत, विजार वर खेचत खुर्चीकडे जाणाऱ्या जोशींच्या पाठीकडे मी बघितले आणि वाटले...कसले कठोर झालोय आपण ! जरा बोलले असते गोडगोड तर नसतं का चाललं ?
म्हणजे...
"अहो, कशाला असं अशुभ बोलताय ? सकाळी सकाळी ? काsssही होणार नाही बघा तुम्हांला ! रग्गड जगाल तुम्ही ! अजून चांगले शंभ्भर वर्ष ! नातवंड...पतवंड खेळवाल मस्त ! !"
मग तेही गेले असते खुशीत जागेवर...दिवसाची सुरुवात छानच झाली अशी मनाची समजूत घातली असती व त्यांनी त्यांचा दिवस पुढे ढकलला असता. नाकावर चष्मा पेलवत.
पण नाही ना ! काही दयामाया नाही !
उगाच....धाडकन सत्य सांगायचं...म्हणजे सांगायचं नाही...खरं तर फेकायचं...सत्य म्हणजे जसा एक तापता तोफगोळा... एकदम म्हणजे टाकायचाच अंगावर !

तोफगोळ्यांचं कोठार अगदी उघडंच पडलंय ! माझ्या डोक्यात !
:)

Saturday 1 October 2011

बिना कुछ खोये....

परवा काळी पिवळी करून कचेरीत जावे लागले. आमच्या एखाद्या लेगोच्या चौरसागत उभ्या असलेल्या इमारतीखाली पोचले व चालकाला भाडे विचारले.
"किती झाले ?"
"४५."
"बघू. भाडे कार्ड बघू."
कार्डावर नजरेने पटकन शोधले....मीटर व कार्ड ह्यांची सांगड घातल्यास भाडे ४४.५० पैसे इतके होते. मग पन्नास पैसे ? ते चालकाने गृहीत धरून स्वत:च्या खिशात घातले होते. म्हणजे कष्टाचे ४४.५० व फुकटचे पन्नास पैसे. जर मी त्या चालाकाच्या डोक्यात जर थोड्या वेळासाठी डोकावले तर....पन्नास पैश्याचा तोटा ग्राहकाने उचलावा...मी का ? आणि म्हणून मी कधीही ४४ रुपये सांगणार नाही...नेहेमीच ४५ सांगेन. नाहीतरी ग्राहकाच्या खिशात ५० पैश्यांची चिल्लर कुठून असणार ? नसेलच हे मी गृहीत धरेन व 'राउंड फिगर' करून सांगून टाकेन....वाढीव स्वरूपात ! पचास पैसे कि हि तो बात है !
'राउंड फिगर' ही नेहेमीच वरच्या रकमेची...कधीही पन्नास पैश्यांनी देखील कमी नाही.

आज.
गेले कित्येक वर्षे मी ज्यावेळी माझ्या एका ठराविक बँकेत जाते त्यावेळी त्याच गल्लीत मी गाडी लावते. नेहेमीच एक बुटकासा माणूस त्याची बिलांची छोटीशी पुस्तिका घेऊन पुढे येतो. मी पाच रुपये देते. पावती घेते. संवाद करण्याचा काहीही प्रश्र्न येत नाही. परंतु, आज मी गाडी लावली तसा तो रिकाम्या हातांनी पुढे आला. मी खिडकीची काच खाली केली.
"द्या. रिसीट द्या."
"मॅडम, आप जो मन में आये वो दे दो."
"मेरे मन में क्या आनेवाला है ? तू रिसीट दे और पैसा ले."
"अब पैसा बढ गयेला है मॅडम ! पाँच का दस हो गया है."
"ठीक. तो दस का रिसीट फाड."
"नही वैसे नही...आप चाहे तो पांच दे सकते हो."
"बॉस ! तू दस का रिसीट फाड और ये दस का नोट ले ! फालतू में टाईम पास मत कर ! "

घरच्या एसीला सर्विसिंगची गरज आहे. नाहीतर चालू केला की बंद खोलीत एक हलकेच धुळीचा फवारा केल्यागत वाटू लागते ! आज शनिवार...असली कामे संपवण्याचा दिवस. म्हणून दुपारी एक ते दोनमध्ये हे काम करावे असे सर्विस स्टेशनला सांगितले. कंपनीचे अधिकृत सर्विस स्टेशन. कुठेही गोलमाल असण्याचा संभाव नाही. ज्या माणसाशी ह्या संदर्भात गेले आठ दिवस अधून मधून बोलत होते त्याचा ११ वाजता फोन आला.
"मॅडम, आप कंपनीसे करवाते हैं तो आपको १४०० रुपया चार्ज  पडेगा."
"हा. मुझे मालूम है. आपकी वो ऑफिसवाली लडकीने ये मुझे बोला है. और आपका कंपनीकाही सर्विस स्टेशन है ना ? "
"हा....कंपनी का ही है.... पर अगर मै आके करता हूँ तो आपका कम में काम हो सकता है." अतिशय मुलायम व समजावणीचा सूर.
"फोन रख तू ! और मेरे घर आने की बिल्कुल जरुरत नही."

माझी तत्वे एका टोपलीत.
टोपली माझ्या पुढ्यात.
व मी भर बाजारात...
"तत्वे घ्या तत्वे.
कधी पन्नास पैसे...
कधी पाच रुपये...
कधी पाचशे रुपये."

मी माझी तत्वे, कधी टोपलीत भरली व बाजारात विकायला काढली ? चिरीमिरीला विकली ?

एक जाहिरात आठवली...आवडली होती...माझ्या मनाला पटली होती....
कधी नव्हे ती एक अशी जाहिरात, जी काही तत्वांबद्दल बोलत होती...
...व तीही एका तरुणाच्या नजरेतून...
तरुणांसाठी...


पहिल्या घटनेत, माझ्या लिखाणात मी गरजेइतके नीट विचार मांडू शकले आहे असे आता नाही वाटत...म्हणून...
'चालकाने ग्राहकाने ५० पैसे जास्ती द्यावेत हे गृहीत धरणे चूक की बरोबर हा मुद्दा आहे.
मला माझे भाडे नक्की किती झाले आहे ते आधी त्याने सांगितले असते...त्यानंतर जर माझ्याकडे सुट्टे नसतील तर पन्नास पैसे मी त्याला अधिक देईन. परंतु, ते 'मीच' द्यावेत असे त्याने गृहीत धरणे हे किती बरोबर ? कारण इथे प्रश्र्न पन्नास पैश्याचा नाही...तर हक्काचे व श्रमाचे नसताना देखील पैसे अधिक मागण्याचा आहे.
व ते आता आपल्याही इतके रक्तात भिनले आहे की त्यात काही गैर आहे असे आपल्याला वाटत देखील नाही...'
ही एखाद्याची चुकीची प्रवृत्ती जोपासण्यासारखे आहे. आणि आपण 'कुठे पन्नास पैश्यासाठी भांडत बसा 'ह्या कारणाने त्या वृत्तीस खतपाणीच घातले आहे.
तसेच आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर, त्याचे जेव्हा आपल्यासमोर बिल ठेवण्यात येते त्यावेळेस जर त्यात सर्विस चार्जेसच्या नावाखाली एखादी रक्कम जोडली गेली असेल तर ती ग्राहकाची पूर्णपणे लुबाडणूक आहे. कारण हॉटेलच्या सेवेची किंमत पदार्थांच्या दरात अंतर्भूत असते..ती ते अधिक किंमत म्हणून आपल्याकडून वेगळी घेऊ शकत नाहीत. ती सर्वस्वी लबाडी आहे.