नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 22 August 2011

त्वमेव माता...पिता त्वमेव...

सैतान जन्म घेतो तेव्हा नेमकं काय घडतं ?
तारा खचतो ?
मेघ कपाळ बडवतात ?
वादळ सैरावैरा धावतं ?
वृक्ष अंग टाकतात ?

काय सैतान सांगून जन्मास येतो ?

असंख्य माता...असंख्य पिता...
एकाचवेळी...
वेगवेगळ्या स्थळी...
सैतान बालकांना जन्म घालतात....
पोटचं पोर ते...
ओंजारून गोंजारून वाढवावयास हवे.
कुशीत निजवावं...त्याने बोबडं बोलावं...
दुडूदुडू धावावं...त्याला तीट लावावं.
जगभर बाळं अशीच तर वाढतात...
दिवसागणिक बलदंड होतात.
घरोघरी...गल्लीगल्ली...
कोण ह्याचे माता...कोण पिता ?
का ह्यांच्या पोटी सैतान पोरे जन्माला येतात ?
ते असे उफराटे काय करितात ?
आणि अकस्मात हे सैतान अनाथ का होतात ?
बेवारशी भटकताना का दिसून येतात ?

चला विचार करुया.
शोध घेऊया.
का बरे ह्यांच्या पोटी सैतानच जन्म घेतात ?
आणा पकडून त्या मातापित्याला...
चला शोध घेऊया...
ह्यांच्या पोटी का सैतान जन्म घेतात ?

शोध आता अटळ आहे.
विलंब तर झाला आहे...
पण काय वेळ टळून गेली आहे ?

चला या...
एकेक करून उत्तरे द्या...
काय म्हणता ?
मी कोण ?
प्रश्र्न विचारणारा मी कोण ?
हा अधिकार मला कोणी दिला ?
समजा, मी कृष्ण आहे.
कलियुगात तळहातावर गीता आहे.
तीवर एक हात ठेवा.
आणि मग उत्तरे द्या.
का पोटी सैतान जन्म घेतात ?
का कालौघात सैतानाचे आईबाप हरवून जातात ?
आसमंतात घिरट्या घालणाऱ्या, त्या अनाथ सैतानाचे मायबाप आज शोधावयाचे आहेत.

बाई, रहा तुम्ही रहा उभ्या...
सांगा...आम्हांला दु:ख सांगा.
"अहो तुम्हांस आता कसे सांगावे ? आमच्या पोटच्या पोराने आम्हांस देशोधडीस लावले...आमचे बाळ माजले."
"बुवा, आता तुम्ही सांगा. असे तुम्ही काय केले...आपले बाळ का टाकून दिले ?
"आम्ही अज्ञानी. ना आम्ही हे जाणिले. आम्हांला ना वेळ...ना काळ...सगळीच घाई घाई..."
"मग, त्या घाईघाईत असे तुम्ही काय केले...?"
"आम्ही लेकाला दोन हिरव्या काड्या घातल्या...पोराला ते भावले...चटक लागली...झिंग चढली...दुसरे काही दिसेनासे झाले...खा खा सुटली...प्रत्येक वाटसरूकडे हिरवा चारा मागू लागे. आमचे नाव खराब झाले...म्हणून आम्ही त्याचे नाव टाकिले."

"हो हो..आम्ही देखील असेच केले...." हल्लागुल्ला. आरडा ओरडा...पार नभाला भिडला.

"थांबा थांबा...ओरडू नका...शांत व्हा...बसून घ्या...लक्षात घ्या...हा एक शोध आहे...एक विचारमंथन आहे...मग आता सांगा...आपण काय करायचे....? इतुके मोठे केलेले हे तुमचे बाळ...आता कोणी त्याचे काय करावे ? जन्मास तुम्ही घातिले...मग त्याचे तुम्हांलाच ओझे झाले ? हे असे उफराटे कसे काय झाले ? रडू नका...असा आक्रोश करू नका...आक्रोशाने काय प्रश्र्न सुटतात ? आता तरी तुम्हांला कळिले...तुम्हांला धीर कसा तो नाही...माज त्याला नाही...तुम्हांला आहे...हिरवा चारा डोक्यावर घेऊन नाचला...संयम, श्रम, स्वेदाचे महत्त्व विसरला...तो हिरवा रंग, तुमच्यावर चढला...डोळ्यांत उतरला...आणि तुमच्या लेकराच्या नसानसात भिनला...तुमचेच ते गोंडस बाळ, सैतान पुरुष झाले...आता इथे आमच्या द्वारी धाव घेता...उपाय पुसता...आता दुजा काय उपाय....सांग बयो...सांगा बुवा...माना खाली काय घालता...आम्ही सांगतो...आमचे ऐका..आता नाही आम्ही फिरून अवतरणार...ह्या तुमच्या लेकाला तुम्हीच मारणार...ब्रम्हास्त्र तुम्हीं उपसावे. सुदर्शनचक्र तुम्ही सोडावे...घातले जे जन्माला...ते तुमचे पोटचे पोर सैतान बनले. आता त्याला टाकून काय होणार ? कोणता प्रश्र्न उलगडणार ? त्याला तुम्हीच जन्म दिला हे सत्य तुम्ही धुडकारले...काय त्याला अनाथ जगू द्यावे...? तो धुमसला...अस्ताव्यस्त पसरला...येईल मार्गी ते खाऊ लागला...असंख्य हस्त...असंख्य पाद...पसरावयाला कितीसा काळ ? आता समजून घ्या...व्हा पुढे...युद्धात खून माफ असतात...खरे तर युद्धात खूनच नसतात...आठवते ना मी तेव्हा काय सांगितले...आपलेच बंधू, आपलेच सगे. आपलेच सोयरे. मग कसला विचार...आता नाही तर केव्हा...शुभस्य शीघ्रम म्हणावे...कितीही टाळले...तरी आता जग जाणे...तुम्हीं त्यास जन्मास घातले...तुम्हीं त्यास वाढविले. आता त्याचे शरसंधान दुसरे कोण करणार ? अहो बुवा, अहो बाई...उगा आपले पाप दुसऱ्या माथी मारू नये...स्वत:शी सत्य बोलावे...हा भ्रष्ट्र सैतान जन्मास तुम्हींच घातिला...तुम्हां कळले नाही...त्याला कधी भस्म्या झाला. बायांनो, बाप्यांनो, ह्या तुमच्या पोराची...भ्रष्टाचाराची सांगा दुसरा कोण खांडोळी करणार ? व्हा पुढे...शुरासारखे...षंढ तुम्ही बनू नका...रणांगणातून पळ काढू नका...त्याचा शिरच्छेद करा...कोथळा बाहेर काढा...हे एक तरी पुण्य करा...ह्या भस्मासुराचा नाश जर तुम्ही केला...स्वर्गद्वारी मी उभा राहीन स्वागतासाठी तुमच्या...आणि तुम्हीच सांगा...तुम्हींच थोडा विचार करा...इतिहासात किती माता जन्मास आल्या...देशहितासाठी त्या नाळेचा त्यांनी तुकडा पाडीला...चला, काही नाही तर तसे काही करून दाखवा...त्या तुमच्याच पोटच्या पोराच्या गळ्याला एक नख लावा.
तुम्हीच विचारीत होता...
सैतान जन्माला येतो तेव्हा नक्की काय घडतं...?
काय सैतान सांगून जन्मास येतो ?

होय...सैतान सांगून जन्मास येतो...तो तुमच्या मनी जन्म घेतो...जेव्हा हिरव्या नोटा तुम्हीं कोणापुढे नाचवता त्याक्षणी तो जन्म घेतो...जन्मदाता तुम्हीं असता. जन्मत:च केलेले त्याचे विकट हास्य तुम्हां ऐकू येत नाही...कारण एकच...तुमच्या धुंदीत तुम्ही बहिरे व आंधळे झालेले असता...एका क्षणात तो जन्म घेतो....दुसऱ्या क्षणी त्याला भस्म्या होतो.
चला, आज जन्माचे सार्थक करा...भविष्य स्वत:च्या हाती घ्या...
त्या तुमच्याच पोटच्या पोराच्या गळ्याला तुम्हींच हिंमतीने नख लावा.


19 comments:

sanket said...

अगदी मनातले.. आपणच जन्म दिलाय, आपण़च नख लावायचे..

Gouri said...

गोकुळाष्टमी स्पेशल :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, लेखणीत श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र भिरभिरत होते का? ....... अशी अनघा प्रथमच अनुभवली... :-) व्वाह...

श्रीराज said...

@Gouri +1
@Professor ++1
@Anagha... चाबूक!!!

अनघा said...

संकेत, आपल्याला हे मान्य करायलाच हवं...चूक जर मान्यच केली नाही तर आपण ती सुधारणार कशी ? नाही का ?

अनघा said...

गौरी...हे मी तुझ्या त्या दिवशीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली तेव्हापासून डोक्यात पिसाटलं होतं...चारपाच वेळा लिहून काढलं तेव्हा ते पोस्ट करण्याइतपत वाटलं...आहे ना ग बाई त्या लायकीचं ?
:)

अनघा said...

ह्म्म्म...सर आपण आपली जबाबदारी समजूनच घेत नाही...प्रत्येकवेळी आपल्याला दुसरा कोणी तरी लागतो आपल्या आयुष्यात बदल घडवून आणायला...हे कधी समजून घेणार आपण ?

वेगळंच लिहायचा प्रयत्न तर केलाय सर...थोडंफार जमलं असेल असं वाटतंय... :)
धन्यवाद हं ... :)

अनघा said...

श्रीराज...धन्यवाद !
पटलंय का पण ???
:)

हेरंब said...

हम्म.. आवडलं.. पटलं... एकदम मान्य :))

Gouri said...

अनघा, सही झालंय... वेगळा फॉर्म मस्तच जमलाय.

BinaryBandya™ said...

हटकेच लिहिले आहे ..
आपणच जन्म दिलाय, आपण़च नख लावायचे..

हो लावायलाच हवे ...

भानस said...

अनघा, १००% सहमत! आपणच जन्म दिलाय आता पळ काढून चालणार नाही. दुसरा कोणी त्याचा नरडीचा घोट घेईलचीही वेळ उरली नाही...

जीवाची काहिली शब्दातून चाबूक उतरली आहे...

श्रीराज said...

@ Anagha, म्हणजे काय!!! अगदी अगदी पटलं

अनघा said...

बंड्या, ठरवलं तर जमणारच बघ आपल्याला ! :)

अनघा said...

गौरी...
:)

अनघा said...

अगदी गं भाग्यश्री...जसं काही हा भ्रष्ट्राचार ही एक नैसर्गिक आपत्ती आहे...असेच वागतो आपण !
आपणच जन्म दिलाय हे जर नाही समजून घेतलं तर मग आपण परिस्थिती सुधारणार कशी ?
आज एक माणसाची मुलाखत वाचली. त्याने म्हटलं होतं..."आपण दिलेली शंभराची नोट आणि एखाद्या कोट्याधीशाने दिलेले करोडो रुपये..हे दोन्ही सारखेच असतात..."
बरोबरच आहे नाही का हे ?

भानस said...

अगदी अगदी. शंभर टक्के बरोबर. फक्त दुसर्‍याकडे बोट दाखवताना लोकं चार बोटे स्वत:कडे वळलेली आहेत हे मात्र सोयिस्कर विसरतात... :(:(

सौरभ said...

थोरच!!!

अनघा said...

सौरभ...