नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 27 July 2011

एक कळी

"माझ्या डोक्यावर खूप ओझं आहे."
"अगं, ओझं कसलं ? मी आहे ना...मी माझं छत्र धरलंय गं तुझ्यावर. "
"पण मला त्याचं ओझं होतंय बाबा. "
"असं कसं म्हणतेस तू ? अजून कळी तू. माझी. फक्त माझी. बाहेरचं जग काय माहित तुला ? दिसतंय हिरवंगार...पण ते वरून गं..."
"पण ते मला बघू द्या ना...मला अनुभवू द्या ना..."
"म्हणजे ? बाहेर धोका आहे...तो मी तुला नको सांगू...मोकळं सोडून देऊ ? नाही...माझ्याच्याने शक्य नाही. मी जग पाहिलं...बरे वाईट अनुभव मी घेतले...त्याचा उपयोग तुला नाही झाला तर कोणाला?"

कळी अधिक वाकली. जड छत्राखाली दबून गेली. पण करणार काय ? ती तर कळी. नाजूक. टवटवीत जग डोळ्यांसमोर...त्याची आस. मन दु:खी. डोळ्यांतून टिपं येत...पण नजर खाली लावलेली...लीन नजर...त्यातील अश्रू कोणाला ना दिसत.

असे किती दिवस उलटले, कोण जाणे. त्या नम्र कळीची नव्हती हिंमत नजर वर करण्याची. जमिनीवर टेकलेल्या नजरेला काय माहित अंधार कधी झाला व उजाडले कधी. ना ती बहरे...ना ती उमले.

मग त्या दिवशी कसे कोण जाणे ? कोणी आले. तिला मुक्त केले. त्या हिरव्यागार पानाखाली दडून बसलेल्या कळीला हलकेच बाहेर काढले. कळी आनंदली. डोलू लागली. तोच तो अवखळ वारा. त्याच्या नजरेपासून कोण लपे ? त्याने तिला बाहेर खेचले. मुक्त वाऱ्याचा तिला स्पर्श झाला. ती सुखावून गेली. अंगावर रोमांच उभे राहिले. काही दिस उलटले. आणि पाऊस आला. त्याने तिला ओलेते केले. नखशिखांत भिजवून टाकले. ती शहारली. ते ओलेतेपण देखील तिला आवडू लागले. कधी तो वारा तर कधी तो पाऊस. कळी नाचू बागडू लागली.

हिरवे पान दुखावले. त्याच्या नजरेसमोर हे काय घडू पहात होते ? वाऱ्याने त्याच्या पोरकळीला बाहेर खेचले. मोहात पाडले. अनुभवी पान, नाचऱ्या कळीकडे नाराज होऊन बघू लागले. किती दिवस जपले होते. आत दडवून ठेवले होते. पण ते त्याच्या कळीला ना रुजले. ना पटले. आता मात्र त्याच्या हातात काही नव्हते. जगाची नजर, त्याच्या कळीवर पडली होती. पान फक्त चिंतेत पडले. दुसरे हातात काय होते ? काय आता कळी तग धरेल ? उन्हापावसात तिचे काय होईल ? बेभान कळीला कुठे कसले भान ? ती मस्त. ती धुंद.

असेच अजून काही दिस उलटले. अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतके. पांढरी शुभ्र यौवनातील कळी आता शुभ्र ना राहिली. कधी तिला प्रखर उन्हाने लुटले. कधी आक्रस्ताळी पावसाने तिला ओले केले. उद्दाम वाऱ्याने तिला पुरते विस्कटले. ते हिरवे पान, फक्त साक्षीदार ठरले.

काही दिवसांतच कळीला प्रारब्ध कळून चुकले. कळी खिन्न झाली. विचार करू लागली. पण हेच तर प्राक्तन होते. कळीला फुलायचे होते. फुलून कोमेजून जायचे होते. बाहेरचे जग राक्षस आहे. पानाला माहिती होते. पण काय कळीने घाबरून रहायचे होते ? ती मनाशी म्हणे...माझे सुख मी उपभोगले...माझे दु:ख मी झेलले. माझा वाटा...ऊनपावसाचा.

हिरव्या पानाचे दु:खच वेगळे...त्याचे आयुष्य संपत नव्हते. जसा तो भीष्म...अंतापर्यंत तग धरत...कळींवरचे अत्याचार झेलत. उघड्या डोळ्यांसमोर.

24 comments:

rajiv said...

वा : !! निसर्गाचे रूपक खूपच छान उतरलेय !!

Raindrop said...

kharach...ek chhottushya metaphor ne life che kewade mothe lesson kitti soppepana ni sangitales tu :)

अपर्णा said...

मला कळीकडे पाहताना विचार करणारी अनघा दिसतेय...:)

भानस said...

निसर्गासंगे प्रारब्धाच्या उनपावसाचा खेळ खूपच छान चितारलास अनघा, आवडले !!

हेरंब said...

कळीचं रुपक आणि एकूणच वर्णन खूप आवडलं !

श्रीराज said...

अनघा, करुण झालेय गं कथा... वाचताना आपल्यालापण त्या पानासारखे असह्य झाल्यासारखे वाटते.

ह्या कथेच्या प्रकाराला काय म्हणणार? नीतिकथा म्हणू शकतो का??

Vinayak Pandit said...

अतिशय तरल!
माझ्या ’कळी’ या दोन परस्परविरोधी मूड्सच्या कवितांचे दुवे देण्याचा मोह आवरत नाहिए.तुम्ही समजून घ्याल! :)
http://vinayak-pandit.blogspot.com/2008/02/blog-post_5800.html
दुसरी खरं तर आत्ताच पोस्ट केली.जास्तच गंभीर झालीए म्हणून ती बासनातच ठेऊन दिली होती.तुमच्या पोस्टमुळे ती बाहेर आली.
http://vinayak-pandit.blogspot.com/2011/07/blog-post_28.html
आभार!

रोहन चौधरी ... said...

आईग.. तुझे पाय कुठे आहेत? तुला खरच साष्टांग नमन.. :)

अनघा said...

धन्यवाद राजीव. :)

अनघा said...

वंदू, आभार गं ! :)

अनघा said...

अपर्णा, खरं सांगू ? अगं, घराबाहेरच्या एका कुंडीत अशी एक कळी ना पानाआड दडून बसली होती...मी तिला बाहेर काढलं तर ती एकदम डोलायलाच लागली! आणि मी लिहायला बसले तर हे असं लिहून बसले ! तू एकदम ओळखलंसच !!! :)

अनघा said...

:) भाग्यश्री आभार. :)

अनघा said...

हेरंबा ! मनापासून आभार ! :D

अनघा said...

ह्म्म्म... एक कळी वाढवायची हे एक महाकठीण कर्म आहे बाबा श्रीराज !
धन्यवाद रे.

अनघा said...

तुम्ही नवी 'कळी' पोस्ट केलीत तेव्हाच माझ्या ब्लॉगवर सुचना मिळाली होती. सुंदर आणि हळवी झालीय कविता...खूप.
आणि जुनी कळी देखील वाचली. खरंच दोन परस्परविरोधी मूड्स पकडले आहेत तुम्हीं ! खूप छान. धन्यवाद ही पण लिंक दिल्याबद्दल. :)

आणि प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार, विनायक. :)

अनघा said...

:p रोहणा ? अति हळवी झाली का??
मी धरून चाललेय की तुला पोस्ट बरी वाटलीय ! :)
आभार. :)

सौरभ said...

आऽऽऽऽऽऽक्रोश... मी पान होऊन पिकलो, मी कळी होऊन जगलो... मागच्या क्षणी होतो माणूस, ह्या क्षणी झाड झालो...

काय!!! काय बोलायचं!!!??? व्वाह व्वाह... चरणस्पर्श...

BinaryBandya™ said...

उन पावसाचा खेळ मस्तच ...

आनंद पत्रे said...

सुंदर लिहिलं आहेस...

Prof. Narendra Vichare said...

अनघा, तुझे पोस्ट वाचतांना मला अशाच एका बापाची आणि त्याच्या मुलीची आठवण झाली.... खूप छान लिहिले आहेस..

अनघा said...

सौरभा.... :)

अनघा said...

बंड्या, धन्यवाद :)

अनघा said...

आनंद, धन्यवाद रे. :)

अनघा said...

ह्म्म्म...
सर, मला वाटतं प्रत्येक विचारी बापाची आणि खुळ्या वेड्या वयातील मुलीची अशीच काहीशी कथा असावी...हो ना ?
आभार सर. :)