नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 18 July 2011

चित्र-विचित्र

कोण जाणे किती वेळ डोळे मिटले होते. कधीकधी जाग व नीज ह्यांतील रेषा अंधुक होते. एक कुठला विचारांचा धागा हाती लागतो. तो धागा पकडत हलकेच पुढे निघावे आणि धागा काही वेगळ्याच वळणावर वळावा. जसे काही धुक्याच्या पायवाटेवर चालू पडावे व काही क्षणात ती पायवाट कुठे एखाद्या दरीच्या काठावर नेऊन कटकन तुटावी....अकस्मात. आणि मग विचारात पडावे...ह्या पायवाटेवर आपण का निघालो...कधी निघालो.

डोळे उघडले तर माझ्या डोळ्यांसमोरील चित्राला चौकट होती विमानाच्या दीड वीत खिडकीची. बाहेर बघावं तर पांढरे शुभ्र ढग. ढग...आणि ढग. सर्वत्र पसरलेले. कापूस जो आपण बघतो त्याला तर असते एक पिवळसर छटा. हे जे डोळ्यांसमोर होतं त्याहून अधिक शुभ्र काही असूच शकत नाही. सर्वत्र पसरलेला तो पांढरा रंग. त्या रंगाला बाधा येईल असे काहीही कुठेही नाही...दूर दूरपर्यंत नाही. कधी पनवेलच्या तलावात पाहिलेली पांढरी कमळे, हाताला किंचित रवाळ लागणारी पांढरी रांगोळी, गादीवर अंथरलेली पांढरी मऊ चादर, हातात कधीतरी मिळणारा शाळेतील तो पांढरा खडू, बाबांचे रोजचे पांढरेशुभ्र कपडे, आणि चित्र काढण्यासाठी कॉलेजमध्ये हातात धरलेला शुभ्र गुळगुळीत महागडा आयव्हरी कागद.

जे डोळ्यासमोर होते ते जणू एका अतिप्रचंड कॅनव्हसवरील एक चित्र. ते चित्र इतके मोठे की एका नजरेत बघून कधी पूर्णच होणारे नाही. आणि ते बघण्यासाठीच जशी काही मी इतकी वर आले होते. एखाद्या प्रदर्शन दालनात मोठ्या चित्रासमोर उभे राहायचे असेल तर चित्रापासून अंतर राखून दूर उभे रहाणे भागच असते. जवळून त्या चित्राची खोली, त्यातील विविध आकार नजरेत मावतच नाहीत. तेव्हढी व्याप्ती आपल्या नजरेच्या क्षमतेच्या बाहेरची ठरते. तसेच काहीसे वाटले. अति उंचावर बसून कोणा चित्रकर्म्याची निर्मिती बघावी. फक्त पांढरा रंग घेऊन इतके आकार कसे हा निर्माण करू शकतो. आणि साधासुधा नाही. पेलिकन व्हाईट. कॉलेजमध्ये हा पेलिकन व्हाईट ज्यावेळी हातात आला, त्यावेळी त्याच्या नावाचीच गंमत वाटली. म्हणजे एक साधा व्हाईट आणि एक भारी पेलिकन व्हाईट. कधी त्याला पॅलेटमध्ये उतरवून घ्यावयाचे असले तर हातातील कुंचला पाण्यात ढवळून घ्यावा लागत असे. अगदी पाण्याची खळखळ खळखळ. वेगळ्या रंगाचा एक अणूथेंब देखील त्याच्या शुभ्र अंगावर एक डाग सोडून जात असे. आणि मग मन हिरमुसलं होऊन जाई...एकदा पडलेला डाग कधीही निघत नाही. तो त्याच्या साऱ्या आयुष्यात मिसळून जातो...आणि मग तो पांढराशुभ्र नाही उरत...कधी निळसर छटा...तर कधी करडी छटा पसरलेला...मग ज्यावेळी तो पेलिकन व्हाईटच हवा असेल त्यावेळी दुसरी बाटली आणण्यावाचून गत्यंतर नाही...कारण हा रंग धुवून थोडाच नाहीसा होतो ? एकदा डागाळलेला व्हाईट कधीही फिरून पेलिकन व्हाईट होत नाही. मग ती बाटली पडून राही कोपऱ्यात...ना कोणी तिला फिरून उघडे...ना कोणी त्यात कुंचला बुडवे. मग ते विस्थापित आयुष्य जगून सुकून गेलेली ती बाटली कधीतरी कचऱ्याच्या डब्यात जाऊन पडे...जसे एखादे आयुष्य...डागाळलेले.

किती वेळ गेला कोण जाणे...लाखो शुभ्र ढग नजरेखालून गेले. आणि मी अगदी शाळेतून निघून माझ्या कॉलेजपर्यंत फेरफटका मारून आले.

एक होते. नजरेखाली, काही फुटांवर ढग होते त्यामुळे आपण किती उंचावर आहोत हे कळायला काही मार्ग नव्हता. हे असे ढग, रोज बनवून खाली सोडून द्यावयाचे काम करण्यास, देवाने किती माणसे कामावर ठेवली असतील बरं ? आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरात येत असेल ? ढग बनवण्याची रेसिपी काय असेल बरं ? एखादा अतिप्रचंड टब असावा....त्यात कित्येक लिटर पाणी ओतलेले असावे...आणि त्या पाण्याचा पुरवठा अविरत असावा...व त्यात साबणाचा चुरा कोणी भुरभुरत ठेवत असावे...रवी घेऊन अनेक बायका ते पाणी घुसळत असाव्यात...व त्या टबाला एका बाजूला असलेल्या नळातून मऊ मऊ ढग निसटून हलकेच बाहेर पडत असावेत. नाही का ? नाही पटलं ? मग दुसरी काही कल्पना आहे का तुमच्याकडे ? मला तरी हा असाच 'ढग कारखाना' असावा असं वाटलं.

अकस्मात माझ्या त्या शुभ्र कॅनव्हासाला भोक पडलं. आणि इतका वेळ हळुवार तरंगणारी माझी नजर भस्सकन त्या भोकातून खाली घसरली. आणि एकदा घसरावयास लागल्यावर काहीतरी अडथळा मध्ये यावा लागतो. नाहीतर घरंगळत किती खोल जाणार ? माझ्या नजरेला ना कोणी थोपावले. खोल खोल त्या भोकातून माझी दृष्टी जी घसरली ती कित्येक मैल खाली गेली. आणि ती थाडकन आपटली एका झोपडीवर. आता शुभ्र साम्राज्य संपलं होतं. ढग टरटर फाटत चालले होते. जसं शुभ्र शालूला एक छिद्र पडावं व त्यात बोट घालून ते कोणी मोठं मोठंच करावं. झाकलेलं नागडं सत्य उघडं पाडावं...शुभ्र स्वप्नातून लाथाडून बाहेर फेकावं.

काही क्षणांपूर्वी नजरेसमोर पसरलेला कॅनव्हास आता पूर्ण फाटला होता...त्याची लक्तरे झाली होती...त्यातून वास्तव बाहेर लोंबकाळलं होतं. विद्रूप. बेंगरूळ.

माझं तरंगतं विमान जमिनीला टेकलं.
रंजलेली गांजलेली माझी बलात्कारित मुंबादेवी. तिचाच मी एक अणू.

पुढल्या पाचव्या मिनिटाला मी प्रीपेड टॅक्सीत बसले होते. घरच्या रस्त्याला लागले होते. बाहेर सर्व ओले धूसर. धुंद. खिडकीच्या बंद काचेवर थेंब जमा होत होते. ही खिडकी उघडणे हातात होते. उघडलेल्या खिडकीतून मान वर उंचावून बघितले. दूरदूर एक चिमुकले विमान आकाशात पुढे सरकत होते. काय त्याच वेळी कोणी, कोसो मैल उंचीवरून पुन्हा एकदा खाली डोकावत होते ?

मग मनोमन वाटलं...निदान त्या अनामिक प्रेक्षकासाठी तो शुभ्र कॅनव्हास पुन्हा एकदा जोडला गेला असावा. अज्ञानात तो सुखी असावा.
निरंतर.

26 comments:

अपर्णा said...

मस्तच लिहिलंय ग....अप्रतिम....
ढगांचा कारखाना .....:) तुला माहिते का ढगांना अप्प्रीशिएट करणारी एक सोसायटी आहे...
http://cloudappreciationsociety.org/

All In the Day's Work said...

अनघा,लेख वाचताना मी ही विमानातुन ऊंच गेलो.तुमचे बरेच लेख मनाला स्पर्श करतात.Next time I am in Mumbai, I will like to look you up in Shivaji Park and say hi and 
thank you for the blogs you write.

BinaryBandya™ said...

ढगांचा कारखाना आवडला ..
सगळ्या विमानतळाजवळ अशीच बकाल वस्ती असते . (काही अपवाद असतील)

ढगातून डायरेक्ट जमिनीवर आणले तुम्ही :(

yogik said...

कधी पनवेलच्या तलावात पाहिलेली पांढरी कमळे...

हे तर स्मरण रंजन राहिले आता.........
माझी पनवेल ची पहिली आठवण.....
शुभ्रता गेलीय इथली ...

ani cloud appreciation society....kiti kavyatm!! wah!!

Raindrop said...

nicely portrayed contrast....kabhi sapno ki duniya to kabhi reality...dhoop chhaon ka khel

अनघा said...

अपर्णा, आभार गं. :)
आणि काय सही आहे ती सोसायटी ! ढगप्रेमी ! :) मस्त !

अनघा said...

All in the day's work...धन्यवाद ! :)

अनघा said...

बंड्या...हो असं होतं खरं...ढगांवर तरंगत असतो व धाडकन खाली आपटतो !
बालीचा विमानतळ मात्र मस्त समुद्राला लागून होता... :)
आभार रे. :)

अनघा said...

हो ना योगिक ! माहितेय मला ! आता नाही दिसत पनवेलच्या तळ्यात शुभ्र कमळं ! :(
धन्यवाद. :)

अनघा said...

जसा आयुष्यात लपाछपीचा खेळ चालू असतो....कधी सावली तर कधी ऊन.
आभार वंदू... :)

Gouri said...

मुंबईला लॅंड व्हायचं म्हणजे एकदम ढगातून जमिनीवर असतं ग ... बाकी तुझा ढगांचा कारखाना मस्तच आहे :)

अनघा said...

:) ढगांचा कारखाना ! मस्त नं गौरी ? नॉन - स्टॉप!

भानस said...

प्रत्येक वेळच्या १८ तासाच्या प्रवासात निरनिराळ्या आकाराच्या व पोताच्या ढगांच्या पिसार्‍यातून मी जात येत असते. आपलेच जग एक वेगळेच विश्व भासते तेव्हां. बाकी भुईशी लगट करायला जवळ येत गेलो की आहेच नेहमीचेच दृष्य... :(

अनघा, ढगांचा कारखाना अगदी असाच असेल बघ. आता पुढल्या वेळी उडेन तेव्हां हटकून तुझी आठवण येईल. :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा, दिल्लीला किंवा गोव्याला जाताना / येताना असे ढगांचे दृश्य मी अनेक वेळा अनुभवले असेल. पण तुझ्या ब्लॉग वरील पांढऱ्या शुभ्र ढगांचे वर्णन वाचतांना मात्र "अनघाच्या नजरेतून" वेगळाच चित्र-विचित्र अनुभव देवून गेले.

हेरंब said...

बंड्याशी सहमत..

ढगातून डायरेक्ट जमिनीवर आणलंस !!

सुप्रिया.... said...

Khup mast....

एका शुभ्र स्वप्नात हरवून जात होते मी...तू डायरेक्ट वास्तवात आणलस....

श्रीराज said...

खरंच अज्ञानात सुख असते; पण हा पडदा उघडतोच न एक न एक दिवस :(

Vinayak Pandit said...

सुपर्ब पोस्ट अनघा! अमूर्त अनुभव साध्यासोप्या पण आकर्षक शब्दात मांडलाय तुम्ही! कल्पनाशक्ती, वास्तव, जरासा ह्युमर... चित्रमय शैली! रखरखीत वास्तवही! एक मस्त ललित! :)

अनघा said...

माझी आठवण येईल ना तुला ? मग बस्स ! झाला की हेतू साध्य ! हो ना भाग्यश्री ? :)

अनघा said...

सर, तुमच्या हातात जर स्केचबुक दिली तर तुम्ही कसे भराभर स्केचेस काढत सुटाल ? तसं हे आपलं माझं शब्दचित्र ! :)

अनघा said...

हेरंबा, लँडिंग वाईट झालं म्हणायचं ? :)

अनघा said...

सुप्रिया, मनापासून आभार प्रतिक्रियेबद्दल. :)
येत जा अशीच... :)

अनघा said...

हम्म्म्म. श्रीराज ?

अनघा said...

विनायक खूप खूप आभार ! एकदम हुरूपच आला मला ! :)

सौरभ said...

वाह वाह वाह वाह... सुभानअल्लाह... बोहोत खुब...

अनघा said...

:D धन्यवाद सौरभ मियॉं. :)