नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 4 July 2011

विषवल्ली...भाग ६

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३
विषवल्ली...भाग ४
विषवल्ली...भाग ५

मग तशीही काही वर्षे उलटली. लीनाला ना कधी भाड्याने घर मिळाले. ना ती कधी प्राजक्ताला घेऊन एकटी कुठे राहू शकली. लीनाच्या वडिलांनी कधी नव्हे ते अनेक देव केले. लीनाच्या आईने लीनाच्या हातात रामरक्षा ठेवली. तिला मन शांत राखणे गरजेचे होते म्हणून. लीनावर अन्याय झाला की नाही ह्याचे उत्तर शोधायचा कोणी कधी प्रयत्न केला नाही.

जर आता मनीष परगावीच रहाणार आहे तर निदान म्हणून तरी लीना-प्राजक्ताला त्यांचे घर रहावयास मिळावे अशी मागणी मग लीनाने मनीषपुढे मांडली. कधीकधी नशिबाची चक्र वेगळी पडतात. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणारे दरवाजे आपोआप उघडताना दिसतात. मनीषने लीनाची विनंती मान्य केली. लीनाला तिच्या घराची किल्ली जवळपास / वर्षांनी मिळाली.
"आई, आता आपण इथेच राहायचं ?"
"हो बाळा. आपण आता आपल्या घरी राहायचं."

त्यानंतर किती प्रलय आले. किती भूकंप झाले. लीना नाही बदलली. मनीष प्रथम मनाविरुद्ध घरी परतला. पण आता लीनाने सर्व बळ एकवटले होते. घर, नोकरी आणि लेक ह्या सर्वांमधील तारेवरची कसरत तिने झेपवून नेली होती. मनीष सर्व बघत होता. प्राजक्ता तिच्या घरी खूष होती. अभ्यास, खेळ...बालपण सर्वांगाने फुलत होतं. त्या मायलेकींना पुन्हा घराबाहेर तो काय म्हणून काढणार होता ? जेव्हा प्राजक्ता बाळ होती तेव्हा आई बाबांना घट्ट मिठी मारायला सांगायची स्वत:ला मध्ये गुरफटून घ्यायची...आणि बोबड्या शब्दांत 'सॅन्डी सॅन्डी' करून टाळ्या वाजवत रहायची. आता बऱ्याच वर्षांनी जेव्हा प्राजक्ताला तिचं 'सॅन्डवि' परत मिळालं तेव्हाही ती तशीच टाळ्या वाजवत राहिली...तिचं कालियामर्दन सफल झालं होतं...जणू ती त्याच आनंदात होती.

काही वर्षे उलटली. मनीष, लीना प्राजक्ता ह्या तिघांनी मिळून जगभर भटकंती केली.

परंतु, बहुधा तो संसारच मुळी दृष्ट लागलेला होता. सुख हे धुके ठरावे असे मनिषचे दारूचे व्यसन हळूहळू वाढले. पुन्हा रोज पिऊन मनीष घरी परतू लागला. वा कधी त्याचे मित्र त्याला दारी आणून टाकू लागले. शेखर गौरी मनीषच्या आधीच परगाव सोडून शहरात परतलेले होते. मग लीनाने पुन्हा शक्ती एकत्र केली. डॉक्टर केले. इस्पितळे केली. दारू सोडवण्यासाठीचे सगळे उपाय केले. परंतु, दारू हे एक व्यसन नव्हे. तो एक रोग आहे. रोग सुटत नाही. तो बळावतो जीव घेऊनच विसावतो. ते मायावी द्रव्य मनीषच्या पोटाची चाळण करत होतं...आणि एक दिवस लीना प्राजक्ताच्या नशिबालाच छिद्रे पडली त्यातून मनीष निसटून गेला.

पुन्हा सर्व मित्र गोळा झाले. लीनाला भेटावयास आले. मनीषच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याच्या गोष्टी करू लागले. परोपरीने तिने एकच विनंती केली...मला थोडा वेळ द्या.

काही महिने गेले. आजपर्यंत सर्व संकटात स्वत:ची नोकरी सांभाळण्याचे तंत्र म्हणजे लीनाच्या हातचा मळ झाला होता.
एक दिवस लीनाने घरातील उंच स्टूल खेचले वर चढली. उंच कपाटात व्यवस्थित ठेऊन दिलेली मनीषची चित्रे तिने खाली उतरवली. गादीवर सर्व मांडली. काही चित्रे होती. काही चित्रे लीनाकडे होती. जपून ठेवलेली. तर काही परगावी असताना मनीषने शेखरच्या ताब्यात दिली होती. लीनाच्या हे लक्षात आले.
"अरुण, सर्व चित्र नाहीयेत घरात. मला वाटतं काही शेखरकडे आहेत. त्याच्याकडून आणा मागून. मग सर्व नीट एकत्र करून भरवू आपण प्रदर्शन." तिने मनीषच्या दुसऱ्या एका जवळच्या मित्राला कळवले.
"हो काय ? चालेल. मी करतो त्याला फोन. आणतो त्याच्याकडून चित्र."
लगेच दुसऱ्या दिवशी अरुणने शेखरला फोन केला.
"अरे, तुझ्याकडे चित्र आहेत ना मनीषची ?
"हो. आहेत. काही चित्र आहेत माझ्याकडे."
"मग मी कधी येऊ तुझ्याकडे ? मी घेऊन जाईन ना चित्र. प्रदर्शन भरवायचंय त्याच्या चित्रांचं."
"देईन ना...मी चित्र नक्की देईन. पण एका अटीवर."
"अट ? ह्यात अट कसली ?"
"लीनाला सांग मला फोन करायला. मी फक्त तिच्याचकडे चित्रे देईन."

"लीना, त्याने तुला फोन करायला सांगितलाय."

लीनाने लाचार व्हायचे होते. गत नवऱ्याची चित्र शेखरकडे गयावया करून मागून घ्यायची होती. तिने शेखरवर केलेल्या मायेचा शेखरने एकदा अपमान केला होता. तिने शेखरसाठी एका वहिनीची, एका बहिणीची त्याचप्रमाणे एका मैत्रिणीची भूमिका अतिशय ताकदीने निभावली होती. त्याच शेखरच्या मनातील विषारी अजगराने लीनावर विखारी फुत्कार टाकला होता.

आज पुन्हा एकदा नियतीच्या परीक्षेत शेखर सपशेल नापास झाला होता.

एका अगतिक क्षणी लीनाचा फायदा उठवण्यास धजू शकणारा शेखर आज पुन्हा एकदा त्याच पायरीवर विषारी जीभ लवलवत अधाशी मनाने उभा होता...तिचा पुन्हा अपमान करण्यासाठी.
"आई, जाऊ दे. राहू दे बाबांची चित्रं."
आता मोठं झालेलं ते बाळ सर्व समजून गेल्यासारखं बोललं.
"बाळा, तुला वाटतं मी त्याला करेन फोन ? तो बाबांचा जर खरा मित्र असता तर हे असं तो वागलाच नसता नाही का ? हे मला कधीच कळून चुकलंय....बाबांनी हे समजून समजल्यासारखे केले...आयुष्यभर..."
प्राजक्ता आता मोठी झाली होती...जगाची बदलती गणित तिला लवकर समजून येत होती.

चित्रे ती. शेखरच्या कपाटात पडून राहिली. कधीतरी स्वत:च्या घरात परत जाण्याची वाट पहात. मरण का कोणाला टळले आहे ? जसे ते तिला येईल तसेच ते एक दिवस शेखरला देखील येईल. मधुमेहाने त्याला ग्रासले. एक पाय लंगडा झाला. दीड दिवसांचा गणपती तो लंगडत लंगडत घेऊन येतो, काय त्यावेळी त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीत जीव असतो ?

ही गोष्ट, कधीच मनीष आणि लीनाची नव्हती. ती शेखर लीनाची होती. ती प्रारंभी एका भाबड्या प्रेमाची होती. बहिणीने भावावर करावे तसे ते लीनाचे प्रेम होते. त्याच्या पडत्या काळात तिने ते नाते बहिणीसारखे जपले. परंतु, गोष्टीने एक वळण घेतले त्या प्रेमाचे निरागस पंख गळून पडले. आत इतकी वर्षे लपून बसलेले काटेरी पंख भस्सकन लीनाच्या अंगावर झेपावले. एका फटकाऱ्यासरशी त्या निरागस नात्याची राखरांगोळी झाली.

चूक कबूल करून ती सुधारू द्यावी जगू द्यावे हे एका स्त्रीने आपल्या जोडीदाराला केलेले आर्जव.
स्वत:ची काहीही चूक नाही ही अहं भावना गोंजारून तिला झिडकारून लावणारा एक पुरुष.
आणि निखळ मैत्रीचे नाते विसरून क्षणार्धात आपले असली रंग दाखवणारा दुसरा पुरुष.

डोळ्यांसमोर येतात ती काळी करडी धूसर चित्रे. कधी चित्रांमधून दिसणाऱ्या सैतानाची. तेच ते लपवलेले तीक्ष्ण दात, लालबुंद डोळे, वेडीवाकडी टोकदार नखे असलेली किळसवाणी बोटे.

ही माणसात लपलेल्या सैतानाची गोष्ट. घराघरात लपून बसलेल्या भेकड भस्मासुराची गोष्ट. फक्त वासनेची भाषा बोलणाऱ्या हैवानाची गोष्ट. बेसावध सावजावर झेप घालते...त्या हपापलेल्या पालीची ही गोष्ट.

कित्येक वर्षांपूर्वी, मनीषने काही बिया लीनाच्या हाती टेकवल्या होत्या...सुगंधी रोप आहे म्हणून सांगितलं होतं...लीनाने बिया कुंडीत पेरल्या...खतपाणी केलं...कोंब फुटला...आकाशात झेपावला.
आणि अकस्मात एक दिवस त्या रोपाने गाफील लीनावर झेप घातली होती...डंख मारला होता.
त्यावेळी लीनाला जाणवलं...मनीषने घरात आणलेलं रोप सुगंधी नव्हतं...ती विषवल्ली होती.
लीनाने ती वेल दूर भिरकावली...नजरेआड ढकलून दिली.
पण विषवल्ली ती...जिवंत राहिली...पुढील संधीची वाट पाहू लागली.
...ज्यावेळी त्या बिया हाती आल्या होत्या...लीना निरागस होती...मनाने नाजूक होती...पण आज ?
आज परिस्थितीचे आभार मानावे...लीना खंबीर झाली.
नियतीने तिला घाव झेलायला शिकवले...विषवल्लीचा आज काहीही परिणाम होणार नाही इतके तिला कणखर बनवले.
आणि ते लीनाला वाचवणारे चिमुकले हात...ते हात बियाणं आधीच ओळखायला शिकले. सुगंधी रोप विषवल्लीतील फरक दुरूनच समजून घ्यायला शिकले.

समाप्त

22 comments:

Raindrop said...

कुछ कहानियाँ हम नहीं लिखते, वो लिखता है. और वो हमेशा मास्टरपीस ही लिखता है. कभी सुख भरी, कभी दुःख भरी. इस बार भी उसने मास्टरपीस लिखा और उसमे आंसू भर डाले. लीना के आंसू. उन आंसुओ की कीमत काफी भरी थी. प्राजक्ता ने भरी, लीना ने भरी, उसके माता पिता ने भरी, यहाँ के मनीष ने भी भरी.....फिर भी उसका मोल अदा नहीं हो पाया. कुछ कहानियो का हम ख्वामखा मोल लगाते हैं...वो तो सब iगिनती से परे अनमोल होती हैं. ये ऐसी ही कहानियों में से एक है.

neela said...

सुन्न व्हायला झालंय मला .......
या गोष्टीमध्ये विषवल्ली कोण हे मला ठरवता नाही आलं, पण एकच इच्छा आहे की ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक असावी......

Shriraj said...

रत्नाकर मतकरींची "माणसाच्या गोष्टी" आणि तुझी "विषवल्ली" एकत्र वाचत होतो. संध्याकाळी मतकरी आणि सकाळी निगवेकर... पिळून काढलेत बाबा तुम्ही दोघांनी!!! आत्ता कुणीतरी येऊन मला हसवा

Shriraj said...

...आणि हो, तुझी ही गोष्ट वाचताना मी ही एक गोष्ट लिहीत होतो. ह्या गोष्टीतूनच प्रेरित होऊन; पण ती अजून पूर्ण झालेली नाही. थोडा वेळ लागेल, कारण ती थोडी मोठी आहे (विषवल्लीपेक्षा नाही हं). बघूया कसं जमतंय ते.

Nisha said...

bapre - kasatarich zala vachun hi goshta - man vishhanna zalay - hi satyakatha aahe ka ??

Gouri said...

अनघा, गेले काही दिवस नुसतं जमेल तसं वाचते आहे ... प्रतिक्रियासुद्धा दिली नाहीये तुझ्या ‘विषवल्ली’वर. काय लिहू? आपलं कोण आणि परकं कोण हे सांगणंच अवघड होतं कधी कधी. इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही माणसं अनोळखीच राहतात! यात नायक कोण आणि खलनायक तरी कोण? सगळ्याच थोड्याफार फरकाने करड्या छटा. नीलासारखंच म्हणावंसं वाटतंय ... ही कथा पूर्णपणे काल्पनिक असू देत.

rajiv said...

शेखर, मनीष, लीना, गौरी, अनामिक व प्राजक्ता हीच फक्त पात्रे या कथानकात.

पण तरीही वाचकाला खिळवून ठेवण्यात जबरदस्त यशस्वी !!

शेखर - स्वच्छंदी, जवळ असणाऱ्या प्रत्येकीची अभिलाषा धरणारा भोगवादी, स्वतःच्या इच्छातृप्तीसाठी सर्व नात्यांना तिलांजली देणारे व्यक्तिमत्व, या सगळ्यामधून त्याच्या स्वभावातील गडद काळेपणा व करडा रंग हा अतिशय प्रभावीपणे लिहीला गेलाय.

मनीष - स्वच्छ , सरळ, मैत्र हेच सर्वस्व मानणारा, परंतु घोडचूक केलेल्या पत्नीची मुलीच्या अस्तित्वासाठी चाललेली एकहाती लढाई बघून, मनोमन तिच्या प्रामाणिक पश्चातापाबद्दल खात्री पटूनही, स्वत:च्या चुकांची जाणीव होऊन त्याची कबुली देण्याचे धैर्य नसल्याने पुन्हा दारूच्या आहारी जाणे व त्यातच संपून जाणे ( कदाचित शेखरसारख्या मित्रांनी, टाकलेल्या पत्नीबरोबर परत रहाण्यास लागल्यामुळे केलेल्या मानसिक निर्भत्सनेतून ) इकडे आड तिकडे विहीर झालेल्या कमकुवत मनाच्या मनीषचे वर्णन खूपच चटका लावून जाते.

गौरी - स्वत्व नसलेली, येन केन प्रकारेण फक्त छानछोकीत राहणे, एवढेच हित जपणारी एक स्त्री, बस्स... यापलीकडे काहीच नाही

लीना - परिणामांची तमा न बाळगता, स्वतःला झोकून देणारी, तरीही प्रांजळ व स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहून घडलेल्या चुकीचे प्राय:श्चित्त भोगत, स्वाभिमानाने विखारी वृत्तींशी फटकारून राहत, पतीला परत मिळवणाऱ्या व छोट्या मुलीला समाजातील अपप्रवृत्ती ओळखून त्यापासून आपला बचाव करण्याची समज शिकवणारी एक निडर स्त्री' हे व्यक्तिचित्रण खासच जमले आहे.

अनामिक - स्वतःच्या स्वार्थासाठी लोभाने लीनाने मनीषला घराबाहेर काढावे असे सांगून, लीनाच्या डोळ्यावरील झापड दूर होण्यास कारणीभूत !! कथेला अनपेक्षित पण नाट्यमय वळण देणारे पात्र, मनुष्यस्वभावाचा एक वेगळाच पैलू दाखवून जाते.

प्राजक्ता - निर्व्याज प्रेम याशिवाय कोणतीही भावना माहित नसलेले, नकळतपणे आईला जगण्यास कारण देऊन, लहान वयातच समाजातील अपप्रवृत्ती बाजूला सारून पुढे जाण्याची प्रौढ समज स्वतःला व आईला देणारे, एक निष्पाप बाल्य !!
या कथेत कुठेही प्रत्यक्ष सहभाग नसूनसुद्धा सर्व कथानकाचा तोल समर्थपणे सांभाळलाय !!

अनघा, ही सर्व व्यक्तिमत्वे तू खूपच कमी शब्दात बारकाईने त्यांची वैशिष्ट्ये दाखवून, त्याचा नेहमीचा त्रिकोण न होऊ देता, या कथेला एकूणच खूप उंचीवर नेऊन ठेवलयस, अभिनंदन !!

हेरंब said...

>> आणि एक दिवस लीना प्राजक्ताच्या नशिबालाच छिद्रे पडली व त्यातून मनीष निसटून गेला.

हे आणि अजून अशी काही वाक्यं म्हणजे !! बापरे.. एकदम भयंकर.. !!

खरंच ही कथा पूर्णतः काल्पनिक असावी ही प्रार्थना !!

Unique Poet ! said...

सर्व भाग जसा वेळ मिळेल तसे एकामागून एक वाचत होतो....... प्रतिसाद... आता देतोय..

एक वेगळी कथा होती.... कुठे भरकटली नाही.... ट्रॅक सोडला नाही....

काही काही वाक्ये छान होती.... परिस्थितीचे...जीवनाचे नेमकेपण दर्शवणारी....

कथा आवडली ! काल्पनिक असेल तर छान वाटेल... :)

Anagha said...

वंदू, इतकं सगळं मराठी तू माझ्यावरील प्रेमाने वाचतेयस माहितेय मला....आभार गं.

Anagha said...

नीला, मला वाटतं, कधीच एखादे व्यक्तिमत्व पूर्ण पांढरे वा पूर्ण काळे नसते...त्यात करड्या छटा असतात...हो ना ?
इतकं सगळं वाचलंस...आभार गं.

Anagha said...

श्रीराज, सौरभला हाक मार तुला हसवायला.
आणि टाक लवकर तुझी गोष्ट. किती झाली लिहून ?

Anagha said...

निशा, एखादं पुस्तक वाचलं की असा प्रश्र्न आपल्याला नेहेमीच पडतो नाही का...ही गोष्ट खरी की खोटी...

...इतके भाग वाचलेस हेच माझ्यासाठी खूप.

Anagha said...

गौरी...ह्या करड्या छटा म्हणजेच माणूस नाही का ? नाहीतर सगळेच देव झाले असते...हो ना ?

Anagha said...

राजीव, एकदम परीक्षण लिहिलंत...धन्यवाद. म्हणजे मी न भरकटता लिहू शकलेय नं ?

Anagha said...

हेरंबा, भयंकर झालं का लिखाण...अशी वाक्य मला लिहिता लिहिता सुचत जातात ! :(

Anagha said...

समीर, अजून कमी नाही करू शकले भाग.

ती वाक्य अशी सुटतात माझ्या हातून...माहित नाही ते चांगलं आहे की वाईट.

आणि वर म्हटल्याप्रमाणे...एखादी कादंबरी वाचली की हे असे प्रश्र्न आपल्या मनात बऱ्याचदा येतात नाही का...ही गोष्ट खरी की खोटी...महाभारत, कथा की इतिहास...?
इतकं सगळं वाचलंस...प्रतिक्रिया दिलीस..मनापासून धन्यवाद.

Shriraj said...

शेवटचा भाग लिहितोय... पण राहवलं नाही म्हणून पहिला भाग पोस्ट केला आजच

सौरभ said...

ह्या गोष्टीबाबतित म्हणायचं झालं तर वय, अनुभव, समज ह्यासगळ्याबाबतित लहान आहे, म्हणुन काही बोलणं ठिक नाही. हि कथा काल्पनिक असो वा खरी.. ह्याच्याशी कोणाचा दुरान्वयेही संबंध नसो वा जवळचा असो... माणसाचा स्वभाव ह्या एकाच नात्याने (स्वतःचापण) विचार करायला लावतं. असो. काही गोष्टींवर मूक रहाणेच शहाणपणाचे असते, किंबहुना निमूट रहाण्याशिवाय अधिक योग्य असा कोणताच प्रतिसाद नसतो.

भानस said...

त्या त्या वेळेची, कारणांची, त्यात गुरफटलेल्या माणसांच्या भावनांची एक अनाकलनीय दुनिया आहे ही सारी. नेमका मोह कशाला म्हणायचा व भोग कशाला म्हणायचे याची ज्याची त्याची परिमाणे वेगवेगळीच. तशीच लढाऊ वृत्ती व सहनशक्तीही माणसामाणसाप्रती बदलणारीच...

कुठलेही भोग भोगून संपले असते तर त्यांचे व्रण कुणीही कुरवाळत बसले नसते हेच खरं...

अनघा, कथा... खरी घडलेली, काहिशी खरी काहिशी गुंफलेली जे काही असेल ती तू चांगली चितारलीस.

Anagha said...

सौरभा, माझ्या छोट्या मित्रा...
तू येथे दाखवलेली विचारांची प्रौढता...मला पुन्हा एकदा तू माझा मित्र असल्याचा अभिमान देऊन गेली. :)

Anagha said...

भाग्यश्री, धन्यवाद...

नेहेमीच आपल्याला आपलं माणूस देवाच्याच रुपात लागतं...आणि आपण कितीही राक्षसी गुण दाखवले तरीही आपल्या माणसाने कायम देव वा देवताच असायला हवे ही आपली अपेक्षा असते...
...असं माझ्या मनात नेहेमी येतं.

...रामयाणापेक्षा बऱ्याचदा महाभारत खरं वाटतं...ते त्यातील करड्या छटांच्या खेळामुळेच. नाही का ?