नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 2 July 2011

विषवल्ली...भाग ४

विषवल्ली...भाग १
विषवल्ली...भाग २
विषवल्ली...भाग ३

लीनाने रात्रंदिवस विचार केला. न सांगणे तिला जगू देईना. आणि कसे सांगावे हे कळेना. रोज पाच वाजत होते. पहाट होत होती. लीना यंत्रागत दिवस सुरु करत होती. दिवस पुढे सरके...पण तिचे विचार मात्र जसं शिवणयंत्र अचानक अडकून पडावं...किती पाय मारावेत...किती चाक हाताने ढकलावं...ना सुई पुढे सरके...ना टाका मारला जाई...सुई फक्त वरखाली होत होती आणि कापडावर एकाच जागी नुसत्याच गाठी पडत होत्या...नुसती गुंतागुंत. काय होईल नाही सांगितले तर ? आपण हा चुकीचा रस्ता तर बदलू...जिथे आहोत तिथूनच परत फिरू....पण कधीतरी एक वळण चुकीचे घेतले होते त्याचे हे जड ओझे आता कुठे टाकू ? प्राजक्ताला तयार करे...शाळेत त्या दोघी नेहेमीच चालत जात. आणि त्यावेळच्या त्यांच्या गप्पा तर किती रंगत. पण आता गेले काही दिवस फक्त लीना हुंकार भरत होती...आणि हे असे फक्त हुंकार भरणे देखील तिला त्रास देत होते...लीनाला मोकळा श्वास हवासा होता...पुन्हा एक मोकळा श्वास...तोच एक श्वास तिला तिच्या जोडीदाराकडे मागायचा होता.

ती आधी शेखरला भेटली. मुंबईतील एका गजबजलेल्या हॉटेलमध्ये. चारच्या सुमारास. चहा पीतपीत त्याला तिने सर्व सांगितले. हे सर्व कसे घडले. ती कशी त्यात वहावत गेली हे व असेच बरेचसे. मनीषला हे सर्व सांगण्यात धोका आहे हे शेखरने तिला सर्वप्रथम बजावले. परंतु, हा असा खोट्या पायरीवर पुढील संसार नाही उभा करता येणार हे तिने त्याला सांगितले.
ठीक आहे. मग सांग. शेखर तिला म्हणाला.

सकाळी चालायला जाणे हा मनिषचा रिवाज. त्यादिवशी तो जेव्हा फेरफटका मारायला गेला त्यावेळी लीना घरात बसून सगळे बळ एकवटत होती. धावपळ करून प्राजक्ताला शाळेत सोडण्याचे रोजचेच तिचे काम आजही तिने सवयीने केले होते. त्या कामात मनीषने काही हातभार लावावा असे तिला सुरुवातीला फार वाटे. जगभरातील अनेक स्त्रियांप्रमाणे तिलाही त्यातील फोलपणा जाणवला. मग एकदा मनाची समजूत घातल्यावर सगळी कामे एकटीनेच करणे तसे तिला सोपे गेले.

आज मनीषची वाट बघत ती दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचण्याचे सोंग करत होती. सांगायचे हे एकदा ठरवल्यावर त्यावर तिने तसा काहीही विचार केला नव्हता. म्हणजे प्लान ए नीट नाही झाला तर प्लान बी काय असेल हे तिच्या डोक्यात काहीही तयार नव्हते. तो काय म्हणेल काय करेल काही अंदाज बांधता येत नव्हता. घरात कोणी मोठं नव्हतं ज्यांच्यासमोर हातून घडलेली अक्षम्य चूक मान्य करून माफी मागता येईल. वा पुढे काय करावे ह्याचा सल्ला घेता येईल. तिच्या आईशी इतकी जवळीक तिची कधीच नव्हती. खरं तर एखाद्या रात्री मनीषला सांगणे हे सोप्पे गेले असते. नवरा बायको ह्यांचे खाजगीतील संवाद खरे तर बिछान्यात होणे हे अधिक उचित असते काय ? ती नाना विचार करीत होती. परंतु, मनिषशी संवाद असा कधी केलेला तिला आठवेचना. इकडचे तिकडचे बोलणे होई. परंतु, कधी कुठल्या गंभीर विषयावर बोललेले नव्हते आठवत. म्हणजे मग आपण गेली इतकी वर्षे करत काय होतो ? असा विचार येऊन तिने फटकन वर्तमानपत्र समोरील टेबलावर आपटले आणि तेव्हढ्यात दारावरची घंटा वाजली.

मनीष परत आला होता. घामेजलेला. बूट काढीत कोचावर बसला. शिरस्त्याप्रमाणे लीनाने त्याच्या हाती पाण्याचा ग्लास दिला. त्याने ताजे वर्तमानपत्र हाती धरले व नेहेमीप्रमाणे तो बाथरुमच्या दिशेने जाऊ लागला.
"मला तुझ्याशी काही बोलायचंय."
"बोल ?"
"बस ना तू. इथे. माझ्याजवळ."
धीर एकवटून. बळ गोळा करून. वगैरे वगैरे. शेवटी लीनाने मनीषला सर्व सांगितले. कुठल्या सुंदर स्वप्नात ती होती कोण जाणे. ह्या सर्व प्रसंगातून तिने काय आशा धरली होती हे देवच जाणे. पण त्यानंतर मनीष सकाळी जो कचेरीत गेला तो रात्री घरी फिरकलाच नाही. रात्री उशिरा प्राजक्ताला घेऊन लीना त्याच्या ऑफिसला पोचली. खूप काम आहे ते आटोपले की येईन असे त्याने तिला सांगितले व घरी परत पाठवून दिले. दोन दिवस उलटले. मनीष घरी आला नाही. चवथ्या दिवशी मनीषचा निरोप घेऊन ज्यावेळी शेखर लीनाकडे पोचला त्यावेळी लीना अंथरुणाला खिळली होती. तीन दिवस पोटात अन्नपाण्याचा थेंब नव्हता गेला.
त्याने तुला घरातून निघून जायला सांगितलेले आहे. प्राजक्ताला घेऊन.
पण का ? मला त्याच्याशी बोलायचंय.
ते आता कधी होईल नाही माहित. तू तुझ्या आईवडिलांकडे निघून जा. त्याशिवाय मनीष घरी नाही परतणार. गेले तीन दिवस तो आमच्याकडेच आहे.

मनीष किती हट्टी आहे हे तिला वेगळे कोणी सांगायची गरज नव्हती. हा निर्वाणीचा निरोप ऐकल्यावर लीनाच्या हाती काय उरलं होतं ? ती तिच्या माहेरी गेली. त्यावेळी प्राजक्ता पाच वर्षांची होती. आजी आजोबांकडे रहायला जायचे म्हणून ती खुष होती. रस्त्यात उड्या मारीत असलेल्या प्राजक्ताचा थकलेल्या लीनाला उगाच राग येत होता. आता पुढे नशिबी काय वाढून ठेवले होते कोण जाणे.
ह्या सर्वात प्राजक्ताचा विचार कोणी केला होता का ? कुठलेतरी बंड डोक्यात घेऊन चुकीचे पाऊल टाकताना लीनाने वा ह्या लीनाच्या चुकीत आपला सहभाग किती ह्याचा तिळमात्र विचार न करता तिला घराबाहेर काढणाऱ्या मनीषने. कोणी त्या चिमुरडीचा विचार केला का ?

हे सर्व घडून जवळजवळ महिना दोन महिने उलटले. लीना माहेरी रहात होती. लेकीबरोबर. आता ती तिथे किती दिवस राहील कोण जाणे. ह्या विचाराने लीनाच्या आईने तिला तिच्या कपाटात एक खण रिकामा करून दिला. धुसफुसत. त्यात लीनाने स्वत:चे व लेकीचे कपडे पुरवून बसवले. वाहते डोळे व वाहून ओसंडून चाललेले कपाट. सगळीच आता अनिश्चितता. मधल्या काळात कित्येकदा लीना तिच्या घरी गेली. बाहेर उभे राहून वारंवार मनीषच्या विनवण्या केल्या. दार उघड मनीष. मला आत येऊ दे. मला तुझ्याशी बोलू दे...अगदी धाय मोकलून रडून झालं. परंतु ते दार म्हणजे जशी काय चीनची भिंतच उभी. असंख्य आक्रोश गिळंकृत करून अभेद्य उभी रहाणारी. मनीषच्या मित्रांचे मग फावले. त्यांच्या ओल्या पार्ट्या त्याच्या ह्या मोकळ्या घरात विनासायास झडू लागल्या. सकाळी ज्यावेळी कामवाली केर लादी करावयास येई त्यावेळी तिच्यासाठी दारुच्या इतस्तत: विखुरलेल्या बाटल्या उचलणे हे पहिले काम असे.

ताजी जखम अशीच उसकवत मनीषने आपल्या कॉलेजमधील जवळच्या मित्रांना एक दिवस गोळा केले. त्यांच्या रोजच्या हॉटेलमध्ये तो त्यांना घेऊन गेला. प्रत्येकाने आपापल्या आवडीची दारू मागवली. बिलाची चिंता नव्हतीच. नेहेमीच त्यांची बिले मनीषच भरत होता. दारू आली. ग्लास उंचावले गेले. मद्य हिंदोळले. मद्य चढले. व लीनाचे वस्त्रहरण केले गेले. लीनाने एक लफडे केलेय. आणि ते तिने नको तितके पुढे नेलेय. आणि म्हणून मी तिला घराबाहेर काढले आहे. कायमचे. मनीषने आपल्या सर्व मित्रांसमोर हे जाहीर केले. आज मुळी त्याला मित्रांना सगळे सांगायचेच होते. जखम उघडी करावयाचीच होती. मित्र हादरले. खरे तर लीनाला तेही ओळखत होतेच. तीही त्यांच्याच तर कॉलेजची होती. पण बायकांचे काय सांगता येते. तू दारू पितोस म्हणून काय तिने असे करायचे...वगैरे वगैरे...मनीषवर झालेला अन्याय सर्वांनी पटवून घेतला. त्यालाही तो अधिक पटवून दिला गेला. व हे जे तू तिला घराबाहेर काढले आहेस ते तू बरोबरच केले आहेस असा त्याच्या वागण्याला दुजोरा दिला गेला. हे घर तू तुझ्या कष्टाने घेतले आहेस. लीनाने आता असे केल्यावर तिला तिथून बाहेर काढणे हे बरोबरच आहे इत्यादी. शेखर मद्याचे घुटके घेत शांतपणे ऐकत होता.

4 comments:

Shriraj said...

ह्याच्यात लीनाचे ज्या दुसऱ्या व्यक्तीशी नातं जडते ते कसे जडते किंवा ती व्यक्ती तिच्याशी कशी संपर्कात येते याबद्दल थोडं कुतूहल वाटतेय; कारण ते पात्र या कथेत मला महत्त्वाचे वाटते... निदान तिच्या या निर्णयात त्या व्यक्तीची काय प्रतिक्रिया असते हे तरी कळायला हवे होते.

Anagha said...

लीना, मनीष, गौरी आणि शेखर ह्या व्यक्ती व ह्यांमध्ये घडलेल्या घटना हा ह्या कथेचा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीमुळे ते घडलं त्या व्यक्तीला ह्या कथेत प्राधान्य देऊन तो उगाच प्रेमाचा त्रिकोण बनवणे हे कथेचे मूळ वळण नाही...कथेचा 'फोकस' मुळात तो नाही. इथे आपण एका स्त्रीच्या मनात शिरायचा प्रयत्न करत आहोत...आपल्या संसारावर, नवऱ्यावर व मुलीवर जीवापाड प्रेम करणारी अशी ती आहे व तरीही एक चूक तिच्याकडून घडलेली आहे. ती घडण्याची तिची स्वत:ची कारणे आहेत.

अजून कथा संपायचीय... धीर धर. :)

भानस said...

आपल्या समाजाचे चलनच कायम अप्पलपोटे आहे. दुजाभाव तर पाचवीला पुजलेलाच. जे नियम पुरुषांना लागू होतात त्यातले पाव टक्काही स्त्रियांना समर्थनीय असू शकत नाहीत आणि असणारही नाहीत.

लीनाची परवड आणि मनाची फरफट वाचतेय...

Anagha said...

आभार ग भाग्यश्री. :)