नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 28 June 2011

विषवल्ली...भाग १

ही एक मुंबईतील कथा आहे. तीन सर्वसामान्य व्यक्तींमध्ये घडत जाणारी. त्या कथेमध्ये त्या व्यक्तींच्या अनुषंगाने जी व्यक्तिमत्वे आपल्या समोर येतात त्यांची तेव्हढीच तोंडओळख आपल्याला देण्यात येते. कारण खोलात शिरून शेवटी हाती काय लागणार ? फुका मेंदूची जागा अधिक खाल्ली जाणार ! म्हणून.

सर्वप्रथम, कथेतील मुख्य व्यक्तंींची आपण ओळख करून घेऊ. ह्या कथेत नायक कोण, नायिका कोण खलनायक कोण हे सर्वात शेवटी तुम्ही ठरवू शकता. ही काही परीक्षा नव्हे. परंतु, लिखाणाच्या ओघात नेमके ते ठरवण्याचेच राहून गेले आहे.


...तर मंडळी, जगण्यासाठी तो अतिशय लायक माणूस होता. पाच फुट आणि एखाददुसरा इंच इथे तिथे. रंग गोरा. पोपटी, पिवळा, निळा असे ताजे रंग आवडते. त्यामुळे जांभळ्या रंगाच्या विजारीवर पोपटी रंगाचा शर्ट त्याच्या अंगावर बऱ्याचदा दिसून येत असे. कॉलेजमधे सहाध्ययांसमवेत वावरताना आपण मागे पडू नये ह्याची काळजी तो नक्कीच घेत असे. शरीरयष्टी जेमतेम. कुरळ्या केसांची दाढी. डोक्यावर तश्याच केसांचा बोजवारा.. त्यात अध्येमध्ये सफेद वेलबुट्टी. बारीक काडीवजा चौकटीचा गोल चष्मा त्याला एक अभ्यासकाचे रूप देत असे. किंबहुना आपण अभ्यासक, नवकवी वा नवागत लेखक, चित्रकार ह्यात मोडले जावे ह्या हेतूने तो तशा ढंगाचे केस, दाढी चष्मा राखत असावा. हातात अरुण कोल्हटकरांचे एखादे कवितेचे पुस्तक, शांताराम पवारांबरोबर कधी काळी झालेल्या भेटीगाठीचे पुन्हापुन्हा रसभरीत वर्णन हे मग समाजात ते वलय आपसूक मिळवून देत असे. गावावरून आल्याने सुरुवातीच्या काळा थोड़ा दबावाखाली वावरणारा तो ळूळू आपले मूळ रंग वर आणू शकला. अंगी नाना कळा तशाच विविध रंगछटा. ज्या कलेच्या नावाखाली त्या कला विद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता, ती कला फारशी काही त्याला अवगत नव्हती. शेखर. बेळगावचा शेखर.

माणसे गुंतागुंतीची असतात. आयुष्ये अधिक गुंतागुंतीची करण्याची त्यांची हौस असावी असे बहुतेक वेळा वाटू लागते. कॉलेजच्या स्वच्छंदी काळात दोन मैत्रिणींबरोबर एकाच वेळी शारीरिक संबंध ठेवणे हे शेखरला फारसे कठीण गेले नाही. त्या दोघी एकमेकींच्या जिवलग. त्याच्या मते त्यातील एकीवर त्याने मनापासून प्रेम केले. तर दुसरी स्वत: त्याच्या गळ्यात पडत होती. असे तो मित्रांना मोठ्या अभिमानाने सांगत असे. तसेही बघितले तर ज्याच्यावर प्रेम करतो त्याचीच साथ आयुष्यभर मिळावी असे फार क्वचित घडते. त्यामुळे पहिलीच्या घरून तीव्र विरोध झाला म्हणून त्या मुलीने ह्याला वाऱ्यावर सोडले. मग हा रडला. तुटून पडला. प्रेमभंग झालेला एखादा तरुण जे जे करील ते सर्व त्याने केले.

कॉलेजमध्ये शेखरला जिवलग मानणारा एक मुलगा होता. मनीष. कायम मित्रांच्या घोळक्यात. विनोदांचा खजिना. अगदी वाक्यावाक्याला विनोद. आणि त्यामुळे मित्रांमध्ये हवाहवासा. लीना ह्या मनीषची मैत्रीण. मनीषहून दोन वर्षांनी लहान. कॉलेजच्या तिच्या पहिल्या वर्षापासून मनीषच्या प्रेमात आकंठ डूबलेली. खांद्यापर्यंतचे कुरळे केस. गव्हाळी रंग. सरळ नाक, पातळ जिवणी. चेहेरा कायम गोंधळलेला. बराचसा भोळा असा लीनाचा स्वभाव. तिची सगळी गणितं सरळ. एक अधिक एक दोन हे इतकं पाठ की सध्याच्या जगात त्या गणिताचे उत्तर अगदी दोन हजार देखील येऊ शकते हे तिच्या डोक्यात कधी शिरणारच नाही. मनीषवर ती जीव तोडून प्रेम करत असे. आणि दोन माणसांच्या एकमेकांवरील प्रेमात, त्यातील एक माणूस नेहेमीच दुसऱ्यावर अधिक प्रेम करीत असतो. त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे कधीही समान पातळीचे नसते. प्रेम म्हणजे काही तराजूतील मालवस्तू नव्हे. एका थाळीत एक किलो तर दुसऱ्या थाळीत देखील तितकेच वजन टाकले. ह्या कबुतरांच्या जोडगोळीत लीनाचे मनीषवर फार प्रेम मनीषचा जीव अधिकतम मित्रांमध्ये रमणारा. जसा बऱ्याच पुरुषांचा रमतो. उलट एखाद्या पुरुषाचा जीव पत्नीमध्ये फार रमणे हे त्याच्यासाठी मित्रांमध्ये कमीपणाचे मानले जाते असा एक अभ्यास सांगतो.

शेखर + पहिली, दुसरी.
मनीष + लीना.
ह्यांच्या ह्या प्रेमकथांमध्ये कॉलेजमधील तरुणाईची धुंद वर्षे वाजतगाजत उलटून गेली.

10 comments:

हेरंब said...

हम्म. सगळं बरं वाटतंय आत्ता तरी.. आणि नावात 'विषवल्ली' ?? बघू.. पुढे कळेलच.

rajiv said...

``एखाद्या पुरुषाचा जीव पत्नीमध्ये फार रमणे हे त्याच्यासाठी मित्रांमध्ये कमीपणाचे मानले जाते'' असा एक अभ्यास सांगतो.'--

असा प्रवाद आहे खरा :)

पुढील भागांची वाट बघतो आहोत आम्ही !!

विनायक पंडित said...

पुढचा भाग कधी?

Shriraj said...

छान आहे सुरुवात...

Anagha said...

:) हेरंबा, वाचतोयस ना ?

Anagha said...

राजीव, दर दिवशी एक टाकायचा प्रयत्न आहे.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

Anagha said...

विनायक, आज तीन झाले भाग. :)

Anagha said...

श्रीराज, धन्यवाद. :)

भानस said...

वाचतेय....

Anagha said...

भाग्यश्री, आभार गं. :)