नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 20 June 2011

मैत्री

मैत्रीकडे गंभीरतेने बघावे की नाही ? वा ती फक्त भिरभिरत्या कापसासारखी असावी ? जोवर हातात असेल तोवर आपली.

बालपणीच्या निष्पाप विश्वात किती बियाणे पेरले होते. त्या त्या मौसमातील ती ती फुले. कधीतरी गळून गेली...तर एखादे खुडून टाकले गेले. ते रोप मग तसेच राहिले...त्या फुलांची ती नाजूक जागा तशीच राहिली...काही काळ ओली. कालौघात ती सुकून गेली...त्यावर पुन्हा तीच फुले कशी फुलणार? त्यांचा तो मौसम तर कधीच निघून गेला.

कॉलेजच्या नाजूक काळातील ती मैत्री. हसतीखेळती. भाबडी. पुढे ती तिचं आयुष्य जगत गेली. मी माझं. धरलेले रस्तेच वेगळे...मग कुठून कधी भेटी होणार ? नाहीच झाल्या. पण कधीतरी कानी पडलं ते तिने व तिच्या नवऱ्याने जोडीने जोपासलेल्या फुलबागेविषयी. फुलून निघालेला एक रंगीबेरंगी व्यवसाय. म्हटलं एकदा बघून यावी. तिची फुलबाग. तिचा एक जुना मित्र तोच माझा नवा मित्र. आम्ही दोघांनी ठरवलं हिची बाग बघून येण्याचं. तसं, आम्ही दोघींनी भेटून जवळजवळ वीस वर्ष उलटून गेलेली. पहाटे मुंबईहून निघालो व तिच्या बागेशी दहापर्यंत पोचलो. ती भेटणार अशी मनात एक आशा. पण दारात फक्त तिचा त्या फुलबागेतला व जीवनाचा साथी हजर. "तिला अगदी यायचं होतं. पण असं काही काम निघालं...न टाळता येण्यासारखं." त्यांनी दाखवली त्यांची बहरलेली बाग. इतकी नानाविध रंगांनी सजलेली की बघत राहावं. सगळे रंग वस्तीला आलेले. हिरव्या रंगाच्या नानाविध छटा. व त्यावर, नजर पडावी तिथे लगडलेली फुलं जणू फुलपाखरंच. समुहासमुहाने एकमेकांना चिकटून राहिलेली. वाऱ्यावर डुलणारी. वाऱ्याला देखील गंमत येत असावी...हलकेच हात त्याने फिरवावा तर त्यातून नाजूक झुळूक निघावी व रंग डोलून जावे. दोन तास कधी निघून गेले कळलं देखील नाही. फुलांना शास्त्रीय नावे का असतात कोण जाणे...चाफा, चमेली, जाई, जुई, पारिजात...कसे मानवी वाटतात...अगदी कधी सडा तर कधी त्यांचा पाऊस अंगावर झेलावा असं वाटून रहाणारी ही नावे. तिथे बघितली बरीचशी विदेशी फुले...विदेशी नावांची. दुसऱ्या दिवशी म्हटलं सकाळीच मैत्रिणीला फोन करावा व सांगावे कालचा दिवस कसा नजरसुख देऊन गेला. तिच्या बगीच्यात.
सुंदर गं. खूपच अप्रतिम. खूप छान.
काय छान ? काय आवडलं ? माझी बाग की माझा नवरा ?
हे बोलून त्यावर तिचे ते हसणे.
एका क्षणात त्या कोवळ्या मैत्रीची निष्पापताच निखळून गेली. त्या विनोदात काहीतरी असभ्य वाटले. अंगावर पाल पडावी व कितीही झटकले तरी त्या पालीने जाऊ देखील नये. उगाच वळवळत राहावे व त्या तिच्या बुटक्या पायांच्या टोकेरी नखांनी अगदी व्रण उठवावे.
तिथेच संपली ती एक मैत्री.

नवरा गेला. हाहा म्हणता जगभर बातमी पसरली. माणसे भेटीसाठी येऊ लागली. एका माणसाने गणती कमी झालेल्या आमच्या घराला भेट देण्यास आलेल्या लोकांनी आमचे चिमुकले घर क्षणाक्षणाला भरू लागलं. त्याच त्या कॉलेजमधील निष्पाप दिवसांतील सख्या देखील धावत आल्या. प्रेमात पडण्याच्या माझ्या वेड्या दिवसांच्या त्या साक्षीदार. वेडे, भोळेभाबडे, नको तितके हळवे दिवस. सोळाव्या वर्षाला शोभेसे कोवळे मन. त्यांच्या समोरच उलटलेले ते दिवस, ते महिने व ती पाच वर्षे.
तुझं काही नाही गं. तुझ्या लेकीचंच जास्ती वाटतंय. तिचं तिच्या बाबावर फार प्रेम. ती खूप मिस करेल त्याला.
माझ्या मैत्रिणीने आम्हां मायलेकींच्या प्रेमाला तराजूत घातले. वजन केले. लेकीचं तर बापावर प्रेम असणारच. पण माझे नवऱ्यावरील प्रेम व लेकीचे बापावरील प्रेम ह्यात स्पर्धा आहे हे नव्हतं माहित. माझा कोरा चेहेरा. काहीही न बोलता माझा निषेध तिच्यापर्यंत पोचला का ? कोण जाणे.
दुसरी मैत्री. फाटलेली. ठिगळ लावून मग पुढे खेचलेली.

कधी मोजदाद न केलेले प्रचंड हसतखेळत घालवलेले ते दिवस. त्याच कॉलेजच्या दिवसांतील ही तिसरी मैत्री. तेव्हा दर दिवस सोबतीत घालवलेला. एकमेकींच्या छोट्या छोट्या सुखदु:खाच्या गोष्टी वाटून घेतलेल्या. त्या दिवसांत, मानलेल्या भावाला राखी बांधण्याचा एक रिवाज. त्याला अनुसरून, तिने माझ्या त्यावेळच्या मित्राला भाऊ मानलेले. माझे त्याच्याशी लग्न झाले. संसाराच्या कधी हलक्या लाटा आल्या तर कधी झपाटलेला प्रलय आला. त्यात सावरण्याच्या प्रयत्नांत माझ्या ह्या तिसऱ्या मैत्रिणीला फोन करीत रहाणे वा पत्र व्यवहार करणे नाही जमले. तिची नाव, माझी नाव...वेगवेगळ्या धारेला वाहू लागल्या. निसर्गाच्या नियमानुसार. मला हे नाही कधी कळले, आमची मैत्री ही नको तितकी फोनवर अवलंबून होती. फोनच्या वायरीला लटकलेली ती अशक्त मैत्री, मी फोन करत नाही ह्या कारणास्तव कुठल्यातरी वर्षाला कधीतरी निसटून गळून गेली. एखाद्या फांदीला लटकलेल्या असंख्य थेंबांतील एखादा निखळावा व मातीत आपटून निशब्द फुटून देखील जावा. तिने नवीन घर घेतले. सजवले. एक दिवस आमच्या घराच्या खालून माझ्या नवऱ्याला गाडीत घालून ती स्वत:च्या नव्या घरी घेऊन गेली. सजवलेले घर मानलेल्या भावाला दाखवण्याची तिची इच्छा. ती मला कळली. परंतु, हे असे घराच्या खाली येऊन माझ्या नवऱ्याला गाडीत घालून परस्पर घेऊन जाणे...मला दुखावूनच गेले.
मग, मी तिथे ठिगळ नाही लावले.

अगदी शिशुवर्गापासुन प्रगतीपत्रकावर 'हळवी' हे विशेषण मी घेत आले. हळूहळू एक गैरसमज झाला. वाटू लागले की हा एक गुण आहे. अवगुण नव्हे. ना कधी अनुभवी आईबाबांनी सांगितले. बाई गं, 'हळवे' असणे बरे नव्हे. ह्यावर काम कर..हा अवगुण झटकून टाक. जगणे सोपे जाईल.

आज मन दगड. परंतु, तो दगड अतिशय मांसल अश्या काळजाच्या तुकड्यावर ठेवलेला. दाबून चिरडून ठेवलेले काळीज कधी हलकेच लबलबते...दगड डुचमळतो. छिद्रांनी पोखरलेल्या काळजाचे दिवस भरल्याची जाणीव होते. मग हात थरथरतात...कोरडे ठणठणीत झालेले डोळे झोंबू लागतात.
त्या निष्पाप मैत्रींची आठवण. ते हसणारे दिवस. ती निरागस पत्रे. त्या जखमा. व त्या वेदना.

मैत्रीकडे गंभीरतेने बघावे. हृदयाशी धरावे. तिचा आदर करावा. तिचा मान ठेवावा. हलक्याफुलक्या दिवसांची ती. नाजूक मैत्री. तिला ओंजळीत जपावे. परंतु ती ओंजळ....असावी दोन हातांची. एक हात तुझा...एक हात माझा. मग कधी तू हात काढून घेतलास...एक झोका आला...कापूस उडून गेला तर तो कधी भरकटला, कुठे विसावला की सोसाट्याच्या वादळात पिंजून गेला...काय मी त्यामागे धावू ? का उगा त्या विस्कटलेल्या कापसाचे कोळीष्टक हृदयाशी जोडू ?

माझी ओंजळ तुटली...एव्हढेच मी जाणे.

21 comments:

rajiv said...

मैत्री..
बालपणीच्या...मौसमातील ती ती फुले..त्यावर पुन्हा तीच फुले कशी फुलणार...त्यांचा तो मौसम तर कधीच निघून गेला. वाट बघणेच चुकीचे.!!

" तिला ओंजळीत जपावे. परंतु ती ओंजळ....असावी दोन हातांची. एक तुझ्या व एक माझ्या."

`अप्रतिम !!'
खरेय अनघा , मैत्री ओंजळी ऐवजी एका हातात आली की सांभाळता सांभाळता कधीतरी बोटांच्या फटीतून झिरपूनच जाते. आणि मग कधीतरी कोरड्या बोटांचा,ओलाव्याचा भास पण कोरडा करून टाकावा लागतो ...

neela said...

friendship is holding tight when it is going away... also friendship is letting go when it is time to do so...
अशा अर्थाचं १ वाक्य वाचलं होतं .... ते आठवलं....

अपर्णा said...

मैत्रीलाही एक चष्मा असतो..नाही का?? जोवर दोघांचे चष्मे एकंच आहेत तोवर सारं काही आलबेल असतं..आणि एकदा ते बदलले की मग समोरच्याला जे स्पष्ट दिसत असेल तेच नेमक आपल्याला धुरकट दिसणार...कदाचित समोरचाही काही दुसऱ्या कारणाने हळवा होत असेल ग....सध्याच्या काळात येईल तस माणसांना समोर जायचं इतकाच आपल्या हाती उरतं...

हेरंब said...

कॉमन सेन्स वापरणं एवढं अवघड असतं??

As they say 'Common sense is not common' !!

Gouri said...

सुंदर!
अपर्णा + १

Raindrop said...

sensitivity is a crutch when it comes to life but a talwar when it comes to creativity. I am sad to hear about the lost friendships :(

Anagha said...

सगळीच नाती...नाही का राजीव ? नाती जर ओंजळीत जपायची असतात तर ती दोन हातांची ओंजळ दोघांच्या हातांची असावी..नाही का ? :)

Anagha said...

नीला... :)

Anagha said...

खरं आहे अपर्णा...फक्त त्या कोवळ्या वयातील मैत्रींची गणितच वेगळी असतात...नाही का ? :)

Anagha said...

हेरंबा, कॉमन सेन्स कधी आणि कुठे वापरण्याबद्दल बोलतोयस ? नाही कळलं... :)

Anagha said...

गौरी, धन्यवाद गं. :)

Anagha said...

Vandu... :)

BinaryBandya™ said...

सुंदर ..
एक लहानसं कारण होतं अन मग उरते ठिगळा- ठिगळाणी जोडलेली मैत्री :(

Anagha said...

बंड्या, ठिगळांची नाती...ठिगळांची मैत्री.... :(

हेरंब said...

सॉरी. आता वाचल्यावर मलाही माझी कमेंट अर्धवट वाटते आहे. मला असं म्हणायचं होतं की मित्र म्हणून असं वागणं हे तर साफच चूक आहे. पण मैत्री म्हणून नाही तर निदान कुठे काय बोलावं याचा एक साधा कॉमन सेन्स असू नये का माणसाला?

Anagha said...

हो ना हेरंबा... माणसं काहीही कुठेही बोलू शकतात ! आणि मला दोन कान दिलेत आणि त्याच्यामध्ये हे जड डोकं दिलंय ! त्यामुळे हे असं सगळं त्यात अडकून बसतं !
( हे लिहून खरं तर रडकं स्मायली टाकणार होते...पण लिहिल्यावर मला हसायलाच आलं ! हेहे ! :) :D )

भानस said...

जशी एका हाताने टाळी वाजत नाही तशीच मैत्रीही कोणा एकाच्या मनात आहे म्हणून होत नाही. कोवळ्या वयातली मैत्री म्हणूनच कदाचित आयुष्यभर तितकीच निखळ, निस्वार्थी राहते.

राजीव +१. ओलाव्याचे भासच वारंवार ठिगळं लावण्यास प्रवृत्त करतात आणि सापडतो तो पुन्हा पुन्हा तितकाच कोरडेपणा...

Shriraj said...

हेरंबचे म्हणणे पटले; पण तो म्हणतो तसला 'साधा कॉमन सेंस' माझ्याकडे ही नाहीये. मी ही असाच कधीतरी येडपटासारखं बोलून जातो आणि मग पश्चातापाची पाळी येते :(

Anagha said...

आभार गं भाग्यश्री. :)

Anagha said...

तुझी का बरं बोलती बंद झाली सौरभा ? :)

Anagha said...

श्रीराज ! :D