नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 14 June 2011

वाचन

१५ दिवस वाचन केलं. काही सुंदर काही सुमार. कदाचित अगदी सुमार नाही म्हणता येणार. कारण नावे मोठी आहेत. परंतु, न आवडलेली असे मात्र म्हणता येईल.

झोंबी
आनंद यादव.
ज्याला मराठी वाचता येते त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावयास हवे. 'शाळा' हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक आपल्याला शालेय जीवनाचे एक रूप दाखवते. तर आनंद यादवांचे 'झोंबी' हे शाळेत जाण्याचा आपण केलेला कंटाळा आठवून एक शरमेची भावना मनास स्पर्श करते. पाठ्यपुस्तकात ह्याचा काही भाग समाविष्ट आहे की नाही ह्याची जाणीव नाही. केला जावा असे मात्र वाटले. पु. ल. देशपांडे प्रस्तावनेत म्हणतात...आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायीभाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरु झालाच आहे. हे व्हायला हवेच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे ते या 'झोंबी' सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथांनीच !
डिसेंबर १९८७ साली ह्याची पहिली आवृत्ती छापली आहे. गांधी हत्येचा उल्लेख पुस्तकात आहे...मग थोडे गणित केले तर पुस्तकाचा कालावधी अंदाजे १९४० च्या आसपासचा असावा. मग भारतातील शिक्षणाविषयीची जागरूकता...आज काय वेगळी आहे ?
अस्वस्थ. अवाक !

गंधर्वयुग
गंगाधर गाडगीळ.
बाल गंधर्व चित्रपट बघितला व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचावयास घेतले. सुरुवातीलाच गाडगीळांनी सांगितले आहे की हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी काहीही नवीन अभ्यास केलेला नाही. तर इतरांनी केलेल्या अभ्यासावर आधारित ही कादंबरी आहे. अभ्यास नाही केला तरी ठीक होते. परंतु, घटना सांगताना त्यातील व्यक्तींविषयी सरधोपट विधाने करून टाकली नसती तर उगाच मनाला त्रास नसता झाला. जगभरातील माणसांमध्ये फक्त काळा व पांढरा हे दोनच रंग नसतात तर त्यातील असंख्य करड्या छटांमधेच तर माणसे घडतात. असे मला वाटते. वरवर बघून कोणाबद्दल मते बनवून टाकणे व समाजापुढे ठेवणे हे अन्यायकारक व उथळ वाटते.

रण / दुर्ग
मिलिंद बोकील.
स्त्री म्हणून पुढारलेल्या समाजात जगताना होणारे मानसिक हिंदोळे. वर्तमानपत्रातून ह्या पुस्तकाविषयी काय परीक्षण आले काही कल्पना नाही. माझ्या मनाला मात्र एक स्त्री असूनही फारसे जवळचे नाही वाटले. उगाच फाफटपसारा देखील भरपूर वाटला. पुस्तक अजून कमी पृष्ठांचे झाले असते !

ओपन
आंद्रे अगासी.
काही महिन्यांपूर्वी सुरु केले. परंतु, लेकीने पळवले. व मग माझे राहून गेले. अप्रतिम. टेनिस मधील मला काही कळते असे अजिबात नाही. उलट शून्य कळते. परंतु हे पुस्तक टेनिसबद्दल नाहीच. अतिशय सुंदर. सोप्पे सरळ इंग्लिश. मनातून कागदावर उतरलेले. शेवटच्या पानावरील एक्नॉलेजमेंटमध्ये अगासीने ह्या लिखाणाचे श्रेय दिले आहे त्याचे मित्र आणि पुलीझ्झर बक्षिसाचे माननीय विजेते, जे. आर. मोहरिंगर ह्यांना. मुखपृष्ठावर त्यांचे नाव टाकावे ही आगासीची इच्छा. परंतु, मोहरिंगर ह्यांना वाटले...Only one name belonged on the cover. Though proud of the work we did together, he said he couldn't see signing his name to another man's life. काय पुस्तक आहे ! अगासी आवडो न आवडो. पुस्तक वाचावयासच हवे !

पुस्तक...पुस्तक....पुस्तक.
वाचावं....व मनोमन समजून जावं...
अक्षर...त्यातून शब्द...मग वाक्य...परिच्छेद...एक पान...दुसरे पान...आणि मग शेवटचे पान...
...हवा...जशी सायकलीमध्ये भरतो...टप्प्याटप्प्याने.
...पुढील रस्ता काटण्यासाठी...
...हा प्राणवायू...माझ्यासाठी.

26 comments:

rajiv said...

भारतातील शिक्षणाविषयीची जागरूकता...आज काय वेगळी आहे ?..... खरेय तुझे म्हणणे !!
२०११ आले तरी अजूनही शिक्षण मुठभर लोकांनाच परवडू शकते .. !!
जे. आर. मोहरिंगर > Only one name belonged on the cover. ... his name to another man's life.
केव्हढा हा विरोधाभास आपल्या येथील वांग्मयचोर्य लक्षात घेतले तर ...

पुस्तक...
पुढील रस्ता काटण्यासाठी. हा प्राणवायू...माझ्यासाठी.

खूपच छान विचार दिलायस या आंतरजाळाच्या रेट्याच्या काळात !!

अपर्णा said...

I loooooooooooove tennis...so probly I am gonna go for the one...

बाकीची वाचते म्हटल तरी देणारे कोण...:P

Raindrop said...

hmm...open is at home..will read...the others u can tell me the gist of them :) me vachayala ghetli tar ayushya zail majha....

सौरभ said...

मी तुमच्याकडे लायब्ररी लावणारे... पैसे वाचतिल... आणि पुस्तक परत दिलं नाही तरी चालेल... हाय की नाय...

हेरंब said...

मस्तच.. झोंबी कधीपासून वाचायचं होतं.. राहून गेलंय.. 'ओपन' तू मागे एकदा सांगितल्यावर लगेच विशलिस्ट मधे गेलंय..

मीही गेल्या आठवड्यात 'शाळा' आणि 'दुनियादारी' संपवली. आत्ता 'आहे मनोहर तरी' चालू आहे.

Anagha said...

राजीव, आभार. :)

Anagha said...

अपर्णा, ओपन वाचच. अतिशय सुंदर लिहिलेलं आहे.

आणि आता आलीस की 'झोंबी' मिळव ! ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये शालेय शिक्षण हा विषय आहे. परंतु, दोन्ही व्यक्तींसाठी त्याचे महत्त्व फार वेगळे आहे. :)

Anagha said...

ओपन वाचलंस की सांग मला वंदू. मग त्यावर गप्पा मारू ! :)

Anagha said...

सौरभ, भेटलास की 'झोंबी' तर मी देणारच आहे तुला!
आणि लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडील सगळ्या पुस्तकांचे मी वाचनालय चालवत असे ! सगळी व्यवस्थित नोंद ठेवून ! :D

हेरंब said...

>> सगळी व्यवस्थित नोंद ठेवून ! :D

आता सौरभचा तुझं वाचनालय लावण्यातला इंटरेस्ट संपला ;)

BinaryBandya™ said...

झोंबी माझं पण आवडतं पुस्तक आहे .
आणि हो मी शाळेत असताना होता एक धडा आम्हाला झोंबी म्हणून :)
पण आता अभ्यासक्रम बदलला आहे ..

ओपन घेईन आता वाचायला :)

आणि हो सचिन कुंडलकरचे "कोबाल्ट ब्लू " काल-परवाच वाचून संपवले - नाही आवडले ..

Anagha said...

हेरंबा, हो ना ! बघ गायबलाच तो ! :D

Anagha said...

बंड्या, होता ना धडा ! छान !...असायलाच हवा...:)

मीही वाचलंय कोबाल्ट ब्लू...आणि काही आवडलं नव्हतं...

सचिन उथळे-पाटील said...

झोंबी वाचताना मन हेलावून जात ...
काय परिस्थितीत शिकले ना डॉ. यादव.

गावाकडे अजूनहि काही भागात अशी परिस्थिती आहे. अजूनहि मजुरी करणारी आई पोराच्या शिक्षणासाठी धडपडत आहे तर बाप पोराला कामाला जुन्पायला पाहतोय.

अगदी दहावीच्या परीक्षा देखील मुले सकाळी काम करून पेपर द्यायला जातात. अगदी डोळ्यासमोरची उदाहरण आहेत.

Anagha said...

खरंय सचिन...मी आईला वाचायला दिलं तर तिने सुरुवात वाचली आणि बाजूला ठेवून दिलं...मी आपली तिला सांगत राहिले...की अगं, तसल्या परिस्थितीत राहून पुढे शिकणं ही मोठी गोष्ट नाही काय ? म्हणून तरी वाच ! पण नाही वाचू शकली ती ! :(

विनायक पंडित said...

अनघा! झोंबी+++++++++१००! :)

Anagha said...

हेरंबा, आता जी. ए. कुलकर्ण्यांचं 'पारवा' सुरु केलंय. :)

Anagha said...

विनायक तुम्हांला पण आवडतं ना 'झोंबी' ?! कसलं पुस्तक आहे !

आनंद पत्रे said...

झोंबी आणि ओपन मागवतोय आता :)

भानस said...

” झोंबी ’प्रत्येकाने जरुर वाचावे असेच पुसक. यादवकाकांकडे गेल्यावर खूप चर्चा झालेली. ग्रेट माणूस. अगं, ओपन अजूनही नाही झाले का पुरे? मी आले तेव्हां मैत्रेयी वाचत होती.

बाकीची दोन्ही मी वाचलेली नाहीत. पाहू कधी हाताशी येतात ते.

शेवटच्या परिच्छेदाशी +१००.

Anagha said...

आनंद, नक्की वाच ! आणि मग सांग कशी वाटली ही दोन पुस्तक ते ! :)
एक शिक्षणासाठी जीवतोड प्रयत्न करणाऱ्याची आत्मकथा...तर दुसरी शाळेच्या वाईट स्वरूपाला घाबरून स्वेच्छेने शाळा सोडून देणाऱ्या खेळाडूची आत्मकथा ! :)

Anagha said...

अगं भाग्यश्री, 'ओपन' लेकीने पळवले आणि मग माझे राहून गेले. गेल्या पंधरा दिवसात मात्र खाली ठेवले नाही ! तूही नक्की वाच ! सोडू नकोस ! 'झोंबी' आणि 'ओपन' ही दोन्ही पुस्तकं वाचून काय सही वाटलंय गं मला ! बाकीची दोन्ही नाही वाचलीस तरी काहीही बिघडणार नाही आयुष्यातलं ! :)

Prof. Narendra Vichare said...

अनघा,
मी झोंबी वाचेनच. पण तू माझ्या फेसबुक वरील एक video जरूर बघ. उत्तर प्रदेशातल्या खेड्यातील एका शेतकरी बापाने मुलाला आय ए एस करण्यासाठी काय काय केले आणि काय करण्याची तयारी दाखविली ते जरूर ऐक. त्या मुलाखतीतील शब्दन शब्द ऐक आणि ऐकताना जर डोळे भरून आले किंवा हुंदका आला तर मुकाट्याने सहन कर.. माझ्यासारखे.......
विचारे सर.

रोहन... said...

वाचन कमी-अधिक, थोडे-बहुत पण सुरू असतेच... :) जेंव्हा पुस्तक वाचन जमत नाही तेंव्हा निसर्ग वाचन... :)

Anagha said...

सर, बघितलीय मी ती मुलाखत. आहे ती हृदयद्रावक. :(

Anagha said...

खरंय रोहन, तुझं निसर्ग वाचन पण जोरात चालू असतं.. :)
धन्यवाद रे.